पुलंच्या लेखनातील पूर्ववाङ्मयीन (गाळीव/न कळीव) संदर्भ

Submitted by हरचंद पालव on 18 June, 2022 - 10:28

विल्यम हेझ्लट नावाचा एक जुना इंग्रजी साहित्यिक म्हणून गेला आहे, की हास्य आणि रुदन हे 'काय आहे' आणि 'काय असायला हवं' ह्यातल्या फरकावर अवलंबून असतात. जेव्हा वस्तुस्थिती ही आपल्याला ह्या फरकामुळे दु:ख देते तेव्हा आपण रडतो आणि जेव्हा अनपेक्षित आनंद देते तेव्हा आपण हसतो. पुढे मराठीत आचार्य अत्र्यांनी त्यांच्या 'विनोदाचे व्याकरण' ह्या विषयावरील व्याख्यानातही 'विनोद हा, काय आहे आणि काय असायला हवं, ह्यातल्या फरकावर अवलंबून असतो' अशीच सोपी व्याख्या केली आहे. काही विनोद हे त्यात 'काय हवं' हे आपल्याला माहीत नसेल तर कदाचित तितके भावतीलच असं नाही.

नमनाला एवढं घडाभार तेल ओतण्याचं कारण म्हणजे पुलंच्या लिखाणातील काही विनोदांबाबतीत माझीही अशीच परिस्थिती झाली. उदाहरणार्थ असा मी असामीत गुरुदेव प्रकरणात 'हे कोण बोलले बोला म्हणून मी मागे पाहिलं तर ...' ह्या वाक्यात ते 'कोण बोलले बोला' ऐकायला मजेशीर वाटलं होतं. पण मुळातली 'हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला' ही कविताच त्यावेळी माहीत नसल्यामुळे काय अपेक्षित आहे आणि काय अर्थाने ते शब्द वापरले ह्यातला फरक आणि त्यातली मजा कळाली नव्हती. 'वरदाबाईंनी मीराबाईच्या तुमबिन मोरीत तोंड घातलं' - हे एखाद्याला 'तुमबिन मोरी' किंवा एकूणच मीराबाईची भजनं माहीत नसलेल्यांना कळेलच असं नाही. केवळ विनोदच नाही, तर पुलंच्या लिखाणात कित्येक अन्य भाव व्यक्त होतानादेखिल असे त्यांच्या पूर्वीच्या वाङ्मयातले संदर्भ येऊन जातात. ते मुळातले संदर्भ माहीत असतील तर पुलंचं लिखाण वाचतानाची मजा, त्यातली रसनिष्पत्ती वृद्धिंगत होते असा अनुभव आहे. ते संदर्भ कुठून कुठून घेऊन पुलंनी ज्या सहजतेने वापरले आहेत, त्यावरून त्यांच्या सखोल वाचनाची आपल्याला प्रचिती येते. त्यातले आपल्याला माहीत असलेले काही संदर्भ, माहीत नसलेले काही अशा सर्वांची चर्चा करायला हा धागा उपयोगी पडावा. सुरुवात करायची म्हणून खाली काही मला माहीत असलेले संदर्भ देतो.

कवींच्या गणनाप्रसंगी सुरुवातच कालिदासापासून करतात, त्याला अनुसरून मीही सुरुवातीच्या बिगिनिंगमदी कालिदासाचे पुलंच्या लिखाणातले दोन संदर्भ सांगतो. त्यातला पहिला आहे, अंतु बर्वामधला. त्यात अंतु बर्वा म्हणतो की 'कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुंका उकिरडा ! हे सगळं चक्रनेमिक्रमेण होतं.' ह्यातला जो चक्रनेमिक्रमेण म्हणून शब्द आहे, त्याचा उगम कालिदासाच्या मेघदूतात आहे. जगण्याला (गटणीय भाषेत - जीवनाला) कालिदास चाक आणि त्याच्या आऱ्यांची उपमा देतो.
कस्यात्यन्तं सुखमुपगतं दु:खमेकान्ततो वा
नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण॥

