जर्मनी : एका वेड्या राजाचे स्वप्न : नॉईश्वानस्टाईन कॅसल
(म्युनिक- नॉईश्वानस्टाईन कॅसल डे टूर - भाग २)
Neuschwanstein Castle-Dream Of A Mad King, Munich-Neuschwanstein Castle Day Tour : Part -2
मुखपृष्ठ – ००१
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आटपाट नगर होतं. त्यावर एक राजा राज्य करीत होता. पण तो होता "वेडा". . .
अशा गोष्टी आपण बालपणी वाचल्या.
पण आज मात्र आपण खरंच एका वेड्या राजाची कहाणी पाहणार आहोत.
ह्या राजाला आलम दुनियेत वेडा राजा लुडविग (Mad King Ludwig) म्हणून ओळखले जातं.
त्यालाच Swan King असेही म्हणत.
परिकथेतील राजा (Fairy Tale King) म्हणूनही तो ओळखला जाई.
लहरी राजा हेही त्याचे नामाभिधान.
आणि Shy King Ludwig म्हणूनही तो प्रसिद्ध होता.
ह्या वेड्या राजाने एक स्वप्न पाहिलं, "एक किल्ला बांधण्याचं", आणि त्याच्या स्वप्नातला हा किल्ला म्हणजे नॉईश्वानस्टाईन कॅसल जो जगातला सर्वात जास्त भेट दिला जाणारा किल्ला आहे.
या राजाचं आयुष्य पाहिलं आणि त्याची स्वप्न पाहिली तर मी मात्र याला वेडा राजा न म्हणता
"मनस्वी राजा" म्हणीन आणि त्याने बांधलेल्या नॉईश्वानस्टाईन कॅसलला म्हणीन,
”एका मनस्वी, कलंदर, कलावंत राजाची निर्मिती”.
(इथे एक गोष्ट स्पष्ट करावीशी वाटते, ती म्हणजे किल्ला म्हटल्यावर आपल्याला शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील किल्ले, Forts आठवतात. इथे Castle याचा एक अर्थ किल्ला असा होतो. पण युरोपमधील "Castle" म्हणजे एखाद्या सरदाराचं, उमरावाचं किंवा मोठ्या माणसाची, संरक्षणाची व्यवस्था असलेली त्यांची रहायची जागा. त्यामुळे Castle म्हणजे गढी असाही एक अर्थ आहे.)
कधीकधी माणूस पहाताना वास्तू कळते तर कधी वास्तू पहाताना माणूस कळतो याच उत्तम उदाहरण म्हणून राजा लुडविग- II आणि नॉईश्वानस्टाईन कॅसल या जोडगोळीकडे पहायला हवं.
या सुंदर किल्ल्याला "परिकथेतील किल्ला" (Fairy Tale Castle), ”Disney Story Book Castle”, “Cindrella's Castle” असंही म्हटलं जातं.
आल्प्सच्या अंगाखांद्यावरच्या अल्पाईन जंगलाच्या आणि पायथ्याच्या अतिशय विहंगम अशा गवता - कुरणाच्या (Meadows) निसर्गसौंदर्यामध्ये वसलेल्या एका टेकडीवर या किल्ल्याचं बांधकाम केलंय.
मुळात हा किल्ला आल्प्स पर्वतातल्या एका टेकडीवर बांधल्यामुळे त्याची उंची वाढलेली आहे आणि त्या उंचीवरून होहेनश्वांगॉव गावाच्या अतिशय सुंदर निसर्गाचं आणि दरीचं मंत्रमुग्ध करणार दर्शन होतं.
प्रथमदर्शनी हा किल्ला आपल्याला मध्ययुगीन काळातील किल्ल्याची प्रचिती आणून देतो.
म्युनिकवरून याच राजाचा लिंडरहॉफ पॅलेस आणि भित्ती चित्रांसाठी प्रसिद्ध असलेले वाटेतील ओबरआमेरगॉव हे गांव पाहिल्यावर आमच्या डे टूरची बस होहेनश्वांगॉव गावात पोहोचली ज्या गावात हा नॉईश्वानस्टाईन किल्ला वसलेला आहे.
मात्र गावात पोहोचण्याआधीच नॉईश्वानस्टाईन किल्ल्याने त्याचे दर्शन लांबवरूनच द्यायला सुरुवात केली.
प्रचि - ०१:
प्रचि - ०२:
इथे आम्हाला उतरवल्यावर आधी जवळपासच्या रेस्टॉरंट्समध्ये जेवण आटपून घ्यायचे होते आणि नंतर एका मिनी बसने किल्ल्याजवळ जायचे होते.
किल्ल्यामध्ये जाण्यासाठी घोडागाडीचा पर्यायही होता. अर्थात चालत जाणारे पर्यटकही होतेच.
प्रचि - ०३: ह्या तिकीट हॉलपाशी आम्ही बसमधून उतरलो.
प्रचि -०४: ज्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही लंच घेतले, त्याच्या दर्शनी भागातही ओबरआमेरगॉव सारखी रंगीत भित्तिचित्रे काढलेली होती.
प्रचि -०५: जेवून झाल्यावर थोडं पुढे गेलो आणि मागे पाहिलं तर पुन्हा नॉईश्वानस्टाईन किल्ल्याचं दर्शन झालं.
प्रचि -०६: गांवातून दिसणारा नॉईश्वानस्टाईन कॅसल
प्रचि -०७ : नॉईश्वानस्टाईन कॅसलच्या वाटेवर लागतो होहेनश्वांगॉव कॅसल, ज्यामध्ये लुडविग- II राजाचं बालपण गेलं.
प्रचि -०८ : होहेनश्वांगॉव कॅसल
प्रचि – ०९: किल्ल्यावर जाण्यासाठी असलेली घोडागाडी (काय मस्त दणकट, धष्टपुष्ट घोडे आहेत नां…..?)
प्रचि – १०: होहेनश्वांगॉव कॅसल जवळून
प्रचि – ११: होहेनश्वांगॉव कॅसल वरचे लुडविग राजाचे हंस चिन्ह
प्रचि – १२: किल्ल्याचा रस्ता चढाचा आहे ज्याच्यावरून मिनी बस पण शेवटपर्यंत जाऊ शकत नाही.
बस मधून उतरल्यानंतर थोड्या चढाच्या रस्त्यावरून वर जायला लागतं.
एखादं वळण चढून आपण वर आलो की सरळ रस्ता जातो किल्ल्याकडे आणि उजव्या हाताला एक वाट जाते ती मेरीच्या पुलाकडे.
