वैद्यकातील प्रभावी नोबेल-विजेते संशोधन : भाग ४
टीप: या लेखमालेचे पाहिले ३ भाग म भा दिनाच्या उपक्रमा अंतर्गत प्रकाशित झालेले आहेत.
( भाग ३: https://www.maayboli.com/node/69129)
*****************
१९३० चे नोबेल
या संशोधनाचा तपशील असा आहे:
विजेता संशोधक : Karl Landsteiner
देश : ऑस्ट्रिया
संशोधकाचा पेशा : औषधवैद्यक व विषाणूशास्त्र
संशोधन विषय : मानवी रक्तगटांचा शोध
अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान समजले जाते. त्या खालोखाल कुठल्या दानाचा क्रमांक लावायचा? माझ्या मते अर्थात रक्तदान ! जेव्हा एखाद्या रुग्णाला काही कारणाने तीव्र रक्तस्त्राव होतो तेव्हा तो भरून काढायला दुसऱ्या माणसाचे रक्तच लागते. विज्ञानाने कितीही प्रगती केलेली असली तरी हुबेहूब मानवी रक्त प्रयोगशाळेत तयार करणे अद्याप तरी जमलेले नाही. अशा वेळी माणसाला गरज असते ती मानवी रक्तदात्याचीच. अशा वेळेस आपण एखाद्या निरोगी आणि रक्तगट जुळणाऱ्या दात्याची निवड करतो. या दात्याचे रक्त जेव्हा संबंधित रुग्णास दिले जाते त्या प्रक्रियेस रक्तसंक्रमण (transfusion) म्हणतात.
सर्व माणसांचे रक्त जरी एकाच रंगाचे असले तरी त्यांचे ‘गट’ निरनिराळे असतात हे आपण आज जाणतो. परंतु हा मूलभूत शोध अनेक वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमानंतर लागलेला आहे. त्यासाठी हे संशोधन काही शतकांत अनेक टप्प्यांतून गेलेले आहे. त्याचा इतिहास आता जाणून घेऊ.
रक्तसंक्रमणाचे प्रयोग इसवी सनाच्या पंधराव्या शतकापासून सुरु झाले. जेव्हा एखाद्या रुग्णास रक्ताची गरज असे तेव्हा त्याकाळी त्याला एखद्या प्राण्याचे अथवा निरोगी व्यक्तीचे रक्त काढून पिण्यास देत ! किंबहुना यातूनच ‘रक्तपिपासू’ भुताची दंतकथा रुजली असावी. अर्थातच असे प्रयोग अयशस्वी ठरले. त्यातून असा निष्कर्ष निघाला की रक्तसंक्रमण हे शिरेतूनच (vein) झाले पाहिजे. १७व्या शतकाच्या उत्तरार्धात एका प्राण्याचे रक्त दुसऱ्या प्राण्यास देऊन असे प्रयोग झाले. त्यानंतरच्या टप्प्यात सस्तन प्राण्याचे रक्त माणसास दिले गेले. काही प्रयोगांत माणसाचे रक्त कुत्र्यास दिले गेले. मात्र त्यात कुत्रा नंतर मरण पावला. असे बरेच वेळा दिसल्यानंतर एक महत्वाचा निष्कर्ष निघाला.
तो असा की, एका प्राणिजातीचे (species) रक्त अन्य जातीस चालणार नाही. पुढे ते प्रयोगशाळेत सिद्ध केले गेले. त्या प्रयोगात जेव्हा एका प्राण्याच्या रक्तपेशी जेव्हा दुसऱ्या जातीच्या रक्ताबरोबर मिसळल्या जात तेव्हा त्या २ मिनिटांतच फुटून जात. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे, माणसाला रक्ताची गरज भासल्यावर माणसाचेच रक्त दिले पाहिजे.
