पुलंच्या लेखनातील पूर्ववाङ्मयीन (गाळीव/न कळीव) संदर्भ

Submitted by हरचंद पालव on 18 June, 2022 - 10:28

विल्यम हेझ्लट नावाचा एक जुना इंग्रजी साहित्यिक म्हणून गेला आहे, की हास्य आणि रुदन हे 'काय आहे' आणि 'काय असायला हवं' ह्यातल्या फरकावर अवलंबून असतात. जेव्हा वस्तुस्थिती ही आपल्याला ह्या फरकामुळे दु:ख देते तेव्हा आपण रडतो आणि जेव्हा अनपेक्षित आनंद देते तेव्हा आपण हसतो. पुढे मराठीत आचार्य अत्र्यांनी त्यांच्या 'विनोदाचे व्याकरण' ह्या विषयावरील व्याख्यानातही 'विनोद हा, काय आहे आणि काय असायला हवं, ह्यातल्या फरकावर अवलंबून असतो' अशीच सोपी व्याख्या केली आहे. काही विनोद हे त्यात 'काय हवं' हे आपल्याला माहीत नसेल तर कदाचित तितके भावतीलच असं नाही.

नमनाला एवढं घडाभार तेल ओतण्याचं कारण म्हणजे पुलंच्या लिखाणातील काही विनोदांबाबतीत माझीही अशीच परिस्थिती झाली. उदाहरणार्थ असा मी असामीत गुरुदेव प्रकरणात 'हे कोण बोलले बोला म्हणून मी मागे पाहिलं तर ...' ह्या वाक्यात ते 'कोण बोलले बोला' ऐकायला मजेशीर वाटलं होतं. पण मुळातली 'हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला' ही कविताच त्यावेळी माहीत नसल्यामुळे काय अपेक्षित आहे आणि काय अर्थाने ते शब्द वापरले ह्यातला फरक आणि त्यातली मजा कळाली नव्हती. 'वरदाबाईंनी मीराबाईच्या तुमबिन मोरीत तोंड घातलं' - हे एखाद्याला 'तुमबिन मोरी' किंवा एकूणच मीराबाईची भजनं माहीत नसलेल्यांना कळेलच असं नाही. केवळ विनोदच नाही, तर पुलंच्या लिखाणात कित्येक अन्य भाव व्यक्त होतानादेखिल असे त्यांच्या पूर्वीच्या वाङ्मयातले संदर्भ येऊन जातात. ते मुळातले संदर्भ माहीत असतील तर पुलंचं लिखाण वाचतानाची मजा, त्यातली रसनिष्पत्ती वृद्धिंगत होते असा अनुभव आहे. ते संदर्भ कुठून कुठून घेऊन पुलंनी ज्या सहजतेने वापरले आहेत, त्यावरून त्यांच्या सखोल वाचनाची आपल्याला प्रचिती येते. त्यातले आपल्याला माहीत असलेले काही संदर्भ, माहीत नसलेले काही अशा सर्वांची चर्चा करायला हा धागा उपयोगी पडावा. सुरुवात करायची म्हणून खाली काही मला माहीत असलेले संदर्भ देतो.

कवींच्या गणनाप्रसंगी सुरुवातच कालिदासापासून करतात, त्याला अनुसरून मीही सुरुवातीच्या बिगिनिंगमदी कालिदासाचे पुलंच्या लिखाणातले दोन संदर्भ सांगतो. त्यातला पहिला आहे, अंतु बर्वामधला. त्यात अंतु बर्वा म्हणतो की 'कुंभार मडकी घेऊन गेला, तुम्ही फुंका उकिरडा ! हे सगळं चक्रनेमिक्रमेण होतं.' ह्यातला जो चक्रनेमिक्रमेण म्हणून शब्द आहे, त्याचा उगम कालिदासाच्या मेघदूतात आहे. जगण्याला (गटणीय भाषेत - जीवनाला) कालिदास चाक आणि त्याच्या आऱ्यांची उपमा देतो.
कस्यात्यन्तं सुखमुपगतं दु:खमेकान्ततो वा
नीचैर्गच्छत्युपरि च दशा चक्रनेमिक्रमेण॥

