अमेरिकेच्या नॉर्थ करोलीना राज्यातील एका गावात घडलेली ही सत्य घटना.
डॉक्टर बेंजामिन गिल्मर यांनी वैद्यकीय अभ्यासक्रम संपवून नुकतीच पदवी प्राप्त केली होती. आता त्यांची ग्रामीण भागातील एका दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली. डॉक्टरांनी त्यांचे शिक्षण कर्ज काढून घेतलेले होते. आताच्या नोकरीवर रुजू झाल्यानंतर त्या कर्जाची परतफेड करण्यास ते उत्सुक होते. मोठ्या उत्साहात ते संबंधित दवाखान्यात जाण्यास निघाले. तिथे पोचल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण दवाखाना गेली चार वर्षे बंद केलेला होता. अधिक चौकशी करता त्यांना मिळालेली माहिती अजूनच थरारक व धक्कादायक होती.
चार वर्षांपूर्वी तो दवाखाना कोणी एक विन्स गिल्मर नावाचे डॉक्टर चालवत होते. सन २००४मध्ये त्यांनी चक्क स्वतःच्या वडिलांचा खून केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि आता ते ती भोगत होते. या घटनेनंतर सदर दवाखाना बंद होता. हे सर्व ऐकल्यावर डॉक्टर बेंजामिन पुरते चक्रावून गेले. आपलाच एक आडनावबंधू इतके क्रूर कृत्य कसा काय करू शकला या विचाराने त्यांना अस्वस्थ केले.
ते नोकरीत रुजू झाले आणि त्यांचे दैनंदिन कामकाज सुरू झाले. दवाखाना सुरू झाल्याची बातमी पंचक्रोशीत पसरली आणि लवकरच तेथे रुग्णांची गर्दी होऊ लागली. चार वर्षांपूर्वीची ती घटनाच भीषण असल्याने त्याचा गावात बराच बोलबाला झाला होता. आता डॉ. बेंजामिनकडे येणारे रुग्णही त्यांना आपण होऊन जुन्या डॉक्टरांच्याबद्दल बरच काही सांगू लागले. त्यांचे ते किस्से ऐकल्यावर बेंजामिनना अजूनच आश्चर्याचे धक्के बसले. विन्स हे अगदी दयाळू, प्रेमळ व उदार मनाचे होते. दवाखान्यात मन लावून झटून काम करण्याचा त्यांचा स्वभाव. रात्री-अपरात्री ते तपासणीसाठी रुग्णांच्या घरीदेखील जात. काही गरीब शेतकरी रुग्णांकडे डॉक्टरांची फी द्यायला पैसे नसायचे. तरीसुद्धा डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आणि अशा लोकांनी प्रेमाने दिलेला शेतावरचा वानवळा फी-स्वरूप स्वीकारत. मग असा दयाळू वृत्तीचा माणूस खुनी का झाला असावा, या प्रश्नाने बेंजामिन यांच्या डोक्यात थैमान घातले. ते त्यांना स्वस्थ बसू देईना. मग त्यांनी हे संपूर्ण प्रकरण खणून काढायचे ठरवले.
अधिक चौकशी करता त्यांना त्या गुन्ह्याची साद्यंत हकिकत समजली. त्याचा घटनाक्रम असा होता :
डॉक्टर विन्स यांनी त्यांच्या म्हाताऱ्या दुबळ्या झालेल्या वडिलांचा दोरीने गळा आवळून खून केला. एवढेच नाही तर त्यांनी त्या प्रेताची सर्व बोटे तोडली. नंतर ते प्रेत लांबवर नेऊन पुरून टाकले. या नीच कृत्यानंतर जसे काही घडलेच नाही अशा थाटात ते दवाखान्यात येऊन रोजचे काम करू लागले. पण अखेर खुनाला वाचा फुटली. परिणामी विन्सना पोलिसांनी अटक केली. त्यांचे वडील सिझोफ्रेनियाने ग्रस्त होते. नुकतेच त्यांना मानसोपचार निवासी केंद्रातून विन्सबरोबर घरी पाठवले होते. स्वतः डॉ. विन्स यांनाही नैराश्याने ग्रासलेले होते आणि त्यासाठी ते योग्य ती औषधे घेत होते. मात्र खुनाच्या घटनेच्या एक आठवड्यापूर्वी त्यांनी ती औषधे बंद केली होती. अशा कृतीचाही रुग्णावर दुष्परिणाम होतो. विन्स यांनाही आपल्या डोक्यात काहीतरी गडबड झाल्याचे जाणवू लागले आणि त्यांनी तसे त्यांच्या मित्रांना कळवले होते. तसेच या घटनेच्या सहा महिन्यांपूर्वी विन्सना एक कार अपघातही झाला होता. त्या अपघातात काही वेळापुरती
त्यांची शुद्ध हरपली होती.
