एका लेखाची चाळीशी

Submitted by कुमार१ on 21 September, 2022 - 02:02

प्रास्ताविक :
माझ्या आयुष्यातील पहिलावहिला लेख मी ३९ वर्षांपूर्वी लिहिला. तेव्हा मी नुकताच एमबीबीएसची अंतिम परीक्षा उत्तीर्ण झालो होतो. त्यानंतर एक वर्षे इंटर्नशिपचा कालावधी असतो. त्या काळी त्यापैकी सहा महिने ग्रामीण भागात राहायला लागायचे. मी पुणे जिल्ह्यातील एका खेड्यात माझे ग्रामीण प्रशिक्षण पूर्ण केले. त्या वास्तव्याच्या अनुभवावर आधारित मी प्रस्तुत लेख लिहिला. तो नंतर कॉलेजच्या वार्षिकात प्रसिद्ध झाला. यंदा त्या प्रथम लेखनाने चाळीशीत पदार्पण केले आहे. त्यानिमित्त तो लेख जसाच्या तसा इथे प्रकाशित करीत आहे. लेखनाची भाषा आणि (अ)परिपक्वता वयानुरुप आहे हे वाचकांनी समजून घ्यावे ! _/\_

हा लेख वैद्यक विद्यार्थीविश्वाशी निगडित असल्याने त्यातील काही मुद्द्यांचे/ शब्दांचे संदर्भ समजण्याठी आधी स्पष्टीकरण देणे आवश्यक वाटते:

१. P.H.C. = Primary Health Centre

२. तेव्हा आमच्या वर्गासाठी पुणे विद्यापीठ क्षेत्रात ग्रामीण इंटर्नशिपची जी केंद्रे ठरलेली होती त्यापैकी फक्त शिरूर येथे प्रशिक्षणार्थी मुले व मुली एकत्र राहत असत. हे मोठे प्रशिक्षण केंद्र असल्याने तिथे एका ज्येष्ठ प्राध्यापकांच्या देखरेखीखाली तशी व्यवस्था केलेली होती. बाकी इतर सर्व केंद्रांवर एक तर फक्त मुलगे किंवा फक्त मुली अशी परिस्थिती असायची. माझ्या लहान केंद्रावर अर्थातच आम्ही फक्त चार मुलगे होतो.

३. Weaning : जन्मल्यानंतर बाळ अंगावर दूध पिऊ लागते. त्यानंतर काही महिन्यांनी अंगावरचे दूध कमी करत घन पदार्थांचा आहार वाढवायचा असतो. या ६-९ महिने चालणाऱ्या प्रक्रियेला Weaning म्हणतात (समर्पक मराठी शब्द सुचवावा).
………………………………………………………………….................................................................................................................
मुक्काम पी. एच. सी.

mbbs deg cert (2).jpg

जेव्हा शासकीय महाविद्यालयातून थर्ड एमबीबीएस पास झालो तेव्हा असे सांगण्यात आले, की तुम्हाला आता एक वर्ष सक्तीने सरकारसाठी राबावे लागणार आहे व त्याबद्दल पोटापाण्यापुरते पैसे मिळतील. त्यापैकी सहा महिने खेड्यात जावे लागणार होते. “शिरूर घ्या अन ऐश करा”, असे सिनिअर लोकांनी सांगितले. परंतु आपल्याला हवे ते केंद्र मिळण्यासाठी ‘जे काही करावे लागते’, ते न जमल्याने मला शिरूर मिळाले नाही. अखेर माझी अन्य एका खेड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेमणूक झाली. मग दुसऱ्या दिवशी प्रवासास निघालो. एसटीचा प्रवास संपल्यानंतर खडकाळ रस्त्यावरून पायपीट चालू झाली. चालता चालता असे जाणवले की बरेच लोक कुतूहलाने माझ्याकडे बघत होते. टेरीकॉटचे कपडे व बूट एवढ्या दोन गोष्टी सुद्धा इथे लक्ष वेधून घ्यायला पुरेशा होत्या. आता त्या केंद्राचा पत्ता विचारायचा होता.
रस्त्यात दिसणाऱ्यापैकी त्यातल्या त्यात कमी खेडवळ माणूस गाठला. त्यांना विचारले,

“अहो इथे सरकारी दवाखाना कुठे आहे?” त्याने बरेच हातवारे करून पत्ता सांगितला आणि विचारले,
“काय नवीन डाक्टर वाटतं”
“ हो, इंटर्नशिपसाठी आलोय, प्रशिक्षण असतं आमचं”
“म्हंजे शिकावू डॉक्टर म्हना की !”
... च्यायला, अगदी चिमणीच पाडली साल्यानं.

