खुनी डॉक्टर व तारणहार आडनावबंधू

Submitted by कुमार१ on 20 April, 2022 - 05:51

अमेरिकेच्या नॉर्थ करोलीना राज्यातील एका गावात घडलेली ही सत्य घटना.

डॉक्टर बेंजामिन गिल्मर यांनी वैद्यकीय अभ्यासक्रम संपवून नुकतीच पदवी प्राप्त केली होती. आता त्यांची ग्रामीण भागातील एका दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली. डॉक्टरांनी त्यांचे शिक्षण कर्ज काढून घेतलेले होते. आताच्या नोकरीवर रुजू झाल्यानंतर त्या कर्जाची परतफेड करण्यास ते उत्सुक होते. मोठ्या उत्साहात ते संबंधित दवाखान्यात जाण्यास निघाले. तिथे पोचल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण दवाखाना गेली चार वर्षे बंद केलेला होता. अधिक चौकशी करता त्यांना मिळालेली माहिती अजूनच थरारक व धक्कादायक होती.

चार वर्षांपूर्वी तो दवाखाना कोणी एक विन्स गिल्मर नावाचे डॉक्टर चालवत होते. सन २००४मध्ये त्यांनी चक्क स्वतःच्या वडिलांचा खून केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि आता ते ती भोगत होते. या घटनेनंतर सदर दवाखाना बंद होता. हे सर्व ऐकल्यावर डॉक्टर बेंजामिन पुरते चक्रावून गेले. आपलाच एक आडनावबंधू इतके क्रूर कृत्य कसा काय करू शकला या विचाराने त्यांना अस्वस्थ केले.

ते नोकरीत रुजू झाले आणि त्यांचे दैनंदिन कामकाज सुरू झाले. दवाखाना सुरू झाल्याची बातमी पंचक्रोशीत पसरली आणि लवकरच तेथे रुग्णांची गर्दी होऊ लागली. चार वर्षांपूर्वीची ती घटनाच भीषण असल्याने त्याचा गावात बराच बोलबाला झाला होता. आता डॉ. बेंजामिनकडे येणारे रुग्णही त्यांना आपण होऊन जुन्या डॉक्टरांच्याबद्दल बरच काही सांगू लागले. त्यांचे ते किस्से ऐकल्यावर बेंजामिनना अजूनच आश्चर्याचे धक्के बसले. विन्स हे अगदी दयाळू, प्रेमळ व उदार मनाचे होते. दवाखान्यात मन लावून झटून काम करण्याचा त्यांचा स्वभाव. रात्री-अपरात्री ते तपासणीसाठी रुग्णांच्या घरीदेखील जात. काही गरीब शेतकरी रुग्णांकडे डॉक्टरांची फी द्यायला पैसे नसायचे. तरीसुद्धा डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आणि अशा लोकांनी प्रेमाने दिलेला शेतावरचा वानवळा फी-स्वरूप स्वीकारत. मग असा दयाळू वृत्तीचा माणूस खुनी का झाला असावा, या प्रश्नाने बेंजामिन यांच्या डोक्यात थैमान घातले. ते त्यांना स्वस्थ बसू देईना. मग त्यांनी हे संपूर्ण प्रकरण खणून काढायचे ठरवले.
अधिक चौकशी करता त्यांना त्या गुन्ह्याची साद्यंत हकिकत समजली. त्याचा घटनाक्रम असा होता :

डॉक्टर विन्स यांनी त्यांच्या म्हाताऱ्या दुबळ्या झालेल्या वडिलांचा दोरीने गळा आवळून खून केला. एवढेच नाही तर त्यांनी त्या प्रेताची सर्व बोटे तोडली. नंतर ते प्रेत लांबवर नेऊन पुरून टाकले. या नीच कृत्यानंतर जसे काही घडलेच नाही अशा थाटात ते दवाखान्यात येऊन रोजचे काम करू लागले. पण अखेर खुनाला वाचा फुटली. परिणामी विन्सना पोलिसांनी अटक केली. त्यांचे वडील सिझोफ्रेनियाने ग्रस्त होते. नुकतेच त्यांना मानसोपचार निवासी केंद्रातून विन्सबरोबर घरी पाठवले होते. स्वतः डॉ. विन्स यांनाही नैराश्याने ग्रासलेले होते आणि त्यासाठी ते योग्य ती औषधे घेत होते. मात्र खुनाच्या घटनेच्या एक आठवड्यापूर्वी त्यांनी ती औषधे बंद केली होती. अशा कृतीचाही रुग्णावर दुष्परिणाम होतो. विन्स यांनाही आपल्या डोक्यात काहीतरी गडबड झाल्याचे जाणवू लागले आणि त्यांनी तसे त्यांच्या मित्रांना कळवले होते. तसेच या घटनेच्या सहा महिन्यांपूर्वी विन्सना एक कार अपघातही झाला होता. त्या अपघातात काही वेळापुरती
त्यांची शुद्ध हरपली होती.

