अमेरिकेच्या नॉर्थ करोलीना राज्यातील एका गावात घडलेली ही सत्य घटना.
डॉक्टर बेंजामिन गिल्मर यांनी वैद्यकीय अभ्यासक्रम संपवून नुकतीच पदवी प्राप्त केली होती. आता त्यांची ग्रामीण भागातील एका दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली. डॉक्टरांनी त्यांचे शिक्षण कर्ज काढून घेतलेले होते. आताच्या नोकरीवर रुजू झाल्यानंतर त्या कर्जाची परतफेड करण्यास ते उत्सुक होते. मोठ्या उत्साहात ते संबंधित दवाखान्यात जाण्यास निघाले. तिथे पोचल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण दवाखाना गेली चार वर्षे बंद केलेला होता. अधिक चौकशी करता त्यांना मिळालेली माहिती अजूनच थरारक व धक्कादायक होती.
चार वर्षांपूर्वी तो दवाखाना कोणी एक विन्स गिल्मर नावाचे डॉक्टर चालवत होते. सन २००४मध्ये त्यांनी चक्क स्वतःच्या वडिलांचा खून केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि आता ते ती भोगत होते. या घटनेनंतर सदर दवाखाना बंद होता. हे सर्व ऐकल्यावर डॉक्टर बेंजामिन पुरते चक्रावून गेले. आपलाच एक आडनावबंधू इतके क्रूर कृत्य कसा काय करू शकला या विचाराने त्यांना अस्वस्थ केले.
ते नोकरीत रुजू झाले आणि त्यांचे दैनंदिन कामकाज सुरू झाले. दवाखाना सुरू झाल्याची बातमी पंचक्रोशीत पसरली आणि लवकरच तेथे रुग्णांची गर्दी होऊ लागली. चार वर्षांपूर्वीची ती घटनाच भीषण असल्याने त्याचा गावात बराच बोलबाला झाला होता. आता डॉ. बेंजामिनकडे येणारे रुग्णही त्यांना आपण होऊन जुन्या डॉक्टरांच्याबद्दल बरच काही सांगू लागले. त्यांचे ते किस्से ऐकल्यावर बेंजामिनना अजूनच आश्चर्याचे धक्के बसले. विन्स हे अगदी दयाळू, प्रेमळ व उदार मनाचे होते. दवाखान्यात मन लावून झटून काम करण्याचा त्यांचा स्वभाव. रात्री-अपरात्री ते तपासणीसाठी रुग्णांच्या घरीदेखील जात. काही गरीब शेतकरी रुग्णांकडे डॉक्टरांची फी द्यायला पैसे नसायचे. तरीसुद्धा डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आणि अशा लोकांनी प्रेमाने दिलेला शेतावरचा वानवळा फी-स्वरूप स्वीकारत. मग असा दयाळू वृत्तीचा माणूस खुनी का झाला असावा, या प्रश्नाने बेंजामिन यांच्या डोक्यात थैमान घातले. ते त्यांना स्वस्थ बसू देईना. मग त्यांनी हे संपूर्ण प्रकरण खणून काढायचे ठरवले.
अधिक चौकशी करता त्यांना त्या गुन्ह्याची साद्यंत हकिकत समजली. त्याचा घटनाक्रम असा होता :
डॉक्टर विन्स यांनी त्यांच्या म्हाताऱ्या दुबळ्या झालेल्या वडिलांचा दोरीने गळा आवळून खून केला. एवढेच नाही तर त्यांनी त्या प्रेताची सर्व बोटे तोडली. नंतर ते प्रेत लांबवर नेऊन पुरून टाकले. या नीच कृत्यानंतर जसे काही घडलेच नाही अशा थाटात ते दवाखान्यात येऊन रोजचे काम करू लागले. पण अखेर खुनाला वाचा फुटली. परिणामी विन्सना पोलिसांनी अटक केली. त्यांचे वडील सिझोफ्रेनियाने ग्रस्त होते. नुकतेच त्यांना मानसोपचार निवासी केंद्रातून विन्सबरोबर घरी पाठवले होते. स्वतः डॉ. विन्स यांनाही नैराश्याने ग्रासलेले होते आणि त्यासाठी ते योग्य ती औषधे घेत होते. मात्र खुनाच्या घटनेच्या एक आठवड्यापूर्वी त्यांनी ती औषधे बंद केली होती. अशा कृतीचाही रुग्णावर दुष्परिणाम होतो. विन्स यांनाही आपल्या डोक्यात काहीतरी गडबड झाल्याचे जाणवू लागले आणि त्यांनी तसे त्यांच्या मित्रांना कळवले होते. तसेच या घटनेच्या सहा महिन्यांपूर्वी विन्सना एक कार अपघातही झाला होता. त्या अपघातात काही वेळापुरती
त्यांची शुद्ध हरपली होती.
