सुमारे ३५ वर्षांपूर्वीचा काळ. संगणकाशी माझा अद्याप परिचय झालेला नव्हता. मोबाईल फोन तर तेव्हा स्वप्नातही नव्हते. तेव्हा संदेशवहनासाठी दोन मुख्य साधनांचा वापर प्रचलित होता – एक स्थिर-फोन आणि दुसरे पत्र. फोनचे दर हे आजच्यासारखे किरकोळ नव्हते. त्यामुळे फोनचा वापर विचारपूर्वक आणि मर्यादित असे. परदेशी फोन तर फक्त अत्यावश्यक किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत केले जात. पत्रलेखन विविध कामांसाठी बरेच होई, जसे की व्यक्तिगत, कार्यालयीन, विविध आमंत्रणे, जाहिराती, पत्रमैत्री, इ. महाविद्यालयीन जीवनात मी माझ्या परगावी आणि परदेशात असलेल्या आप्तस्वकीयांना हटकून पत्रे लिहीत असे. अशीच पत्रे लिहीता लिहीता मला त्या लेखनाची गोडी लागली. हे लेखन मी आवडीने आणि अगदी भान हरपून करीत असे. तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे माझी पत्रे प्राप्तकर्त्या व्यक्तींना आवडत असत. त्यांपैकी काही तसे पत्रोत्तरातून कळवत तर काही समक्ष भेटल्यावर सांगत. अशा प्रोत्साहनातून माझी ती आवड वाढतच गेली आणि तो आयुष्यातील एक छंद झाला.
सुरवातीचे पत्रलेखन हे आप्तस्वकीयांपुरते मर्यादित होते. पुढे वृत्तपत्रांतून पत्रलेखन चालू केले. तरीसुद्धा या लेखनाची भूक अजून भागत नसे ! मग त्याची व्याप्ती वाढवू लागलो. त्या काळी छापील पुस्तकांचे वाचन बऱ्यापैकी असे. त्यात अभ्यासाची पुस्तके आणि साहित्य या दोन्हींचा समावेश होता. अभ्यासाच्या पुस्तकात काही वेळेस मुद्रणदोष तर कधी घोडचूका सापडत. यात देशी आणि विदेशी अशा पुस्तकांचा समावेश होता. ते पाहून मी बेचैन होई. मग नुसते स्वस्थ न बसता संबंधित प्रकाशकाला ती चूक पत्राद्वारे कळवू लागलो. परदेशी प्रकाशकांबाबतचे पत्रोत्तराचे अनुभव चांगले होते. ते धन्यवाद देऊन पुस्तकाच्या पुढील आवृत्तीत चूक सुधारण्याचे आश्वासन देत.
साहित्यवाचन करता करता काही विशिष्ट लेखक जास्त आवडू लागले. मग त्यांची पुस्तके वाचल्यावर त्यांना पत्राने अभिप्राय कळवू लागलो. सुरवातीस फक्त ‘पुस्तक खूप आवडले’ असे कळवत असे. पण हळूहळू त्यातल्या काही नावडल्या गोष्टींबद्दलही लिहू लागलो. माझ्या पत्रांना काहींची उत्तरे येत तर काहींची नाही. नमुन्यादाखल काही लेखकांचा उल्लेख करतो. रणजित देसाईना ‘राधेय’ आवडल्याचे कळवले होते. त्यांनी सामान्य वाचकांना उत्तरांसाठी स्वतःचे नाव-पत्ता छापलेली पोस्टकार्डे तयार ठेवलेली होती. त्यावरील त्यांच्या हस्ताक्षरातील चार ओळीदेखील बहुधा ठराविक असाव्यात. पण तरीही, “आपल्यासारख्या जाणकार वाचकांची पत्रे लेखकाला नेहमीच समाधान देतात”, हा मजकूर त्या वयात मला नक्कीच सुखावून गेला.
