नोबेल-संशोधन(४) : रक्तगटांचा शोध

Submitted by कुमार१ on 5 March, 2019 - 22:08

वैद्यकातील प्रभावी नोबेल-विजेते संशोधन : भाग ४

टीप: या लेखमालेचे पाहिले ३ भाग म भा दिनाच्या उपक्रमा अंतर्गत प्रकाशित झालेले आहेत.
( भाग ३: https://www.maayboli.com/node/69129)
*****************
१९३० चे नोबेल
या संशोधनाचा तपशील असा आहे:

विजेता संशोधक : Karl Landsteiner
देश : ऑस्ट्रिया
संशोधकाचा पेशा : औषधवैद्यक व विषाणूशास्त्र
संशोधन विषय : मानवी रक्तगटांचा शोध

अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान समजले जाते. त्या खालोखाल कुठल्या दानाचा क्रमांक लावायचा? माझ्या मते अर्थात रक्तदान ! जेव्हा एखाद्या रुग्णाला काही कारणाने तीव्र रक्तस्त्राव होतो तेव्हा तो भरून काढायला दुसऱ्या माणसाचे रक्तच लागते. विज्ञानाने कितीही प्रगती केलेली असली तरी हुबेहूब मानवी रक्त प्रयोगशाळेत तयार करणे अद्याप तरी जमलेले नाही. अशा वेळी माणसाला गरज असते ती मानवी रक्तदात्याचीच. अशा वेळेस आपण एखाद्या निरोगी आणि रक्तगट जुळणाऱ्या दात्याची निवड करतो. या दात्याचे रक्त जेव्हा संबंधित रुग्णास दिले जाते त्या प्रक्रियेस रक्तसंक्रमण (transfusion) म्हणतात.

सर्व माणसांचे रक्त जरी एकाच रंगाचे असले तरी त्यांचे ‘गट’ निरनिराळे असतात हे आपण आज जाणतो. परंतु हा मूलभूत शोध अनेक वैज्ञानिकांच्या अथक परिश्रमानंतर लागलेला आहे. त्यासाठी हे संशोधन काही शतकांत अनेक टप्प्यांतून गेलेले आहे. त्याचा इतिहास आता जाणून घेऊ.
रक्तसंक्रमणाचे प्रयोग इसवी सनाच्या पंधराव्या शतकापासून सुरु झाले. जेव्हा एखाद्या रुग्णास रक्ताची गरज असे तेव्हा त्याकाळी त्याला एखद्या प्राण्याचे अथवा निरोगी व्यक्तीचे रक्त काढून पिण्यास देत ! किंबहुना यातूनच ‘रक्तपिपासू’ भुताची दंतकथा रुजली असावी. अर्थातच असे प्रयोग अयशस्वी ठरले. त्यातून असा निष्कर्ष निघाला की रक्तसंक्रमण हे शिरेतूनच (vein) झाले पाहिजे. १७व्या शतकाच्या उत्तरार्धात एका प्राण्याचे रक्त दुसऱ्या प्राण्यास देऊन असे प्रयोग झाले. त्यानंतरच्या टप्प्यात सस्तन प्राण्याचे रक्त माणसास दिले गेले. काही प्रयोगांत माणसाचे रक्त कुत्र्यास दिले गेले. मात्र त्यात कुत्रा नंतर मरण पावला. असे बरेच वेळा दिसल्यानंतर एक महत्वाचा निष्कर्ष निघाला.

तो असा की, एका प्राणिजातीचे (species) रक्त अन्य जातीस चालणार नाही. पुढे ते प्रयोगशाळेत सिद्ध केले गेले. त्या प्रयोगात जेव्हा एका प्राण्याच्या रक्तपेशी जेव्हा दुसऱ्या जातीच्या रक्ताबरोबर मिसळल्या जात तेव्हा त्या २ मिनिटांतच फुटून जात. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे, माणसाला रक्ताची गरज भासल्यावर माणसाचेच रक्त दिले पाहिजे.