अखेर मुक्कामी पोचलो. “प्राथमिक आरोग्य केंद्र” हे शब्द व त्याखाली आई-बाबा, दोन मुले आणि लाल त्रिकोण अशी चित्रांकित पाटी असलेल्या इमारतीत शिरलो. ओपीडी मध्ये बसलेल्या मेडिकल ऑफिसरची भेट झाली. मी आल्याचे पाहून ते एकंदरीत खूष झाले. कारण मागच्या बॅचचे प्रशिक्षणार्थी जाऊन चार दिवस लोटल्याने त्यांच्यावर ओपीडीतील सर्व पेशंटस बघायची वेळ आली होती. मग हॅलो, वेलकम, नाव, गाव, बाप काय करतो व पुढे काय करणार, इत्यादी गप्पा झाल्यावर सहा महिन्यातील कार्यक्रम समजला.
family planning.jpg

सकाळ-संध्याकाळ ओपीडी काढणे हा त्यातला मुख्य भाग. याशिवाय नसबंदी शस्त्रक्रियेत मदत करणे, शाळांमधून जाऊन बालके तपासणे, क्षयरोग-कुष्ठरोग इत्यादी संबंधी जनजागृती करणे आणि जी काही शिबिरे होतील त्यात इकडून तिकडे करणे या गोष्टींचा समावेश होता. आमचे राहायचे क्वार्टर्स तसं बरं होतं. चौघांची राहायची सोय होती आणि मुख्य म्हणजे हे ठिकाण नर्सेस क्वार्टर्सच्या अगदी समोर होते. एक-दोन दिवसात बाकीचे तिघे आले आणि रूटीन व्यवस्थित चालू झाले.

ओपीडीला भरपूर गर्दी असायची. नव्वद टक्के लोकांची लक्षणे ठराविक असायची. एकंदरीत डोके व कंबर हे दुखण्यासाठी आणि हात व पाय मुंग्या येण्यासाठीच निसर्गाने दिलेले आहेत की काय असे वाटू लागे. व्हिटामिन B12 चे इंजेक्शन हे तिथले एक अत्यावश्यक ड्रग असायचे. या इंजेक्शनने खरोखरीच अंगात ताकद येते की काय असे मला सुद्धा शेवटीशेवटी वाटू लागलं होतं !

काही आजारांवर लोकांकडून गावठी इलाज हे प्राथमिकता म्हणून केले जात. त्यातून बरे वाटले नाही तरच पेशंट इथे येई. अशा इलाजांपैकी काही समजुती तर आपल्या बुद्धीपलीकडील आहेत. कावीळ झालेला माणूस जेव्हा आपल्याकडे यायचा तेव्हा त्याच्या गळ्यात ती विशिष्ट माळ घातलेली असायचीच. एखादी जखम झाली असताना भात खाल्ला तर जखमेत पू कसा काय होतो, याचे स्पष्टीकरण मला तरी माहीत नाही ! सर्पदंशाच्या बाबतीत, चावलेला साप विषारी होता का, हे ठरवण्यासाठी कोंबडीचा प्रयोग गावातील एका वैदूकडून सर्रास करण्यात येई. साप चावलेल्या जागेवर कोंबडीचे गुद्द्वार टेकवण्यात येई; जर कोंबडी मेली तर साप विषारी.

