घुमणं (घुमणे)

Submitted by 'सिद्धि' on 4 February, 2022 - 00:26

"माले निघतेस का ग? खेळी जमलेत बघ, आईपाषाणी बायच्या मंदिरामाग गाण्याचा आवाज येतोय."

"व्हय, मस्तपैकी तय्यार होऊन निघाली बघ मी. येते. " लाल-पिवळ चकाकीचं परकर-पोलकं, हातात हिरव्या बांगड्या आणि पायात घुंगरांचे पैंजण घालून मालन हौसाक्काच्या समोर उभी राहिली. कपाळावरची चंद्रकोर नीटनेटकी करत हौसाने तिची दृष्ट काढली. केसातला गजरा नीटनेटका करत मालन पळत मंदिराकडे जाऊ लागली.

"चांगल कर्तब दाखव गं, उभा गाव हलला पायजे. शेटलोक येडे झाले पायजेल… येडे. शेवटी हौसाच्या विज्जतीचा प्रश्न हाय.”
मालन फडावर पोहोचून नाचगाण्याला सुरुवात झाली होती. इकडे लाकडी माचावर अस्ताव्यस्त आडवी पडून लोळण घेत हौसा तिच्या उधार उज्ज्वल भविष्याच्या विचाराने बडबड करत होती. तिच्या ५०-५५ च्या वयाला न शोभणारी ती रोजचीच अमंगल बडबड ऐकून समोरच्या वाटेने येणारे-जाणारे 'शी-थू' केल्याशिवाय पुढे जात नसत. "हातपाय जाग्यावर बसले, तर या कवळ्या पोरींना हाताशी घेतलय बेवडीने. " म्हणत स्त्रिया देखील तिला अपशब्द ऐकवून पुढे जात.

"छबीदार छबी, मी तोऱ्यात उभी..." हौसाक्का मात्र आपल्या तोर्यात ठुमकतं, गाणं म्हणत मुरडू लागली.

"अक्का आत चला. लोक बघतात." लहानग्या पिंकीने तिला उठवण्याचा प्रयत्न केला.

"नाय, नाय, नाय, ती माली पैसं लपवती, मला म्हाईत हाय, मोप पैसं मिळतात तिला, आल्या-आल्या कशी हिसकवून घेते बग तिच्याकडून." पिंकीच्या हाताला बाजूला करून हौसाआक्का तिथेच मांडी घालून अडकित्त्याने सुपारी कातरत बसून राहिली.
येणाऱ्या जाणाऱ्यांच्या घाणेरड्या नजरा, अपशब्द आणि शिव्याशाप ऐकत ती आपल्या खांद्यावरचा ढळलेला पदर हातात घेऊन त्याने हवा खात दारातच बसलेली असायची.

पिंकीला हे रोजचेच. एवढ्या लहानग्या जीवाला गोलगप्प फुगलेली अक्का काय आवरणार .
*****

'कोणी मोठी पार्टी माजघरात येऊन बसली होती. आक्काने पाणी देण्यासाठी पिंकीला आत आवाज दिला, पाण्याचा ट्रे टेबलवर ठेवून पिंकी परत आत वळली.'
"ही पिंकी! कशी हाय?" पानाचा गुटखा गिळून आपले लाल-लाल दात विचकत हौसाक्का हिsss हिsss करून हसली.

"चालतंय की." म्हणत समोरची मंडळी देखील मान डोलावु लागली.

'दुरूनच चोरून बघणाऱ्या मालनच्या काळजात पाणी पाणी झाले. जवळपास दोन वर्षाची असताना शहराला जाणाऱ्या रस्त्यावर पिंकी हौसाक्काला सापडली होती. गोड गळा, शुद्ध भाषा आणि गोरीगोमटी पिंकी म्हणजे अक्काला आयतीच सोन्याचं अंड देणारी कोंबडी मिळाली. इथे आली तेव्हापासून मालनने तिला आपल्या लहान बहिणीप्रमाणे वाढवले. आता कुठे मोठी व्हायला लागली होती, तर अक्काने मोठ्या पाव्हण्यांकडे तिचा सौदा चालू केला. मालनचा संताप अनावर झाला होता. पाहुणे निघून गेल्यावर मालनने आक्काला चांगला जाब विचारला.'
" खायाला पियाला काय फुकट मिळत? राधा मेल्यापासून तुम्ही दोघीच राहिलाय. तुझ्या कामाचे पैसे पुरना झालेत, आन पिंकी बी वयात आले. कमवुदे तिला बी. आडकाठी घालण्याचा प्रयन्त केलास तर तुला बी खर्चाला एक पै देणार नाय, सांगून ठेवते."
मालनला धमकी देऊन हौसाक्का फणफणत निघून गेली. हौसाक्काशी भांडण्यात काही अर्थ नाही, हे ओळखून असलेली मालन मनाशी काहीतरी धागेदोरे पक्के करू लागली होती.
*****

