वेगळा भाग - १५

Submitted by निशा राकेश on 18 June, 2022 - 06:38

भाग – १५

बाबू ची अश्या प्रकारे फजिती झाल्यावर उरलेला सिनेमा काही दोघांनीही पहिला नाही ते तिकडून निघाले आणि त्यांच्या नेहमीच्या जागी टेकडीवर जाऊन बसले ,संध्याकाळ उलटून गेली होती , टेकडीवर आता अंधार दाटायला लागला होता , बायडाला घरी जाऊन जेवण बनवायचं होत , तिची मात्र चुळबुळ सुरु झाली , पण बाबू अगदीच शांत होता लांब कुठेतरी एकटक पाहत , तंद्री लागल्यासारखा.

“आपण जायचय का घरला” बायडा ने शांततेचा भंग केला.

“.................................”

“मी काय म्हणती, मला येळ होतोय, आजून जेवण बी बनवायचय”

“...............................”

“आता जाऊंदे ना, किती मनाला लाऊन घेशील”

“जा तू , माझ्यामुळे आणखीन तुला त्रास नको” अखेर बाबू ने तोंड उघडल.

“मला कसला तरास, आन मी एकली नाही जाणार , तू बी चल माया संग”

“मी नंतर येतो, आता मला जरा एकट्याला रहावस वाटतंय, तू खरच जा , “

“पर मी तुला अशी एकल्याला सोडून न्हाय जायची”

“काय करणार आहेस सोबत राहून”

“असा का बोल्तुयास”

“ तूला वाटत असेल काय बावळट ध्यान पडलंय पदरात”

बायडा ला काय बोलाव कळत न्हवत , ह्यात चूक तर दोघांचीही न्हवती , तरी बाबू मात्र ह्या सर्वाला स्वतःलाच जबाबदार मनात होता.
तरीही ती हिम्मत करून बाबुला समजावू लागली .

“तुला यक सांगू का , आविश्य पडलंय आपल्यासमोर हे समंद कराया ,
तुला अजून पुढ शिकायचं,
चांगली नोकरी हुडकायचीये ,
आबा संगट आपल्या लग्नाची बोलणी बी करायचीत ,
लय काम हाईत आपल्याकड ,
कुठ ह्यात डोक खपवतुयास,
आणि तुला जस वाटत तसं काय बी इचार मी करीत न्ह्वाय, तू कसा हैइस हे मला चांगल ठाव हाय.
चल आता घरला लय अंधार झालाय, माझा बाप वस्तीभर हुडकत बसलं मला “

बायडाच्या समजावण्याने बाबुला वस्तुस्थितीची बर्यापैकी जाणीव झाली, आपण उगीच ह्या गोष्टीला इतक महत्व देत बसलो , बायडा आपल्यापेक्षा किती समजूतदार आहे हे त्याला जाणवलं .पुढे कधीही ह्या गोष्टींची विनाकरण घाई करायची नाही हे त्याने मनोमन ठरवलं, दोघे घरी जायला निघाले.

दुसर्या दिवशी बाबू जोमाने कामाला लागला त्याला दहावी मध्ये लगेच दाखल होण तर शक्य न्हवत त्यासाठी एक वर्ष वाट पहावी लागणार होती, पण त्याने मालका कडून त्याच्याच कामाच्या संदर्भातल नवनवीन काम अगदी प्रामाणिक पणे शिकायला सुरुवात केली, मालकाने कुठे बाहेर जाऊन काम करायला सांगितल किंवा त्याच्या सुट्टीच्या दिवशी देखील जरी कामावर बोलवलं तरीही तो जाऊ लागला , त्याची ती कामातली आवड आणि प्रगती बघून मालकाने त्याचा आठवडी पगार पंचवीस रुपयाने वाढवला, ते सर्व वाढवलेले पैसे तो साठवून ठेऊ लागला, मध्ये मध्ये तो आंटीकडे देखील तिला भेटायला जाई , तिच्याशी तोडक्या मोडक्या हिंदी मध्ये खूप गप्पा मारी , अशोक शी मात्र तो चार हात लांब राही , कारण तो भेटला कि फक्त त्याच्या कडे सिनेमा , प्रेम , आणि बाब्या तू किती बावळट आहेस ह्या खेरीज दुसरा विषय नसे , बायडाला मात्र तो रोज टेकडीवर भेटे, कामावरच्या गमती जमती, आज काय नवीन काम शिकलो, कुठे नवीन काम करायला गेलो असच आणि बरच काही तो तिला रोज सांगे, नाही म्हंटल तरी त्याच्या आयुष्याला एक प्रकारे चांगल वळण लागल होत .