अखेर इ.स. १८१८मध्ये इंग्लंडमध्ये एका माणसाचेच रक्त दुसऱ्यास संक्रमित करण्याचा प्रथम प्रयोग झाला. James Blundell या प्रसूतीतज्ञास त्याचे श्रेय जाते. प्रसूतीनंतर रक्तस्त्राव झालेल्या स्त्रीत त्याने असे संक्रमण यशस्वी केले. या घटकेला मानवी रक्तगटांचे ज्ञान झालेले नव्हते ही बाब उल्लेखनीय आहे ! म्हणजेच वरील घटनेत दाता व रुग्ण यांचे ‘गट’ योगायोगानेच जुळले असले पाहिजेत. इथपर्यंतचा अभ्यास हा Karl Landsteiner यांच्या पुढील संशोधनासाठी पाया ठरला.
सन १९०० मध्ये कार्ल हे व्हिएन्नातील एका संशोधन संस्थेत काम करीत होते. त्यांनी वेगवेगळ्या माणसांचे रक्तनमुने गोळा करून त्यांच्यावर प्रयोग चालू केले. आपल्या रक्तात पेशी आणि द्रव भाग (serum) असे दोन घटक असतात. या प्रयोगांत पेशींपैकी त्यांनी लालपेशीवर लक्ष केंद्रित केले होते. त्यांच्या प्रयोगात एका माणसाच्या लालपेशी दुसऱ्या माणसाच्या serum बरोबर मिसळल्या जात. हे प्रयोग अनेक जणांचे रक्तनमुने घेऊन करण्यात आले. त्यापैकी काही मिश्रणे व्यवस्थित राहिली. पण, अन्य काहींत लालपेशींच्या गुठळ्या (clumps) झाल्या. यातून असा निष्कर्ष निघाला की काही माणसांच्या लालपेशीच्या आवरणात विशिष्ट antigens असतात तर अन्य काहींच्या नसतात. या अनुषंगाने त्यांनी माणसांची तीन रक्तगटांत विभागणी केली: A, B आणि C. याचा अर्थ असा होता:
A गटाच्या रक्तात लालपेशीत ‘A’ हा antigen असतो.
B गटाच्या रक्तात लालपेशीत ‘B’ हा antigen असतो आणि,
C गटाच्या रक्तात लालपेशीत कुठलाच antigen नसतो.
त्याचबरोबर त्यांच्या हेही लक्षात आले की एखाद्या रुग्णास समान गटाचे रक्त दिल्यास त्याच्या लालपेशीना कुठलीच इजा पोहोचत नाही. मात्र अन्य गटाचे रक्त दिल्यास धोका पोहोचतो. अशा प्रकारे या घटकेला या संशोधनाचा पाया तयार झाला. पुढे कार्ल यांच्या विद्यार्थ्यांनी एक चौथा गट शोधला आणि त्याला AB हे नाव दिले. या गटाच्या रक्तातील लालपेशीवर A व B हे दोन्ही antigens असतात. पुढे अधिक विचारांती C गटाचे O असे नामांतर झाले. या O चा अर्थ ‘शून्य’(antigen) असा आहे. अशा रीतीने ही ४ रक्तगटांची एक प्रणाली तयार झाली आणि त्याचे A, B, O व AB हे प्रकार ठरले. या संशोधनावर आधारित पहिले रक्तसंक्रमण १९०७मध्ये न्यूयॉर्कमध्ये केले गेले.
आता आपण या चारही गटांचा अर्थ समजून घेऊ (चित्र पाहा).
A = लालपेशीत A antigen आणि सिरममध्ये anti-B हे प्रथिन.
B = लालपेशीत B antigen आणि सिरममध्ये anti-A हे प्रथिन.
AB = लालपेशीत A व B हे दोन्ही antigens आणि सिरममध्ये कोणतेच विरोधी प्रथिन (antibody) नाही.
O = लालपेशीत कोणताही antigen नाही आणि सिरममध्ये anti-A व anti-B ही दोन्ही प्रथिने.