प्रचि – १३: मेरीच्या पुलाकडे - ०१
प्रचि – १४: मेरीच्या पुलाकडे - ०२
लुडविग राजाने हा सुंदर किल्ला बांधायला तर घेतला. पण एवढं भव्य बांधकाम, देखणी इमारत जवळून पहाण्यापेक्षा थोडी दुरून पहिली आणि तीही नजरेच्या पातळीत (Eye Level ला) आणि त्यातूनही घरं, कुरणं, नदी, डोंगर आणि हे सर्व पहाडाच्या पार्श्वभूमीवर. . . .
तर त्यात एक आगळीच मजा येईल. आणि हे बांधकाम जसजस प्रगतीपथावर जाईल तसतसं आपलं स्वप्न साकार होताना दिसेल.
यासाठी ह्या वेड्या राजाने एक अफाट जागा शोधली . . . .
ती म्हणजे मेरीचा पूल (Mary's Bridge)
दोन पहाडांमधून वहाणाऱ्या आणि Pollat George Waterfall मधून उगम पावलेल्या Pollat Stream वर लुडविगच्या बाबांनी एक छोटासा कामचलाऊ लाकडी पूल बांधला होता आणि त्यांच्या पत्नीचे, राजा लुडविगच्या आईचे, मेरीचे (Queen Mary of Prussia) नाव दिलं होतं.
लुडविगने हा लाकडी पूल संपूर्ण पणे लोखंडी कामाने बांधला.
येणारे सर्व पर्यटक आधी ह्या मेरीच्या पुलावर येतात. तिथून डोळे भरून हा किल्ला पाहतात. फोटो काढतात आणि मग मात्र फिरून किल्ल्याकडे जातात.
प्रचि – १५: मेरीच्या पुलावरून दिसणारा नॉईश्वानस्टाईन कॅसल ०१
प्रचि – १६: मेरीच्या पुलावरून दिसणारा नॉईश्वानस्टाईन कॅसल ०२
दिवसा झोपणाऱ्या या राजाला दिवस झोपून काढल्यावर दिवसभरात किल्ल्याच्या पुऱ्या झालेल्या कामाची उत्सुकता असायची.
मग हा भूतकाळात, मध्ययुगात रमणारा निशाचर वेडा राजा, रात्री या मेरीच्या पुलावर यायचा. (आधी लाकडी आणि नंतर लोखंडी),
आणि त्या रात्रीच्या अंधारात जो उजेड चंद्र, ताऱ्यांचा असेल, बांधकामाच्या जागेवर पेटवलेल्या दिव्यांचा, मशालींचा उजेड असेल किंवा उबेसाठी पेटवलेल्या शेकोटीचा असेल त्या उजेडात किंवा अंधारात; तोपर्यंत जेवढा पूर्ण झाला असेल तो हा मध्ययुगीन किल्ला, त्याचे स्वप्न पुरे होत असल्याचे पहात बसायचा.
जशी विहिरीतील कासवीण आपल्या पिल्लांना नजरेने वाढवते. . . . . अगदी त्याचप्रमाणे स्निग्ध, स्वप्नाळू नजरेने.
या किल्ल्यावरून बलूनने फिरावं आणि हा किल्ला आणि त्याचा परिसर आकाशातून हंस पक्षाप्रमाणे पहावा अशीही या राजाची एक मनिषा होती.
प्रचि – १७: पुलाखालून खळाळत वहाणारा Pollat Mountain Stream. (हिवाळ्यात मात्र हा गोठतो)
प्रचि-१८: मेरीच्या पुलावरून दिसणारा नॉईश्वानस्टाईन कॅसल ०३
प्रचि - १९: मेरीच्या पुलावरून दिसणारा नॉईश्वानस्टाईन कॅसल ०४
मेरीच्या पुलावरून हा किल्ला पाहताना नॉईश्वानस्टाईन कॅसल एवढा सुंदर का मानला जातो,
का हा किल्ला भेट देणाऱ्या प्रत्येकाच्या मनावर गारुड करतो,
का प्रत्येक पाहणाऱ्याची नजरबंदी करतो,
याचं कारण समजतं.
आल्प्स पर्वताचं सानिध्ध्य, याच पर्वतामधली एक टेकडी, सभोवताली अल्पाईन जंगल, टेकडीचा विस्तार थांबतो तिथे गवताळ कुरणं, त्यात चरणाऱ्या धष्टपुष्ट जर्मन गायी, उतरत्या छपरांच्या घरांची लोकवस्ती, त्या पलीकडे कायम वहात असलेली नदी (हिवाळ्यात गोठत नाही तोपर्यंत), पर्वतावरूनच वहाणारा स्वछ पाण्याचा धबधबा आणि त्यातूनच वहाणारा, किल्ल्याला पाणी पुरवणारा आणि नंतर पुढे नदीला जाऊन मिळणारा झरा.
आणि त्या टेकडीच्या खडकाळ मजबूत उंचवट्यावर वसलेला ठाशीव कॅसल, गोलाकार उंच खांबांनी त्याला आलेली मृदुता आणि लाभलेलं सौंदर्य, त्याचे भरभक्कम बुरुज आणि एखाद्या अर्जुन वृक्षाप्रमाणे किंवा उंच महोगनी वृक्षाप्रमाणे आकाशाला चिरत जाणारे अरुंद slender तरीही उंच बळकट, शेवटाला निमुळते होत जाणारे, टोकेरी, अणुकुचीदार मनोरे.
आणि यामुळे एकाचवेळी तळाशी जमिनीच्या छाताडात पाय रोवून त्याच्या बुरुजांसह घट्टपणे उभा असल्याचा सामर्थ्यशाली भास आणि जसजशी वरती नजर जाईल तेव्हा त्या खांबा / मनोऱ्यांमुळे होणारा अधरतेचा, तरंगल्याचा आभास (Floating Effect) यामुळे ह्या किल्ल्याला तो खास परिकथेतल्या किल्ल्याचा तरल, Fantasy Feel आला आहे.
या किल्ल्याच्या डिझाईनमध्ये लुडविगचा एवढा हस्तक्षेप होता कि हे डिझाईन आता किल्ल्याच्या आर्किटेक्टपेक्षा लुडविगचे म्हणूनच ओळखले जाते.
या किल्ल्याच्या परिकथेच्या स्वरूपाने, आर्किटेक्चरने वॉल्ट डिस्नेलाही मोहित केलं आणि त्यावरून प्रेरणा घेत तो त्याची प्रसिद्ध जादूनगरी बनवायला प्रवृत्त झाला आणि डिस्नेवर्ल्ड फ्लोरिडा मधला Cinderella Castle आणि डिस्नेलँड पॅरिस मधला Sleeping Beauty Castle यांचे डिझाईन त्याने ह्या किल्ल्यावर बेतले.