कुटुंबकल्याण कार्यक्रम हे आरोग्य केंद्राच्या कामकाजाचे महत्त्वाचे अंग असते. बाकी एखाद्या जोडप्याला मुलगा झाल्याशिवाय कुटुंबाचे ‘कल्याण’ होऊ शकत नाही, हे आपल्या लोकशाहीचे दुर्दैव नाही काय ? एक प्रासंगिक विनोद अजून आठवतो. केंद्रांमधील एक मल्टीपर्पज वर्कर होता. सहज घरची चौकशी केली,

“काय मग. मुलेबाळे किती?”
“ पाच मुली आणि एक मुलगा ! आपल्या सर्व सवलती सरकारने बंद केल्यास बघा !”
(त्याचाही अभिमान)
“अहो, निदान तुम्हाला तरी संततिनियमनाचे महत्त्व कळायला नको का ?”
“डॉक्टर, संततिनियमन म्हणजे काय - नियमाने संतती होत राहणे !!”

एकदा मुलगा झाल्यावर मात्र नसबंदी करून घेण्याकडे वाढता कल जाणवे; त्यातही अर्थात पुरुषापेक्षा स्त्रीचीच. बिनटाक्याच्या शस्त्रक्रियेबाबत मात्र अजून गैरसमज असायचे. एकदा बिनटाक्याचे शिबीर होणार होते. तेव्हा जास्तीत जास्त संख्या जमवण्यासाठी लोकांना पटवायचे काम चालू होते. एका बाईचा नवरा फारच हट्टी निघाला. मी म्हणालो,

“अहो, पंधरा मिनिटात ऑपरेशन, लगेच घरी घेऊन जायचे. पुन्हा (सरकारतर्फे) पैसे पण जास्त आणि लगेच मिळतात” त्यावर तो वैतागून म्हणाला,
“डॉक्टर, आम्ही काय पैशासाठी आपरेशन करतो का? ते जादूवाली भानगड काय नगं. पद्धतशीर टाक्याचे आपरेशन होऊ द्या. पायजे तर आम्ही पैसे देतो !”

तांबी (कॉपर टी) बसवण्यासाठी जरा औदासिन्यच असे. यासाठी स्वतःहून येणाऱ्या स्त्रिया फारच कमी. त्यामुळे ओपीडीत लहान मुलाला दाखवण्यासाठी घेऊन आलेल्या बायकांना पकडावे लागे. तांबी बसवायचे काम दोन मिनिटाचेच असले तरी बाईला समजावून द्यायला मात्र दोन दोन तास जायचे आणि बसवल्यानंतर तीन वर्षे बाईने काही कुरकुर केली नाही, तरच डॉक्टरला खरा आराम !

अशा कितीतरी कार्यक्रमांमुळे रिकामा वेळ तसा मिळतच नसे. पण चुकून मिळालाच तर मात्र काय करायचे असा प्रश्न पडायचा. कारण “शिरूर संस्थान” सारखी करमणुकीची साधने येथे नव्हती. तसं टेबल टेनिस, कॅरम इत्यादी गोष्टी गौण आहेत; बरोबर मैत्रिणी नाहीत हे खरे दुःख ! पण रोजच्या संसारात मात्र येथे जातीने लक्ष घालावे लागे. साखरेचा भाव काय, रॉकेल कधी मिळणार आहे, हे बघावे लागे. एखाद्या दिवशी स्वयंपाकाच्या बाई येणार नसतील तर आम्हा चौघांपैकी एकाला ओपीडीतून पळ काढून स्वयंपाकाची आघाडी बघावी लागे. एक प्रकारे भावी आयुष्याचीच ही इंटर्नशिप नाही का?

एक स्वस्त आणि मस्त करमणूक आयुष्यात प्रथमच येथे अनुभवली. ती म्हणजे तंबूतील थिएटर. इथे अनेक जुने हिंदी मराठी चित्रपट लागत. दर तीन दिवसाला नवीन चित्रपट येई. विद्यार्थिदशेत असताना मोजकेच चित्रपट पाहिले होते. ‘पूरब और पश्चिम’ पासूनचे अनेक जुने राहून गेलेले चित्रपट या मैदानावरील चित्रगृहात मोठ्या चवीने तृप्त होईपर्यंत पाहिले.