यातून रक्तसंक्रमणासंबंधी खालील महत्वाचे निष्कर्ष निघाले:
१. समान रक्तगटाची माणसे एकमेकास रक्त देऊ शकतात.
२. O गटाचे रक्त अन्य तिन्ही गटांस दिल्यास काही बिघडत नाही कारण या लालपेशीत कोणताच antigen नसतो. त्यामुळे हे रक्त घेणाऱ्यांच्या रक्तात कोणतीच ‘प्रतिक्रिया’(immune reaction) उमटत नाही.
३. AB गटाची माणसे अन्य तिन्ही गटांचे रक्त स्वीकारू शकतात कारण त्यांच्या सिरममध्ये A वा B ला विरोध करणारी प्रथिने तयार होतच नाहीत.
या क्रांतीकारी संशोधनाबद्दल कार्लना १९३०मध्ये नोबेल दिले गेले. हे संशोधन अत्यंत मूलभूत असल्याने त्यांना रक्तसंक्रमणशास्त्राचा पिता म्हणून ओळखले जाते.
यानंतर वैद्यक व्यवसायात अनेक रक्तसंक्रमणे होऊ लागली. त्यासाठी दाते निवडताना फक्त वरील ABO या प्रणालीचाच विचार होत होता. परंतु कार्ल यांचे संशोधन अद्याप चालूच होते. त्यांच्या मते लालपेशीत या प्रणालीखेरीज अन्य काही प्रकारचे antigensही असण्याची शक्यता होती. अखेर त्यांच्या परिश्रमास १९३७मध्ये यश आले. आता अन्य एका सहकाऱ्यासमवेत त्यांनी Rh या नव्या antigenचा शोध जाहीर केला. Rh हे नाव देण्यामागे एक कारण होते. तेव्हा त्यांना असे वाटले की आपल्या लालपेशीतला हा antigen ‘Rhesus’ माकडाच्या पेशींत असलेल्या antigen सारखाच आहे. पुढील संशोधनात असे आढळले की माणूस व माकडातील हे antigens वेगवेगळे आहेत. त्यामुळे आता Rh हे नाव शास्त्रीयदृष्ट्या बरोबर नसले तरीही ऐतिहासिक कारणासाठी ते टिकून आहे.
आता रक्तगट प्रणालींत ABOच्या जोडीला Rhची भर पडली. त्यानुसार माणसांचे २ गट पडले:
लालपेशीत Rh(D) हा antigen असल्यास त्याला Rh-positive म्हणायचे आणि,
लालपेशीत Rh(D) हा antigen नसल्यास त्याला Rh-negative म्हणायचे.
आज आपण आपला रक्तगट सांगताना वरील दोन्ही प्रणालींचा वापर करतो. उदा.: A, Rh-positive.
Rh प्रणालीच्या शोधानंतर रक्तदानासाठी “सार्वत्रिक दात्या”ची व्याख्या सुधारण्यात आली. त्यानुसार O, Rh-negative हा गट असलेली व्यक्ती सार्वत्रिक दाता ठरते. अर्थात रक्तसंक्रमणापूर्वी दाता व रुग्ण यांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पूर्णपणे “match” करून आणि दात्याचे अन्य काही निकष बघूनच योग्यायोग्यतेचा निर्णय घेतला जातो.
कार्ल यांनी वरील शोधाव्यतिरिक्तही अन्य संशोधन केले आहे. ते रोगप्रतिकारशक्ती आणि allergy या संदर्भात आहे. तसेच त्यांनी अन्य सहकाऱ्याच्या मदतीने पोलिओच्या विषाणूचा शोध लावलेला आहे. ते अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी आहेत.
