आमच्याकडे एक बरीच जुनी मळकट कार आणि एक थोडी जुनी बेढब वॅन आहे. या दोन्हीही मी नियमित चालवत असते. पण दोन तीन वर्षात आमच्या नेबरहूडात हळूहळू सगळ्या टेस्ला दिसायला लागल्यात. किंवा साधुसंतांना सगळीकडे जसा ईश्वर दिसतो तशा मला ह्याच दिसत असतील. मागच्या वर्षीपासून तर ड्रायव्हिंग करताना दर तीन मिनिटाला एक टेस्ला बाजूने सुळकन निघून ही जाते. आणि मला आपोआपच हीन भावना येते. कसं ते सांगायला '3 ईडियट्स' मधल्या रँचो सारखा डेमो देते. त्याशिवाय काही ही हीन भावना तुमच्यापर्यंत पोचणार नाही.
कल्पना करा, शेजारशेजारच्या दोन थेटरात दोन सिनेमे लागलेत , त्याचे पोस्टर बाहेरच्या भिंतीवर लावलेयं. एकात 'गहराईयां'ची दीपिका पडूकोण तर दुसऱ्यात कुठल्याही सिनेमाची काकुळतीला आलेली निरूपा रॉय आहे. निरूपांच्या सिनेमाचे तिकीट पन्नास रुपये व दीपिकाच्या सिनेमाचे हजार आहे, आणि तुमच्याकडे पंचवीस रूपये आहेत तर तुम्हाला सिनेमाला न जाताही हीन भावना येईल. शिवाय घरी येऊन टिव्ही बघावा तर आहेत त्या एक-दोन वाहिन्यांवर 'आमची माती-आमची माणसं' लागलेलं असंल, तर जे काय मनात तयार होईल. ती हीच भावना होय.
आम्ही असेच कुठूनतरी कुठेतरी गाडीने जात होतो. मी ड्रायव्हिंग करत होते, तेव्हा रेड लाईटवर थांबून निघाल्यानंतर गाडीचा पिकप व समोरचा चढ चढताना म्हशीवर बसल्याचं फील आलं आणि दुर्दैवयोगाने निळी टेस्ला हरणासारखी टेकोव्हर करून गेली. मगं मी मुलांना विचारले, "तुमच्याकडचे सगळे पैसे मला देता का ? आपण पोटालाच नाहीतर सगळ्या अंगाला चिमटे काढून टेस्ला आणू. लेक , "मी काही ओवाळणीचे जमवलेले एकशे बत्तीस डॉलर देणार नाही. गेट युवर ओन", म्हणाली. मुलगा पार्टटाइम नोकरी करून पैसे जमवतोय म्हणून मला वेडी आशा होती. तो म्हणाला, मला केन्ड्रीक लमारच्या म्युझिक कंसर्टसाठी हवे आहेत, पुढच्या वेळी देतो." बघा आता, हा केन्ड्रीक लमार आला होता का याचे ढु धुवायला!!! कलियुगातील स्वार्थानी बटबटलेली मुलं कुठली आईच्या भौतिक इच्छा किंवा छोटेसे हव्यास पूर्ण करणार, आता आयांना आपापले पांग आपणच फेडावे लागणारे. (बायदवे, पांग म्हणजे काय आणि ते लुगडे किंवा धोतर असल्यागत फेडावे का लागते, शिवाय नेसलेले कधी असते ??)
दुसऱ्या वेळीही व त्यानंतर दरवेळी टेस्ला बघून 'आमची माती, आमची माणसं'वालं गरीब व मंद फील व्हायला लागलं. तेव्हा दरवेळा 'बघा, बघा'वगैरे संवाद व 'मेरा नंबर कब आयेगा' ते 'अपना टाईम आयेगा' ह्या चर्चाही व्हायला लागल्या. कधी उरलेली वाटली डाळ सगळ्यांना तीन दिवस हफ्त्याहफ्त्याने संपवावी लागल्याने, कधी 'डॉक्टर स्ट्रेंज' बघायला नेण्याऐवजी घरीच 'मुंबईचा फौजदार' बघायला लावल्याने, कधी लेकीने दाखवलेल्या क्यूट भूभूचे कौतुक करताना कुत्र्यांमधला 'महेश बाबू' म्हणणे वगैरे आगावपणा केल्याने, माझ्याबद्दल सहसा कुणाचेही धोरण सहिष्णू वगैरे नसते. हळूहळू सगळ्यांनी माझ्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली आहे. तुम्ही म्हणाल , नवऱ्याशी बोलावे, पण तो 'आशीर्वाद' कणकेपासून-टिव्ही पर्यंत सगळ्या गोष्टींना 'थोडं थांब' असंच म्हणतो. यासाठी थांबून राहीले तर स्वदेस सिनेमातल्या 'बिजली' म्हणणाऱ्या आजी सारखी अवस्था होईल.