एवढंच नव्हे तर या किल्ल्याला त्याने Disney कंपनीच्या लोगोमध्येही स्थान दिले.
प्रचि -२०: Disney Logo – 01 (प्र.चि. आंतरजालावरून साभार)
प्रचि -२१: Disney Logo – 02 (प्र.चि. आंतरजालावरून साभार)
प्रचि -२२: Disney Logo – 03 (प्र.चि. आंतरजालावरून साभार)
लहान मुलांच्याच नव्हे तर मोठ्या माणसांच्या मनावरही (ज्यात मीही आलो) ज्या वॉल्ट डिस्नेच्या कार्टून फिल्म्स, अॅनिमेशन फिल्म्स ने प्रचंड गारुड केलेलं आहे त्या माणसाच्या मनावर ह्या किल्ल्याने गारुड करावं आणि त्याने ह्या किल्ल्याला स्वतःच्या कंपनीच्या लोगोमध्ये कायमस्वरूपी स्थान द्यावं यातच नॉईश्वानस्टाईन कॅसल ची महती सामावलेली आहे.
ह्या मेरीच्या पुलावरून किल्ल्याचं दर्शन घेतल्यावर आमच्याकडून एक चूक घडली.
ती म्हणजे आम्ही मेरीच्या पुलावरून किल्ल्यासाठी परत मागे येण्याऐवजी गैरसमजुतीमुळे पूल ओलांडून पलीकडच्या डोंगरावर गेलो. ह्या पायवाटेवरून एक ५-७ मिनिटं गेल्यावर एक ट्रेकर्सचा ग्रुप लागला. त्यांनी आमची वाट चुकलीय हे सांगून परत माघारी पाठवलं. त्यात आमची १५-२० मिनिटं वाया गेली.
पण ते भेटले नसते तर काही खरं नव्हतं.
म्हणजे परत आलो असतो, पण वाट चुकल्यामुळे एखाद दीड तास चुकीमुळे वाया गेला असता तर किल्ला बघायला वेळच मिळाला नसता. नुसताच भोज्ज्या.
प्रचि – २३: हि ती चुकलेली वाट...
(खरं तर ही वाट पुलापलीकडच्या डोंगरावर जाते. तिथून नॉईश्वानस्टाईन कॅसलचा अजून एक छान आणि उंचावरून दर्शन घडवणारा Point आहे. पण वेळेचे हे चोचले बॅग पॅकर्सना परवडतात, Day Tour वाल्यांना परवडत नाहीत.)
प्रचि – २४: परत मेरीच्या पुलावरून दिसणारी नदी, तिच्या काठावरचं गांव, घर. कुरणं आणि नॉईश्वानस्टाईन कॅसलचा एक कोपरा ...
प्रचि – २५: हे आता बरोबर रस्त्याला लागल्यावर, रस्त्यावरून दिसणारा कॅसल...
प्रचि- २६: आणि हि जंगलामधून दिसणारी बाजूची उतरती वाट जी चढून आम्ही आलो होतो...
प्रचि - २७: किल्ल्याचे बाहेरील (तटबंदीतील) प्रवेशद्वार
प्रचि – २८: हे लांबून दिसणाऱ्या मेरीच्या पुलाचे दर्शन (किल्ल्याच्या प्रांगणातून) – ०१ (Long Shot)
आणि खाली धबधबा......
प्रचि- २९: हे लांबून दिसणाऱ्या मेरीच्या पुलाचे दर्शन (किल्ल्याच्या प्रांगणातून) – ०२ (Mid Shot)
प्रचि- ३०: हे लांबून दिसणाऱ्या मेरीच्या पुलाचे दर्शन (किल्ल्याच्या प्रांगणातून) – ०३ (Close Up)
प्रचि-३१ : किल्ल्याचे जवळून पहिले दर्शन...
कला आणि स्थापत्य याला आयुष्य वाहिलेला राजा लुडविग शास्त्रीय संगीताचा मोठा भोक्ता होता. जागतिक कीर्तीच्या रिचर्ड वॅगनर या संगीतकार आणि नाट्य दिग्दर्शकाचा राजा लुडविग खूप मोठा चाहता आणि पाठीराखा होता. हा किल्ला त्याने वॅगनरच्या सन्मानार्थ बांधला आणि या किल्ल्यातल्या बऱ्याच खोल्या वॅगनरच्या संगीतिकांमधल्या (Operas) पात्रांवर बेतलेल्या आहेत.
नॉईश्वानस्टाईन चा शब्दशः अर्थ म्हणजे "नवा हंस किल्ला". हे नाव वॅगनरच्या हंसाच्या आकाराच्या नौकेतून येणाऱ्या आणि राजकन्येची सोडवणूक/सुटका करणाऱ्या गूढ हंस सरदारावर (The Swan Knight) आणि त्या परिकथेवर बेतलेलं आहे.
प्रचि – ३२: हंस सरदार (Swan Knight) (प्र.चि. आंतरजालावरून साभार)
प्रचि - ३३: बुरुज
प्रचि- ३४: किल्ल्याचा कोपरा आणि रंगीत दगडी भिंत...
प्रचि-३५: प्रत्यक्ष किल्ल्याचे प्रवेशद्वार
या किल्ल्याला विरोधाभासाचा किल्ला (Castle of Paradox) असंही म्हणतात. कारण १९ व्या शतकामधे हा मध्ययुगीन काळातील म्हणजे १५ व्या शतकातला किल्ला बांधला गेला आहे. आणि १५ व्या शतकातल्या बांधकामातल्या संरक्षणात्मक युक्त्यांचा / तरतुदींचा १९ व्या प्रगत शतकात काहीच उपयोग नव्हता.
मात्र या किल्ल्याचा अंतर्भाग त्या काळातल्या, १९ व्या शतकातल्या अत्यंत आधुनिक सुख-सोयींनी युक्त आहे. कारण लुडविग राजा टेक्नॉलॉजि बाबत अद्ययावत होता. बहुश्रुत होता. आणि त्या सर्व अद्ययावत सुखसोयी वापरण्याकडे त्याचा कल होता.
या किल्ल्याचं बांधकाम सन १८५९ मध्ये सुरु झालं आणि ते तीन वर्षात पूर्ण करायचे असा लुडविगचा मानस होता. मात्र जरी बराचसा किल्ला पूर्ण झाला तरी परिपूर्ण किल्ला बनवण्याच्या ध्यासापायी लुडविगच्या आकस्मिक, अनपेक्षित, धक्कादायक, संशयास्पद आणि गूढ मृत्यूपर्यंत म्हणजे सन १८८६ पर्यंतही १७ वर्षांच्या कालावधीत हा किल्ला संपूर्ण होऊ शकला नाही.