पुढे विन्स यांच्याविरुद्ध खटला चालू झाला. त्यांनी वडिलांच्या खुनाची कबुली दिली. परंतु त्याचबरोबर आपण नैराश्याचे रुग्ण आहोत हा दावा केला. त्यांनी वडिलांवर असा आरोप केला की ते अनेक वर्षे आपला लैंगिक छळ करीत होते. पण त्यासाठी ते साक्षीपुरावे काही सादर करू शकले नाहीत. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध खुनाचे भरभक्कम पुरावे गोळा केले होतेच. आता न्यायालयापुढे हा प्रश्न होता, की त्यांनी ते कृत्य मानसिक रोगाच्या झटक्यात केले की काय ?
मग विन्सची मनोविकार तज्ञांकडून तपासणी झाली. तज्ञांच्या मते विन्स चक्क खोटारडेपणा करीत होते व त्यांची मनोवस्था ठीक होती.

एकंदरीत दोन्ही बाजूंचा विचार करून न्यायालयाने विन्सना जाणूनबुजून केलेल्या खुनाच्या कृत्यासाठी दोषी ठरवले आणि मरेपर्यंत कारावासाचीची शिक्षा सुनावली. तसेच या शिक्षेदरम्यान पॅरोलचा पर्याय ठेवला नाही. या आदेशानुसार त्यांची रवानगी व्हर्जिनियातील तुरुंगात झाली.

हा सर्व तपशील बेंजामीननी बारकाईने अभ्यासला. एकीकडे दवाखान्यातील जुने रुग्ण विन्स यांची भला माणूस म्हणून प्रशंसा करीत होते तर दुसरीकडे त्याच डॉक्टरनी केलेले हे भयानक कृत्य जगासमोर होते. यावर विचार करून बेंजामिन यांची मती गुंग झाली. परंतु एक प्रश्न राहून राहून त्यांचे डोके पोखरत होता. विन्स यांचे नैराश्य व त्यावरील उपचार आणि उपचार बंद केल्याचे परिणाम हे मुद्दे तर महत्त्वाचे होतेच. पण त्याच्या जोडीला विन्सना अन्य काही मेंदूविकार तर नसावा ना, अशी शंका त्यांना येऊ लागली.

दरम्यान अमेरिकी रेडिओवरील एका कार्यक्रमाचे निर्माते आणि पत्रकार या विन्स प्रकरणावर एक कार्यक्रम तयार करणार होते. त्यासाठी त्यांनी बेंजामिनना मुलाखतीसाठी विचारले. पण बेंजामिननी घाबरून नकार दिला. पण कालांतराने त्यांनी विचार बदलला आणि आपला होकार कळवला. त्यासाठीची पहिली पायरी होती ती म्हणजे विन्सची तुरुंगात प्रत्यक्ष भेट घेणे. मग बेंजामिननी विन्सना रीतसर पत्र लिहून परवानगी मागितली. ती मिळाली.

मग एके दिवशी ही डॉक्टर पत्रकार जोडी त्यांना भेटायला गेली. त्यांना पाहता क्षणी बेंजामिनना विलक्षण आश्चर्य वाटले. जेमतेम पन्नाशीचे असलेले विन्स आता अगदी जख्ख म्हातारे दिसत होते आणि पिंजऱ्यात बंद केलेल्या एखाद्या जनावरासारखी त्यांची अवस्था होती. हे पाहता बेंजामिनना मनापासून वाटले की या माणसाला नक्की काहीतरी मोठा आजार झालेला आहे. मग त्यांनी दुसऱ्या भेटीची वेळ ठरवली. यावेळेस त्यांनी बरोबर एका मनोविकारतज्ञांना नेले. त्यांनी बारकाईने निरीक्षण केल्यावर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली. विन्स चालताना आपले पाय जमिनीवर अक्षरशः फरफटत नेत होते (shuffling gait). या निरीक्षणावरून त्या डॉक्टरांनी Huntington disease (HD) या मेंदूविकाराची शक्यता व्यक्त केली. पण हे निदान करण्यासाठी काही महत्त्वाच्या तपासण्या करणे आवश्यक होते, जे तुरुंगात शक्य झाले नसते. अशा तऱ्हेने ही भेट निष्कर्षाविना संपली.

