चला फोटो काढूया : पोस्ट प्रोसेसिंग/एडिटिंग

Submitted by याकीसोबा on 30 August, 2022 - 02:25

चला फोटो काढूया : पोस्ट प्रोसेसिंग

नमस्कार,

पोस्ट प्रोसेसिंग/एडिटिंग किंवा बोली भाषेत "फोटोशॉप करणे" हा बऱ्याच जणांसाठी चर्चेचा किंवा वादाचा मुद्दा असतो.

कोणी चांगला फोटो दाखवल्यावर "एडिट केलाय का ?" असं विचारून त्याचं उत्तर हो मिळाल्यावर खवचटपणे "वाटलंच मला" म्हणणं हे त्यापैकीच एक. लोल.

बऱ्याच जणांचा पोस्ट प्रोसेसिंग/एडिटिंग करणं म्हणजे वाईट असा समज असल्यामुळे असे प्रसंग उद्भवतात. सध्या इंटरनेटवर खास करून फोटोग्राफी संबंधित फोटो शेअरिंग साईट्सवर (flickr, ५००px, इंस्टाग्राम इ.) आपल्याला जे जे फोटो बघून "व्वा" असं वाटतं, यापैकी ९९% फोटो हे पोस्ट प्रोसेसिंग/एडिटिंग केलेले असतात हे कितीजणांना ठाऊक आहे ? (१००% लिहिणार होतो पण १% उगीच वाद नको म्हणून सोडलाय. लोल.)

पोस्ट प्रोसेसिंग म्हणजे नक्की काय ?
शब्दशः बघितलं तर, एक फोटो कॅमेऱ्यामध्ये काढल्यानंतर वेगवेगळी साधनं (सॉफ्टवेअर) वापरून त्यावर ज्या ज्या प्रक्रिया केल्या जातात त्याला पोस्ट प्रोसेसिंग म्हणता येईल. त्या प्रक्रिया कोणकोणत्या हि चर्चा आत्ता सुरु करत नाही पण उदाहरणार्थ साध्या साध्या गोष्टी जसे कि फोटो क्रॉप करणे, बेसिक ब्राईटनेस किंवा कॉन्ट्रास्ट सेटींग्ज इथपासून निरनिराळी ऍडव्हान्स्ड सेटिंग्स ह्या सर्व गोष्टी पोस्ट प्रोसेसिंगमध्ये गणल्या जातात.

पोस्ट प्रोसेसिंग कशासाठी ?
निसर्गातला सर्वात ऍडव्हान्स्ड कॅमेरा म्हणजे आपले डोळे हे ज्या पद्धतीने एखादं दृश्य बघू शकतात, ते कितीही अद्ययावत यांत्रिक कॅमेऱ्याने टिपणं हि सध्यातरी अशक्यप्राय गोष्ट वाटते. खूपदा आपणच काढलेल्या एखाद्या सुंदर दृश्याचा फोटो मात्र आपल्याला तितकासा आकर्षक वाटत नाही यामागे हेदेखील एक कारण आहे. या गोष्टीवर एक उपाय म्हणून पोस्ट प्रोसेसिंगकडे पाहिलं जाऊ शकतं. कोणताही बेसिक कॅमेरा हा एखाद्या ठराविक रेंज मधलं एक्सपोजर (सोप्या भाषेत फोटोतील उजेड मापायचं एक एकक) ठेवून एखादा फोटो काढत असतो. उदाहरण म्हणजे एखाद्या निरभ्र दिवसाच्या दुपारी जर आपण एखाद्या व्यक्तीचा फोटो काढतो आहोत आणि मागे सुंदर निळं आकाश आहे. असं असताना जर एक्सपोजर पॉईंट आकाशावर सेट केल्यास आकाश निळंशार दिसतं परंतु त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर पूर्ण अंधार होतो आणि तोच पॉईंट जर चेहऱ्यावर सेट केला तर पूर्ण आकाश ओव्हरएक्सपोज होऊन पांढरंशुभ्र होऊन जातं. अश्या वेळी पोस्ट प्रोसेसिंग माहित असलेला फोटोग्राफर योग्य ती सेटिंग्ज ठेवून फोटो काढतो आणि त्यात ज्या तांत्रिक त्रुटी राहिल्या असतील त्यांवर पोस्ट प्रोसेसिंगमध्ये काम करतो .