पुढे विन्स यांच्याविरुद्ध खटला चालू झाला. त्यांनी वडिलांच्या खुनाची कबुली दिली. परंतु त्याचबरोबर आपण नैराश्याचे रुग्ण आहोत हा दावा केला. त्यांनी वडिलांवर असा आरोप केला की ते अनेक वर्षे आपला लैंगिक छळ करीत होते. पण त्यासाठी ते साक्षीपुरावे काही सादर करू शकले नाहीत. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध खुनाचे भरभक्कम पुरावे गोळा केले होतेच. आता न्यायालयापुढे हा प्रश्न होता, की त्यांनी ते कृत्य मानसिक रोगाच्या झटक्यात केले की काय ?
मग विन्सची मनोविकार तज्ञांकडून तपासणी झाली. तज्ञांच्या मते विन्स चक्क खोटारडेपणा करीत होते व त्यांची मनोवस्था ठीक होती.
एकंदरीत दोन्ही बाजूंचा विचार करून न्यायालयाने विन्सना जाणूनबुजून केलेल्या खुनाच्या कृत्यासाठी दोषी ठरवले आणि मरेपर्यंत कारावासाचीची शिक्षा सुनावली. तसेच या शिक्षेदरम्यान पॅरोलचा पर्याय ठेवला नाही. या आदेशानुसार त्यांची रवानगी व्हर्जिनियातील तुरुंगात झाली.
हा सर्व तपशील बेंजामीननी बारकाईने अभ्यासला. एकीकडे दवाखान्यातील जुने रुग्ण विन्स यांची भला माणूस म्हणून प्रशंसा करीत होते तर दुसरीकडे त्याच डॉक्टरनी केलेले हे भयानक कृत्य जगासमोर होते. यावर विचार करून बेंजामिन यांची मती गुंग झाली. परंतु एक प्रश्न राहून राहून त्यांचे डोके पोखरत होता. विन्स यांचे नैराश्य व त्यावरील उपचार आणि उपचार बंद केल्याचे परिणाम हे मुद्दे तर महत्त्वाचे होतेच. पण त्याच्या जोडीला विन्सना अन्य काही मेंदूविकार तर नसावा ना, अशी शंका त्यांना येऊ लागली.
दरम्यान अमेरिकी रेडिओवरील एका कार्यक्रमाचे निर्माते आणि पत्रकार या विन्स प्रकरणावर एक कार्यक्रम तयार करणार होते. त्यासाठी त्यांनी बेंजामिनना मुलाखतीसाठी विचारले. पण बेंजामिननी घाबरून नकार दिला. पण कालांतराने त्यांनी विचार बदलला आणि आपला होकार कळवला. त्यासाठीची पहिली पायरी होती ती म्हणजे विन्सची तुरुंगात प्रत्यक्ष भेट घेणे. मग बेंजामिननी विन्सना रीतसर पत्र लिहून परवानगी मागितली. ती मिळाली.
मग एके दिवशी ही डॉक्टर पत्रकार जोडी त्यांना भेटायला गेली. त्यांना पाहता क्षणी बेंजामिनना विलक्षण आश्चर्य वाटले. जेमतेम पन्नाशीचे असलेले विन्स आता अगदी जख्ख म्हातारे दिसत होते आणि पिंजऱ्यात बंद केलेल्या एखाद्या जनावरासारखी त्यांची अवस्था होती. हे पाहता बेंजामिनना मनापासून वाटले की या माणसाला नक्की काहीतरी मोठा आजार झालेला आहे. मग त्यांनी दुसऱ्या भेटीची वेळ ठरवली. यावेळेस त्यांनी बरोबर एका मनोविकारतज्ञांना नेले. त्यांनी बारकाईने निरीक्षण केल्यावर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली. विन्स चालताना आपले पाय जमिनीवर अक्षरशः फरफटत नेत होते (shuffling gait). या निरीक्षणावरून त्या डॉक्टरांनी Huntington disease (HD) या मेंदूविकाराची शक्यता व्यक्त केली. पण हे निदान करण्यासाठी काही महत्त्वाच्या तपासण्या करणे आवश्यक होते, जे तुरुंगात शक्य झाले नसते. अशा तऱ्हेने ही भेट निष्कर्षाविना संपली.
