आधीच्या भागाकडे जाण्यासाठी कृपया इथे टिचकी मारावी.
नेताजी सुभाषचंद्र हवाई अड्डा, कोलकाता !
पिवळी अॅम्बॅसिडर सोडून ती आत शिरली. स्पाईस जेटचा काऊंटर पाहून लगेज देऊन टाकलं. बोर्डिंग पासेस घेऊन वरच्या मजल्यावरच्या रेस्तराँमधे जाऊन बसली. काहीच्या काही दर होते कोलकाता शहरापेक्षा. पण वेळ घालवायचा तर नाईलाज होता. आत्ताशी दहा वाजत होते.
मुंबई फ्लाईट दुपारी एक वाजता होती. चेक ईन करताना ती तीन तास लेट असल्याची बातमी समजली.
आज तसंही शहरात राहणं तिला अशक्य झालं होतं. परतीचे वेध लागले होते. परक्या शहरात जर होम सिकनेस आला तर अनेक जण रेल्वे स्टेशन, बस स्टँड अशा ठिकाणी जाऊन वेळ घालवतात. त्या शहरात येताना ते इथेच उतरलेले असतात आणि इथूनच पुन्हा जाण्याची सोय होणार असते. कुठेतरी घराशी कनेक्शन जोडून मानसिक समाधान मिळत असतं. ती विमानतळावर पाच सहा तास आधी येऊन बसली होती. घरमालकही इतक्या लवकर जाऊन काय करणार असं विचारत होता.
कोलकाता सोडताना इथल्या सगळ्या आठवणींनी गर्दी केली होती. आता पुन्हा असे येणे होणार नाही लवकर.
काही काही आठवणी तर इतक्या हृद्य होत्या कि तिच्या गळ्यात आताही आवंढा दाटून आला होता. मुद्दामच कुणालाही न कळवता तिने सगळं सोडायचा निर्णय घेतला होता. नंतर फोनवर सांगता आले असते.
विचारांच्या तंद्रीत वेळ कसा गेला, अनाऊंसमेंट कधी झाली, कधी ती विमानात चढली आणि कधी मुंबई आलं हे ही तिला समजले नाही.
सांताक्रूझ पासून दादर किंवा कुठेही टॅक्सी करण्यापेक्षा थेट पुण्याला कॅब बुक केलेली परवडते. तिने उतरल्या उतरल्याच नेहमीच्या सरदारजी कडे कॅब बुक केली होती. ती बाहेर येईपर्यंत कॅबवाला बाहेर येऊन थांबणार होता.
सर्व्हिस छान होती. तो आत मधे येऊन तिची वाट बघत बसला होता. तिथून पार्किंग मधे सहाव्या फ्लोअर वर तो लिफ्टने घेऊन गेला. सामान वर टाकलं आणि गाडी सुरू केली.
"निघायचं ? काही राहिलं तर नाही ना ?"
"नाही "
जेवायचीही तिला इच्छा नव्हती. पण ड्रायव्हरला विचारायला हवं म्हणून तिने विचारलं.
" तुम्हाला मधे थांबायचं आहे का ?"
" का ?"
" म्हणजे मला म्हणायचं होतं कि शक्य असेल तर नॉन स्टॉप जाता येईल का ?"
" काहीच हरकत नाही. आम्ही पॅसेंजरसाठी थांबतो. मधे त्यांना भूक लागली किंवा अजून काही असेल तर त्यासाठी "
" नाही मला थांबायचे नाही "
एव्हढ्या संवादानंतर एक शब्दही कॅबमधे कुणी कुणाशी बोललं नाही. रेडीओ चालू होता.
तलतची गाणी लागली होती. तिच्या चित्तवृत्ती थोड्या प्रफुल्लित व्हायला त्याचा रेशमी आवाज पुरेसा होता.
पण दिवसभराची वाट बघण्यातली दगदग आणि गेले काही दिवस आलेला मानसिक थकवा यामुळे तिला कधी झोप लागली समजलेच नाही.
जाग आली तेव्हां ड्रायव्हर तिला काही तरी विचारत होता.
" पुण्यात आलो आपण. घरचा रस्ता सांगा मॅडम "
" ओह सॉरी. मला झोपच लागली "
तिने सांगितलेल्या पत्त्यावर गाडी येऊन पोहोचली.