दरम्यान या प्रकरणाला एक कलाटणी मिळाली. तुरुंगात असताना विन्सनी तिथल्या अधिकाऱ्यांना, "आपण आत्महत्या करू" अशी वारंवार धमकी दिली. परिणामी त्यांना एका मनोरुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांच्या रीतसर तपासण्या झाल्या. त्यापैकी एक विशिष्ट जनुकीय चाचणी होती. या तपासण्यावरून HD चे निदान झाले. या जनुकीय आजारात मेंदूच्या काही महत्त्वाच्या पेशींचा वेगाने नाश होत राहतो. त्यामुळे रुग्णाच्या मेंदूकार्यात बिघाड होतो. त्याच्या वागण्यात अजब बदल होऊ लागतात आणि त्याची चालही बिघडते. टप्प्याटप्प्याने आजाराची तीव्रता वाढतच राहते. त्यातून रुग्णाला पंगुत्व येते. आजाराची सुरवात झाल्यानंतर सरासरी वीस वर्षांनी अशा रुग्णांचा मृत्यू होतो.

download.jpeg

विन्सच्या आजाराची बातमी त्यांना सांगण्यात आली. ती ऐकल्यावर त्यांना हायसे वाटले. " चला, आपल्याला काय झालय ते तरी समजले !" असे ते आनंदाने उद्गारले. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांच्यावर पूर्वीचेच नैराश्यविरोधी उपचार सुरू केले. त्यातून ते थोडेफार सुधारले. अर्थातच पुन्हा त्यांची रवानगी तुरुंगात झाली. इथे त्यांना आपले उरलेसुरले आयुष्य काढायचे होते.

इथपर्यंतच्या या हकीकतीवर आधारित एक कार्यक्रम वर उल्लेखिलेल्या पत्रकारांनी तयार केला. 2013 मध्ये त्या कार्यक्रमाचे प्रसारण झाले. तिकडे बेंजामीन मात्र आतून अस्वस्थ होते. विन्सना संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढायचे होते आणि तिथे त्यांना नीट औषधोपचार मिळतील की नाही याची बेंजामिनना काळजी वाटली. नीट उपचारांअभावी ते असेच सडून मरू नयेत ही त्यांची इच्छा होती. विन्सच्या आजाराचे कारण पुढे करून त्यांची तुरुंगातून सुटका होऊ शकते का, यावर बेंजामीन गांभीर्याने विचार करू लागले.

विन्स घटनेवर आधारित रेडिओ कार्यक्रमामुळे संबंधित माहिती सर्वदूर पसरली. ती ऐकून अनेक स्वयंसेवक याप्रकरणी मोफत कायदेशीर सल्ला व मदत करण्यास तयार झाले. अशा लोकांनी एक समिती स्थापन केली. समितीच्या मते हा खटला विन्सच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर नव्याने लढवण्याची गरज होती. तसे झाल्यास न्यायाधीश विन्सना तुरुंगातून मुक्त करून एखाद्या निवासी मनोशुश्रुषा केंद्रात स्थलांतराची परवानगी देण्याची शक्यता होती. परंतु यावर विचारविनिमय करता समितीला त्यातील अडचणी लक्षात आल्या. खटला पुन्हा नव्याने चालवायचा झाल्यास तो दीर्घकाळ चालेल. विन्सना त्याचा मानसिक ताण कितपत सहन होईल अशी शंका समितीला वाटली. म्हणून तो बेत रद्द करण्यात आला. त्याऐवजी संबंधित राज्यपालांकडे दयेचा अर्ज (clemency) करून पाहण्याचे ठरले.
तो अर्ज दाखल झाला. राज्यपालांनी त्यावर विचार करण्यास बराच वेळ घेतला आणि 2017 मध्ये त्यांची कारकीर्द संपताना अर्ज नामंजूर केला. पुढे नवे राज्यपाल पदावर रुजू झाले. ते स्वतः मेंदूविकार तज्ञ आहेत. समितीने अर्ज नव्याने त्यांच्यापुढे ठेवला. या महोदयांनी सुद्धा चार वर्षे वेळ घेऊन 2021 मध्ये अर्ज नामंजूर केला. आता समितीवर हताश होण्याची पाळी आली होती. त्यांच्या कष्टांबरोबरच त्यांनी आतापर्यंत केलेल्या काही लाख डॉलर्सचा खर्च पाण्यात गेल्यासारखा होता !

