सजल नयन नितधार बरसती.. (भाग -१ )

Submitted by SharmilaR on 16 March, 2022 - 02:15

सजल नयन नितधार बरसती.. (भाग -१ )

सजल नयन नित धार बरसती
भावगंध त्या जळी मिसळती ||

डोळे बंद करून, मंत्रमुग्ध होऊन वीणाताई गाणं ऐकत होत्या. त्या हळुवार गाण्याचा शब्द न् शब्द मनाला भिडत होता. वीणाताईंच्या डोक्यातले इतर विचार तेवढ्या पुरते तरी थांबले होते. गाडी थांबली, ह्याचंही त्यांना भान नव्हतं.

“उतरायचं नं आई?” अर्चनाने हळूच विचारलं. वीणाताई भानावर आल्या. गाडी लाइफ केअर हॉस्पिटल समोर उभी होती.

“अ.. हो..”

“मी येऊ का बरोबर?” अर्चनाने विचारलं.

“नको. नको. तू तुझी कामं आटप. परत निघताना मी फोन करीन तुला.” गाडीतून उतरत वीणाताई म्हणाल्या.

“नीट जाल ना? सोबत हवी असेल तर खरंच, मी थांबते.” अर्चना परत म्हणाली.

“नको गं बाळा. जाईन मी नीट. मी व्यवस्थित आहे. आणि मला एकटीलाच भेटायचं आहे माईंना.” वीणाताईंच्या चेहऱ्यावर निश्चय स्पष्ट दिसत होता.

“बरं. काळजी घ्या. आणि मला फोन करा. मी जवळपासच आहे.” त्यांना उतरवून अर्चनाने गाडी पुढे घेतली.

‘सून आहे, पण किती काळजी घेते.. आणी आता तर, तिने सून असण्याचं ओझं वहायची पण काहीच गरज नाही. तिची ती स्वतंत्र आहे. आता तिने आमची काळजी करायचीही काही गरज नाही. दुसरी एखादी असती, तर म्हणाली असती, ‘करेल त्यांचा मुलगा त्यांचं.. आता माझा काय संबंध?..’.

पण एकदा जोडलेलं नातं, बायका इतक्या सहजी तोडत नाही हेच खरे..’. वीणाताईंच्या मनात आलं, आणी त्या चमकल्याच. वाटलंच परत, ‘माझ्याकडून घाई झाली होती का, नानांशी नातं जोडण्यात? आणखी जरा वेळ जाऊ द्यायला हवा होता का मी? की मुळात मी त्यांच्याशी नातं जोडणच टाळायला हवं होतं?’

हॉस्पिटल मध्ये शिरून वीणाताई जिन्याकडे वळल्या. प्रितीने रूम नंबर सांगीतलाच होता. दोन मजले चढायचे होते, तरी मुद्दाम त्यांनी लिफ्ट घेतली नाही. माईंना भेटण्याच्या आधी, परत थोडा वेळ हवा होता एकटीला. पण माईंना त्रास तर नाही नं होणार मला बघून? आणी प्रीती भेटू देईल ना? मनात शंका आलीच.

त्या रूम समोर पोचल्या तेव्हा नेमकी प्रीती बाहेर पडतच होती. त्यांना बघून ती थबकली. थोडी गोंधळली सुद्धा.
“तुम्ही एकट्याच आलात?” प्रीतीला वाटलं होतं, आता तरी नाना येतील, काल एवढं कळवल्यावर आणि सांगितल्यावर तरी.

“त्यांना बरं नाहीये... मी भेटले तर चालेल? पाचच मिनिटे नुसती बसेन हवं तर..” त्या आजिजीने म्हणाल्या.
प्रितीने नुसताच निश्वास सोडला.

“मी जरा कँटिन मध्ये जाऊन, कॉफी घेऊन येते. बसा तुम्ही.” प्रीती बाहेर पडली.

