भाग - १
‘हं, बोला, देवाशपथ खरं सांगेन, खोटं सांगणार नाही.’पणअसं बोलूनसुद्धा हे सगळे खोटं सांगत होते. धडधडीत असत्य. पण त्यांना तरी दोष कसा द्यावा. जे दिसलं, जे ऐकलं तेच ते सांगत होते. यातून बाहेर पडण्याची आशा आता त्याला राहिली नव्हती. त्यानं वाचलेल्या सगळ्या सकारात्मक गोष्टी आतापर्यंत आठवून झाल्या होत्या. सगळ्या प्रार्थना रोज म्हणून झाल्या होत्या. जेंव्हा सारे रस्ते बंद व्हायचे तेंव्हा त्याला आई म्हणायची ते गाणं आठवायचं.
‘इतनी शक्ती हमे देना दाता
मन का विश्वास कमजोर हो ना.’
सा-या खडतर प्रवासात जेंव्हा कोणी जवळ नसायचं, तेंव्हा या गाण्यानं नेहमीच त्याच्या मनाला हत्तीचं बळ दिलं. आजकाल तो इतका कोसळून गेला होता की त्याला या गाण्याचे शब्दसुद्धा नीट आठवत नव्हते. पण आजही त्याला त्या दिवशीचं ते सारं लख्ख आठवत होतं. तो रडून देवाला साक्ष ठेवून सारं खरं सांगत होता पण कोणी विश्वास ठेवायला तयार नव्हतं.
निराशेनं खचून शेवटी तो गुडघ्यात डोकं घालून बसायचा. डोळे उघडे काय आणि बंद काय? त्याला आठवायचे त्याचे आई-बाप. अजून होतंच कोण?
वडील वॉचमन. आई किरकोळ शिवणकाम करायची. चिंतामण शिंप्याचं जुनं शिवणयंत्र आईनं हट्ट करून घेतलं होतं. चार ठिकाणी तारेनं आवळून ते चालतं केलेलं.वर्षभर किरकोळ-कारकोळ कामं मिळायची,घरखर्चाला तेवढाच दोन-पाचशे रुपयांचा हातभार. इतक्या कष्टानं पोरगं वाढवलं, शिकवलं. ते हुशार निघालं ही त्या गरिबीची जमेची बाजू. आई-बापाच्या खस्ता पाहत ते वाढलं, त्यानं त्यांचे कष्ट वाया जाऊ दिले नाहीत.
बारावीत मेरीटमध्ये आला. पेपरात फोटो आला. आई-बाप धन्य-धन्य झाले. त्या दिवशी बापानं सुट्टी घेतली. त्याला आवडतं म्हणून श्रीखंड आणलं,पाव किलोचा डबाच आणला. आईनं दिवसातून दहा वेळा त्याची अलाबला घेतली. २-३वेळा दृष्ट काढली असेल. हे सारं पाहून बाप मिशात हसत होता. उठून चार वेळा पेपरातला त्याचा फोटो पहात होता. त्याच्या पाठीवर ‘शाबास वाघा’ म्हणून हात फिरवत होता. त्याच दिवशी बापानं रोख ३०० रुपये मोजून ती पेपरची बातमी फ्रेम करून आणली आणि भिंतीवर टांगली. त्याला हाही दिवस लख्ख आठवत होता.
पुढं काय करायचं याचा विचार अजून पक्का नव्हता. पेढे द्यायला म्हणून बाप त्याला घेऊन पाटील सरांकडं गेला. पेढा देऊन सरांना हात जोडले. “सर, पोरगं तुमच्या पायावं घातलंय, तुम्ही सांगा आता पुढं कसं-कसं करावं? आम्हा अडान्याचा डी.यड. अन् आय.टी.आय. च्या पुढं नाय चालत इचार. माझ्या मतानं डी.यड. बरं राहीन. म्हंजे हा आपल्या नजरंत राहीन कायम. नौकरीबी ग्यारंटीशीर.”
सर हसले, “असं कुठं असतंय होय? अहो, वाघ बोर्डात आलाय, बोर्डात. अन् तुम्ही डी.एड. न आय.टी.आय. कुठं घेऊन बसले? हा डॉक्टर-इंजिनीअरच्या रेसचा गडी आहे. याला इंजिनीअरींगला घाला. आपले पाटील सर आहेत तिथं. तेबी पाटीलच. आबा पाटील. आमची भावकीच आहे. याला मिळून जाईल अॅडमिशन. मी रिझल्ट पाहिल्याबरोबर फोन केला होता.”
बापाला गोड गुदगुल्या झाल्या, पण इतक्या वर्षात आयुष्यानं त्याला जे शिकवलं ते तो विसरला नव्हता. आपण किती उडी मारावी याच्या मर्यादा त्याला आठवल्या. “पन सर, त्याची फीबीलईच राहीन, आपल्यासारक्याला झेपाय पायजे. नाय का?यवढा शिकला लई झालं.” बापाच्या गळ्यात आवंढा आला. पण खरं जे होतं ते बोलायला हवंच होतं.
