श्रीमद् रायगिरौ
शिवकालीन रायगड नगररचना आणि वास्तू-अभ्यास
लेखक- श्री. गोपाळ चांदोरकर (आर्किटेक्ट)
लेखक श्री. गोपाळ चांदोरकर आता ८५+ वर्षांचे आहेत. हे पुस्तक २०१७ मध्ये प्रकाशित झालेलं आहे. (बुकमार्क पब्लिकेशन्स, पुणे)
पुस्तकाच्या नावावरून आपल्याला पुस्तकात काय असेल, याचा अंदाज येतोच. रायगडाचा वास्तुरचनेच्या आणि नगररचनेच्या दृष्टिकोनातून केलेला दीर्घ अभ्यास लेखकाने या पुस्तकात मांडला आहे. रायगडावर असंख्य वेळा जाऊन, तिथल्या बांधकामाचं, अवशेषांचं निरीक्षण करून, त्यांची प्रत्यक्ष मापे घेऊन लेखक श्री. चांदोरकरांनी स्वतःचे वास्तुरचनेचे आणि नगररचनेचे ज्ञान आणि तर्कशास्त्र वापरून काही निष्कर्ष काढले आहेत आणि ते एकत्रितपणे या पुस्तकात मांडले आहेत. त्यापैकी अनेक निष्कर्ष हे प्रचलित समजुतींना धक्का देणारे असले, तरी त्यामागचं तर्कशास्त्र आपल्यालाही पटण्यासारखं आहे. उदा. आज जे बांधकाम हत्तीखाना म्हणून ओळखलं जातं, त्याची उंची आणि इतर मोजमापं पाहता ते हत्तींना ठेवण्यासाठी वापरत असणं शक्य नाही. उलट, तो एक नाट्यमंडप असावा, असा अंदाज लेखक मांडतात. कारण भरतमुनींच्या नाट्यशास्त्र या ग्रंथात दिलेल्या नियमांनुसार त्याचे बांधकाम आहे. हे बांधकाम शिवपूर्वकालीन, विजयनगर साम्राज्याच्या काळातील असावं. त्याचप्रमाणे जो लोखंडी मल्लखांब दाखवला जातो, तोही विजयनगर काळातला पर्जन्यमापक असावा, असाही अंदाज त्यांनी मांडला आहे. आज आपण ज्याला राणीवसा म्हणतो, तो राणीवसा नसून कचेर्या असल्या पाहिजेत, ज्याला आपण बाजारपेठ म्हणून ओळखतो, त्याही कचेर्याच असल्या पाहिजेत असे निष्कर्ष त्यांनी अनेक पुराव्यांच्या आणि मोजमापांच्या आधारे काढले आहेत. या आणि जवळपास सर्वच बांधकामांची मोजमापांसहित आरेखने (ड्रॉइंग्ज) त्यांनी पुस्तकात दिली आहेत. याशिवाय खलबतखाना कुठे असेल, खजिना कुठे असेल, खासबाग कुठे असेल, लष्करी छावणी कुठे असेल याबद्दलचे सप्रमाण निष्कर्ष त्यांनी मांडले आहेत. रायगडावर सांडपाण्याची, कचरा व्यवस्थापनाची कशी सोय असेल, कुठलं बांधकाम विजयनगर काळातलं, कुठलं मलिक अंबरच्या काळातलं आणि कुठलं शिवकाळातलं, याचेही अंदाज लेखकाने मांडलेत. गडावरच्या अनेक गोष्टींचा उलगडा त्यांनाही झालेला नाही. त्याबद्दलही त्यांनी लिहिलं आहेच.
हे आणि बाकीचेही सगळे निष्कर्ष १००% बरोबरच आहेत असा दुराग्रह मात्र लेखकाचा नाही. रायगडावरच्या आणि सगळ्याच गडकिल्ल्यांवरच्या अवशेषांचं असं शास्त्रशुद्ध पद्धतीने संशोधन झालं पाहिजे, त्यातून वेळोवेळी समोर आलेल्या माहितीनुसार त्या निष्कर्षांमध्ये डोळसपणे सुधारणा करत गेलं पाहिजे असं त्यांचं मत आहे.
पुस्तक मला आवडलं. मुळात चिकाटीने, वेळप्रसंगी जनरोष पत्करून ( कारण प्रचलित समजुतींना धक्का) वर्षानुवर्षे हे असं संशोधन करत राहणं हेच कठीण आहे. त्यानंतर ते तितक्याच स्पष्टपणे, समजेल अशा पद्धतीने त्यांनी पुस्तकात मांडलेलं आहे. सविस्तर नकाशे, ड्रॉइंग्ज दिली आहेत. आपल्या मतांना वेळोवेळी शास्त्रीय आधार दिलेला आहे. त्याच वेळी कुठेही अनादराची भावना यात चुकूनही येऊ दिलेली नाही. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर ’मूर्तिभंजन नव्हे, शेंदराची पुटे काढणे’ हाच त्यांचा उद्देश आहे.
