पुस्तक परिचय : बोल माधवी - चन्द्रप्रकाश देवल ( अनुवाद आसावरी काकडे)

Submitted by अवल on 24 March, 2022 - 23:29

(भारतीताईंचा लेख वाचला अन हा लेख इथे द्यावा वाटला. लेख जुना आहे पण तरीही...)

20220325_084814.jpg

मुखपृष्ठ पाहिलं अन तिथेच मी अडखळले.
अगदी पूर्वीची लाकडाची ठकी- बाहुली, आकार-बिकार नसलेली, त्रिकोणी ठोकळ्यावर चितारलेली, दोन हात जोडलेली, मोठे डोळे, मोठं कुंकू, अगदी टिपिकल जुन्या काळातली ठकी.
पण, ओठांवर पांढर्‍या चिकटपट्टीची फुली. अन् अशा या ठकीची डावीकडे हलके हलके धूसर होत गेलेल्या तीन प्रतिमा अन उजवीकडे आर्जव, बोल माधवी! मोठ्या डोळ्यातले ते भाव..
मनात धस्स झालं , अन् धडधडतच पान उलटलं. आत घोडेच घोडे, महत्वाकांक्षेचे प्रतीक, पुरुषी अहंकाराचे प्रतीक, जेत्यांचे प्रतीक. कितीतरी घोडे,घोडे अन घोडे.... अन त्यानंतर येणार्‍या काही ओळी.

"माधवी
मृत्यू, दु:ख, पराभव कुणाचाही असो
सर्व पराभूतांसाठी
मी विचलित होईन
तुझ्यासारख्या प्रत्येक आयुष्यासाठी
मला पाझर फुटेल

परहितासाठी, परक्या आगीत
जळत असेल एखादी स्त्री...
एखादी माधवी...
त्या प्रत्येक वेळी मी व्यथित होईन ! "

माधवी ? कोण माधवी ?

महाभारत आपण जाणतो. कौरवांना आपण ओळखतो. ययाती आपल्याला माहिती आहे. त्याचे दोन पुत्र पुरु आणि यदु आपल्याला नवीन नाहीत. पण माधवी? नाहीच माहिती आपल्याला. माधवी ययातीची मुलगी, पुरु आणि यदुची बहीण! चकीत झालात ना? मग ऐकाच तिची कहाणी!

महाभारतातल्या उद्योग पर्वातल्या गालव विषयक उपाख्यानात माधवी बद्दल उल्लेख सापडतो. मुळातच किती शोकात्मक कथा या माधवीची! तिच्या आयुष्याच्या परवडीची ही कहाणी अतिशय क्लेश देणारी, अतिशय अंतर्मुख करणारी, हृदय पिळवटून टाकणारी ही कथा. विश्वामित्र ॠषींचा गालव हा शिष्य. त्याचे शिक्षण पूर्ण झाल्यावर तो गुरुदक्षिणा घेण्याबद्दल आग्रह धरतो. तेव्हा विश्वामित्र त्याच्याकडे आठशे श्यामकर्णी अश्वमेधी घोड्यांची मागणी करतात. मग हे घोडे मिळवण्यासाठी गालव ययाती राजा कडे जातो. पण हे घोडे किंवा ते विकत घेण्याइतके द्रव्य ययातीकडे नसते.

पण याचकाला विन्मुख कसे पाठवायचे हा विचार करून ययाती एक अभिनव कल्पना मांडतो. ययातीच्या मुलीला, माधवीला एका वेदॠषीकडून वर मिळाला असतो, ज्यामुळे ती चक्रवर्ती पुत्रांना जन्म दिल्यावरही कुमारी होणार असते. म्हणून ययाती, आपली मुलगी माधवी, जी सर्वसंपन्न आहे तिला, गालवाला देऊ करतो, ज्यान्वये गालव इतर राजांकडे जाऊन माधवीच्या बदल्यात श्यामकर्णी घोडे मिळवू शकेल. मग गालव माधवीला घेउन प्रथम अयोध्यापती हर्यश्वाकडे जातो. त्याला प्रलोभने दाखवून, माधवी देऊन तिचे शुल्क सांगतो. ८०० श्यामकर्णी घोडे. पण हर्यश्वाकडे फक्त २००च असे घोडे असतात. मग माधवीला फक्त वर्षभारासाठी, एक पुत्र होईपर्यंत ठेवण्याचे ठरते. अन गालव परततो.