सन १९१०च्या दरम्यान अन्य काही संशोधकांनी रक्तगट हे अनुवांशिकतेने पुढच्या पिढीत संक्रमित होतात हे सिद्ध केले. पुढे त्याचा उपयोग वादग्रस्त पितृत्वासंबंधीच्या दाव्यांमध्ये करता आला.
.......
काही आजार वा शस्त्रक्रियादरम्यान रुग्णास रक्तस्त्राव होतो. अन्य काही आजारांत शरीरात निरोगी रक्त तयार होत नाही. अशा सर्व प्रसंगी रुग्णास अन्य व्यक्तीचे रक्त द्यावे लागते. त्या प्रसंगी ते जीवरक्षक ठरते. आपल्या अनेक सामाजिक कर्तव्यांत रक्तदान हेही समाविष्ट आहे. त्यासाठी आपल्या प्रत्येकाला स्वतःचा रक्तगट माहित असणे अत्यावश्यक आहे. रक्तगटांच्या मूलभूत शोधामुळे वैद्यकातील रक्तसंक्रमण निर्धोकपणे करता येऊ लागले. हा क्रांतिकारी शोध लावणाऱ्या कार्ल यांना वंदन करून हा लेख पुरा करतो.
******************
(चित्र जालावरून साभार).
ओ blood group म्हणजे कोणतेच
ओ blood group म्हणजे कोणतेच antigen नाही. कोणाला ही चालते.
ह्या मध्ये ओ positive आणि ओ निगेटिव्ह दोन्ही ग्रुप आहेत का ?
ओ positive aani ओ निगेटिव्ह म्हणजे काय
ओ positive आणि ओ निगेटिव्ह
ओ positive आणि ओ निगेटिव्ह दोन्ही ग्रुप आहेत का ? >>>
अर्थात दोन्ही आहेत.
ए बी ओ ही रक्तगटांची एक प्रणाली तर आर एच ही दुसरी प्रणाली आहे .
त्यामुळे, एखादी व्यक्ती पहिल्या प्रणालीनुसार O असली तरी तिच्या लालपेशींमध्ये आरएच antigen आहे किंवा नाही यावर ती Rh+ / Rh negative ठरते.
म्हणूनच आपला रक्तगट हा संयुक्तरीत्या लिहिला जातो. उदा.
O Rh +ve
AB Rh -ve , इ.
H ह्या प्रणाली मध्ये कोणते
H ह्या प्रणाली मध्ये कोणते blood group आहेत
Dr ह्या सविस्तर लिहा .
O रक्त गट निगेटिव्ह आहे की paisitve आणि A,ab,B रक्त गट positive aahe ki निगेटिव्ह
हे ठरवण्याची पद्धत वेगळी आहे
हा फरक समजून सांगा
Hh = H antigen असणे.
Hh = H antigen असणे. बहुसंख्याक लोकांमध्ये हा आहे.
hh= Oh= Bombay phenotype (म्हणजेच H नसणे). याचे प्रमाण खूप कमी आहे.
Sir प्लिज सविस्तर लिहा ओ रक्त
Sir प्लिज सविस्तर लिहा ओ रक्त गट विषयी.ज्या मध्ये कोणतेच antigen नसते
आता अजून थोडी गुंतागुंतीची
आता अजून थोडी गुंतागुंतीची माहिती:
H पासूनच A व B तयार होतात.
म्हणजेच,
जर एखाद्याच्या रक्तात H नसेल, तर तो ABO या प्रणालीनुसार O (म्हणजेच शून्य) ठरतो.
…
H /h बद्दलची माहिती लक्षात घेतली नाही तर पितृत्वाच्या वादग्रस्त दाव्यांमध्ये गैरसमज होऊ शकतात.
हेमंत
हेमंत
तुम्ही लेख पुन्हा एकदा नीट वाचा. अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे .
O म्हणजे शून्य असा खरा अर्थ आहे. म्हणजेच ए किंवा बी अंटीजन नसणे
धन्यवाद डॉक्टर.
धन्यवाद डॉक्टर.
