क्रिप्टो ( Crypto ) भाग - ६

Submitted by मिलिंद महांगडे on 23 May, 2022 - 11:12

₿₿₿
जयसिंग नॉर्मल झाला आणि त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला , आणि तो घरी आला . त्याची बायको यमुना , त्याच्या तब्येतीची जास्तच काळजी घेऊ लागली. अधून मधून चौकशी करण्यासाठी सुहासिनी ताईसाहेबांचा फोन येत होता. जयसिंगची तब्येतही आता सुधारू लागली. वरून सर्व आलबेल दिसत असलं तरी एक अशी गोष्ट होती , कि ती जयसिंगच्या जीवाला खात होती,
“ काय हो ? मी बघतेय , बरेच दिवस तुम्ही टेन्शन मध्ये दिसताय ? काय झालंय असं ? ”, यमुनेने त्याला विचारलं.
“ काही नाही . कुठं काय ? ” , त्याने उत्तर द्यायचं टाळलं .
“ हे बघा ! , मी काय तुम्हाला आज ओळखत नाही , बायको आहे तुमची ! काय झालंय ते सांगा मला. ” ती ठामपणे म्हणाली.
“ तुला सांगून काय होणारे ? शांत बस. उगाच डोक्याला ताप देऊ नको . ”, जयसिंग खेकसला. यमुना थोडा वेळ शांत बसली, पण तो तिचा स्वभाव नव्हता . नक्की तिला काय झालंय ते जाणून घ्यायचंच होतं. काल - परवा पर्यंत धडधाकट असणारा तिचा नवरा अचानक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो म्हणजे काय ? अचानक असं कसं होईल ? ह्या मागे काहीतरी कारण असलंच पाहिजे ! आणि तेच कारण ती शोधण्याचा प्रयत्न करत होती.
“ बरं , ते जाऊ द्या … आपल्या बिझनेसचं कुठवर आलंय ? ” , तिने खडा टाकून पाहिला .
“ का ? तू कशाला विचारायलीस ? ”, खडा बरोब्बर लागला.
“ आत्ता ? हे पण विचारू नको व्हय ? एवढे दुसऱ्याचे पैसे उसने घेतलेत , तर म्हणलं विचारावं काम कुठवर आलंय ते … ” ती सरळ चेहऱ्याने म्हणाली.
“ चालू आहे काम … आणि दुसऱ्याचे पैसे काय म्हनतीस ? जवळच्याच माणसाचे हायेत ते … ”
“ आओ हो , पण ते कधी ना कधी द्यावे लागणारच ना ? उसनं फेडावंच लागतं … ”
“ ताई तुला काय बोलली का ? ” , जयसिंगने साशंक चेहऱ्याने विचारलं.
“ नाही , तसं डायरेक्ट काय बोलल्या नाहीत . पण त्या दिवशी त्यांच्या गाडीतून गेले होते , त्यावेळी चौकशी करत होत्या . विचारत होत्या तुमचं काम ठीक चालू आहे ना ? कामाचं टेन्शन घेतलंय का म्हणून … ”, एवढं बोलून यमुना जयसिंगचा चेहरा निरखू लागली . तिला जी शंका होती , ती खरी ठरली होती . ताईने चौकशी केली असं समजताच त्याचा चेहरा उतरला होता. तिला काय समजायचं ते समजली . तिने पुढे काही विचारलं नाही. जयसिंगला आठवला तो दिवस जेव्हा तो सुहासिनी ताईच्या बंगल्यावर गेला होता -
कित्येक दिवसांच्या मिनतवारीनंतर सुहासिनीताई तयार झाल्या होत्या. आज त्या प्रतापरावांकडे जयसिंगचा विषय काढणार होत्या. पण खासदार साहेबांचा स्वभाव पाहता ते कितपत यशस्वी होईल ह्याची खात्री खुद्द सुहासिनी ताईंनासुद्धा नव्हती. खासदार प्रतापराव बोडकेपाटील त्यांच्या प्रशस्त दिवाणखान्यात बसले होते. जयसिंग तिथे आल्यावर त्यांनी उपचारादाखल हसत त्याला खुशाली विचारली . घरच्या , बाहेरच्या गप्पा झाल्यावर मग सुहासिनी ताईंनी हळूच विषय काढला ,
“ मी काय म्हणते , जयसिंग बिझनेस करायचं म्हणत होता , काय ते कसलं हॉटेल काढायचा विचार आहे त्याचा … ”
“ हॉटेल नाही ताई , रिसॉर्ट … ”
“ हां … तेच ते … महाबळेश्वरला जागा बघितलीय म्हणत होता . ”
“ अरे वा ! छानच कि ! मग ? कधी जायचं रिसॉर्टवर ? ”, प्रतापराव उपरोधिकपणे म्हणाले.