एक वर्षाने तो परत येतो आणि माधवीला घेऊन काशी नरेश दिवोदासाकडे जातो. पुन्हा त्याच्याकडेही २००च असे घोडे असल्याने, पुन्हा वर्ष आणि एका पुत्राचा सौदा होतो. पुन्हा पुढच्या वर्षी भोजनगराचा राजा उशीनर ! पुन्हा तेच तेच... शेवटी देशातले सर्व श्यामकर्णी घोडे संपल्यामुळे गालव माधवीला विश्वामित्रांकडे घेऊन येतो, तोच ठरलेला सोपस्कार विश्वामित्राकडेही होतो. माधवी विश्वामित्रांना एक पुत्र देते, अन् मग गालव तिला ययातीला परत करतो. आता ययाती माधवीचे स्वयंवर ठरवतो. पण स्वयंवरात कोणालाही न वरता माधवी तपोवनात निघून जाते. अन् संपूर्ण आयुष्य तपामध्ये घालवते.

आहे ना अंगावर येणारी कथा? उच्च संस्कृती, उच्च संस्कृती म्हणत आपण आपल्या गतैतिहासाला कित्ती नावाजत असतो... असो!

कवी चन्द्रप्रकाश देवल म्हणतात, "माधवीला कसं समजून घ्यायचं, तिच्यापर्यंत कसं पोहोचायचं? स्मृती, श्रुती, महाभारत यातून खोदून खोदून काढायचं कसं? त्या काळाचे संदर्भ, निकष, सरकार, परंपरा या सर्वांपर्यंत पोहचायचं कसं ? पण हे अवघड नव्हतंच! माधवी अन् महाभारत आजही समकालीनच आहेत. आजही काही समाजातले काही लोक हे त्या काळातल्याच विचार अन संस्कारांच्या स्तरावर आहेत."

पुढे एका ठिकाणी ते लिहितात, "विनिमयाचे साधन बनलेल्या माधवीचे, माणसाचे एक वस्तू होणे, अचेतन होणे हे अमानवीकरण आहे."

हे काव्य लिहिताना देवलांनी वेगवेगळ्या पातळ्यांवर विचार केलेला दिसतो. विषय, त्यासाठीचा अभ्यास, शोध, विषयाच्या खोलात जाणे, त्याचा गाभा बरोबर ओळखणे , एकूणच काव्य निर्मिती या सर्वांवर त्यांनी अतिशय जाणीवपूर्वक विचार केलेला दिसतो. एकूणच कविता आणि तिची निर्मिती याबाबतचे त्यांचे विचार मुळातूनच वाचले पाहिजेत. कवी, त्याची वाचक म्हणून रसिकता, काळाचे भान असणारा एक भाष्यकर्ता, शब्दांवर प्रेम करणारा भाषातज्ज्ञ, सहसंवेदना जाणणारी सहृदय-समंजस व्यक्ती , एक विचारवंत, एक समीक्षक, एक संगीतकार अन या सर्वांवर भरभरून कोसळणारा एक सृजन कवी ! अशा वेगवेगळ्या स्तरावराचे त्यांचे विचार मला तर प्रेमात पाडून गेले.

मुळात एवढ्या गंभीर विषयावर लिहिणे, त्यातही काव्य ( एकुण ३८ कविता) अन ते पुन्हा विचारपूर्वक, जाणीवपूर्वक केलेले काव्य! अनेक तारांवरची ही कसरत, पण काय पेललीय सांगू!

तसेच, एका अर्थी हे शिवधनुष्य, अन् त्यातून ते मराठीत अनुवादित करायचे! हेही तितकेच किंबहुना अधिक जबाबदारी अन सृजनाचे काम! पण आसावरी काकडेंनी ते ज्या रीतीने पूर्ण केलेय... हॅट्स ऑफ टू हर!

आसावरी काकडे आपल्या मनोगतात लिहितात, "कवितांचे अनुवाद करायला मला आवडतं, कारण त्यात दुहेरी आव्हान असतं,एक कुणीतरी रचलेला शब्दांचा व्यूह भेदत आत शिरायचं .......आणि दुसरं ....आपल्या शब्दांच्या आत - बाहेर रचायचा आपला व्यूह......." तसेच त्या हे ही मांडायला विसरत नाहीत की, "ही कविता एक पुरुष लिहितो हे अधोरेखित करायला हवं, कारण त्यामुळे या मांडणीला एक अर्थ पूर्ण परिमाण लाभलंय."