दरम्यान या प्रकरणाला एक कलाटणी मिळाली. तुरुंगात असताना विन्सनी तिथल्या अधिकाऱ्यांना, "आपण आत्महत्या करू" अशी वारंवार धमकी दिली. परिणामी त्यांना एका मनोरुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांच्या रीतसर तपासण्या झाल्या. त्यापैकी एक विशिष्ट जनुकीय चाचणी होती. या तपासण्यावरून HD चे निदान झाले. या जनुकीय आजारात मेंदूच्या काही महत्त्वाच्या पेशींचा वेगाने नाश होत राहतो. त्यामुळे रुग्णाच्या मेंदूकार्यात बिघाड होतो. त्याच्या वागण्यात अजब बदल होऊ लागतात आणि त्याची चालही बिघडते. टप्प्याटप्प्याने आजाराची तीव्रता वाढतच राहते. त्यातून रुग्णाला पंगुत्व येते. आजाराची सुरवात झाल्यानंतर सरासरी वीस वर्षांनी अशा रुग्णांचा मृत्यू होतो.
विन्सच्या आजाराची बातमी त्यांना सांगण्यात आली. ती ऐकल्यावर त्यांना हायसे वाटले. " चला, आपल्याला काय झालय ते तरी समजले !" असे ते आनंदाने उद्गारले. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांच्यावर पूर्वीचेच नैराश्यविरोधी उपचार सुरू केले. त्यातून ते थोडेफार सुधारले. अर्थातच पुन्हा त्यांची रवानगी तुरुंगात झाली. इथे त्यांना आपले उरलेसुरले आयुष्य काढायचे होते.
इथपर्यंतच्या या हकीकतीवर आधारित एक कार्यक्रम वर उल्लेखिलेल्या पत्रकारांनी तयार केला. 2013 मध्ये त्या कार्यक्रमाचे प्रसारण झाले. तिकडे बेंजामीन मात्र आतून अस्वस्थ होते. विन्सना संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढायचे होते आणि तिथे त्यांना नीट औषधोपचार मिळतील की नाही याची बेंजामिनना काळजी वाटली. नीट उपचारांअभावी ते असेच सडून मरू नयेत ही त्यांची इच्छा होती. विन्सच्या आजाराचे कारण पुढे करून त्यांची तुरुंगातून सुटका होऊ शकते का, यावर बेंजामीन गांभीर्याने विचार करू लागले.
विन्स घटनेवर आधारित रेडिओ कार्यक्रमामुळे संबंधित माहिती सर्वदूर पसरली. ती ऐकून अनेक स्वयंसेवक याप्रकरणी मोफत कायदेशीर सल्ला व मदत करण्यास तयार झाले. अशा लोकांनी एक समिती स्थापन केली. समितीच्या मते हा खटला विन्सच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर नव्याने लढवण्याची गरज होती. तसे झाल्यास न्यायाधीश विन्सना तुरुंगातून मुक्त करून एखाद्या निवासी मनोशुश्रुषा केंद्रात स्थलांतराची परवानगी देण्याची शक्यता होती. परंतु यावर विचारविनिमय करता समितीला त्यातील अडचणी लक्षात आल्या. खटला पुन्हा नव्याने चालवायचा झाल्यास तो दीर्घकाळ चालेल. विन्सना त्याचा मानसिक ताण कितपत सहन होईल अशी शंका समितीला वाटली. म्हणून तो बेत रद्द करण्यात आला. त्याऐवजी संबंधित राज्यपालांकडे दयेचा अर्ज (clemency) करून पाहण्याचे ठरले.
