एका लेखाची चाळीशी

Submitted by कुमार१ on 21 September, 2022 - 02:02

प्रास्ताविक :
माझ्या आयुष्यातील पहिलावहिला लेख मी ३९ वर्षांपूर्वी लिहिला. तेव्हा मी नुकताच एमबीबीएसची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. त्यानंतर एक वर्षे इंटर्नशिपचा कालावधी असतो. त्या काळी त्यापैकी सहा महिने ग्रामीण भागात राहायला लागायचे. मी पुणे जिल्ह्यातील एका खेड्यात माझे ग्रामीण प्रशिक्षण पूर्ण केले. त्या वास्तव्याच्या अनुभवावर आधारित मी प्रस्तुत लेख लिहिला. तो नंतर कॉलेजच्या वार्षिकात प्रसिद्ध झाला. यंदा त्या प्रथम लेखनाने चाळीशीत पदार्पण केले आहे. त्यानिमित्त तो लेख जसाच्या तसा इथे प्रकाशित करीत आहे. लेखनाची भाषा आणि (अ)परिपक्वता वयानुरुप आहे हे वाचकांनी समजून घ्यावे ! _/\_

हा लेख वैद्यक विद्यार्थीविश्वाशी निगडित असल्याने त्यातील काही मुद्द्यांचे/ शब्दांचे संदर्भ समजण्याठी आधी स्पष्टीकरण देणे आवश्यक वाटते:

१. P.H.C. = Primary Health Centre

२. तेव्हा आमच्या वर्गासाठी पुणे विद्यापीठ क्षेत्रात ग्रामीण इंटर्नशिपची जी केंद्रे ठरलेली होती त्यापैकी फक्त शिरूर येथे प्रशिक्षणार्थी मुले व मुली एकत्र राहत असत. हे मोठे प्रशिक्षण केंद्र असल्याने तिथे एका ज्येष्ठ प्राध्यापकांच्या देखरेखीखाली तशी व्यवस्था केलेली होती. बाकी इतर सर्व केंद्रांवर एक तर फक्त मुलगे किंवा फक्त मुली अशी परिस्थिती असायची. माझ्या लहान केंद्रावर अर्थातच आम्ही फक्त चार मुलगे होतो.

३. Weaning : जन्मल्यानंतर बाळ अंगावर दूध पिऊ लागते. त्यानंतर काही महिन्यांनी अंगावरचे दूध कमी करत घन पदार्थांचा आहार वाढवायचा असतो. या ६-९ महिने चालणाऱ्या प्रक्रियेला Weaning म्हणतात (समर्पक मराठी शब्द सुचवावा).
………………………………………………………………….................................................................................................................
मुक्काम पी. एच. सी.

mbbs deg cert (2).jpg

जेव्हा शासकीय महाविद्यालयातून थर्ड एमबीबीएस पास झालो तेव्हा असे सांगण्यात आले, की तुम्हाला आता एक वर्ष सक्तीने सरकारसाठी राबावे लागणार आहे व त्याबद्दल पोटापाण्यापुरते पैसे मिळतील. त्यापैकी सहा महिने खेड्यात जावे लागणार होते. “शिरूर घ्या अन ऐश करा”, असे सिनिअर लोकांनी सांगितले. परंतु आपल्याला हवे ते केंद्र मिळण्यासाठी ‘जे काही करावे लागते’, ते न जमल्याने मला शिरूर मिळाले नाही. अखेर माझी अन्य एका खेड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेमणूक झाली. मग दुसऱ्या दिवशी प्रवासास निघालो. एसटीचा प्रवास संपल्यानंतर खडकाळ रस्त्यावरून पायपीट चालू झाली. चालता चालता असे जाणवले की बरेच लोक कुतूहलाने माझ्याकडे बघत होते. टेरीकॉटचे कपडे व बूट एवढ्या दोन गोष्टी सुद्धा इथे लक्ष वेधून घ्यायला पुरेशा होत्या. आता त्या केंद्राचा पत्ता विचारायचा होता.
रस्त्यात दिसणाऱ्यापैकी त्यातल्या त्यात कमी खेडवळ माणूस गाठला. त्यांना विचारले,

“अहो इथे सरकारी दवाखाना कुठे आहे?” त्याने बरेच हातवारे करून पत्ता सांगितला आणि विचारले,
“काय नवीन डाक्टर वाटतं”
“ हो, इंटर्नशिपसाठी आलोय, प्रशिक्षण असतं आमचं”
“म्हंजे शिकावू डॉक्टर म्हना की !”
... च्यायला, अगदी चिमणीच पाडली साल्यानं.

