कळावे, लोभ असावा...

Submitted by कुमार१ on 30 September, 2019 - 05:15

सुमारे ३५ वर्षांपूर्वीचा काळ. संगणकाशी माझा अद्याप परिचय झालेला नव्हता. मोबाईल फोन तर तेव्हा स्वप्नातही नव्हते. तेव्हा संदेशवहनासाठी दोन मुख्य साधनांचा वापर प्रचलित होता – एक स्थिर-फोन आणि दुसरे पत्र. फोनचे दर हे आजच्यासारखे किरकोळ नव्हते. त्यामुळे फोनचा वापर विचारपूर्वक आणि मर्यादित असे. परदेशी फोन तर फक्त अत्यावश्यक किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत केले जात. पत्रलेखन विविध कामांसाठी बरेच होई, जसे की व्यक्तिगत, कार्यालयीन, विविध आमंत्रणे, जाहिराती, पत्रमैत्री, इ. महाविद्यालयीन जीवनात मी माझ्या परगावी आणि परदेशात असलेल्या आप्तस्वकीयांना हटकून पत्रे लिहीत असे. अशीच पत्रे लिहीता लिहीता मला त्या लेखनाची गोडी लागली. हे लेखन मी आवडीने आणि अगदी भान हरपून करीत असे. तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे माझी पत्रे प्राप्तकर्त्या व्यक्तींना आवडत असत. त्यांपैकी काही तसे पत्रोत्तरातून कळवत तर काही समक्ष भेटल्यावर सांगत. अशा प्रोत्साहनातून माझी ती आवड वाढतच गेली आणि तो आयुष्यातील एक छंद झाला.

post card.jpg

सुरवातीचे पत्रलेखन हे आप्तस्वकीयांपुरते मर्यादित होते. पुढे वृत्तपत्रांतून पत्रलेखन चालू केले. तरीसुद्धा या लेखनाची भूक अजून भागत नसे ! मग त्याची व्याप्ती वाढवू लागलो. त्या काळी छापील पुस्तकांचे वाचन बऱ्यापैकी असे. त्यात अभ्यासाची पुस्तके आणि साहित्य या दोन्हींचा समावेश होता. अभ्यासाच्या पुस्तकात काही वेळेस मुद्रणदोष तर कधी घोडचूका सापडत. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. ते पाहून मी बेचैन होई. मग नुसते स्वस्थ न बसता संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवू लागलो. परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत.

साहित्यवाचन करता करता काही विशिष्ट लेखक जास्त आवडू लागले. मग त्यांची पुस्तके वाचल्यावर त्यांना पत्राने अभिप्राय कळवू लागलो. सुरवातीस फक्त ‘पुस्तक खूप आवडले’ असे कळवत असे. पण हळूहळू त्यातल्या काही नावडल्या गोष्टींबद्दलही लिहू लागलो. माझ्या पत्रांना काहींची उत्तरे येत तर काहींची नाही. नमुन्यादाखल काही लेखकांचा उल्लेख करतो. रणजित देसाईना ‘राधेय’ आवडल्याचे कळवले होते. त्यांनी सामान्य वाचकांना उत्तरांसाठी स्वतःचे नाव-पत्ता छापलेली पोस्टकार्डे तयार ठेवलेली होती. त्यावरील त्यांच्या हस्ताक्षरातील चार ओळीदेखील बहुधा ठराविक असाव्यात. पण तरीही, “आपल्यासारख्या जाणकार वाचकांची पत्रे लेखकाला नेहमीच समाधान देतात”, हा मजकूर त्या वयात मला नक्कीच सुखावून गेला.