अखेर इ.स. १८१८मध्ये इंग्लंडमध्ये एका माणसाचेच रक्त दुसऱ्यास संक्रमित करण्याचा प्रथम प्रयोग झाला. James Blundell या प्रसूतीतज्ञास त्याचे श्रेय जाते. प्रसूतीनंतर रक्तस्त्राव झालेल्या स्त्रीत त्याने असे संक्रमण यशस्वी केले. या घटकेला मानवी रक्तगटांचे ज्ञान झालेले नव्हते ही बाब उल्लेखनीय आहे ! म्हणजेच वरील घटनेत दाता व रुग्ण यांचे ‘गट’ योगायोगानेच जुळले असले पाहिजेत. इथपर्यंतचा अभ्यास हा Karl Landsteiner यांच्या पुढील संशोधनासाठी पाया ठरला.

सन १९०० मध्ये कार्ल हे व्हिएन्नातील एका संशोधन संस्थेत काम करीत होते. त्यांनी वेगवेगळ्या माणसांचे रक्तनमुने गोळा करून त्यांच्यावर प्रयोग चालू केले. आपल्या रक्तात पेशी आणि द्रव भाग (serum) असे दोन घटक असतात. या प्रयोगांत पेशींपैकी त्यांनी लालपेशीवर लक्ष केंद्रित केले होते. त्यांच्या प्रयोगात एका माणसाच्या लालपेशी दुसऱ्या माणसाच्या serum बरोबर मिसळल्या जात. हे प्रयोग अनेक जणांचे रक्तनमुने घेऊन करण्यात आले. त्यापैकी काही मिश्रणे व्यवस्थित राहिली. पण, अन्य काहींत लालपेशींच्या गुठळ्या (clumps) झाल्या. यातून असा निष्कर्ष निघाला की काही माणसांच्या लालपेशीच्या आवरणात विशिष्ट antigens असतात तर अन्य काहींच्या नसतात. या अनुषंगाने त्यांनी माणसांची तीन रक्तगटांत विभागणी केली: A, B आणि C. याचा अर्थ असा होता:

A गटाच्या रक्तात लालपेशीत ‘A’ हा antigen असतो.
B गटाच्या रक्तात लालपेशीत ‘B’ हा antigen असतो आणि,
C गटाच्या रक्तात लालपेशीत कुठलाच antigen नसतो.

त्याचबरोबर त्यांच्या हेही लक्षात आले की एखाद्या रुग्णास समान गटाचे रक्त दिल्यास त्याच्या लालपेशीना कुठलीच इजा पोहोचत नाही. मात्र अन्य गटाचे रक्त दिल्यास धोका पोहोचतो. अशा प्रकारे या घटकेला या संशोधनाचा पाया तयार झाला. पुढे कार्ल यांच्या विद्यार्थ्यांनी एक चौथा गट शोधला आणि त्याला AB हे नाव दिले. या गटाच्या रक्तातील लालपेशीवर A व B हे दोन्ही antigens असतात. पुढे अधिक विचारांती C गटाचे O असे नामांतर झाले. या O चा अर्थ ‘शून्य’(antigen) असा आहे. अशा रीतीने ही ४ रक्तगटांची एक प्रणाली तयार झाली आणि त्याचे A, B, O व AB हे प्रकार ठरले. या संशोधनावर आधारित पहिले रक्तसंक्रमण १९०७मध्ये न्यूयॉर्कमध्ये केले गेले.

आता आपण या चारही गटांचा अर्थ समजून घेऊ (चित्र पाहा).

1200px-ABO_blood_type.svg_.png

A = लालपेशीत A antigen आणि सिरममध्ये anti-B हे प्रथिन.
B = लालपेशीत B antigen आणि सिरममध्ये anti-A हे प्रथिन.

AB = लालपेशीत A व B हे दोन्ही antigens आणि सिरममध्ये कोणतेच विरोधी प्रथिन (antibody) नाही.

O = लालपेशीत कोणताही antigen नाही आणि सिरममध्ये anti-A व anti-B ही दोन्ही प्रथिने.

यातून रक्तसंक्रमणासंबंधी खालील महत्वाचे निष्कर्ष निघाले:
१. समान रक्तगटाची माणसे एकमेकास रक्त देऊ शकतात.

२. O गटाचे रक्त अन्य तिन्ही गटांस दिल्यास काही बिघडत नाही कारण या लालपेशीत कोणताच antigen नसतो. त्यामुळे हे रक्त घेणाऱ्यांच्या रक्तात कोणतीच ‘प्रतिक्रिया’(immune reaction) उमटत नाही.

३. AB गटाची माणसे अन्य तिन्ही गटांचे रक्त स्वीकारू शकतात कारण त्यांच्या सिरममध्ये A वा B ला विरोध करणारी प्रथिने तयार होतच नाहीत.