सुनीता देशपांडेंचे पत्रोत्तर चक्क मजेशीर होते. तेव्हा त्यांचे ‘आहे मनोहर तरी’ वाजतगाजत होते. मी अगदी मन लावून वाचले होते ते. पुस्तकातल्या महत्वाच्या विषयाखेरीज त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत सवयी, आवडी वगैरेबद्दलही काही लिहीले होते. घरी केलेल्या ताकावरील लोण्यापासून जास्तीत जास्त तूप काढण्यात त्यांचा हातखंडा आहे, असे त्यांनी लिहीले होते. त्यावर माझे कुतूहल चाळवले गेले कारण माझेही ते आवडीचे काम होते. मग काय, उचलले पेन आणि त्यांना “सांगा बरं, तुमची जादू काय आहे”, अशा आशयाचे पत्र लिहीले. नंतर विसरूनही गेलो होतो. त्यांच्या या पुस्तकासंदर्भात त्यांना बऱ्याच पुलं-भक्तांची खरमरीत पत्रे (आणि पुस्तक आवडल्याची देखील) त्याकाळी गेलेली होती. त्या पुस्तकावर अनेक चर्चा व परिसंवाद घडत होते. तेव्हा माझ्या या क्षुल्लक पत्राची त्या दखलच घेणार नाहीत असा माझा अंदाज होता. किंबहुना आपण तो ‘पुलं’ विषय सोडून काहीतरी वेगळे लिहावे हा माझा उद्देश होता. पण काही दिवसांनी त्यांचे उत्तर आले. माझे पत्र वाचल्यावर त्यांना क्षणभर हसू आले होते. पुढे पत्रात त्यांनी, त्यांची तुपाबद्दलची पद्धत पत्रातून नाही सांगता येणार पण प्रत्यक्ष भेटीत प्रात्यक्षिक जरूर दाखवेन, असे लिहीले होते.
हमो मराठेंच्या काही कादंबऱ्यात पात्रांच्या संवादांत इंग्रजी वाक्यांचा अतिरेक झालेला होता. शेवटी मी वैतागून त्यांना लिहीले की मराठी पुस्तकात हे जरा अतिच होतंय. याची दखल घेणारे त्यांचे उत्तर आले. त्यांनी स्पष्टीकरण असे दिले होते. आपण सगळे उच्चशिक्षित सध्या ‘हिंग्लिश/ मिंग्लिश/ इंग्राठी/ मिंदी’ अशा प्रकारची भेसळ भाषाच बोलत आहोत. त्यामुळे कादंबरीतील पात्रेही तशीच बोलणार !
माझ्या या साहित्यिक पत्रव्यवहारात वपु काळेंचा अनुभव अनोखा आहे. त्यांच्या लेखन कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यातील एक पुस्तक वाचले होते. त्याचे नाव आता आठवत नाही. त्या पुस्तकात शुद्धलेखनाच्या असंख्य चुका झाल्या होत्या. त्या पाहून मी खूप अस्वस्थ झालो. एखाद्या नामवंत लेखकाच्या पुस्तकातील अशा चुकांमुळे लेखकाची प्रतिमा डागाळली जाते. त्या चुका नक्कीच लेखकाच्या नसून मुद्रितशोधनातील दुर्लक्षामुळे झाल्या असणार याची मला खात्री होती. आता वपुंना लिहू का नको या संभ्रमात होतो. पण त्या आधी त्यांचे ‘प्लेझर बॉक्स’ पुस्तक वाचले होते. त्यात त्यांनी सुमारे पन्नास हजार वाचकांच्या पत्रांना स्वहस्ताक्षरात उत्तरे लिहिल्याचे नमूद केले होते. मग अजून काय पाहिजे ? म्हटलं, आपणही लिहायचे बिनधास्त. बघू काय होतंय ते. मग एक अंतर्देशीय पत्र त्यांना लिहीले. “अशा गोष्टी प्रकाशकांना लिहून फारसा उपयोग होत नाही, असा अनुभव आहे. मात्र लेखक अधिक संवेदनशील असल्याने तुम्हाला हे कळवत आहे”, असे मी लिहीले. त्यावर सुमारे ३-४ महिने गेले. काही उत्तर नव्हते. म्हटलं ठीक आहे. वयोपरत्वे ते