सर म्हणाले, “त्याची तुम्हाला का चिंता? अहो सरकारी कॉलेज आहे. आपला गडी टॉपर आहे. यादीत बोट ठेवील तिथं याला अॅडमिशन. शिवाय मी याला स्कॉलरशिप मिळवून देतो. मी सारा विचार केलाच की हो. सारं बोलून झालंय. अंगावरच्या कपड्यावर फक्त तुम्ही याला पाठवा. एक रूपाया देऊ नका न बघा. नाय डिग्री घेऊन, साहेब होऊन परत आला, तर मग पुढं. हे पोरगं आपल्या शाळेची इज्जत आहे, इज्जत. काही अडचण आली तर तिथले पाटील सर आहेत क्लार्क, रात्री १२ वाजता त्यांच्याकडं जा, नाही म्हणणार नाहीत. आमच्या भावकीतच आहेत. त्यांच्या सख्ख्या आत्याची मुलगी दिली आहे आमच्या घरात.”
बापानं सरांचे तिथंच पाय धरले.
दोघंही घरी आले. आता कौतुक त्या दोन खोलीच्या घरात पुरेना. त्याला कुठं ठेवू न कुठं नको असं आईला झालेलं.
पुढं अॅडमिशनचे सोपस्कार झाले. एक दिवस आपली बॅग भरून तो होस्टेलला पोहोचला. २७ नंबरची खोली त्याला मिळाली होती. त्याला सोडायला त्याच्या बापाबरोबर सदाकाका आला, मामा आला. विशेष म्हणजे पाटील सर स्वत: आले, तिथली सारी व्यवस्था लावून द्यायला. तिथल्या आबा पाटील सरांच्या घरी सार्यांना घेऊन गेले. आबा त्याच कॉलेजमध्ये क्लर्क होते. निवृत्तीला चारेक वर्षं बाकी होती. तेही सज्जनच. एवढ्या चार-सहा माणसाचं जेवण त्या माऊलीनं रांधलं, गोडाचा स्वयंपाक केला.
निघताना आबा पाटलांनी या पाटील सरांची गळाभेट घेतली. “आता निमित्त आहे, येत जा” म्हणाले. वरुन त्यालाही म्हणाले,“कधीही काहीही अडचण आली, हे माझं घर. मी असलो नसलो, बाई असतात. सांगायला लाजायचं नाही. गरजेला कोणाकडून उधारी मागू नको. मी आहे. मी होस्टेलच्या मेसवाल्याला बोलतोच. तुझी ओळख करून देईन. होस्टेलपासून कॉलेज लांब आहे. माझ्याकडं सायकल आहे एक चांगली. पडूनच आहे. थोडी ठीकठाक करून हवा-बीवा भरून ठेवतो. उद्या घेऊन जाशील. काय?”
कोण कुठले सर, आपण कोण, ते कोण?नातं-गोतं नाही अशा माणसानं आपलं पोरगं काळजाशी धरावं. हे सारं बघून बाप समाधान पावला. पोरानं नशीब काढलं. चांगल्या ठिकाणी जाऊन पडलं. आता चिंता नाही. सोडायला आलेली मंडळी सुखा-समाधानानं परतली.
त्याला तोही दिवस लक्षात होता.
कॉलेज सुरू झालं. पाटील सरांनी दिला शब्द खरा केला होता. त्याला स्कॉलरशिप मिळवून दिली होती. फार नाही, पण कॉलेज आणि जेवणाखाण्याचा खर्च भागून वरखर्चाला हातात शे-पाचशे रुपये महिन्याला राहायचे. त्यात तो परिस्थिती जाणून काटकसरीनं, निगुतीनं रहात होता. आपलं ओझं कोणावरच; अगदी आपल्या आई-बापावरसुद्धा, पडू नये याची तो काळजी घेत होता. पैसे लागतातच कशाला? कॉलेजची थोडीफार फी भरली, वह्या-पुस्तकं, स्टेशनरी, खानावळ, अजून काय?कधी काय कुठं जायला सायकल होतीच. त्यानं आईची घराची मॅनेजमेंट खूप जवळून पाहिली होती. त्यामुळं वायफळ पैसा खर्चावा अशी कोणतीच सवय त्याला नव्हती. आपण बरं आणि आपलं काम बरं. दिवसभर कॉलेज, संध्याकाळी अभ्यास, असाईनमेंट्स, लायब्ररी. वेळ काढून संध्याकाळच्या बातम्यांपुरता टी.व्ही. हॉलमध्ये जात होता. बस.