कायमच सुख किंवा कायमच दु:ख असं कुणाच्या वाटेला येतं? जीवनाची दशा ही नेमाने खाली जाऊन वर येणाऱ्या चक्राप्रमाणे असते. मेघदूतात काही मोजके, ज्याला आपण आजकाल मराठीत आयकॉनिक म्हणतो, अशा पद्धतीचे श्लोक आहेत. त्यातला एक हा म्हणता येईल. एकूणच उपमा ह्या अलंकाराच्या बाबतीत कालिदास हा 'दादा आदमी' मानला जातो. त्याच्या सर्वात लोकप्रिय उपमांपैकी 'चक्रनेमिक्रमेण' ही एक आहे (इंदुमती स्वयंवरातली दीपशिखेची उपमा तर सगळ्यात जास्त हिट आहे. त्यावरून त्याला 'दीपशिखा-कालिदास' अशा नावाने संबोधतात. पण तो आत्ताचा विषय नाही.). मराठी विश्वकोशावर अर्थनीतीवरच्या नोंदीत देवदत्त दाभोलकरांनी तेजीमंदीच्या बाबतीत चक्रनेमिक्रमेण हा शब्द वापरलेला दिसला, हे जाता जाता गंमत म्हणून नमूद करतो.

दुसरा संदर्भ येतो तो बटाट्याच्या चाळीच्या संगीतिकेत.
'गृहिणी सचिव सखी एकांती ललित कलातील प्रियशिष्या ती'
ही पुलंनी लिहिलेली ओळ कालिदासाच्या 'गृहिणी सचिव: सखी मिथ: प्रियशिष्या ललिते कलाविधौ' ह्या ओळीचा थेट अनुवाद आहे. खरं म्हणजे रघुवंश ह्या महाकाव्यात इंदुमती ह्या आपल्या प्रिय पत्‍नीच्या मृत्यूनंतर विलाप करणाऱ्या अज राजाच्या तोंडी हे वाक्य येतं. म्हणजे मुळातलं वाक्य करुण रसात (ती कशी होती वगैरे आठवणीत) येतं. त्याच्या पुढच्याच ओळीत पुल कालिदासाला क्रेडिट देऊन काय म्हणतात ते पहा -
कविकुलगुरुच्या विसरा पंक्ती,
कालप्रवाही वाहुनि गेला त्या युवतींचा ग्राम,
(रसिका,) तुझे न येथे काम!

चला, आता जिथून ह्या विषयाची सुरुवात झाली, त्या संदर्भाकडे वळू. 'हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला' - गोविंदाग्रजांनी लिहिलेलं अत्यंत कारुण्यपूर्ण असं हे गीत आहे. ते गीत ऐकल्यानंतर मी पुन्हा जेव्हा ... 'अहो गुरुदेवांना बरं का साहेब, सगळे सारखे' - हे कोण बोलले बोला म्हणून मी मागे पाहिलं... हे ऐकलं तेव्हा अक्षरश: फुटलो. त्यातली 'राजहंस माझा निजला' ही ओळ बिगरी ते मॅट्रिकमध्येही आलेली आहे. बहुधा कुठल्याही कवितेला 'कळवण्यास अत्यंत दु:ख होते की' प्रकारची चाल लावणाऱ्या मास्तरांच्या संदर्भात ती येते.

असा मी असामीमध्ये आणि पुलंच्या अन्यही काही लिखाणात उल्लेख असलेले 'भो पंचम जॉर्ज भूप' म्हणजे कोण ते आपल्याला माहीत असेलच, पण ती ओळ पंचम जॉर्जच्या अधिपत्याखाली असताना मराठी शाळांमध्ये सर्वांना म्हणाव्या लागणाऱ्या प्रार्थनेतली आहे. त्यावेळी बालपण घालवलेल्या सर्वांनाच हा विनोद जास्त भावला असेल यात शंका नाही.
भो पंचम जॉर्ज, भूप, धन्य धन्य | विबुधमान्य सार्वभौम भूवरा ||
नयधुरंधरा, बहुत काळ तूंचि पाळ ही वसुंधरा | शोभविशी रविकुलशी कुलपरंपरा ||

असे आणखी कित्येक संदर्भ आहेत. तुम्हाला लक्षात आलेले किंवा आणखी माहिती हवी असलेले असे त्यांच्या लिखाणातले संदर्भ असतील तर त्यावर चर्चा होऊन जाऊ द्या.

(मागे वावे यांच्या दुसऱ्या एका धाग्यावर ह्या धाग्याची कल्पना निघाली. बरेच दिवस हा विषय चर्चेला घ्यावा हे मनात होतं पण नंतर विसरून गेलो. काही दिवसांनी फेरफटका आणि वावे ह्यांनी आठवण करून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार.)