आता थकले असतील. मला पत्रोत्तर आले नाही पण पुढे एक सुखद प्रसंग घडणार होता. एव्हाना मी त्या पत्राबद्दल विसरूनही गेलो होतो. अशात एका रविवारी सकाळी बायकोशी निवांत गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात घराची बेल वाजली. दार उघडून पाहतो तर समोर एक अनोळखी गृहस्थ. त्यांना आत बोलावले. त्यांनी लगेच खुलासा केला. त्यांच्या पिशवीतून एक पुस्तक काढून ते म्हणाले, “ मी मुंबईहून आलोय, मला वपुंनी पाठवलंय. तुमच्यासाठी हे पुस्तक भेट दिले आहे त्यांनी”. ते पुस्तक होते ‘चिअर्स’. त्याच्या पहिल्या पानावर खुद्द वपुंची लफ्फेदार सुंदर स्वाक्षरी आणि ‘प्रेमादरपूर्वक’ असा उल्लेख ! तेव्हा मला झालेला आनंद काय सांगू? हे त्यांचे एक जुने पुस्तक होते. त्याचा माझ्या पत्रातील पुस्तकाशी काही संबंध नव्हता. मग ते गृहस्थ मला म्हणाले, “ तुमची तक्रार वपुंनी प्रकाशकाला कळवली आहे. तुमच्या पत्रात जर तुमचा फोन क्रमांक असता तर वपुंना तुमच्याशी बोलायची इच्छा होती”. असा हा आगळावेगळा आणि सुखद अनुभव.
काही लेखकांनी पत्रोत्तर देण्यासाठी लेखनिक ठेवलेले होते. हे मी कसे ओळखले ते सांगतो. त्यांच्या पत्रातील मजकूर अगदी सुवाच्य आणि नीटनेटका दिसे आणि त्याखाली असलेली लेखकाची सही अगदी वेगळ्या धाटणीत आणि स्पष्टपणे वेगळ्या शाईत केलेली दिसे. अरुण साधूंचे असे एक पत्र माझ्याकडे आहे.
अशा छान अनुभवांतून पत्रलेखनाची नशा वाढतच जाई. मग या यादीत उच्चपदस्थ सरकारी अधिकारी, संपादक, उद्योगपती, काही सत्कारमूर्ती यांचीही भर पडली. त्या सर्वांचीच उत्तरे येत नसत पण त्यांना लिहीण्याचा आनंद काही औरच असे. उद्योगपतींत राहुल बजाज आणि फिरोदिया यांचे अनुभव सुखद आहेत. त्या काळी मी बजाज-चेतक ही स्कूटर वापरत होतो. ती वापरणाऱ्या लोकांना साधारण जे मायलेज मिळे त्याच्यापेक्षा तब्बल २० किमी मला जास्त मिळत होते. ‘टू- स्ट्रोक’च्या जमान्यात हे एक भलतेच नवल होते. खूप मित्रांना त्याचे आश्चर्य वाटे. एकाने तर माझ्याशी त्यावर चक्क पैज लावली होती आणि प्रात्यक्षिक झाल्यावर तो ती हरला होता ! मग काय, माझे हात शिवशिवू लागले आणि लिहीले पत्र बजाज यांना. पत्ता जरी कंपनीचा घातला होता तरी ते त्यांना नावाने लिहीले होते. पत्रात अर्थातच त्यांचे कौतुक आणि मी या अतिरिक्त मायलेजवर जाम खूष असल्याचा मजकूर. तसेच एखादीच स्कूटर असा अत्युत्तम अनुभव कसा देऊ शकते, याचे स्पष्टीकरणही मी विचारले होते. पंधरवड्यातच त्यांचे सुरेख उत्तर आले. इलेक्ट्रोनिक टाईपरायटरवर टाईप केलेलं. त्याकाळी सरकारी आणि सामन्य टंकलेखन साध्या टाईपरायटरवर होत असे. मोठ्या खाजगी उद्योगांची पत्रे नुकतीच इलेक्ट्रॉनिक यंत्रावर येऊ लागली होती आणि ते टंकलेखन पाहणे हेही डोळ्यांना सुखद वाटे ! बजाज यांच्या त्या उत्तरापाठोपाठ त्यांच्या तांत्रिक व्यवस्थापकाचेही मायलेजचे स्पष्टीकरण देणारे वेगळे पत्र आले – ते मात्र साध्या टाईपरायटरवर टंकलेले होते.