कायमच सुख किंवा कायमच दु:ख असं कुणाच्या वाटेला येतं? जीवनाची दशा ही नेमाने खाली जाऊन वर येणाऱ्या चक्राप्रमाणे असते. मेघदूतात काही मोजके, ज्याला आपण आजकाल मराठीत आयकॉनिक म्हणतो, अशा पद्धतीचे श्लोक आहेत. त्यातला एक हा म्हणता येईल. एकूणच उपमा ह्या अलंकाराच्या बाबतीत कालिदास हा 'दादा आदमी' मानला जातो. त्याच्या सर्वात लोकप्रिय उपमांपैकी 'चक्रनेमिक्रमेण' ही एक आहे (इंदुमती स्वयंवरातली दीपशिखेची उपमा तर सगळ्यात जास्त हिट आहे. त्यावरून त्याला 'दीपशिखा-कालिदास' अशा नावाने संबोधतात. पण तो आत्ताचा विषय नाही.). मराठी विश्वकोशावर अर्थनीतीवरच्या नोंदीत देवदत्त दाभोलकरांनी तेजीमंदीच्या बाबतीत चक्रनेमिक्रमेण हा शब्द वापरलेला दिसला, हे जाता जाता गंमत म्हणून नमूद करतो.

दुसरा संदर्भ येतो तो बटाट्याच्या चाळीच्या संगीतिकेत.
'गृहिणी सचिव सखी एकांती ललित कलातील प्रियशिष्या ती'
ही पुलंनी लिहिलेली ओळ कालिदासाच्या 'गृहिणी सचिव: सखी मिथ: प्रियशिष्या ललिते कलाविधौ' ह्या ओळीचा थेट अनुवाद आहे. खरं म्हणजे रघुवंश ह्या महाकाव्यात इंदुमती ह्या आपल्या प्रिय पत्‍नीच्या मृत्यूनंतर विलाप करणाऱ्या अज राजाच्या तोंडी हे वाक्य येतं. म्हणजे मुळातलं वाक्य करुण रसात (ती कशी होती वगैरे आठवणीत) येतं. त्याच्या पुढच्याच ओळीत पुल कालिदासाला क्रेडिट देऊन काय म्हणतात ते पहा -
कविकुलगुरुच्या विसरा पंक्ती,
कालप्रवाही वाहुनि गेला त्या युवतींचा ग्राम,
(रसिका,) तुझे न येथे काम!

चला, आता जिथून ह्या विषयाची सुरुवात झाली, त्या संदर्भाकडे वळू. 'हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला' - गोविंदाग्रजांनी लिहिलेलं अत्यंत कारुण्यपूर्ण असं हे गीत आहे. ते गीत ऐकल्यानंतर मी पुन्हा जेव्हा ... 'अहो गुरुदेवांना बरं का साहेब, सगळे सारखे' - हे कोण बोलले बोला म्हणून मी मागे पाहिलं... हे ऐकलं तेव्हा अक्षरश: फुटलो. त्यातली 'राजहंस माझा निजला' ही ओळ बिगरी ते मॅट्रिकमध्येही आलेली आहे. बहुधा कुठल्याही कवितेला 'कळवण्यास अत्यंत दु:ख होते की' प्रकारची चाल लावणाऱ्या मास्तरांच्या संदर्भात ती येते.

असा मी असामीमध्ये आणि पुलंच्या अन्यही काही लिखाणात उल्लेख असलेले 'भो पंचम जॉर्ज भूप' म्हणजे कोण ते आपल्याला माहीत असेलच, पण ती ओळ पंचम जॉर्जच्या अधिपत्याखाली असताना मराठी शाळांमध्ये सर्वांना म्हणाव्या लागणाऱ्या प्रार्थनेतली आहे. त्यावेळी बालपण घालवलेल्या सर्वांनाच हा विनोद जास्त भावला असेल यात शंका नाही.
भो पंचम जॉर्ज, भूप, धन्य धन्य | विबुधमान्य सार्वभौम भूवरा ||
नयधुरंधरा, बहुत काळ तूंचि पाळ ही वसुंधरा | शोभविशी रविकुलशी कुलपरंपरा ||

असे आणखी कित्येक संदर्भ आहेत. तुम्हाला लक्षात आलेले किंवा आणखी माहिती हवी असलेले असे त्यांच्या लिखाणातले संदर्भ असतील तर त्यावर चर्चा होऊन जाऊ द्या.

