भैरवगड ते कात्राबाई भटकंती

Submitted by अजित केतकर on 18 March, 2022 - 07:27

एकेक गड किल्ल्यांची भटकांत्या आजवर केल्या होत्या पण रेंज ट्रेक काही झाला नव्हता. तसेच आजपर्यंत सगळ्या भटकंत्यांमध्ये खानपान गावकऱ्यांकडून घेतले होते त्यामुळे लाकडं गोळा करून, चूल पेटवून स्वंयपाक करण्याची मजा अजून घेतली नव्हती. चंद्रकोर ट्रेक्स या समूहाच्या भैरवगड ते कात्राबाई अशी रांग भटकंती ची माहिती मिळाली आणि ही संधी सोडायची नाही असें ठरवले. हा ग्रुप बरीचशी व्यवस्था आपली आपणच करतो आणि खर्च वाटून घेतो, त्यामुळे खूप स्वस्तात आणि स्वावलंबी भटकंती होते.
या ग्रुपबरोबर आधी चंदेरी गडावर गेलो होतो. पण तो एकदिवसीय असल्याने पाठीवर समान विशेष नव्हते. आताच्या भटकंतीत वजन उचलावे लागणार होते आणि चालही खूप जास्त होती. त्यामुळे मला जमेल की नाही ही शंका आमच्या म्होरक्याला प्रसादला सांगितली. त्याने चंदेरीच्या माझ्या आठवणीवर मला घेतले आणि माझी तयारी सुरू झाली.
थोडा व्यायाम आणि सकाळी 5-6 किमी चालणे सुरू केले आणि ट्रेकचा दिवस आला. खानपान सामान प्रत्येकाला वेगवेगळे आणायला सांगितले. तयारीसाठी प्रसादने मला 3 डझन केळी आणि एक लिटर अमूल टेट्रापॅक आणायला सांगितले होते.
सॅक चे वजन बऱ्यापैकी झाले होते. रात्री 8 च्या कसारा लोकलने निघायचे होते, पण करोना - गर्दी - बरोबरची केळी - या सगळ्याचा विचार करून मी आधीच निघालो. डोंबिवली लोकलने डोंबिवली, मग तिथून कल्याण लोकलने कल्याण, मग टिटवाळा असे करत कसाऱ्याला सुखरूप पोहीचलो
मंडळी जमा झाली. एकूण सात जण होतो. जीप सांगितली होती. साधारण १० च्या सुमारास निघून पहाटे १ वाजता शिरपुंजे गावात पोहोचलो. रात्री उशीरा होणार हे समजून गावात आमटी भाताचे जेवण सांगून ठेवले होते ते जेवलो आणि झोपलो. सकाळी ६ ला उठून चहा झाला आणि बरोबर आणलेल्या समानातून, केळी, खाकरे असा नाश्ता झाल्यावर आम्ही निघालो.
भैरवगडाची सुरुवात छान पायऱ्यांनी आहे, पण थोड्याच चढाईनंतर डोंगर चढाई सुरू होते. बरोबरची मंडळी चांगलीच तयारीची आहेत हे पहिल्याच चढाईत लक्षात आले.. आपला कस लागणार याचीही कल्पना आली. ९ च्या सुमारास आम्ही भैरवगड आणि घनचक्कर गड यांच्या मधल्या खिंडीत पोहोचलो. पुनः थोडे खानपान झाले आणि सॅका तिथेच ठेऊन आम्ही भैरवगड पाहून आलो. घोड्यावर स्वार असलेल्या भैरवदेवाचे कातळात कोरलेले मंदिर कमी उंचीचे पण छान आहे. आजूबाजूचे अवशेष, पाण्याच्या टाक्या पाहून खिंडीत परतलो. थोडे खाऊन पुढच्या घनचक्कर गडाकडे चढाईला सुरुवात केली. पुरातत्व, पर्यटन मंडळाने इथे दोन मोठ्या शिड्या बसवण्याचे काम सुरू होते. बरेचसे काम झाले असल्याने आम्ही त्यावरूनच वरती गेलो.
घनचक्कर गड हा बराच पसरलेला आहे वर मोठे पठार असल्याने दमछाक फार झाली नाही. माथ्यावर जाताना थोडे आधी सॅका ठेवल्याने जरा पटापट वर जाता आले. वरून खूपच मोठा परिसर दिसत होता. फोटोसेशन झाल्यावर उतरणीला लागलो. सामान घेऊन गावळदेव गडाकडे चालायला सुरवात.
थोड्या थोड्या वेळाने च्यावम्याव साठी आणि पाणी पिण्यासाठी थांबे होत असल्याने थोडा आराम मिळत होता, पण या तंगड्या मंडळी बरोबर आपला शेवटपर्यंत निभाव लागणार नाही याचा अंदाज आला. गावळदेव गडाच्या पायथ्याला आम्ही साधारण अडीच वाजता पोहोचलो. इथे लगेच माथ्यावर जायचे आणि पुढे कात्राबाई कडे प्रयाण करायचे असा एक विचार होता. पण त्यात उशीर झाला असता आणि अंधारात लाकडे, स्वयंपाक करावा लागला असता. त्यापेक्षा गावळदेव करून या पठारावर मुक्काम करायचा आणि स्वंयपाकाची तयारी करून ५ वाजता गावळदेव माथ्यावर जायचे ठरले. मुक्कामाची जागा ठरल्यावर, तंबू ठोकायची तयारी सुरू झाली. तीन तंबू लावले आणि लाकडे आणून ठेवली. आधीचा ग्रुप येऊन गेला असल्याने तीन दगडांची चूल तयार होती. प्रसादने दूध तापवून गरमागरम चहा केला. पठारावर फिरत मस्त चहा पिऊन झाल्यावर गावळदेव माथ्यावर जायला निघालो. तासाभरात सगळे वरती पोहोचलो. सामान तंबूत ठेवल्याने फारशी दमछाक झाली नाही. गावळदेव हे जवळपास कळसुबाईच्या उंचीचे असल्याने वरतून खूपच छान देखावा दिसत होता. दूरवर कळसुबाई, AMK, भैरवगड, घनचक्कर, अशी रांग दिसत, दुसऱ्या बाजूला हरिश्चंद्र गड, तारामती, रोहिदास, पदरगड, आजोबा पर्वत असे सगळे डोंगर स्वच्छ दिसत होते. आजोबा पर्वता मागे सूर्य झुकत होता. छान सूर्यास्त पाहून लगेच उतराई ला लागलो. तंबू तळापाशी येई पर्यंत अंधार पडला होता.
कसाऱ्याहून येतानाच डिझेल आणले असल्याने परत चूल पेटवायला फारसे कष्ट पडले नाहीत. खिचडीचे सामान निघाले, काहीजण मक्याचे दाणे काढू लागले. काही कांदे, बटाटे चिरायला लागले. उरलेले पराठे, आणि इतर नाशिवंत खानसामान काढले. मस्त मसालेदार खिचडी शिजू लागली.. बाहेर थंडी वाढत होती पण आमच्या झापेत चूल आणि आम्ही नऊ जण असल्याने थंडीला शिरायला जागाच नव्हती.. प्रसादने सरप्राइझ आयटम म्हणजे श्रीखंड काढले. चुलीवर ची खिचडी, साजूक तूप, मक्याचे दाणे, पराठे, श्रीखंड, सोबत गाजरे, काकडी, दोन तीन प्रकारच्या चटण्या ठेचे असे मनसोक्त जेवण झाले. बाहेर जाऊन ताटल्या, भांडी धुतली. बाकीच्या मंडळींना नाही पण माझ्यासाठी सुपर सरप्राईज वाट पाहात होते. प्रसाद चक्क विड्याची पाने लावत होता. पाने, चुना, सुपारी, गुलकंद, मध असे सगळे साग्रसंगीत पान खाण्याचा कार्यक्रम झाला. आजपर्यंत च्या भटकांत्या मध्ये हा कार्यक्रम अगदी नवीन आणि आवडीचा ठरला. थोडावेळ बाहेर शेकोटी जवळ गप्पा झाल्या आणि झोपले.