शिवाजीमहाराज हे आपल्या सगळ्यांच्या मनातलं अतीव आदराचं स्थान. हा आदर मनात ठेवूनच आपण किल्ल्यांवर जातो. पण हा आदर कशा प्रकारे व्यक्त झाला पाहिजे? मी या दिवाळीत रायगडावर जाऊन आले. तेव्हा पाहिलेल्या काही दृश्यांमुळे हा विचार नव्याने मनात आला. राजसभेत शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तो आपल्या मागे येईल असा कोन साधून गटामधल्या प्रत्येकाने सेल्फी काढून घेणे, नमस्काराची ’पोझ’ घेऊन कॅमेर्याकडे हसतमुखाने पाहताना फोटो काढून घेणे, हिरोजी इंदुलकरांचं नाव कोरलेल्या पायरीवर हात टाकून फोटो काढून घेणे इत्यादी कृतींमधूनच हा आदर व्यक्त करावा लागतो का? शिवाजीमहाराजांचा राज्याभिषेक ही ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची घटना जिथे घडली, तिथे दोन मिनिटं शांत उभं रहायला जावं तर समोर फोटो काढण्यासाठी झुंबड उडालेली दिसते. काही वर्षांपूर्वी पन्हाळ्याला गेलो असताना बाजीप्रभूंच्या पुतळ्याच्या शेजारी उभे राहून फोटो काढून घेणारे लोक पाहिले होते. पुतळा प्रतीकात्मक असतो हे मान्य, पण बाजीप्रभूंच्या पुतळ्याच्या शेजारी आपण उभं रहायचं? निदान जरा खाली, त्यांच्या पायाजवळ तरी उभे रहा, असं त्यांना सांगावंसं वाटलं होतं. अर्थात ही माझी मतं आहेत, सगळ्यांनाच ती मान्य होतील असं नाही. शिवाय, या सगळ्यांनाही शिवाजी महाराजांबद्दल आणि बाजीप्रभूंबद्दल आदर नसतो असं नाही. आदर असतो, पण व्यक्त करण्याची याहून चांगली पद्धत असू शकते.
हे श्रीमद् रायगिरौ पुस्तक वाचल्यावर मला वाटलं की आपल्या या गडकिल्ल्यांकडे अशा चिकित्सक, डोळस दृष्टीने पाहणे, हा त्या वास्तूंचा आणि आपल्या इतिहासाचा आदर करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. ज्यांनी हे किल्ले बांधले, ती माणसं या विद्येत जाणकार होती. खोलात जाऊन या वास्तू समजून घेणे म्हणजे त्यांनी केलेल्या निर्मितीला दाद देणे. लेखक श्री. चांदोरकर स्वतः वास्तुविशारद आहेत. इतिहास आणि शिवाजीमहाराजांबद्दल त्यांना प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या हौसेखातर हे संशोधन केलेलं आहे. असे अनेकजण जर पुढे आले आणि एकमेकांच्या सहकार्याने जर विविध किल्ल्यांवर अशा प्रकारचं संशोधन सुरू झालं तर त्यातून आपल्या इतिहासावर प्रकाश पडायला मदतच होईल. आपल्या या सर्वच किल्ल्यांना फार मोठा इतिहास आहे. सातवाहन, चालुक्य, शिलाहार अशा राजवटींनी बांधलेल्या,वापरलेल्या या किल्ल्यांचं, त्यांच्या मोक्याच्या स्थानांचं महत्त्व ओळखून त्यांचं शिवाजीमहाराजांनी पुनरुज्जीवन केलं. तिथे आधीपासून असलेली बांधकामं, सोयी यांचा चातुर्याने वापर तर केलाच, पण अनेक बांधकामं नव्यानेही केली. शौर्याबरोबरच दूरदृष्टी, बारीकसारीक मुद्द्यांचाही विचार करण्याचा गुण, सतत लोककल्याणाला असलेलं प्राधान्य, असे शिवाजी महाराजांच्या मोठेपणाचे अनेक पैलू आहेत. गडकिल्ल्यांच्या डोळस अभ्यासातून, संशोधनातून यातल्या काही पैलूंवर अधिक प्रकाश पडेल. शिवपूर्वकालीन इतिहासाबद्दलही अधिक माहिती समजेल. किल्ल्यांकडे बघण्याची एक नवीन,जाणकार दृष्टी आपल्याला लाभेल.