अखेर मुक्कामी पोचलो. “प्राथमिक आरोग्य केंद्र” हे शब्द व त्याखाली आई-बाबा, दोन मुले आणि लाल त्रिकोण अशी चित्रांकित पाटी असलेल्या इमारतीत शिरलो. ओपीडी मध्ये बसलेल्या मेडिकल ऑफिसरची भेट झाली. मी आल्याचे पाहून ते एकंदरीत खूष झाले. कारण मागच्या बॅचचे प्रशिक्षणार्थी जाऊन चार दिवस लोटल्याने त्यांच्यावर ओपीडीतील सर्व पेशंटस बघायची वेळ आली होती. मग हॅलो, वेलकम, नाव, गाव, बाप काय करतो व पुढे काय करणार, इत्यादी गप्पा झाल्यावर सहा महिन्यातील कार्यक्रम समजला.
family planning.jpg

सकाळ-संध्याकाळ ओपीडी काढणे हा त्यातला मुख्य भाग. याशिवाय नसबंदी शस्त्रक्रियेत मदत करणे, शाळांमधून जाऊन बालके तपासणे, क्षयरोग-कुष्ठरोग इत्यादी संबंधी जनजागृती करणे आणि जी काही शिबिरे होतील त्यात इकडून तिकडे करणे या गोष्टींचा समावेश होता. आमचे राहायचे क्वार्टर्स तसं बरं होतं. चौघांची राहायची सोय होती आणि मुख्य म्हणजे हे ठिकाण नर्सेस क्वार्टर्सच्या अगदी समोर होते. एक-दोन दिवसात बाकीचे तिघे आले आणि रूटीन व्यवस्थित चालू झाले.

ओपीडीला भरपूर गर्दी असायची. नव्वद टक्के लोकांची लक्षणे ठराविक असायची. एकंदरीत डोके व कंबर हे दुखण्यासाठी आणि हात व पाय मुंग्या येण्यासाठीच निसर्गाने दिलेले आहेत की काय असे वाटू लागे. व्हिटामिन B12 चे इंजेक्शन हे तिथले एक अत्यावश्यक ड्रग असायचे. या इंजेक्शनने खरोखरीच अंगात ताकद येते की काय असे मला सुद्धा शेवटीशेवटी वाटू लागलं होतं !

काही आजारांवर लोकांकडून गावठी इलाज हे प्राथमिकता म्हणून केले जात. त्यातून बरे वाटले नाही तरच पेशंट इथे येई. अशा इलाजांपैकी काही समजुती तर आपल्या बुद्धीपलीकडील आहेत. कावीळ झालेला माणूस जेव्हा आपल्याकडे यायचा तेव्हा त्याच्या गळ्यात ती विशिष्ट माळ घातलेली असायचीच. एखादी जखम झाली असताना भात खाल्ला तर जखमेत पू कसा काय होतो, याचे स्पष्टीकरण मला तरी माहीत नाही ! सर्पदंशाच्या बाबतीत, चावलेला साप विषारी होता का, हे ठरवण्यासाठी कोंबडीचा प्रयोग गावातील एका वैदूकडून सर्रास करण्यात येई. साप चावलेल्या जागेवर कोंबडीचे गुद्द्वार टेकवण्यात येई; जर कोंबडी मेली तर साप विषारी.

कुटुंबकल्याण कार्यक्रम हे आरोग्य केंद्राच्या कामकाजाचे महत्त्वाचे अंग असते. बाकी एखाद्या जोडप्याला मुलगा झाल्याशिवाय कुटुंबाचे ‘कल्याण’ होऊ शकत नाही, हे आपल्या लोकशाहीचे दुर्दैव नाही काय ? एक प्रासंगिक विनोद अजून आठवतो. केंद्रांमधील एक मल्टीपर्पज वर्कर होता. सहज घरची चौकशी केली,

“काय मग. मुलेबाळे किती?”
“ पाच मुली आणि एक मुलगा ! आपल्या सर्व सवलती सरकारने बंद केल्यास बघा !”
(त्याचाही अभिमान)
“अहो, निदान तुम्हाला तरी संततिनियमनाचे महत्त्व कळायला नको का ?”
“डॉक्टर, संततिनियमन म्हणजे काय - नियमाने संतती होत राहणे !!”