पहाटे २ वाजताच "उठा उठा" हाकाट्या आल्या. सगळे आवरून ३ ला निघून कात्राबाई शिखर सूर्योदयाच्या आत गाठायचे असा बेत होता. पटापट चूल पेटवून चहा झाला, तोपर्यंत तंबू आवरून सामानाची बांधाबांध झाली. चहा नंतर केळी खाऊन ठरल्याप्रमाणे ३ ला निघालो. बॅटऱ्यांच्या प्रकाशातच सगळी वाटचाल होती. उजव्या बाजूला मोडा डोंगर अंधूक दिसत होता. त्याला मागे टाकून आम्ही कात्राबाई कडे निघालो. वाटेत पाण्याच्या ठिकाणी थांबा झाला आणि नंतर ५च्या सुमारास आम्ही कंत्राबाईच्या पायथ्याच्या मंदिरापाशी पोहोचलो. माझ्या पायाची शीर दुखायला लागली होती. नंतरच्या धोक्याची कल्पना येऊन मी कात्राबाई शिखरावर न जाण्याचे ठरवले. मी थांबल्याने सगळ्यांच्या सॅका मंदिराशी ठेवल्या आणि निघाले. डोंगरावरचे मंदिर म्हणजे मूर्तीच्या बाजूला थोडी सपाट मोकळी जागा आणि लगेच झाडी होती. अजून तासभर तरी इथे पूर्ण अंधार राहणार होता. त्यामुळे गावकऱ्यांने एकटेच असल्याने हातात काठी आणि बॅटरी कायम ठेवा असे सांगून ठेवले. सगळी मंडळी निघाली. बॅटऱ्यांचे ६ दिवे देवळामागच्या झाडीत वर वर सरकू लागले. मधून मधून आमचे झोत / शिट्या मारून खुणा चालू होत्या. मंडळी दिसेनाशी झाली. सगळे शांत झाले. जंगलात पूर्ण अंधारात निर्जन ठिकाणी मी एकटाच असा पहिल्यांदाच थांबलो होतो. पण छान वाटत होते. थोड्या वेळाने तांबडे फुटायला लागले, पक्षांचे छान छान आवाज ऐकायला यायला लागले. काही पक्षांचे आपल्या जोडीदाराबरोबर चाललेले आवाजाचे 'सिग्नलिंग' ऐकण्यात खूपच गंमत वाटत होती. हळूहळू छान उजाडलं. समोरच्या डोंगरावर आकाश पिवळे धम्मक झाले आणि सूर्यदेवाने दर्शन दिले. मंडळींना यायला थोडा वेळ होता. कंत्राबाईची मूर्ती स्वच्छ सूर्यप्रकाशा पडल्याने चमकत होती. बूट काढून देवासमोर उन्हात बसलो. थोडी स्तोत्रे म्हटली इतक्यात मंडळींचे आवाज ऐकू आले. थोडे खानपान झाल्यावर शेवटच्या उतराईला लागलो.
झपाट्याने उतरत कुमशेत गावाकडे चाल चालू होती. आमच्यातल्या अनूपला शुगर चा त्रास असल्याने तो इन्शुलिन घेत होता. आजही त्याने कात्राबाई शिखरावर तसे घेतले पण त्यावर काही खाल्ले नाही. त्यामुळे कुमशेत गावात पोहोचता पोहोचता त्याचे पाय वेडे वाकडे पडायला लागले. परिस्थिती गंभीर होती पण हा खंबीर होता. मला काही झालेले नाही असे ठासून सांगत होता. सुदैवाने आमच्या बरोबर डॉ अजयहोते. त्यांनी अनुपवर पक्के लक्ष ठेवायला सांगितले, तो ऐकणार नाही पण केव्हाही कोसळेल असेही सांगितले. त्याला चारही बाजूने कव्हर करत आम्ही कसेबसे गावात पोहीचलो.