तो अर्ज दाखल झाला. राज्यपालांनी त्यावर विचार करण्यास बराच वेळ घेतला आणि 2017 मध्ये त्यांची कारकीर्द संपताना अर्ज नामंजूर केला. पुढे नवे राज्यपाल पदावर रुजू झाले. ते स्वतः मेंदूविकार तज्ञ आहेत. समितीने अर्ज नव्याने त्यांच्यापुढे ठेवला. या महोदयांनी सुद्धा चार वर्षे वेळ घेऊन 2021 मध्ये अर्ज नामंजूर केला. आता समितीवर हताश होण्याची पाळी आली होती. त्यांच्या कष्टांबरोबरच त्यांनी आतापर्यंत केलेल्या काही लाख डॉलर्सचा खर्च पाण्यात गेल्यासारखा होता !
दरम्यान बेंजामिन विन्सना तुरुंगात नियमित भेटत आणि धीर देत होते. एव्हाना त्या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. बेंजामिनना हा माणूस मुळात शांत व मवाळ प्रवृत्तीचा आहे असे अगदी आतून वाटू लागले. या प्रकरणामध्ये बेंजामिन भावनिकदृष्ट्या खूपच गुंतले होते. त्यांनी आतापर्यंत झालेल्या त्या सर्व घटनांचा आढावा घेणारे एक पुस्तक लिहिले. पुस्तकाच्या शेवटी मात्र त्यांनी आपण राज्यपालांच्या निर्णयामुळे खूप व्यथित झालो असल्याचे लिहिले. इथून पुढे तरी मनोरुग्णांच्या हातून घडणाऱ्या हिंसक कृत्यांबाबत वेगळ्या दृष्टिकोनातून विचार व्हावा अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आता त्या पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व प्रती संबंधित राज्यपालांच्या कार्यालयात देखील वाटण्यात आल्या. एवढे करून बेंजामिन स्वस्थ बसले.
दरम्यान 2022 उजाडले आणि 12 जानेवारी रोजी कुणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक एक आश्चर्य घडले. डॉक्टर असलेल्या राज्यपालांनी विचारांती त्यांचा पूर्वीचा निर्णय फिरवून विन्सना दयायाचना मंजूर केली ! त्यानुसार विन्सचा तुरुंगातून सुटकेचा मार्ग मोकळा झालेला आहे. पण अद्याप ते तुरुंगातच आहेत. समिती त्यांच्यासाठी योग्य त्या निवासी केंद्राच्या शोधात आहे. मध्यंतरीच्या कोविडपर्वामुळे अशा अनेक केंद्रांमध्ये पुरेशा रुग्णखाटा आणि काळजीवाहू लोकांचा तुटवडा निर्माण झालेला आहे.
डॉक्टर बेंजामिन कधीतरी मनाशी विचार करतात, की या सर्व प्रकरणात आपण काय गमावले आणि काय कमावले ? त्यांच्या वैयक्तिक कारकीर्दीची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली होती. त्यांनी आपले नियमित काम सांभाळून ही जी दगदग केली ती 'लष्कराच्या भाकरी' प्रकारात मोडणारी होती. त्यात गुंतवून घेतल्याने त्यांच्या व्यक्तिगत अर्थिक विकास आणि कुटुंबसौख्यावर दुष्परिणाम झाला. (किंबहुना त्यांच्या पत्नीने याबद्दल तक्रारही केली होती). हे झाले गमावलेले पारडे. पण ते जेव्हा कमावलेले पारडे बघतात तेव्हा त्यांना विलक्षण आत्मिक आनंद मिळतो. डॉ.विन्स गिल्मर जेव्हा तुरुंगातून खरोखर बाहेर येऊन एखाद्या निवासी मानसोपचार केंद्रात स्थिरावतील तेव्हा बेंजामिनना होणारा आनंद कल्पनातीत असेल.
…………
आता थोडा वैद्यकीय काथ्याकूट.
या प्रकरणातून वैद्यकीय तज्ञांपुढे काही प्रश्न उभे राहिलेत आणि त्या संदर्भात मतांतरे व्यक्त झाली आहेत.
१. एखाद्या रुग्णास निव्वळ HD आजार असेल तर तो इतका हिंसक होऊ शकतो का ? इथे दुमत आहे.