फिरोदियांचा अनुभव जरा वेगळ्या प्रकारचा आहे. त्या काळी ‘कायनेटिक’ची एक दुचाकी खूपच गंडली होती. ती गाडी खरेदीच्या पहिल्याच वर्षात सतत दुरुस्त्या काढी. मुख्य म्हणजे ती सुरु होतानाच रुसायची ! त्यांच्या सेंटरला खेटे मारून जाम वैताग आला होता. तिथल्या ‘अधल्यामधल्यांना’ भेटून काही उपयोग झाला नाही. मग सरळ कंपनी मालकांनाच सविस्तर पत्र लिहून आता ‘दुसरी नवी गाडीच बदलून द्या’ असे लिहीले. त्यावर उत्तर नाही आले पण तीनच दिवसात कंपनीचा एक अभियंता आमच्या दारात हजर ! मग त्यांनी ती गाडी थेट त्यांच्या कारखान्यात नेली व दुरुस्त करून शून्य बिलासह यथावकाश घरपोच केली. अर्थात नंतर ते मॉडेलच कंपनीने बंद केले. उद्योग जगतात कागदी घोड्यांपेक्षा तातडीच्या कृतीला किती महत्व असते, हे या प्रसंगातून दिसून आले.
मराठीतून दीर्घ पत्रलेखन करतानाचा एक विशेष अनुभव नोंदवतो. त्या काळी लेखनासाठी बॉलपेन आणि फौंटनपेन असे दोन्ही पर्याय प्रचलित होते. जातिवंत लेखक फौंटनपेन वापरत. आपण जर का बराच मोठा मराठी मजकूर बॉलपेनने लिहिला तर बोटे दुखून येत. इंग्रजी मजकूर लिहिताना मात्र ती तेवढी दुखत नसत. याचे कारण म्हणजे देवनागरी अक्षरांना बऱ्यापैकी गोलाई असते. याचा अनुभव घेतल्यावर मराठी लेखन कटाक्षाने फौंटनपेनने करू लागलो.
पत्रलेखनातील अजून एक मुद्दा सांगतो. मी जेव्हा पत्र लिही तेव्हा त्यावर वरच्या कोपऱ्यात दिनांक घालायचे हमखास विसरत असे. एकदा मी 'सकाळ' च्या तत्कालीन संपादकांना एक तक्रारपत्र लिहीले होते. त्याचे उत्तर देताना त्यांनी “तुमचे (दिनांक नसलेले) पत्र मिळाले..” अशी सुरवात केली होती. त्यानंतर दिनांक हटकून लिहायची मला सवय लागली.
असेच पत्रलेखन जोशात चालू होते. मग एकदा असे वाचनात आले की देशातला कोणीही नागरिक थेट पंतप्रधानांना पत्र लिहू शकतो आणि त्याची दखल घेण्याची यंत्रणा असते. म्हटलं, चला आता ही पण हौस पुरी करू. तत्कालीन पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी. मग त्यांना लिहीले एक कौतुकाचे पत्र. मनाशी विचार असा केला. जर आपण तक्रारीचे पत्र लिहीले तर त्यांचे सचिव स्वतःच्या पातळीवरच त्याला केराची टोपली दाखवतील ! त्यापेक्षा कौतुकाचेच लिहा ना, म्हणजे बहुतेक ते सचिवांच्या चाळणीतून पुढे सरकेल आणि योग्य त्या टेबलावर पोहोचेल. बस्स, माझ्याकडून मी ते टपालपेटीत टाकले खरे. पुढे ते पोचले की नाही, पोचले असल्यास चाळणीतून पुढे सरकले का टोपलीत गेले हे कळण्यास काही मार्ग नाही.