त्याचं आता हे तिसरं वर्ष होतं. कॉलेजमध्ये त्याच्या नावाला विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्येसुद्धा किंमत आली होती. मोठ्या शहरातून आलेल्या पोरा-पोरींची लाईफस्टाईल बघून कधी-कधी त्याचं मन सैर-भैर होत असेल इतकंच. पण त्याच्यावर त्यानं नामी उपाय शोधला होता. आईच्या फोटोची एक रंगीत प्रिंट त्यानं खोलीत भिंतीवर लावली. हा फोटो पाहिला की त्याचं चित्त स्थिर होत होतं. नाही म्हणायला त्याला एक नाद लागला होता, तो म्हणजे पिक्चरचा. पण सारं सांभाळून पंधरा दिवसातून एक पिक्चर पहाणं म्हणजे काही वाईट गोष्ट मुळीच नव्हती. दारू, सिगारेट, मुली, अचकट-विचकट बोलणे, फॅन्सी हेअरकट हे सारं त्यानं निग्रहानं दूर ठेवलं होतं. त्याचं आयुष्याचं ध्येय अतिशय स्पष्ट होतं. एक चूक त्याच्या आई-बापासह त्याला धुळीत मिळवू शकत होती आणि याची त्याला पुरेपूर जाणीव होती. आयुष्य पुन्हा-पुन्हा संधी देत नसतं. मनाची चलबिचल झाली की तो आईच्या फोटोकडे पहात शांत बसून जाई.
मग त्याला त्याचं घर दिसू लागे. नालीला लागून कच्च्या वीटांना मातीचा गिलावा केलेल्या भिंती. वर पन्हळीचा पत्रा आणि तशाच अर्ध्या पत्र्याचं स्वयंपाकघराला पार्टिशन. पहाटेच्या अंधारात ४० च्या बल्बच्या पिवळ्या उजेडात,त्या तारेनं आवळून बांधलेल्या शिलाई मशीनच्या सुईत धागा ओवून कपडे शिवणारी आई त्याला मग दिसे. एकीकडे फरा-फरा आवाज करणार्या स्टोव्हवर तिनं भाजी शिजायला ठेवलेली असे. पहाटेच उठून घरकाम, वरकाम, नवरा, पोर, सारं तिनं जागच्या जागी अन् वेळच्या वेळी सांभाळलं.
त्याला आठवलं; एकदा चंदूशेठच्या बायकोनं साडी दिलेली अर्जंट फॉल लावायला आणि ब्लाऊज अल्टर करायला. हातातली कामं संपवून रात्री जागून तिचं काम केलं. सकाळी साडी-ब्लाऊज घेऊन गेलेली चंदूशेठची बायको परत आली आणि काम बिघडवलं म्हणून भांडण काढलं. चूक तिचीच होती. तिनं अंगावर माप न देता मोलकरणीच्या हातून मापासाठी दुसराच ब्लाऊज पाठवला. आईचं काम चोख असायचं. तरी तिनं पडती बाजू घेतली. स्वाभिमानी आणि करारी आईचं मन घट्ट होतं, पण गरिबीच्या ओझ्यानं ती इतकी वाकली होती की कधी मान वर करुन कोणाला दोन शब्द बोलू शकली नाही. ‘गरीबानं गरीबासारखंच रहावं. आपला मान आपल्या मनात, दुस-याला तोंड वर करुन आपला मान सांगू नये. कमीपणा घेऊन रहायचं. प्रेमानं प्रेम आणि रागानं राग वाढतो.’ हे तिचं तत्व.
आईनं दहा वेळा माफी मागितली. पण गरीबाला वाली नसतो. आई बिचारी सांगत होती, “मी भरून देते.” पण तिनं आईच्या तोंडावर कपडे फेकून दिले आणि म्हणाली, “तुझ्यासारख्या छप्पन बाया मी पोसते रोज, तुझी लायकी आहे का हे भरून द्यायची?” अजून काय-काय अन् काय. तो अंथरुणात पडूनच हे ऐकत राहिला. त्याला चीड आली. भयंकर चीड आली. स्वत:ची आली, त्या कडाकडा भांडणा-या चंदूशेठच्या बायकोची आली, तीन हजार रुपये महिना कमवून वॉचमनकी करणा-या बापाची आली, गरिबीची आली. त्याला ते असह्य झालं.
इंटरेस्टिंग सुरुवात..
इंटरेस्टिंग सुरुवात..
वाचते आहे. सुरूवात मस्त
वाचते आहे. सुरूवात मस्त झालीये.
मस्त सुरुवात झालीय...
मस्त सुरुवात झालीय...
Criminal Justice season 1 आठवला
मस्त सुरुवात. पुढील भागाच्या
मस्त सुरुवात. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
सुरूवात मस्त झालीये.
सुरूवात मस्त झालीये.
सुरुवात छानच झाली आहे!
सुरुवात छानच झाली आहे!
(तुम्ही कथाही लिहिता हे माहिती नव्हतं)
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
@वावे - काम, छंद, मित्र वगैरे काही ना काही कारणानं, अनेक किस्से समजत गेले. अनुभव येत गेले. कथा डोक्यात तयार होत गेली. तेच उतरवत गेलो. पहिला प्रयत्न आहे.
छान सुरुवात..
छान सुरुवात..
सुरूवात मस्त झालीये.
सुरूवात मस्त झालीये.
धन्यवाद वीरु, साद
धन्यवाद वीरु, साद
छान सुरुवात!
छान सुरुवात!