या क्रांतीकारी संशोधनाबद्दल कार्लना १९३०मध्ये नोबेल दिले गेले. हे संशोधन अत्यंत मूलभूत असल्याने त्यांना रक्तसंक्रमणशास्त्राचा पिता म्हणून ओळखले जाते.
यानंतर वैद्यक व्यवसायात अनेक रक्तसंक्रमणे होऊ लागली. त्यासाठी दाते निवडताना फक्त वरील ABO या प्रणालीचाच विचार होत होता. परंतु कार्ल यांचे संशोधन अद्याप चालूच होते. त्यांच्या मते लालपेशीत या प्रणालीखेरीज अन्य काही प्रकारचे antigensही असण्याची शक्यता होती. अखेर त्यांच्या परिश्रमास १९३७मध्ये यश आले. आता अन्य एका सहकाऱ्यासमवेत त्यांनी Rh या नव्या antigenचा शोध जाहीर केला. Rh हे नाव देण्यामागे एक कारण होते. तेव्हा त्यांना असे वाटले की आपल्या लालपेशीतला हा antigen ‘Rhesus’ माकडाच्या पेशींत असलेल्या antigen सारखाच आहे. पुढील संशोधनात असे आढळले की माणूस व माकडातील हे antigens वेगवेगळे आहेत. त्यामुळे आता Rh हे नाव शास्त्रीयदृष्ट्या बरोबर नसले तरीही ऐतिहासिक कारणासाठी ते टिकून आहे.

आता रक्तगट प्रणालींत ABOच्या जोडीला Rhची भर पडली. त्यानुसार माणसांचे २ गट पडले:
लालपेशीत Rh(D) हा antigen असल्यास त्याला Rh-positive म्हणायचे आणि,
लालपेशीत Rh(D) हा antigen नसल्यास त्याला Rh-negative म्हणायचे.

आज आपण आपला रक्तगट सांगताना वरील दोन्ही प्रणालींचा वापर करतो. उदा.: A, Rh-positive.

Rh प्रणालीच्या शोधानंतर रक्तदानासाठी “सार्वत्रिक दात्या”ची व्याख्या सुधारण्यात आली. त्यानुसार O, Rh-negative हा गट असलेली व्यक्ती सार्वत्रिक दाता ठरते. अर्थात रक्तसंक्रमणापूर्वी दाता व रुग्ण यांच्या रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पूर्णपणे “match” करून आणि दात्याचे अन्य काही निकष बघूनच योग्यायोग्यतेचा निर्णय घेतला जातो.
कार्ल यांनी वरील शोधाव्यतिरिक्तही अन्य संशोधन केले आहे. ते रोगप्रतिकारशक्ती आणि allergy या संदर्भात आहे. तसेच त्यांनी अन्य सहकाऱ्याच्या मदतीने पोलिओच्या विषाणूचा शोध लावलेला आहे. ते अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी आहेत.

सन १९१०च्या दरम्यान अन्य काही संशोधकांनी रक्तगट हे अनुवांशिकतेने पुढच्या पिढीत संक्रमित होतात हे सिद्ध केले. पुढे त्याचा उपयोग वादग्रस्त पितृत्वासंबंधीच्या दाव्यांमध्ये करता आला.
.......

काही आजार वा शस्त्रक्रियादरम्यान रुग्णास रक्तस्त्राव होतो. अन्य काही आजारांत शरीरात निरोगी रक्त तयार होत नाही. अशा सर्व प्रसंगी रुग्णास अन्य व्यक्तीचे रक्त द्यावे लागते. त्या प्रसंगी ते जीवरक्षक ठरते. आपल्या अनेक सामाजिक कर्तव्यांत रक्तदान हेही समाविष्ट आहे. त्यासाठी आपल्या प्रत्येकाला स्वतःचा रक्तगट माहित असणे अत्यावश्यक आहे. रक्तगटांच्या मूलभूत शोधामुळे वैद्यकातील रक्तसंक्रमण निर्धोकपणे करता येऊ लागले. हा क्रांतिकारी शोध लावणाऱ्या कार्ल यांना वंदन करून हा लेख पुरा करतो.
******************
(चित्र जालावरून साभार).

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ॲमी, धन्यवाद.

@ Filmy: आता तुमच्या प्रश्नाची अजून एक बाजू बघू.