एकदा मुलगा झाल्यावर मात्र नसबंदी करून घेण्याकडे वाढता कल जाणवे; त्यातही अर्थात पुरुषापेक्षा स्त्रीचीच. बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेबाबत मात्र अजून गैरसमज असायचे. एकदा बिनटाक्याचे शिबीर होणार होते. तेव्हा जास्तीत जास्त संख्या जमवण्यासाठी लोकांना पटवायचे काम चालू होते. एका बाईचा नवरा फारच हट्टी निघाला. मी म्हणालो,

“अहो, पंधरा मिनिटात ऑपरेशन, लगेच घरी घेऊन जायचे. पुन्हा (सरकारतर्फे) पैसे पण जास्त आणि लगेच मिळतात” त्यावर तो वैतागून म्हणाला,
“डॉक्टर, आम्ही काय पैशासाठी आपरेशन करतो का? ते जादूवाली भानगड काय नगं. पद्धतशीर टाक्याचे आपरेशन होऊ द्या. पायजे तर आम्ही पैसे देतो !”

तांबी (कॉपर टी) बसवण्यासाठी जरा औदासिन्यच असे. यासाठी स्वतःहून येणाऱ्या स्त्रिया फारच कमी. त्यामुळे ओपीडीत लहान मुलाला दाखवण्यासाठी घेऊन आलेल्या बायकांना पकडावे लागे. तांबी बसवायचे काम दोन मिनिटाचेच असले तरी बाईला समजावून द्यायला मात्र दोन दोन तास जायचे आणि बसवल्यानंतर तीन वर्षे बाईने काही कुरकुर केली नाही, तरच डॉक्टरला खरा आराम !

अशा कितीतरी कार्यक्रमांमुळे रिकामा वेळ तसा मिळतच नसे. पण चुकून मिळालाच तर मात्र काय करायचे असा प्रश्न पडायचा. कारण “शिरूर संस्थान” सारखी करमणुकीची साधने येथे नव्हती. तसं टेबल टेनिस, कॅरम इत्यादी गोष्टी गौण आहेत; बरोबर मैत्रिणी नाहीत हे खरे दुःख ! पण रोजच्या संसारात मात्र येथे जातीने लक्ष घालावे लागे. साखरेचा भाव काय, रॉकेल कधी मिळणार आहे, हे बघावे लागे. एखाद्या दिवशी स्वयंपाकाच्या बाई येणार नसतील तर आम्हा चौघांपैकी एकाला ओपीडीतून पळ काढून स्वयंपाकाची आघाडी बघावी लागे. एक प्रकारे भावी आयुष्याचीच ही इंटर्नशिप नाही का?

एक स्वस्त आणि मस्त करमणूक आयुष्यात प्रथमच येथे अनुभवली. ती म्हणजे तंबूतील थिएटर. इथे अनेक जुने हिंदी मराठी चित्रपट लागत. दर तीन दिवसाला नवीन चित्रपट येई. विद्यार्थिदशेत असताना मोजकेच चित्रपट पाहिले होते. ‘पूरब और पश्चिम’ पासूनचे अनेक जुने राहून गेलेले चित्रपट या मैदानावरील चित्रगृहात मोठ्या चवीने तृप्त होईपर्यंत पाहिले.

महिन्यातील दोन शुक्रवार मात्र घातवार असायचे. कारण या दिवशी पुण्याहून इंटर्नशिप नियंत्रण खात्याचे लोक भेट द्यायला यायचे. त्यांच्या करमणुकीसाठी जर्नल नावाचा एक रुक्ष प्रकार लिहून ठेवावा लागे. ते लोक त्याला प्रेमाने डायरी असे म्हणायचे. मग आदल्या गुरुवारी हे काम उरकण्यात येई. त्यांच्या भेटी दरम्यान त्या प्रकाराची अगदी बारकाईने तपासणी होई आणि मग 100 ग्रॅम डाळ म्हणजे किती चमचे घ्यायची, असल्या गोष्टींवरून सुद्धा चंपी होई. प्रशिक्षणार्थी डॉक्टर कामावर दांड्या मारत नाहीत ना हे बघण्यासाठी या खात्यातर्फे अधूनमधून अचानक भेट दिली जाई. एके दिवशी आमच्यावर अशी अचानक धाड पडली आणि आम्ही चौघेही हजर पाहून ते लोकच आश्चर्यचकीत झाले !