मात्र त्याच्या हयातीत ज्या १४ खोल्या पूर्ण झाल्या, त्यांचे अंतरंग अतिशय परिपूर्ण, भव्य, राजेशाही आणि तत्कालीन उच्च अभिरुचीचे आहे. या किल्ल्याच्या आतमध्ये उंच भिंतीने वेढलेल्या अतिशय सुंदर बागा आहेत. एवढंच नव्हे तर कृत्रिम गुहा सुद्धा आहेत. कारण लुडविगला गूढतेचे आणि एकांताचं (एकटं राहण्याचं) खूप आकर्षण होतं.
ह्या राजाच्या सापडलेल्या डायऱ्यांवरून, लिखाणांवरून या राजाचा कल Homo Sexuality कडे असावा असा अंदाज आहे. पण कट्टर कॅथोलिक धर्माच्या आत्यंतिक प्रभावाखाली, तत्कालीन चालीरीतीनुसार आणि राजघराण्यावर असलेली वावरण्याची बंधनं, त्यांचे आचार विचारांचे रीती रिवाज यामुळे लुडविगने त्याची हि उर्मी कधी व्यक्त केली नाही, करू शकला नाही. यामुळे याबाबत (त्याच्या Homo Sexuality बाबत) ठामपणे तसं होतंच, असं कुणाला म्हणता आलं नाही.
एक गोष्ट मात्र खरी की बव्हेरियाच्या सरदारकन्येबरोबर/ ऑस्ट्रियन राजकन्येबरोबर, सोफी बरोबर त्याचा वाड:निश्चय झाला होता. पण स्वतःचा कल लक्षात घेता आपण आपल्या वाग्दत्त वधूला न्याय देऊ शकणार नाही आणि तिचे आयुष्य वाया जाऊ नये या विचाराने बहुतेक, राजा लुडविगने ही सोयरीक मोडली. यावरूनही त्याची सहृदयता निदर्शनास येते. ह्या घटनेमुळेही तत्कालीन इतिहासकार त्याच्या ह्या कलाकडे बोट दाखवतात आणि त्याचा हा कल स्पष्ट होतो असे मानतात.
एक अतिशय खंत वाटणारी गोष्ट म्हणजे लिंडरहॉफ पॅलेसप्रमाणेच ह्या किल्ल्याच्या अंतर्भागाची छायाचित्रे काढण्यास ही मनाई आहे. मात्र मुख्य खोल्यांची टूर संपल्यावर आपण एका कॅफेटेरियामध्ये येतो. तिथपासून पुढच्या भागाची छायाचित्रे घेण्यास हरकत नाही.
पण तुम्हाला कल्पना येण्यासाठी एकच प्रचि आंतरजालावरून साभार घेऊन इथे देतो. कॅफेटेरिया लागतो
त्या आधी या राजाची सिंहासनासाठी राखलेली खोली लागते.
प्रचि- ३६ : सिंहासन कक्ष (आंतरजालावरून साभार)
भितिंवर देवदूतांची चित्रं रंगवलेली या किल्ल्यातील सिंहासनाची दुमजली खोली आर्किटेक्चरच्या Byzentime शैलीत बनवलेली आहे.
मात्र या खोलीत सिंहासन नाही. कारण राजा लुडविग दुर्दैवाने हि खोली पूर्ण व्हायच्या आधीच मरण पावला.
ही कामं करताना अफाट खर्च झाला. हि अशी भव्य आणि महाखर्चिक बांधकामे करताना, लुडविगने पैसे मात्र प्रजेचे वापरले नाहीत कि त्यांच्यावर कर लादले नाहीत.
त्याने हा सर्व खर्च त्याच्या खाजगी/ वैयक्तिक मालमत्तेमधून, संपत्तीमधून केला.
मात्र ही कामे केल्यामुळे बव्हेरियन जनतेला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला. (आपली रोजगार हमी योजनाच म्हणा नां)
आणि हा रोजगारही एकसुरी, काही विशिष्ट लोकांना मिळण्याऐवजी या बांधकामाच्या अफाट आणि चतुरस्त्र, आणि विविधांगी गरजांमुळे समाजातल्या जवळजवळ सर्व घटकांकडे झिरपला.
प्रत्येक बलुतेदार, प्रत्येक क्षेत्रातला कारागीर, तंत्रज्ञ, मजूर यांना रोजगारासाठी या बांधकामांचा आसरा होता. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कलावंतांची कलाही यामुळे बहरली आणि त्यांची आर्थिक सुस्थितीही.
या राजाने त्याची ही स्वप्नवत बांधकामे मजुरांच्या पाठीवर चाबकाचे फटके मारून निर्दयपणे पुरी केली नाहीत की अशा कलाकृती परत निर्माण होऊ नयेत म्हणून त्यांचे हात तोडले नाहीत. राजरोस चांगली मजुरी, चांगले मानधन देऊन करून घेतली.
अर्थात या प्रचंड खर्चामुळे राजा लुडविगला वैयक्तिकरित्या मोठी मोठी कर्जे काढावी लागली.
तरीही पुढचं काम करण्यासाठी राजा लुडविगने जेव्हा आणखी कर्ज घेण्याचा प्रस्ताव सभेपुढे ठेवला, तेव्हा Bavarian Parliament नी तो फेटाळला.
त्याच्या कर्ज घेण्याच्या प्रयत्नांना सुरुंग लावण्यासाठी बव्हेरियन पार्लमेंटने चार मानसोपचारतज्ज्ञांची टीम बनवली ज्यांनी त्याला एकमताने वेडसर, विवेकशून्य (Insane) ठरवून राज्यकारभार करण्यास असमर्थ असे जाहीर केले आणि या मतावर विसंबून पार्लमेंटने १० जून १८८६ ला त्याला अटक करून त्याची राजपदावरून पाय उतारणी केली.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे ह्या ४ पैकी ३ डॉक्टरांनी त्याची तपासणी साठी तर सोडाच पण उभ्या आयुष्यात कधीही भेट घेतलेली नव्हती.
तर मुख्य डॉ. गुडेन हे त्याला १२ वर्षांपूर्वी फक्त एकदा भेटले होते.
(शेवटी इतिहास हा जेत्यांकडून लिहिला जातो म्हणतात ते काही खोटे नाही.)
आणि यानंतर तीनच दिवसांनी म्हणजे दिनांक १३ जून १८८६ ला, वयाच्या ४० व्या वर्षी हा सव्वा सहा फूट उंचीचा, अट्टल पोहोणारा राजा Lake Starnberg तलावाच्या केवळ तीन फूट खोल भागात बुडून मरण पावलेला आढळला.