दरम्यान बेंजामिन विन्सना तुरुंगात नियमित भेटत आणि धीर देत होते. एव्हाना त्या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. बेंजामिनना हा माणूस मुळात शांत व मवाळ प्रवृत्तीचा आहे असे अगदी आतून वाटू लागले. या प्रकरणामध्ये बेंजामिन भावनिकदृष्ट्या खूपच गुंतले होते. त्यांनी आतापर्यंत झालेल्या त्या सर्व घटनांचा आढावा घेणारे एक पुस्तक लिहिले. पुस्तकाच्या शेवटी मात्र त्यांनी आपण राज्यपालांच्या निर्णयामुळे खूप व्यथित झालो असल्याचे लिहिले. इथून पुढे तरी मनोरुग्णांच्या हातून घडणाऱ्या हिंसक कृत्यांबाबत वेगळ्या दृष्टिकोनातून विचार व्हावा अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आता त्या पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व प्रती संबंधित राज्यपालांच्या कार्यालयात देखील वाटण्यात आल्या. एवढे करून बेंजामिन स्वस्थ बसले.

9780593355169.jpeg

दरम्यान 2022 उजाडले आणि 12 जानेवारी रोजी कुणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक एक आश्चर्य घडले. डॉक्टर असलेल्या राज्यपालांनी विचारांती त्यांचा पूर्वीचा निर्णय फिरवून विन्सना दयायाचना मंजूर केली ! त्यानुसार विन्सचा तुरुंगातून सुटकेचा मार्ग मोकळा झालेला आहे. पण अद्याप ते तुरुंगातच आहेत. समिती त्यांच्यासाठी योग्य त्या निवासी केंद्राच्या शोधात आहे. मध्यंतरीच्या कोविडपर्वामुळे अशा अनेक केंद्रांमध्ये पुरेशा रुग्णखाटा आणि काळजीवाहू लोकांचा तुटवडा निर्माण झालेला आहे.

डॉक्टर बेंजामिन कधीतरी मनाशी विचार करतात, की या सर्व प्रकरणात आपण काय गमावले आणि काय कमावले ? त्यांच्या वैयक्तिक कारकीर्दीची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली होती. त्यांनी आपले नियमित काम सांभाळून ही जी दगदग केली ती 'लष्कराच्या भाकरी' प्रकारात मोडणारी होती. त्यात गुंतवून घेतल्याने त्यांच्या व्यक्तिगत अर्थिक विकास आणि कुटुंबसौख्यावर दुष्परिणाम झाला. (किंबहुना त्यांच्या पत्नीने याबद्दल तक्रारही केली होती). हे झाले गमावलेले पारडे. पण ते जेव्हा कमावलेले पारडे बघतात तेव्हा त्यांना विलक्षण आत्मिक आनंद मिळतो. डॉ.विन्स गिल्मर जेव्हा तुरुंगातून खरोखर बाहेर येऊन एखाद्या निवासी मानसोपचार केंद्रात स्थिरावतील तेव्हा बेंजामिनना होणारा आनंद कल्पनातीत असेल.
…………

आता थोडा वैद्यकीय काथ्याकूट.
या प्रकरणातून वैद्यकीय तज्ञांपुढे काही प्रश्न उभे राहिलेत आणि त्या संदर्भात मतांतरे व्यक्त झाली आहेत.
१. एखाद्या रुग्णास निव्वळ HD आजार असेल तर तो इतका हिंसक होऊ शकतो का ? इथे दुमत आहे.

२. डॉ.विन्सच्या बाबतीत दोन शक्यता राहतात. विशिष्ट प्रकारची नैराश्यविरोधी औषधे चालू असताना देखील काही रुग्ण हिंसक होऊ शकतात. पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे, ही औषधे जर रुग्णाने अचानक बंद केली तर तो हिंसक होण्याचे प्रमाण बरेच वाढते.
मुळातच जर ते समाजविघातक प्रवृत्तीचे असतील तर मग इथे आगीत तेल असल्यासारखे झाले असावे. एखादा माणूस वरवर जरी कनवाळू वाटला तरी त्याच्या मनाचा थांग लागणे अवघड असते. त्यांनी केलेल्या नीच कृत्याची तीव्रता पाहता आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो.