२. डॉ.विन्सच्या बाबतीत दोन शक्यता राहतात. विशिष्ट प्रकारची नैराश्यविरोधी औषधे चालू असताना देखील काही रुग्ण हिंसक होऊ शकतात. पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे, ही औषधे जर रुग्णाने अचानक बंद केली तर तो हिंसक होण्याचे प्रमाण बरेच वाढते.
मुळातच जर ते समाजविघातक प्रवृत्तीचे असतील तर मग इथे आगीत तेल असल्यासारखे झाले असावे. एखादा माणूस वरवर जरी कनवाळू वाटला तरी त्याच्या मनाचा थांग लागणे अवघड असते. त्यांनी केलेल्या नीच कृत्याची तीव्रता पाहता आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो.
३. HD हा त्यांचा आजार योगायोगाने लक्षात आलेला असू शकतो.
………
मनोरुग्णांनी केलेल्या खुनाबाबत कायद्याचा बघण्याचा दृष्टिकोन कसा वेगळा असतो हे जाणून घेण्यास उत्सुक. जाणकारांनी जरूर मत द्यावे.
(चित्रे जालावरून साभार)
सुरुवातीच्या चर्चेत देहांताची
सुरुवातीच्या चर्चेत देहांताची शिक्षा असावी का नसावी हा मुद्दा आला होता. यासंदर्भात आजच्या सकाळ सप्तरंग पुरवणीतील 'फक्त माझा गुन्हा सांगा' हा लेख वाचण्यासारखा आहे.
थोडक्यात घटना लिहितो:
16जून 1944: दक्षिण कॅरोलिना, अमेरिका
आरोपी : जॉर्ज स्टिनी, वय 14
आरोप : दोन मुलींचा खून
खटला घाईघाईत उरकला गेला. जॉर्जच्या बाजूने कोणाची साक्ष नाही; त्याला त्याची बाजूही मांडू दिली नाही.
देहांताची शिक्षा फर्मावली आणि दिली गेली.
सन 2004 : तोच खटला न्यायालयीन पुनरावलोकनासाठी घेण्यात आला.
तो दहा वर्षे चालला
2014 मध्ये जॉर्जला दोषमुक्त ठरविण्यात आलं आणि शिक्षा माफ करण्यात आली !!
एवढ्या अल्पवयीन मुलाला देण्यात आलेली ही जगातली एकमेव देहांताची शिक्षा आहे असे लेखात म्हटले आहे.
…
सुन्न झालो.
>>>>'फक्त माझा गुन्हा सांगा>>
>>>>'फक्त माझा गुन्हा सांगा>>> छे, फारच भयानक. वाचवेना.
असे होता कामा नये.
तारीख 16जून 1944 >> हे
तारीख 16जून 1944 >> हे महत्त्वाचे आहे.
आता परिस्थिती अशी आहे की देहांत शिक्षा मिळालेले कैदीपण टॅक्सपेअर्सच्या पैशांवर, वर्षानुवर्षे आनंदात जेलमध्ये जिवंत राहतात.
1944 ते 2014...जवळपास 70
1944 ते 2014...जवळपास 70 वर्षे? म्हणजे निर्दोष स8द्ध झाला तेव्हा आरोपी 84 वर्षाचा होता का ?
देहांतची शिक्षा म्हणजे नेमके काय ?
आरोपीला चौदाव्या वर्षीच 1944
आरोपीला चौदाव्या वर्षीच 1944 मध्ये इलेक्ट्रीकच्या खुर्चीत बसवून देहांताची शिक्षा दिली गेली .
त्यानंतर कित्येक वर्षांनी त्याच्या बहिणीनी तो खटला पुन्हा उपस्थित केला.
(न्यायालयीन पुनरावलोकनासाठी : coram nobis
https://en.wikipedia.org/wiki/Coram_nobis)
देहांत ची शिक्षा,आजन्म
देहांत ची शिक्षा,आजन्म कारावास अशा शिक्षा देताना खूप कठोर पने आणि सर्व बाबी चा खूप खोल विचार करून,सर्व साक्षी पुरावे क्रॉस चेक करून .मग च दिल्या जाव्यात. .जगात अनेक केस असतील तिथे निर्दोष व्यक्ती लं शिक्षा दिली गेली असेल.