सुनीता देशपांडेंचे पत्रोत्तर चक्क मजेशीर होते. तेव्हा त्यांचे ‘आहे मनोहर तरी’ वाजतगाजत होते. मी अगदी मन लावून वाचले होते ते. पुस्तकातल्या महत्वाच्या विषयाखेरीज त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत सवयी, आवडी वगैरेबद्दलही काही लिहीले होते. घरी केलेल्या ताकावरील लोण्यापासून जास्तीत जास्त तूप काढण्यात त्यांचा हातखंडा आहे, असे त्यांनी लिहीले होते. त्यावर माझे कुतूहल चाळवले गेले कारण माझेही ते आवडीचे काम होते. मग काय, उचलले पेन आणि त्यांना “सांगा बरं, तुमची जादू काय आहे”, अशा आशयाचे पत्र लिहीले. नंतर विसरूनही गेलो होतो. त्यांच्या या पुस्तकासंदर्भात त्यांना बऱ्याच पुलं-भक्तांची खरमरीत पत्रे (आणि पुस्तक आवडल्याची देखील) त्याकाळी गेलेली होती. त्या पुस्तकावर अनेक चर्चा व परिसंवाद घडत होते. तेव्हा माझ्या या क्षुल्लक पत्राची त्या दखलच घेणार नाहीत असा माझा अंदाज होता. किंबहुना आपण तो ‘पुलं’ विषय सोडून काहीतरी वेगळे लिहावे हा माझा उद्देश होता. पण काही दिवसांनी त्यांचे उत्तर आले. माझे पत्र वाचल्यावर त्यांना क्षणभर हसू आले होते. पुढे पत्रात त्यांनी, त्यांची तुपाबद्दलची पद्धत पत्रातून नाही सांगता येणार पण प्रत्यक्ष भेटीत प्रात्यक्षिक जरूर दाखवेन, असे लिहीले होते.

हमो मराठेंच्या काही कादंबऱ्यात पात्रांच्या संवादांत इंग्रजी वाक्यांचा अतिरेक झालेला होता. शेवटी मी वैतागून त्यांना लिहीले की मराठी पुस्तकात हे जरा अतिच होतंय. याची दखल घेणारे त्यांचे उत्तर आले. त्यांनी स्पष्टीकरण असे दिले होते. आपण सगळे उच्चशिक्षित सध्या ‘हिंग्लिश/ मिंग्लिश/ इंग्राठी/ मिंदी’ अशा प्रकारची भेसळ भाषाच बोलत आहोत. त्यामुळे कादंबरीतील पात्रेही तशीच बोलणार !

माझ्या या साहित्यिक पत्रव्यवहारात वपु काळेंचा अनुभव अनोखा आहे. त्यांच्या लेखन कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यातील एक पुस्तक वाचले होते. त्याचे नाव आता आठवत नाही. त्या पुस्तकात शुद्धलेखनाच्या असंख्य चुका झाल्या होत्या. त्या पाहून मी खूप अस्वस्थ झालो. एखाद्या नामवंत लेखकाच्या पुस्तकातील अशा चुकांमुळे लेखकाची प्रतिमा डागाळली जाते. त्या चुका नक्कीच लेखकाच्या नसून मुद्रितशोधनातील दुर्लक्षामुळे झाल्या असणार याची मला खात्री होती. आता वपुंना लिहू का नको या संभ्रमात होतो. पण त्या आधी त्यांचे ‘प्लेझर बॉक्स’ पुस्तक वाचले होते. त्यात त्यांनी सुमारे पन्नास हजार वाचकांच्या पत्रांना स्वहस्ताक्षरात उत्तरे लिहिल्याचे नमूद केले होते. मग अजून काय पाहिजे ? म्हटलं, आपणही लिहायचे बिनधास्त. बघू काय होतंय ते. मग एक अंतर्देशीय पत्र त्यांना लिहीले. “अशा गोष्टी प्रकाशकांना लिहून फारसा उपयोग होत नाही, असा अनुभव आहे. मात्र लेखक अधिक संवेदनशील असल्याने तुम्हाला हे कळवत आहे”, असे मी लिहीले. त्यावर सुमारे ३-४ महिने गेले. काही उत्तर नव्हते. म्हटलं ठीक आहे. वयोपरत्वे ते आता थकले असतील. मला पत्रोत्तर आले नाही पण पुढे एक सुखद प्रसंग घडणार होता. एव्हाना मी त्या पत्राबद्दल विसरूनही गेलो होतो. अशात एका रविवारी सकाळी बायकोशी निवांत गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात घराची बेल वाजली. दार उघडून पाहतो तर समोर एक अनोळखी गृहस्थ. त्यांना आत बोलावले. त्यांनी लगेच खुलासा केला. त्यांच्या पिशवीतून एक पुस्तक काढून ते म्हणाले, “ मी मुंबईहून आलोय, मला वपुंनी पाठवलंय. तुमच्यासाठी हे पुस्तक भेट दिले आहे त्यांनी”. ते पुस्तक होते ‘चिअर्स’. त्याच्या पहिल्या पानावर खुद्द वपुंची लफ्फेदार सुंदर स्वाक्षरी आणि ‘प्रेमादरपूर्वक’ असा उल्लेख ! तेव्हा मला झालेला आनंद काय सांगू? हे त्यांचे एक जुने पुस्तक होते. त्याचा माझ्या पत्रातील पुस्तकाशी काही संबंध नव्हता. मग ते गृहस्थ मला म्हणाले, “ तुमची तक्रार वपुंनी प्रकाशकाला कळवली आहे. तुमच्या पत्रात जर तुमचा फोन क्रमांक असता तर वपुंना तुमच्याशी बोलायची इच्छा होती”. असा हा आगळावेगळा आणि सुखद अनुभव.

