लेखक

Submitted by पाचपाटील on 31 August, 2022 - 08:20

बराच काळ नुसतं ठरवत होतो. बोलत होतो.
पण मग नंतर एकदा अशीच सणक गेली
डोक्यात.. आणि मागचा पुढचा विचार न
करता सलग पंधरा दिवस बैठक मारून
लिहूनच टाकलं सगळं..!

अर्थात, पहिलीच कादंबरी..! त्यामुळे
सुरुवातीला कुणी दखल घेतली नाही.
पण नंतर मग सगळं 'शोले' सारखंच झालं.
वाऱ्याहाती माप..!
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापासून थेट बडोदा,
इंदूर, बेळगाव, कारवार, अगदी
गोव्यापर्यंत येकच लाट उसळली.
सहा महिन्यांत भरघोस दहा जन-आवृत्त्या..!
तेपण पुरं पडेना. लायब्रऱ्या, दुकानं सगळीकडं
लोकांच्या झुंडी.
दुकानदार समजावून दमले की बाबांनो
आता नाय ती कादंबरी उपलब्ध, तर कुठून
देणार? आम्ही कशाला लबाड बोलू?
आम्हाला काय पैशे मिळाले तर नकोयत का ?

पण लोकं ऐकायला तयार नाईत.
लोकांना वाटायलं की दुकानदार काळाबाजार करतायत..!
घराघरांतनं माणसं देव पाण्यात
घालून बसली की बाबा कायबी करून येकतरी
प्रत हाताला लागावी.

आता मी स्वतःच फार काही सांगणं बरं
नाही. कारण उगाच अहंता आडवी येते.!
पण कादंबरी होतीच तशी.‌ संपूर्ण म्हराटी
भाषिक समाजाचा वरपासून खालपर्यंत
सफाईदार छेद..!
निष्णात शल्यविशारदासारखा..!
काय विषयच ठेवला नाय..!

झाडून सगळ्या अकादमीक समीक्षकांनी
एकमुखाने गर्जना केली की, ही कादंबरी
'कोसला'ला ही ओलांडून फार फार पुढे
निघून जाते..! सशक्त, सखोल आणि
गडद परिणाम करणारा एक तरूण
कादंबरीकार आता मराठी भाषेच्या
क्षितीजावर उगवतो आहे, ह्याबाबत
आमच्या मनांत बिलकुल शंका नाही..!

अगदी नेमाडेसुद्धा आपल्या कादंबरीबद्दल
खाजगीत का होईना, पण जरा बरं बोलले
आहेत, अशी खबर उडत उडत कानांवर
आली..!

शिवाय बारामतीवरून एक फोन आला की
आमच्याकडनं होन्यासारखी काई सेवा
आसेल तर जरूर सांगा. काई अनमान करू
नका. दिलं-घेतलं काई नसतंय..!
आणि समजा नागपूरवरूनही एक टिप्पणी
आली की तिशीच्या मानानें तसें बरें लिहितां.
परंतु पाश्चात्य प्रभाव किंचित जास्तच
जाणवतों. टाळावां. आरोग्यास बरा नसतों.

तर असो. ह्या गोष्टींचं एवढं काही वाटत
नाही आता.
कुणी टीका केली तरी जिथल्या तिथे सोडून
मी पुढे निघतो.
कुणी कौतुक केलं तरीही मी जिथल्या तिथे
सोडून पुढे निघतो.
कुणी धमकी दिली तर मात्र थोड्या
जास्तच वेगाने पुढे निघतो. एवढंच.
(काही पुटपुटलात का ? नाही? मग ठीके.)

तर बाकी आता अडचण अशीय की ह्या
प्रकाशकांचं काय करावं, कळत नाहीये.
रोज येऊन माझ्या दारात ताटकळत
बसतात. एकमेकांच्या बोकांडी बसून
रेटारेटी करतात.
एवढी मोठी प्रतिष्ठित माणसं..!
आणि अशी वागतात..!
नको वाटतं बघायला..!
पण काय करणार?
इलाज नाही.
म्हणून मग रोज सकाळी त्यांचा ताजा ताजा
अपमान करून पिटाळून लावावं लागतं..!
नायतर मला जिन्यातून खालीच उतरू
देत नाहीत..! आडवे पडतात..!
सारखं आपलं पायात पायात..!
एखादा फुटकळ लेख तरी
द्याच प्लीज, म्हणतात.

परवा असंच झालं.
पान खायला म्हणून खाली निघालो तर
सगळ्यांनी गराडा घातला.
पळायला लागलो तर मागे मागे पळायला
लागले.
म्हणून मी फक्त हातात दगड घेऊन त्यांना
भीती दाखवत होतो. एवढंच.
बाकी नंतर काय झालं, आठवत नाही.