अधूनमधून आजूबाजूच्या लहान खेड्यांतील आरोग्य उपकेंद्रांना जावे लागे. या भेटींमधून मात्र खऱ्या भारत देशाचे दर्शन घडे. तिथे जीपमधून जाताना शरीर अक्षरशः ढवळून निघे. पावसाळ्यात तर काही गावच्या ओढ्यानाल्यांना इतके पाणी येई, की एकीकडून दुसरीकडे जाणे अशक्य व्हायचे. एकीकडे आपला ‘Insat 1 B’ अवकाशात भराऱ्या मारतोय अन दुसरीकडे हे ओढेनाले लोकांना गावाबाहेर पडू देत नाहीत. असे कितीतरी अडथळे आणि विसंगती.

poverty india.jpg

अशा या लहान खेड्यातील (आपल्या भाषेत इंटिरियरमोस्ट) समाजजीवनाचे दर्शन कित्येकदा मन हेलावून टाकणारे असे. दोन वेळेस पुरेसे अन्न, कपड्यांचे दोन जोड आणि एक कौलारू घर एवढे ज्याला प्राप्त झाले आहे तो खरोखरच इथला श्रीमंत म्हटला पाहिजे. तीन रुपये रोजगारावर पोट भरणारी एखादी स्त्री, जर आपल्या दोन वर्षाच्या मुलाला अजूनही फक्त अंगावरच दूध कसेबसे पाजत असेल, तर तिला weaning वर लेक्चर देणारे आपण कोण? दारू पिऊन बायकोला मारझोड करणारा नवरा हा आर्थिक व सामाजिक विषमतेतूनच निर्माण होत नाही का? ‘पेठ-डेक्कन-कॅम्प’ संस्कृतीत वाढलेल्या माझ्यासारख्याला तर ही विषमता फारच जाणवली. दारिद्र्य-रोगराई-दारिद्र्य हे एक दुष्टचक्र झालेले आहे. “सन २००० पर्यंत सर्वांसाठी आरोग्य” हे स्वप्न साकार होण्याआधी ‘गरिबी हटाव’ पूर्णतः साध्य होणे आवश्यक आहे.

अशा असंख्य विचारांनी अंतर्मुख झालेल्या अवस्थेत हे सहा महिने संपले. या ग्रामीण इंटर्नशिपचे फलित काय होते ? तर, माझ्या दृष्टीने जे ‘मेडिसिन’ होते - म्हणजे मधुमेह आणि हृदयविकार- त्या दृष्टीने ज्ञानात विशेष भर पडली नव्हती. परंतु, गेल्या साडेचार वर्षात फारशी जाणीव न झालेल्या सोशल मेडिसीनचे महत्त्व मात्र पुरेपूर पटले होते.
……………………………………………………………………………………...............................................
................................................................................................................................................
टीप :
जे वाचक 1990 नंतर जन्मलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी :

१. “गरीबी हटाव” ही तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आवडती राजकीय घोषणा होती.

२. “हेल्थ फॉर ऑल बाय 2000” हे जागतिक आरोग्य संघटनेचे1980-1990 च्या दशकांतील ध्येय होते.

३. “दोन मिनिटाचे काम आणि तीन वर्ष आराम” ही जाहिरात तांबी हे गर्भनिरोधक साधन बसवण्याबाबत महाराष्ट्र शासनाने तयार केलेली होती.
,...,......,.............

.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख व माहिती. ते छोटे कुटुंब सुखी कुटुंब जाहिरात लहान पणी प्रवासात अनेक वेळा बघितली आहे. मोस्टली जीवन शिक्षण मंदीर शाळेच्या भिंतीवर किंवा खताच्या दुकानाच्या मागे. पुढे उज्वला युरिआ सुफला युरिआ.
गरीबी हटाव पण माहीत आहे.