एका गावकऱ्याच्या घरी आमच्या बरोबरचा उरलेला शिधा दिला आणि त्यांना खिचडी बनवायला सांगितली. अनूप तिथेच बाजेवर आडवा झाला. बाकीच्या मंडळींचा गुहिरीची दर उतरून देहणे गावांत जायचा बेत होता. अजून ४-५ तास चालावे लागणार होते. त्यांच्या वेगाने मला इतके चालता येईल याची खात्री नसल्याने मी इथे ट्रेक सोडला आणि आमच्या वाटाड्यांबरोबर मुख्य कुमशेत गावात पोहोचलो. लालपरी रुसली असल्याने इथून १५ किमी चालून शिरपुंजे गावात जावे लागणार होते. तेथून घोटी साठी गाड्या मिळतात असे कळले. १२ वाजून गेले होते. एका घरात जेवून मग निघायचे ठरवले. जेवण उरकून शिरपुंजे गावात जायला निघालो. गावाच्या वेशीवर जेमतेम पोहोचतो तेवढ्यात प्रसादची हाक आली. अनुपला खूप त्रास झाल्याने त्या सगळ्यानीही इथूनच परतायचे ठरवले होते. आधीच्या गावात अनूप जवळपास कोमात गेला होता. बाजेवर आडवा झाला होता तो जेवायला हाका मारल्या तरी उठेना. तो बेशुद्ध झालेला होता. डॉ अजयने प्रयत्न करून पाहिले, पायाला जोरात चिमटे काढले, थोबाडीत दिल्या पण अनूप काहीच प्रतिसाद देत नव्हता. त्याचे तोंड जबरदस्तीने उघडून डॉ त्यात मीठ लिंबू पाणी टाकत होते पण तो गिळत नव्हता. कसे बसे थोडेसे पाणी आत गेले आणि काही वेळाने त्याने थोडी हालचाल केली. मग डॉ नी आणि इतरांनी प्रयत्न केले आणि तो शुद्धी वर आला. फारच भयानक प्रसंग आला होता. पण डॉ अजय बरोबर होते आणि त्याची 'वेळ' झाली नव्हती म्हणून सुदैवाने तो वाचला आणि आम्ही पुनः एकत्र आलो. योगायोगाने एका भाजीच्या टेम्पोत आमची शिरपुंजे गावात जायची सोय झाली आणि माझी ३-४ तास चाल वाचली. सगळे गप्पा मारत शिरपुंजे- घोटी- कसारा प्रवास करून ठाण्याच्या लोकलमध्ये बसलो. शेवटचा अनूप प्रसंग सोडला तर ट्रेक छानच झाला पण शरणागती पत्करलेला माझा पहिलाच ट्रेक ठरला. आता आपलीही उतराई सुरू झाली असल्याची जाणीव या ट्रेकने करून दिली.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वर्णन छान आहे नेहमीप्रमाणे.
अनुप यांच्यावर गुदरलेला प्रसंग थोडक्यात निभावला म्हणून बरं. आधीच (चालत असतानाच) चिक्की, लाडू वगैरे काही खायला दिलं असतं तर? असा विचार मनात आला.