सन २००० उलटले आणि हळूहळू आपल्याकडे संगणकाचा वापर वाढू लागला. त्याचबरोबर हाताने पत्र लिहिण्याचे प्रमाण झपाट्याने कमी होऊ लागले आणि आजची परिस्थिती तर आपण जाणतोच. संगणकाच्या सुरवातीच्या दिवसात ‘इ-मेल’ चे कौतुक आणि अप्रूप होते. त्यामुळे त्या माध्यमातून पत्रलेखन करीत राहिलो. विशेषतः परदेशी पत्रव्यवहारासाठी ते फारच स्वस्त आणि मस्त माध्यम होते. पत्रकार आणि लेखक अशोक जैन यांची मला आलेली एक इ-मेल संस्मरणीय आहे.
अजून एक मुद्दा नमूद करतो. हस्तलेखनात एकाच हाताच्या तीन बोटांना खूप ताण येतो. संगणकलेखनात तो ताण दहा बोटांमध्ये विभागता येतो, हा फायदा नक्कीच महत्वाचा.
गेल्या ५ वर्षांत मात्र या छंदाला ओहोटी लागली आहे. ऐन तारुण्यात आपण जोशपूर्ण असतो. तेव्हा मी पाठवविलेल्या पत्रांपैकी निम्म्यांना जरी उत्तरे आली तरी मी खूष असे. इ-माध्यमांचा प्रसार वाढल्यावर वास्तविक पत्रोत्तर देणे हे सोपे झाले होते. पण व्यक्तिगत अनुभव मला तरी उलटाच येऊ लागला. उत्तराचे प्रमाण जुन्या जमान्यापेक्षा काहीसे कमीच होऊ लागले. तक्रार किंवा शंका विचारली असताही पत्राकडे दुर्लक्ष होऊ लागले. तेव्हा आता हौसेच्या पत्रलेखनाला मुरड घालावी हे बरे. उत्तर न आल्याने होणारा विरस आता अधिक जाणवतो. तेव्हा उगाचच आपणहून (कुठलेही व्यावहारिक काम नसताना) लिहिणे टाळलेले बरे, ही भावना बळावली आहे. एखादे वेळीस जर पत्र लिहिण्याची उर्मी आली तरी “जाऊदे, मरूदे, बास झाल्या लष्कराच्या भाकऱ्या”, असे म्हणणारे दुसरे मन वरचढ होत आहे. कालानुरूप आपण बदलत राहावे हे बरेच. लिखित जमान्यात आलेली पत्रोत्तरे मात्र व्यवस्थित जपून ठेवली आहेत. ती जाडजूड फाईल अधूनमधून चाळणे हे सुरेख स्मरणरंजन असते खरे ! ती चाळतानाच हा लेख लिहिण्याची स्फूर्ती मिळाली.
.......
हे होते माझे अनुभवकथन. तुमचेही असे काही अनुभव असल्यास जरूर लिहा. वाचण्यास उत्सुक.
*********************************************************
गेल्या महिन्यात एका मित्राचे
गेल्या महिन्यात एका मित्राचे 93 वर्षीय वडील वारले. नुकतीच त्याने वडिलांची खोली पूर्ण रिकामी करण्याची मोहीम हाती घेतली. त्यात त्याला अनेक जुनी पोस्टकार्डे व पत्रे साठवलेली आढळली. त्यातली काही वैशिष्ट्यपूर्ण निवडक पत्रे त्याने बाजूला काढून ठेवली आणि आम्हा दोघा तिघांना बघायला बोलावले.
जुन्या काळातील ती हस्तलिखित पत्रे पाहून आमच्यासाठी पत्रांच्या इतिहासाची एक छानशी उजळणी झाली. त्या पत्रांमधली काही वैशिष्ट्ये अशी होती :
* काही पत्रे टाक अथवा बोरुने लिहिलेली होती.