महिन्यातील दोन शुक्रवार मात्र घातवार असायचे. कारण या दिवशी पुण्याहून इंटर्नशिप नियंत्रण खात्याचे लोक भेट द्यायला यायचे. त्यांच्या करमणुकीसाठी जर्नल नावाचा एक रुक्ष प्रकार लिहून ठेवावा लागे. ते लोक त्याला प्रेमाने डायरी असे म्हणायचे. मग आदल्या गुरुवारी हे काम उरकण्यात येई. त्यांच्या भेटी दरम्यान त्या प्रकाराची अगदी बारकाईने तपासणी होई आणि मग 100 ग्रॅम डाळ म्हणजे किती चमचे घ्यायची, असल्या गोष्टींवरून सुद्धा चंपी होई. प्रशिक्षणार्थी डॉक्टर कामावर दांड्या मारत नाहीत ना हे बघण्यासाठी या खात्यातर्फे अधूनमधून अचानक भेट दिली जाई. एके दिवशी आमच्यावर अशी अचानक धाड पडली आणि आम्ही चौघेही हजर पाहून ते लोकच आश्चर्यचकीत झाले !

अधूनमधून आजूबाजूच्या लहान खेड्यांतील आरोग्य उपकेंद्रांना जावे लागे. या भेटींमधून मात्र खऱ्या भारत देशाचे दर्शन घडे. तिथे जीपमधून जाताना शरीर अक्षरशः ढवळून निघे. पावसाळ्यात तर काही गावच्या ओढ्यानाल्यांना इतके पाणी येई, की एकीकडून दुसरीकडे जाणे अशक्य व्हायचे. एकीकडे आपला ‘Insat 1 B’ अवकाशात भराऱ्या मारतोय अन दुसरीकडे हे ओढेनाले लोकांना गावाबाहेर पडू देत नाहीत. असे कितीतरी अडथळे आणि विसंगती.

poverty india.jpg

अशा या लहान खेड्यातील (आपल्या भाषेत इंटिरियरमोस्ट) समाजजीवनाचे दर्शन कित्येकदा मन हेलावून टाकणारे असे. दोन वेळेस पुरेसे अन्न, कपड्यांचे दोन जोड आणि एक कौलारू घर एवढे ज्याला प्राप्त झाले आहे तो खरोखरच इथला श्रीमंत म्हटला पाहिजे. तीन रुपये रोजगारावर पोट भरणारी एखादी स्त्री, जर आपल्या दोन वर्षाच्या मुलाला अजूनही फक्त अंगावरच दूध कसेबसे पाजत असेल, तर तिला weaning वर लेक्चर देणारे आपण कोण? दारू पिऊन बायकोला मारझोड करणारा नवरा हा आर्थिक व सामाजिक विषमतेतूनच निर्माण होत नाही का? ‘पेठ-डेक्कन-कॅम्प’ संस्कृतीत वाढलेल्या माझ्यासारख्याला तर ही विषमता फारच जाणवली. दारिद्र्य-रोगराई-दारिद्र्य हे एक दुष्टचक्र झालेले आहे. “सन २००० पर्यंत सर्वांसाठी आरोग्य” हे स्वप्न साकार होण्याआधी ‘गरिबी हटाव’ पूर्णतः साध्य होणे आवश्यक आहे.

अशा असंख्य विचारांनी अंतर्मुख झालेल्या अवस्थेत हे सहा महिने संपले. या ग्रामीण इंटर्नशिपचे फलित काय होते ? तर, माझ्या दृष्टीने जे ‘मेडिसिन’ होते - म्हणजे मधुमेह आणि हृदयविकार- त्या दृष्टीने ज्ञानात विशेष भर पडली नव्हती. परंतु, गेल्या साडेचार वर्षात फारशी जाणीव न झालेल्या सोशल मेडिसीनचे महत्त्व मात्र पुरेपूर पटले होते.
……………………………………………………………………………………...............................................
................................................................................................................................................
टीप :
जे वाचक 1990 नंतर जन्मलेले आहेत त्यांच्या माहितीसाठी :

१. “गरीबी हटाव” ही तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आवडती राजकीय घोषणा होती.