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

छान विषय. माझ्या आठवणीतले काही :

... एकदा ते आडगावातील हॉटेल मध्ये जातात तेव्हा तिथे कोरा चहा प्यावा लागतो. त्यावर कथेतील एकजण म्हणतो,
"काय रे गावातल्या सगळ्या म्हशी गाभण राहिल्यात का ?"
...
यासारखे विनोद सध्याच्या तरुण पिढीला समजणार नाहीत अशी चर्चा कुठेतरी वाचल्याचे आठवते.

मस्त! Happy

‘ती फुलराणी’तल्या नायिकेचं नाव ‘मंजुळा साळुंके’ ठेवण्यामागे तुकारामांच्या ‘साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी । बोलविता धनी वेगळाची ॥’ या ओवीचा संदर्भ आहे असं त्यांनीच सांगितलं होतं. किती चपखल वापर!!

‘बटाट्याच्या चाळी’त कुणाकडेतरी करुण कटाक्ष ‘टाकुनिया बाबा (बर्वे) गेला’ हा पी. सावळारामांच्या ‘कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला’कडे निर्देश आहे.

>>> बहुधा कुठल्याही कवितेला 'कळवण्यास अत्यंत दु:ख होते की' प्रकारची चाल लावणाऱ्या मास्तरांच्या संदर्भात ती येते.
गोळे मास्तर! Lol

रत्नांग्रीच्या समस्त म्हयशी तूर्तास गाभण काय रे झंप्या! Happy

अंतू बरवा. पण त्याचा पूर्वकालिन संदर्भ काही आहे का?

मराठी मालिका चर्चेतून /गर्तेतून वाचकांना बाहेर काढल्याबद्दल लेखकाचे आणि प्रतिसादांतून नवीन माहिती दिलेल्या/ देणाऱ्या सर्वांचे आभार.

विदर्भी वाचकांना प्रश्न पडतो की बटाट्याच्या चाळीत काय विनोद आहे. चाळीत कांदे बटाटे साठवतो मोड येऊ नये म्हणून.

मुंबईत चाळीत मोड येतात. राहून पाहा.

‘नाथा कामता’बद्दल (व्यक्ती आणि वल्ली) लिहिताना ‘नाथाघरची उलटीच खूण’ असा उल्लेख येतो. तो एकनाथांच्या याच ओळीने सुरू होणाऱ्या भारुडातला उल्लेख आहे.

त्याच भारुडातला ‘वळचणीचे पाणी आढ्या गेले’ हा संदर्भही ‘अंतू बर्व्या’त येतो.

हे कोण बोलले बोला (हा कोण इथे पडलेला ?)
कादारखॉं काबुलीवाला
झेंडूची फुले
हे जास्त पटेल.appropriate आहे.

वाह! फारच छान सुरुवात करून दिली आहेत हपा!
इथले प्रतिसाद वाचायला उत्सुक आहे. शिवाय या निमित्ताने पु. लं ची सर्व पुस्तके चाळून बघता येतील!

वाह! मस्त धागा आहे हा. स्वातीताई, सुंदर अ‍ॅडिशन्स.

“ साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी । बोलविता धनी वेगळाची ॥” - ‘बोलाविता धनी‘ हा संदर्भही ‘पाळीव प्राण्यातल्या’ कुसुकू च्या बाबतीत आलाय.

काही भाषणांत त्यांनी ज्ञानेश्वरीतल्या ‘ये हृदयीचे ते हृदयी घातले‘ वचनाचा आधार घेत शिक्षणपद्धतीविषयी भाष्य केलंय.

त्यांनी लिहिलेल्या/रूपांतर केलेल्या काही नाटका/पुस्तकांची नावंही :
तुका म्हणे आता (उरलो उपकारापुरता)
तुझे आहे तुजपाशी (परि तू जागा चुकलासी)
विठ्ठल तो आला आला (मला भेटण्याला)
आम्ही लटिके ना बोलू (वर्तमान खोटे)
सुंदर मी होणार (कवी गोविदांची कविता)
एका कोळियाने (एकदा आपुले, जाळे बांधियेले, उंच जागी)

एका प्रवासवर्णनात (जर मला स्मृती दगा देत नसेल तर ‘पूर्वरंगा’च्या शेवटी) ‘जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत - सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत’चा उल्लेख आहे

यासारखे विनोद सध्याच्या तरुण पिढीला समजणार नाहीत >> हो, ते ही बरोबरच आहे म्हणा! मुळातला संदर्भ माहीत नसेल तर म्हशी गाभण आणि चहाचा रंग ह्यातला संबंध समजणार नाही.