३. HD हा त्यांचा आजार योगायोगाने लक्षात आलेला असू शकतो.
………
मनोरुग्णांनी केलेल्या खुनाबाबत कायद्याचा बघण्याचा दृष्टिकोन कसा वेगळा असतो हे जाणून घेण्यास उत्सुक. जाणकारांनी जरूर मत द्यावे.
(चित्रे जालावरून साभार)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रोचक आहे.
मनोविकारांचा मुद्दा महत्वाचा आहे. सहानुूभुतीचा मुद्दा बरोबर आला तरीही जी व्यक्ती पीडित आहे , जिच्या कुटुंबाला सोसावं लागलं ती माणसे या सहानुभूती मुद्द्याकडे कसे पाहत असतील ?

बरेचदा डिफेन्स वकील मानसिकदृष्ट्या स्थिर नाही असा बचाव करून कमी शिक्षा / शिक्षेतून सुट मिळवायचा प्रयत्न करतात असे दिसून आले आहे

धन्यवाद
*जिच्या कुटुंबाला सोसावं लागलं ती माणसे या सहानुभूती मुद्द्याकडे कसे पाहत असतील ?
>>> अगदी योग्य आणि महत्त्वाचा मुद्दा.

नैराश्यविरोधी औषधे जर रुग्णाने अचानक बंद केली तर तो हिंसक होण्याचे प्रमाण बरेच वाढते.

पण जर बंद औषधे पुन्हा चालू केली तर हिंसक घटना करण्याचे प्रमाण अजूनच वाढते.

अति निराश मनुष्य सहसा हिंसक नसतो , कारण हिंसेची क्रिया ( उदा चाकु घेणे, प्रवास करणे, दोरी विकत घेणे व त्याने नरडे आवळणे , बंदूक विकत घ्यायला ब्यांकेत जाऊन पैसे काढणे व मग हत्यार विकत घेणे, खुनाचे पुरावे नष्ट करणे इ इ इ) करायला जी मानसिक ऊर्जा लागते, तीही त्याच्याकडे नसते.

पण निराशाविरोधी औषध सुरू झाले की त्याच्याकडे काम करण्यास मानसिक ऊर्जा निर्माण होते व ते आत्महत्या , हत्या करू शकतात.

म्हणून निराशेचे औषध सुरू केले की पहिले 3 महिने महत्वाचे असतात.

सर्वांना धन्यवाद !

*म्हणून निराशे विरोधी औषध सुरू केले की पहिले 3 महिने महत्वाचे असतात >>>>
अतिशय चांगला मुद्दा आणि प्रतिसाद.

>> रोचक आहे. मनोविकारांचा मुद्दा महत्वाचा आहे.
+१

>> मनोरुग्णांच्या हातून घडणाऱ्या हिंसक कृत्यांबाबत

किंबहुना हिंसक कृत्य घडले कि तो मनोविकाराचाच भाग म्हणता येणार नाही का? कारण इथे HD माहित होता व या रुग्णाच्या बाबत त्याचे निदान झाले म्हणून कळले कि तो मनोरुग्ण आहे. नसते झाले तर? तर तो मनोरुग्ण नव्हता म्हणून कधीचीच फाशी देऊन रिकामे झाले असते.

एकाच प्रसंगाला दोन वेगवेगळ्या व्यक्तींचा प्रतिसाद सारखाच नसतो. जी व्यक्ती खुनासारखे भीषण कृत्य करते ती व्यक्ती मानसिक आजारामुळे ते तणाव हाताळू शकत नाही असे generalization करता येईल का? कारण मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तीकडून त्याच प्रसंगात तशी प्रतिक्रिया येणार नाही.

जाता जाता, वैद्यकीय क्षेत्रात नसलेल्या माझ्यासारख्या व्यक्तीला एक प्रश्न पडतो:
सध्या जे Depression संदर्भात विविध मनोविकार ज्ञात आहेत त्यामध्ये hallucination, confusion, delusion, lack of concentration हि लक्षणे सर्वांत कॉमन दिसतात. हे कसे काय? तुम्ही bipolar disorder वर वाचा, किंवा schizophrenia वर वाचा किंवा आता इथे या लेखात उल्लेख आला म्हणून Huntington disease वर वाचले. तर तिथही हीच लक्षणे? या यादीत अजूनही काही आजार असतील. तर हे कसे काय? त्यामुळे Depression हि umbrella term आहे आणि आतले सगळे मनोविकार हे एकमेकांत सरमिसळ आहेत असे म्हटले तर ते योग्य होईल का?

