हेऽऽ श्यामसुंदर राजसा...मनमोहना !

Submitted by चैतन्य दीक्षित on 7 February, 2015 - 09:04

'ती' एक गोपिका. संध्याकाळची यमुनाकाठी गेली असता दुरून बासरीचे स्वर तिच्या कानी पडले आणि तिला स्वत:चा विसर पडला. त्या सुरांच्या दिशेनं ती यमुनेपासून दूर घनदाट वनांत कशी गेली हे तिचं तिलाही समजलं नाही. तिथे तिला बासरी वाजवत असलेला कान्हा दिसला, त्याने तिचा हात धरला आणि तीही क्षणभर मोहात पडली. दुसर्‍या क्षणी मात्र तिला जाणवलं की ती एकटीच खूप दूरवर आली आहे. तिला कृष्णासोबत इतक्या दूरवर आलेलं कुणी पाहिलं तर???
एकीकडे हवाहवासा वाटणारा कृष्णाचा सहवास तर दुसरीकडे लोकलज्जा ! अशा वेळी स्वतःला नक्की काय पाहिजे हे ठरवता न येऊन तिला कृष्णाच्या जवळ असण्याचाच त्रास होऊ लागला. अंतःकरण पिळवटून निघालं. या सगळ्या भावना कृष्णाला तिच्याकडे नुसतं बघूनही उमगल्या आणि तो नेहमीसारखाच गूढ हसला. त्याच्या हसण्याने तिची हॄदयव्यथा अजून तीव्र झाली. आपल्याला कृष्ण हवा आहे, हे कृष्णालाही कळलंय याचाही तिला साश्चर्य राग आला ..अर्थात लटकाच. मग कृष्णाला खोटं पाडण्यासाठीच जणू ती असं भासवू लागली की तिला कृष्णाचा सहवास नको आहे आणि तरीही कृष्णानंच तिला थांबवून ठेवलंय. आणि आपल्याला हे असं भासवावं लागतंय याचाही काहीसा त्रागा करत ती म्हणाली ... "हे श्यामसुंदर राजसा...मनमोहना, विनवुनी सांगते तुज, जाऊ दे मला परतुनी |"
हे ऐकून कृष्ण अजूनच गूढ हसला. तिचा हात तो सोडणार नाहिये हेच त्या हास्याने सूचित केलं. ते उमगून आता ती एक एक कारणं सांगू पाहतेय. "गांव गोकुळ दूर राहे, दूर यमुना-नीर वाहे, हरवले मी कसे मज ? चालले कुठे घन वनी?" कारण "पावरीचा सूर भिडला, मजसि माझा विसर पडला, नकळता पाउले मम राहिली इथे थबकुनी".... हे मनमोहना, तुझ्या पावरीच्या सुरांमुळे मी इतक्या दूर घन वनांत आले. त्या सुरांनी मोहिनीच अशी घातली की मी स्वतःला अक्षरशः विसरले आणि माझी पावलं इथेच थबकली." नाही तर मी इतक्या लांब आलेच नसते असा त्यातला लपलेला अर्थ!
एवढंच कृष्णाला पटणार नाही हे ठाऊक असल्याने तिने अनिच्छेनेच पण मनाशी अगदी खोल असलेली भीती बोलून दाखवली. कृष्णही असा मनातलं सगळं बोलायला लावणारा ! ती म्हणते 'पानजाळी सळसळे का? भिवविती रे लाख शंका.' वार्यानंच पानं हालतायत पण मला मात्र अगदी लक्ष शंकांनी घाबरवून सोडलंय. त्या झुडुपाआड कुणी नसेल ना? मला इथे तुझ्याबरोबर एकांतात असलेलं कुणी पाहात तर नसेल ना? अशा त्या शंका.
त्या शंकांनी "थरथरे बावरे मन, संगती सखी न च कुणी"...हे माझंच बावरं मन आहे जे मलाच येत असलेल्या शकांनी थरथरतंय. माझ्याबरोबर माझी कुणी सखी असती तर त्या शंकांना वाव मिळाला नसता, पण मी तर एकटीच आहे इथे.म्हणूनच "हे श्यामसुंदर राजसा, मनमोहना, विनवुनी सांगते तुज, जाऊ दे मला परतुनी"!