त्याच्या बरोबर त्याला वेडा म्हणून जाहीर करणारा मानसोपचारतज्ञही (Dr. Gudden) शेजारी मृतावस्थेत आढळला.
लुडविगने आत्महत्या केली असं जाहीर करण्यात आलं असलं तरी घातपात, कपट, आणि खुनाची शंकाही अनेकांनी व्यक्त केली आहे.
हा राजा जरी सणकी, तऱ्हेवाईक, थोडासा विक्षिप्त (Eccentric) असला तरी त्याचं हे असं वागणं राजघराणं, मंत्री, राजशिष्टाचाराशी संबंधित व्यक्तींशी होतं. स्वभावाने अंतर्मुख असला तरी सामान्य जनतेबाबत तो अतिशय प्रेमाने आणि भावनाप्रधानतेने वागे.
बव्हेरियन कंट्रीसाईड भागात फिरण्याची आणि तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांशी आणि मजुरांशी, कामकऱ्यांशी बोलायची त्याला आवड होती. या प्रवासादरम्यान जे त्याचे आदरातिथ्य करत त्यांना तो उदारपणे बक्षिसी देत असे.
या दयाळू, उदार स्वभावामुळेच सामान्य बव्हेरियन जनतेचा तो खूप लाडका राजा होता आणि अजूनही त्याची ही प्रतिमा बव्हेरियन जनतेमध्ये कायम राहिली आहे.
”Bavaria's Beloved King” हे बिरुद त्याला उगाचंच मिळालेलं नाही.
अवघं ४० वर्षांचं अल्पायुष्य, १८ व्या वर्षी डोक्यावर विराजमान झालेला राजमुकुट, जिथे रुबाबात मिरवायचं त्या राजेशाही लोकांमध्ये वावरताना लाजरेपणा, ज्यांच्यावर अधिकार गाजवायचा त्या सामान्य लोकांशी प्रेमाने वागण्याची वृत्ती, कदाचित Homo Sexuality कडे असणारा कल, एखादीच्या आयुष्याचं नुकसान होऊ नये म्हणून मोडलेला वाङनिश्चय, कल्पक स्वरूपाचे आणि अफाट खर्च करून बांधलेले उत्कृष्ट स्थापत्यशास्त्राचे नमुने, त्यासाठी प्रजेला यत्किंचितही तोशीस लागू न देता, उलट त्यांना कायमस्वरूपी रोजगार देणारी, उत्पन्न देणारी व्यवस्था व वृत्ती,
पूर्ण झालेल्या वास्तूत (लिंडरहॉफ पॅलेस) काही काळच राहायला मिळालेलं सौख्य आणि सर्वात अफाट, अचाट असलेल्या परिकथेतील नॉईश्वानस्टाईन कॅसलची निर्मिती पूर्ण होण्याआधीच, ती वस्तू पूर्णांशाने उपभोगण्याआधीच झालेला गुढ , अनपेक्षित मृत्यू यामुळे राजा लुडविग ५००० हुन जास्त पुस्तकं, अनेक नाटकं, फिल्म्स, कविता आणि नृत्यांचा विषय झाला आहे.
प्रचि-३७: जिथून फोटोग्राफीला हरकत नाही तो कॅफेटेरिया – ०१
प्रचि- ३८: कॅफेटेरिया - ०२ (ह्या प्रचि मधला छायाप्रकाश मला स्वतःला खूप आवडला)
प्रचि- ३९: कॅफेटेरिया - ०३ (भिंतीवर ओबेरामेरगॉव प्रमाणे भित्तिचित्रे)
या कॅफेटेरियाच्या बाहेर एक मोठ्या गोल दुहेरी खांबांनी वेढलेली छान गॅलरी आहे.
प्रचि -४०: त्या खांबांमधून दिसणारा हा मेरीचा पूल – ०१... आणि खाली धबधबा......
प्रचि- ४१: आणि त्या गॅलरीमधून दिसणारा किल्ल्याचा सभोवताल -०१
(मध्यभागी टेकडीवरचा होहेनश्वांगॉव किल्ला)
प्रचि – ४२: गॅलरीमधून दिसणारा किल्ल्याचा सभोवताल – ०२ (Overlooking Forggense Lake in the foot hills of Alps) आणि उजव्या खालच्या कोपऱ्यात होहेनश्वांगॉव किल्ला
प्रचि- ४३: गॅलरीमधून दिसणारा किल्ल्याचा सभोवताल – ०३ (गॅलरीच्या कोपऱ्यातून)
प्रचि-४४: गॅलरीमधून दिसणारा किल्ल्याचा सभोवताल – ०४ (गॅलरीच्या कोपऱ्यातून)
प्रचि-४५: गॅलरीमधून दिसणारा किल्ल्याचा सभोवताल – ०५ (हिरवी कुरणं आणि लोकवस्ती)
प्रचि- ४६: गॅलरीमधून दिसणारा किल्ल्याचा सभोवताल - ०६ (Forggense Lake)
प्रचि - ४७: गॅलरी च्या दोन दुहेरी खांबांमधून दिसणारा किल्ल्याचा सभोवताल - ०७
प्रचि- ४८: पावसाळी ढगांमुळे छान अंधारलेला परिसर
इथून आमचा किल्ल्यामधला परतीचा प्रवास सुरु झाला
प्रचि- ४९: हा शाही मुदपाकखाना - ०१
प्रचि - ५०: शाही मुदपाकखाना – ०२
प्रचि- ५१: किल्ल्याचे लाकडी मॉडेल
प्रचि- ५२: गूढ वाटणारा कॉरिडॉर - ०१
प्रचि- ५३: गूढ वाटणारा कॉरिडॉर - ०२
आता बाहेरून बसकडे परतीचा प्रवास आणि तो मात्र चालत.
प्रचि : ५४
प्रचि : ५५
प्रचि : ५६ (Worm’s Eye View of The Castle)
प्रचि : ५७
प्रचि - ५८: परतीची वाट
खरंतर अतिशय खाजगी निवासस्थान म्हणून बांधलेली हि इमारत आणि ते खाजगीच राहू द्यावं अशी अटकेच्या वेळी शेवटची (अंतिम) इच्छा व्यक्त केली असतानाही लुडविग राजाच्या मृत्यूनंतर ७ च आठवड्यात नव्या राजाने लोकांसाठी खुली केली.
आणि राजाचं निवासस्थान पाहायला आलेले लोक या किल्ल्याचं बाह्यरूप आणि अंतरंग बघून एवढे आश्चर्यचकित आणि थक्क झाले कि हा किल्ला पाहायला लोकांची, पर्यटकांची रीघ लागली.