अतुल
असे नाहीये
*कारण इथे HD माहित होता व या रुग्णाच्या बाबत त्याचे निदान झाले म्हणून कळले कि तो मनोरुग्ण आहे. नसते झाले तर? >>>

ते डॉक्टर पूर्वी नैराश्याने ग्रासलेले रुग्ण होतेच .
किंबहुना त्यावरील औषधे चालू/ बंद करणे या मुळे ते कृत्य घडले असावे असे काहींना वाटते
HD ची सुरुवात नक्की कधी झाली असेल हे सांगता येणे अवघड आहे

अच्छा. वाचताना थोडा गोंधळ झाला बहुतेक माझा. कारण माझा प्रतिसाद:

>> तज्ञांच्या मते विन्स चक्क खोटारडेपणा करीत होते व त्यांची मनोवस्था ठीक होती.

याला धरून होता. कारण HD चे निदान यानंतर झाले.

तुमचा निष्कर्ष एका अर्थी बरोबर आहे !
इथे एक गोची झालेली दिसते.
खटल्याच्या दरम्यान ज्या डॉक्टरांनी मत दिलेले आहे त्यावर आता वाद होऊ शकतो, कारण HDचे निदान झाल्यानंतर अन्य डॉक्टरांनी पूर्वीचीच नैराश्य विरोधी औषधे काही काळ दिली आणि त्याने थोडी सुधारणा दिसली होती.
अशीही शक्यता आहे की या दोन्ही आजारांचे मिश्रण या माणसामध्ये आहे. ??

2.
Depression हि umbrella term आहे आणि आतले सगळे मनोविकार हे एकमेकांत सरमिसळ आहेत असे म्हटले तर ते योग्य होईल का?
>>>
हा चांगला आणि आव्हानात्मक प्रश्न आहे ! याचे परिपूर्ण उत्तर अर्थातच मनोविकार तज्ञ देऊ शकतील. मी मर्यादित प्रयत्न करतो.

काही महत्त्वाच्या मनोविकारांची लक्षणे एकमेकात गुंतलेली असतात हे बरोबर. परंतु त्या प्रत्येक आजाराचे एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण लक्षण असते. ते अचूक हेरणे हे खरंच कौशल्याचे काम असते. म्हणून रुग्णाची कथा अतिशय लक्षपूर्वक ऐकावी लागते.

एकमेकांशी साधर्म्य दाखवणार्‍या आजारांमध्ये योग्य तो भेद करणे याला आधुनिक वैद्यकात differential diagnosis असे म्हणतात.

कितीही भयानक गुन्हा असूदे, देहांत ही शिक्षा म्हणूनच कायद्यात कधीही नसावी. मनोविकार हा एक पदर झाला, पण तपासात किंवा पुराव्यात किंवा इतर सिस्टिम मध्ये अनेक त्रुटी राहिलेल्या असुच शकतात आणि एकदा जीव घेतला की तो परत येऊ शकत नाही. त्यामुळे कॅपिटल पनिशमेंट ही कितीही निर्घ्रुण अपराध असला तरी वर्जच असावी. दुर्दैवाने अनेक देशांत असं नाही.

ईंटरेस्टींग टॉपिक आहे हा.
असे मनोविकाराचे नाटक करून अपराधातून वाचायच्या थीमवर कैक पिक्चरही निघालेत ते आठवले.

कितीही भयानक गुन्हा असूदे, देहांत ही शिक्षा म्हणूनच कायद्यात कधीही नसावी.
>>>>>
याच्याशी सहमत आहे. पुरावा असने नसणे, तपासातील त्रुटी हा एक मुद्दा आहेच.
पण त्याचसोबत कोणतीही व्यक्ती पुर्ण चांगली वा पुर्ण वाईट नसते. कोणताही अपराध ठराविक परीस्थितीत, ठराविक मनस्थितीत घडते. तो गुन्हा तात्कालिक डोके भडकल्याने असो, मानसिक आजाराने असो, वा स्वभावदोषामुळे असो. त्या व्यक्तीकडून तो गुन्हा पुन्हा पुन्हा घडण्याची शक्यता असो, त्याला जन्मठेप देऊन समाजापासून वेगळे ठेवणे हिच सर्वात मोठी शिक्षा हवी. देहांत शिक्षा देणे योग्य नाही. जर माणूस म्हणून आपले काही वेगळेपण असेल तर ते असा विचार करण्यातूनच दिसते.