ह्यातच चार- सहा महिने निघून गेले , एक दिवस झेंडु म्हणजे बाबू ची लहान बहिण शाळेतून रडत घरी आली , आई ने तिला खुपदा विचारून पाहिलं पण ती नीटस काहीही सांगायला तयार न्हवती , शेवटी जेव्हा बाबू कामावरून घरी आला , तेव्हा त्याने तिच्याशी बोलायलाचा प्रयन्त करून पहिला , पण तिच्याशी ह्याआधी जास्त बोलायची सवय नसल्यामुळे त्याला सुरुवात कुठून करायची हे समजत न्हवत, पण तरीही बाबू ने काळजीत पडलेल्या आईला धीर देऊन झेंडु शी बोलयचं ठरवलं ,जेवल्या नंतर तो झेंडु ला त्याच्या झोपायच्या ठिकाणी तिच्याशी मोकळे पणाने बोलता याव म्हणून घेऊन गेला , आधी ती जागेवरून हलत देखील न्हवती कसे बसे चार घास तिने आईने भरवल्या मुळे पोटात ढकलले होते , ती त्याच्या सोबत बोलायला यायला अजिबात तयार न्हवती , पण बाबू ने “चल ग तुला एक गम्मत दाखवतो” म्हणून तिला हाताला धरून घेऊन गेला ,आभाळात आज पूर्ण चंद्र दिसत होता आणि आसपास खूप चांदण्या देखील त्यांच्यावर वर आपल्या प्रकाशाची उधळण करीत होत्या.

“झेंडु , तुला माहित आहे मी रोज रात्री इथे जेव्हा झोपायला येतो ना तेव्हा आधी ह्या संपूर्ण चांदण्या मोजतो आणि मग झोपतो”

झेंडु आपली गप्प तिच्याकडून काहीही प्रतिक्रिया आली नाही पण बाबू ने पुन्हा प्रयन्त केला.

“ झेंडु तुझ हे नाक अस चपट का आहे माहितीये ,”

झेंडु ने तिच्या हि नकळत स्वतःच्या नाकाला हात लाऊन पहिला .

“अग खरच , खोट वाटत तर बघ आरशात जाऊन , का आहे चपट माहितीये,”

झेंडु ने बाबुकडे पुढे हा काय सांगतोय म्हणून पाहिलं .

बाबुला पुढे काय बोलाव हे काही सुचत न्हवत मग मात्र तो काही तरी सांगायचं म्हणून “हा हा हा ....अग तू बाळ असताना पालथी पडलायला लागली होतीस ना तेव्हा तुझ नाक सारख जमिनीला आपटायच म्हणून ते चपट आहे”

“मी जाते झोपायला “ झेंडु उठायला लागली ,

बाबू ने तिला लगेचच हाताला धरून खाली बसवलं

“पण तुला एक गोष्ट माहित आहे का , तुला जर अस माझ्या सारख सरळ नाक हव असेल ना तर सकाळी उठल्या उठल्या अस हे जोरात जोरात खेचायच म्हणजे ते सरळ होत, हे बघ हे अस , हे अस , कर कर तू करून बघ , बघू तुला जमतंय का , अग करून तर बघ”

झेंडु ने बाबू दाखवत होता त्याप्रमाणे नाक खेचल आणि त्याचक्षणी तिच्या नाकातून भला मोठा हिरवा गार शेंबूड बाहेर आला ,

तसे ते दोघे जोरात हसू लागले,

झेंडु बरीच मोकळी झाली त्या हसण्यामुळे,

“हसताना किती छान दिसते , का रडत होतीस , रडताना तू अजिबात छान दिसत नाही आणि हा असा शेंबूड पण जमा होतो नाकात ,लोक शेंबडी बोलतील ना तुला ”

“बोलू दे शेंबडी , चोरटी बोलण्यापेक्षा ते बरच ”

“चोरटी, कोण बोलत तुला चोरटी , सांग मला“

“चंदू दादा मूळ”

“चंद्या चा काय संबंध, त्याने काय केल”

“तुला माहित नाही दादा , त्या दिवशी चंदू दादा ने पाठक बाईंच्या पाकिटातले पैसे चोरले आणि त्याला ते चोरताना बाई नी पकडलं आणि मोठ्या सरांकडे न्हेल, चंदू दादा ला त्या सरांनी खूप मारलं , आई ला पण शाळेत बोलावलं होत”

“हे सगळ कधी झाल , आणि आई मला काही बोलली का नाही “

“माहित नाही मला , पण तेव्हा पासून मला सगळे शाळेतले चोरटी म्हणून चिडवतात आज पण तेच झाल सगळे चिडवतात , मला तर आता शाळेत पण जावस वाटत नाही” अस म्हणून झेंडु पुन्हा डोळे पुसू लागली.