पुढे विन्स यांच्याविरुद्ध खटला चालू झाला. त्यांनी वडिलांच्या खुनाची कबुली दिली. परंतु त्याचबरोबर आपण नैराश्याचे रुग्ण आहोत हा दावा केला. त्यांनी वडिलांवर असा आरोप केला की ते अनेक वर्षे आपला लैंगिक छळ करीत होते. पण त्यासाठी ते साक्षीपुरावे काही सादर करू शकले नाहीत. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध खुनाचे भरभक्कम पुरावे गोळा केले होतेच. आता न्यायालयापुढे हा प्रश्न होता, की त्यांनी ते कृत्य मानसिक रोगाच्या झटक्यात केले की काय ?
मग विन्सची मनोविकार तज्ञांकडून तपासणी झाली. तज्ञांच्या मते विन्स चक्क खोटारडेपणा करीत होते व त्यांची मनोवस्था ठीक होती.
एकंदरीत दोन्ही बाजूंचा विचार करून न्यायालयाने विन्सना जाणूनबुजून केलेल्या खुनाच्या कृत्यासाठी दोषी ठरवले आणि मरेपर्यंत कारावासाचीची शिक्षा सुनावली. तसेच या शिक्षेदरम्यान पॅरोलचा पर्याय ठेवला नाही. या आदेशानुसार त्यांची रवानगी व्हर्जिनियातील तुरुंगात झाली.
हा सर्व तपशील बेंजामीननी बारकाईने अभ्यासला. एकीकडे दवाखान्यातील जुने रुग्ण विन्स यांची भला माणूस म्हणून प्रशंसा करीत होते तर दुसरीकडे त्याच डॉक्टरनी केलेले हे भयानक कृत्य जगासमोर होते. यावर विचार करून बेंजामिन यांची मती गुंग झाली. परंतु एक प्रश्न राहून राहून त्यांचे डोके पोखरत होता. विन्स यांचे नैराश्य व त्यावरील उपचार आणि उपचार बंद केल्याचे परिणाम हे मुद्दे तर महत्त्वाचे होतेच. पण त्याच्या जोडीला विन्सना अन्य काही मेंदूविकार तर नसावा ना, अशी शंका त्यांना येऊ लागली.
दरम्यान अमेरिकी रेडिओवरील एका कार्यक्रमाचे निर्माते आणि पत्रकार या विन्स प्रकरणावर एक कार्यक्रम तयार करणार होते. त्यासाठी त्यांनी बेंजामिनना मुलाखतीसाठी विचारले. पण बेंजामिननी घाबरून नकार दिला. पण कालांतराने त्यांनी विचार बदलला आणि आपला होकार कळवला. त्यासाठीची पहिली पायरी होती ती म्हणजे विन्सची तुरुंगात प्रत्यक्ष भेट घेणे. मग बेंजामिननी विन्सना रीतसर पत्र लिहून परवानगी मागितली. ती मिळाली.
मग एके दिवशी ही डॉक्टर पत्रकार जोडी त्यांना भेटायला गेली. त्यांना पाहता क्षणी बेंजामिनना विलक्षण आश्चर्य वाटले. जेमतेम पन्नाशीचे असलेले विन्स आता अगदी जख्ख म्हातारे दिसत होते आणि पिंजऱ्यात बंद केलेल्या एखाद्या जनावरासारखी त्यांची अवस्था होती. हे पाहता बेंजामिनना मनापासून वाटले की या माणसाला नक्की काहीतरी मोठा आजार झालेला आहे. मग त्यांनी दुसऱ्या भेटीची वेळ ठरवली. यावेळेस त्यांनी बरोबर एका मनोविकारतज्ञांना नेले. त्यांनी बारकाईने निरीक्षण केल्यावर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली. विन्स चालताना आपले पाय जमिनीवर अक्षरशः फरफटत नेत होते (shuffling gait). या निरीक्षणावरून त्या डॉक्टरांनी Huntington disease (HD) या मेंदूविकाराची शक्यता व्यक्त केली. पण हे निदान करण्यासाठी काही महत्त्वाच्या तपासण्या करणे आवश्यक होते, जे तुरुंगात शक्य झाले नसते. अशा तऱ्हेने ही भेट निष्कर्षाविना संपली.
दरम्यान या प्रकरणाला एक कलाटणी मिळाली. तुरुंगात असताना विन्सनी तिथल्या अधिकाऱ्यांना, "आपण आत्महत्या करू" अशी वारंवार धमकी दिली. परिणामी त्यांना एका मनोरुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांच्या रीतसर तपासण्या झाल्या. त्यापैकी एक विशिष्ट जनुकीय चाचणी होती. या तपासण्यावरून HD चे निदान झाले. या जनुकीय आजारात मेंदूच्या काही महत्त्वाच्या पेशींचा वेगाने नाश होत राहतो. त्यामुळे रुग्णाच्या मेंदूकार्यात बिघाड होतो. त्याच्या वागण्यात अजब बदल होऊ लागतात आणि त्याची चालही बिघडते. टप्प्याटप्प्याने आजाराची तीव्रता वाढतच राहते. त्यातून रुग्णाला पंगुत्व येते. आजाराची सुरवात झाल्यानंतर सरासरी वीस वर्षांनी अशा रुग्णांचा मृत्यू होतो.