काही लेखकांनी पत्रोत्तर देण्यासाठी लेखनिक ठेवलेले होते. हे मी कसे ओळखले ते सांगतो. त्यांच्या पत्रातील मजकूर अगदी सुवाच्य आणि नीटनेटका दिसे आणि त्याखाली असलेली लेखकाची सही अगदी वेगळ्या धाटणीत आणि स्पष्टपणे वेगळ्या शाईत केलेली दिसे. अरुण साधूंचे असे एक पत्र माझ्याकडे आहे.

अशा छान अनुभवांतून पत्रलेखनाची नशा वाढतच जाई. मग या यादीत उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, संपादक, उद्योगपती, काही सत्कारमूर्ती यांचीही भर पडली. त्या सर्वांचीच उत्तरे येत नसत पण त्यांना लिहीण्याचा आनंद काही औरच असे. उद्योगपतींत राहुल बजाज आणि फिरोदिया यांचे अनुभव सुखद आहेत. त्या काळी मी बजाज-चेतक ही स्कूटर वापरत होतो. ती वापरणाऱ्या लोकांना साधारण जे मायलेज मिळे त्याच्यापेक्षा तब्बल २० किमी मला जास्त मिळत होते. ‘टू- स्ट्रोक’च्या जमान्यात हे एक भलतेच नवल होते. खूप मित्रांना त्याचे आश्चर्य वाटे. एकाने तर माझ्याशी त्यावर चक्क पैज लावली होती आणि प्रात्यक्षिक झाल्यावर तो ती हरला होता ! मग काय, माझे हात शिवशिवू लागले आणि लिहीले पत्र बजाज यांना. पत्ता जरी कंपनीचा घातला होता तरी ते त्यांना नावाने लिहीले होते. पत्रात अर्थातच त्यांचे कौतुक आणि मी या अतिरिक्त मायलेजवर जाम खूष असल्याचा मजकूर. तसेच एखादीच स्कूटर असा अत्युत्तम अनुभव कसा देऊ शकते, याचे स्पष्टीकरणही मी विचारले होते. पंधरवड्यातच त्यांचे सुरेख उत्तर आले. इलेक्ट्रोनिक टाईपरायटरवर टाईप केलेलं. त्याकाळी सरकारी आणि सामन्य टंकलेखन साध्या टाईपरायटरवर होत असे. मोठ्या खाजगी उद्योगांची पत्रे नुकतीच इलेक्ट्रॉनिक यंत्रावर येऊ लागली होती आणि ते टंकलेखन पाहणे हेही डोळ्यांना सुखद वाटे ! बजाज यांच्या त्या उत्तरापाठोपाठ त्यांच्या तांत्रिक व्यवस्थापकाचेही मायलेजचे स्पष्टीकरण देणारे वेगळे पत्र आले – ते मात्र साध्या टाईपरायटरवर टंकलेले होते.

फिरोदियांचा अनुभव जरा वेगळ्या प्रकारचा आहे. त्या काळी ‘कायनेटिक’ची एक दुचाकी खूपच गंडली होती. ती गाडी खरेदीच्या पहिल्याच वर्षात सतत दुरुस्त्या काढी. मुख्य म्हणजे ती सुरु होतानाच रुसायची ! त्यांच्या सेंटरला खेटे मारून जाम वैताग आला होता. तिथल्या ‘अधल्यामधल्यांना’ भेटून काही उपयोग झाला नाही. मग सरळ कंपनी मालकांनाच सविस्तर पत्र लिहून आता ‘दुसरी नवी गाडीच बदलून द्या’ असे लिहीले. त्यावर उत्तर नाही आले पण तीनच दिवसात कंपनीचा एक अभियंता आमच्या दारात हजर ! मग त्यांनी ती गाडी थेट त्यांच्या कारखान्यात नेली व दुरुस्त करून शून्य बिलासह यथावकाश घरपोच केली. अर्थात नंतर ते मॉडेलच कंपनीने बंद केले. उद्योग जगतात कागदी घोड्यांपेक्षा तातडीच्या कृतीला किती महत्व असते, हे या प्रसंगातून दिसून आले.