(मागे वावे यांच्या दुसऱ्या एका धाग्यावर ह्या धाग्याची कल्पना निघाली. बरेच दिवस हा विषय चर्चेला घ्यावा हे मनात होतं पण नंतर विसरून गेलो. काही दिवसांनी फेरफटका आणि वावे ह्यांनी आठवण करून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार.)

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

हो..ते मत्स्यानाम् अस्मि सामनः कसलं चपखल बसवलं आहे त्यांनी तिथे.
हे 'भिंत पिवळी आहे' कशातलं आहे? मी वाचलेलं नाहीये हे.

हे 'भिंत पिवळी आहे' कशातलं आहे? मी वाचलेलं नाहीये हे.>>
गोळाबेरीज मधील 'एक नवे सौंदर्यवाचक विधान' या लेखातील. तो सगळा लेखच जबरी आहे Happy

मस्त च लेख आहे आणि सगळे प्रतिसाद पण भारी..
खाद्यजीवन मध्ये एका ठिकाणी एक संदर्भ आहे की भात खदखदू लागला म्हणजे प्रियकराचे प्रेयसीवरचे लक्ष उडून आमोद सुनांस होते..
यातले
आतां आमोद सुनांस जाले । श्रुतीसि श्रवण रिघाले ... अशी काहीतरी
ही ज्ञानेश्वर माऊलींची रचना आहे असे वाचल्याचे आठवते

आतां आमोद सुनांस जाले । श्रुतीसि श्रवण रिघाले ... अशी काहीतरी
ही ज्ञानेश्वर माऊलींची रचना आहे असे वाचल्याचे आठवते>> बरोबर.
त्याच नावाची दि. बा. मोकाशी यांची एक प्रसिध्द कथाही आहे.

तुझे आहे तुजपाशी मधील 'एकला चलो रे' ही टागोरांची प्रसिध्द बंगाली रचना आहे.

मस्त धागा आणि प्रतिसाद!
गोळेमास्तर 'गोपिकाबाईंचा पुत्रशोक" ही कविता मन लावून शिकवतात असं काहीतरी आहे ना? खरंतर ती कविता खूप tragic आहे- गोपिकाबाईंचे तिन्ही मुलगे लवकर गेले- पण पुलंनी लिहिल्यावर फार फनी वाटतं ते.

म्हैसमध्ये ते सरदारजी character पण दोन वाक्यात effect साधण्याचं उदाहरण आहे- आदमी मर जाता तो- भैन्स मर गया तो क्या असं काहीतरी.

पाळीव प्राणी मध्ये मनी बोक्याला 'माझा होशील का बोका' असं गाणं म्हणते. तेही 'सांग तू माझा होशील का' या गाण्याचा रेफरन्स आहे. भयंकर फनी आहे ते सगळं. Biggrin

पूर्वी "भारतमाते"चे वर्णन असे मराठी साहित्यात. यावरून अंदाज लावता येतो की ५० च्या दशकाच्या आसपास तर खूप जास्त असावे. त्यात पुलंना येणार्‍या एका पत्रात "आज भारतमातेचे अश्रू पुसणारे लेखक हवे आहेत" असा एक सल्ला/उपदेश येतो. त्यावर

"ह्या भारतमातेने तर वैताग आणलाय. सुपुत्रांना हाक देणे आणि अश्रू ढाळणे हे एवढे दोनच कार्यक्रम करणारी ही माता जी एकदा "तळहाती ठेवुनी या स्वशिराते बैसली" ती काही उठून देवळात कुठे प्रवचनाला जाईल किंवा नातवंडांना खेळवील, नाव नको" Happy

अभ्यासपूर्ण असल्याने मला काही लिहिता येईल असं वाटत नाही.
- by mi_anu.

- बरेच दिवसात आलिया भोगासी परिस्थितीजन्य प्रसंगांवर अभ्यासपपूर्ण विनोदी लेख आलेला नाही.

