₿₿₿
सकाळचे नऊ वाजले होते तरी जयसिंग अजूनही बिछान्यावर लोळत पडला होता, इतक्यात त्याचा फोन वाजला. फोनवर झिपऱ्या होता जयसिंगने नाखुशीनेच तो फोन उचलला.
" अहो , मालक बातम्या बघा काय करून ठेवले बघा तुम्ही ! " , तो घाईघाईत म्हणाला.
" आता काय झालं? " जयसिंग वैतागून म्हणाला.
" मालक लय मोठा घोटाळा झालाय. काल तुम्ही दारूच्या नशेत त्या रागिणीला फोन केला आणि आता हे बातम्यांना दाखवतात बघा काय! " झिपऱ्या असं म्हणाला आणि तडक जयसिंगने बातम्या लावल्या.
बातम्यांमध्ये एक ऑडिओ रेकॉर्ड क्लिप लावली होती , त्यात स्पष्ट ऐकू येत होतं ,
" तुला एकदा सांगून कळत नाय काय ? मला माझे पैसे पाहिजेत. "
" किती पैसे आहेत तुझे ? "
" वीस करोड …माझे 20 करोड मला परत पाहिजेत. आता फक्त काच फोडलिय , उद्या डोकं फोडीन तुझं खासदार बोडके पाटलांचा माणूस हाय मी ! समजलं का ! "
न्यूज चॅनलवाले खासदार बोडके पाटलांचा माणूस हाय मी ! समजलं का ! " हेच वाक्य वारंवार दाखवत होते . जवळपास सर्वच न्युज चॅनलला ही क्लिप पोहोचली होती , आणि सर्वत्र हीच क्लिप चालू होती . जयसिंगचं डोकं भणभणू लागलं त्या बातमीने. त्याने न्युज चॅनल बदलला . दुसऱ्या एका न्युज चॅनलवर खासदार बोडके पाटील बंगल्याच्या समोर पत्रकारांच्या गराड्यात आहेत आणि ते त्यांच्यावरच्या आरोपाचं खंडन करतायत असं दिसत होतं . " मी बिटकॉईनमध्ये पैसे गुंतवल्याचा पुरावा द्या , मी माझ्या खासदारकीचा राजीनामा देईन . बाकी नो कमेंट्स … " असं घाईघाईने बोलून ते गाडीत बसून निघून जाताना दिसले. इकडे जयसिंगने डोक्याला हात लावला.
' अरे देवा ! काय झालं हे ! लय मोठ्ठा घोळ झाला . आता या बिटकॉइनच्या नादात आपले मेहुणे भलत्याच अडचणीत आलेत . आता काय खरं नाय ! मेलो आता आपण !' जयसिंग असा विचार करत असतानाच त्याचा फोन पुन्हा वाजला . त्याने पाहिलं , मोबाईलवर अक्षरे उलटली होती , ' खासदार साहेब कॉलिंग … '
₿₿₿
" ब्रिलियंट …! सिंपली ब्रिलियंट ! … मेघ , यु आर जिनियस ! आय लव यू ! " असं म्हणत रागिणीने मेघनादला घट्ट मिठी मारली . तोही आनंदात तिच्या मिठीत विसावला. " तू कसं काय केलंस हे ? "
" तो जो कोणी बेवडा होता ना , तो चुकून बोलून गेला , त्याने खासदार बोडके पाटलांच नाव घेतलं. कॉल रेकॉर्ड मध्ये खासदाराचं नाव आलं , आपल्याला आणखी काय पाहिजे ? " , मेघनाद हसत म्हणाला .