आर एच निगेटीव्ह मातेला जर आर
आर एच निगेटीव्ह मातेला जर आर एच पॉसिटीव्ह बाळ होणार असेल तर बाळात रक्तस्रावाचे विकार होण्याची शक्यता असते
हा धोका पहिल्या बाळंतपणात नसतो. गर्भारपणापासून बाळंतपणापर्यंत कुठल्याही कारणाने Rh- Positive बाळाचे रक्त Rh- Negative आईच्या रक्तात मिसळले तर आईच्या रक्तात Rh - Positive विरुद्ध अँटिबॉडीज तयार होतात, पुढील अर्भक जर Rh - Positive असेल तर त्या अर्भकास वरील धोका संभवतो.
एक दुर्मिळ प्रकारचा रक्तगट :
एक दुर्मिळ प्रकारचा रक्तगट : Rh null
हा साठ लाख लोकांमध्ये एकात आढळतो. असा रक्तगट असणाऱ्या व्यक्तींचे पालक
जवळच्या रक्ताच्या नात्यातले असतात. अशा व्यक्तीच्या रक्तातील लाल पेशी अल्पायुषी असतात.
इराणमध्ये याचे प्रमाण बऱ्यापैकी आहे.
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC6305262/
सध्या रक्तपेढ्यांना
सध्या रक्तपेढ्यांना प्लेटलेटचा तुटवडा जाणवत असल्याचा वर उल्लेख केलेला आहे. त्या संदर्भातील एक कौतुकास्पद कार्य :
श्री सचिन मराठे हे त्यांच्या कॉलेज जीवनापासूनच नियमित रक्तदाते आहेत. 2010 पासून ते पुण्यातील एका रक्तपेढीत महिन्यातून एकदा असे नियमित प्लेटलेट्स दान करतात. आतापर्यंत त्यांनी 130 वेळा असे दान केलेले आहे.
अभिनंदन !
रक्तसंक्रमणातून एचआयव्ही आणि
रक्तसंक्रमणातून एचआयव्ही आणि हिपॅटाइटिस यांचे विषाणू ( HIV, HBV, and HCV) संक्रमित होण्याचा धोका असतो. म्हणून प्रत्येक रक्तदात्याची यासंदर्भात संक्रमणपूर्व चाचणी केली जाते. हे तीनही विषाणू एकाच चाचणीने ओळखणारे NATSpert ID TripleH Detection Kit हे तंत्रज्ञान पुण्यातील मायलॅब डिस्कवरी सोल्युशन्स यांनी विकसित केलेले आहे. हे संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञान आहे.
या उपक्रमाबद्दल संबंधित उद्योगाला केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे राष्ट्रीय तंत्रज्ञान पुरस्कार दिला गेलेला आहे.
अभिनंदन !
https://www.freepressjournal.in/pune/pune-national-technology-award-for-...
रक्ताच्या पिशवीसाठी जादा
रक्ताच्या पिशवीसाठी जादा पैसे घेण्यावर बंदी; आता फक्त प्रक्रिया खर्च द्यावा लागणार; DCGI चा मोठा निर्णय
https://www.loksatta.com/desh-videsh/blood-not-for-sale-only-supply-dcgi...
.. दरम्यान, केंद्राकडून २०२२ मध्ये जारी करण्यात आलेल्या नियमावलीनुसार रक्तदात्याकडून घेण्यात आलेल्या रक्तावरचा प्रक्रिया खर्च हा १५५० रुपयांपेक्षा जास्त असू नये. लाल पेशी, प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स यांच्यासाठी अनुक्रमे १५५०, ४०० व ४०० रुपयांची मर्यादा घालून देण्यात आली होती...