मराठीतून दीर्घ पत्रलेखन करतानाचा एक विशेष अनुभव नोंदवतो. त्या काळी लेखनासाठी बॉलपेन आणि फौंटनपेन असे दोन्ही पर्याय प्रचलित होते. जातिवंत लेखक फौंटनपेन वापरत. आपण जर का बराच मोठा मराठी मजकूर बॉलपेनने लिहिला तर बोटे दुखून येत. इंग्रजी मजकूर लिहिताना मात्र ती तेवढी दुखत नसत. याचे कारण म्हणजे देवनागरी अक्षरांना बऱ्यापैकी गोलाई असते. याचा अनुभव घेतल्यावर मराठी लेखन कटाक्षाने फौंटनपेनने करू लागलो.

पत्रलेखनातील अजून एक मुद्दा सांगतो. मी जेव्हा पत्र लिही तेव्हा त्यावर वरच्या कोपऱ्यात दिनांक घालायचे हमखास विसरत असे. एकदा मी 'सकाळ' च्या तत्कालीन संपादकांना एक तक्रारपत्र लिहीले होते. त्याचे उत्तर देताना त्यांनी “तुमचे (दिनांक नसलेले) पत्र मिळाले..” अशी सुरवात केली होती. त्यानंतर दिनांक हटकून लिहायची मला सवय लागली.

असेच पत्रलेखन जोशात चालू होते. मग एकदा असे वाचनात आले की देशातला कोणीही नागरिक थेट पंतप्रधानांना पत्र लिहू शकतो आणि त्याची दखल घेण्याची यंत्रणा असते. म्हटलं, चला आता ही पण हौस पुरी करू. तत्कालीन पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. मग त्यांना लिहीले एक कौतुकाचे पत्र. मनाशी विचार असा केला. जर आपण तक्रारीचे पत्र लिहीले तर त्यांचे सचिव स्वतःच्या पातळीवरच त्याला केराची टोपली दाखवतील ! त्यापेक्षा कौतुकाचेच लिहा ना, म्हणजे बहुतेक ते सचिवांच्या चाळणीतून पुढे सरकेल आणि योग्य त्या टेबलावर पोहोचेल. बस्स, माझ्याकडून मी ते टपालपेटीत टाकले खरे. पुढे ते पोचले की नाही, पोचले असल्यास चाळणीतून पुढे सरकले का टोपलीत गेले हे कळण्यास काही मार्ग नाही.

सन २००० उलटले आणि हळूहळू आपल्याकडे संगणकाचा वापर वाढू लागला. त्याचबरोबर हाताने पत्र लिहिण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होऊ लागले आणि आजची परिस्थिती तर आपण जाणतोच. संगणकाच्या सुरवातीच्या दिवसात ‘इ-मेल’ चे कौतुक आणि अप्रूप होते. त्यामुळे त्या माध्यमातून पत्रलेखन करीत राहिलो. विशेषतः परदेशी पत्रव्यवहारासाठी ते फारच स्वस्त आणि मस्त माध्यम होते. पत्रकार आणि लेखक अशोक जैन यांची मला आलेली एक इ-मेल संस्मरणीय आहे.