न्याय देताना कोणताच भावनिक कल्लोळ नको,कोणताच बाह्य दबाव नको,कोणतीच नैतिकता,अनैतिकता नको.कोणतेच ग्रह,पूर्व ग्रह नको.
फक्त योग्य पुरावे हाच पाया हवा शिक्षेचा.
आता पूर्ण मानवी बुध्दी वर अवलंबून राहण्याचे कारण पण नाही.
क्रिकेट मध्ये जसे कॅमेरा चा वापर करतात.
त्या प्रमाणे Ai च वापर पण समांतर करावा.
न्यायाधीश बरोबर रोबोट पण तिथे असावा.जो कायद्याचा योग्य अर्थ कोणताच भावनिक गोंधळ न घालता काढेल.
इतकेच नाही केस चा निकाल लागेपर्यंत तुरुंगात टाकणे पण माणुसकी लं धरून नाही.
फक्त आरोप केला म्हणजे तो आरोपी नसतो.
जामीन मिळण्याचा हक्क सर्वांना असायला हाव.
काही मोजकेच गुन्हे सोडले तर.
<< सर्व बाबी चा खूप खोल विचार
<< सर्व बाबी चा खूप खोल विचार करून,सर्व साक्षी पुरावे क्रॉस चेक करून .मग च दिल्या जाव्यात >>
सध्याच्या दिवसात हे सर्व न करता, एखाद्याला गुन्हेगार ठरवून अगदी सहजपणे देहांताची शिक्षा दिली जाते असे म्हणायचे आहे का? खरा प्रश्न हा आहे की गुन्हेगाराला दोषी ठरवून देहांताची शिक्षा दिली गेली तरीही त्याची अंमलबजावणी वर्षानुवर्षे होत नाही आणि ते गुन्हेगार टॅक्सपेअर्सच्या पैशांवर वर्षानुवर्षे जिवंत राहतात.
मग कुणाच्या पैशावर जगवणार ?
मग कुणाच्या पैशावर जगवणार ?
गुन्हा निर्विवाद सिद्ध होऊन
गुन्हा निर्विवाद सिद्ध होऊन देहांताची शिक्षा दिली गेली की गुन्हेगाराला वर्षानुवर्षे पोसत न ठेवता, शिक्षेची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, अशी अपेक्षा आहे. या अर्थाने म्हटले आहे.
भारतात सध्या देहांताची शिक्षा
भारतात सध्या देहांताची शिक्षा दुर्मिळातील दुर्मिळ खुनाच्या गुन्ह्यासाठीच द्यावी असा संकेत आहे. प्रत्यक्ष शिक्षा फर्मावल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीत कित्येक वर्षांची चालढकल होते.
जर का असा गुन्हेगार दहा वर्षे शिक्षेच्या छायेत राहिला तर त्यानंतर ती जन्मठेपेत रूपांतरित करावी असा एक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने खूप वर्षांपूर्वी दिला होता.
सध्याचा नियम माहीत नाही
(((आरोपीला चौदाव्या वर्षीच
(((आरोपीला चौदाव्या वर्षीच 1944 मध्ये इलेक्ट्रीकच्या खुर्चीत बसवून देहांताची शिक्षा दिली गेली .त्यानंतर कित्येक वर्षांनी त्याच्या बहिणीनी तो खटला पुन्हा उपस्थित केला.)))
Ohh ...फारच दुर्दैवी...
मला वाटले की देहांताची शिक्षा जाहीर झाली परंतु अंमलबजावणी झाली नाही आणि खटला पुन्हा उभा राहिला की काय...
मृत्यूपश्चात त्याच्या बाजूने निकाल लागला म्हणजे न्यायालयाने त्याचा खुनच केल्यासारखे झाले ...
अगदी सनसनाटी बातमीच वाचायची
अगदी सनसनाटी बातमीच वाचायची असेल हे बघा. १२ वर्षाच्या मुलीला फाशी दिले होते (पण कधी १७८६ साली) . आता इतक्या सहजासहजी असे काही होत नाही.
2014 मध्ये जॉर्जच्या
2014 मध्ये जॉर्जच्या थडग्यावर
"बेकायदेशीररित्या देहांताची शिक्षा दिली गेली" असा मजकूर लिहीण्यात आला आहे.
चित्र इथे पाहता येईल
https://www.postandcourier.com/columbia/news/sc-bill-named-for-george-st...