दुःखद मृत्यूAB Rh+ रक्तगट
दुःखद मृत्यू
AB Rh+ रक्तगट असलेल्या सचिन शर्मा या २३ वर्षीय तरुणाला रुग्णालयाच्या चुकीने O Rh+ या गटाचे रक्त दिले गेले. परिणामी त्याच्या शरीरात घातक प्रतिक्रिया होऊन त्याचा मृत्यू झालेला आहे.
आदरांजली !
या घटनेच्या बातम्यांनुसार सचिनचा रक्तगट हा AB Rh+ होता आणि त्याला चुकून O Rh+ हे रक्त दिले गेलेले आहे.
म्हणून कुठलेही रक्त संक्रमण करण्यापूर्वी दाता व स्वीकारणारा यांच्या रक्ताचे प्रयोगशाळेत क्रॉस मॅचिंग करणे अत्यावश्यक असते.
O रक्तगटाचे काही उपप्रकार असे आहेत, की ज्यामध्ये आर एच व्यतिरिक्त अन्य अँटीजेन्सचा समावेश असतो. त्यांच्यामुळे वरील प्रकारची दुर्घटना घडली असावी.
अधिक चौकशीअंती गोष्टी स्पष्ट होतील.
https://www.indiatoday.in/india/story/rajasthan-man-dies-after-wrong-blo...
AB Rh+ रक्तगट असलेल्या सचिन
AB Rh+ रक्तगट असलेल्या सचिन शर्मा >>>> AB + ला कोणताही रक्तगट चालतो आणि O रक्तगट कोणालाही चालतो ( युनिवर्सल ऍक्सेप्टर आणि युनिवर्सल डोनर ) या कन्सेप्ट मुळे हि मोठी चूक झाली असेल (कदाचित ). AB + थोडा दुर्मिळ रक्त गट आहे.
म्हणून कुठलेही रक्त संक्रमण करण्यापूर्वी दाता व स्वीकारणारा यांच्या रक्ताचे प्रयोगशाळेत क्रॉस मॅचिंग करणे अत्यावश्यक असते. >> १००%
बातमीत दोन फोटो आहेत.
बातमीत दोन फोटो आहेत. दोन्हींमध्ये रुग्णाचे नाव आणि रक्तदात्याचे नाव अनुक्रमे एकच आहे. पण एका फोटोत दोघांचाही रक्तगट O Rh+ आणि दुसऱ्यात दोघांचाही AB Rh+ लिहिले आहे. दोन्हीतील सँपल नंबर आणि ऑपरेटरचे नाव वेगळे आहे. हा नक्की काय गोंधळ आहे कळेना. फोटो व्हायरल करणाऱ्याचा खोडसाळपणा की रुग्णालयाचा सारवासारव करण्याचा प्रयत्न.
O रक्तगटाचे काही उपप्रकार असे
O रक्तगटाचे काही उपप्रकार असे आहेत,>>>>
त्याला phenotype असे काही म्हणतात का? कारण मी नेहमी जिथे platelet donate करतो त्या blood bank मधून मला जेव्हा फोन येतो, तेव्हा ते म्हणतात, 'तुमचा आणि पेशंटचा phenotype match होतो आहे' म्हणून.
१. "O रक्तगट कोणालाही चालतो"
१. "O रक्तगट कोणालाही चालतो" >>>> हे एक सामान्य विधान म्हणून(च) ठीक आहे पण ते शंभर टक्के बरोबर नाही.
..
२. फोटोमध्ये गोंधळ आहे खरा.
३. O, A, B, and AB यांना
३. O, A, B, and AB यांना ABO phenotypes म्हणतात.
प्रत्येक type चे उपप्रकार हा वेगळा भाग आहे. त्यामध्ये ABO & Rh व्यतिरिक्त अन्य काही प्रणालींचा समावेश असतो
अतिशय दुर्दैवी परंतु टाळता
अतिशय दुर्दैवी परंतु टाळता आली असती अशी घटना.
आदरांजली.