खूप दिवसांनी घराकडे पाहताना तिच्या भावना उचंबळून आल्या.
एका दिवसात कितीतरी भावभावनांचा अनुभव तिने घेतला होता.
कोलकाता सोडताना तिथल्या आठवणींनी गर्दी केली होती. काही का असेना, तिला रोजगार देणारं शहर होतं ते.
आणि आता तिचं सगळं बालपण पाहिलेले तिचे घर.
त्या घरात वाट पाहणारी तिची आई.
आईची आठवण येताच ती अगदी व्याकूळ झाली. सामान दारात ठेवून तिने दार वाजवतच आवाज दिला.
" आई SSSSS "
बेडरूम मधला दिवा लागला. मग हॉलमधला.
आईने एलईडी स्क्रीनवर पाहिले. झिलमिल !!
आणि मग तिने लगबगीने दार उघडले.
दार उघडताच ती आईच्या गळ्यात पडली. आनंदाने तिला रडू येत होतं.
आईनेही तिचे पटापट मुके घेतले. अगदी बाबासारखेच.
"एव्हढा उशीर का गं झाला ?"
" अगं आई तीन तास प्लेन लेट होतं. मुंबईतच मी सव्वा आठला पोहोचले. बाहेर पडेपर्यंत नऊ वाजले. आत्ता एक वाजतोय."
" बरं चल. भूक लागली असेल. आज तू येणार म्हणून दही वडे , खीर, बटाट्याची भाजी, पुरी आणि तुला आवडतो तसा भात केलाय. पापड तळेपर्यंत तू तोंड, हात पाय धुवून ये "
" अगं आई एव्हढं कशाला बनवलंयस ? मी काय राक्षसीण आहे का ?"
" जेव्हढं खायचंय तेव्हढं खा. काका पण येणार आहे. त्याने सक्त ताकीद देऊन ठेवलीय तू आलीस कि कळवायला "
" त्याला कशाला एव्हढ्या रात्री त्रास दिलास आई ?"
" असू दे. तुझ्यावर खूप जीव आहे त्याचा "
तिच्यावर झोपेचा अंमल होता. जेवावं कि झोपावं हे समजत नव्हतं.
पण काका आला आणि झोप उडाली.
त्यांची नेहमीची थट्टामस्करी सुरू झाली.
जेवताना मग तिने आपल्या निर्णयाबद्दल सांगितले तसा काका गंभीर झाला.
" झिलमिल आपण उद्या परवा बोलू या विषयावर. आता रिलॅक्स हो. आपण मस्त पैकी पिकनिक करू, मग बोलूच"
कुणीच काही बोललं नाही.
पहाट होत आली होती.
काका घरी जायला निघाला.
जाताना त्याने हळू आवाजात सांगितलेले तिला स्पष्ट शब्दात ऐकू आले.
" वैनी ! या वयात असलं खूळ डोक्यात शिरत असतं. विरोध करू नकोस. पण कुठल्याही परिस्थितीत तिला परवानगी देऊ नकोस. बाकीचं माझ्यावर सोड"
" तूच बघ आता. तुझंच ऐकेल ती "
त्या शब्दांबरोबर तिचा निर्धार आणखीच पक्का झाला.
उघड्या खिडकीतून येणाया मंद झुळकीने ती कधी झोपेच्या अधीन झाली कळलंच नाही.
स्वप्नात तिला पर्वतरांगा दिसत होत्या. एका गुहेतून बाहेर येणारा तिचा बाब तिला हाका मारत होता.
त्याच्या मागे कुणीतरी होतं. आणि त्या नादात तो दलदलीत फसला. दोन्ही हातांनी तो तिला हाक मारत होता.
तो आत आत चालला होता.....
ती जागी झाली तेव्हां अंग भाजत होतं.
दुपारची उन्हं अंगावर पडत होती आणि अंगावर जाडजूड रजई होती.
" बाबा "
एव्हढा एकच शब्द तिच्या तोंडून बाहेर पडला.
आणि मग स्वप्नाचा विचार करत शांत बसून राहिली.
काही काही गोष्टी ती कधीच विसरलेली नव्हती. कायमच तिच्या मेंदूवर कोरल्या गेलेल्या आठवणी होत्या त्या.