वीणाताई आत गेल्या. खूप वर्षांनी बघत होत्या त्या आज माईंना. मुळातल्याच सडपातळ माई आता खूपच कृश दिसत होत्या, पण चेहऱ्यावरचे शांत भाव तसेच होते, तीस, चाळीस वर्षांपूर्वीचे. तेव्हाही माई साधारणच होत्या रूपाने. खरं तर गोऱ्यापान, देखण्या नानांबरोबर काहीशा सावळ्या, ठेंगण्या माई जरा विजोडच दिसायच्या. पण सावळ्या माईंचे डोळे, शांत समई सारखे वाटायचे तेव्हाही.

वीणाताई हळूच बेड शेजारच्या खुर्चीवर बसल्या. माईंचे डोळे बंद होते. जवळच ईसीजी मॉनिटर चालू होता. माईंना ऑक्सिजन मास्क लावला होता, तरी धाप जाणवत होती. चाहूल लागताच माईंनी कष्टाने अर्धवट डोळे उघडले. विणाताई दिसताच त्यांनी जरा आजूबाजूला नजर फिरवली, आणी परत डोळे मिटले.

काय होतं त्यांच्या नजरेत? दु:ख.. वेदना.. निराशा.. की वीणाताईंबद्दलचा आकस? की फक्त नानांना शोधत होत्या त्या? माईंच्या बंद डोळ्यांच्या कडातून पाणी ओघळलं.

मुक्या मनाचे मुकेच आठव
मूक दीपज्योतीसम जळती ||

चेहऱ्यावरची माईंची निराशा स्पष्टपणे जाणवत होती. आजपर्यंत कधी त्यांनी काहीच मागीतलं नाही कुणाकडे. कशाचीच कधी अपेक्षा केली नाही. आणी आज त्यांची शेवटची, एकमेव इच्छा आपण नाही पुरी करू शकलो. वीणाताईंना गहिवरून आलं. ‘काय आठवत असेल बरं माईंना ह्यावेळी? नानांनी केलेली त्यांची अवहेलना विसरल्या त्या? तसं नसतं तर, कशाला त्यांनी आता नानांची आठवण काढली असती? पूर्वीच्या काळी अहेवपणी जातांना पती पाणी द्यायचा म्हणे शेवटचं.. माईंचा विश्वास आहे ह्या गोष्टींवर? म्हणजे माई अजूनही स्वत:ला नानांची पत्नी समजतात?.....’ त्यांनी माईंचा हात हातात घेतला.

तुझ्या स्मृतींची फुले प्रेमले
अजुन उखाणे मला घालिती ||

“त्यांना यायचं होतं, पण तब्बेत साथ देत नाही हल्ली..” वीणाताईं थबकल्या. त्यांना स्वत:चच बोलणं पोकळ वाटायला लागलं. त्या माईंचा हात हातात घेऊन तशाच बसून राहिल्या. किती आग्रह केला त्यांनी नानांना येण्याचा. शेवटच्या क्षणी तरी हा दुरावा सोडा म्हणून.

काल प्रीतीचा फोन येऊन गेल्यापासून वीणाताईंना काहीच सुचत नव्हतं. त्यांना तर वाटत होतं, नानांनी एकट्यानेच माईंना भेटायला जावं म्हणून. शेवटचे काही क्षण तरी माईं बरोबर एकट्याने घालवावे म्हणून. पण नाना ऐकायलाच तयार नव्हते.

“माझ्या आयुष्यातला तो रस्ता केव्हाच संपला आहे. आणी तिनेही केव्हाच तिचा मार्ग बदलला आहे. आमच्यात नातं शिल्लकच नाहीय काही. मग उलट आता मी जाऊन, तिला त्रासच जास्त होईल. कशाला शेवटच्या क्षणी जुन्या आठवणी तिला तरी? शांतपणे जाऊ दे तिला.” ते ठामपणे म्हणाले होते. म्हणजे हे सगळं नानांनी एकतर्फीच ठरवलं होतं....

शब्द.. शब्द .. आणी फक्त शब्दच. त्यांना त्यांच्या पुस्तकातल्या पात्रांच्या भावना जशा कळतात, तशा प्रत्यक्षातल्या माणसांच्या का नाही कळत? तसाही त्यांनी कधी माईंचा विचार केला होता? त्यांच्यावर फक्त तो लादला होता. माईंशी त्यांच जमत नाही हेही त्यांनीच ठरवलं होतं. वेगळं व्हायचा निर्णय त्यांचाच होता. आणी स्वाभिमानी माईंनी मुकाट्याने तो ऐकला होता.