बाकी प्रतिसादही छान.

“ एका प्रवासवर्णनात (जर मला स्मृती दगा देत नसेल तर ‘पूर्वरंगा’च्या शेवटी) ‘जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत - सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत’चा उल्लेख आहे” - बरोबर! किंबहूना ह्या काव्यपंक्तिचा उल्लेख त्यांनी बीएमएमच्या भाषणातही केलाय.

मस्त धागा. पुलंचा मी पंखा नाही, पण धाग्याची कल्पना, मांडणी आवडली.
संदर्भासहीत स्पष्टीकरणे साठी घेतलेली मेहनत पण उत्तम आहे. मला स्वतःला एखादा विनोद समजण्यासाठी इतके कष्ट घेणे जमणे नाही.

त्यांच्या कुठल्याशा लेखनात "या हृदयी चे त्या हृदयी " आले आहे , त्यालाही काहीतरी संदर्भ असणार! जाणून घ्यायचे आहे.
अशी कितीक उदाहरणे आहेत.. जी नेहमी quotes म्हणून वापरलेली असतात पण ज्यांचे मूळ संदर्भ बहुतेकांना ठाऊक नाहीत.
जसे कि
नेमेचि येतो मग पावसाळा

उत्तम धागा. 'गोळाबेरीज' पुस्तकातील 'शांभवी -एक घेणे' हे पु.शि.रेगे यांच्या काव्याचे विडंबन आहे असे कळले. पहिल्यांदा वाचले तेव्हा काहीच अर्थ लागला नव्हता पण मग त्यातील वाक्यरचना रेग्यांच्या काव्यात नेहमी वापरलेल्या प्रतिमांचे विडंबन आहे असे समजले.

ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं
क्षीणे पुण्ये मर्त्यलोकं विशन्ति।
एव त्रयीधर्ममनुप्रपन्ना
गतागतं कामकामा लभन्ते।।9.21।।
भगवद्गीतेतील श्लोकामधले हे शब्द अपूर्वाईमधे इंग्लंडहून मायदेशी परतणाऱ्या तरूणांच्या मन: स्थितीबद्दल वापरले आहेत.

या धाग्यावरून आठवलं की एबीपी माझावर 'जीएंच्या कथेतील स्थानं' हा माहितीपट बघितला होता. धारवाडमध्ये जीए राहात तिथली घरं, चौक, रस्ते दाखवले होते आणि त्यांचं वर्णन कोणत्या कथेत ते सांगितलेलं.

धागा आणि प्रतिसाद, दोन्हींमधली उदाहरणं मस्त!
मंजुळा साळुंकेची ही पार्श्वभूमी अजिबातच माहिती नव्हती.

'नारायण' मधला एक विरोधाभासातला विनोद.
'शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे' हा श्लोक नारायण हातात खास आग्रहाचे जिलब्यांचे ताट घेऊन ठणकावून देतो. Happy

'नाथा कामत' मध्ये 'गिरगाव रस्त्याला खोताची वाडी जिथे 'टांग जराशी' मारते तिथे' असं लिहिलंय. हे 'टांग जराशी' मर्ढेकरांच्या कवितेतलं आहे. "जिथे मारते कांदेवाडी टांग जराशी ठाकुरद्वारा, खडखडते अन् ट्राम वाकडी, कंबर मोडुनी, चाटित तारा"

आठवतील तसतसे लिहिते.
'नाथा कामत' मधलंच त्याच्या भावाचं वर्णन 'जळाहूनही शीतळू' हे मूळचं काय आहे?

बिगरी ते मॅट्रिक मधील 'देवाजीने करूणा केली, भाते पिकुनी पिवळी झाली' ही ओळसुद्धा मर्ढेकरांच्या कवितेतील आहे.

मी आणि माझा शत्रुपक्ष मधील 'पिपात ओल्या मेले उंदीर ' ही देखील मर्ढेकरांची कविता आहे.

मस्त धागा. धन्यवाद. "साहित्यिक" ग्रूप मधे सामील झालो तेव्हा आता दिसू लागला. आधी माझ्या फीड मधे दिसत नव्हता.

मंजुळा साळुंकेचा संदर्भ मलाही माहीत नव्हता.