विन्सच्या आजाराची बातमी त्यांना सांगण्यात आली. ती ऐकल्यावर त्यांना हायसे वाटले. " चला, आपल्याला काय झालय ते तरी समजले !" असे ते आनंदाने उद्गारले. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांच्यावर पूर्वीचेच नैराश्यविरोधी उपचार सुरू केले. त्यातून ते थोडेफार सुधारले. अर्थातच पुन्हा त्यांची रवानगी तुरुंगात झाली. इथे त्यांना आपले उरलेसुरले आयुष्य काढायचे होते.
इथपर्यंतच्या या हकीकतीवर आधारित एक कार्यक्रम वर उल्लेखिलेल्या पत्रकारांनी तयार केला. 2013 मध्ये त्या कार्यक्रमाचे प्रसारण झाले. तिकडे बेंजामीन मात्र आतून अस्वस्थ होते. विन्सना संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढायचे होते आणि तिथे त्यांना नीट औषधोपचार मिळतील की नाही याची बेंजामिनना काळजी वाटली. नीट उपचारांअभावी ते असेच सडून मरू नयेत ही त्यांची इच्छा होती. विन्सच्या आजाराचे कारण पुढे करून त्यांची तुरुंगातून सुटका होऊ शकते का, यावर बेंजामीन गांभीर्याने विचार करू लागले.
विन्स घटनेवर आधारित रेडिओ कार्यक्रमामुळे संबंधित माहिती सर्वदूर पसरली. ती ऐकून अनेक स्वयंसेवक याप्रकरणी मोफत कायदेशीर सल्ला व मदत करण्यास तयार झाले. अशा लोकांनी एक समिती स्थापन केली. समितीच्या मते हा खटला विन्सच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर नव्याने लढवण्याची गरज होती. तसे झाल्यास न्यायाधीश विन्सना तुरुंगातून मुक्त करून एखाद्या निवासी मनोशुश्रुषा केंद्रात स्थलांतराची परवानगी देण्याची शक्यता होती. परंतु यावर विचारविनिमय करता समितीला त्यातील अडचणी लक्षात आल्या. खटला पुन्हा नव्याने चालवायचा झाल्यास तो दीर्घकाळ चालेल. विन्सना त्याचा मानसिक ताण कितपत सहन होईल अशी शंका समितीला वाटली. म्हणून तो बेत रद्द करण्यात आला. त्याऐवजी संबंधित राज्यपालांकडे दयेचा अर्ज (clemency) करून पाहण्याचे ठरले.
तो अर्ज दाखल झाला. राज्यपालांनी त्यावर विचार करण्यास बराच वेळ घेतला आणि 2017 मध्ये त्यांची कारकीर्द संपताना अर्ज नामंजूर केला. पुढे नवे राज्यपाल पदावर रुजू झाले. ते स्वतः मेंदूविकार तज्ञ आहेत. समितीने अर्ज नव्याने त्यांच्यापुढे ठेवला. या महोदयांनी सुद्धा चार वर्षे वेळ घेऊन 2021 मध्ये अर्ज नामंजूर केला. आता समितीवर हताश होण्याची पाळी आली होती. त्यांच्या कष्टांबरोबरच त्यांनी आतापर्यंत केलेल्या काही लाख डॉलर्सचा खर्च पाण्यात गेल्यासारखा होता !
दरम्यान बेंजामिन विन्सना तुरुंगात नियमित भेटत आणि धीर देत होते. एव्हाना त्या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. बेंजामिनना हा माणूस मुळात शांत व मवाळ प्रवृत्तीचा आहे असे अगदी आतून वाटू लागले. या प्रकरणामध्ये बेंजामिन भावनिकदृष्ट्या खूपच गुंतले होते. त्यांनी आतापर्यंत झालेल्या त्या सर्व घटनांचा आढावा घेणारे एक पुस्तक लिहिले. पुस्तकाच्या शेवटी मात्र त्यांनी आपण राज्यपालांच्या निर्णयामुळे खूप व्यथित झालो असल्याचे लिहिले. इथून पुढे तरी मनोरुग्णांच्या हातून घडणाऱ्या हिंसक कृत्यांबाबत वेगळ्या दृष्टिकोनातून विचार व्हावा अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आता त्या पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व प्रती संबंधित राज्यपालांच्या कार्यालयात देखील वाटण्यात आल्या. एवढे करून बेंजामिन स्वस्थ बसले.