अजून एक मुद्दा नमूद करतो. हस्तलेखनात एकाच हाताच्या तीन बोटांना खूप ताण येतो. संगणकलेखनात तो ताण दहा बोटांमध्ये विभागता येतो, हा फायदा नक्कीच महत्वाचा.
गेल्या ५ वर्षांत मात्र या छंदाला ओहोटी लागली आहे. ऐन तारुण्यात आपण जोशपूर्ण असतो. तेव्हा मी पाठवविलेल्या पत्रांपैकी निम्म्यांना जरी उत्तरे आली तरी मी खूष असे. इ-माध्यमांचा प्रसार वाढल्यावर वास्तविक पत्रोत्तर देणे हे सोपे झाले होते. पण व्यक्तिगत अनुभव मला तरी उलटाच येऊ लागला. उत्तराचे प्रमाण जुन्या जमान्यापेक्षा काहीसे कमीच होऊ लागले. तक्रार किंवा शंका विचारली असताही पत्राकडे दुर्लक्ष होऊ लागले. तेव्हा आता हौसेच्या पत्रलेखनाला मुरड घालावी हे बरे. उत्तर न आल्याने होणारा विरस आता अधिक जाणवतो. तेव्हा उगाचच आपणहून (कुठलेही व्यावहारिक काम नसताना) लिहिणे टाळलेले बरे, ही भावना बळावली आहे. एखादे वेळीस जर पत्र लिहिण्याची उर्मी आली तरी “जाऊदे, मरूदे, बास झाल्या लष्कराच्या भाकऱ्या”, असे म्हणणारे दुसरे मन वरचढ होत आहे. कालानुरूप आपण बदलत राहावे हे बरेच. लिखित जमान्यात आलेली पत्रोत्तरे मात्र व्यवस्थित जपून ठेवली आहेत. ती जाडजूड फाईल अधूनमधून चाळणे हे सुरेख स्मरणरंजन असते खरे ! ती चाळतानाच हा लेख लिहिण्याची स्फूर्ती मिळाली.
.......
हे होते माझे अनुभवकथन. तुमचेही असे काही अनुभव असल्यास जरूर लिहा. वाचण्यास उत्सुक.
*********************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुर्वी काही दुकानदार शिक्का बनवून पोस्ट कार्डवर मारत आणि त्यांच्या मालाची जाहिरात करत. पण नंतर पोस्टानं अशा व्यापारी उपयोगावर बंदी घातली होती. विशेषतः उधारी/कर्ज वसुली साठी शिक्क्याची पत्रं पाठवत.

@ हा ब,

पत्रप्रपंच कमी झाला तसे पत्र पेटी ते पोस्टमन ते पोस्ट ऑफिस सिस्टीम कशी बदलली >>>

भारतात क्रमाने होत गेलेले बदल थोडक्यात नोंदवतो:
१. पत्रांच्या सुगीच्या दशकांत पोस्टमन घरी दिवसातून दोनदा येत – सकाळी १० व दुपारी ४.
२. साधारण सन २०००च्या आसपास त्यांची सकाळची फेरी बंद झाली. पुढे रोज येणेही कमी झाले.

३. सध्या आमचे पोस्टमन आठवड्याची ‘डाक’ साठवतात आणि मग ७ दिवसात एखादी फेरी मारतात. त्या डाकेत पत्रे नगण्य असतात. जास्त करून भरणा असतो तो निरनिराळ्या संस्थांचे छापील अहवाल व विविध जाहिरातपत्रकांचा.

४. अजून काही सरकारी दस्तावेज/ कागदपत्रे स्पीडपोस्टने येतात. खास करून पासपोर्ट आणि वाहन-परवाना. ते समक्ष न देता अधिकृत पत्त्यावरच पोस्टाने येतात.

५. बरेचसे न्यायालयीन आदेश, इ. अजून रजि. पोस्टाने येतात. ‘WA’ संदेश पाठविण्याबाबत मध्यंतरी उच्च न्यायालयाने काही निर्णय दिला आहे. पण अंमलबजावणीबाबत माहिती नाही.
(क्रमशः)

@ हा ब
.....
६. साधारण २०००५ पासून पत्रपेट्यांची दुरवस्था सुरु झाली. पत्र टाकायची पेटी गंजणे आणि पुढे तिचा पत्रा फाटलेला असणे. तशी वाचकपत्रे पेपरात आली तरी त्याची दखल घेणे कमी होऊ लागले.
७. पूर्वी शहरांमध्ये दर अर्ध्या किलोमीटरवर पत्र टाकण्यासाठी टपाल पेट्या बसवलेल्या असत. त्यातल्या कित्येक रिकाम्या राहू लागल्याने काढून टाकण्यात आल्या.

८. एक घराजवळची पेटी काढल्यावर माझ्या मामाने पोस्टात जाऊन विचारणा केली होती. तेव्हा ते लोक हसून म्हणाले की तुमच्या बंगल्यात बसवून हवी असेल तर देऊ ! मुळात पत्र येऊन टाकणार कोण ?

९. अलीकडे पोस्टातील कर्मचारी बँकसदृश आणि गुंतवणूकीची कामे अधिक करतात.
१०. तरीसुद्धा ४ महानगरांत पोस्टमनकडे असलेला ‘गठ्ठा’ बऱ्यापैकी असतो !

११. पोस्टातील नवी नोकरभरती किरकोळ असावी कारण अधूनमधून सध्याच्या कर्मचार्‍यांची त्यासाठी आंदोलने होतात.