" मस्तच ! भलताच केयॉस झालाय . पण मग तू म्हणाला होतास की एका दगडात दोन पक्षी , त्याचं काय ? "
" सगळ्या मिडियाचं लक्ष आता आपल्यावरून त्या खासदार बोडके पाटीलवर जाईल , आपल्याला हवा असणारा वेळ मिळेल , हा एक पक्षी , आणि दुसरा म्हणजे मी थोड्या वेळापूर्वी पोलीस स्टेशनमध्ये गेलो आणि कालच्या घटनेबद्दल सांगितलं . तुझ्या जीवाला धोका आहे असं पत्र दिलं , आता जे पोलीस तुला त्रास द्यायला यायचे , तेच तुझे रक्षण करण्यासाठी २४ तास उभे राहतील. मला तुझ्यासाठी सेपरेट सिक्युरिटी नेमायची गरज नाही. पोलिसांचं सुद्धा काम जरा वाढवूया म्हटलं … " , मेघनाद गंमतीदार चेहरा करून म्हणाला .
" वॉव … ग्रेट ! कसा काय विचार करतोस एवढा ? "
" करावा लागतो मॅडम ! "
" अरे पण एक गोष्ट तू विसरतोयस , आपल्याला आता एकांत मिळणार नाही . " , रागिणी नाखुशीने म्हणाली .
" ठीक आहे, आपल्या एकांतापेक्षा मला तुझी सिक्युरिटी जास्त महत्वाची वाटते, आणि थोड्याच दिवसांचा तर प्रश्न आहे … आपण आपल्या टार्गेट पासून फारच थोड्या अंतरावर आहोत . " मेघनाद म्हणाला .
" तरी कितीचं टार्गेट ठेवलं आहेस ? "
" फार नाही, फक्त ९०० करोड … ! "
" काय ? काय सांगतोयस काय ? मी चुकीचं ऐकत नाही ना ? " , तिने डोळे मोठे करत विचारलं .
" तू ऐकलंय ते बरोबर आहे ! " , मेघनादच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होते .
₿₿₿
खासदार प्रतापराव बोडकेपाटील यांच्या प्रशस्त बंगल्याबाहेर जयसिंग आणि झिपऱ्या उभे होते. खासदार साहेबांनी त्याला तातडीने भेटायला बोलावलं होतं. वाघाच्या गुहेत जाताना जसं वाटेल तसं आता खासदार साहेबांच्या बंगल्यावर जाताना त्याला वाटत होतं. दारूच्या नशेत तो एक मोठी चूक करून बसला होता. आणि आता त्याच्या चुकीची शिक्षा त्याच्या खासदार मेहुण्यांना भोगावी लागणार होती . जवळपास सर्वच न्यूजचॅनल्स आणि वर्तमानपत्रात त्यांच्या बिटकॉईन संदर्भातल्या गुंतवणुकीची बातमी होती . आधीच ओमी मिरचंदानीच्या मृत्यूमुळे क्रिप्टो करन्सी एक्स्चेंज प्रकाशझोतात आलं होतं , त्यात आता खासदार साहेबांचीही गुंतवणूक असल्याने तो सर्वत्र चर्चेचा विषय झाला होता. आत जावं की नको असा विचार करत असतानाच त्याचा मोबाईल वाजला . सुहासिनी ताईचा फोन होता . का कुणास ठाऊक पण तिचा फोन आलेला पाहून त्याला जरा हायसं वाटलं .
" हॅलो ताई … " , त्याने घाबरत फोन घेतला .
" अरे जया , आहेस कुठं तू ? येणार होतास ना घरी ? हे विचारतायत. " , त्यांनी घाईघाईने विचारलं.
" हा काय , बंगल्याबाहेरच आलोय … "
" बंगल्याबाहेर काय करतोयस ? लवकर ये … साहेब वाट बघतायत तुझी . "
" आलो ,आलो… ", म्हणत जयसिंग घाईघाईने बंगल्याचं गेट ओलांडून आत गेला . झिपऱ्याही त्याच्या मागोमाग आत आला . पण सिक्युरिटीने त्याला आत जाऊ दिलं नाही . त्याला तिथेच गेटवर थांबवण्यात आलं.