छान परिचय.
छान परिचय.
आपण आपल्या इतिहासाकडे
आपण आपल्या इतिहासाकडे चिकित्सक नजरेने पाहायला शिकले पाहिजे ह्याच्याशी सहमत.
परिचय आवडला.
सेल्फी, पायरीला हात लावनं
सेल्फी, पायरीला हात लावनं असले सवंग प्रकार अशा पवित्र जागेचा सौम्य, नकळत अवमान करणारेच...काही मंदिरात फोटो काढणं वर्ज असतं तसं करायला हवं.
बाजारपेठ खूप उंच चवथ-यावर आहे...एका युट्युबरनं ती सरदारांना घोड्यावर बसल्या, बसल्या खरेदीला सोईस्कर असावी असे सांगितले... अर्थात ऐतिहासिक पुरावे,तथ्थ काही सांगत नाही...
ऐतिहासिक ठिकाणं कशी पाहावित या करीता लोकांना समज द्यायला हवी.
हल्ली वास्तुशास्त्र शिकणारा साठी अशी पुस्तकं वस्तुपाठ ठरावीत.
या विषयीची तुमची मतं आवडली.
परिचय आवडला.
परिचय आवडला.
आवडला पुस्तक परिचय!
आवडला पुस्तक परिचय!
परिचय आवडला आणि लेखही.
परिचय आवडला आणि लेखही.
रायगडासंदर्भात गोनीदांनी फारच जिव्हाळ्याने लिहून ठेवलंय. शिवाय प्र के घाणेकरांचे दुर्गदुर्गेश्वर रायगड हे एक चांगलं पुस्तक पूर्वी वाचलं होतं.
शिवाजीमहाराजांचा राज्याभिषेक ही ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची घटना जिथे घडली, तिथे दोन मिनिटं शांत उभं रहायला जावं तर समोर फोटो काढण्यासाठी झुंबड उडालेली दिसते. >>
यासंदर्भात एक आठवण आहे. मी गेलो होतो तेव्हा राजसदरेच्या परिसरात फारशी गर्दीही नव्हती. एक-दोन कुटुंबं होती फक्त. त्यात एक लहाना मुलगा होता.. आणि त्याला महाराजांच्या सिंहासनाच्या खालच्या बाजूला जो दगडी चौथरा आहे, तिथं उभं राहून फोटो काढून हवा होता. तो त्याच्या वडिलांना तशी परवानगी मागत होता..!
यावर त्या मुलाचे वडील त्याला म्हणाले, "नको नको, तेवढ्या जवळ नाही जायचं..! आपण तेवढे मोठे नाही..!तिथं उभं राहण्याएवढी आपली योग्यता नाही..! "
_/\_
शिवाजीमहाराज हे आपल्या सगळ्यांच्या मनातलं अतीव आदराचं स्थान.>>>
होय. हे आहेच. आदराच्याही पलीकडचं काहीतरी आहे..! माया, प्रेम, आपलेपणा, आत्मीयता, मानबिंदू...!
रायगडावर महाराजांच्या समाधीपाशी थोडा वेळ फक्त उभा राहिलो तरी आतून काहीतरी ऊबदार, उदात्त वाटायला लागतं..! काय जादू होते तिथं कळत नाही..!
_/\_
"नको नको, तेवढ्या जवळ नाही
"नको नको, तेवढ्या जवळ नाही जायचं..! आपण तेवढे मोठे नाही..!तिथं उभं राहण्याएवढी आपली योग्यता नाही..!" >> शंभर टक्के बरोबर. हेच, अगदी हेच मलाही म्हणायचं आहे!!
गोनीदांचं दुर्गभ्रमणगाथा हे पुस्तक मला अतिशय आवडतं. त्या पुस्तकाबद्दल पूर्वी मी https://www.maayboli.com/node/57847 इथे लिहिलं आहे.
परिचय आवडल्याचं सांगितल्याबद्दल सगळ्यांचे आभार
द.सा., हो, ते घोड्यावर बसून खरेदी करण्याचंच मीपण अनेक ठिकाणी वाचलं होतं.
पुस्तक परिचय आवडला.
पुस्तक परिचय आवडला.
छान पुस्तक परिचय! खूप
छान पुस्तक परिचय! खूप वर्षांपूर्वी रायगडावर गेले आहे.
रायगडावर महाराजांच्या समाधीपाशी थोडा वेळ फक्त उभा राहिलो तरी आतून काहीतरी ऊबदार, उदात्त वाटायला लागतं..! काय जादू होते तिथं कळत नाही..! >> १००%
छान परिचय.