डॉ. कुमार,
टपाल ‘अधोगती’चा वृत्तांत छान !
>>> ‘WA’ संदेश पाठविण्याबाबत मध्यंतरी उच्च न्यायालयाने काही निर्णय दिला आहे. पण अंमलबजावणीबाबत माहिती नाही. >>

यावर काही आक्षेप घेतले गेले आहेत. अद्याप प्रत्येक नागरिकाकडे स्मार्टफोन नाही आणि असला तरी Wapp वापरायचे कायद्याने बंधन कसे करणार?
Wapp वरील आदेश वाचल्याची ‘खूण’ दरवेळी/ प्रत्येक फोनमध्ये दिसतेच असे नाही.

पत्र निमित्तमात्र कार्यक्रम

जी ए कुलकर्णी व सुनीता देशपांडे यांच्यातील पत्रव्यवहारावर आधारित अभिवाचन कार्यक्रम पुण्यात जुलै ते डिसेंबर २०१९ दरम्यान होत आहे.
इच्छुकांसाठी बातमी इथे:

https://epaper.esakal.com/FlashClient/Client_Panel.aspx#currPage=4

पोस्टाबद्दल च्या माहिती साठी धन्यवाद डॉक्टर.
पत्रासारखेच पोस्टमन ह्या आता विस्मृतीत चाललेल्या व्यक्तीबद्दल बरेच काही लिहिता येईल. आमच्या कडे 20 वर्षे येणारा पोस्टमन अचानक एके दिवशी बदलून आला आणि कोणी त्याची दखल सुद्धा घेतली नाही.

थोडे अवांतर आहे पण,
सध्याच्या e-commerce बिझनेस संधीचा पोस्टाने उपयोग करून घेतला नाही का? प्रायव्हेट कुरिअर पेक्षा पोस्ट जास्त जबाबदार वाटते मला.

कुमारजी लेखनातले ओघवतेपण भावले.

एका सामाजिक कार्यक्रमाप्रसंगी मा. निळू फुलेंशी भेट झाली होती. तो प्रसंग, त्याचं हसणं अजूनही आठवते.

हा ब,

पत्रासारखेच पोस्टमन ह्या आता विस्मृतीत चाललेल्या व्यक्तीबद्दल बरेच काही लिहिता येईल.
>>>>>
आजच एका ‘पोस्टवूमन’ वर छान लेख सकाळ मध्ये आला आहे.
https://www.esakal.com/pune/postwomen-lata-panhale-discussion-222051

सूर्यकांत, धन्यवाद.

** उद्या (९ ऑक्टोबरला ५० वा जागतिक टपाल दिन आहे).

या लेखामुळे अजून एक जागी झालेली आठवण.

माझी आजी दररोज (दिवस रात्र Happy ) सांगली आकाशवाणी ऐकत असे. पुढे त्यात मुंबई दूरदर्शनची भर झाली. तसेच एक दोन रोजची वर्तमानपत्रे वाचत असे. जवळपास रोज ती एक तरी पत्र ऐकलेल्या/पाहिलेल्या कार्यक्रमांसंदर्भात वा वाचलेल्या बातम्यांसंदर्भात पाठवत असे. कधी त्यात प्रशंसा असे, कधी तिला खटकलेल्या बाबी असत, कधी कधी त्यात सुचना असत जसे अमूक विषयावर कार्यक्रम करा वगैरे. हे साधारण मला आठवते ते ८७/८८ ते २००० पर्यंत. लहानपणापासून मी तिला पोस्टकार्डे आणून देणे, ती पत्रपेटीत टाकणे वगैरे कामे करत असे. थोडा मोठा झाल्यावर तिची (कु)चेष्टाही करू लागलो. जसे 'कोण वाचणार आजी तुझे पत्र, त्यांना काय पडले आहे' वगैरे.
मात्र आता याबद्दल विचार करता काही बाबी लक्षात येतात. ही पत्रे पाठवणे हा तिचा एक प्रकारचा सामाजिक संवाद होता. कार्यक्रम/लेख हे चांगल्या प्रतीचे सादर व्हावेत, अचूक असावेत, नवनवीन विषय असावेत व त्याद्वारे समाजाला काहितरी अधिक व सकस लाभावे ही तिची इच्छा होती. दुसरे म्हणजे १५पैश्याचे पोस्टकार्ड ही तिला परवडणारी गोष्ट होती.
पोस्टकार्डामुळे त्याकाळी असे अनेक सामान्य जन तत्कालिन 'नेटवर्क'मध्ये भाग घेऊ शकत होते.