मनोव्यापार हा मेंदूतील अनेक भागांवर अवलंबून असतो किंबहुना तो मेंदूच्या अनेक भागांमधील सुसूत्रतेवरच अवलंबून असतो, त्यामुळे मनोविकार असेलच तर अनेक भागांत दोष असू शकतो व त्यामुळे विविध आजारात लक्षणे सारखी दिसू शकतात, पण एखादेच लक्षण वेगळे असू शकते जे केवळ एखादा तज्ञच पकडू शकतो

दुसरे म्हणजे , मेंदूतील पेशींमधील रासायनिक क्रिया कमीजास्त झाल्या की मनोविकार होऊ शकतात तसेच काही मेंदूपेशींना प्रत्यक्ष विकार असेल तरीही मनोरोग होऊ शकतो,
पहिला प्रकार सिटी एम आर आय यात दिसत नाही , दुसरा प्रकार अशा तपासणीत सापडतो , पण तेही लेट स्टेजमध्ये

ब्लॅककॅट, मेक्स सेन्स!
या वरच्या केस मध्ये घटना घडल्याचं साल दिसलं नाही तरी घटना आणि निदान यात १० एक वर्षे नक्की झालेली आहेत असं वाटलं. जर मनोविकार, मेंदू रचना, चयापचय आणि शरीरातील रसायने आणि मुख्य म्हणजे रोगाची पातळी १० वर्षांत जर बदलत असेल तर आजच्या घडीला एखादी व्यक्ती मनोरुग्ण आहे म्हणून ती गुन्हा घडला तेव्हा ही असेल हे रिव्हर्स एक्स्टापोलेट (असा शब्द नसेल, पण अर्थ समजावा) कसं करणार? आणि जरी ह्युरिस्टिकली करता आलं, तरी व्यक्तीपरत्त्वे ते बदलत असेल तर न्याय देण्याच्या दृष्टीने ते कितपत योग्य?

रक्तातील दारुचे प्रमाण जसं अपघात झाल्याच्या काही तासात बघावे लागते त्याच्या बरोबर उलटी केस आहे ही. पुरेशा पुराव्या अभावी शिक्षा चालू ठेवणे हे केलं तरी त्यात चूक नसेलच कदाचित.

चांगल्या अर्थपूर्ण चर्चेबद्दल सर्वांना धन्यवाद
घटनेचे साल लेखात दिलेले आहे.:

"तो दवाखाना कोणी एक विन्स गिल्मर नावाचे डॉक्टर चालवत होते. सन २००४मध्ये त्यांनी चक्क स्वतःच्या वडिलांचा खून केल्यानंतर "

रोचक. छान लेख.

असे मनोविकाराचे नाटक करून अपराधातून वाचायच्या थीमवर कैक पिक्चरही निघालेत ते आठवले. >> +१

कितीही भयानक गुन्हा असूदे, देहांत ही शिक्षा म्हणूनच कायद्यात कधीही नसावी.>>> असहमत.
निर्भया प्रकरण , कसब प्रकरण यात जर देहांत ही शिक्षा नसती तर काय झाले असते?
आज आपणच भरलेल्या करावर त्याना पोसले गेले असते. बरीच वर्षे सरळ मार्गाने कारागृहात काढली म्हणून काही सवलती ही दिल्या गेल्या असत्या. या दोन्ही ठिकाणी परिस्थिती, डोकं सटकलं म्हणून गुन्हा घडलेला नाही. अशा स्वरूपाच्या गुन्ह्यात कायदा आहे म्हणून चाललंय.

अर्थात मानसिक रोगी आणि त्यांच्याकडून झालेला गुन्हा याबाबतीत शिक्षा देताना सगळीडून विचार व्हावा हे मान्य.

कायद्यात कधीही नसावी.>>> असहमत.
निर्भया प्रकरण , कसब प्रकरण यात जर देहांत ही शिक्षा नसती तर काय झाले असते?.........
हेच मनात आले होते.

बाकी सरांचा लेख नेहमीप्रमाणेच मस्त आहे.

इथे library मध्ये पुस्तक मिळते का पाहणार आणि वाचणार. Interesting आहे. डॅाक चांगला लेख.

चांगला लेख आहे. विचारांना चालना देणारा. पण यात मनोविकारतज्ञाचे मत अंतिम आहे.
माझ्यासारख्या सामान्य माणसाला तपास अधिकार्‍यांनी रूग्णांची मते जाणून घेतली का नाहीत हा प्रश्न पडू शकतो. किमान त्यांच्या वकीलांनी हा मुद्दा पुढे आणायला हवा होता. अशी व्यक्ती स्वतःच्या वडीलांचा खून करण्यास का प्रवृत्त होते यावर न्यायालयाचा सॉफ्ट कॉर्नर वकीलांनी मिळवून द्यायला हवा होता. हत्या क्षम्य नाहीच. त्यामुळे दुसरी बाजू सुद्धा तितकीच जोरदार मांडली गेली असावी. असो. अंदाज करण्यात अर्थ नाही. तो खटला मुळातून वाचायला हवा (अमेरिकन कायद्यांच्या संदर्भात).