दरम्यान 2022 उजाडले आणि 12 जानेवारी रोजी कुणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक एक आश्चर्य घडले. डॉक्टर असलेल्या राज्यपालांनी विचारांती त्यांचा पूर्वीचा निर्णय फिरवून विन्सना दयायाचना मंजूर केली ! त्यानुसार विन्सचा तुरुंगातून सुटकेचा मार्ग मोकळा झालेला आहे. पण अद्याप ते तुरुंगातच आहेत. समिती त्यांच्यासाठी योग्य त्या निवासी केंद्राच्या शोधात आहे. मध्यंतरीच्या कोविडपर्वामुळे अशा अनेक केंद्रांमध्ये पुरेशा रुग्णखाटा आणि काळजीवाहू लोकांचा तुटवडा निर्माण झालेला आहे.
डॉक्टर बेंजामिन कधीतरी मनाशी विचार करतात, की या सर्व प्रकरणात आपण काय गमावले आणि काय कमावले ? त्यांच्या वैयक्तिक कारकीर्दीची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली होती. त्यांनी आपले नियमित काम सांभाळून ही जी दगदग केली ती 'लष्कराच्या भाकरी' प्रकारात मोडणारी होती. त्यात गुंतवून घेतल्याने त्यांच्या व्यक्तिगत अर्थिक विकास आणि कुटुंबसौख्यावर दुष्परिणाम झाला. (किंबहुना त्यांच्या पत्नीने याबद्दल तक्रारही केली होती). हे झाले गमावलेले पारडे. पण ते जेव्हा कमावलेले पारडे बघतात तेव्हा त्यांना विलक्षण आत्मिक आनंद मिळतो. डॉ.विन्स गिल्मर जेव्हा तुरुंगातून खरोखर बाहेर येऊन एखाद्या निवासी मानसोपचार केंद्रात स्थिरावतील तेव्हा बेंजामिनना होणारा आनंद कल्पनातीत असेल.
…………
आता थोडा वैद्यकीय काथ्याकूट.
या प्रकरणातून वैद्यकीय तज्ञांपुढे काही प्रश्न उभे राहिलेत आणि त्या संदर्भात मतांतरे व्यक्त झाली आहेत.
१. एखाद्या रुग्णास निव्वळ HD आजार असेल तर तो इतका हिंसक होऊ शकतो का ? इथे दुमत आहे.
२. डॉ.विन्सच्या बाबतीत दोन शक्यता राहतात. विशिष्ट प्रकारची नैराश्यविरोधी औषधे चालू असताना देखील काही रुग्ण हिंसक होऊ शकतात. पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे, ही औषधे जर रुग्णाने अचानक बंद केली तर तो हिंसक होण्याचे प्रमाण बरेच वाढते.
मुळातच जर ते समाजविघातक प्रवृत्तीचे असतील तर मग इथे आगीत तेल असल्यासारखे झाले असावे. एखादा माणूस वरवर जरी कनवाळू वाटला तरी त्याच्या मनाचा थांग लागणे अवघड असते. त्यांनी केलेल्या नीच कृत्याची तीव्रता पाहता आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो.
३. HD हा त्यांचा आजार योगायोगाने लक्षात आलेला असू शकतो.
………
मनोरुग्णांनी केलेल्या खुनाबाबत कायद्याचा बघण्याचा दृष्टिकोन कसा वेगळा असतो हे जाणून घेण्यास उत्सुक. जाणकारांनी जरूर मत द्यावे.
(चित्रे जालावरून साभार)
डॉक्टर , नैराश्यसाठी नर्व्ह
डॉक्टर , नैराश्यसाठी नर्व्ह थेरपी हा काय प्रकार असतो/?
नैराश्यसाठी नर्व्ह थेरपी हा
नैराश्यसाठी नर्व्ह थेरपी हा काय प्रकार असतो/? >>>
नैराश्यासाठी पारंपरिक उपचार म्हणजे नैराश्यविरोधी गोळ्या आणि मानसोपचार. परंतु जे रुग्ण या दोन्ही उपायांना फारसे दाद देत नाहीत त्यांच्यासाठी हा उपचार गेल्या दोन-तीन दशकांपासून वापरला जातो.
Vagus ही आपल्या मेंदूमधून निघणारी एक महत्त्वाची चेतातंतू असते. तिला चेतवल्याने अशा रुग्णाच्या लक्षणांमध्ये काही प्रमाणात फरक पडतो असे दिसून आले आहे.
परंतु या विषयावरील संशोधन तसे मर्यादित आहे. जर्मनीमध्ये हा मान्यताप्राप्त उपचार आहे.
माहितीसाठी धन्यवाद डॉ.