झकास धागा! पूर्ववाङ्मयीन संदर्भ - इंटरेस्टिंग.
धाग्याचा मजकूरही छान लिहिलाय.

"हसायचे कारण नाही... इथे संत श्री ज्ञानेश्वरान परमिट दिलेले आहे... की राजहंसाचे चालणे..." हा अख्खा श्लोक म्हणून पुढचं मुद्द्याचं वाक्यही श्लोकाच्या चालीत कसलं भारी म्हटलंय! Lol

वडिलांची नाट्यगीतांची आवड सांगताना -
सुखकर्ता दु:खहर्ता चालीवर 'स्वकुल तारक सुता सुवरा, वरुनी वाढवी वंश वनिता'. मूळ गाण्यातला मूड सगळा बदलून जातो. आणि सुता ऐवजी सुवरा पाशी पॉज एक नंबर आहे Biggrin

पूर्वरंग - बाली बेटांवरच्या नृत्यकार्यक्रमाचं वर्णन आहे, त्यात
'नृत्य करणारी जोडपी इतक्या जवळ येऊन स्पर्श देखील न करता दूर का जातात?' या प्रश्नामुळे मुखाच्या चेहर्‍यावर 'शिरसि मा लिख मा लिख मा लिख' असा भाव येतो. Biggrin

मूळ श्लोकाचा अर्थ साधारण गाढवासमोर वाचली गीता / गाढवाला गुळाची चव काय असा आहे.

-------------------

हे कोण बोलले बोला
चिंचेवर चंदू चढला

ही अ‍ॅडिशन कुणाची आहे? अत्र्यांची का?

जबरी!

मूळ श्लोकाचा अर्थ साधारण गाढवासमोर वाचली गीता / गाढवाला गुळाची चव काय असा आहे >> अरसिकेषु कवित्वनिवेदनं शिरसि मा लिख मा लिख मा लिख|

ललिता-प्रीति, मस्तच.
तरुणींच्या स्पर्शापेक्षा त्यांचा गंध जास्त मादक असतो, हे मी तुम्हाला सांगायला हवं का, असं तो मुख म्हणतो. त्यावर 'नातिचरामि' ची घोर प्रतिज्ञा घेतलेला मी एक भारतीय नवरा आहे असं पुलंनी म्हटलंय ना पुढे?

खूप मस्त धागा... .
पु ल वाचताना पेक्षा ऐकतानाही ह्यातील बर्‍याच गोष्टींवर हसुही येतं खूप... दर वेळी नवीन संदर्भही कळतात.. पण ह्या लेखामुळे आत्तापर्यंत माहीत नसलेले अनेक संदर्भ कळत आहेत अन परत खूप हसुन घेता येत आहे
धन्यवाद...

अब्द अब्द मनी येते ..... ह्या वसंतराव देशपांडे यांच्यावरील लेखाचे शिर्षक मर्ढेकरांच्या कवितेवरुन घेतले आहे.

किती पायी लागू तुझ्या
किती आठवूं गा तूंते;
किती शब्द बनवूं गा
अब्द अब्द मनी येते.

काय गा म्यां पामराने
खरडावी बाराखडी;
आणि बोलावी उत्तरें
टिनपाट वा चोमडी.

कधी लागेल गा नख
तुझे माझिया गळ्याला,
आणि सामर्थ्याचा स्वर
माझिया गा व्यंजनाला!

- बा. सी. मर्ढेकर

"यां चिंतयामि सततं मयि सा विरक्ता" हे मला आठवतं त्यानुसार अपूर्वाईतलं आहे जिज्ञासा. लंडनमधे एके सकाळी त्यांना ब्रिटिश पोलीस "बॉबी" दिसतो. त्या जगन्मित्र बॉबीच्या दर्शनाने अत्यानंदित होऊन पुलं त्याच्याशी काही बोलू जातात पण बॉबी मात्र "gummong " का काहीसे बरळून अंतर्धान पावतो. त्याच्याशी बोलायच्या गोष्टी पुलंच्या मनातच राहतात तेव्हा ते म्हणतात, "यां चिंतयामि सततं मयि सा विरक्ता" हे बहुधा प्रेयसीप्रमाणे पोलिसालाही लागू असावं.