आता हे लोक म्हणतायत की मी झिंज्या
वगैरे विस्कटून ओरडत नाचत रस्त्यावर
दिसेल त्याला दगडं मारत फिरत होतो.
माझा काय ह्यावर विश्वास बसत नाही.
कारण हे सरळसरळ षडयंत्र आहे.
मोठा डाव आहे. हे मला माहीतीच आहे.

सांगायचं राहिलंच.
मी सध्या प्रादेशिक मनोरूग्णालय, येरवडा
या ठिकाणी आहे.
त्यांनी मला इथे आणून डांबून ठेवलंय.

आणि हा टिपीकल फ्रेंच दाढी ठेवलेला इथला
एकमेव सायकियाट्रिस्ट..! येडा फुफाटा.
हा ही त्यांना सामील दिसतोय.

काल मी त्याला सगळी हकीकत
पोटतिडकीने सांगायला लागलो, तर त्यानं
डोळ्यांनीच वॉर्डबॉईजना काहीतरी
खाणाखुणा केल्या.
आणि त्या दुष्टांनी ताबडतोब मला तिथून
उचलून इथे ह्या बेडला बांधून टाकलं.
हे काय वागणं झालं??

दिलवाले सिनेमामध्ये श्री.अजय देवगण
ह्यांना जसा पौर्णिमेच्या मध्यरात्री तीव्र
वेडाचा झटका यायचा, तशी समस्या माझ्या
बाबतीत येणार नाही..!
तुम्ही मुळीच काळजी करू नका..!
असं मी त्यांस सांगितलं, तर
त्यांनी माझ्या तोंडात बोळा कोंबला..!

आता शॉक बिक देतेत की काय कुणास
ठाऊक..!

हरकत नाही तशी..! मोठेपणाचे भोग असतात..!
भोगावे लागतात..!
आणि हे तर चालतच राहतं..!
ह्याच लोकांनी एकेकाळी
सॉक्रेटिसला हेमलॉक नावाचं विष देऊन
संपवलं..!
मी पण त्याच कुळातला..!
मी संपेन, पण जाताजाता मराठी
भाषासंस्कृती आकाशाला नेऊन भिडवेन..!
नंतर मग समजा तुम्ही हळहळला तरी
त्याचा काय उपयोग?

आले वाटतं शॉक द्यायला..!
देवा पांडुरंगाss..!
माफ कर रेss ह्या मर्त्य मानवांना..!
अज्ञानी आहेत बिच्चारे.!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बारामतीची ठसकेबाज असो की नागपूरची अनुस्वारप्रचुर.... मायमराठीची सर्व रूपे तुम्हांवर प्रसन्न आहेत लेखक महोदय Happy

वावे, SharmilaR, आबा.. प्रतिसादाबद्दल आभार. Happy
अनिंद्य, कसचं कसचं..! Blush

कौतिक राव बनले पाटील !
बरे वाईट शब्दच नाही उरले की हो मराठीत!
तुम्ही मारे मराठी भाषासंस्कृती आकाशाला नेऊन भिडवाल पण इथे जमिनीवर शब्दच नाही उरले ना आमच्यासाठी!

लेखनशैली खुमासदार आहे पण नाहीच आवडलं.

मराठी पुस्तकाच्या / लेखकाच्या बाबतीत इत़कं छान काही घडतय असे नुसतं वाचून देखील किती छान वाटत होतं.
कल्पनाविश्वात तरंगायला लागलो होतो ते धाडकन आपटवलंत खाली.
अर्थात त्यात काही विशेष नाही. बहुतेक सगळे असे कमीच लेखतात मराठीला.

देवकी पंडीत यांच्या रियाझाला अवधूत गुप्ते यांच्या आत्मविश्वासाची जोड कधी लाभणार कोणास ठाऊक

सहा महिन्यांत भरघोस दहा जन-आवृत्त्या..!
तेपण पुरं पडेना. लायब्रऱ्या, दुकानं सगळीकडं
लोकांच्या झुंडी.

घराघरांतनं माणसं देव पाण्यात
घालून बसली की बाबा कायबी करून येकतरी
प्रत हाताला लागावी.

प्रकाशकांचं काय करावं, कळत नाहीये.
रोज येऊन माझ्या दारात ताटकळत
बसतात.

<< हे चित्र खरंच दिसायला हवंय.

नेहमीप्रमाणे अफाट लिहलंय.

भारी, आवडलच
तुमची स्टाईल हटके आहे, जियो