माहितीसाठी धन्यवाद डॉ.
एक विचार करण्याजोगा लेख
एक विचार करण्याजोगा लेख :
शिरच्छेद, फाशी आणि आल्बेर काम्यूचा चिंतननामा’
https://www.aksharnama.com/client/article_detail/6036
गेल्या आठवड्यात अमेरिकेत
गेल्या आठवड्यात अमेरिकेत शालेय मुलांवर एका व्यक्तीने बेधुंद गोळीबार करून हत्याकांड केल्याची घटना घडली. या प्रकारच्या घटना जगभरात अधून-मधून घडत असतात.
यासंदर्भात संबंधित खुनी लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास होत असतो. समूह हत्याकांडाच्या एकूण घटनांपैकी किमान एक तृतीयांश घटनांमध्ये खुनी व्यक्ती गंभीर मनोविकारग्रस्त असल्याचे दिसते.
अर्थात हा विषय व्यापक असून त्याला इतर अनेक पैलू आहेत.
https://www.treatmentadvocacycenter.org/evidence-and-research/learn-more...
समाजाचं,देशाचं मानसिक आरोग्य
समाजाचं,देशाचं मानसिक आरोग्य सशक्त राहावे म्हणून च भक्ती सांगितली आहे.
कीर्तन,प्रवचन,धार्मिक कार्यक्रम हे मानसिक आरोग्य नीट ठेवू शकतात.
पण अर्धवट बुध्दी चे हुशार लोकांनी .
मुळावर च घाव घालून..देव नाही,संस्कृती चुकीची आहे .
असे अनेक फालतू दावे करून त्याचा प्रचार केला.
लोकांचे मानसिक आरोग्य ठीक राहावे म्हणून योग्य राहणीमान कसे असावे ह्याचा अभ्यास केला तर परत.प्राचीन संस्कृती मध्येच त्याचे उत्तर सापडेल.
कुमारसर,
कुमारसर,
दुर्दैवाने ती शाळा आमच्यापासून फार दूर नाही, अतिशय अस्वस्थ करणारी बातमी आहे. त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया, पोलिसांना पोचायला झालेला उशीर, त्या मनोरुग्ण मुलाचं वयं, चुकून उघडे राहीलेले मागचे दार, जीव गलबलून येतोय. पोलीसांना तयारीला वेळ लागला म्हणे, ते चिमणेचिमणे लेकरं तिथं रक्ताच्या थारोळ्यात पडताहेत आणि हे सव्वा तास 'तयारी' करताहेत, फार चिडचिड होतेय.
बहुतांश अमेरिकन जनता बंदुकांबाबत अती दुराग्रही आहे, केवळ तो अजेंडा रेटण्यासाठी/या प्रकरणावर धूळ बसेपर्यंत ते 'मेन्टल हेल्थ' म्हणून गळे काढतील. खरंतर जगातल्या प्रत्येकाचे मानसिक आरोग्य सुधारत बसणे अशक्य आहे, त्या पेक्षा गन्स सहज उपलब्ध न ठेवणे तारतम्याचे आणि तातडीचे सुद्धा आहे.
हे मनुष्यजातीचे कलेक्टीव्ह फेल्युअर आहे, ह्या दुर्दैवी घटनेचे अनेक पैलू आहेत. हे पुन्हा पुन्हा होत रहाणार आहे आणि आपल्याला हे षंढ मनाने पुन्हापुन्हा बघत रहावे लागणार आहे.
अस्मिता
अस्मिता
पूर्ण सहमत आहे .
एखादी घटना आपल्या घराजवळ घडली की त्यामुळे येणारी अस्वस्थता भयंकर असते.
असो
बंदुका दोषी नाहीत.
बंदुका दोषी नाहीत.
मानसिक वैफल्य ग्रस्त लोकांची संख्या वाढत आहे.
बंदूक नसती तर चाकू,तलवार,कुऱ्हाड,ही हत्यार वापरली असती
ही पण उपलब्ध नसती तर दगड वापरला असता हत्या करण्यासाठी.
जबरदस्त स्पर्धा,विस्कळीत कुटुंब व्यवस्था,संस्कार चा अभाव, अंधारमय भविष्य.
ह्या मुळे आर्थिक सुबत्ता असली तरी तरुण पिढी वैफल्य ग्रस्त होत आहे..
त्याच मानसिकतेतून ही कृत्य होतात .ज्या मुलाने २०,२२ लोकांचे जीव घेतले त्याला त्याचा बिलकुल पध्छताप पण होत नसेल.
समाजाबद्दल तीव्र द्वेष त्याच्या मनात असणार.
ह्याचे उत्तर सोपे नाही.
संवाद आता राहिला नाही.
कुटुंब विस्कळीत आहेत.
आई,वडील म्हणून ज्यांची ओळख झाली ते आई वडील पण बदलत आहेत.