बाबा कौलावर धडपडल्यानंतर बुलेटचा आवाज आला तेव्हांच टिमोथी अंकलचा विचार मनात आला होता. टिमोथी गॅरेजचे मालक जॉन टिमोथी बाबाचे जिवलग मित्र होते. त्या रात्री टिमोथी अंकलच्याच बुलेटवरून बाबा गेला होता. त्यानंतर टिमोथी अंकल आणि तिच्या स्वतःच्या घरी कित्येक वेळा पोलीस आले होते. सोबतच ते दोन गोरटेले अधिकारी पण असायचे. आत्ता आत्ता तिला नीट समजू लागल्यानंतर कळालं ते गुप्तचर अधिकारी होते.
खूपदा घरापुढच्या रस्त्यावर फेरीवाले दिसायचे. कोपर्यावर अनोळखी लोक दिसायचे. आई ला ते कळायचं.
त्यांच्या घरावर पाळत होती. तशीच टिमोथींच्याही.
टिमोथी अंकल बाबाला घेऊन पळाल्याने त्यांच्याही मागे पोलीस लागले होते.
काही महीन्यांनी टिमोथी अंकल परतले. त्यांना पोलीस घेऊन गेले होते.
पण कसून चौकशी करूनही ते जास्त काही सांगू शकले नाहीत.
पुढे कोर्टात टिमोथींच्या वकीलाने आपले सर्व कौशल्य वापरून त्यांना आधी जामीनावर आणि नंतर कायमचेच सोडवले होते. काहीतरी असे घडले होते की नंतर त्या गुप्तचर अधिकार्यांनी स्वतःच टिमोथी अंकलच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला होता.
तिची आई बाबांच्या चौकशीसाठी गेली तेव्हां मिसेस टिमोथीने हात जोडून "आता आमचा पिच्छा सोडा. झालं ते खूप झालं. आम्हाला जगू द्या" या शब्दात सुनावल्याने पुन्हा ती त्यांच्याकडे गेली नव्हती.
पण एक दिवस ती आई बरोबर चालली असताना टिमोथी गॅरेजचा एक मेकॅनिक कार घेऊन त्यांच्याजवळ येऊन थांबला होता.
" ताई, टिमोथी सरांना तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचंय " त्याने समजूत घालत सांगितल्यावर दोघी कारमधे बसल्या.
गाडी वानवडीच्या चर्च मधे आत घेतली.
मॅकॅनिक त्यांना घेऊन मागच्या बाजूच्या जिन्याने वर फादरच्या खोलीत घेऊन गेला. तिथे टिमोथी अंकल आणि फादर बोलत होते.
झिलमिल आणि तिच्या आईला पाहून टिमोथी अंकल उठून उभे राहीले.
" हे फादर रॉड्रीक्स आणि फादर याच त्या ज्यांच्याबद्दल मी आता बोलत होतो"
" जॉन तू त्यांना सगळं सांगायला पाहीजेस "
" फादर त्याच्यासाठीच तर इथे बोलवलंय. घरी मार्गारेट खूप त्रागा करते. आणि माझ्यावर अजूनही पाळत आहे. यांच्यावरही आहे. हो ना ?"
आईने मानेनेच होकारार्थी मान हलावली.
" इतकंच नाही तुमचा टेलिफोन सुद्धा टॅप होतो. तुम्हाला येणारी पत्रं सुद्धा आधी स्कॅन होऊन तुम्हाला मिळतात. तुम्ही कुणाला पाठवली तर ती ही स्कॅन होणार "
" बाप रे " आईला हे नवीन होतं.
" अनोळखी माणसांना चुकूनही कसली माहिती देऊ नका "
" मी अनोळखी माणसांशी बोलत नाहीच. पण माहिती देण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही. दक्ष मला काहीही सांगायचा नाही "
" मलाही नाही. पण तो संकटात असल्याने घरी येण्यापूर्वी त्याने पब्लिक बूथवरून मला फोन केला होता. घरी फोन न करण्यामागचं कारण मी सांगितलंच"
" तुम्हाला काय माहिती आहे दक्षबद्दल "
" त्याने फोन करून बुलेट काढून तयारीत रहा . रस्त्यात सगळं सांगतो असे म्हणाला होता " "
" मग सांगितले का ?"