त्यासाठी लावलेल्या तिकीट विक्रीतून एवढं उत्पन्न मिळायला लागलं कि खर्चाचा खड्डा असलेली हि इमारत, हा किल्ला बव्हेरियन तिजोरीसाठी आता उत्पन्नाची खाण ठरला आहे.
(प्रत्यक्ष वार्षिक उत्पन्न १.५ कोटी USD आणि हॉटेलमधला मुक्काम, खाणं-पिणं वगैरे अप्रत्यक्ष वार्षिक उत्पन्न ३.० कोटी USD) .
आणि जी गोष्ट एकेकाळी अफाट उधळपट्टी म्हणून गणली जात होती ती आता विस्मयकारक आणि अत्यंत हुशारीची गुंतवणूक (Brilliant Investment) ठरल्याचे सिद्ध झाले आहे.
ह्या किल्ल्याची मोहिनी इतकी आहे कि दरवर्षी जवळजवळ १३ ते १५ लाख प्रवासी/ पर्यटक याला भेट देतात. वसंत ऋतूत तर जवळजवळ सहा हजारापर्यंत पर्यटक रोज या वास्तूत असतात.
प्रचि- ५९: परिसरातील घरे
प्रचि- ६०: बसजवळ येताना परतीच्या वाटेवरून दिसायला लागलेला होहेनश्वांगॉव कॅसल
प्रचि- ६१: Bye -Bye नॉईश्वानस्टाईन कॅसल
हे साकार झालेलं अप्रतिम स्वप्न बघताना आतून खूप आनंद होत होता.
पण डे टूरच्या गाईडच्या तोंडून राजा लुडविगचं आयुष्य जाणल्यापासून मनाला एक बोच होती, टोचणी लागली होती. काही केल्या मनातला सल संपत नव्हता, खरं तर कळत नव्हता.
एखाद्या छान, गुबगुबीत, मऊ मखमली गादीच्या खुर्चीत बसल्यावर सुख पण व्हावं, बरं पण वाटावं पण कुठेतरी त्या गादीत चुकून राहिलेली सुई सतत, हळूहळू आपल्याला टोचत राहावी, त्या सुखाचा निर्भेळ आनंद घेता येऊ नये, स्वस्थ वाटू नये, असं काहीतरी. . . .
कायम एक अस्वस्थपणा, एक विषण्णतेचा थर हलके हलके मनावर पसरत जावा.
थोडा वेळंच भळभळत राहणाऱ्या रक्ताच्या जखमेपेक्षा कायम मंदपणे स्त्रवत राहणारी, झिरपत राहणारी जणू एखादी जखम . . . .
ते झिरपणारं रक्त कधी थांबत नाही आणि म्हणून माणूस पूर्णपणे कधी बराच होत नाही.
आणि हे फक्त परततानाच झालं असं नाही, तर नंतर जेव्हा जेव्हा या किल्ल्याचे फोटो पाहिले, जेव्हा जेव्हा या किल्ल्याची, या राजाची, या गारुड करणाऱ्या वातावरणाची सय आली, किंवा अगदी आत्ताही हा लेख लिहिताना कायम असंच वाटत राहिलं आहे.
प्रचि- ६२ : बसच्या खिडकीमधून दिसणारा संध्याकाळचा बव्हेरिया -०१
प्रचि- ६३ : बसच्या खिडकीमधून दिसणारा संध्याकाळचा बव्हेरिया -०२
प्रचि- ६४: बसच्या खिडकीमधून दिसणारा संध्याकाळचा बव्हेरिया- ०३
यानंतर आमच्या डे टुरवाल्या बसने आम्हाला सोडलं ते म्युनिकमधल्या एका बीअर हाॅल मध्ये.
प्रचि- ६५: बीअर हाॅल- ०१
प्रचि- ६६: बीअर हाॅल- ०२
प्रचि- ६७: बीअर हाॅल- ०३
हे सर्व आटपून म्युनिकमधल्या अपार्टमेंटमध्ये आलो. पण हा किल्ला काही पाठ सोडत नव्हता. आणि अजूनही त्याने माझी पाठ सोडलेली नाही. डिस्नेचा लोगो टी. व्ही. वर, थिएटर मध्ये आला कि हा किल्ला हटकून आठवतोच आठवतो.
या किल्ल्याबद्दल माझ्या काही अपुऱ्या इच्छा आहेत. काही स्वप्न आहेत. त्यापैकी काही म्हणजे:
o मावळतीच्या संध्या प्रकाशात हा किल्ला मेरीच्या पुलावरून पहायचा.
o पौर्णिमेचा चंद्रप्रकाश सांडलेला हा किल्ला मेरीच्या पुलावरून पहायचा.
o अमावास्येच्या ठार काळोखात जेव्हा आकाशात तारांगण नुसतं पेटलेलं असतं तेव्हा हा किल्ला मेरीच्या पुलावरून पहायचा.
o सूर्योदयाच्या आधीपासूनच हळू हळू उजळत जाणाऱ्या प्राचीच्या वेळी/ त्या प्रकाशात सूर्योदयाच्या केशरी उजळत जाणाऱ्या प्रकाशात हा किल्ला मेरीच्या पुलावरून पहायचा.
प्रचि -६८: पौर्णिमेच्या प्रकाशात उजळलेला किल्ला (प्रचि आंतरजालावरून साभार)
पण त्यापैकीही तमन्ना म्हणावी तर अशी कि :
मेरीच्या पुलाच्या अलीकडे किंवा पलीकडे कॅम्पिंगचा एक तंबू ठोकायचा. काही समानधर्मी किंवा प्रवासी वेडे मित्र सोबत घ्यायचे. रात्रीच्या Packed Food /Dinner ची काहीतरी सोय करायची.
रात्री जागं रहाण्यासाठी आणि रात्र जागवण्यासाठी गरमागरम चहा, कॉफीचे भलेमोठे थर्मासच्या थर्मास भरून ठेवायचे (पेय ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे )
आणि जेव्हा भुरभुरता हिम वर्षाव होत असेल अशा ऋतूमध्ये सूर्यास्ताच्या आधीपासून ते दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयानंतर पर्यंतची एक रात्र हा परिकथेतला किल्ला बघत काढायची. . . .
जास्त मेरीच्या पुलावर, थोडीशी तंबूमध्ये. . . .