कोणाची आई दुसरे लग्न करते तर कोणाचा बाप.
ह्याचा खूप विपरीत परिणाम मुलांच्या मनावर होत आहे.
भारतीय कुटुंब व्यवस्था ही आदर्श सिस्टीम आहे..त्या सिस्टीम मध्ये सर्व स्तरातील लोक सुरक्षित आहेत.
आता एक दोन अशी हत्याकांड होत आहेत पुढे ती वाढली तर आश्चर्य मला तरी वाटणार नाहीं
माणूस मानसिक रोगी आहे हे कसे
माणूस मानसिक रोगी आहे हे कसे समजावे.
मेंदू मध्ये काय रासायनिक बदल होतो.. कोणत्या रसायनाच्या प्रमाण बिघडल्या मुळे व्यक्ती हिंसक होतो .
ह्याची शास्त्रीय कारणे फक्त त्या स्थिती मध्ये तो व्यक्ती आहे का?
मानसिक रोगी आहे का,?
हे सिध्द करण्यासाठी योग्य आहेत..
. प्रश्न हा आहे dr कुमार ह्यांना.
१) जसे दारू,सिगारेट मुळे काही कॅन्सर होण्याची शक्यता असते ..
जीन मध्ये बदल म्हणजे कॅन्सर ही व्याख्या कॅन्सर ची आहेच
जीन मध्ये(dna, RNA) जे काही असेल ते त्या मध्ये बिघाड झाल्यावर च पेशी चे वर्तन बदलते
मधुमेह पण त्याच प्रकारातील
ही फक्त उदाहरणे माझा मुद्धा समजण्यासाठी.
तसे मानसिक विकार निर्माण होण्यासाठी ज्या रसायनांचा ,हार्मोन्सचा balance बिघडणे गरजेचे असते .
शरीरावर नियंत्रण ठेवणारे जीन्स,dna ह्यांच्या कार्यात बिघाड होणे गरजेचे असते ..
त्याला कारणे काय?
सतत मानसिक दबाव.
सतत भीती
कोणता तरी न आवडणारा प्रसंग.
किंवा प्रचंड अन्याय..
ह्या मुळे होणारा मानसिक त्रास आणि त्याचा परिणाम म्हणून मेंदूत रासायनिक बदल आणि पुढे मानसिक रोग .
असे समीकरण मांडले तर तर ते शास्त्रीय व्याख्येत बसेल का?
जन्मजात मानसिक विकार हा अपवाद समजावा.
बंदुका दोषी नाहीत.
बंदुका दोषी नाहीत.
मानसिक वैफल्य ग्रस्त लोकांची संख्या वाढत आहे.
बंदूक नसती तर चाकू,तलवार,कुऱ्हाड,ही हत्यार वापरली असती
ही पण उपलब्ध नसती तर दगड वापरला असता हत्या करण्यासाठी.>>
हे मान्य आहेच. पण आता विचार करा की त्या व्यक्तीला AR-15 ही अत्याधुनिक संहारक बंदूक अतिशय सहजपणे १८ वर्ष पूर्ण झाल्याचे दाखवून legally खरेदी करता आली. त्याबरोबर शेकडो ammunition rounds खरेदी करता आल्या. या तरूणाला याची काय गरज आहे असा साधा प्रश्नही दुकानदाराच्या मनात आला नाही. ही बंदूक हे asaault weapon आहे. यातून असंख्य गोळ्या सुटतात एका वेळी. यातून निघालेली गोळी शरीरात घुसली की आत फुटून चिंधड्या उडवते. त्या १९ मुलांच्या शरीराच्या चिन्धड्या झाल्या होत्या, देह इतके छिन्नविछिन्न होते की डीएनए घेऊन ओळख पटवावी लागली. त्या व्यक्तीने समजा दगड, चाकू, कुर्हाड वापरली असती तर इतका संहार झाला असता का? Mental health वर इलाज होणे गरजेचे आहेच पण ज्या संहारक शस्त्राची सैनिक सोडून सामान्य नागरिकांना अजिबातच गरज नाही अशा शस्त्रांवर बंदी घालणे सयुक्तिक नाही का? नाहीतर आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा प्रकार जो आधीच होत आहेच तो तसाच चालू राहील.
नाहीतर आग रामेश्वरी आणि बंब
नाहीतर आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा प्रकार जो आधीच होत आहेच
>> +११
योग्य मुद्दा.
मानसिक वैफल्यग्रस्त लोकांची
मानसिक वैफल्यग्रस्त लोकांची संख्या वाढत आहे. >>>> +१११११
मागचे प्रकरण थंड होत नाही तर अजून एक घटना ओकलाहोमा राज्यात घडलेली आहे.