लेख आवडला.
डॉक्टर, या चाळीशीच्या लेखाची भाषा/शैली मला तुमच्या सध्याच्या लिखाणापेक्षा जास्त आवडली. दिलखुलास आणि खुसखुशीत.
सध्याच्या लिखाणात गांभीर्य आणि थोडे नर्मविनोद असतात. पण ते खुप माहितीपूर्ण आणि रंजक असते.

डॉक्टर, तुमचा पहिलाच लेख इतका सुंदर होता! खूप आवडला. अनुभव रोचक आहेत.

रोजगारावर पोट भरणारी एखादी स्त्री, जर आपल्या दोन वर्षाच्या मुलाला अजूनही फक्त अंगावरच दूध कसेबसे पाजत असेल, तर तिला weaning वर लेक्चर देणारे आपण कोण?>> तुमच्यातल्या डॉक्टरच्या मागे दडलेला सहृदय माणूस ठिकठिकाणी जाणवतो.

डॉक्टर, तुमचा पहिलाच लेख इतका सुंदर होता! >>> अगदी असेच वाटले वाचताना. पहिला असल्याचे बिलकुल वाटले नाही. माहितीही रोचक.

वरील सर्वांचे अभिप्रायबद्दल आभार !
...

१. जीवन शिक्षण मंदीर शाळेच्या भिंतीवर>>>> बरोबर.
अनेक घोषणांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण असायचे

२. चाळीशीच्या लेखाची भाषा/शैली मला तुमच्या सध्याच्या लिखाणापेक्षा जास्त आवडली.>>>
साहजिक आहे. प्रस्तुत लेख ऐन तारुण्यात लिहीला होता ना !

३. अनुभव रोचक आहेत.>>> होय, खरे आहे.

लेख आवडला.
छान मोकळाढाकळा लिहिला आहे. हे कदाचित त्या वयातच शक्य आहे.

वरील सर्वांचे अभिप्रायाबद्दल आभार !

*मोकळाढाकळा लिहिला आहे. हे कदाचित त्या वयातच शक्य आहे.>>>
अगदी बरोबर. आपल्या गद्धेपंचविशीत आपण बरीच विधाने धडाधड आणि काही वेळेस बेफामही करत असतो.
पुढे वयाच्या प्रत्येक दशकागणिक आपल्या वागण्या, बोलण्या आणि लेखनात फरक पडत जातात.

अगदी हृदयस्पर्शी अनुभव....
गावी असताना मी देखील वैद्यकीय उपचार शासकीय रुग्णालयातच घ्यायचो. त्यामुळे त्या वातावरणाचा परिचय आहे . लेख खूप रिलेट झाला.
म्हणजे शिकावू डाक्टर Happy
मला नेहमी वाटतं गावाकडच्या लोकांची प्रतिकारशक्ती शहरी माणसांपेक्षा कितीतरी जास्त असते. आम्हाला ताप, खोकला असली किरकोळ दुखणी देखील होत नसायची . सर्दीला ( बरसान) कापसाचा धूर ओढायचा. गरम माडंग प्यायचं. काखेत कसलातरी गोळा ( बद) आला होता पहिलीत असताना एक माणसानं ब्लेडने कापला. हाड मोडले तर ग्रामीण अस्तितज्ञ बांबूच्या काड्यांचं प्लास्टर करत. पाय मुरगळला साण ( एक छोटा गोल दगड) फिरवत. आजीचा बटवा ब-याच आजारांवर होता.
आमच्या गावावरुन प्राथमिक आरोग्य केंद्रात जायला बैलगाडीतून २ तास लागत त्यामुळे खूपचं आजारी असेल तर न्यायचे. साप चावला भैरोबाच्या देवळात कडू लिंबाच्या पाल्यात ठेवत.

वरील सर्वांचे अभिप्रायाबद्दल आभार !