** वेगवगळे रक्तगट असण्याचा माणसाच्या उत्क्रांती/अनुकूलतेशी काही संबंध आहे का? “”>>>>
* विविध रक्तगट आणि काही आजार होण्याचे प्रमाण यावर बरेच संशोधन झाले आहे. मात्र त्यातील बरीच गृहीतके पुरेश्या पुराव्याअभावी सिद्ध झाली नाहीत.

* मलेरिया संदर्भात आशादायक पुरावे आहेत. आफ्रिका व द.पूर्व आशियात हा आजार भरपूर आहे आणि तिथली जनता त्याला काहीशी पुरून उरली आहे. त्याचे कारण तेथील लोकांच्या लालपेशीतील विशिष्ट antigens मध्ये दडलेले आहे. यावर सतत संशोधन चालू आहे.

* जठर-आम्ल अधिक्य, कॉलरा इ.रोगांचा संबंध यावर उलटसुलट मते व्यक्त झाल्याने ठोस निष्कर्ष नाही.

स्वाती, धन्यवाद.

आज व्यक्तिगत संपर्कातून Rh बद्दल नीट समजावून सांगण्याची सूचना आली. हा मुद्दाही सर्वांनाच उपयुक्त असल्याने इथे लिहितो. गर्भवती व तिचे अर्भक यांच्या संदर्भात प्रश्न कधी व कसा उद्भवतो ते बघा.

१. समजा आई Rh –ve व वडील +ve आहेत.
२. मग गर्भातले मूल +ve वा –ve असू शकते.
३. समजा ते +ve आहे.

४. पहिल्या गरोदरपणात सहसा काहीच बिघडत नाही. कारण मुलाचा जन्म होईपर्यंत त्याचे रक्त आईच्या रक्तात मिसळत नाही.
५. प्रत्यक्ष बाळंत होताना placenta तुटतो आणि मग बाळाचे रक्त आईच्यात जाते. त्यातून +ve प्रकारच्या लालपेशी आईत जातात.

६. आई –ve असल्याने आता तिचे शरीर Rh-विरोधी antibodies तयार करते. पण पहिल्या बाळाचा जन्म आधीच झालेला असल्याने त्याला काहीच त्रास नाही.

७. पुढे ती दुसऱ्या वेळेस गरोदर झाली आणि तेव्हाचे बाळ +ve असेल तर मग तिच्या रक्तातील antibodies बाळात जाऊन त्याच्या लालपेशीचा नाश करतील.

८. पण, असे होऊ नये म्हणून या गरोदरपणात Rh immunoglobulin हे इंजेक्शन तिला दिले जाईल ज्यामुळे वरील पेशी-मारामारीची प्रक्रिया होणार नाही.

ABO व Rh सोडून लालपेशीतील इतर काही antigens मुळे कशी समस्या येते यासंबंधीची आजची बातमी:

नुकत्याच जन्मलेल्या बाळाचा व त्याच्या आईचा गट A Rh +ve. या बाळाला जन्मतःच कावीळ झाली आणि हिमोग्लोबिन धडाधड कमी होऊ लागले. त्याला तातडीने रक्त द्यावे लागणार होते पण खुद्द त्याच्या आईचे (त्याच गटाचे) रक्त क्रॉसमॅच होत नव्हते.

बातमी इथे:
https://www.esakal.com/pune/thirty-six-hours-baby-fighting-death-193650

वा ! अगदी 'ए वन' कुटुंब !
............
अर्थात वरील ABO व Rh सोडून लालपेशीतील इतर काही antigens चा मुद्दा वेगळा आहे.

1 ऑक्टोबर : आज राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिन आहे.

या निमित्त सर्व रक्तदात्यांना शुभेच्छा !
सिंधुदुर्ग मधील सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान हे या संदर्भात खूप चांगले काम करीत आहे.
विविध उपक्रमांत बरोबरच ते बॉम्बे ब्लड ग्रुप या अतिदुर्मिळ रक्तगटाचे दाते शोधण्याची मोहीम राबवत आहेत.
हा रक्तगट आपल्या लोकसंख्येत साधारण 10 लाखात ४ इतक्या अत्यल्प प्रमाणात आढळतो.

संबंधित प्रतिष्ठानचे अभिनंदन व शुभेच्छा !