थंडी वाजू नये यासाठी सर्व जामानिमा चढवून चहा/कॉफीचे घुटके घेत संध्याकाळी स्पष्ट दिसणाऱ्या किल्ल्यापासून हळूहळू अस्पष्ट होत जाणाऱ्या आणि केवळ काळ्या बाह्यकृतीमध्ये (Silhouette)/ तिमिराकृतीमध्ये परावर्तित होणारा रात्रीचा किल्ला, त्याचे आकाशात शिरू पाहणारे टोकदार, उंच सुळक्यासारखे मनोरे पहात.
आता नांदता झाल्यामुळे काही ठराविक भागात उजेड असेल, एखाद्या गवाक्षातूनही पिवळसर मंद उजेड झिरपत असेल त्या मर्यादित प्रकाशात दिसणारं थोडंफार बाह्यरूप. . . .
आणि हे सारं त्या शिशिरातल्या हिमवृष्टीने न्हायलेल्या, माखलेल्या एक जिनसी आसमंतामध्ये…..
“हिम ल्यायलेला तो परिकथेतील नॉईश्वानस्टाईन कॅसल.”
डोळ्यावर फारच पेंग आली तर एखादी छोटीशी झोप काढायची त्या तंबूमध्ये. पण आपल्या डोळ्यांनीही तीच स्वप्न पाहायची जी त्या वेड्या, मनस्वी राजाने पाहिली होती. . . . .
वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या ऋतूंमध्ये, प्रकाशाच्या/अंधाराच्या वेगवेगळ्या तीव्रतांमध्ये, वेगवेगळ्या छटांमध्ये तोच तो परिकथेतील नॉईश्वानस्टाईन कॅसल पाहायची. . . . . - पुन्हा पुन्हा. . . . . .
आणि जाग आल्यावर ब्रिजवर जाऊन तेच स्वप्न प्रत्यक्षात आणायचं. (डोळ्यांमध्येही तीच स्वप्नं भरून). अगदी उगवत्या प्रसन्न सूर्यप्रकाशात तो किल्ला दिसेपर्यंत…..
कदाचित तो वेडा, मनस्वी राजा त्या आसमंतामध्ये कुठेतरी असेलही, त्याच्या त्या स्वप्नाळू डोळ्यांसह, त्याचा नॉईश्वानस्टाईन कॅसल पहात.
आणि कदाचित खुशही होईल त्याच्याच सारखे काही वेडे पीर पाहून. . ..
आणि असाच आसुसून तो किल्ला, त्या वातावरणात, त्या पुलावरून पाहणं, विशेषतः रात्रभर; हीच त्या राजाला, त्याच्या स्वप्नदृष्टीला, त्याने साकारलेल्या स्वप्नाला, त्याने निर्मिलेल्या अजोड कलाकृतीला मानवंदना असेल.
शिशिरात, हिमवृष्टीत मी तिथे गेलो नसल्याने त्या ऋतूतली छायाचित्र माझ्याकडे नाहीत. पण तुमच्यासाठी हि काही आंतरजालावरून साभार. . .
प्रचि- ६९: शिशिरातील नॉईश्वानस्टाईन कॅसल ०१. मागे हिमाच्छादित आल्प्स शिखरे (आंतरजालावरून साभार)
So. . . . . . सध्या तरी तंबूमधली एकच जागा भरलीय . . . - माझी. . . .
आणि अजून जागा तर आहेतच.....
तेव्हा समानधर्मी, समव्यसनी माबोकरांनी हात वर करा, नंबर लावायला. . .
स मा प्त
Disclaimer: हा ललित लेख असून इतिहास लेखन नाही.
@ निरू,
@ निरू,
डोळ्यांना सौंदर्याचा शीण झाला.
माझा हात वर समजा हो.
डोळे निवले पण मन नाही भरले.
डोळे निवले पण मन नाही भरले.
निरुदा, मस्त फोटो आणि वर्णनही
निरुदा, मस्त फोटो आणि वर्णनही.
कधीकधी माणूस पहाताना वास्तू कळते तर कधी वास्तू पहाताना माणूस कळतो याच उत्तम उदाहरण म्हणून राजा लुडविग- II आणि नॉईश्वानस्टाईन कॅसल या जोडगोळीकडे पहायला हवं.>>>>>मस्तच
खूप सुंदर लिहिलेत. फोटोही
खूप सुंदर लिहिलेत. फोटोही अतिशय सुरेख आलेत. शेवटचा परिच्छेद ... तुमची स्वप्ने पुरी होवोत.
बिअर गार्डनने पूर्ण निराशा केली. मला वाटले गार्डनमध्ये बसून बिअर प्यायची असेल...
अनिंद्य, पाथफाईंडर, जिप्सी .
अनिंद्य, पाथफाईंडर, जिप्सी ......
प्रतिसादाबद्दल आभार...
@ साधना,
@ साधना,
पुढच्या भागात बीयर गार्डन बाबत निराशा होणार नाही.
तिथे खरीखुरी गार्डन च असेल.
इथे मात्र हा बीयर हाॅल होता.
चूक दुरुस्ती केली आहे.
प्रतिसादाबद्दल आभार...
सुंदर
सुंदर
निरू, मस्त सफर घडवलीत या
निरू, मस्त सफर घडवलीत या किल्ल्याची! फोटो नेहेमीप्रमाणेच अप्रतिम!
तुमच्या स्वप्नात एक छोटीशी भर ... मेरीच्या पुलावरून हा किल्ला बघताना मागे रिचर्ड वागनरचं संगीतही असावं!
स्निग्धा, आभार...
स्निग्धा, आभार...
मस्त.. शेवटी लिहिलेल्या इच्छा
मस्त.. शेवटी लिहिलेल्या इच्छा फारच जबरी आहेत.. त्या पूर्ण व्हाव्यात..
छान लेख व फोटो.
छान लेख व फोटो. हैद्राबादेतील राजीव रेड्डी ह्या बिल्डर होटेलिअर ने ( ऑफ कंट्री क्लब फेम) ह्यावरून इन्स्पायर होउन असेच दिस णारे अमृता कासल नावचे एक हॉटेल बांधले आहे. पण ते चुकीच्या जागी आहे. अगदीच मेन रोड वर आहे. सेक्रेटेरिअट च्या समोर. त्या ऐवजी जरा डोके लढवऊन मागचे उंचावरचे रिट्स्झ हॉटेल ची जागा घेउन तिथे बांधले अस्ते तर एक चांगला लँडमार्क झाला असता. मी अॅडवरटाइझिंन्ग मध्ये अस्ताना ह्या हॉटेलचे काम चालू होते . आतल्या खोल्या अगदी बारक्या आहेत. गुड आयडिया बॅडली एक्सिक्युटेड असे वाट्ते. त्यामानाने हा मूळ कॅसल किती सुरेख आहे.