तरीही जेव्हा जेव्हा बाजूने टेस्ला जाते मीही 'अशीही बनवाबनवी' मधली मोलकरीण जशी संशय, असूया व असुरक्षित भावनेने , स्टिकर मिशीचे equilibrium हुकलेल्या धनंजय माने व त्याच्या 'भक्कम बाईमाणूस' ईत्यादी गँगकडे बघायची तसे बघते. तिलाही तिची कारणं होतीच, 'विजू खोटे' सारखा शोलेपासून मार खाऊन परत येणारा आद्य अपयशी बॉयफ्रेंड असल्यावर, ती तरी काय करणार ???
तिला जशी तिची कारणं आहेत तशी मलाही , म्हणून माझ्यासारख्या मनाने कुठेतरी किंचितच पण मडोनाची 'मटेरिअल गर्ल' असलेल्या, चटकचांदण्या आणि भटकभवान्यांसाठी ही 'दिसला गं बाई दिसला' या गाण्यात बसवलेली टेस्लाची लावणी....;)
टेस्ला गं बाई टेस्ला
ईर्षेच्या जाळाची नजर नस्ती
चालं मी कडंनं ट्रॅफिकच्या रस्ती
ब्रेकं पुढं, गॅस मगं मागं, भोंगेही स्टायलिश गाती
ब्रेकं पुढं, गॅस मगं मागं, भोंगेही स्टायलिश गाती
लाईटचा दिलबर, वायरचा चार्जर, होs s
लाईटचा दिलबर, वायरचा चार्जर, होs s
का परवडंनं मला, बाई-बाई का परवडंना मला
डब्बा चालवना, पेट्रोल भरवना
घेऊ कसं, घेऊ कसं, घेऊ कसं ??
टेस्ला गं बाई टेस्ला
टेस्ला गं बाई टेस्ला
तिला बघून जीव हा जळला , गं बाई जळला
तिला बघून जीव हा जळला , गं बाई जळला
मस्क हा अंगानं उभा नी आडवा
गं ट्विटात त्याच्या मोहाचा चकवा
म्हणे घ्यावा नाही तर मंगळावर जावा
मस्क हा अंगानं उभा नी आडवा
म्हणे घ्यावा नाही तर मंगळावर जावा
पांढऱ्या कारा, डॉलर लाखाला
निळ्याला सव्वाचा बट्टा
पांढऱ्या कारा, डॉलर लाखाला
निळ्याला सव्वाचा बट्टा
काळजामधे ह्या घुस्ल्या, गं बाई-बाई काळजामधे घुस्ल्या
काळजामधे, काळजामधे, काळजामधे
टेस्ला गं बाई टेस्ला
टेस्ला गं बाई टेस्ला
तिला बघून जीव हा जळला , गं बाई जळला
तिला बघून जीव हा जळला , गं बाई जळला
______
कमेंट न करता जाताय, हे वागणं बरं नव्हं
फोटो साभार# टेस्ला डॉट कॉम व इंटरनेट
©अस्मिता
भ न्ना ट!!!
भ न्ना ट!!!
बाकी तुझ्या भावना अगदी पोहिचल्या, लेकाला शाळेत सोडायला जाताना ड्राइव्ह थ्रु मधे इतक्या टेस्ला मागे -पुढे असतात की काय विचारु नका
हाहाहा मस्त लिहीलयस.
हाहाहा मस्त लिहीलयस.
>>>>>>हा केन्ड्रीक लमार आला होता का याचे ढु धुवायला!!!
ए काय गं बिचार्याला
घेऊन टाका- लॉन्ग टर्म परवडते.
घेऊन टाका- लॉन्ग टर्म परवडते.. गॅस लयच महाग आहे...
भारी आहे
भारी आहे
चालीतच वाचून पाहिली . अगदी मीटरमध्ये आहे
मस्त, मजेशीर, हहपुवा लिहिलंय.
