वेगळा भाग - २१

Submitted by निशा राकेश on 29 July, 2022 - 00:38

बायडा दुसर्या दिवशीच पुन्हा सासरी निघून गेली, रामला कल्पना देखील न्हवती , तो तिला संध्याकाळी पुन्हा एकदा भेटून तिच्याशी सविस्तर बोलणार होता तिला समजवणार होता , रामने पुन्हा टेकडी जवळ केली, काहीही झाल तरी आपल दु:ख हे दुसऱ्या कुणालाही सांगायचं नाही ह्याची जणू त्याला सवयच झाली होती, पण कितीहि झाल तरी दु:खाचं ओझ पाठीमागे दडवून जरी आपण आयुष्य जगत राहिलो, कितीही उसण अवसान आणून आपण हसत राहिलो, खोट वागत राहिला तरी आपले डोळे आपली वेगळीच कथा सांगत असतात , आणि ते सर्वाना जरी नाही कळल तरी ज्या लोकांना आपली मनापासून काळजी आहे , किंवा ज्यांना आपल्यात स्वारस्य आहे त्यांना आपल्यातला हा बदल लगेच कळतो, रामची काळजी घेणारे लोक तर होतेच , पण त्याचा मर्यादे पेक्षा जास्त विचार करणारी एकच व्यक्ती होती ती म्हणजे जया ,

रविवारचा दिवस होता , कॉलेजला सुट्टी होती , राम त्या दिवशी कंटाळा आला म्हणून कामाला ही गेला नाही , दिवस कसा बसा झोपून , टीव्ही बघून , थोडफार वाचन आणि अभ्यास करून त्याने काढला , काही केल्या रागावून निघून गेलेली बायडा त्याच्या नजरेसमोर जात न्हवती , संध्याकाळी टेकडीवर आपसूकच त्याचे पाय वळले, पण त्या रस्त्याला आज कुण्या नेत्याची सभा असल्या कारणाने प्रचंड गर्दी होती , मोठ मोठे लाउड स्पीकर बसवले होते , टेकडीवर निवांत बसलायला जाव तर तिकडे ह्यांच्या भाषणाचे आवाज येणार म्हणून तो माघारी वळला पण त्याला घरी जावस वाटेना, तो दत्त मंदिरात गेला , तिकडे थोडाफार निवांत पणा होता , त्याने मंदिराच्या डाव्या कोपर्यातली जागा पकडली आणि तिथेच मांडी घालून बसला, आपसूकच त्याचे डोळे मिटले , क्षण - दोन क्षण गेले असतील त्याच्या गालावरून , डोक्यावरून काहीतरी पिसा सारख फिरून गेल , त्यासरशी त्याने डोळे उघडले , तर ती एका मुलीची ओढणी होती , त्या मुलीच राम कडे लक्ष न्हवत , तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एकटक पाहत राहिला, ती मन लाऊन दर्शन घेत होती , अचानक ती वळली आणि तिची रामशी नजरा नजर झाली ती दुसरी कोणीही नसून जया होती , राम ने लगेच त्याची नजर वळवली, त्याला चोरट्या सारख झाल , तिच्या चेहऱ्यावर मात्र आश्चर्य होत.

“ तू इथे , काय करतोयस “ जया त्याच्याकडे येत म्हणाली.

“तू जे करतेयस तेच “ राम ने निर्विकार पणे उत्तर दिल.

“अरे म्हणजे तसं नाही, तू इथेच राहतोस का आसपास”

“होय इथे मागच्या वस्तीत”

“अच्छा , “ अस म्हणून तिने ती वस्ती अगदी नीट पाहून घेतली.

तिला वाटत होत , राम ने तिला घरी येण्याच्या आग्रह करावा , पण राम काही बोलेना किंवा अस बोलाव हे त्याला सुचल नसाव.

“ तू देखील नेहमी येतोयस का इथे ” काहीतरी बोलाव म्हणून जयाने विचारल.

“नाही , नेहमी नाही पण कधी कधी मला अस्वस्थ ....................” अस म्हणून तो थांबला आपण काहीतरी भलतच बोलतोय आणि ते पण जया समोर , तो गप्प राहिला .

“कधी कधी काय “ जयाने विचारल.

“कधी कधी , काही नाही , कुठे काय , कधी कधी येतो मी इथे मंदिरात “ अस म्हणून त्याने वाक्य पूर्ण केल, राम बोलत होता पण त्याचे डोळे वेगळच काहीतरी सांगत होते आणि जयाला ते कळत होत.