आताही नानांना त्यांचा भूतकाळ दिसत नाहीये का? मोहन, अर्चनाच्या रुपानं? त्यांच्या लाडक्या नातीला, इशाला बघून त्यांना प्रीतीची आठवण नाही का येत? की तेच कारण आहे, इथे नं येण्याचं?

वीणाताईंना अगदीच राहवलं नव्हतं. शेवटी त्यांनी एकटीनेच माईंना भेटायचं ठरवलं. जमलं तर माफीही मागायची होती माईंची मनापासून.
म्हणायचं होतं, ‘माझ्या चुकीची शिक्षा मला द्या. मुलांवर नका राग धरू. त्यांच्या पाठीशी आशीर्वाद असू द्या तुमचा’. त्या एकट्याच हॉस्पिटल मध्ये जाणार कळल्यावर अर्चना आली होती त्यांना सोडायला.

वीणाताई माईंचा हात हातात धरून तशाच बसल्या होत्या. पण खरंच माझी चूक होती का? की मी नसते, तरी माईंचा हा एकटेपणा नं टाळता येण्यासारखा होता?

लेखक म्हणून वीणाला नानासाहेब खूपच आवडत होते. वीणाचं वयच तस होतं. पुस्तकी विश्वात रमण्याचं. नानासाहेबांनी लिहिलेला शब्द न् शब्द ती वाचायचीच. कॉलेज च्या मासिकासाठी मुलाखत घ्यायला म्हणून तिची नानासाहेबांशी पहिली भेट झाली. तेव्हा तर ती काय प्रश्न विचारायचे हे पण विसरून गेली होती. नानाचं व्यक्तिमत्वच तसं होतं. ऊंचे पुरे आणी देखणे नानासाहेब पहिल्या भेटीतच मग जास्तच आवडायला लागले तिला. आणी वीणाने मुलाखत घेतली, म्हणण्यापेक्षा त्यांनी तिला विचारतं केलं. मग हळू हळू तिला प्रश्न सुचत गेले. मुलाखत रंगत गेली. तासाभरकरता म्हणून आलेली वीणा चांगले दोन तीन तास त्यांच्याशी गप्पा मारून परतली.

त्यांच्या पुस्तकांबद्दलचा तिचा व्यासंग बघून, त्यांनी प्रकाशना करता तयार असलेलं, त्यांच एक हस्तलिखित तिला देऊ केलं. मग त्या निमित्ताने, ती एक दोनदा त्यांच्या घरीही गेली होती. तेव्हाच तिने माईंना प्रथम पहिलं होतं. ती नानासाहेबांशी बोलत असताना, मुकाट्‍याने त्या चहाचा ट्रे आणून ठेवायच्या. किंचित हसून ‘कशी आहेस?’ विचारायच्या, आणी चटकन निघूनही जायच्या. छोटी प्रीतीही कधीतरी आसपास दिसायची. अगदी आईवर गेली होती प्रिती.

नानासाहेब कितीही आवडत असले तरी ते संसारी आहेत, एका मुलीचे बाप आहेत ही जाणीव वीणाला होती. मनातलं प्रेम वीणाने कधी उघड होऊ दिलं नाही. त्यांचं बोलणं ऐकतांना तिला विरघळून जायला व्हायचं. त्यांच्याशी भेटीही कमी केल्या तिने मग. तिला त्यांच्यापासून दूरच रहायचं होतं. तिने स्वत:ला अभ्यासात, वाचनात गुंतवलं. सगळ्यांच्याच आयुष्यातला गुंता टाळायचा होता तिला.

पोस्टग्रॅजुएशन नंतर विणाने एका दैनिकात नोकरी सुरू केली, अन् परत एकदा, दैनिकाच्या विशेष पुरवणी करण्या करता नानासाहेबांची मुलाखत घेण्याची वेळ तिच्यावर आली. तिची त्यांच्याशी असलेली पूर्वीची ओळख कधीतरी बोलता बोलता तिनेच सांगितली होती, मग त्यांना भेटण्याचं काम तिच्यावरच आलं. तिलाही मोहं आवरला नाही. वाटलं, भेटावच एकदा त्यांना.