मस्त, मजेशीर, हहपुवा लिहिलंय.
लावणी पण भन्नाट.
कलियुगातील स्वार्थानी बटबटलेली मुलं>>>> मुलगा मला दर दोन दिवसांनी, अम्मा, मुझे र्युबिक क्युब चाहिए,अम्मा मुझे ये चाहिए,वो चाहिए..आणि मी दरवेळी नाही म्हटले कि, मुलाचं उत्तर ' टेस्ला तो नही मांग रहा हु ना' !
घ्या
अगं, कसलं भन्नाट लिहिलयल
अगं, कसलं भन्नाट लिहिलयल
लावणी तर एक नंबर, मी ताला सूरात म्हणत वाचली
धमाल लिहिलंय
धमाल लिहिलंय
मस्त जमली!!
मस्त जमली!!
छान लिहीले आहे.
छान लिहीले आहे.
पण दोन तीन वर्षात आमच्या नेबरहूडात हळूहळू सगळ्या टेस्ला दिसायला >>> अगदी अगदी. आता तर आमच्या शेजाऱ्यांनीही घेतली आहे. जाता-येतां नेहमी चार्जिंगला लावलेली दिसते(दावणीला बांधल्यासारखी).
बॅटरी १००%च्या खाली येऊच देत नसतील ते
खत्तर्र्नाक लिवलंय!
खत्तर्र्नाक लिवलंय!
'कोतबो लावणी' हा प्रकार कमाल आहे.
धमाल विनोदी आहे सगळंच. ताला
धमाल विनोदी आहे सगळंच. ताला सुरात लावणी आहे.
कोतबो लावणी ट्यूब पेटता पेटता विझली. प्रकाश टाकावा.
पांग हा कर्ज अर्थाचा शब्द आहे
पांग हा कर्ज अर्थाचा शब्द आहे. पाश > पांग. फेडणे हे सोडणे उतरवणे अर्थाने वापरले जाते. ऋण/उपकाराची परत फेड. असा फेडणे बऱ्याच जागी येतो.
बाकी लेख जमलाय!
ख_त_र_ना_क जमलंय!
ख_त_र_ना_क जमलंय!
वाटलीडाळ, कुत्र्यातला महेशबाबू, आशिर्वाद कणिक, फेडलेले पांग...
आमच्या बारक्या टेस्ला फिल्टर आहे. कुठेही पटकन टेस्ला दिसते त्याला. रोज एकदा तरी 'आपण टेस्ला घेऊया!' चा जप असतोच. बरं मॉडेल -३ वगैरे नाही तर ती दार वरती जाणारी ब्लू कलरची पाहिजे. नाही तर मग सायबर ट्रकच! मला आपले दार वरती जायला जागा पाहिजे तर गराज मध्ये किती क्लिअरंस लागेल आणि पार्किंगमध्ये आजुबाजूच्या गाड्यांना लागायला नको म्हणून दूरच पार्क करत असतील का हे लोक... असले अगदी मम प्रश्न पडतात. पण मी गप बसतो. आपल्याला कुठे घ्यायची आहे!
पोरांना म्हणतो घ्या म्हणावं. मी आपला प्यासिंजर सीटवर बसुन जाईन.
... अर्थात मला एकदा ती 'समन' करण्यापुरती वापरायला द्या. मॉलच्या पार्किंग मध्ये जन्ता आपापली कार शोधत्येय आणि मी 'अकिओ' करुन समनिंग चार्म वापरतोय.. ही एक शेवटची इच्छा पूर्ण करा माझी!
तिथे बहुतेक 'आपापली पापे
तिथे बहुतेक 'आपापली पापे आपल्यालाच फेडावी लागतात' असं काहीतरी पाहिजे. पांग वरून गे मायभू आठवली (.. तुझे मी फेडीन पांग सारे - फेम)
जम्या. एकदम जम्या. एकदम घट्ट
जम्या. एकदम जम्या. एकदम घट्ट कवडीचं, थोडं विनोदापुरतं मिरमिरीत मस्त दही जम्या.
हर्पा , मला 'पांग'च म्हणायचं
हर्पा , मला 'पांग'च म्हणायचं होतं. कारण मुलं 'पांग फेडतील' ऐकून कान किटले आहेत. हे उगा आईने ऐहिक त्याग करत रहावा म्हणून दाखवलेले गाजर आहे.