" मालक, हे मला आत येऊ देईनात … " , तो जयसिंला म्हणाला.
" का रे बाबांनो , मला वळकत नाय का ? त्यो माझ्याबरोबर हाये. येऊ द्या त्याला आत . ", जयसिंग सिक्युरिटीला म्हणाला .
" फक्त तुम्हालाच आत सोडायचे आदेश आहेत साहेबांचे ! तुम्ही इथंच बसा … " , झिपऱ्याला तिथेच बसायला सांगितलं. झिपऱ्या नाईलाजाने तिथल्या एका खुर्चीवर बसला. इतरवेळी खासदार साहेबांच्या बंगल्यावर जाताना काय रुबाब असायचा जयसिंगचा ! साहेबांचा मेहुणा म्हणून तर जास्तच ! पण आज एखाद्या अपराध्यासारखं त्याला वाटू लागलं . आयुष्यात प्रत्येक क्षणी , मग तो महत्वाचा असो किंवा नसो , झिपऱ्या त्याच्या सोबत होता. बऱ्याचदा झिपऱ्याने त्याला निर्णय घ्यायला मदत केली होती . खरं तर बिटकॉईनमध्ये पैसे गुंतवू नका असं त्याने एकदा जयसिंगला सांगितलंही होतं , पण जयसिंगच्या उत्साहापुढे तो जास्त काही बोलला नव्हता . आता जयसिंगला एकट्यालाच आत जाऊन येणाऱ्या भयंकर प्रसंगाला तोंड द्यावं लागणार होतं. पहिल्यांदाच जयसिंगला खरोखर एकटं पडल्यासारखं वाटू लागलं . तो पाय ओढत आत जाऊ लागला . त्याने पाहिलं , दरवाज्यावर सुहासिनीताई साहेब उभ्या होत्या. त्यांच्या डोळ्यांतून पाण्याच्या धारा लागल्या होत्या . त्यांचा तो तसा चेहरा बघून आत आपल्यासाठी काय वाढून ठेवलंय याचा अंदाज जयसिंगला आला . पण आता आत जाण्यावाचून पर्याय नव्हता. आपण ज्या चुका केल्या आहेत त्याचं प्रायश्चित आपल्यालाच घ्यावं लागणार आहे. त्याने मन घट्ट केलं . आता जे होईल त्याला तोंड द्यायची त्याने तयारी केली .
" जया , काय करून बसलास रे बाबा , तरी तुला मी सांगत होते , ह्या भानगडीत पडू नकोस म्हणून ! " , जयसिंग जवळ आला तशा सुहासिनी ताईसाहेब म्हणाल्या .
" ताई , मला माफ कर ! माझ्याकडून लय मोठी चूक झाली . " , जयसिंगला रडायला येईल की काय , असं वाटू लागलं.
" माफ करणारी मी कोण बाबा ? बरं ऐक ! हे काय बोलतील ते नुसतं ऐकून घे … काही बोलू नकोस . "
" साहेब लय चिडलेत का ? "
" तसं मी समजावलंय त्यांना . पण बघू … चल " , म्हणत ते दोघे आत गेले. समोरच्या प्रशस्त दिवाणखाण्यात खासदार बोडकेपाटील एकटेच मान खाली घालून बसले होते . सुहासिनीताई आणि जयसिंग आत आल्याची चाहूल लागताच त्यांनी मान वर केली .
" या , या जयसिंगराव ! बसा , काय घेणार ? चहा का कॉफी ? अरे हो ! तुम्ही चहा , कॉफी काही घेत नाही , नाही का ! पेग भरू का तुमच्यासाठी व्हिस्कीचा ? " , खासदार बोडके पाटील उपरोधिक बोलत होते , त्यांच्या आत खूप मोठा राग लपलाय हे त्यांच्या चेहऱ्यावरुन दिसत होतं .