Michael Lewis या व्यक्तीने AR-15 अशी संहारक बंदुक वापरून दोन डॉक्टर्स व रूग्णालयातील अन्य दोघेजण यांची हत्या केली आणि लगेच आत्महत्या केली.
दोन डॉक्टरपैकी एक सर्जन होते आणि त्यांनी Michael Lewis ची नुकतीच शस्त्रक्रिया केली होती. त्यानंतर त्याची पाठदुखीची तक्रार होती. निव्वळ एवढ्यावरून त्याने इतके भयंकर कृत्य करावे ?....
लेखात वर्णन केलेल्या घटनेच्या
लेखात वर्णन केलेल्या घटनेच्या बरोबर विरुद्ध प्रकारची घटना इथे आहे :
https://globalnews.ca/news/8906775/prescription-drug-overdiagnosis-aware...
एका गृहस्थांना नैराश्यविरोधी औषधे चालू होती. त्याच्या प्रभावाखाली त्यांनी स्वतःच्या मुलाचा खून केला.
आता ते जनजागृती दौरा करीत असतात.
रात्र आरंभ आठवला.
रात्र आरंभ आठवला.
रात्र आरंभ आठवला. >>>
रात्र आरंभ आठवला. >>>
पाहिल्याचे आठवत नाही.
त्या भूमिकांचा दिलीप प्रभावळकर यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला दिसतोय.
आज जपानच्या माजी
आज जपानच्या माजी पंतप्रधानांचे बंदुकीच्या गोळीबारामुळे निधन झाले.
आदरांजली !
त्यासंदर्भात जपान मधील बंदूक धोरण आणि गुन्हेगारी संदर्भातील एक माहितीपूर्ण लेख :
https://edition.cnn.com/2022/07/08/asia/japan-gun-laws-abe-shooting-intl...
वास्तविक जपानमध्ये असे गुन्हे अत्यल्प आहेत
>>>>>वास्तविक जपानमध्ये असे
>>>>>वास्तविक जपानमध्ये असे गुन्हे अत्यल्प आहेत>>>
+११
धक्कादायक आहे. हल्लेखोर नेव्हीत होता .
>>>>>वास्तविक जपानमध्ये असे
>>>>>वास्तविक जपानमध्ये असे गुन्हे अत्यल्प आहेत>>>
+११
धक्कादायक आहे. हल्लेखोर नेव्हीत होता .
Dr.Ralph Newman हे मनोविकार
Dr.Ralph Newman हे मनोविकार तज्ञ तुरुंगातील कैद्यांवर उपचार करतात. त्यांना एका जीवघेण्या हल्याला नुकतेच सामोरे जावे लागले.
नॉर्थ करोलीना येथील एका तुरुंगातील कैद्याला पॅरोलवर सोडायचे की नाही हे ठरवायचे होते. त्यासाठी डॉक्टर न्यूमन यांचे वैद्यकीय मत घेण्यात आले. त्यांच्या मते तो कैदी बाहेर पाठव ण्यास योग्य नव्हता. परिणामी त्याचा पॅरोल नाकारला गेला. मात्र तो कैदी त्यानंतर सतत डॉक्टरांचा सूड घेण्याची संधी शोधत होता.
एकदा ते त्यांच्या खोलीत रुग्णांची टिपणी लिहीत बसले होते. तेव्हा या कैद्याने तेल तिथल्या मायक्रोवेव्हमध्ये गरम केले आणि ते कढत तेल घेऊन तो त्यांच्या खोलीत घुसला आणि त्याने डॉक्टरांच्या पाठीवरती तेल फेकले.
डॉक्टरांना जबरदस्त जखमा झाल्या. त्यानंतर दोन महिन्यांनी ते त्यातून सावरले.
तुरुंगात काम करणाऱ्या डॉक्टरांना फार सावधगिरी बाळगावी लागते
जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी ,
जगभरातील कोट्यवधी लोकांसाठी , दीर्घ काळातील अंधकारमय विचार आणि जाचक भावनांपासून मुक्ती गोळ्याच्या स्वरूपात येते, प्रत्येक डोसने सेरोटोनिन नावाच्या नम्र न्यूरोट्रांसमीटरचे संतुलन तुलनेने नियंत्रणात राहते याची खात्री करण्यासाठी थोडासा प्रयत्न केला जातो.
मूड डिसऑर्डरवर उपचार म्हणून त्यांची लोकप्रियता असूनही, अँटीडिप्रेसंट फार्मास्युटिकल्समागील बरीच यंत्रणा संपूर्ण ब्लॅक बॉक्स आहे. कमी मूडवर उपचार करण्यासाठी ते कसे कार्य करतात याचा आम्ही फक्त अंदाज लावू शकतो.
आणखी धक्कादायक, हे अंदाज पूर्णपणे चुकीचे असू शकतात, ज्यामुळे नैराश्य खरंच सेरोटोनिनमध्ये लक्षणीय घट झाल्यामुळे होते का असा प्रश्न पडतो.