कायदेशीर कारवाई चे, सर्वात
कायदेशीर कारवाई चे, सर्वात जास्त बळी हे सामान्य लोक आणि गरीब लोक च ठरतात.
असे मत न्याय पालिकेने च व्यक्त केले आहे .
प्रभवशिल व्यक्ती चे खटले लगेच न्यालयासमोर येतात .पण गरीब किंवा सामान्य व्यक्ती चे खटले कित्येक वर्ष न्यायालय समोर येत नाहीत..
किरकोळ आरोप असलेले पण जामीन देण्यास कोणी नाही ,आणि खटला न्यायालय समोर पण येत नाही म्हणून .खूप कच्चे किरकोळ कैदी दहा दहा वर्ष तुरुंगात आहेत
सिरियल नुसार च खटल्यांची सुनावणी होणे अपेक्षित आहे
पण तसे घडत नाही.
ही सर्वात गंभीर बाब आहे .
सरकार, न्यायलाय चूक मान्य करतात पण ती सुधारत कोणीच नाही.
ह्या वर उपाशी बोका ह्यांचे काय मत आहे..
लोकांच्या टॅक्स च्या गैर वापर बद्धल.
न्यायदाना बद्दल इंग्लिशमध्ये
न्यायदानाबद्दल इंग्लिशमध्ये एक प्रसिद्ध वचन आहे:
Justice is simply the interest of the stronger.
खटल्यांचा “निकाल” लागतो, पण पीडिताला खरच 'न्याय' मिळतो का ? माहित नाही...... या आशयाची वाक्ये बऱ्याच पुस्तके आणि चित्रपटांमध्ये बघायला मिळतात.
माझा स्वतः च अनुभव आहे.जमिनी
माझा स्वतः च अनुभव आहे.जमिनी विषयी चालू असलेला दिवाणी खटला वीस वर्ष चालला तरी निकाल लागला नाही.दोन्ही बाजूंचे मिळून वकिलाला जमिनी च्य किंमती पेक्षा जास्त पैसे गेले
शेवटी आम्ही बसून ते प्रकरण आपसात मिटवले.
खरी सत्य घटना आहे.
अगदी बरोबर !
अगदी बरोबर !
एक जेष्ठ वकील आणि त्यांचा नव्याने वकील झालेला मुलगा यांच्या संबंधात तो प्रसिद्ध विनोद आहेच. अशील वर्षानुवर्ष रखडत राहिले पाहिजे
साधे तलाठी सारखा सरकार चा
इतके मार्ग आता उपलब्ध आहेत.
सायन्स इतके पुढे गेलं आहे.
अती बुद्धी मान पण भावना विरहित असणारे यांत्रिक मानव उपलब्ध आहेत.
यांत्रिक मानव चा वापर.
न्याय पालिका आणि प्रशासन मधील अधिकाराच्या जागा इथे केला पाहिजे.
स्वच्छ न्याय व्यवस्था आणि प्रशासकीय व्यवस्था लोकांना मिळेल
आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक
आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक करारांमध्ये असतो तसा 'सनसेट क्लॉज' न्यायदानात का वापरात नाहीत काय माहित.
म्हणजे अमुक गुन्ह्यासाठी कमाल कारावास ४ वर्षे आहे आणि आरोपी खटला उभा न राहिल्यामुळे आधीच ४ वर्षे तुरुंगात आहे तर त्याची/तिची ४ वर्षे पूर्ण झाल्याच्या दिवशी सुटका होईल आणि खटला बाद होईल असे नियम का बनवत नाहीत ? तसेच फाशीची शिक्षा झाली आणि ५ वर्षे अंमलबजावणी झाली नाही तर शिक्षा आपोआप जन्मठेपेत बदलेल असे. ह्यातून हवे तर खून-बलात्कार असे मोठे गुन्हे वगळता येतील.
लाखो खटले बाद आणि हजारो कैदी मोकळे होतील झटक्यात. ... करदात्याचा पैसा वाचेल तो बोनस.
मला पण असे वाटायचे.
मला पण असे वाटायचे.
जेव्हा बातमी यायची मीडिया मध्ये अमक्या तमक्या नी बलात्कार केला.
विनय भंग केला.
खून केला.