वावे यांच्या "मला दिसलेले पुलं" लेखावरच्या प्रतिक्रियांत अजून काही उदाहरणे आहेत. पण इथेही देतो.

मी आणि माझा शत्रुपक्ष मधे उंदरांचा प्रश्न सोडवायला "पिपात मेले ओल्या उंदीर हे ऐकून आम्ही पिंपे आणली..." चा उल्लेख आहे, पुढे त्यावर आणखी "उंदीर ओले करायचे की पिंपे हे न समजल्याने तो प्रश्न तसाच राहिला" हे ही आहे वर. तो "पिपात मेले ओल्या उंदीर" या बा. सी. मर्ढेकरांच्या कवितेवरून हा संदर्भ आहे. ती कविता दुर्बोध आहे अशी टीका अनेकांनी केलेली आहे. अंत्र्यांनीही केली होती. ती दुर्बोध असण्याचा असा परिणाम- नक्की काय ओले करायचे- पिंपे की उंदीर- ते समजले नाही- मात्र धमाल आहे Happy

पुलंच्या लेखनातील अजून एक. कोणत्यातरी पुस्तकात अर्जुनाच्या धनुष्याचे नाव वाचताना आपल्याला कोणी बघितले/ऐकले का याची भीती वाटण्याबद्दल उल्लेख आहे. ते नाव "गांडीव धनुष्य" Happy पुण्याच्या आसपासच्या खेड्यांमधे नदीवर गेलो होतो वगैरे म्हणताना शेवटचे र अक्षर खातात. "नदीव" वगैरे इतकेच म्हणतात. ते ऐकलेले असल्याने या शब्दाने जाम हसू येते.

दुर्बोध कविता, नाटकं, इतर साहित्य याच्यावर अनेक धमाल विडंबने आहेत पुलंची. वेटिंग फॉर गोदोचा संदर्भ घेऊन "गोदूची वाट " हे ठळक उदाहरण. सुरुवातीलाच "वा! कुत्र्याची कॅरेक्टर कॉम्प्लेक्स झाली आहे" Lol

वा! कुत्र्याची कॅरेक्टर कॉम्प्लेक्स झाली आहे >>> Lol

बटाट्याची चाळ मधे "वरदाबाई उतरल्यावर विक्टोरिया युधिष्ठिराच्या रथासारखी चार बोटे वर आली" असा उल्लेख आहे. युधिष्ठिर नेहमी खरे बोलत असे त्यामुळे त्याचा रथ नेहमी जमिनीवर चार बोटे अधांतरी चालत असे असा काहीतरी संदर्भ महाभारतातील कथांमधे वाचला आहे. मग जेव्हा तो "नरो वा कुंजरो वा" म्हणतो तेव्हा तो रथ जमिनीवर येतो. अश्वत्थामा युद्धात मारला गेला असे द्रोणाचार्यांना सांगितले जाते व ते युधिष्ठिराला विचारतात (कारण तो सत्य बोलणारा असतो). पण तो "नरो वा कुंजरो वा" - माणूस की हत्ती ते माहीत नाही असे अर्धवट सांगतो. त्यामुळे त्याचा रथ जमिनीवर येतो.

इथे मात्र तो वरदाबाईंच्या वजनाने खाली आलेला असतो. त्या उतरल्यावर चार बोटे वर जातो असे आहे Happy

“ दुर्बोध कविता, नाटकं, इतर साहित्य याच्यावर अनेक धमाल विडंबने आहेत पुलंची. ” - ‘खुर्च्या’ हे ‘न-नाट्य‘ तर मास्टरपीस आहे ह्या कॅटेगरीत. चिराबाजारातला बर्फ, निमकराच्या खानावळीतली डुकराची तळलेली भजी, पोपच्या खालच्या दर्जाचे अधिकारी - न-नाट्यातली न-संपणारी यादी आहे

>>> पिपात मेले Lol

त्यांच्या एका भाषणात (याचा मसुदा क्रमिक पुस्तकात होता माझ्या बॅचला) केशवसुतांच्या ‘प्राप्तकाल हा विशाल भूधर, सुंदर लेणी तयात खोदा’ या ओळींचा नुसता उल्लेखच नव्हता, तर पुढे “‘लेणी खोदा’ म्हणतायत ते - ‘चित्रे रंगवा’ असं नाही म्हणत. हे दीर्घ परिश्रमांचं काम आहे” असं नेमकं रसग्रहणही होतं.

Pages