कथाशंभरी - २ - सानी - मोरोबा

Submitted by मोरोबा on 4 September, 2022 - 18:03

अंगणात येऊन रघूने सवयीने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे पाहिले आणि तिथे चूळ फेकायला उघडलेला त्याचा जबडा तसाच राहिला.
दाराला कुलूप नव्हते. चुळा, पिचकार्‍यांनी भरलेले अंगण कोणीतरी स्वच्छ धुवून काढले होते. तुळशीला पाणी दिले होते. याच वृंदावनावर डोके आपटून राधाक्कांनी....
दार करकरले आणि सानी बाहेर आली. कुंकू, मंगळसूत्र ल्यालेली. रघूला पाहून क्षणभर चरकली. मग तिने खालचा ओठ गच्च दाताखाली दाबला, पदर कमरेला खोचला, आणि सणसणीत आवाज दिला,
'राघोबानाना, पुन्हा या अंगणात घाण केलीत तर तोंड फोडीन'
गलका ऐकून केश्या बाहेर आला. ‘पायरी ओळखून रहा’ म्हणून राधाक्कांनी कधीकाळी हाकलून दिलेला तोच. त्याच्या खांद्यावरून रघूचं पाप त्याच्याकडे टुकूटुकू बघत होतं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी. शेवटच्या वाक्यामुळे कथेत एकदम कितीतरी आशय भरला जातोय. कथा फारच उत्तम बांधली गेली आहे. >>> +१

मस्त.

'राघोबानाना, पुन्हा या अंगणात घाण केलीत तर तोंड फोडीन'
शेवटच्या वाक्यामुळे वरिल वाक्य द्व्यर्थी झाले.
छान!