२. “हेल्थ फॉर ऑल बाय 2000” हे जागतिक आरोग्य संघटनेचे1980-1990 च्या दशकांतील ध्येय होते.

३. “दोन मिनिटाचे काम आणि तीन वर्ष आराम” ही जाहिरात तांबी हे गर्भनिरोधक साधन बसवण्याबाबत महाराष्ट्र शासनाने तयार केलेली होती.
,...,......,.............

.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

**माझ्या घरापासून पाच मिनिट अंतरावर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. हे भयंकर प्रिव्हिलेज वाट्ते मला.
>>>
यावरून ही जुनी हृदयद्रावक घटना आठवली:

यासंदर्भात एकदा डॉ. अभय बंग यांनी एक प्रयोग केला होता. त्यात त्यांनी अगदी लहान खेड्यातील एका हगवण झालेल्या बालकाच्या केसचा अभ्यास केला.
त्या बालकाचा आजार तीव्र झाला आणि त्याला जिल्ह्याच्या ठिकाणी पोचेपर्यंत अनेक अडथळे आले आणि ते योग्य त्या रुग्णालयात पोहोचू शकले नाही. ते बालक दगावले.
मग डॉक्टरांनी त्या ग्रामस्थांना येणाऱ्या अशा प्रकारच्या अडथळ्यांचा रीतसर अभ्यास केला. तेव्हा सुमारे २४ प्रकारचे अडथळे समजून आले. त्या अडथळ्यांमध्ये आर्थिक परिस्थितीपासून अनेक नैसर्गिक, सामाजिक अडथळे वगैरे असे तपशील होते.
यावर त्यांनी एक अहवाल शासनाला सादर केला होता.

अहो हो ते तर आहेच. मी वाचले आहे ते. मी हैद्राबादेत होते ना तेव्हा ज्युबिली हिल्स चेकपोस्ट ते पंजागुट्टा चौक हा एक सरळ रस्ता आहे पहिले तो अगदीच दुप दरी होता व धु ळीचा, मग पक्का रोड झाला. हा फारच श्रीमंतांचा भाग. अन्नपुर्णा स्टुडी ओ वगैरे. तर तिथे मी आदि वासी/ मूल वासी/ बंजारा लोक बघितले आहेत. प्ला स्टर लावलेल्या रोग्याला खांद्यावरुन नेणारे. ही नेट वर चित्र व्हायरल होण् याच्या आधीच्या काळातील बाब आहे.

दुर्गम भाग वगैरे तर जाऊ द्या. परंतु पुण्यापासून जेमतेम वीस पंचवीस किलोमीटरवर आज काय परिस्थिती आहे
ते मला अन्यत्र झालेल्या एका चर्चेतून समजले:

मांजरी खुर्द नदीच्या पलिकडे आहे. पावसाळ्यात ८-१० दिवस नदीवरचा पूल पाण्याखाली जातो आणि हडपसर किंवा पुण्यात येणार्‍या लोकांचा खोळंबा होतो. तेव्हा नोकरदार आणि गंभीर किंवा तातडीच्या परिस्थितीतील रुग्णांना वाघोली-खराडी मार्गे हडपसर किंवा पुण्यात न्यावे लागते.

रच्याकने:
बरेच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स असतात, इमारत छान दिसत असते, काय काय सेवा, सुविधा आहेत, कोणकोणत्या चाचण्या होतात हे लिहिले असते.
पण वेळेवर ultrasound ला तिकडे जा, CT Scan ला तिकडे जा, आज radiologist नाहीय, आज मशिनला प्रॉब्लेम आहे असे सांगतात. आमच्या एरियात असणाऱ्या काही हॉस्पिटलचा असा अनुभव आल्याने आई बाबांना लांब पडत असले तरी सरळ प्रस्थापित हॉस्पिटललाच घेऊन जातो.

तेव्हा ऐनवेळी लागेल म्हणून हॉस्पिटल बघुन ठेवताना तिथे लिहिलेल्या, जाहिरात केलेल्या सोयी सुविधा तिथे खरेच कार्यरत आहेत ना याची खात्री करून ठेवा.