आण्णा (माझे आजोबा) दर रविवारी आठवड्याभरात आलेल्या पत्रांना उत्तर लिहीत. कितीतरी पोस्टकार्ड त्यांनी त्यांच्या छोट्याश्या पेटीत जपुन ठेवलेली आठवतात..
पण आता सर्वांचे एवढे सुंदर पत्रलेखनाचे अनुभव वाचुन माझा पत्रलेखनाचा अनुभव फक्त परीक्षेपुरताच मर्यादीत राहीला..याच वाईट वाटतंय.. Sad

यावरून आठवलं काल शाळेत मुलाच्या काॅन्फला त्यांना पुस्तकांबद्दल लिहायला शिकवत आहेत हे कळलं. तेव्हा सहज मी मुलाला हेच सगळं लिहून माझ्या भाचीला पत्राने पीठव असं शिक्षिकेसमोर सुचवलं (म्हणजे नंतर मला ते करवून घेता आलं असतं) तर तिनेच मला पत्ता लिहिलेली पाकिटं पाठव असं सुचवलॅ. पुढचं शाळा बघेल. आमच्या स्कूल डिस्ट्रिक्टला अशा कार्यक्रमात रस आहे. आता बघु आमचा पाल्य काय करतो पण कदाचीत इतर पालकांना ही कल्पना आवडावी.
माझ्या काही मैत्रीणी बारावीनंतर दूर गावी शिकायला गेल्यावर काही पत्रव्यवहार झाला नंतर इंटरनेटमनळे आम्ही एकंदरीत तशा स्वादातून फारकत घेतली असं वाटतं. लेख आवडला. Happy

पोस्टमनच्या आयुष्यावर आधारित ‘पोस्टकार्ड’ हा मराठी चित्रपट पाहिला. गिरीश कुलकर्णी पोस्टमनच्या भूमिकेत. अन्य कलाकारही सर्व उत्तम आणि दिग्दर्शक गजेंद्र अहिरे.
मस्तच ! जरूर पाहण्यासारखा. प्राईमवर आहे.

>>>>पोस्टमनच्या आयुष्यावर आधारित ‘पोस्टकार्ड’ हा मराठी चित्रपट
>>>>>.
काल हा सिनेमा पहिला. खूप आवडला. त्यामुळे या धाग्याची आठवण झाली.
अनेक धन्यवाद.

पत्रोत्तराचे अनुभवकथन छान केले आहे...
मी दुसरी-तिसरीत असताना आई आणि आजी माझ्याकडून मामा,आत्या यांच्या साठी पत्रे लिहून घ्यायचे ते आठवले..
आंतरदेशीय निळ्या रंगाची पत्रे आणि कधी कधी पोस्टकार्ड पण.. Happy

मृणाली
धन्यवाद.
आंतरदेशीय निळ्या रंगाची पत्रे >>> अगदी.

1973 मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींनी जेआरडी टाटा यांना लिहिलेले एक पत्र सध्या माध्यमांमधून झळकते आहे.
ते इथे पाहता येईल :
https://www.livemint.com/news/india/indira-gandhi-s-letter-to-jrd-tata-g...

त्या पत्राचा सरकारी कागद, साध्या टाईपरायटरने केलेले टंकलेखन, इत्यादी गोष्टी आता बघायला रोचक वाटतात.

सुंदर लेख. राहुल बजाज यांचा अनुभव खासच आहे.
पत्र लेखनाचे दिवस काही औरच होते. मोठ्या लोकाना मी क्वचित पत्रे लिहली असतील.
माझे अक्षर आणि पत्र लेखन उत्तम असल्याने काहीनी माझी पत्रे जपून ठेवलीत याचे अप्रूप वाटते.
कधी त्यांच्या घरी गेले की कौतुकाने दाखवतात !

चौ को
धन्यवाद !
*"माझे अक्षर आणि पत्र लेखन उत्तम>> अरे वा छानच
Happy
तुम्ही इथे पण आहात ते मला आज कळले

सुरेख पत्रोत्तर लिहिणे ही बजाज यांची खासियत होती याचा एक अनुभव इथे आहे:
https://www.aksharnama.com/

नोकरी न देऊनसुद्धा मी राहुलकुमार बजाज यांचा जन्माचा ऋणी आहे!"
- मुकुंद टाकसाळे

या लेखात टाकसाळे व बजाज यांच्यात झालेल्या पत्रव्यवहाराचा उल्लेख आहे
तो किस्सा भलताच रोचक आहे
जरूर वाचा.