मात्र रक्ताचे प्रयोगशाळेत क्रॉस मॅचिंग करणे अत्यावश्यक असते हे खरे आहे का? रुग्णालयाच्या खाटेवरील तीन व्यक्ती रुग्णाला नळीतून डायरेक्ट रक्त देत असल्याचे अद्भुत दृश्य पडद्यावर प्रत्यक्ष पहिल्याचा मी "चष्माधारक गवाह" आहे, त्यामुळे ही शंका.
>>>अद्भुत दृश्य
>>>अद्भुत दृश्य
होय अमर व अद्भुत
चालायचंच. चित्रपटातील
चालायचंच. चित्रपटातील दृश्यांमुळे गैरसमज पसरतात खरे.
भारतात 1952 मध्ये शोध
भारतात 1952 मध्ये शोध लागलेला ‘बॉम्बे’ रक्तगट हा एक दुर्मिळ रक्तगट आहे. सध्या भारतात असा रक्तगट असणारे सुमारे साडेचारशे जण नोंदले गेलेले आहेत.
हा रक्तगट असणाऱ्या पन्नास जणांचे कुटुंबीयांसह संमेलन नुकतेच मुंबईत झाले. त्याप्रसंगी त्यांनी दुर्मिळ रक्तगट असणाऱ्या लोकांची संगणकीय माहिती राष्ट्रीय पातळीवर उपलब्ध असावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.
बॉम्बे रक्तगट असणाऱ्या प्रवीण शिंदे यांनी एका प्रसंगी व्हिएतनामला जाऊन रक्तदान केलेले आहे.
https://www.timesnownews.com/india/what-is-bombay-blood-group-people-wit...
ओह
ओह
कहानी सिनेमा मुळे माहीत झाला हा.
‘बॉम्बे’ रक्तगट'
‘बॉम्बे’ रक्तगट'
या संदर्भात मुंबईतील विनय शेट्टी आणि केइएम रुग्णालय यांनी संयुक्तपणे राष्ट्रीय नोंदणी यंत्रणा उभारण्याचे काम सुरू केलेले आहे. आतापर्यंत त्यात नोंद झालेल्या साडेचारशे जणांमध्ये मुख्यतः महाराष्ट्र आणि दक्षिण भारतातील व्यक्तींचा समावेश आहे.
हैदराबादच्या सतीश म्हैसेकरांनी ( जे बॉम्बे गटाचे आहेत) आतापर्यंत 40 वेळा रक्तदान केलेले आहे.
अभिनंदन !
https://indianexpress.com/article/lifestyle/life-style/bombay-blood-grou...
काही विशिष्ट परिस्थितीत
काही विशिष्ट परिस्थितीत रुग्णाला रक्तातील प्लाझ्मा देण्याची गरज असते. याचा अनेकदा तुटवडा जाणवतो. जगातले काही देश प्लाझ्माची निर्यात करत असून यात अमेरिका आघाडीवर आहे. त्यांच्या प्रौढ लोकसंख्येपैकी एकूण आठ टक्के लोक प्लाझ्मादान करून त्या बदल्यात पैसे मिळवत आहेत. अनेक गरीब लोक या प्रकारे पैसे मिळवत असल्याने त्यातून काही नैतिक आणि आरोग्य सुरक्षाविषयक प्रश्न निर्माण झालेले आहेत :
https://finshots.in/archive/why-is-america-us-blood-plasma-trade-rising/....
रक्तदानाचा कौटुंबिक विक्रम
रक्तदानाचा कौटुंबिक विक्रम
अहमदाबाद येथील पटेल यांच्या एकत्र विस्तारित कुटुंबाने मिळून आतापर्यंत 630 लिटर रक्तदान केलेले आहे. त्यांच्यातील 16 जणांनी आतापर्यंत पन्नासहून अधिक वेळा रक्तदान केलेले आहे.
https://timesofindia.indiatimes.com/city/ahmedabad/this-patel-family-of-...
Pages