![](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/article_images/2022/08/23/20220823_232302.jpg)
चाफा फुलला..
अंदाजे ऑक्टोबर २०२१ मध्ये आमच्या शेजाऱ्यांनी त्यांच्या मित्राने छाटलेल्या चाफ्याच्या काही फांद्या दिल्या. आमचे गच्चीवरचे उद्योग बघताना केव्हातरी मी चाफ्याचे झाड लावायची इच्छा दर्शवली होती. ती लक्षात ठेवून त्यांनी ही भेट मला दिली. त्यातून चार फांद्या निवडल्या आणि त्यांचे खालचे टोक ४५ अंशात कापले. पांढरा चीक आला त्यावरच मध, हळद आणि दालचिनी पूड समप्रमाणात घेऊन मिश्रणाचा लेप दिला आणि छोट्या चार कुंड्यांमध्ये एकेक रोप लावले. घरातच चारही प्रयोग ठेवले. आठ दिवसातून एकदा थोडे पाणी घालायचो. तीन चार महिन्यात एकेक करून तीन फांद्या सुकल्या पण एक मात्र तग धरून होती. मरत नव्हती हेच जिवंत असल्याचे लक्षण. साधारण पाच महिन्यांनी तिच्या टोकाची एकमेकाला चिकटलेली छोटीशी पाने विलग होऊन "आम्ही आहोत" असे सांगू लागली. प्रयोग यशस्वी झाल्याने उत्सुकता वाढली आणि उत्साहही. पुढे रोज बदल दिसू लागले. इवलीशी पाने तुकतुकीत चॉकलेटी दिसू लागली.
पानांचे आकार हळूहळू मोठे होऊ लागले आणि रंग टवटवीत हिरवा होऊ लागला. लवकरच रोप मोठ्या कुंडीत स्थलांतरित करून त्याची गच्चीवर पाठवणी केली. मातीविरहित कुंडीत मुख्यतः बदामाच्या वाळक्या पानांपासून आणि घरच्या जैविक कचऱ्यापासून केलेले खत, भरपूर ऊन, मोकळी हवा आणि बाजूचे हिरवे सवंगडी यांच्या सान्निध्यात चाफा जोमाने वाढू लागला. पावसाळ्यात हिरवीगार टवटवीत पाने नेत्रसूख देत असतानाच जुलै महिन्यात एक दिवस शेंड्यावर वेगळी वाढ दिसली. करंगळी इतपत जाड पण सरळ वाढणारा दांडा आणि त्यावर छोटे छोटे काळे ठिपके. चारपाच दिवसातच तो कळ्यांचा गुच्छ असल्याचे लक्षात आले आणि "किती सांगू मी सांगू कुणाला..." असे झाले. काही दिवसातच कळ्या स्पष्ट दिसू लागल्या आणि हा पांढरा चाफा असल्याचे लक्षात आले. रोप लावल्यापासून साधारण नऊ महिन्यांनी स्वातंत्र्यदिनी पाहिले फूल फुलले हा निव्वळ योगायोग.
छाटलेली फांदी ते बहरलेल्या झाडाचे फूल हा वाढीचा प्रवास पहाणे म्हणजे निखळ आनंद. काय धडपड केली असेल त्या सुप्तावस्थेतल्या पहिल्या पाच महिन्यात? कुठे सापडला हा मोहक सोनेरी पिवळा रंग? कोठून आणले ते स्वच्छ पांढऱ्या रंगाचे तेज? कचऱ्यातून कसा शोधला रेशमाहूनही मुलायम स्पर्श? कुजलेल्या खतात कुठे दडला होता सुगंध? सगळेच अनाकलनीय ...... आणि म्हणूनच वंदनीय.
अरे वा! छानच.
अरे वा! छानच.
खूपच छान अनुभव. लिहीलंय पण
खूपच छान अनुभव. लिहीलंय पण छान.
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
चाफ्याचा वेल असता तर किती बरं
चाफ्याचा वेल असता तर किती बरं झालं असतं.
सुरेख लिहीलंय. झाडाचे, बागेचे
सुरेख लिहीलंय. झाडाचे, बागेचे अजून फोटो बघायला आवडतील.
सुंदर
सुंदर
छान!
छान!
सुंदर अनुभव !
सुंदर अनुभव !
सुंदर अनुभव , चाफा ही छान
सुंदर अनुभव , चाफा ही छान दिसतोय
वाह! सुरेख लिहिलंय.
वाह! सुरेख लिहिलंय.
सुंदर लिहिलय... आपण प्रेमाने
सुंदर लिहिलय... आपण प्रेमाने जपलेल्या झाडाला पहिलं फुल आलेलं पाहाण्याचा आनंद अवर्णनीय असतो. भाग्यवान आहात.
छानच. अशी हुरहूर आवडते.
छानच. अशी हुरहूर आवडते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![IMG_20220824_122400-752x1004.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u61480/IMG_20220824_122400-752x1004.jpg)
माझ्या कुंडीतली नागवेल पूर्ण सुकलीच होती. सुकलेल्या पानांखाली दोन बारीक हिरव्या काटक्या दिसत होत्या. म्हणून उपटून टाकलं नाही. थोडं थोडं पाणी घालत राहिले. आज १६ दिवसांनी हे चित्र आहे. आता जगणारच.
अजित, खूप छान लिहिलय. तुमचा
अजित, खूप छान लिहिलय. तुमचा चाफा बहरून जावो.
चिन्मयी, नागवेलीला जपावे लागतेच. एकदा रुजली की तगते. जास्त ऊन लागू देऊ नका.
छान लिहीलंय.
छान लिहीलंय.
आपण प्रेमाने जपलेल्या झाडाला पहिलं फुल आलेलं पाहाण्याचा आनंद अवर्णनीय असतो. >> + ११११
मला ठाणे हायपरसिटी च्या
मला ठाणे हायपरसिटी च्या आवारातील पांढऱ्या चाफ्याची छाटणी करत असताना सहज मागितल्यावर एक फांदी दिली होती माळीबुवाने मीही ती अशीच कुंडीत लावली व यथावकाश पाणी घालत राहिले आणि त्याला बहरत जाताना पाहिले आहे पण काही काळाने मला घर बदलावे लागले व मी नवीन ठिकाणी माझी झाडे नाही घेऊन जाऊ शकले त्यामुळे त्या झाडाला सुकतानाहि पाहायचे नशिबात आले।
मोगरा काही दिवस घरात ठेवला
मोगरा काही दिवस घरात ठेवला होता तर अजिबात फुलला नाही. रुसून काय बसला. घुम्यासारखा वागे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण नंतर गॅलरीत ठेवाल. भरपूर दणकुन उन मिळाले तर हसू, फुलू लागला. आता ६ कळ्या येउन डोलतायत . मी वाट बघतेय कधी उमलणार याची.