हे झालं पोस्ट प्रोसेसिंग करण्यामागचं एक कारण. या उलट फोटोग्राफी ही एक कला आणि फोटो ही त्या त्या फोटोग्राफरची कलाकृती असं बघायला गेलं तर ज्याप्रमाणे प्रत्येक चित्रकाराचं एक पॅलेट (रंगसंगती, चित्र काढायची पद्धत, विषय) इत्यादी गोष्टी ह्या वेगवेगळ्या असतात तसंच प्रत्येक फोटोग्राफरप्रमाणे त्यांची पोस्ट प्रोसेसिंगची पद्धत, फोटो एडिट करण्याचं प्रमाण हे नक्कीच निरनिराळं असतं हे लक्षात घेतलं पाहिजे. एकच अनएडिटेड फोटो वेगवेगळ्या फोटोग्राफर्स/एडिटर्स कडून एडिट करून घेतल्यास आपल्याला तितकेच वेगवेगळे फोटो मिळतील.

पोस्ट प्रोसेसिंग किती करावं ?
वर लिहिल्याप्रमाणे किती एडिटिंग करावं हे पूर्णपणे व्यक्तिसापेक्ष असून एका व्यक्तीला उत्तम वाटणारा फोटो दुसऱ्याला भडक वाटू शकतो. त्याचप्रमाणे काही जणांना सूक्ष्म (subtle) एडिट करायला आवडतं ज्यात एडिट केलं आहे कि नाही हेदेखील सांगणं अवघड असतं. एकदा आपण एडिटिंगची माहिती करून घ्यायला लागलो कि आपोआप आपण आपल्याला आवडती शैली विकसित करतो. अर्थात आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी/शैली देखील बदलत राहू शकतातच.

पोस्ट प्रोसेसिंग करायची सॉफ्टवेअर्स
फोटो एडिटिंग आणि adobe फोटोशॉप या समीकरणाबद्दल वेगळं लिहायला नकोच. परंतु फोटोशॉप/लाईटरूम यासारखी अत्यंत प्रगत सॉफ्टवेअर्स हि अर्थातच पैसे देऊन विकत घ्यावी लागतात. iOS प्रणालीवर लाईटरूमचं मोफत ऍप आहे आणि त्यातदेखील खूप उत्तमप्रकारे प्रोसेसिंग करता येऊ शकतं. मोबाईलवर फोटो एडिट करण्यासाठी मला सर्वात आवडणारं आणि मोफत ऍप म्हणजे स्नॅपसीड (snapseed). अगदी फोटोशॉप अथवा लाईटरूमला टक्कर नाही पण हे ऍप मोफत असूनदेखील यात मास्किंग सारखे प्रकार वापरता येतात. मागे म्हंटल्याप्रमाणे माझी फोटोग्राफी हीदेखील सध्या मोबाईलवरून होत असल्याने लगेच मोबाईलवर एडिट करणं मला खूप सोयीस्कर पडतं. आता तर मोबाईलवर एडिट करण्याची जास्त सवय झाल्यामुळे क्वचित कॅमेऱ्याने फोटो काढलेच, तर तेही मोबाईलवर घेऊन एडिट करतो. अर्थात हे माझं प्राधान्य आहे. व्यावसायिक अथवा इतर अनेक फोटोग्राफर्स कॉम्प्युटरवर एडिट करण्याला प्राधान्य नक्कीच देऊ शकतात.

पोस्ट प्रोसेसिंग शिकावं का ?
अर्थात हो. फोटोग्राफी म्हणजे नुसतं कॅमेऱ्यातून फोटो काढणं राहिलं नसून पोस्ट प्रोसेसिंग देखील आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही एखादा फोटो काढताना तुमच्या मनात पोस्ट प्रोसेस केल्यानंतरच फोटो तयार असेल तर तुम्ही नक्कीच त्या दृष्टिकोनातून फोटो क्लीक करता आणि यासाठी पोस्ट प्रोसेसिंगचं बेसिक ज्ञान गरजेचं आहे.