मी मुळातून "बोलो माधवी " वाचलं नाही. पण 'अनुवादिकेच्या मनोगत' मध्ये आसावरी काकडेंनी अनेक उदाहरणे मूळ काव्यातली (हिंदीतील) दिलीत. ती वाचताना आणि त्यांचे अनुवाद वाचताना मला सारखीच अनुभुती आली. एका स्त्रीची वेदना समजून ती मांडण्याचे काम चन्द्रप्रकाश देवल यांनी केलय तर हिंदी सारख्या सुमधूर, गोड भाषेतून मराठी सारख्या राकट भाषेत ते काव्य आणण्याचे काम आसावरी काकडे यांनी केलंय. मला तर हा योग फार फार चकीत करून गेला.

या दोन्ही कविता मला एकमेकींचे प्रतिबिंबच; नाही, नाही.. त्या मला एकमेकींच्या जुळ्या बहिणीच वाटल्या.

देवल लिहितात,

"न जान पाने की यातना
तेरी पीडा से बडी होने लगी हैं
और माधवी हो कर जानना
एक दुसरी जात की दिल्लगी हैं!"

तर आसावरी लिहितात :

"तुला न समजू शकण्याची यातना
तुझ्या दु:खापेक्षा भयंकर होत चाललीय,
आणि माधवी होऊन समजून घेणं
तर उपमर्द आहे एक प्रकारचा"

देवल केवळ माधवीची व्यथा मांडत नाहीत तर त्याचे उत्तरदायित्वही ते स्वीकारतात.

"माधवी तुझं काय करू आता
तुझ्याशी निगडीत, तुझ्याशी बांधलेला अपराध
आपले बाहू पसरून
हलके हलके खेचतो आहे मला..."

किंवा

"आज उरिन होना चाहता हूं पितृॠणसे
प्रायश्चित के कितने चातुर्मास चाहिये,
बोलो माधवी ..."

वेगळा विषय मांडत असताना त्यात येणारे संदर्भ मात्र सर्वसामान्यांना माहिती असलेले द्यायचे, पण देताना त्यांचा संदर्भ मात्र एकदम बदलून टाकायचा ही देवलांची खासियत आहे. उदाहरणच द्यायचं तर 'किती काळ निद्रिस्त राहशील' या कवितेचं देता येईल. कृष्ण, कदंब आणि गौळणी यांच्याबद्दलची कथा आपल्याला माहिती आहे. 'दे रे कान्हा चोळी लुगडी' हा अगदी अध्यात्मिक पातळीवरचा संदर्भही आपल्याला नवीन नाही. पण देवल त्याचे फार वेगळे रूप आपल्या समोर उभे करतात. कधी कधी त्यांच्या चार ओळीच, पण खाडकन आपल्याला जागं करतात.

"राजप्रासादाच्या भिंती तर असतात नेहमी
मुक्या आणि बहिर्‍या...
झरोक्यांना बोलतानाही
ऐकलं नाही कधी कोणी"

किंवा

"पितृ- आज्ञा सोपी नसते इतकी
रामाला विचारून बघ वनवासाचं दु:ख
मुकुटधारी राजा, पिता असतच नाही!"

किंवा

"या जखमांनीच पोसते मी
तुझ्या सृजनाचे सुख..."

किंवा
"चुपचाप ...
हुंदक्यांचे स्वर नसतात संगीतात..."

किंवा

"मला उगीचच आठवतो
तुझ्या नखशिकांत शृंगाराने मढवलेला देह
जपमाळेतील मण्यांसारखा
एका पाठोपाठ एक
पर-स्पर्श पार करत निघालेला."

पुस्तकाच्या शेवटी परिशिष्टात महाभारतातील गालवोपाख्यानातले मूळ संस्कृतातले अन त्याचे भाषांतरही दिले आहे. हे संपूर्ण पुस्तक मी नाहीच वाचू शकले; एका झटक्यात. अनेकदा डोळ्यातल्या पाण्याने अडवले तर अनेकदा गळ्यातल्या आवंढ्याने थांबवले. कधी संतापाने मन भरून आले तर कधी उद्वेगाने.
सर्वात आश्चर्य वाटलं ते एका पुरुषातली ही सहसंवेदना पाहून. कोण कुठली माधवी, जिच्या बापालाही कणव आली नाही तिच्यावर हा पुरुष इतके जीव तोडून लिहितोय...

