मराठी भाषा दिवस : माझे मराठीचे मास्तर / माझ्या मराठीच्या बाई - स्वाती_आंबोळे

Submitted by स्वाती_आंबोळे on 1 March, 2022 - 16:09

मला मायबोली मराठीची गोडी माझ्या मायमाऊलीमुळेच प्रथम लागली. इतकी लागली, की शालेय जीवनात कितीतरी मराठीच्या शिक्षिकांनी धुरंधर प्रयत्न करूनही तीत बाधा आली नाही.

आई कोकणातली, त्यामुळे तिच्या अभिव्यक्तीला ते एक वाकुडं वळण जन्मजात लाभलेलं आहे. तसं तिचं शालेय शिक्षण तेव्हाच्या मॅट्रिकपर्यंतच झालेलं होतं, पण तरीही, किंबहुना त्यामुळेच की काय, तिच्या जिभेवर सरस्व.... एक हिंदू देवी सातत्याने नृत्याचे कार्यक्रम करत आली आहे. विशेषतः आई चिडली की या कार्यक्रमांना भलताच रंग चढतो.

लहानपणी मी तिच्या हातचा मारही बराच खाल्ला आहे, पण त्यासाठी शक्तीचा अपव्यय करण्याची तिला आवश्यकताच नव्हती असं मला अजूनही वाटतं. समोरच्याला गारद करायला पहिली तिच्या नजरेची धार, आणि बॅकअप म्हणून जिभेची धार अजूनही पुरे असतात.

अनेक म्हणी, वाक्प्रचार तिच्या बोलण्यात अगदी सहज आणि सतत डोकावत असतात. तसंच तिचं साधं बोलणंही अतिशय नादमय आणि अलंकारिकही असतं. विशेषतः वक्रोक्ती, पर्यायोक्ती आणि अचेतनगुणोक्ती (म्हणजे जिवंत माणसांवर ते दगड वगैरे असल्याचा आरोप) हे तिचे आवडते अलंकार!

मराठी भाषेचं तिला इतकं प्रेम आहे, की हिंदीइंग्रजीसारख्या इतर भाषाही ती मराठीतूनच बोलते.

तेव्हा माझी मायबोली ही खरोखरीच माय-बोलीच आहे.

वाचनाची आणि साहित्याची आवडमात्र प्रथम बाबांमुळे लागली. मुलांना नुसती हातात पुस्तकं देऊन भागत नाही, त्यांना घरातली मोठी माणसं वाचनाचा आनंद घेताना दिसली, तर त्यांनाही ती गोडी लागण्याची शक्यता जास्त असते. बाबांनी तो वारसा दिला. ते स्वतः तर वाचायचेच, पण आवडलेले उतारे आम्हालाही वाचून दाखवायचे. ते नाटकांतूनही कामं करायचे, त्यामुळे ते उतारे अभिनीतही करत असत. अगदी रोजच्या वर्तमानपत्रातल्या वेचक बातम्या आणि वेधक मजकूर शाळेत असल्यापासून त्यांच्यामुळे कानावर पडायचा.
यात 'चला, संस्कार करू' अशा संकल्पापेक्षा 'जे जे आपणासि ठावे, ते ते इतरांसी सांगावे' या स्वभावाचा भाग अधिक होता.

बाबा, काका, चुलत भावंडं बरंच निरनिराळ्या प्रकारचं वाचन आणि थोडंफार लेखनही करत असत. त्यांची घरगुती पत्रंही वाचनीय असायची. हे सगळं कुठेतरी रक्तात उतरलं असावं. शुद्धलेखन मात्र आईमुळेच पक्कं झालं. त्याबाबतीत ती खूप आग्रही असायची.

कवितांची आवड कशी आणि कधी लागली हे मला नक्की सांगता येणार नाही. शाळेत तसा पाठांतरावर भर अधिक असायचा, पण पाठ्यपुस्तकातली विंदांची 'पवित्र मजला' कविता वाचताना एकदम ती 'युरेका' मोमेन्ट आली, 'यात गंमत आहे' असं बहुधा तेव्हा प्रथम स्पष्टपणे वाटलं असं आठवतंय. गाणी ऐकतांनाही आपलं लक्ष शब्दांकडे अधिक असतं हे जाणवत गेलं. हे एक कविता समजण्याचं इंद्रिय मला दिल्याबद्दल मी देव/ दैव किंवा जे काही कारणीभूत असेल त्याची ऋणी आहे! कविता वाचण्यात, लिहिण्यात, त्यांचा रसास्वाद उलगडण्यात अमाप आनंद आहे, आणि तो मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे!

मराठीच्या भवितव्याबद्दल वगैरे मला बोलता येणार नाही. माझ्या मुलांना मराठी बोललेलं कळतं, खाचाखोचाही पोचतात. मुलगा मराठीतून बर्‍यापैकी संवादही साधू शकतो. मुलीची मातृभाषाच अमेरिकन इंग्रजी आहे.
मुलगा लहान असताना त्याने घरी मराठीतच बोलावं असा मी आग्रह धरत असे. पण पुढेपुढे इंग्रजीत विचार करून, त्यासाठी मराठी शब्द आठवून, मग बोलण्याची कसरत करण्यात त्याचा बोलण्यातला उत्साहच मावळून जातो असं वाटायला लागलं. मग मी तो हट्ट सोडला. भाषा महत्त्वाची नाही, संवाद महत्त्वाचा - हे त्या उदाहरणावरून नीटच कळलं. मुलीच्या बाबतीत मग मी त्या फंदात पडले नाही.