तेव्हा आता यापुढे एखादा छान फोटो दिसल्यावर हा एडिट केला आहे का यापेक्षा यात कायकाय एडिट केलं असेल यावर आपण बारकाईनं अभ्यास करू आणि आपल्या फोटोग्राफीमध्ये देखील आपल्याला आवडलेले बदल करत राहू अशी आशा करतो आणि थांबतो.

--------------------------------------------------------------------------

एडिटिंग शिकण्यासाठी अक्षरशः हजारो वेबसाईट्स आणि युट्युब चॅनेल्स आहेत. आपण आपल्याला ज्या सॉफ्टवेअरमध्ये एडिटिंग शिकायचं आहे त्याप्रमाणे शोधून शिकू शकता. एकदा सर्च करत गेलात कि आपोआप एकेक सापडत जातील.

--------------------------------------------------------------------------

टीप : मी एक हौशी फोटोग्राफर असून मला फोटोग्राफीबद्दल जी काही मोडकीतोडकी माहिती आहे ती वेगवेगळ्या वेबसाईट्स, लेख, युट्युब व्हिडिओज आणि हे सर्व बघून/वाचून स्वतः केलेले प्रयोग यावर आधारीत आहे. मला अजून खूप काही शिकायचं शिल्लक आहे आणि कायमच काही ना काही शिल्लक राहील. सर्वांनी या विषयावरची आपापली मतं, सल्ले, काही उपयुक्त लिंक्स असल्यास नक्की शेअर करा.

Group content visibility: 
Use group defaults

मला फोटो काढण्याबद्दल काहीतरी लिही म्हटल्यावर कॅमेरे आणि एडिटिंग हे दोन विषय डोक्यात घोळत होते. या दोन विषयांवर दोन स्वतंत्र पोस्ट करत आहे. इतर कोणास आणखी विविध विषय सुचत असल्यास नक्की लिहा आणि पोस्ट करा. धन्यवाद.

हाही लेख छान.
मी बेसिक (क्रॉपिंग, ब्राईटनेस-कॉन्ट्रास्ट वगैरे) एडिटिंग करते. मध्यंतरी लॅपटॉपवर फोटोशॉप सॉफ्टवेअर विकत घेऊन जरा खोलात शिरून एडिटिंग करायचे, पण त्याचा एक प्रकारचा कंटाळा यायला लागला मग ते सोडून दिलं. सध्या फोनवर लाईटरूमचं मोफत व्हर्जन आहे तेवढं वापरते.

एखादा लेख लिहून झाला की परत परत वाचून त्यात थोड्या सुधारणा केल्या तर तो जास्त चांगला होतो. पण एका मर्यादेनंतर आपणच लिहिलेलं परत परत वाचून ते कंटाळवाणं आणि निरर्थक वाटायला लागतं Lol म्हणजे माझं तरी असं होतं. तसंच काहीसं फोटो एडिटिंगच्या बाबतीत व्हायला लागलं. आधीचंच फोटोचं व्हर्जन/ आधीचंच वाक्य जास्त चांगलं होतं अशी शंका सारखीसारखी वाटायला लागली की आपण ती विशिष्ट मर्यादा ओलांडतोय हे लक्षात येतं. लिखाणाच्या बाबतीत ते अजिबात बाजूला ठेवून दुसऱ्या दिवशी परत वाचणं हे करते. पण फोटोच्या बाबतीत तेवढा पेशन्स जमला नाही!

@रानभुली
धन्यवाद... कोणत्या ऍपवरच्या फिल्टर्स बद्दल म्हणत आहात ? मला फिल्टर्स बद्दल तितकी माहिती नाही पण इंस्टाग्राम हे ऍप बरेचदा चांगले फिल्टर्स सुचवतं, आणि ते थोड्या प्रमाणात वापरल्यास फोटोंमध्ये इंटरेस्टिंग इफेक्टस येतात.