छान चर्चा वाचतोय
>>एखादी जखम झाली असताना भात खाल्ला तर जखमेत पू कसा काय होतो,>>>
हे समजण्या पलीकडे आहे. खाण्यातला पदार्थ आणि पू होण्याचा मुळात काय संबंध??

आमच्या गावी भाताव्यतिरिक्त वांगी आणि शेंगदाणे खाऊ नका असे सांगत कुठली जखम झाली तर ती भरे पर्यंत.

आता भात आणि वांग्याचा विषय निघतोच आहे तर जरा सविस्तर लिहितो.

भात खाल्ल्याने जखमेत पू होतो याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.
थोडे अधिक समजून घेऊ.

जखमेत पू होण्याचा अर्थ जंतुसंसर्ग होणे.
जर एखाद्या व्यक्तीला अनियंत्रित मधुमेह असेल तर त्याच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण हे जास्त असते आणि त्यामुळे कुठल्याही जखमेत जंतुसंसर्ग व्हायला सहज आमंत्रण मिळते.

पूर्ण ठणठणीत निरोगी व्यक्तीने भात खाल्ला काय किंवा पोळी भाकरी खाल्ली काय, त्याच्या रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण हे नॉर्मलच असणार ना !
हाच मुद्दा नेहमीच्या जेवणातल्या सर्व खाद्यपदार्थांना लागू होईल.

त्यामुळे वरील समज हा पूर्णपणे अशास्त्रीय आहे.

वरील मुद्द्यांना निव्वळ 'पारंपरिक ज्ञान/ समज' म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही.
अमुकतमुक खाद्यपदार्थातील नक्की कुठला रासायनिक घटक जंतुसंसर्ग करण्यास कारणीभूत आहे, या स्वरूपाचे संशोधन संदर्भासहित कोणी दिले तर त्यावर काही बोलता येईल.

मांजरी खुर्द, उरळी कांचन, त्याजवळ गोळीबार नावाचा एक पाडा इत्यादी ठिकाणी साधारण २०-२५ वर्षांपूर्वी दौरा झाला होता. परिस्थिती अजूनही तशीच आहे हे वाचून वाईट वाटलं.

सहमत आहे.
...
Weaning = दूधवियोग
असा एक शब्द सुचला आहे पण कितपत बरोबर होईल माहित नाही.

परंतु, गेल्या साडेचार वर्षात फारशी जाणीव न झालेल्या सोशल मेडिसीनचे महत्त्व मात्र पुरेपूर पटले होते >>> असेच काहीसे माझ्या बाबतीत झाले.
आम्हालाही BAMS च्या अभ्यासक्रमाचे साडेचार वर्षे झाल्यानंतर एक वर्षाचे आंतरवासीय प्रशिक्षण करणे अनिवार्य होते. त्यात कॉलेजशी संलग्नीत रुग्णालयातील ६ महिने, प्राथमिक आरोग्य केंद्र ३ महिने व शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ३ महिने प्रशिक्षण करावे लगे, अर्थातच त्याचे लॉग बुक ही होते, जे पुढे महाराष्ट्र आरोग्यविज्ञान विद्यापीठाकडे जमा करून, अंतिम पदवी मिळे. माझ्या सोबतच्या बहुतेक मित्र-मैत्रिणींचा ओढा पदव्युत्तर प्रवेश परीक्षेची तयारी करण्यावर असल्याने, कोणीही फारश्या गंभीरतेने प्राथमिक आरोग्य केंद्रातील ३ महिन्यांचे प्रशिक्षण केले नाही. नावापुरते रुजू होऊन, कालावधी संपल्यावर केवळ प्रमाणपत्र घेऊन आले.