जर्मन लोकांबद्दल काहीच भरोसा उरलेला नाही सर्व वर वर छान दिसते आहे.
<<< तुमच्या स्वप्नात एक
<<< तुमच्या स्वप्नात एक छोटीशी भर ... मेरीच्या पुलावरून हा किल्ला बघताना मागे रिचर्ड वागनरचं संगीतही असावं! Happy >>>
@ गौरी ...
तसं झालं तर बहारंच येईल...
आणि प्रतिसादाबद्दल आभार...
फारच सुंदर
फारच सुंदर
बकेट लिस्ट मध्ये पहिल्या स्थानावर गेलाय हा किल्ला
आणि तुम्ही म्हणताय तसा तंबूत बसून तर अहाहा
फारच सुंदर ... फोटो आणि लिखाण
फारच सुंदर ... फोटो आणि लिखाण ही.
सुंदर..लेख, गोष्ट, वर्णन अन
सुंदर..लेख, गोष्ट, वर्णन अन प्रचिही..
सुंदर वर्णन व अप्रतिम प्रचि !
सुंदर वर्णन व अप्रतिम प्रचि ! दिल खुश हो गया !
हिम्सकूल, आशुचँप, मनीमोहोर,
हिम्सकूल, आशुचँप, मनीमोहोर, टीना, मंजूताई....
आभार....
@ अमा
@ अमा
<<<< छान लेख व फोटो. हैद्राबादेतील राजीव रेड्डी ह्या बिल्डर होटेलिअर ने ( ऑफ कंट्री क्लब फेम) ह्यावरून इन्स्पायर होउन असेच दिस णारे अमृता कासल नावचे एक हॉटेल बांधले आहे. पण ते चुकीच्या जागी आहे. अगदीच मेन रोड वर आहे. सेक्रेटेरिअट च्या समोर. त्या ऐवजी जरा डोके लढवऊन मागचे उंचावरचे रिट्स्झ हॉटेल ची जागा घेउन तिथे बांधले अस्ते तर एक चांगला लँडमार्क झाला असता. मी अॅडवरटाइझिंन्ग मध्ये अस्ताना ह्या हॉटेलचे काम चालू होते . आतल्या खोल्या अगदी बारक्या आहेत. गुड आयडिया बॅडली एक्सिक्युटेड असे वाट्ते. त्यामानाने हा मूळ कॅसल किती सुरेख आहे. >>>
आज अमृता कॅसल ची वेबसाईट पाहिली....
खरंच, मूळ कॅसल किती सुरेख आहे...
आणि प्रतिसादाबद्दल आभार...
किती सुरेख जमलाय हा लेख.
किती सुरेख जमलाय हा लेख. वाचलाच नव्हता.
वेडा नव्हे कलंदर.. हे किती खरं लिहिलय. फोटोही खूप छान आहेत. लिन्क मित्र मैत्रिणींना पाठवलीच.
दाद,
दाद,
आपल्या हुरुप देणार्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार..
_/\_ _/\_
खूप सुंदर लेख आणि फोटो..
खूप सुंदर लेख आणि फोटो..
मनावर गारुड करणारा आहे हा प्रासाद
वाचनातून निसटला होता वाटते.
वाचनातून निसटला होता वाटते. आताच वाचला. लेख, छायाचित्रे अत्युत्तम. अगदी स्वप्ननगरी. राजा लुड्विग आणि त्याचे त्याच्या हयातीत पूर्ण न झालेले स्वप्न. पण स्वप्नाच्या पूर्ततेपेक्षा स्वप्न पाहाणे आणि ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न हेच रोमांचक आणि झिंग आणणारे असते. ती नशा त्याने अनुभवली असेल. ध्येयपूर्तीपेक्षा पूर्तीपर्यंतचा प्रवास अधिक आनंददायक असतो तसा.
आणखी एक गोष्ट म्हणजे संपूर्ण परिसर अतिशय स्वच्छ, सुशासित, उत्कृष्ट देखभाल राखलेला असा दिसतो. अर्थात बाहेर अनेक ठिकाणी हे सुशासन दिसतेच आणि आपल्याकडे का नाही अशी खंत वाटते.
किती सुरेख जमलाय हा लेख.
किती सुरेख जमलाय हा लेख. वाचलाच नव्हता.
वेडा नव्हे कलंदर.. हे किती खरं लिहिलय. फोटोही खूप छान आहेत. >>> +9999
सुंदर लेख आणि फोटोज तर
सुंदर लेख आणि फोटोज तर अप्रतिम!! खरंच परीकथेची सफर केल्यासारखे वाटले. मस्तच.
शशांकजी, भाग्यश्री१२३
शशांकजी, भाग्यश्री१२३ प्रतिसादाबद्दल धन्यवाद..
हीरा, खूप छान प्रतिसाद.. आवडला..
>>>पण स्वप्नाच्या पूर्ततेपेक्षा स्वप्न पाहाणे आणि ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न हेच रोमांचक आणि झिंग आणणारे असते. ती नशा त्याने अनुभवली असेल. ध्येयपूर्तीपेक्षा पूर्तीपर्यंतचा प्रवास अधिक आनंददायक असतो तसा.<<<
हे ही बरोबरंच...
लुडविगने जी स्वप्न पुरी होत असताना पाहिली, मेरीच्या पुलावर ज्या रात्री जागवल्या त्यांनी त्याला एक खूप छान, वेगळाच आणि बर्याच जणांच्या नशिबात नसलेला आनंद आणि एक अफाट, आगळीच नशा नक्कीच दिली असणार..
पण ध्येयपूर्ती आणि पूर्ती पर्यंतचा प्रवास हे दोन्ही एखाद्याच्या आयुष्यात येतात तेव्हा तर-तम भावाने तो म्हणतो की पूर्तीपेक्षा प्रवासंच मस्त होता रे..
पण ह्या बिचार्याला प्रवासच तेवढा मिळाला.. त्याचं मला नेहमी वाईट वाटत रहातं..
पुन्हा एकदा छान अभिप्रायाबद्दल धन्यवाद.. _/\_...
लाॅकडाऊन मधे घरबसल्या प्रवास
लाॅकडाऊन मधे घरबसल्या प्रवास करण्यासाठी धागा वर काढतोय...
किल्ली,
किल्ली,
तुमचा प्रतिसाद माझ्याकडून मिस झाला होता. आपल्या प्रतिसादाबद्दल आभार..
फोटोसहीत मस्त वर्णन. जर्मनीला
फोटोसहीत मस्त वर्णन. जर्मनीला भेट देण्याचं माझंही स्वप्न आहेच.
धन्यवाद पराग..
धन्यवाद पराग..