अमित , मला पण ब्लू च हवी आहे, भलेही दार वर जाण्याने गराजमधे मावत नसेल तर ड्राईव्हवेवर पार्क करून रात्रभर तिच्या रक्षणासाठी जागावे लागले तरी बेहत्तर !!!!
भारीच! बरेच दिवसांनी मनमुराद
भारीच! बरेच दिवसांनी मनमुराद हसायला लावणारं लिखाण वाचलं
धमाल जमलंय. टेस्ला मधून
धमाल जमलंय. टेस्ला मधून उतरणार्यांमधे attitude दिसतो तोच आमच्या बस मध्ये नाही. त्यामुळे कधी ती घेतली जाईल असं मला तरी वाटत नाही. मोठ्याचं दिवास्वप्न आहे आमच्या ते, आपली आई टेस्ला घ्यायला हो म्हणते असं. दिवसभरात इतक्या पाहिल्या, असं येताजाता सांगून पाहतो आम्हाला.
अमितव, मी पण मु लांना सांगितलय, मोठे झाल्यावर आपली आपण घ्या. मला एकदा फक्त फिरवून आणा त्यात.
हाहाहा. अच्छा!
हाहाहा. अच्छा!
जबरदस्त लेख आणि लावणी!!
जबरदस्त लेख आणि लावणी!!
सिनेमाचे सगळे संदर्भही भारी!
हाहा, धमाल लिहीलं आहे
धमाल लिहीलं आहे
धमाल
धमाल
हाहाहा. मस्त लिहीलय
हाहाहा.
मस्त लिहीलय
फर्मास जमलय. दणादण पंचेस.
फर्मास जमलय.
दणादण पंचेस.
आई ग्गं...हसून हसून मेले. खूप
आई ग्गं...हसून हसून मेले. खूप दिवसांनी असं काहितरी गुदगुल्या करणारं वाचलं. :डोळ्यात बदाम:
स्टिकर मिशीचे equilibrium, थोडं थांब , ढू धुवायला... लॉल
मला सुपरमॉम च्या युनिक स्टाईल
मला सुपरमॉम च्या युनिक स्टाईल ची आठवण झाली.
आवडलं
आवडलं
धमाल लिहिलंय .
धमाल लिहिलंय .
पंचेस जबरदस्त !
कलियुगातील स्वार्थानी
कलियुगातील स्वार्थानी बटबटलेली मुलं कुठली आईच्या भौतिक इच्छा किंवा छोटेसे हव्यास पूर्ण करणार.. !! >>>
ह्या कलियुगातल्या मातांना श्रावण बाळासारखे किंवा समजा सान्यांच्या श्याम सारखे मातृभक्त पुत्र मिळो, की जे त्यांच्या आयांच्या तमाम इहवादी, जडवादी इच्छांच्या पूर्ततेसाठी निखाऱ्यांवरून चालत जायलाही मागेपुढे न पाहो... !! आईच्या सुखापुढे टेस्ला वगैरे गोष्टी त्यांस क्षुद्र वाटो !!
पंचेस नेहमीप्रमाणेच भन्नाट !!
कुत्र्यांमधला 'महेश बाबू'>> "आद्य अपयशी बॉयफ्रेंड">>
तो 'आशीर्वाद' कणकेपासून-टिव्ही पर्यंत सगळ्या गोष्टींना 'थोडं थांब' असंच म्हणतो.
बनवाबनवी मधली मोलकरीण >>-- तानी !! ऊर्फ तानूमावशी !! ऊर्फ टेहळणी बुरुज !! हिच्या परिपूर्ण शंकेखोर डोळ्यांनी आम्हाला अगदी निरागस वयात जी दचक दिली, ती विसरणे कठीण आहे.
लावणी एक नंबर>> म्हणजे समजा हाती मशाल वगैरे घेऊन शोध घेणाऱ्या चंद्रकला बाई त्यांचा दिलाचा दिलबर दिसल्यावर "दिसला गं बाई दिसला" वगैरे उद्घोषणा करताना वगैरे
क्या आमची माती मानसं, क्या
क्या आमची माती मानसं, क्या निरुपा राय, क्या आशीरवाद आटा! आपने तो किसकोच नै बक्षा.
मै क्या पुछता, साबजी को मनाने के लिये कित्ते कामेन्टा होना?
Pages