ती त्याच्या शेजारी बसली , आणि त्याच्याकडे एकटक पाहत तिने त्याला मायेने विचारल.” काही झालय का “

“काही नाही “ राम ने तत्परतेने उत्तर दिल.

“ राम , बोल ना , मन हलक होईल तुझ”

हिला सांगाव का , पण मला काय समजेल हि राम मनातल्या मनात विचार करू लागला.

“काही नाही , चल मी निघू , उशीर होतोय” अस म्हणून राम उठून उभा राहिला.

“राम , बस इथे , अजिबात उठायचं नाही “ जयाच्या तश्या बोलण्याने तो नकळत खाली बसला.

“काय झाल सांग ना, अरे तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय , सांग ना , तुला माझी शप्पत आहे “ जया बोलून गेली , राम पाहतच राहिला ,

मूर्ख आहे का हि , शपता कसल्या घालते , राम ला धड तिकडून निघता हि येईना, त्याला कात्रीत पकडल्या सारख झालं.

“शप्पत काय घालतेस , सांगतो , माझी एक मैत्रीण होती , तीच नाव बायडा , इथे आमच्या वस्तीतच राहायची” राम ने सांगायला सुरुवात केली,

“ तुला मैत्रीण होती , मला तर खरच नाही वाटत “

“ ऐकायचय ना तुला , मग ऐक ना शांतपणे “

“सॉरी, पुन्हा नाही मध्ये बोलणार , सांग तू “ अस म्हणून तिने तिचे दोन्ही कान पकडले.

रामाला हसू आल , जया सोबत च्या त्या संवादामुळे का होईना त्याच्या दु:खाची सल थोडी कमी झाली,

राम ने तिला सुरुवाती पासून ते अगदी बायडाच्या शेवटच्या भेटी पर्यंतचा वृतान्त जयाला ऐकवला तो देखील जयाच्या झालेल्या नावाच्या उल्लेखा सकट.

सर्व ऐकल्यावर जया हसली , मनापासून हसली , राम ला मात्र कळेना .

“ह्यात हसण्यासारख काय आहे “

“इतक्या लहान सहान गोष्टींचा विचार करत बसशील तर , आयुष्य कस जगशील “ जया मिश्कील पणे रामला म्हणाली.

“लहान गोष्ट नाहीये जया , बायडा खूपच चिडलीये माझ्यावर”

“ ते तर तिच्या जागी मी असते तर मी देखील चिडले असते, पण एक लक्षात ठेव तीच आता लग्न झालंय, आणि तू काहीही चुकीच केल नाहीस , ह्या सर्व गोष्टीना परिस्थिती जबाबदार होती , तुझ्या हातात काहीही न्हवत , म्हणून आता वेड्या सारखा ह्या गोष्टींचा सतत विचार करण बंद कर“

राम सर्व शांतपणे ऐकत होता , काही वेळ आणखीन थोड्या वेगळ्या गप्पा मारल्यावर दोघेही उठले आणि मंदिरातून बाहेर पडले.

रामला बरंच हलक वाटत होत. मनावरच ओझ उतरल्यासारख.

दिवस भराभर जात होते , कॉलेजची सहामाही परीक्षा संपली, विजय आणि राम ह्यांना चांगले पेपर गेले , काम आणि कॉलेज हे दोन्ही सांभाळून त्यांची नाही म्हंटली तरी बरीच प्रगती होती ,

पण चंदूच्या अवस्थेत म्हणावी तितकी सुधारणा होत न्हवती , औषधांच्या गुंगी मुळे तो झोपून राही , घरच्यांशी त्याच बोलन कमी झाल होत, पण तो स्वतःशी बोलल्या सारखा काहीतरी बडबडत राही , त्याची शब्द रचना हि असमंध असे , अश्याच असमंध शब्द रचनेतून त्याने स्वतःची एक भाषा तयार केली होती, त्या भाषेतले शब्द त्याचे, वाक्य त्याची आणि गाणीही त्याचीच, आणि तो हि बडबड सुरुवातीला थोडीशी आणि काही दिवसांनी मात्र सतत करू लागला.
ऐकणाऱ्याला त्याची बडबड विचित्र वाटे , आणि जेव्हा रात्री त्याला झोप लागत नसे तेव्हा मात्र त्याची बडबड हि भीतीदायक वाटे , शेजाऱ्यांनी त्याला देवृषाला दाखवा असे हि सांगून पहिले पण , रामला मात्र त्यात तथ्य वाटत नसे , चंदूच्या मनस्थितीवर त्याने केलेल्या व्यसनांमुळे परिणाम झालाय आणि हे असे काही अघोरी उपाय करून त्याचा काहीही फायदा होणार नाही अस तो म्हणे , दादांनी डॉक्टरांना देखील विचारून पहिले पण डॉक्टरांकडे ह्याच काहीही समाधानकारक उत्तर न्हवत,
आणि असही मानसिक आजार हे कधी बरे होतील , भविष्यात ते बरे होतील कि नाही आणि झालेच तर कालातंराने ते पुन्हा डोक वर काढणार नाही ह्यांची शाश्वती कोणताही मानसोपचार तज्ञ देऊ शकत नाही,