संपूर्ण आयुष्य शहरात काढले असले तरी मी मात्र मिळेल त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जायचे ठरवले होते. पण सुदैवाने मला नागपूर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर व राष्ट्रीय महामार्गावर असलेले केंद्र भेटले. आम्ही एकूण ४ सहप्रशिक्षणार्थी असून आठवड्यातील दिवस वाटून घेतले होते, आणि त्यात रात्री राहणे बंधनकारक नव्हते. तेथेही लेखात लिहिल्याप्रमाणेच परिस्थिती होती. केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये खूप वाईट अवस्था होती. मी विचार करायचो की शहराच्या अगदी जवळ असलेल्या ठिकाणी आरोग्याची अशी स्थिती आहे तर नागपूरपासून ८०-९० किमी अंतरावरील केंद्रे कशी असतील आणि मला आंतरवासियता प्रशिक्षण करताना जो साक्षात्कार झाला, त्याने संपूर्ण जीवनाची दिशाच बदलली. तेव्हापर्यंत माझे पदवीनंतर काय करायचे ठरतच नव्हते. मी शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस सुरु करावी किंवा पदव्युत्तर शिक्षण घ्यावे ह्याचा निर्णय होताच नव्हता मी सोशल मेडिसिन मध्ये पुढे जायचे ठरवले. BAMS नंतर सोशल मेडिसिन संबंधित MPH केले. त्यानेही समाधान झाले नाही. मग गाडी MSc, MPhil व PhD वर गेली. आता खूप समाधानी वाटतंय, आणि ह्याचे श्रेय मी प्राथमिक आरोग्य केंद्रातील केवळ ३ महिन्याच्या प्रशिक्षणाला देतो.

रा बा,
मनाच्या गाभाऱ्यातून लिहिलेला तुमचा अनुभव खूप आवडला !

आंतरवासियता प्रशिक्षण करताना जो साक्षात्कार झाला, त्याने संपूर्ण जीवनाची दिशाच बदलली. >>> वा, छान !

अगदी खरं आहे. मी जन्मापासून ते पदवी शिक्षणापर्यंत संपूर्णपणे शहरात वाढलो होतो. या प्रशिक्षणाच्या निमित्ताने जेव्हा सहा महिन्यांचे सलग ग्रामीण वास्तव्य झाले तेव्हा बरेच काही पहायला व शिकायला मिळाले. पहिल्या महिनाभरातच एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली- एकाच देशाची इंडिया आणि भारत ही दोन रुपे किती भिन्न आहेत. हे अगदी जवळून अनुभवता आले.

अलीकडे एमबीबीएस नंतरच्या ग्रामीण प्रशिक्षणाचा कालावधी फक्त दोन महिन्यांवर आणलेला आहे.

कुमार सर लेख आवडला.
कुटूंब कल्याण अंतर्गत लसीकरण येत नाही का? पल्स पोलियो वगैरे कदाचित नंतर सुरू झाले असावे.

वरील सर्वांचे अभिप्रायाबद्दल आभार !
...
कुटूंब कल्याण अंतर्गत >>
मुळात कुटुंब नियोजन हा शब्द आणीबाणीत बदनाम झाल्यामुळे पुढच्या सरकारने त्याचे नाव कुटुंब कल्याण केले.
लसीकरण हा मुख्यत्वे मुलांचा प्रांत आहे.
बहुतेक त्या वेळेला पल्स पोलिओ नसावे; नक्की आठवत नाही.

तुमचा पहिला लेख खरोखरच सुरेख होता. यातच अजून छोटे मोठे अनुभव टाकून तपशिलवार असा भाग दोन लिहा हा गोड आग्रह Happy
साप विषारी आहे का हे कोंबडी टाकून बघणे आणि तूर डाळ चमच्याने मोजणे याला Lol .मलाही पंचायत मधला 'दो बच्चे है मीठी खीर , उससे ज्यादा बवासीर' आठवले. तुम्हालाही कुणी 'प्रधानजी' /'बनराकस' भेटले असतील नं !