चोरी केली .
ह्या सर्वांना फाशीवर चढवले पाहिजे लगेच .
काही खटला बिटला नको.
पोलिस ना खूप पॉवर असावी.
त्यांना कोणालाही गोळी मारण्याची परवानगी असावी.
त्यांच्या कडे खूप अत्याधुनिक हत्यार असावी
असे पण वाटायचे.
पण जेव्हा खरी स्थिती काय आहे हे लक्षात आले तेव्हा हा सर्व. भावनिक जोश निघून गेला
पोलिस कोणाला पण आरोपी करू शकतात.
ह्याचे बळी सामान्य किंवा गरीब लोक च असतात
कोणताही गंभीर आरोप स्वार्थासाठी कोणी ही करू शकते.
त्या मुळे .
आरोप ची चिकिस्ता योग्य रीती नी जो पर्यंत होत नाही .
तो पर्यंत तो व्यक्ती आरोपी नाही.
पोलिसाना जास्त अधिकार ह्याचा अर्थ अत्याचार .
पोलिस यंत्रणा आणि त्यांची काम करण्याची पद्धत .
ट्रॅफिक सिग्नल वर पण सर्वांना बघायला मिळतें
कोणत्याच एका व्यक्तीला, व्यवस्थेला पूर्ण अधिकार असताच कामा नयेत.
असे आता माझे मत आहे,
सनसेट क्लॉज >>
सनसेट क्लॉज >>
हा मुद्दा नव्याने समजला. अर्थात गंभीर गुन्ह्यांच्या बाबतीत खूप विचारपूर्वक ठरवायला लागेल
जॉर्ज स्टिनी केसमध्ये
जॉर्ज स्टिनी केसमध्ये वर्णद्वेषीपणा दिसतो.
सर्व जुरी गोरे लोक.
भारतात फासावर गेलेल्या
भारतात फाशीची शिक्षा सुनावल्या गेलेल्या लोकांच्या सामाजिक आर्थिक स्थितीचा अभ्यास , आकडेवारी न्यायप्रक्रियेवर प्रकाश पाडू शकतील.
होय, अहवाल विस्तृत आहे.
होय, अहवाल विस्तृत आहे.
निष्कर्ष न्यायव्यवस्थेला आत्मपरीक्षण करायला लावणारे आहेत
भरत ह्या रिपोर्ट वर अविश्वास
भरत ह्या रिपोर्ट वर अविश्वास दाखवण्या ची गरज नाही.
रोज च्य प्रतेक गुन्हेगारी घटनेत सरळ सरळ वेगळी कारवाई होते .आर्थिक स्थिती बघून..
अर्णव,कंगना, ही उदाहरण बस झाली
लाखो गरीब लोकांच्या केस pending असून पण.
उच्च न्यायालय पासून सर्वोच्च न्यायालय नी .
कंगना आणि अर्णव ला प्राथमिकता दिली.
.का?
का?
>>>>म्हणजे बलात्कार, दरोडा,
>>>>म्हणजे बलात्कार, दरोडा, खून असे गंभीर आणि क्रूर गुन्हे करणाऱ्यांना गुन्हेगारांना खरेतर हालहाल करून मारून टाकण्याची पद्धत पाहिजे.
शिक्षा सूड घेण्याकरता देत नाहीत तर समाजात वचक बसावा, अधिक गुन्हे होउ नयेत या दॄष्टिकोनातून देतात. तेव्हा हालहाल करुन मारण्याची गरजही नाही उलट ते मानवी मूल्यांचे उल्लंघन आहे.
इत्यलम!
<< मानवी मूल्यांचे उल्लंघन >>
<< मानवी मूल्यांचे उल्लंघन >>
खरं आहे. म्हणून तर इंजेक्शन देऊन देहांताची शिक्षा देण्यापूर्वी अल्कोहोल स्वाब वापरून आधी निर्जंतुक करतात. /s
यात हसण्यासारखे काय आहे.
यात हसण्यासारखे काय आहे. नाहीये का उल्लंघन? हालहाल करुन मारायचे???
देहांताची शिक्षा झालेल्या
देहांताची शिक्षा झालेल्या एकानेही अजून तक्रार केली नाहीये की हाल होऊन त्याचा जीव गेला.
(No subject)
Pages