" साहेब , मला माफ करा … ! माझ्याकडून खूप मोठी चूक झाली . " , जयसिंग रडवेल्या स्वरात म्हणाला .
" नाही, नाही… चूक नाही… घोडचूक झालीय जयसिंगराव ! तुमची नाही , आमची ! तुम्हाला रिसॉर्ट काढण्यासाठी पैसे दिले हीच मोठी चूक झाली आमची ! तुम्हाला कुणी सांगितलं होतं त्या बिटकॉईनमध्ये पैसे टाकायला ? बरं टाकण्याआधी आम्हाला कल्पना तरी द्यायची होती . तेही जाऊद्या , पैसे बुडाले तेव्हा तरी सांगायचं ! परस्पर त्या बाईला फोन करून धमकी द्यायची काय गरज होती ? " , खासदार बोडके पाटलांचा पारा भलताच चढला होता .
" चूक झाली साहेब , त्या टोनीने सोनकांबळे पत्रकाराकडून त्या बाईचा फोन नंबर मिळवून दिला , म्हणून मी फोन करून माझे गुंतवलेले पैसे मागितले फक्त … " , जयसिंग बारीक आवाजात म्हणाला .
" कोण टोनी ? कोण सोनकांबळे ? कसल्या लोकांच्या संगतीत आहात तुम्ही ? दारूच्या नशेत त्या बाईला फोन केलात, बरं केलात ते केलात , माझं नाव घ्यायची काय गरज होती ? चार पैसे कमवायची अक्कल नाही … आणि निघालेत रिसॉर्ट काढायला … " , खासदार साहेब रागात म्हणाले . त्यावर जयसिंग काहीच म्हणाला नाही . निमूटपणे ऐकत राहिला .
" अहो , मी काय म्हणते … एक वेळ माफ करा त्याला . " , सुहासिनी ताईसाहेब शक्य तितक्या हळू आवाजात म्हणाल्या .
" तुम्ही तर काही बोलूच नका ! तुमच्या भावावरच्या आंधळ्या प्रेमामुळे हे सगळं झालंय " , खासदार साहेब त्यांच्या बायकोवरही भडकले . त्यांनाही बोलायची काही सोय राहिली नाही . आपल्या लहान भावामुळे नवऱ्याची बदनामी झाली होती . त्यांच्यासाठी हे अवघड जागेचं दुखणं झालं होतं. जयसिंग त्यांचा एकुलता एक लहान भाऊ. आई-वडील दोघांच्या मृत्यूनंतर जयसिंगचा त्यांनी मायेने सांभाळ केला होता . त्याला कधी कशाची कमी पडू दिली नव्हती. एका बाजूला लहान भाऊ आणि दुसऱ्या बाजूला पती ! कात्रीत सापडल्यासारखी त्यांची अवस्था झाली होती .
" साहेब , मी तुमचे सगळे पैसे परत करीन … मला थोड्या दिवसांची मुदत द्या . " , जयसिंग मान खाली घालत म्हणाला .
" तुम्ही पैसे देणार ? " असं म्हणून खासदार साहेब कुत्सितपणे हसले . " वीस करोडमध्ये दोनावर किती शून्य असतात ते तरी माहीत आहे का तुम्हाला ? आणि कसेही करून पैसे दिलेत तरी हे कसं परत करणार ? " असं म्हणून त्यांनी एक कागद जयसिंगपुढे भिरकावला . जयसिंगने तो वाचला आणि त्याला चक्कर येईल की काय असं वाटू लागलं . पक्षश्रेष्ठींनी बोडकेपाटलांच्या खासदारकीचा राजीनामा मागितला होता .
क्रमशः
भारी भाग
भारी भाग
मस्तं भाग. उत्तम आणि वेगवान
मस्तं भाग. उत्तम आणि वेगवान कथा.
छान
छान
मस्त चाललीय कथा
मस्त चाललीय कथा