छान परिचय.
काही मायबोलीकर मित्रांसमवेत दहा-बारा वर्षांपूर्वी रायगडावर गेले होते. तेव्हा घाणेकरांचं पुस्तक हाताशी ठेवून गडावर ठिकठिकाणी फिरून बारीकसारीक बर्याच गोष्टी पाहिल्याचं आठवतं.
धन्यवाद deepak_pawar,
धन्यवाद deepak_pawar, जिज्ञासा आणि ललिता-प्रीति
प्र. के. घाणेकरांचं पुस्तक मी वाचलं नाहीये. बघते.
छान परिचय!
छान परिचय!
छान परिचय!
छान परिचय!
छान परिचय..... +१.
छान परिचय..... +१.
त्यांच्या पायाजवळ तरी उभे रहा, असं त्यां...... खरंय.मुळात अशा जागी गेल्यावर अंगावर रोमांच येतात,त्यावेळी सेल्फी कसं सुचते.
लाल महालात खूप वर्षांपूर्वी गेले होते.पहिल्या पायरीला नमस्कार करूनच आत शिरले.इथे राजे वावरत होते या जाणिवेने अंगावर काटा आला होता.
मला सेल्फी, बॅकग्राऊंडला
मला सेल्फी, बॅकग्राऊंडला प्रसिद्ध व्यक्ती आणि फोरग्राऊंला पब्लिक वगैरेचं काही वाटत नाही. डोळ्याने बघणे आणि कॅमेराने बघणे यातही काही विशेष फरक वाटत नाही. (मी भारंभार फोटो काढत नाही, पण फोटो जास्त जतन होतात. डोक्यातील प्रतिमा हळूहळू धुसर होऊ लागतात असं हल्ली वाटू लागलं आहे. त्या रिफ्रेश करायला फोटो उपयोगी पडतात) छत्रपतींच्या पायाशी लायकी असेही काही विचार कधी डोक्यात आले नाहीत. कोणी असं म्हटलं तर 'तो फक्त पुतळा आहे हो' असंच (मनातल्या मनात) वाटेल.
अर्थात, आपल्या वावराचा कुणाला त्रास होऊ नये, ऐतिहासिक स्थळाची बूज राखली जावी, वारसा जतन केला जावा, कायम लो प्रोफाईल राहावे, जे नियम केले आहेत ते काटेकोरपणे पाळावे याला काही पर्याय नाहीच.
धन्यवाद अमितव, स्वाती२, देवकी
धन्यवाद अमितव, स्वाती२, देवकी.
अमितव, फोटो मीही काढतेच. पण जिकडेतिकडे सेल्फींचा आणि फोटोंचा अतिरेक असतो हल्ली. एरवी गंमत म्हणून सोडून दिलं तरी अशा ठिकाणी खूप खटकतं ते डोळ्यांना.
छान परिचय.
छान परिचय.
रायगडाची जीवनकथा असंही एक पुस्तक असल्याचे आठवते आहे. अजून वाचलेले नाही पण.
बाकी, टकमक टोक पाहून थरारले होते व स्थानिक गाईड/मार्गदर्शन करणाऱ्या मुलाने काही एक रोचक पण अवास्तव माहिती दिली होती तेव्हा गंमत वाटली होती.
वावे, पुस्तक परिचय/लेख आवडला
वावे, पुस्तक परिचय/लेख आवडला.
हे पुस्तक वाचायला पाहिजे. परिचयाबद्दल धन्यवाद.
सुंदर पुस्तक ओळख. बरीच नविन
सुंदर पुस्तक ओळख. बरीच नविन माहिती समजली.
कौस्तुभ कस्तुरे यांनी
कौस्तुभ कस्तुरे यांनी लिहिलेला 'पावनखिंड स्थलनिश्चिती' हा लेख आजच वाचला. आज आपण समजतो तीच पावनखिंडीची जागा आहे की दुसरी आहे. याचा ऊहापोह त्यांनी केलाय. ऐतिहासिक पुराव्यांचं विश्लेषण करून. मला आवडला लेख. लिंक देता येत नाही कारण मला तो पीडीएफ स्वरूपात मिळाला. इतिहासाच्या पाऊलखुणा नावाच्या फेसबुक ग्रुपवर बहुतेक तो लेख आहे.
प्राचीन, गजानन, चौथा कोनाडा, प्रतिसादासाठी धन्यवाद
पुस्तकाच्या शेवटी जो मोठ्या
पुस्तकाच्या शेवटी जो मोठ्या आकारात रायगडाचा नकाशा जोडला आहे, त्यामुळे गडाचा आवाका नेमका समजण्यात खूपच मदत होते.