"माधवी
मृत्यू, दु:ख, पराभव कुणाचाही असो
सर्व पराभूतांसाठी
मी विचलित होईन
तुझ्यासारख्या प्रत्येक आयुष्यासाठी
मला पाझर फुटेल.....
परहितासाठी, परक्या आगीत
जळत असेल एखादी स्त्री...
एखादी माधवी...
त्या प्रत्येक वेळी मी व्यथीत होईन ! "

आसावरीताईंनीही कमाल केलीय. कवीचा प्रत्येक बाज, प्रत्येक भावना अन प्रत्येक विचार आपल्यासमोर कसा लख्ख आणि स्पष्ट करून ठेवलाय त्यांनी. अगदी प्रत्येक स्त्री आणि पुरुषाने वाचावेच असे हे काव्य !

***
मूळ पुस्तकाचे नाव : बोलो माधवी
कवी : चंद्रप्रकाश देवल

अनुवादित : बोल माधवी
अनुवाद : आसावरी काकडे
प्रकाशक : दिलीप माजगावकर
राजहंस प्रकाशन, पुणे, २००४, ०७
पृ. सं. : १६४,
किंमत : रुपये १२५/-

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह! याबद्दल काहीच माहिती नव्हती. माधवीबद्दल हळहळ वाटली.

नेमक्या शब्दात करून दिलेला परिचय . उत्तम झालाय

उच्च संस्कृती, उच्च संस्कृती म्हणत आपण आपल्या गतैतिहासाला कित्ती नावाजत असतो>>>>>> सहमत

बापरे.. माधवीची कथा माहिती नव्हती.
कविता आणि अनुवाद सुंदर. परिचय छानच करून दिलाय आणि तुम्ही.

आता मला वि.वा.शिरवाडकरांच्या एका कथेतल्या माधवीचा संदर्भ लागला! त्या कथेचं नावही बहुतेक माधवीच आहे. एक शास्त्रीबुवा, त्यांच्याकडे रहात असलेली ही माधवी. त्या कथेत महाभारतातल्या कथेचाही उल्लेख असावा, पण इतका सविस्तर नक्कीच नाही.

Hmm..
दुर्गा भागवतांचया पुस्तकात वाचलेली माधवी ची कथा.
त्या त्यात वे द वतीचा दाखला आणी उदाहरण देऊन म्हणतात की स्त्री समर्थ असली तर काय होत आणि असमर्थ असली तर काय. ( वेदवती तपोसामार्थ्याने तिच्याबद्दल वाईट विचार करणाऱ्याला जाळून टाकते , तर माधवीची फरफट होते)

अशाच अजून एका कथेत विठोबा आणि पदूबाई भेटतात , तसेच श्रीकृष्ण आणि बलारामावर बायकोला (लक्ष्मीला) हाकल्याबद्दल भीक मागत फिरायची वेळ येते.

मूळ कथेत माधवीची कथा येते, ती गालवाची कथा म्हणून. (हट्ट करणाऱ्याला कशी शिक्षा भोगावी लागते/सव्यापसव्य करावे लागतात, अशा अर्थाने).
तिथेही माधवी laa माणूस म्हणून काही किंमत नाहीच. गालवा chyaa चुकांची शिक्षा माधवी भोगते. काहीच संबंध नसताना.

ह्या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल तthanks अवल. बघितलं पाहिजे!

डॉ. कुमार, वावे, नानबा धन्यवाद.
हो माधवीचे असे चुटपुटते उल्लेख दिसतात.
देवलांचं हे मोठेपण की त्यांनी माधवीचे सारं आयुष्य काव्यातून आपल्या पर्यंत पोहोचवलं.

अतिशय उत्तम परिचय, अवल. धन्यवाद.
.. म्हणून ययाती, आपली मुलगी माधवी, जी सर्वसंपन्न आहे तिला, गालवाला देऊ करतो, ज्यान्वये गालव इतर राजांकडे जाऊन माधवीच्या बदल्यात श्यामकर्णी घोडे मिळवू शकेल.>>> निव्वळ भयानक!!!!

रामाला विचारून बघ वनवासाचं दु:ख
मुकुटधारी राजा, पिता असतच नाही!">>>
मुकुटधारी राजा.. >>चांगला पती तरी कुठे झाला?