कुठले तरी शिक्षक कविता शिकवताना "खबरदार जर टाच मरून जाल पुढे चिंधड्या उडवीन आssई आssई एवढ्या" असे बोलतात (जांभई आल्यामुळे). ती मूळ कविता
"https://www.aathavanitli-gani.com/Song/Khabardar_Jar_Tach" आहे.
पुलंच्या एका पुस्तकाचं नाव "गुण गाईन आवडी" आहे. त्याचा काय संदर्भ आहे?

srd , ती घटना बाली इंडोनिशियातली आहे. मुख त्यांना घेऊन जातो ते पारंपरिक केचक नृत्य असतं. तुमचा काहीतरी गैरसमज झाला असावा.

दीपक२००२, कूलदीपक ब्लॉग तुमचाच आहे ना? खूपच चांगला संग्रह केला आहे तुम्ही पुलंच्या आणि पुलंवरच्या लेखनाचा. तुम्ही मायबोलीवर आहात हे माहिती नव्हतं.

अजबराव, हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा या अभंगातली ओळ आहे ती.
https://youtu.be/tEq8ea3Ux-c

कुठले तरी शिक्षक कविता शिकवताना "खबरदार जर टाच मरून जाल पुढे चिंधड्या उडवीन आssई आssई एवढ्या" असे बोलतात (जांभई आल्यामुळे). ती मूळ कविता>> हे असे नाही. ते शिक्षक सगळ्याच कविता कळवण्यास अत्यंतदु:ख होते आहे की... या चालीवर शिकवत असतात असा संदर्भ आहे...बरीच वर्षे झाली ते वाचुन काही चुकतही असेल माझे.

मनमोहन आणि अजबराव, माझ्याकडे पुस्तक नाही आत्ता हाताशी त्यामुळे संदर्भ चुकलेला असू शकतो.

अपूर्वाई मध्येच बहुतेक कोट शिवणाऱ्याचे इंग्रजी माझ्या हिंदी इतकेच "बिनअस्तराचे" होते ही विशेषणातली मजा लक्षात आली की वाचायला मजा येते!

यां चिंतयामि सततं मयि सा विरक्ता" हे मला आठवतं त्यानुसार अपूर्वाईतलं आहे

>>> 'मयि सा विरक्ता' चा उल्लेख पूर्वरंग-जपान वर्णनात पण आहे. जपानमध्ये त्यांचं इंग्रजीतून भाषण आयोजित केलं गेलं होतं, त्याबद्दल सांगताना त्यांनी लिहिलंय- इंग्रजी भाषा, इंग्रजी वाङ्मय मला आवडतं, पण इंग्रजीला मी आवडत नाही - मयि सा विरक्ता.

खबरदार जर टाच मारुनी ही एक वीरश्रीयुक्त कविता आहे. एका गडावर टेहेळणीचे काम करणारा एक तरुण मुलगा गडाकडे घोडदौड करत येणाऱ्या एका स्वाराला पाहून त्याला अडवतो. स्वाराने नानाप्रकारे विनवूनही हा मुलगा ( बहुधा सावळ्या तांडेल) स्वाराला पुढे जाऊ देत नाही. ह्या प्रसंगावर आधारित ही कविता आहे. तो घोडेस्वार म्हणजे वेषांतर केलेले छत्रपती शिवाजी महाराजच असतात. ते सावळ्याची कर्तव्यनिष्ठा पाहून खुश होतात वगैरे.

mandard , "खबरदार जर टाच मरून जाल पुढे चिंधड्या उडवीन आssई आssई एवढ्या" हे मला वाचल्याचं आठवत नाही पण टीव्हीवर निवडक पुलं ह्या कार्यक्रमात त्यांनी त्या पद्धतीने बोलून दाखवलेलं पाहिल्याचं आठवतंय. मुद्दा तोच होता की ते शिक्षक कुठलीही कविता अतिशय नीरसपणे शिकवत.
गुण गाईन आवडीच्या संदर्भासाठी धन्यवाद वावे

@ deepak2002 ,
cooldeepak Blog आवडला.

Pages

Back to top