* काहींमध्ये लिहिलेले मायने खास जुन्या काळाचे वैशिष्ट्यपूर्ण होते. जसे की,
“कृतानेक उत्तम आशीर्वाद
किंवा
“सकलगुणसंपन्न राजश्रियाविराजित राजमान्य राजश्री”
* तीन पोस्टकार्डांचा एक कोपरा जाणवण्याइतका फाडलेला होता. त्यातील मजकूर वाचल्यावर उलगडा झाला. ती सर्व पत्रे परिचितांपैकी कोणाच्या तरी मृत्यूची बातमी देणारी होती ! ही तत्कालीन पद्धत होती असे नंतर समजले.
मस्त लेख व प्रतिसाद.
मस्त लेख व प्रतिसाद.
तीन पोस्टकार्डांचा एक कोपरा
तीन पोस्टकार्डांचा एक कोपरा जाणवण्याइतका फाडलेला होता.>>>>> अजूनही मृत्यूची बातमी देणारी पत्रे वाचून तात्काळ फाडून टाकतात. तसेच त्या पोस्टकार्डावर एकच बाजूला मजकूर लिहितात, मागची बाजू कोरी ठेवतात.
अच्छा. माहितीबद्दल धन्यवाद
अच्छा.
माहितीबद्दल धन्यवाद
अच्छा. माहितीबद्दल धन्यवाद
.
टपाल खात्याची आकर्षक योजना
टपाल खात्याची आकर्षक योजना
अजूनही काही नागरिक निमंत्रणपत्रिका किंवा अन्य काही कागदपत्रे टपाल पाकिटातून पाठवतात. अशा पाकिटावर लावायच्या तिकिटामध्ये स्वतःच्या फोटोचे तिकीट टपाल खात्याकडून तयार करून मिळते आहे.
हौशी लोकांसाठी ‘माय स्टॅम्प’ ही योजना पाच वर्षांपूर्वी चालू झालेली असून तिला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 12 तिकीटांच्या एका संचासाठी तीनशे रुपये आकारले जातात.
पुणे टपाल विभागाला गेल्या आर्थिक वर्षात या योजनेतून 40 लाख रुपये उत्पन्न मिळाले.
https://www.indiapost.gov.in/Philately/Pages/Content/My-Stamp.aspx
अरे व्वा! छान योजना आहे.
अरे व्वा! छान योजना आहे.
… माय स्टॅम्प’ ही योजना पाच
… माय स्टॅम्प’ ही योजना पाच वर्षांपूर्वी चालू ….
ही सोय मी भाचे मंडळीसाठी २०११- -१२ ला वापरली आहे, म्हणजे तेव्हांपासून असावी. लहान मुलांसाठी त्यांच्या फोटोचे टपाल तिकिट हे छान personalised gift होते. स्वछबीच्या प्रेमात असलेल्या मोठ्यांनांही आवडते.
* स्वछबीच्या प्रेमात >> अरे
* स्वछबीच्या प्रेमात >> अरे व्वा!
खुद पे फिदा ।
खुद पे फिदा ।
पण त्या तिकिटावर पोस्टाचा
पण त्या तिकिटावर पोस्टाचा शिक्का बसणार ना? म्हणजे स्वछबीवर?
* पोस्टाचा शिक्का बसणार ना? >
* पोस्टाचा शिक्का बसणार ना? >>>
त्यावरून पुलंचा तो प्रसिद्ध विनोद आहेच काहीतरी . . .
या तिकिटांसाठी आपण कोणताही
या तिकिटांसाठी आपण कोणताही फोटो देऊ शकतो, स्वछबीच हवी असे नाही, पण बहुतेक जण स्वत:चा/ कुटुंबाचा फोटोच देतात.
स्वत:साठी मी आमच्या जुन्या घराचे+बागेचे फोटो दिले होते तिकिटावर छापायला
किती मस्त कल्पना आहे ही!
किती मस्त कल्पना आहे ही!
<‘माय स्टॅम्प’> मस्त कल्पना
<‘माय स्टॅम्प’> मस्त कल्पना
Pages