दुर्मिळ रक्तगट
जबलपूर येथील एका ३० वर्षीय पुरुषात एक दुर्मिळ रक्तगट सापडला आहे. त्या प्रकाराचे नाव Ael असे असून तो A गटाचा एक उपप्रकार असतो. परंतु तो लक्षात येण्यासाठी काही उच्च पातळीवरील जनुकीय चाचण्या कराव्या लागतात. हे गृहस्थ नियमित रक्तदाते असून आतापर्यंत त्यांचा रक्तगट सामान्य चाचण्यांच्या आधारे O निगेटिव्ह असा धरला होता. परंतु यावेळेच्या रक्तदानानंतर संबंधित डॉक्टरांना चाचणी करताना काही शंका आल्याने त्यांनी वेगळ्या चाचण्या करवून घेतल्या.

https://www.thehindubusinessline.com/news/science/meet-the-jabalpur-man-...

अशाच प्रकारचा रक्तगट एका चिनी माणसामध्ये पूर्वी आढळलेला आहे. जगभरात या उपप्रकाराची खूप कमी माणसे आहेत.
https://www.nature.com/articles/jhg2005102

कुमार सर
माहितीपूर्ण लेख
AB - ve हा रक्तगट दुर्मिळ असण्याची काही कारणे आहेत का?

एखाद्या समूहामध्ये रक्तगटांचे जे तुलनात्मक प्रमाण असते त्यामागे वांशिक आणि जनुकीय कारणे असतात.

भारतापुरते बोलायचे झाल्यास :
AB चे प्रमाण एकुणात ७ टक्के एवढे आहे.
• आता आर एच प्रणालीबद्दल स्वतंत्रपणे पाहू. Rh neg याचेही प्रमाण ०.६ ते ८.५ % इतके आहे.

*आता दोन्ही प्रणाली एकत्र केल्यावर :
विरळ + विरळ = दुर्मिळ असे ते गणित बनते.
.
AB negative = 0.48% इतके कमी होते.

(अर्थातच हे काही सोपे गणित नसते. वांशिकता आणि संख्याशास्त्रीय शक्यता यांचा किचकट अभ्यास करून हे समजवावे लागेल).

१४ जून : Karl Landsteiner यांचा जन्मदिन जागतिक रक्तदाता दिन म्हणून साजरा केला जातो.

सर्व नियमित दात्यांचे
अभिनंदन आणि शुभेच्छा !

भारतातील एका व्यक्तीमध्ये एक दुर्मिळ रक्तगट सापडला असून या रक्तगटाच्या फक्त दहा व्यक्ती सध्या जगभरात आहेत.
यानिमित्ताने Emm ही एक नवी रक्तगट प्रणाली दखलपात्र झाली आहे.

https://www.dnaindia.com/india/report-unique-blood-group-rare-blood-grou...

डेंग्यूचे रुग्ण वाढलेले असल्याने त्यांना प्लेटलेटचे उपचारही मोठ्या प्रमाणावर द्यावे लागत आहेत.
त्यातून रक्तपेढ्यांमध्ये प्लेटलेटचा तुटवडा झालेला आहे.
उत्स्फूर्त रक्तदानाचे आवाहन

https://www.esakal.com/pune/todays-latest-marathi-news-pct22b13999-txt-p...

कुमारसर, "कहानी" सिनेमात बॉम्बे ब्लडग्रूप दाखवला आहे. काही महिन्यापूर्वी त्याची माहिती गोळा करत होते. पूर्ण स्वतंत्र लेख लिहावा इतकी माहिती गोळा झाली नाही. आपल्याला चालत असेल तर त्याबद्दल इथे पुढच्या आठवड्यात कधी माहिती टाकेन.

बार्सिलोना
चांगलेच होईल. जरूर लिहा !

धन्यवाद सर. धागा हायजॅक होईल असे मोठे आनुषंगिक प्रतिसाद देणे सहसा टाळते. (माझ्यापुरता अलिखित नियम सो मि वरचा लेख १००० शब्दांच्या आसपास घुटमळावा पण इथे जरा लहान घडल्याने स्वतंत्र लेख/धागा केला नाही). आपल्या परवानगीने संकलित माहिती इथे देते -