दुर्दैवी चंदू च्या बाबतीत हे घडावं हे चंदू पेक्षा त्यांच्या घरच्यांसाठी जास्त त्रासदायक आणि तापदायक होत, राम घरी आला तर चंदू कधी कधी टीव्ही पाहत बसलेला दिसे तर कधी कधी दादांचे पाय चेपताना, पण त्याच्या तोंडाची टकळी हि त्यावेळी हि अखंड सुरूच राही.

दादा कधी पाय चेपून घेता घेता झोपून जरी गेले तरीही तो त्याच बडबडीत, आणि त्याच लयीत पाय चेपतच राही , मग मध्ये जेव्हा केव्हा दादांना जग येई तेव्हा ते त्याला झोपायला सांगत आणि तेव्हा देखील तो त्याला झोप लागे पर्यंत बडबडत करीत असे.

झेंडु ने कधी जेवायला वाढल तर , तोंडात घास असताना देखील तो बडबड करीत राही , कधी कधी त्याला ठसका लागे तरीहि तो काही केल्या थांबत नसे ,

असा हा अनोखा आणि विचित्र दिनक्रम रामचा आणि त्यांच्या घरच्यांचा सुरु झाला होता आणि त्याला काहीही इलाज न्हवता, तसेच ते लोक दिवस दिवस ढकलत होते.

वर्ष संपल , राम आणि विजय १२ वीत गेले आणी जया १० वीत तिघांचं हे महत्वाच वर्ष होत , राम आणी विजय हे फार मन लाऊन अभ्यास करीत असे ,

जया चा अभ्यास मात्र जेमतेम होता , सुशीलाबाई ना अभ्यास करते अस सांगून ती कविता लिहित राही ,

पण घरात तिच्या भावाला आणि आईला ह्यांची पुसटशी देखील कल्पना न्हवती, तीच दे गुपित तिने फक्त राम ला सांगितलं होत ,

विजय ची पुस्तक द्यायच्या कारणामुळे रामच विजय कडे वरचे वर जाण होत असे , आणि त्याची जया सोबत हि चांगली मैत्री झाली होती ,

त्या दिवशी देखील जया ने नवीन कविता नुकतीच लिहिली होती आणि तेव्हा तिथे राम पोहचला, कवितेची वही रामच्या हातात देऊन त्याच्या चेहऱ्यावरचे भाग टिपण्यात ती मग्न झाली , राम कविता वाचू लागला

कवितेच नाव : मनीषा

ठसठसणारी खोल आतवर खदखदणारी एक मनीषा.
येऊ पाहते बाहेर आता ठरण्यास माझ्या जगण्याची दिशा

रोजरोज मग पडेल स्वप्न पूर्णत्वाच्या अभिलाषेचे,
मला पाहता गोड हसेल उमलत बहरत जाईल ते

कुणास ठाऊक नकोत आता पुसटसाही एक नकार
होईल सर्व सकारात्मकच, आहे हाच दृढविश्वास

सुरेख होईल चीज गोजिरे माझ्या निव्वळ स्वप्नांचे
असेल ऋणी मी तुझीच आता सार्थक होईल जगण्याचे.

सुरुवातीला राम ला ती कविता अजीबात समजली नाही , “मनीषा म्हणजे काय हे समजायला थोडा वेळ गेला , जयाने मनीषा म्हणजे आपली आंतरिक इच्छा असे जेव्हा सांगितले तेव्हा त्याला कुठे संदर्भ लागला,

“कसली इतकी खदखदणारी, ठसठसणारी आंतरिक इच्छा आहे तुझी “ अस म्हणून त्याने त्याच हसू आवरलं.

जयाने त्याच्या हातातली आपली कवितेची वही खेचून घेतली आणि आणि त्या वहीनेच ती त्याला खोट खोट मारू लागली.

राम तिचा मार चुकवत तिला अडवू लागला तरीही ती थांबेना.