आधी फोन करून, वेळ घेऊन ती नानासाहेबांकडे गेली. घरात ते एकटेच होते. सुरवातीलाच त्यांनी स्वत:हूनच बायको, मुलगी कायमच्या दुसरीकडे रहायला गेल्याचं सांगीतलं. थोडंसं अवघडतच मुलाखतीला सुरवात झाली मग, अन परत गप्पांच्या नादात वेळ कसा गेला ते कळलंच नाही तिला. बाहेर अंधारून आलं होतं. मग जेवायलाच बाहेर जाण्याचं, त्यांनी सुचवलं, अन तिनेही नाही म्हटलं नाही. जेवणा नंतरही गप्पा रंगत गेल्या त्यांच्या अन ती तिच्या घरी जायच्या आत, तिला त्यांच्याकडून लग्नाचं प्रपोजल आलं.

वीणा तर बावरूनच गेली एकदम. तेवढ्यातही तिला वाटून गेलं, आपलं प्रेम बिम ठीक आहे.. पण त्यांचा संसार? आत्ता मोडलेला असला तरी.. ते विवाहित होते. त्यांना एक मुलगी आहे.. वयाचं अंतर तर होतंच होतं. जे टाळायचा ती प्रयत्न करत होती, तेच अनपेक्षितपणे समोर आलं होतं. तिचं असं एकदम गप्प बसणं बघून तेच म्हणाले,
“मला तू पूर्वीपासूनच खूप आवडते. तुला पहिल्यांदा पहिलं, तुझं बोलणं ऐकलं, आणी मला आयुष्यात काय हवंय हे कळलं. ..पण तुझ्याकडून इतक्यात उत्तराची घाई नाही. सावकाश विचार करून सांग मला. तसाही अजून डीव्हॉर्स व्हायला काही महीने लागतील.”

पुढचे चार सहा महिने तिने खूप विचार केला. तिचं मनोमन प्रेम तर होतच त्यांच्यावर. वाटलं, दैवानेच ही संधी दिली आहे. त्यांचा संसार मोडायला, मी नक्कीच जबाबदार नाही. तो तर आधीच मोडलाय ..... मी परत भेटण्याच्या आधीच माई त्यांच्या आयुष्यातून दूर झाल्या आहेत. मग काय हरकत आहे?

(क्रमश:)

Group content visibility: 
Use group defaults

छान सुरुवात आहे. प्रसंग नजरेसमोर उभे राहीले. अगदी न पाहीलेल्या माई, प्रीती, अर्चना विणा सुद्धा उभ्या राहील्या. पुढला भाग येऊ दे लवकर.

बाय द वे, सजल नयन ही माझी अत्यंत आवडती भैरवी.

Chhan सुरुवात!
छोटीशी विनंती,
विणा ऐवजी वीणा कराल का?

विषय निघालाच आहे म्हणून थोडं अवांतर.
'सजल नयन' हे गाणं कडकडेंच्या गाण्याच्या खूप आधी मी स्त्री गायिकेच्या आवाजात आकाशवाणीवर ऐकल्याचे पुसटसे आठवते.. कुणाला काही माहीती असेल तर जरूर सांगा.

सजल नयन ही माझी अत्यंत आवडती भैरवी >> माझीही. पण ती भैरवी आहे का नक्की? बिलासखानी तोडी वाटतो. सजल नयन ला सा ग् प ध् म ग् ही सुरावट टिपिकल बिलासखानी तोडी ची आहे. पुढची ओळही तशीच सुरू होते. फक्त प्रत्येक कडव्यात भैरवी जाणवते आणि कडव्याची शेवटची ओळ जी आहे (मुक्या मनाचे वगैरे) तिथे मिश्र भैरवी आहे.

बाकी लेख छानच लिहिला आहे. पुढचा भाग अजून वाचायचा आहे तो वाचेन.