हाळी पंढरीची

Submitted by दत्तात्रय साळुंके on 23 June, 2022 - 01:09

हाळी पंढरीची आली
बंधनांची बेडी तुटली
पाऊले बेभान धावली
पंढरपूरी ती विसावली

गेले गळूनी देहभान
कुठे अंथरुण,पांघरुण
ध्यास एकची रातदीन
आला वैष्णवांचा दिवाळसण

नको सांगाती द्रव्यराशी
लुगडं,धोतर,घडशी पुरेशी
अनमोल सखा विठू बरोबर
सांडीला संसार वा-यावर

गर्वाला नाही स्थान
सारेची संत सज्जन
भेदाभेद गेले विरुनी
मीपण गेले सरुनी

मीठ, भाकरीही पक्वान्न
तोंडी लावाया भजन
तुका आंधळ्याची काठी
माऊली धरीते पोटी

दिसता वैकुंठ भूलोकी
पाणावले नेत्र की
उर भरोनीया आला
देही पांडुरंग भारला

© दत्तात्रय साळुंके
२२-०६-२०२२

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर गायले आहे. संगीत function at() { [native code] }इशय सुंदर आहे. कुठे द्यावे कळेना, इथे देते आहे. समांतर/अवांतर .

https://www.youtube.com/watch?v=o8vEdhKHMms

वेढा वेढा रे पंढरी | मोर्चे लावा भीमातीरी || १ ||
चला चला संतजन | करू देवासी भांडण || २ ||
लुटा लुटा पंढरपूर | धरा रखुमाईचा वर || ३ ||
तुका म्हणे चला चला | घाव निशाणी घातला || ४ ||

संगीत - राजा फाटक
शब्द - संत तुकाराम
गायक - विश्वजीत बोरवणकर
संगीत संयोजन - सचिन इंगळे
तबला, पखवाज - डॉ. राजेंद्र दूरकर
विशेष ताल साहाय्य - शंतनू खेर
व्हायोलिन, हार्मोनियम - सचिन इंगळे

@ सामो खूप धन्यवाद या सुंदर अभंगासाठी...सद्या सुरत लुट चालू आहे आपण तुकोबांच्या अभंगांची लुट करतोय...तुमचं वाचन, श्रवण अफाट आहे...तुकोबांना पंढरी लुटायचीय.... पांडूरंग धरायचाय....किती छान कल्पना आहे...अंभगाची ध्वनीचित्रफितही सुंदर... खूप धन्यवाद

हरचंद पालव...
तुमचा प्रतिसाद मिळाला की मन पल्लवित होते.

वाह, सुरेखच...
पांडुरंग, पांडुरंग... ___/\___

विश्वजीतने गायलेला अभंग अफाट आवडला... धन्यवाद, सामो Happy