“ वही फाटेल हा तुझी “ अस जेव्हा तो म्हणाला तेव्हा ती थांबली आणि त्याच्याकडे रागाने पाहू लागली .

“दुष्ट आहेस तू” खोट्या रागाने ती तिच्याकडे पाहू लागली.

“अग मग काय म्हणू , मला नाही कविता लवकर कळत”

“म्हणून मग टिंगल करशील “

“बर बाई , चुकल , पुन्हा नाही करणार”

जया शांत झाली, राम निघतो म्हणून उठला , तिने त्याला थांबायला सांगितलं आणि त्याने दिलेले कानातले जोड त्याच्यासमोर धरले.

“नको मला हे “ अस म्हणून जया ते कानातले त्याच्या हातात कोंबू लागली.

“ चुकल म्हणालो ना मी , पाहिजे तर उठा बशा काढू का कान पकडून “

“ अरे कविते साठी नाही म्हणत मी , पण कशाला तुझी हि आठवण तरी ठेऊ माझ्याकडे”

“म्हणजे “

“तुला खरच कळत नाही , कि असा मुद्दाम वागतोस” जया ने त्याच्या कडे रोखून पाहिलं.

राम जया शेजारी बसला आणि तिला समजावण्याच्या स्वरात तिच्याशी बोलू लागला ,

“ मला सगळ समजत जया, पण तू जसा विचार करतेस, तसं आपल्या बाबतीत कधीही घडू शकणार नाही , तुझ्या घरच्यांना हे अजिबात आवडणार नाही ,”

“तुला आवडेल “ जया ने रामकडे आशेने पाहत विचारल, तिच्या मोठ्याला डोळ्यात एव्हाना पाणी तरळल होत.

“तू आवडतेस मला , तुझ्याशी बोलून मन मोकळ होत माझ , हलक वाटत मला खूप , तू निरागस आहे , अजून तुला खूप जग पहायचंय, माझ्यापेक्षा खूप चांगला आणि कर्तबगार मुलगा मिळेल तुला”

“ राम माझ प्रेम आहे तुझ्यावर , आणि मला नकोय दुसर कोणी” जया स्पष्टपणे बोलून गेली.

राम ला काय बोलाव हे सुचेना , त्याला कल्पना होतीच पण ती हे लगेच स्पष्टपणे बोलेल अस मात्र त्याला अजिबात वाटल न्हवत, थोडस थांबून तो जया कडे न पाहताच बोलू लागला .

“माझ्यावर खूप जबाबदार्या आहेत , माझ शिक्षण, झेंडूच शिक्षण आणि लग्न, आणि माझा लहान भाऊ चंदू एक मानसिक रुग्ण आहे त्याची देखील जबाबदारी माझ्यावरच आहे , तुझी फरफट होईल माझ्या सोबत, मी लग्न कधी करेल , करेल कि नाही , मला नाहीत माहित , तू किती वाट पाहशील माझी”

“शेवटपर्यंत “ जयाने क्षणाचा विलंब न लावता उत्तर दिल .

दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहत हरवून गेले ,

राम कितीही नाही म्हणाला तरी जया त्याची एक चांगली मैत्रीण तर होतीच पण त्याच बरोबर त्याला देखील तिची निनांत गरज होती , म्हणून तो धड नाही देखील म्हणू शकला नाही प्रश्न अधांतरी ठेऊन त्याने जयाचा निरोप घेतला.

वस्ती जवळ तो त्याच्या विचारांमध्ये असतानाच कधी येऊन पोहोचला हे त्याच त्यालाच कळल नाही , वस्ती जवळ बरीच गर्दी जमली होती , आणि सर्व लोक त्याच्याच चेर्ह्र्याकडे पाहत होते , राम देखील सर्वांकडे पाहत घराच्या दिशेने चालू लागला , त्याने पाहिलं तर त्याच्या घराबाहेर , वस्तीतल्या काही लोकांसोबत पोलीस देखील उभे होते .

क्रमश:

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी मागे पण पोस्ट केल होत, एखाद्या चित्रपटाच्या पटकथे सारखी वाटते ही गोष्ट
फार twist, surprise नाहीत पण प्रत्येक भागात घडणाऱ्या घटना वाचकाला गुंतवून ठेवतात आणि पुढच्या भागाची उत्कंठा वाढवतात
आता नक्की काय झालं असेल, राम चे वडील, चंदू की पुन्हा बायडा ने काही घोळ घातलाय

दुर्दैवानं वाचकांचा फार प्रतिसाद नाही येत इथे
पण तुमच लिखाण खूप छान आहे
पुढच्या भागाची प्रतीक्षा आहे