“ अहो , असं काय करताय ? त्यानं जागा बघितलीय , त्यावर रिसॉर्टचं बांधकाम करायचंय अजून . ” सुहासिनी ताई म्हणाल्या.
“ असं होय ! बरं … मग ? ”, प्रतापरावांनी साळसूदपणे विचारलं.
“ मी काय म्हणते , आपल्याकडून जरा मदत झाली असती तर बरं झालं असतं . त्याचा बिझनेस सुरु झाला , चांगला जम बसला कि तो परत करील आपले पैसे हळूहळू … ” शक्य तेवढ्या हळू आवाजात सुहासिनी ताई म्हणाल्या. जयसिंगनेही त्याला दुजोरा दिला. त्यावर प्रतापराव विचारात पडले. खरं तर त्यांना ह्या सर्वांची कल्पना होतीच . जयसिंग त्यांच्या बायकोचा लहान भाऊ होता , आणि सध्या कोणताच कामधंदा करत नव्हता , तेव्हा हे असंल काहीतरी बिझनेस प्रपोजल आज ना उद्या आपल्यासमोर येणार ह्याची त्यांना खात्री होती . राजकारणी माणूस पुढच्या सगळ्या शक्यतांचा विचार आधीच करतो , प्रतापराव त्याला अपवाद नव्हते. तसे ते हुशार आणि मुत्सद्दी होते. उगाच नाही पक्षातल्या दिग्गज लोकांना डावलून आणि अनेकांचा विरोध पत्करून पक्षश्रेष्ठींनी त्यांना खासदारकीचं तिकीट दिलं, आणि प्रतापरावांनीही मिळालेल्या संधीचं सोनं करून घेतलं .
“ बरं , किती लागतील ? ” ते थेट मुद्द्यावर आले.
“ तसा सगळा प्रोजेक्ट २० मध्ये बसंल … पण सध्या १० करोड मिळालं तरी चालतील . कामाला सुरुवात करता येईल … ” जयसिंग असं म्हणाला आणि तिकडे सुहासिनीताईंना ठसका लागला. प्रतापरावांनी थोडा विचार केला.
“ ठीक आहे . बघू … मी एका माणसाचा पत्ता देतो . त्याला भेट , तो तुझं काम करील… ”, म्हणत राजकारणी लोकांसारखं आश्वासन दिलं आणि ते बाहेर जायला निघाले. ते गेल्यावर सुहासिनीताईंनी जयसिंगाला चांगलंच धारेवर धरलं .
“ अरे जया , डोकं फिरलंय का तुझं ? किती मागितलेस ? २० करोड ? मला वाटलं पाच - दहा लाख म्हणशील … ”
" पाच दहा लाख ? ताई रिसॉर्टची एक खोली तरी बांधून हुईल का त्यानं ? "
" ते मला काय कळत नाही , पण एवढा खर्च कशाला लागतोय ? "
“ तू टेन्शन नको घेऊ ग ताई , दाजींना काही तरी वाटलं का ? आणि रिसॉर्ट उभारायचाय ते बी महाबळेश्वरात ! एवढा खर्च तर येणारच ! ”
“ अरे , पण तुला झेपेल का एवढं मोठं काम ? ”, त्यांना काही जयसिंगचा भरवसा वाटेना.
“ तू मला अजून ओळखलं नाहीस ताई. एकदा का रिसॉर्ट सुरु झालं कि बघ कसा पैशांचा पाऊस पाडतो ते ! ” त्यावेळी आत्मविश्वासाने भरलेलं त्याचं स्वतःचंच वाक्य आता त्याच्या कानात घुमलं . त्याला आता खूपच अस्वस्थ वाटू लागलं. यमुना त्याच्या चेहऱ्यावरचे बदलणारे हावभाव निरखत होती . काहीतरी नक्की झालंय , असा तिचा विश्वास होता तो आता आणखी पक्का झाला.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users