हे ट्रेक वर्णन वेगळे आहे.
सर्व काही ठरल्याप्रमाणे झाले आणि ट्रेक संपला असं नाही.

तर अचानक ग्रुपमध्ये आलेले मनाने येतात पण शारिरीक तयारी नसते ते ट्रेक सुरू झाल्यावर कळते.
आपणच जेवण करायचे ठरले तरी ऐनवेळी बाहेरून घ्यावे लागले.
असेही ट्रेक धागे यावेत. म्हणजे तयारी होईल.
मला एकदा राजमाची उतरताना ताप आला ( मे महिना दुपार.) मग एक परासिटमोल साखर आणि पाणी यावर खाली कोंदिवडेला रिक्षा स्टँडला कसाबसा पोहोचलो आणि जीवात जीव आला. आता पाय हलवायचे नव्हते. साधा उन्हाळी तापच होता.
बाकी ग्रुप ट्रेकिंग बंद झाले पाहिजे हे माझे मत. फार तर तिघे असावेत. भरमसाठ लोक एकाच वेळी ( शनिवार रविवार )जातात आणि छोट्या गावांच्या पाणवठ्यावर ताण पडतो. किंवा विधी मोठ्या प्रमाणात होतात ते निसर्ग निस्तरू शकत नाही ताबडतोब.
असो.

छान लिहिलय.
अनुप यांच्यावर गुदरलेला प्रसंग थोडक्यात निभावला म्हणून बरं. >>>> अनुमोदन.

अनुप म्हणजे कोण?
'ग्रूपमध्ये आजारी पडलेला एक ट्रेकर'. त्यास वाटेत सोडून जाता येत नाही, बरोबर पुढेही नेता येत नाही असा एक जण.

आडनाव काय
कारण एक अनुप नावाचा ट्रेकर माहिती आहे पण तोच हा का ते माहिती नाही