@वावे
धन्यवाद... अगदी अगदी... मला पण कॉम्प्युटरवर एडिट करून एक तोचतोचपणा आला त्यामुळे आता नाहीच करत... अर्थात फोटोशॉप म्हणावं तेवढं शिकलो नाहीये आणि आता तेवढा वेळ द्यावासा वाटत नाही...

याकीसोबा
खूप खूप धनयवाद तुम्हाला हे दोन धागे सुरू केल्याबद्दल, छान उपयुक्त माहिती मिळेल.

एक गोष्ट..
Adobe Photoshop CS हे महागड software आहे पण Adobe cloud ची मेंबरशिप पाहिजे तितके महिने घेऊन त्यांची इतर सोफ्टवेअर वापरता येतात
मी सध्या Adobe Element वापरतो, ते cloud membership शिवाय मिळत आणि फोटोशॉप मधल्या बहुतेक सगळ्या गोष्टी करता येतात.

Lr light room (free) मध्ये काही कामाचे एडिटिंग होत नाहीये. 112 एमबी. काढले.

एडिटिंग करायला फोटोशॉप सारखे बेस्ट काही नाही
माझ्याकडे cs5 व्हर्जन पण मी प्रोफेशनल नसल्याने माझ्या गरजा भागवत मस्तपैकी

पण प्रोसेसिंग करणे हे जाम कंटाळवाणा प्रकार आहे
माझे अक्षरशः शेकडो फोटो असेच पडून आहेत जे कधीतरी करू एडिट म्हणून मी ठेऊन दिलेत

अगदीच कुठ शेअर करायचे असतील तर मी बेसिक एडिटिंग करून टाकतो
त्यातही इंस्टा ला भरपूर ऑप्शन आहेत

फोटोशॉप घेतले. मला कलर करेक्शन करायचे नव्हते. धबधब्याचे फोटो होते त्यात पुढची प्लास्टिक पिशवी काढता आली. पर्यावरणप्रेमी.

@रानभुली
ही आपल्या मोबाईलची फीचर्स असावीत... मी अश्या प्रकारचे फिल्टर ऑप्शन आधी बघितले नाहीत...

@Srd
>> मोबाईलवरील काही फोटो एडिटिंग apps ( android) फोटोची एमबी साईज कमी करतात. Snapseed तसे करते का? <<
माझ्या माहितीप्रमाणे तरी snapseed तसं करत नाही. आपला प्रश्न विचारण्याचा उद्देश काय आहे ? म्हणजे आपल्याला फोटोचा साईझ कॉम्प्रेस न करता हाय क्वालिटी फोटो सेव्ह करणे अपेक्षित आहे कि फोटोचा साईझ कमी करणे अपेक्षित आहे ? पहिलं ऑप्शन अभिप्रेत असल्यास snapseed उत्तम राहील. बरेचदा काही पोर्टल्स वर फोटो अपलोड करण्यासाठी साठी साईझची मर्यादा असते. तसं करणं आपल्याला अभिप्रेत असेल तर इतर ऑप्शन्स शोधायला लागतील.

@manya
धन्यवाद... elements बघतो एकदा काय आहे ते...

@Srd
>> Lr light room (free) मध्ये काही कामाचे एडिटिंग होत नाहीये. 112 एमबी. काढले. <<
हाहा .. खरं आहे पण काही कलर करेक्शनची ऑप्शन्स उत्तम आहेत... आणि मी मोबाईलमध्ये लाईटरूम ठेवण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे लाईटरूम ऍपमधून raw (.dng) फॉरमॅट मध्ये फोटो काढता येतात ज्यांचं पोस्ट प्रोसेसिंग jpg पेक्षा अधिक चांगलं करता येतं. बरेचदा मी काही निसर्ग छायाचित्र ही लाईटरूम मध्ये raw फॉरमॅट मध्ये काढून बेसिक ऍडजस्टमेंट्स करून मग फायनल एडिटिंगची गरज पडल्यास snapseed मध्ये घेऊन एडिट करतो.