' बघता बघता आठवडा उलटला होता. लहानग्या पिंकीला अजून बाहेरचे जग माहित नव्हते. तिला गावात विशेष कोणी पहिलेले नव्हते. मालन बरोबर आता पिंकीदेखील गपचूप फडावर जाऊ लागली होती. नाचगाण्याबरोबर ठुमकाने , मुरडणे असे सगळे नखरे शिकवण्याची जबाबदारी मालनवर होती. आधी नाही नाही म्हणणारी पिंकी देखील आता नियमित जाऊ लागली. नाचगाणी झाल्यावर एखादा पैसेवाला येऊन मालनला त्याच्यासोबत गाडीतून घेऊन जात असे, तेव्हा मात्र पिंकीला रहावत नसे, घरी येऊन ती हमसून हमसून रडायची. सकाळी आलेली मालन आणि तिची झालेली दुर्दशा लहानग्या पिंकीला सुन्न करून सोडी.'

'आज सकाळी सकाळी हौसाक्काने फर्मान सोडला. " गावात आई पाषाणीदेवीची जत्रा सुरु हाय. कळ लागतात आन देवी कौलं देते. त्यासाठी मोठमोठी मंडळी येत असतात. त्यातलीच एक मोठी पार्टी रात्री फडावर येणार हाय. नाचगाणी झालं कि, त्यांच्यासोबत पिंकीला पाठव. मोप पैसं मिळणार हाईत."
गोदाक्काचे शब्द एकताच मालन भलतीच खुश झाली. हिरवी साडीचोळी, केसाचा अंबाडा आणि कपाळाला ठसठशीत कुंकू लावून तिने पिंकीला तयार केले. पायात जाड घुंगूरमाळा गुंफून ती पिंकीला घेऊन निघाली. नेहेमीप्रमाणेच बाहेर खाटेवर हौसाक्का आपल्या सोनेरी स्वप्नांच्या झुल्यावर लोळत पडली होती. तिला तिचे पैसे ऍडव्हान्स्डमध्ये मिळाले होते. डोक्यावरून पार तोंडापर्यंत पदर घेऊन दारातून बाहेर पडणाऱ्या पिंकीकडे पाहण्याची तसदी देखील तिने घेतली नाही. मालनही 'जाते' असा अस्पष्ट शब्द बोलून निघाली.
******

'ढम्म... ढम्म... ढोलाचा आवाज घुमत होता. गुलाल उधळले, पालख्या सजल्या, 'आई पाषाणाची, माया आभाळाची..' अश्या गाण्यांनी परिसर दुमदुमून चालला होता. छोटे-मोठे, लहान-थोर असे सगळेच सामील झाले होते. मागे काही अंतरावर तमाशाच्या फडाची मंडळी जमू लागली, आणि पहिल्या वगाला सुरुवात झाली. तसे काही आंबटशौकीन सरकत-सरकत मंदिराच्या मागच्या दिशेला पळाले. पिंकीला मागच्या खोपटात बसवून, इकडे मालन फेर धरू लागली. आलतूफालतू चाळे करत, शिट्या वाजवत लोक पैसे उडवू लागले. कोणी उठून स्टेजच्यावर चढण्याचा पर्यंत करत होते, तर कोणी बसल्याजागी आरोळ्या ठोकू लागले. फडाचा मुख्या वाढणाऱ्या गर्दीकडे पाहून चेकळला होता. पैश्याचा पाऊस बघून तो स्वतःच नाचगाण्यात सामील झाला.