" ऐन वेळी पोलीस मागे लागले. त्यांना चुकवत सिंहगड रस्त्याला गेलो. तिकडून कात्रज ला जाणार्या कच्च्या रस्त्याने निघालो. पुढे हा रस्ता कोंढवा आणि नंतर फुरसुंगीला निघतो. तिथून सासवड मधे पोहोचलो. तिथे मित्राच्या गॅरेजमधे गाडी लपवून आटपाडी मुंबई एसटीने मुंबईच्या अलिकडे उतरलो. रस्त्यात तो सारखे सांगत होता मी निर्दोष आहे. मी एका खूप मोठ्या प्रकरणात फसलो आहे. हे लोक मला मारून टाकतील"
" मग ?" विचारतानाच आईने फादर कडे पाहीले.
फादर रॉड्रीक्स म्हणाले " बेटी, तू निश्चिंत रहा. पोलिसांना मदत करणे माझे कर्तव्यच आहे. पण जर जोन म्हणतो तसा तुझा नवरा निर्दोष असेल तर त्यालाही मदत केली पाहीजे. बेटा, लोक माझ्याकडे अनेक गुन्ह्यांची कबुली देतात. ती कधीच आमच्याकडून कुणालाही सांगितली जात नाहीत"
आईने नि:श्वास सोडला.
" दक्षा निर्दोष आहे मला ही वाटते. त्याच्याकडे सीक्रेट्स आहेत. ती डिस्क्लोज होऊ नयेत म्हणून त्याच्या मागे पोलीस आणि अन्य काही लोक लागलेत. तो एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी पळतोय. माझ्याही मागे पोलीस लागले होते. आता घरी कसा परत जाणार ही काळजी असताना त्यानेच मला शपथा घालून घरी परतायला लावलं. पोलिसांना सामोरा जा असं म्हणाला तो. मला तशीही फारशी माहिती नव्हती. त्यामुळे पोलिसांनी थर्ड डिग्री लावून सुद्धा मी काहीच सांगू शकलो नाही "
" खरंच तुम्हाला आमच्यामुळे त्रास झाला "
" माझ्या म्हणण्याचा उद्देश तुम्हाला खजील करायचा नव्हता. वाईट वाटून नका घेऊ "
" नाही हो. तुम्ही होता म्हणून त्या दिवशी दक्ष सुटून गेला. पण कसली सीक्रेटस आहेत त्याच्याकडे ? एकदा तरी काही बोलला असेल ना तो ?"
" जास्त काही नाही. पण इतकेच म्हणाला हे सगळं एका प्राचीन शहराबद्दल आहे. जे गडप झालंय. कुणी म्हणतं काल्पनिक आहे, कुणी म्हणतं तिथे एलियन्स आहेत. कुणी म्हणतं तिथे भविष्यकाळातले शहर आहे जे टाईम ट्रॅव्हलशिवाय पाहता येत नाही. तर कुणी म्हणतं की ते एक अध्यात्मिक केंद्र आहे. तिथे सामान्य माणसाला जाता येत नाही. "
" असं मी या आधी कधीच ऐकलं नाही "
फादर रॉड्रीक्स हसत म्हणाले " जगभरात याच्या कहाण्या आहेत. पण कमी लोकांना माहिती आहे त्याबद्दल."
" मला अजून काहीच समजले नाही "
" ग्रीक सम्राट विश्वविजेता अलेक्झांडर याने सुद्धा त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला होता. एक अदृश्य झालेले शहर आहे. त्याने त्याचे नाव शांग्रीला असे नोंदवलेले आहे. "
" शांग्रीला ? एका सोसायटीचे नाव वाचलेय बरेच वेळा. पण त्याचा असा अर्थ असेल असे वाटले नव्हते "
फादर हसले.
" त्या गडप झालेल्या शहराचा आणि दक्षला मिळालेल्या कसल्यातरी सीक्रेट्सचा संबंध असावा. मलाही नक्की माहिती नाही."
" आता दक्ष कुठे आहे ?"
" काहीच सांगता येत नाही. असेल तर कुठेतरी लपून असेल. जर कुणाच्या हाती लागला असेल तर..."
आईच्या चेहर्यावर ताण दिसू लागला. तिच्या अंगाचा थरकाप उडाला.
" घाबरू नका. असेच असेल असे मी म्हणत नाही. पण शक्यता नाकारून, सत्यापासून पळून काहीच उपयोग नाही"
झिलमिलला त्यातून इतकेच समजले होते की बाबा निर्दोष आहे.