“नाही ,अस नाही करायचं शाळेत जा तू , आणि मी उद्या दुपारी तुझ्या शाळेत येऊन तुझ्या मोठ्या सरांशी बोलेण मग तुला कोणीही नाही चिडवणार “ बाबू ने तिचे डोळे पुसले.

“खरच , अस होईल “ झेंडूचा चेहरा लगेचच खुलला.

“मी आहे ना झेंडु, मग काळजी नाही करायची , आणि इथुंपुढे तुला काहीही माझ्याशी बोलावस वाटल तर मोकळे पणाने बोलत जा “
झेंडु ने हो म्हणून मान हलवली आणि गोड हसून ती झोपायला निघून गेली ,

बाबू च्या डोक्यात विचार चक्र सुरु झाल त्याला वाटत होत आताच जाऊन आई शी बोलाव आणि ह्या गोष्टीचा सोक्षमोक्ष लाऊन टाकावा पण आई दिवसभर काम करून थकून झोपली असेल म्हणून त्याने तिच्याशी उद्या बोलूया अस ठरवून तो झोपी गेला .
दुसर्या दिवशी झेंडु त्याला स्वतः शाळेत जाताना उठवायला आली त्याला खूप बर वाटल इतके दिवस आपण आपल्या सख्या बहिणीशी इतके मोकळेपणाने ह्या आधी का बोललो नाही ह्याची खंत त्याला वाटली , “दादा तू आज शाळेत नक्की ये , मी तुझी वाट पाहीन,”
अस म्हणून ती तिच्या दोन वेण्या उडवत शाळेत निघून गेली ,

घरी येऊन पाहतोय तर काय चंदू खाटेवर अस्तावस्त पसरला होता .

“आज हा चंदू गेला नाही झेंडु सोबत शाळेत” बाबू ने घरात पाउल टाकल्या टाकल्या आईला प्रश्न केला.

चंदूने बाबूचे ते शब्द झोपतेच ऐकले. त्याने कूस बदलली.

“नाही आज नाही जात , तब्बेत बरी नाही म्हणतो” आई ने नजर चोरून उत्तर दिल.

“का , चोर्या करून दमला वाटत”

बाबू चे ते शब्द ऐकून चंदू उठूनच बसला,

“काय म्हणालास, मी आणि चोरी , शुद्धीत आहेस ना , कि सकाळी सकाळी”

“लाज नाही वाटत , मला झेंडु ने सगळ सांगितलं आणि ती बिचारी ह्या नालायक माणसामुळे तिला शाळेत चिडवतात म्हणून किती कोमेजून गेली होती काल, आणि हा निर्लज्ज अजूनही धडधडीत खोट बोलतोय”

“हे बघ ,, झेंडु ने पाठक बाईचं जर सांगितलं असेल तर हो मी काढले पैसे त्यांच्या पाकीटा मधून पण मला गरज होती पैशांची म्हणून “चंदू थातुरमातुर उत्तर देऊ लागला .

“चोरी केलीस , जीव द्यायचा ना त्यापेक्षा , आई दादांची लाज तर वेशीवर टांगलीयेस , आणि आई तू का हे लपवून ठेवलस माझ्यापासून”

“अरे बाबा , एकतर तुमच्या दोघांच पटत नाही , त्यात तुला हे कळल्यावर तुम्हा दोघांच भांडण होईल ह्या भीतीने गप्प होते “

“सगळच लपवा माझ्या पासून काहीही सांगू नका मला “ बाबू प्रचंड चिडला होता.

“बाबू , तू शांत हो , कामावर जायचय ना , आवर तू तुला उशीर होईल” आईने बाबू ला शांत करायचा असफल प्रयन्त करून पहिला.

“नाही आई , आज काय ते मला ह्याच समजूच दे कशाला हवे होते पैसे , बोल लवकर , कसली इतकी घाई लागली होती ,पैसे चोरे पर्यंत मजल गेली तुझी”

“ते मी तुला का सांगू तू कोण लागून गेलास इतका”

“मी , कोण , थांब तुला मी कोण ते सांगतो”

बाबू ने इतकडे तिकडे पाहिलं आणि आईच्या हातातलं लाटण खेचून घेतलं आणि तो चंदूला बेदम मारत सुटला .