छान परिचय. माधवीची कथा कधीतरी वाचल्यासारखी वाटते. ययाती आणि माधवी हे संदर्भ स्मरणातून पुसलेत.
-

लेखाचं शीर्षक दिसलं की प्रत्येक वेळी डोक्यात चंद्रमाधवीचे प्रदेश हेच उमटतंय.

सुंदर पुस्तक परिचय.
प्रथम जेव्हा ही कथा वाचली तेव्हा सुन्न व्हायला झालं. ते प्रत्येक वेळी होतंच. तिने प्रतिकार का केला नाही, हे राहून राहून वाटतंच. पण हे victim blaming होईल.
नानबा, विठोबा आणि पदुबाईची कथा कोणती?

छान परिचय अवल. माधवी ची कथा अंगावर आली.
मुळ कवी चंद्रप्रकाश देवलांनी मराठीत सुद्धा कविता लिहिल्या आहेत का?

छान परिचय
खूप आधी लोकप्रभा साप्ताहिकात तनया या नावाने ही कथा क्रमशः प्रकाशित झाली होती

उत्तम परिचय! माधवी हे नाव इतके दिवस मी माधव (विष्णूची) पत्नी या अर्थी असेल असं समजत होते. ही माधवीची कहाणी फारच ह्रदयद्रावक आहे. This will fall under "how not to bahave" category.

यह गालव और विश्वामित्र- जोगी हैं
यह ययाति और हृर्यश्व- राजा
ये कभी किसी के नहीं हुए
तेरे क्योंकर होंगे !

हा कवी फार थेट, टोकदार भाष्य करतो.

साधारण १५ वर्षांपूर्वी 'बोलो माधवी' ला राजस्थान साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. मूळ पुस्तकापेक्षा अनुवादाचे मुखपृष्ठ अधिक प्रभावी दिसतेय. कवितानुवादाची जी उदाहरणे लेखात आहेत त्यावरून नक्कीच सुंदर जमलाय.

भीष्म सहानींनी याच कथेवर हिंदीत एक उत्तम नाटक लिहिले आहे.

रेखीव परिचय लेख. आभार.

धन्यवाद सर्वांना
धनवंती Happy
धनुडी, माझ्या वाचनात तरी नाही आल्या.
ऋतुराज हा काव्य संग्रह आहे हं Happy
अनिंद्य शोधते नाटक

मला ह्या परिच्छेदातल्या उल्लेखांवरून वाटलं >>>>>>>

वेगळा विषय मांडत असताना त्यात येणारे संदर्भ मात्र सर्वसामान्यांना माहिती असलेले द्यायचे, पण देताना त्यांचा संदर्भ मात्र एकदम बदलून टाकायचा ही देवलांची खासियत आहे. उदाहरणच द्यायचं तर 'किती काळ निद्रिस्त राहशील' या कवितेचं देता येईल. कृष्ण, कदंब आणि गौळणी यांच्याबद्दलची कथा आपल्याला माहिती आहे. 'दे रे कान्हा चोळी लुगडी' हा अगदी अध्यात्मिक पातळीवरचा संदर्भही आपल्याला नवीन नाही. पण देवल त्याचे फार वेगळे रूप आपल्या समोर उभे करतात. कधी कधी त्यांच्या चार ओळीच, पण खाडकन आपल्याला जागं करतात.<<<<<<<

धनुडी, मी फक्त मराठी अनुवाद वाचला आहे. त्यातील एका कविते - "किती काळ निद्रिस्त रहाशील " बद्दल मी लिहिलंय.

याच अनुवादित कवितेतलं हे एक उदा.

" सगळी शास्त्रं आणि स्मृती...
हलकल्लोळ माजवतात
वस्त्रहीन स्त्रीच्या केवळ उच्चारानं...
आणि धर्माच्या मर्यादेबाहेर
तो बसला आहे वर
कदंबाच्या फांदीवर...
काय बघण्यासाठी...?
पण त्याची समदृष्टी कुणालाही
वाटत नाही असम...
श्रद्धेइतकी अंध असत नाही
बघणाऱ्याची दृष्टी
..."
मुद्दाहून पूर्ण देत नाही कविता, सो पुस्तक मिळवून वाचणं होईल Happy

तुम्ही परिचय सुरेखच दिलाय... शंभर पैकी शंभर गुण ...माधवी सोबत जे घडले ते भयानक आहे... असल्या कथा डिप्रेसिंग वाटतात.. सुन्न होते वाचून..त्यामुळे माझा पास ...

Pages