त्याला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्याला तो मिळाला नाही तर तो मिळवून देण्यासाठी आयुष्य पणाला लावण्याचा निर्धार तेव्हांच तिने केला होता. पण त्या वेळी ती अजून इतकीही मोठी झालेली नव्हती. खूप लहानही नव्हती.
आणि आता तिला हे ही कळून चुकले होते कि बाबाचा शोध घेणे इतके सोपे नाही.
पुढची आव्हाने तर पुढेच पण घरातून परवानगी मिळेल असे वाटत नव्हती.
ला लढाईला सुरूवात घरापासून करावी लागणार होती.
एक एक पाऊल फुंकून फुंकून टाकावे लागणार होते. अनेकांची मदत लागणार होती.
आणि नाही मिळाली तर मग ....
एकटीनेच ही लढाई लढण्याचा निश्चय , निर्धार अधिकच पक्का होत चालला होता.
पुढील भागाकडे जाण्यासाठी कृपया इथे टिचकी मारा.
एकदम रोमांचक...
एकदम रोमांचक...
छान! वाचतोय.
छान! वाचतोय.
थँक्स धनवन्ती, कॉमी.
थँक्स धनवन्ती, कॉमी.
उत्सुकतेनं वाचतेय.
उत्सुकतेनं वाचतेय.
बेस्ट जमतोय प्लॉट, तुमची शैली
बेस्ट जमतोय प्लॉट, तुमची शैली पण भारी आहे, लवकर लवकर पुढील भाग टाका आता उत्सुकता खूप वाढली आहे
मस्तच.. पुढचा भाग लवकर
मस्तच.. पुढचा भाग लवकर येऊद्या.
कथेचा आवाका मोठा दिसतोयं..
कथेचा आवाका मोठा दिसतोयं.. कथेत बरीच पात्र असावीत..
छान आहे हा भागसुद्धा..!
छानच ......
छानच ......
इन्टरेस्टिंग आहे सुरुवात .
इन्टरेस्टिंग आहे सुरुवात . येऊ द्या पुढचे भाग.
पुढचे भाग पटपट टाका...
पुढचे भाग पटपट टाका... उत्सुकता वाढली आहे!
मस्त सुरवात..प्लीज वेळेवर भाग
मस्त सुरवात..प्लीज वेळेवर भाग टाका म्हणजे लिन्क तुटणार नाही. पु ले शु!
मस्त....
मस्त....
रोचक !
रोचक !
सर्वांचे आभार.
सर्वांचे आभार.
पटापट भाग आले नाहीत तर काय होतं याची कल्पना आहे. खूप महिन्यांपासून माहिती घेण्यातच वेळ गेला. आता कथासूत्रात बांधताना एखादा तपशील अनवधानाने घाईत चुकीचा आला तर पुढच्या भागात ते अडचणीचे होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागतेय. त्यामुळे एखादा भाग विलंबाने आला तर आपण समजून घ्याल ही प्रार्थना आहे. __/\__
रूपाली - कथेचा आवाका मोठा आहे
रूपाली - कथेचा आवाका मोठा आहे पात्र वाढली तर एव्हढे सगळे लिहायला वेळ कसा पुरणार ही पण धाकधूक आहे.
उत्कंठावर्धक..
उत्कंठावर्धक..
उत्कंठावर्धक..
.
छान लिहिलंय ,,,
छान लिहिलंय ,,,
लई भारी !
लई भारी !
मस्त फँटसि वाचायला मिळणार असं दोन भाग वाचून वाटतंय .
पुभाप्र पुलेशु
मस्त लिहितीएस.
मस्त लिहितीएस.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत!
मस्त लिहीत आहेस. खुपचं छान.
मस्त लिहीत आहेस. खुपचं छान. जरा विचारपुस बघणार का?
इन्टरेस्टिंग सुरुवात! मस्त
इन्टरेस्टिंग सुरुवात! मस्त लिहित आहात . पुभाप्र
पुभाप्र....
पुभाप्र....
छान लिहताय. चांगली सुरुवात.
छान लिहताय. चांगली सुरुवात. लवकर टाका पुढचे भाग.
पुढील भाग टंकला का ?????
पुढील भाग टंकला का ?????