दु:खद घटना धाग्यावरुन इथे आले आणि इतके दिवस हा आधी कसा वाचला नाही याचं नवल वाटलं.
डॉ. कुमार नेहमीप्रमाणेच सुरेख अनुभवकथन. राहुल बजाज यांच्याबद्दलचा तुमचा अनुभव व वर दिलेला मुकुंद टाकसाळेंचा अनुभव दोन्ही खूपच आवडले.

>>>राहुल बजाज यांच्याबद्दलचा तुमचा अनुभव व वर दिलेला मुकुंद टाकसाळेंचा अनुभव दोन्ही खूपच आवडले.>>>> +11
बजाज यांनी टाकसाळे यांना 25 रुपयाचा चेक पाठवणे फारच भारी वाटले.

IMG_20220216_123410.jpg

हे माझ्या संग्रहात एक (प्रत) आहे.
लोकमान्य टिळकांचे हस्तलिखित
तारिख १७ फेब्रुवारी १९२०
म्हणजे आजपासून बरोबर १०२ वर्षांपूर्वीचे

‘पिन कोड’ची पन्नाशी ; तंत्रज्ञान युगातही सहा अंकांना महत्त्व
संस्कृत आणि पाली भाषेचे अभ्यासक, टपाल खात्यात पोस्ट मास्तर जनरल म्हणून कार्यरत असलेल्या श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी या ‘पिन कोड’ पद्धतीची भारतात सुरवात केली.

https://www.loksatta.com/mumbai/history-of-the-pin-code-which-turns-50-o...

नुकतेच पत्रलेखन या विषयावरील एक पुस्तक अचानक भेट मिळाले. त्याचा अल्पपरिचय :

पत्रास कारण की…
अरविंद जगताप
ग्रंथाली प्रकाशन.
१२ वी आवृत्ती, २०१९.

पूर्वी झी मराठीवरील चला हवा येऊ द्या मध्ये वाचन झालेल्या पत्रांचा हा संग्रह आहे. पुस्तकाची प्रस्तावना खूप आवडली. हस्ताक्षरातील पत्रलेखनापासून ते अलीकडे इ माध्यमांमधील संपर्कापर्यंत जो बदल झाला, त्याचा आढावा घेतला आहे. मागच्या पिढीतील ज्यांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेल्या पत्रलेखनाचा अनुभव घेतलेला आहे त्यांच्यासाठी हे सुरेख स्मरणरंजन आहे. पूर्वीच्या आणि आताच्या लेखनमाध्यम व पद्धतीबाबत समतोल विचार मांडलेले आहेत.

त्यातले काही मुद्दे:
१. जुनं ते सर्वच सोनं नव्हतं.
२. तंत्रज्ञान हा शाप नाही. त्याच्यामुळे मानवी कष्ट कमी होतात. कष्ट हे किमान पातळीवर जरूर यावेत परंतु संस्कृतीसह ते नष्ट व्हायला नकोत.

३. आपण आता गुगलवर नको इतके अवलंबून आहोत का ? त्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीवर विपरीत परिणाम होतो आहे का?
४. प्रिय व्यक्तीचे हस्ताक्षरातील पत्र हे वाचणाऱ्याला गदगदून हलवू शकत होते. तोच अनुभव इ -संपर्काबाबत येत नाही.

पुस्तकात एकूण ५० पत्रे आहेत. प्रत्येक पत्र समाजातील एखाद्या व्यक्तीला उद्देशून लिहिलेले आहे. त्यामध्ये सामान्यजन, लेखक, खेळाडू, समाजसेवक, राजकारणी, अभिनेते, इ. चा समावेश आहे. पत्रविषयांत प्रामुख्याने बदलते सामाजिक प्रवाह, ग्रामीण व शहरी जीवन( भारत वि. इंडिया), मराठी भाषा यांचा समावेश आहे.
“प्रिय आजी-आजोबा’ या नावाचे पत्र कल्पनेत सन २०६० मध्ये लिहीले आहे. त्याचा विषय तेव्हाची तीव्र पाणीटंचाई हा आहे. त्यात गेल्या १५० वर्षांत आपण पाण्याची कशी नासाडी केली याचे किस्से आहेत.

काही पत्रांचे विषय तात्कालिक असल्याने कालांतराने त्यांचे महत्व राहत नाही.
प्रस्तावना व निवडक पत्रे वाचनीय.

Pages