माझ्या सासऱ्यांनी- बाबांनी हे जवळजवळ आयुष्यभर केलेय. गांधीवादी असल्याने त्यांनी ठरवून हे आयुष्य निवडले होते. स्वतंत्र प्रॅक्टीस केलीच नाही. त्यांच्या काळात म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी MBBS MS केले होते,.तेव्हा खेड्यात गायनॅक किंवा सर्जन यायलाच तयार नसायचे. त्यांनी ४००० वर टॉन्सिल्स काढलेत, ३०००+ सी सेक्शन केलेत. पोटाचे तर असंख्य ऑपरेशन केलेत. प्रशासकीय सेवेत असल्याने सगळ्या खून, अपघात , दंगल अशाच केसेस यायच्या. एकदाही सणावाराला निवांत जेवता यायचे नाही , त्यावेळी तोंडात घास घातला की कुणीतरी 'भोसकल्याची केस आलीये निघूया' म्हणायला यायचे. एकदातर कुठल्यातरी खेड्यात बहुदा 'कळवण'मधे, एक दहावीचा मुलगा क्रॉस करताना रेल्वेखाली आला होता. रात्रीबेरात्री दुसरे कोणी नाही, रक्त पुरवठ्याचे कसलेही साधन नाही. काहीच नव्हते तर यांनी स्वतःचं रक्त देऊन स्वतःच सर्जरी केली होती. वाचला तो ! टीबी पेशंटची सेवा करून त्यांनाच टीबी झाला होता. आदिवासी भागात लशींबद्दल वगैरे गैरसमजुती व अंधश्रद्धा, त्याच वेळी कोटा पुरा करण्याचा दबाव. तासनतास समजवावे लागणे. फक्त ग्लुकोज दिल्याने मुलं वाचायची तरीही डिहायड्रेट होणे व जीव जाणे कॉमन होते. अवेअरनेसच नसायचा. फार वाईट परिस्थिती असायची.

फार्मास्यूटिकल्स कंपन्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढावं लागल्याने/ पॉलिटशन्सच्या सततच्या दबावाने/ कमी पगार /नियमित बदल्या व ब्युरॉक्रसी वगैरे मुळे त्यांचे आयुष्य प्रचंड संघर्षाचे गेले व पन्नाशीतच बायपास करावी लागली, मग लवकर निवृत्ती घ्यावी लागली. म्हणून पेंशन माझ्या लेक्चरर काकांपेक्षा कमी आहे. खूपच अनफेअर आहे आपल्याकडे ! ते आता समाधानी आहेत. कसलाही अभिनिवेष/ खंत नाही. Happy

तुमचा धागा बघून रिलेट झाले म्हणून लिहिले. Happy

बावणकुळे यांनी छान लिहिलेय.
Weaning साठी 'स्तनपानपूर्ती' सुचतोय.

अस्मिता
प्रतिसाद आणि गोडाग्रह दोन्ही आवडले.
धन्यवाद !
सर्वप्रथम तुमच्या सासऱ्यांना माझे मनोमन वंदन. माझे नमस्कार त्यांच्यापर्यंत पोचवा
_/\_
...

स्तनपानपूर्ती हा शब्द का पटत नाही ते जरा वेळाने सविस्तर लिहितो. रच्याकने...
एक चूक बरेच जणांकडून होते म्हणून :

स्तनपान हा अयोग्य शब्द आहे. तो "स्तन्यपान असा हवा.

स्तन्य = अंगावरचे दूध.

Weaning>>>
तान्ह्या बाळाचे बाळाच्या आहाराचे टप्पे असे असतात
१. जन्म - तीन महिने :फक्त अंगावरचे दूध

२. मग आपण पहिला घन आहार देतो = उष्टावण
३. पुढे सहा ते नऊ महिन्यांच्या सलग कालावधीत अंगावरचे दूध कमी करत करत घन आहार वाढवत नेतो.

४. शेवटी स्तन्य समाप्ती./पूर्ती

३ साठी:
इंग्लिश शब्दातल्या ing या प्रत्यामुळे तो अगदी चपखल झालेला आहे. ही सलग प्रक्रिया मराठी शब्दात कशी आणता येईल.?

साप विषारी आहे का हे कोंबडी टाकून बघणे >> ह्याचा उल्लेख ह. ना. पेंडसे च्या तुंबाडचे खोत मध्ये आढळतो. (कोकणात)

दुग्ध वियोग. -- मातृदुग्धशनैर्वियोग ! !
अथवा शनैर्मुक्ती

विनोद म्हणून दुरुस्त केला आहे. >>
प्रत्येक इंग्रजी शब्दासाठी मराठी प्रतिशब्द शोधण्याचा अट्टाहास हा विनोदीच आहे.

Pages