हिंदी सिनेमात सायन्स शोधू नये. अमर अकबर अँथोनी सारखे सिनेमे तर कहर करतात. पण काही सिनेमात शास्त्र (विज्ञान इ) अगदी चपखल वापरलेलं आढळते. अगदी कुणी वैज्ञानिक सल्लागार कामावरती घेऊन केलेली पटकथा असावी इतकं. विद्या बालनचा “कहानी” सिनेमा अशा मोजक्या सिनेमांपैकी एक. सिनेमा जुना आहे म्हणून कथानक अगदी एक वाक्यात लिहीते - कलकत्ता शहरात एक गर्भवती आपल्या बेपत्ता पतीला शोधत येते आणि एक अपूर्ण कार्य करून जाते. ह्या कहाणीतील एक महत्त्वाचा दुवा म्हणजे दुर्मिळ असा ‘बॉंबे ब्लड ग्रूप’.

हा “बॉंबे ब्लड ग्रूप” म्हणजे नक्की काय? त्यामुळे चिकित्सेत काय गोंधळ होतो? ह्या दोन प्रश्नांचा ऊहापोह इथे करू -

आजवर ३३ प्रकारच्या रक्त गट प्रणाली (ब्लड ग्रुप सिस्टीम्स) शोधल्या गेल्या आहेत. ह्या ३३ प्रणालीमध्ये एकूण ३०० अँटीजेन आहेत. यापैकी काही प्रमुख प्रणाली - ABO, Rh, MNS, P, Kell, Duffy, Kidd, Lutheran etc. या बहुतेक प्रणाली जनुकीय आधारावर असतात. उदा: ल्यूथरीन प्रणालीत एकूण १९ अँटीजेन आहेत आणि क्रोमोसोम क्रमांक १९ मुळे व्यक्तीचा रक्तगट ठरतो. अर्थात इतक्या किचकट प्रकारांची गरज रक्त देणे/घेणे इ सामान्य चिकित्सेत सहसा लागत नाही. अवयव प्रत्यारोपण इ अवघड बाबीत कधी कधी अशा प्रकारांची गरज पडते.

रक्त देता-घेतांना ABO व Rh या प्रकारांना मॅच करण्याची गरज पडते. यापैकी ABO गट हे क्रोमोसोम क्रमांक ९ मुळे येतात - क्रोमोसोम ९ वर ए जीन, बी जीन असतात. एखादा जीन व्यक्त होणे म्हणजे त्या जीन मध्ये साठवलेल्या माहितीनुसार पेशींनी शर्करा/प्रथिने इ तयार करणे. जसं ए जीन व्यक्त झाल्यास विशिष्ट प्रकारच्या शर्करा तयार होऊन त्यांचा ए अँटीजेन तयार होतो, तर बी जीन मध्ये तशा तशा शर्करा तयार होतात.

क्रोमोसोम ९ >>> ए/बी जीन >>> शर्करा/प्रथिने >>> अँटीजेन = रक्तगट.

याशिवाय क्रोमोसोम ९ वर एक एच H जीन असतो. हा H जीन ए व बी रक्तगटासाठी आवश्यक अँटीजेन (शर्करा) तयार करण्यासाठी मदत करतो. रक्तगट ओ असणाऱ्या व्यक्तींमध्ये H जीन आढळतो पण तो H अँटीजेन तयार करतो. जर हा H जीन बिघडला किंवा नसलाच तर त्याला ‘बाँबे ब्लड ग्रूप’ म्हणलं जाते. बॉंबे ब्लड ग्रूप ओ रक्तगटासारखा असला तरी H-अँटीबॉडीज ही असल्याने ह्याला ओ रक्तगटापेक्षा वेगळा गट मानावे लागते व रुग्णाची चिकित्सा त्यानुसार करावी लागते.

भारतात व दक्षिण आशियात हा ब्लड ग्रूप हजारात एका व्यक्तीत (०.१ %) म्हणजे बऱ्यापैकी आढळत असला तरी जगात इतरत्र फार आढळत नाही. उदा. दक्षिण कोरियात हा रक्तगट फारसा आढळत नाही. एक इमिग्रण्ट रुग्ण इस्पितळात भरती झाला असता त्याचे निदान लवकर झाले नाही कारण डॉक्टरांना ह्या रक्तगटाची शंकाही आली नाही. लॅब मध्ये तपासणी करणे शक्य नव्हते इ. अर्थात असे प्रकार घडतात तेव्हा पेपर्स इ प्रकाशित करून वैद्यकीय क्षेत्रात जागृती करतातच.