* गावाकडच्या लोकांची प्रतिकारशक्ती शहरी माणसांपेक्षा कितीतरी जास्त असते>>>

अगदी बरोबर बोललात. एक शहरी माणूस या नात्याने तुमच्या विधानाशी पूर्ण सहमत आहे ! Happy
जरा खुट्ट झालं की घ्या औषध ही सर्वसाधारण शहरी प्रवृत्ती आहे खरी…

लेख आवडलाच.
... च्यायला, अगदी चिमणीच पाडली साल्यानं.>> त्यावेळेस असलेला हा शब्दप्रयोग मजेदार वाटला.
गेल्या साडेचार वर्षात फारशी जाणीव न झालेल्या सोशल मेडिसीनचे महत्त्व मात्र पुरेपूर पटले होते.>> +1
तुमचा पाकिस्तानला परीक्षा देण्याचा लेखही छान होता.
अजून अशा आठवणी तुमच्या शब्दात वाचायला आवडेल.

लेख आवडला. अस्सल अनुभवांचं प्रांजळ कथन!
थोडीशी 'पंचायत' मालिकेची आणि 'तेरे मेरे सपने' ('द सिटाडेल'वरून प्रेरित) चित्रपटाचीही आठवण झाली वाचताना.

वरील सर्वांचे मनमोकळ्या अभिप्रायाबद्दल आभार !

* च्यायला, अगदी चिमणीच पाडली साल्यानं..
>>> होय, प्रत्येक दशकात तेव्हाच्या विद्यार्थी वर्गामध्ये असे काही खास वाक्प्रचार असतात.
वरच्या चिमणी व्यतिरिक्त मला आठवणारे काही म्हणजे

: हेटाई केली/ झाली
पोपट झाला
तुमची उसवली… आमची तर फाटली
मास्तरने आज तासली /भादरली/ नसबंदी करायची बाकी ठेवली होती वगैरे….
.....
**'पंचायत' मालिकेची आठवण >>>
अ ग दी च !
माझी पण आवडती मालिका.

*टीपांशी खूप रिलेट झाले
>>>+१

लेख इथे पुनर्प्रकाशित करताना तळटीपा मुद्दाम घातल्या. आपल्या संस्थलावरील वाचक वर्गाची व्याप्ती अगदी वय 18 ते 81 एवढी व्यापक आहे.
त्यामुळे ते आवश्यक वाटले.

छान लेख. ४० वर्षांपुर्वी गाव खेड्यात असलेल्या अपुऱ्या व्यवस्था, आर्थिक अडचणी, समाजातील गैरसमज आणि एकंदर समाजजीवन. थोडक्यात सर्वच घटकांना स्पर्श झाला आहे. जुन्या आठवणी जागवल्या गेल्या. आमच्या गावातही साथीचे आजार आले कि कुणीतरी सायकल वर जाऊन डॉक्टर ला कळवत असत. आणि मग डॉक्टर त्यांची फटफटी घेऊन गावात येत. गावात येणारी वाहने अगदीच तुरळक. त्यामुळे एखादे वाहन गावात आले कि त्याच्या आवाजानेच आम्ही सर्व लहान मुले गाडी बघण्यासाठी नाक्यावर धावत जात असायचो. सरकारी दवाखाना गावात नव्हताच त्यामुळे डॉक्टर आले कि पूर्ण गावात फेरी मारत. आणि मग लहान मुलांना पकडून आणणे. त्यांची रडारड आणि पळापळ, लहान असताना सर्व गोष्टी प्रत्यक्ष अनुभवल्या आहेत.

वरील सर्वांचे अभिप्रायाबद्दल आभार !
...
*सरकारी दवाखाना गावात नव्हताच त्यामुळे डॉक्टर आले कि पूर्ण गावात फेरी मारत. आणि मग लहान मुलांना पकडून आणणे>>>>
+ ११
आजही काही दुर्गम भागांमध्ये नियमित वैद्यकीय सेवा पोहोचलेली नाही.

आजही काही दुर्गम भागांमध्ये नियमित वैद्यकीय सेवा पोहोचलेली नाही.>> खरं आहे. माझ्या घरापासून पाच मिनिट अंतरावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. हे भयंकर प्रिव्हिलेज वाट्ते मला.

वरील सर्वांचे अभिप्रायाबद्दल आभार !
...
रच्याकने…
भ्रमर यांनी त्यांच्या सदस्य परिचय खात्यात दिलेले ओळख- रेखाचित्र मजेशीर असून खूप आवडले. Happy

Pages

Back to top