किशोरीताईंनी गायलेल्या दोनच भावगीतांपैकी हे एक. जाईन विचारित रानफुला हे दुसरं भावगीत. दोन्ही भावगीतांची भावनेची जातकुळी पूर्णतः भिन्न. या गीताचे शब्द शांताबाईंना कसे सुचले असावेत? त्यामागे ह्या वर लिहिल्यात त्याच भावना असाव्यात का? हे माहिती नाही. पण गाणं ऐकताना ही केवळ एका गोपिकेची किंवा राधेची कृष्णाकडे केलेली विनवणी नसावी हेच सारखं वाटत राहतं. भावनांची असंख्य आंदोलनं ह्या तीन कडव्यांत एकवटली आहेत खास !
गाण्याच्या सांगीतिक बाजूकडे बघावं तर ते हिमालयासारखं वाटू लागतं. जितका हिमालय लांबून आकर्ष़क वाटतो तितकाच तो जवळ गेल्यावर अवघड आणि अवाढव्य ! एखादा थेट लागलेला स्वर ऐकू यावा, तो हवाहवासा वाटावा आणि त्याच क्षणी त्या थेटपणामुळे आपल्याला होणार्‍या अस्वस्थतेमुळे काहीसा नकोसा वाटावा, असं कधी कधी होतं हे गाणं ऐकताना. कोणतंही गाणं ऐकताना मला आधी शब्द, त्यांचे अर्थ, त्यातली चमत्कृती दिसते, सूर त्या मानाने नंतर मनाचा ठाव घेतात. हे गाणंही तसंच. यातले सूर पकडू जावं तर गाण्यातले राग ओळखायची केविलवाणी धडपड होते फक्त. गाण्याला निवडलेला रूपक तालही विशेष! चालता चालता प्रत्येक पावलावर जर रूपकाची एक एक मात्रा मोजली तर एकदा सम डाव्या पायावर येईल आणि पुढच्या वेळी ती उजव्या पायावर येईल. गाण्यातले राधेचे भावही काहीसे असेच. एकदा तिला तिथेच थांबावं असंही वाटतंय तर पुढच्याच क्षणी शंकांनी तिचं मन कातर होतंय. दोन कडव्यांच्या मध्ये येणारी बासरी प्रत्येक कडव्यागणिक भावार्त अवस्था अधिक तीव्रपणे दाखवणारी. प्रत्येक कडव्याचा तिसरा भाग (विनवुनी सांगते तुज, नकळता पाउले मम इ.) बहार रागात आहे (हे मला गुरु़जींनी सांगितल्याने मी छातीठोकपणे लिहितोय) बासरीवरही या बहार अंगाचं सा-म वाजतं. तो षड्जावरून येणारा मध्यम प्रत्येक वेळी मनाला अजून कातर करणारा आहे. तानपुरा, स्वरमंडल, तबला आणि कडव्यांच्या मध्ये बासरी इतका मोजकाच वाद्यमेळ असूनही इतकं प्रभावी गाणं होऊ शकतं हे आजच्या नुसत्या वाद्यांचाच भरणा असलेल्या गाण्यांच्या जमान्यात अविश्वसनीयच वाटेल.
या गाण्याची सगळ्यात उच्च बाजू कोणती असेल तर किशोरीताईंचा स्फटिकासारखा शुद्ध, पारदर्शक स्वर ! स्वर हे भाववाही असतात याचा साक्षात्कार या गाण्यात खचितच होतो. भाव निर्माण करण्यासाठी म्हणून मुद्दाम कुठे हरकत घेतली आहे, तानबाजी केली आहे असे नाही. संगीतकाराने तयार केलेली रचना सच्चेपणानं सादर केली गेली आहे इतकंच. ह्या स्वरांत राधेचं प्रेम आहे, मीरेचा भक्तिभाव आहे आणि किशोरीताईंचं स्वतःचं समर्पण!
हे गाणं केवळ गाणं उरतच नाही. ह्यात मनोरंजनमूल्यापेक्षाही अधिक असं शब्दांत सांगता न येण्याजोगं काहीतरी आहे. डोळे मिटून हे गाणं ऐकावं, त्यातलं तंत्र-शास्त्र सगळ्याच्याही पलिकडून कान्ह्याची बासरी ऐकू यावी आणि रोमारोमांत समर्पण भरून रहावं...ह्याहून अधिक काय लिहावे?

-चैतन्य दीक्षित

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज धागा वर आल्यावर हे गाणं पुन्हा ऐकलं. पहिल्या कडव्यात 'दूर यमुनानीर वाहे' ही ओळ जेव्हा दुसर्‍यांदा येते ना, तिथे ना ... नी ... वा.... - ह्या तीन अक्षरांवर किशोरीताईंनी घेतलेली आंदोलने नीट ऐका. खरंच पाणी हलल्याचा भास होतो.

Pages