भारतात कदाचित “कहानी” सिनेमाने जागृती होऊन म्हणा, बॉंबे ब्लड ग्रूप असणाऱ्या मंडळींची सूची तयार झाली. ही सूची भारतापुरती न राहता आंतरराष्ट्रीय व्हावी म्हणूनही प्रयत्न झाले ही बाब आशादायक आहे.

आर एच निगेटीव्ह मातेला जर आर एच पॉसिटीव्ह बाळ होणार असेल तर बाळात रक्तस्रावाचे विकार होण्याची शक्यता असते (Hemolytic diseases of the newborn). अशाच पद्धतीचे आजार बॉंबे ब्लड ग्रूप असणाऱ्या मातेच्या बॉंबे ब्लड ग्रूप नसणाऱ्या बाळास होऊ शकतात. अर्थात ह्याचे प्रमाण नगण्य असल्याने किंवा ते फार घातक नसल्याने त्याबद्दल वैद्यकीय क्षेत्रात फार चर्चा आढळत नाही.

सहज जाता जाता - रक्तगट चर्चेत हॅरिसन यांचा उल्लेख अपरिहार्य आहे. जेम्स हॅरिसन यांनी वयाच्या १८व्या वर्षांपासून ते ८१व्या वर्षापर्यंत नियमित ११७२ वेळा रक्तदान केले. आर एच निगेटीव्ह मातेस होणाऱ्या आर एच पॉसिटीव्ह बाळांना चिकित्सा देण्यासाठी ज्या अँटी डी अँटीबॉडीज लागतात त्या त्यांच्या रक्तात भरपूर होत्या. त्यामुळे संशोधनास चालना तर मिळालीच पण महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या रक्तदानामुळे सुमारे २.४ मिलीयन बाळांचे प्राण वाचले आहेत.

चांगली पूरक माहिती. धन्यवाद
बॉम्बे रक्तगटासंबंधी पान 1 वर मी जे लिहिले आहे त्यातील हा मुद्दा अधोरेखित करतो:

"याचा शोध डॉ. वाय. एम. भेंडेनी १९५२ मध्ये मुंबईस्थित एका व्यक्तीत लावला".
…..
थोडी सुधारणा:

आजवर ३३ प्रकारच्या रक्त गट प्रणाली >>>
सप्टेंबर 2022 पर्यंतच्या माहितीनुसार हा अंक आता ४३ आहे :
https://en.m.wikipedia.org/wiki/Human_blood_group_systems

आणि हो...

जेम्स हॅरिसन यांचे हार्दिक अभिनंदन.!

उत्तम माहिती बार्सिलोना. ABO आणि Rh व्यतिरिक्त इतर काहीही माहीत नव्हते. कहाणी बघितला पण त्यातला बॉम्बे ब्लड ग्रुप अजिबात लक्षात राहिला नव्हता.

>>>>प्लेटलेटचे उपचारही मोठ्या प्रमाणावर द्यावे लागत आहेत.>>>>
प्लेटलेट transfusion केल्यानंतर इन्फेक्शन होऊ शकते हे खरं आहे का?

दुसऱ्याच blood ग्रुप चे ब्लड शरीरात चुकून चढवले गेले तर शरीर खूप भयानक response देते .
हे आताच वाचले.

रक्त चढवल्या नंतर काही मिनिट मध्येच शरीर reaction देते.
Blood group खूप महत्वाचे आहेत.

१.
प्लेटलेट transfusion केल्यानंतर इन्फेक्शन होऊ शकते हे खरं आहे का?>>>

होय, या मुद्द्यामध्ये तथ्य आहे. याचे कारण असे आहे :
रक्तपेढीत संपूर्ण रक्त जसेच्या तसे साठवण्याचे तापमान २ ते ६ सेल्सिअस असते.
या उलट प्लेटलेट्स दानामधून मिळालेल्या या पेशी साठवण्यासाठीचे सुयोग्य तापमान 20 ते 24 सेल्सिअस असे लागते. या तापमानात जिवाणूंची वाढ होऊ शकते. साधारणपणे दर अडीच हजार प्लेटलेट संक्रमणामागे एका संक्रमणातून जंतुसंसर्ग होऊ शकतो.

अर्थात हे टाळण्यासाठी अन्य काही प्रतिबंधात्मक उपाय अवलंबले जातात आणि तो धोका कमीत कमी राहील याचा प्रयत्न असतो.

Pages