>> फोटोशॉप घेतले. मला कलर करेक्शन करायचे नव्हते. धबधब्याचे फोटो होते त्यात पुढची प्लास्टिक पिशवी काढता आली. <<
हे ऑप्शन मी snapseed मध्ये वापरतो... healing म्हणून आहे...

@आशुचँप
>> पण प्रोसेसिंग करणे हे जाम कंटाळवाणा प्रकार आहे
माझे अक्षरशः शेकडो फोटो असेच पडून आहेत जे कधीतरी करू एडिट म्हणून मी ठेऊन दिलेत <<

अगदीच पटलंय.. म्हणूनच आता मोबाईलवर एडिट करतो जेणेकरून बसल्या बसल्या कुठेही करता येतं...

Adobe elements processing च उदाहरण म्हणून खालील चित्र पहा, डावीकडच चित्र मूळच आहे, उजवीकडच्या चित्रात वेगळ्या पार्श्वभूमीवर व्यक्तींची चित्र copy paste केली आहेत, तसच दोन्ही चित्र जोडण, चेहरे झाकण्यासाठी watermark, तसच size आणि resolution कमी करण अशा गोष्टी सुद्धा करता येतात
orginal-processed-1.jpg

@याकीसोबा, माझे प्रयोग -
मी ही Android Apps वापरत होतो.
1) photo editor ( https://play.google.com/store/apps/details?id=com.iudesk.android.photo.e...) वापरतो cropसाठी आणि फोटोवर लिहिण्यासाठी. रेझ साईज फार कमी होत नाही.

२) photo and picture resizer ( https://play.google.com/store/apps/details?id=com.simplemobilephotoresizer) हे रिसाइझिंगसाठी वापरतो.

३) point blur ( https://play.google.com/store/apps/details?id=jp.co.pointblur.android.ap...)
फोटोवरील पर्सनल डिटेल अस्पष्ट करण्यासाठी. रेझ साईज कमी होते. पण काम झटपट होते.
---------------------
- 'Remove unwanted object' -
'धबधब्याच्या फोटोतील प्लास्टिक काढणे' यासाठी फोटोशॉप वापरल्यावर मूळ फोटो 4.39 mb वरून 2.68 एवढा खाली आला. पण Snapseed - Tools - healing वापरल्यावर साईज कमी झाली नाही. 4.37mb टिकली. Snapseed बेस्ट.

@srd
Android built-in photo editor आणि galary मधे बऱ्याच गोष्टी करता येतात.
Built-in photo editor तर Samsung S7 पासून वापरतोय (गेली ४-५ वर्ष).
Android built-in photo editor मधे बेसिक गोष्टी जस, ब्राईटनेस, काँट्रास, exposure, tone adjustment, क्रॉप, फिल्टर वैगरे आहेतच. पण चेहरा bright, smooth करण, डोळे थोडसे उघडण, चेहेरा लांबट कारण, रेड eye effect correction हे पण करता येत. फोटो डाव्या-उजव्या बाजूला किंवा वर-खाली कलता करणं (change perspective), aspect ratio बदलणं, flip (selfie साठी) तसच अजून टेक्स्ट किँवा स्टिकर फोटो वर लावता येतात. नवीन editor मधे स्पॉट टच ब्लर option पण आहे पण मी नीटसा वापरून बघितल नाहीये ते. चेहऱ्याचा जवळून फोटो असेल तर potrait इफेक्ट देऊन मगच background blur करता येत.
गॅलरी मधे हवे ते फोटो निवडल्या नंतर खालच्या तीन टिंबावर टिचकी मारून more options वैगरे बघितल की त्यात त्या निवडलेल्या फोटोंचे कोलाज, movie किंवा Gif करता येतात. Movie बनवताना त्यात ऑडियो ट्रॅक पण घालता येतो.
हे सगळं अगदी कुठलीही नवीन ॲप डाऊनलोड न करता फुकट करता येत मोबाईल वर
built-in photo editor मधे अजून स्टिकर किंवा इतर हवं असल्यास मात्र थोडी किंमत मोजून डाऊनलोड करावे लागतील, पण बहुधा त्याची गरज पडत नाही