चंदू ने आधी त्याला विरोध केला , आणि त्याला उलट मारू लागला , पण कष्टाचे काम करून ताकद कमावलेल्या बाबू समोर त्याची सिगारेट आणि गांजा ओढून निकामी होत चाललेलं शरीर कमजोर ठरलं आणि काही क्षणानंतर तो बाबू समोर फक्त हात जोडून “सोड मला, मारू नकोस, मी नाही करणार कधीच नाही करणार चोरी सोड मला “ अस विनवू लागला.

“बोल लवकर , का हवे होते पैसे , का केलीस चोरी”

“बाबाजी , बाबा , तो जगणु बाबा त्याच्यासाठी , त्याने मला काही समान आणायला सांगितलं होत म्हणून केली चोरी “ चंदू कसाबसा दम खात म्हणाला आणि तिथेच जागच्या जागी झोपून गेला.

“जगणु बाबा , शाळेजवळचा , काय सांगितलं त्याने समान आणायला काय करणार होतात तुम्ही दोघ त्या सामानाच”

पण चंदू कडे बोलायची अजिबात ताकद न्हवती , तो तसाच शांत पडून होता,

बाबू ला कळून चुकल , आता काही हा बोलायच्या मनस्थित नाही.

बाबू ने मनाशी त्या जगणु ची आजच्या आज भेट घ्यायचं नक्की केल आणि तो अवर्रायला निघून गेला.

संध्याकाळी कामावर सुटून घरी येत असताना तो घरी न जाता तडक जगणु बाबा च्या घरी म्हणजे शाळेजवळच्या त्याच्या झोपडीत गेला ,

जगणु गांजा किवा दारू अस काही तरी नशा करून अस्ताव्यस्त झोपला होता.

“ये जगण्या उठ , उठ लवकर “ बाबू त्याला मोठ्या आवाजात ओरडून उठवू लागला.

“कोण , कोण , हाय” जगण्या भयंकर नशेत होता.

“मी चंदू चा भाऊ बाबू , उठ लवकर “

तरीही तो काही उठेना , बाबूला त्याच्या शेजारी पाण्याने भरून ठेवलेला एक माठ दिसला त्याने क्षणाचा हि विलंब न करता त्या माठातलं सर्व पाणी त्याच्या तोंडावर ओतल.

अचानक झालेल्या त्या हल्लाने जगण्या हेलपाटून उठला आणि डोळे चोळत तो इकडे तिकडे पाहू लागला.

“कोण , कोण तू “ जगण्यान रागारागात बाबू कडे बघत विचारल.

“बाबू , चान्द्याचा भाऊ, कशाला येतो तो तुझ्याकडे , काय सामान आणायला सांगतोस तू त्याला”

जगण्या गप्प तो काहीही बोलायला तयार न्हवता.

“सांग नाहीतर शाळकरी मुलांना तुझ्या नादाला लावतोस त्यांना गांजा देतोस म्हणून पोलिसात तक्रार करेन तुझी”

पोलीसांच नाव ऐकल्या बरोबर जगण्या भयंकर घाबरला आणि पोपटासारख बोलू लागला.

“तो सवताच आला हुता माझ्याकड , मी काय बोलावण धाडलं न्हवत त्याला” जगण्याची नशा आता पूर्णपणे उतरली होती.

“कशाला आला होता , तुझ्याकडे काय होत त्याच काम” बाबू कपाळाला आठ्या पाडून विचारू लागला.

“यक मोठा इधी करायचाय त्याला , कुणाला तरी आयुष्यातून उठवायचं , कुणाला तरी मारून टाकायचय बोलत होता,”

“काय , काय बोल्तोयस तू , उतरली नाही का अजून तुझी , माझा भाऊ असा नाहीये , तो असा वाईट विचार कधीच कोणाच्या बाबतीत करू शकत नाही”

त्याच हे बोलन ऐकून जगण्या अचानक हसू लागला, “ अर आधी नाव तर सांगू दे मला , त्याला कुणाला मारायचय, मग भावाच कौतिक ऐकीव मला “

“कुणाला मारायचं आहे त्याला “ बाबूने चाचरतच जगण्याला विचारल.

“तुला “

बाबू कासाबसा स्वतःला सावरत झोपडी बाहेर पडला.

क्रमश:

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users