अळुची खमंग थालिपीठ भाजी

Submitted by सावली on 1 May, 2013 - 03:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अळुची पाने - ४
मध्यम कांदा - १
बेसन - एक वाटी
धने जिरे पावडर - २/३ चहाचे चमचे
तिखट, हळद
चवीपुरती चिंच
चवीपुरता गुळ
तेल
मोहोरी
मीठ

क्रमवार पाककृती: 

अळूची पाने स्वच्छ धुवुन शिरा काढुन बारीक चिरुन घ्या.
एका भांड्यात अळूची चिरलेली पाने, बेसन, तिखट, हळद, धणे जीरा पावडर, चिंच, गुळ ( किसुन ), मीठ हे सगळे एकत्र करुन थोडे थोडे पाणी घालुन कालवा. मिश्रण सरबरीत होऊदे. भज्याप्रमाणे अगदी घट्ट नको.
एका जाड बुडाच्या पसरट कढई / पॅन मधे तेल टाका.
तेल तापले की त्यात मोहोरी टाका.
तडतडली की हिंग, हळद आणि लगेच कांदा टाकुन किंचित परतवा.
कांदा भांड्याच्या बुडाशी व्यवसथित पसरवा. त्यावर मघाशी केलेले अळु बेसनचे मिश्रण पसरवा. मिश्रण कांद्यावर एकसारखे पसरले पाहिजे.
आता झाकण ठेवुन मंद गॅस वर शिजू द्या. अजिबात ढवळायचे नाहीये.
दहा / बारा मिनीटांनी झाकड उघडुन बघा. कडेचा कांदा लाल झाला असेल आणि बेसनाचे मिश्रण थालिपिठासारखे झाले असेल तर उलथण्याने हळुच न मोडता उलटवा.
आता दुसर्‍या बाजुने पण चांगले लाल होईपर्यंत शिजवा.
दोन्ही बाजु लाल झाल्या की थालिपिठ उलथण्यानेच कुस्करा आणि झुणक्याप्रमाणे करा.

अळुची खमंग थालिपीठ भाजी तयार आहे. मधे मधे कुरकुरीत झालेला कांदा खायलाही मजा येते.

वाढणी/प्रमाण: 
२ जणांकरता
अधिक टिपा: 

अळुवड्यांमधे अजुन काही घालत असल्यास ते ही मिश्रणात टाकले तर चालेल.
थालिपीठाप्रमाणे पण कांद्यावर शिजवल्यामुळे खमंगपणा वाढतो
मेहेनत न करता आरामात शिजवायची भाजी

अळु नसल्यास इतर पालेभाजी वापरुन करु शकता Wink

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>तर उलथण्याने हळुच न मोडता उलटवा >> हे कठीण आहे! घरात पालक आहे. आज संध्याकाळी करुन पाहते, आणि फोटो का नाही? फोटोग्राफरकडून फोटो नाही म्हंजे काय? Happy

छान शॉर्टकट आहे

पण ह्यात भाज्या अगदी बारीक कराव्या लागतील , नैतर शिजणार नाहीत