देहान्ताच्या शिक्षेचा अंत
देहान्ताच्या शिक्षेचा अंत?
https://maharashtratimes.com/editorial/dhavte-jag/will-the-death-penalty...
ऋषी मल्होत्रा यांनी २०१७ मध्ये ‘फाशीची शिक्षा’ क्रूर आणि त्यामुळे घटनाबाह्य असल्याचा दावा करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात केली होती. ती आता घटनापीठासमोर सुनावणीला आली आहे.
देहांतची शिक्षा.
देहांतची शिक्षा.
Encounter ही कोर्ट शी संबंधित नसलेली देहांत ची शिक्षा च आहे.
२) माणसाचे आयुष्य खरे तर ६० वर्ष च त्या मध्ये वीस वर्ष कारावास ची शिक्षा १८ वर्ष वयानंतर झाली तर ती फाशी पेक्षा भयानक आहे.
३) चुकीचे आरोप, चुकीचा कोर्ट निर्णय ह्या मुळे जर १ महिना जरी जेल मध्ये निर्दोष व्यक्ती ल जावं लागलं तर.
आरोप करणारा, ह्याचे हातपाय तोडून जंगलात सोडून देण्यावर कोर्टाने विचार करावा.
आरोपी चा गुन्हा खरेच गंभीर असेल तर फाशी हवीच.
पण आरोप चुकीचा असेल आणि ते लक्षात आले तर हातपाय तोडून जंगलात आरोप करणाऱ्या स्त्री पुरुषाला सोडणे ही तरतूद हवीच
फाशीची शिक्षा हवीच ह्या
फाशीची शिक्षा हवीच ह्या पलीकडे सांगेन हाल हाल करून त्या व्यक्ती ला मृत्यू पर्यंत पोचवले पाहिजे.
ह्या वर काही आक्षेप नाही
पण खोटे आरोप ,खोटे आरोप आहेत हे माहीत असून वकिली करणारे वकील,
ह्यांच्या मुळे जर निरपराध व्यक्ती ला शिक्षा झाली .
तर मात्र.
आरोप करणारी व्यक्ती,बाजू मांडणारे वकील,
ह्यांस दोन वर्ष तरी मरण यातना होवून मृत्यू येईल अशी शिक्षा हवी
गेल्या शतकात अमेरिकेत डॉ. एच
गेल्या शतकात अमेरिकेत डॉ. एच एच होम्स या डॉक्टरने सलग 27 खून केलेले होते. शेवटी त्याला मृत्यूदंड देण्यात आला. त्याच्या या अघोरी कृष्णकृत्यांवर आधारित
'रक्तपिपासू डॉक्टर'
हे पुस्तक मेनका प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले आहे :
https://www.loksatta.com/lokrang/book-review-marathi-crime-novels-marath...
12 जानेवारी 2022 रोजी
अद्यतन :
12 जानेवारी 2022 रोजी विन्स गिल्मरच्या तुरुंगातून मुक्ततेचा आदेश निघाला होता.
पण ..
मार्च 2023 पर्यन्त त्यांची तुरुंगातून सुटका झालेली नाही.
डॉक्टर बेंजामिन अमेरिकेतील अनेक रुग्णालयांना सातत्याने विनंती करीत आहेत की त्यांनी या रोगी माणसाला स्वीकारावे. परंतु अद्याप त्यांना त्यात यश आलेले नाही. सर्वत्र नकारघंटाच ऐकू येते आहे..
https://www.theassemblync.com/politics/criminal-justice/the-ongoing-case...
देहांताच्या शिक्षेवर इथे
देहांताच्या शिक्षेवर इथे चर्चा झालेली असल्यामुळे खालील बातमीचा संदर्भ देतो :
https://www.lokmat.com/editorial/a-safe-quick-execution-using-nitrogen-n...
अमेरिकेतील अलाबामा राज्यात एका गुन्हेगाराला श्वसनातून नायट्रोजन देऊन मृत्युदंड देण्यात आला. यावर युरोप आणि अमेरिकेत बराच वादंग झाला आहे.
बापरे! क्रूर आहे हे!
बापरे! क्रूर आहे हे!
भयानक क्रूरता व न्यायदान
भयानक क्रूरता व न्यायदान
अमेरिकेतील पेनसिलवानियातील एका नर्सला 17 रुग्णांना इन्सुलिनचे इंजेक्शन घातक डोसमध्ये देऊन ठार मारल्याबद्दल प्रचंड मोठ्या जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे :
https://www.news18.com/world/pennsylvania-nurse-jailed-for-380-760-years...
विचारांना चालना देणारा चांगला
विचारांना चालना देणारा चांगला लेख आहे. असे मानवी क्रौर्य पाहून थरकाप होतो.
Pages