रात्र मध्यावर आली. जत्रा पांगली, नाचणारी मंडळी दमुन गेली होती. खाऊ-पिऊन, नाचणाऱ्या अप्सरांना बघून धुंद झालेले बघे आता पेंगूळतीला लागले. पैशाचा ओघ कमी झाल्यावर तमाशाची पालं उठायला लागली होती. मुख्याने येऊन इशारा केला आणि सगळ्यांनी आवरायला सुरुवात केली. मालन आणि पिंकी मध्यावरूनच गायब झाल्याचे लक्षात येताच फडावर गोंधळ उडाला. हौसाक्काला काय उत्तर द्यायचे? याच्या विचारात फडाचा मुख्या आणि त्याचे साथीदार त्या दोघींना शोधण्यासाठी सर्वत्र चौफेर विखुरले गेले.

*****
इकडे पाषाणीआईच्या मंदिरात घंटानाद सुरु झाला. कळे लागण्याची वेळ झाली होती.
चौफेर पसरलेल्या फडाच्या माणसांनी अखेर पिंकीला गाठले, पण तिला पकडणे आता अशक्य होते. मंदिराच्या समोरील अंगणात माणसाच्या घोळक्याच्या मधोमध ती बसली होती. हुss हुss हुss हुss हुss हुss करत घुमत ती बडबड करत होती. "आई माझ्या पोराला नोकरी कवा मिललं?" म्हणत कोणीतरी तिला दोनपाच पैसे, आणि खणानारळाची ओटी वाहत होते. कोणी तिच्या पायावर लोटांगण घालून नवस बोलत होते.
गोरीगोमटी पोरं, त्यात हिरवी नऊवारी आणि कपाळभर पसरलेलं लाल कुंकू, गळ्यात तुळशीमाळ असं रूप... ती देवीसारखीच भासत होती. पायलत्या घुंगरांच्या माळा तिने केव्हाच्याच फेकून दिल्या होत्या.

"आतल्या देव्हाऱ्यात देवीला कळे लावले आणि गाऱ्हाण्याच्या वेळी हि मुलगी मंदिराच्या अंगणात घुमू लागली, अर्धा तास ना थांबता घुमतंच होती. पायातून रक्त आलं, तरी ऐकेना. कपाळावर हळदी-कुंकवाचा मळवट लावला तेव्हा शांत झाली. "

"हो आणि विचारलेलं सगळं खर खर सांगते बघ. काय बी प्रश्न विचारा, लगेच उत्तर तयार."

"आई वाढतेय तिच्यात... आई. " म्हणत कोणी तिच्या पायाशी मस्तक ठेवत होते. भाबडे अशिक्षित लोक पिंकीबद्दल आपापली मते मांडत होते.

*****

'मालन एका मोठ्या तमासगिराच्या पोरांबरोबर केव्हाच पसार झाली होती, पुन्हा तोच नाचगाण्याचा खेळ मांडायला. पण तिने एवढे दिवस पिंकीला दिलेल्या शिकवणीमुळे घाणीत जाऊन मलिन होण्याआधीच सुटका होऊन पिंकीला देवाच्या देव्हाऱ्यात कायमचे स्थान मिळाले होते, त्या नरकापेक्षा हे घुमणं केव्हाही योग्य. दोन्ही मुली दोन टोकाच्या. ना जातीपातीचा पत्ता, ना नात्यागोत्यांची ओळख, संस्कार वगैरे तर माहीतीतच नाही. तरीही दोघींनी आपापले मार्ग निवडले.'

एक निशिगंधासारखी जन्म मिळाला आहे तर फुलण्याला पर्याय नाही, म्हणून रात्री फुलणारी, दरवाळणारी, सुगंध पसरून सकाळी कोमेजून गेलेली. मुजरा करत प्रत्येकापुढे झुकणारी.
तर दुसरी पिंकी, मानाचे स्थान प्राप्त झालेल्या वृन्दावनातल्या तुळशीसारखी. प्रत्येकाने येऊन तिच्यापुढे मस्तक टेकवावे. खाली झुकून नतमस्तक व्हावे. एवढी पवित्र.

दोघींच्याही वाट्याला आलेले एकमेव साम्य, ते म्हणजे नशिबी आलेले युगायुगाचे घुमणं. एक हातात टाळ-चिपळ्या घेऊन, तर दुसरी पायात घुंगरमाळा घालून.

-------------------------------------------

कथासंग्रह फुलले रे(ebook)

https://siddhic.blogspot.com/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users