अभिप्राय, पूरक माहिती आणि अर्थपूर्ण चर्चेबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार !

चर्चेत उपस्थित केलेले काही मुद्दे विचारांना चालना देणारे आहेत. या प्रकरणात बरेच जर-तर आहेत. त्यावर वैद्यकीय आणि कायदा तज्ञांची मतेही भिन्न असू शकतील.

आपल्यातील कोणी बेंजामिन यांचे पुस्तक वाचलेच तर त्याबद्दल जरूर लिहा.

<< मग विन्सची मनोविकार तज्ञांकडून तपासणी झाली. तज्ञांच्या मते विन्स चक्क खोटारडेपणा करीत होते व त्यांची मनोवस्था ठीक होती. >>

खुनाची शिक्षा मिळण्यासाठी मुळात गुन्हा beyond a reasonable doubt सिद्ध व्हावा लागतो, जो पोलिसांनी सिद्ध केला. जर मनोविकार तज्ञांकडून तपासणी झाली होती तर याचा अर्थ ते तज्ञ चुकले होते का? केवळ २-४ तज्ञांच्या मतावर संपूर्ण खटल्याचा निकाल ठरवावा/फिरवावा का? हे प्रश्न उपस्थित होतात. मनोविकारात अजून प्रश्न उपस्थित होतो की असा चुकीचा निर्णय उलट बाजूने पण होऊ शकतो का म्हणजे एखादी व्यक्ती ठीकठाक आहे, पण या अश्या सो-कॉल्ड तज्ञांनी त्याला मनोविकार झाला आहे असे ठरवून औषधे सुरू केली आणि त्यांचा काही विपरीत परिणाम झाला तर? तसे काही डॉ.विन्स गिल्मर यांच्या बाबतीत घडले असेल का?

<< डॉ.विन्स गिल्मर जेव्हा तुरुंगातून खरोखर बाहेर येऊन एखाद्या निवासी मानसोपचार केंद्रात स्थिरावतील तेव्हा बेंजामिनना होणारा आनंद कल्पनातीत असेल. >>
मानसिक रोगी औषध घेऊन पूर्ण बरे होतात का? की त्यांना आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात? जर या विशिष्ट रोगात १००% बरे होण्याची शक्यता नसेल तर मग डॉ.विन्स गिल्मर मानसोपचार केंद्रात राहिले काय आणि तुरुंगात राहिले काय, (तुरुंगात औषधे मिळत असतील असे समजून) तांत्रिकदृष्ट्या सारखेच आहे ना?

* तसे काही डॉ.विन्स गिल्मर यांच्या बाबतीत घडले असेल का?>>> मी वर म्हटल्याप्रमाणे या प्रकरणात बरेच जर-तर आहेत तसेच लेखातील वैद्यकीय काथ्याकूट यामध्ये तज्ञांची विविध मते दिली आहेत.
....
*मानसोपचार केंद्रात राहिले काय आणि तुरुंगात राहिले काय, (तुरुंगात औषधे मिळत असतील असे समजून) तांत्रिकदृष्ट्या सारखेच आहे ना?
>>> नाही. एक फार मोठा फरक म्हणजे तुरुंगात असले म्हणजे कैदी ठरते. आता ते मुक्त झाले आहेत हा भाग महत्त्वाचा आहे.
त्यांची मूळ शिक्षा पॅरोलविना होती.
हा मूळ लेख इंग्लिशमध्ये मी वाचला तेव्हा त्यात बेंजामिन यांचे अजून काही मत दिलेले आहे. त्यांच्या मते तुरुंगात अशा रुग्णांची प्रचंड हेळसांड होते. अमेरिकेत फक्त HD या आजाराच्या लोकांची विशेष काळजी घेणारी निवासी केंद्र सुद्धा आहेत. जर तिथे त्यांना प्रवेश मिळाला तर त्यांना नक्कीच चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा मिळेल.
तसेच नातेवाईक व परिचित यांना भेटणे हा भाग इथे बराच सोपा असतो.

धन्यवाद.
*Vins च्या वडिलांना पण HD झालेला असू शकतो का? >>>
शक्यता आहे. त्यांचे वडील किंवा आई या दोघांपैकी एकाला जरी हा आजार असेल तर तो त्यांच्या मुलांपैकी काहींना होऊ शकतो.
या अनुवांशिकतेच्या प्रकाराला डॉमिनंट असे म्हणतात.

Pages