पण तुटपुंजंसुद्धा मराठी येत असल्यामुळे बाहेर असलं तरी आपण कोणाला न कळता खाजगी बोलू शकतो यातली गंमत मुलाला कळते आणि आवडते. लहान असताना काही खास मागणी असेल तर 'मॉमी'ऐवजी 'आई' म्हणायचं अशीही एक लबाड खूणगाठ त्याने बांधली होती.

आता आम्ही दोघंही मोठे झालो आहोत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय :).
दुसरं वाक्य मजेशीर आहे (पण त्यावर संदर्भासहीत स्पष्टीकरण हवं). Happy

स्वाती , ‘उत्तर’ नंतर जास्त कथा लिहिल्या नाहीस ही माझी छोटी तक्रार आहे.

वक्रोक्तीमुळे, लेख वाचनिय झालेला आहे. एकदम टंग इन चीक. आवडला. परवाच तुला म्हटले होते आय अ‍ॅम बीईंग 'स्वातीड' (Swati-ed). ते कुठुन तुझ्यात उतरले आहे त्याचा अंदाज तुझ्या शिक्षिकेंवरुन आला Wink

मस्त लिहिलंयस. तोंडी वाक्प्रचार, म्हणी, अलंकारिक भाषा हे माझ्याही आईच्या बाबतीत अगदी डिट्टो.

छान आहे.
'चला, संस्कार करू' >> Lol

मस्त झाला आहे लेख. शेवट थोडा अचानक झाल्यासारखा वाटला.

तुटपुंजंसुद्धा मराठी येतं >> तुटपुंजं काय, मानेपणा म्हणजे काय आणि घरात कोण माने आहेत हे ज्याला कळतं त्याची लेवल फार वरची आहे Happy

छान .

मराठी भाषेचं तिला इतकं प्रेम आहे, की हिंदीइंग्रजीसारख्या इतर भाषाही ती मराठीतूनच बोलते.
>>> मस्त.

पहिलंच वाक्य वाचलं आणि एकदम ख्याक करून हसू आलं . नंतर अनेक वाक्यांनंतर ते वाढतंच गेलं. आणि हसूच्याही पलिकडंच काहितरी मिळालं !
खूप मस्त लिहिले आहेस !

अरे काय हे!
वक्रोक्ति, पर्यायोक्ति , व्याजोक्तिचे फटाके ठासून भरलेत.

<कविता वाचण्यात, लिहिण्यात, त्यांचा रसास्वाद उलगडण्यात अमाप आनंद आहे, आणि तो मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे!> खरंय.

मुलांना नुसती हातात पुस्तकं देऊन भागत नाही, त्यांना घरातली मोठी माणसं वाचनाचा आनंद घेताना दिसली, तर त्यांनाही ती गोडी लागण्याची शक्यता जास्त असते. >>> हे अगदी पटलं.
छान लेख...!

सुंदर लेख आहे. थोडक्यात पण सर्व मुद्दे कव्हर केले हे विशेष आवडलं. कारण ते कठीण असतं!
पुढच्या पिढीपर्यंत भाषा हवी तशी न पोचणं ही एक खंत आता all pervasive झाली आहे. पण या गोष्टी फोर्सही करता येत नाहीत.

छान लेख, आवडला.
मराठी भाषेचं तिला इतकं प्रेम आहे, की हिंदीइंग्रजीसारख्या इतर भाषाही ती मराठीतूनच बोलते. >> Lol हे कसं असेल त्याची उत्सुकता वाटते आहे. काही samples वाचायला आवडतील

अचेतनगुणोक्ती, अभिनीत असे अस्सल मराठी शब्द!!

आम्हाला ९ वीत द. मा. मिरासदार इतिहास शिकवायला होते. ते वर्गात आम्हाला त्यांनी लिहिलेल्या गोष्टी सांगायचे. पुढे मासिकात त्या गोष्टी छापून आल्यावर कळले की त्या गोष्टी चांगल्या होत्या.
नंतर ११ वी पास होऊन कॉलेजमधे आल्यावर मराठीला दोन शिक्षक होते. एक प्रभाकर ताम्हणे व दुसरे श्री के. क्षीरसागर.
पैकी श्री के क्षीरसागर हे त्या काळचे प्रसिद्ध टीका लेखक होते नि ते आम्हाला कविता शिकवायचे ( म्हणूनच मला कवितेतले काहीहि कळत नाही. ) ताम्हणे नुसते मुलींशी गपा गोष्टी करायचे. एकदा त्यांनी विचारले हा धडा शिकवायचा का, तेंव्हा मी उत्तर दिले परिक्षेत यावर प्रश्न येणार आहे का? या वरून माझे शिकण्याचे प्रेम किती होते ते कळले असेल. पुढे ते प्रसिद्ध झाल्यावर कळले की ते पण ग्रेट होते!

<<<ताम्हणे नुसते मुलींशी गपा गोष्टी करायचे. एकदा त्यांनी विचारले हा धडा शिकवायचा का, तेंव्हा मी उत्तर दिले परिक्षेत यावर प्रश्न येणार आहे का? या वरून माझे शिकण्याचे प्रेम किती होते ते कळले असेल.>>> Happy

Back to top