मृदू आवाज

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

एखाद्याचा जसा गोड, गाता, फिरता गळा असतो ना, तसा एखाद्याचा मृदू आवाजही असतो म्हणे! म्हणजे नुसता गोड आवाज नाही (तो माझाही आहे म्हणे, हेहेहे), गोडही आणि शिवाय हळूवार, तलम असाही! कळला म्हणजे कसा ते? कर्रेक्ट! विविधभारतीवरच्या निवेदकांचा असतो तसा (एफेम चॅनेलवरच्या सो-कॉल्ड आरजेंना अजिबात नसतो गोड-बिड आवाज, ओरडत असतात नुसते!).. हां, तर असा गोड आवाज ऐकून समोरची ऐकणारी व्यक्ती खुश होऊन जाते म्हणे, तिला आपण खूप स्पेशल आहोत वगैरे असे वाटायला लागते म्हणे.. ती व्यक्ती असा गोड आवाज ऐकून काहीही करायला तयार होऊ शकते म्हणे- म्हणजे नजरेचा कटाक्ष असतो, ना तसा मृदू आवाजाचाही ईफेक्ट असतो म्हणे!

हो, म्हणेच. माझा आवाज चांगला खणखणीत आहे, त्यामुळे माझ्या आवाजामुळे ’काय कटकट आहे, कोण ते ओरडतंय’ असेच ईफेक्ट झालेले पाहिलेत मी.. असे मृदू आवाजाचे मृदू ईफेक्ट माझा आवाज ऐकणार्‍यांच्या नशीबात नाहीत, बिच्चारे!

आमच्या ऑफिसमध्ये एक विवक्षित जागा आहे बरंका.. तिथे आपल्या क्यूबिकलमध्ये बसून न बोलता येणार्‍या गोष्टी फोनवरून बोलता येतात. म्हणजे, ओळखलं असेलच- ती खास कुचकुच करण्याची जागा आहे. तिथे ऑफिसातल्या काही कन्यका त्यांच्या ठरलेल्या वेळेला येतात आणि मोबाईल कानाला चिकटवून कुजबूज करत असतात. आता म्हणाल, तर ही जागा तशी सार्वजनिक वहिवाटीची आहे, त्यातला एक असा तो कोपरा आहे.. सो, मुलगी कुजबूज करत असताना, आपण ’सहज म्हणून’ तिच्या शेजारून चक्कर मारू शकतो. पण ह्या कन्या एकतर बोलण्यात इतक्या दंग असतात, की शेजारून कोणी गेल्याचा त्यांना पत्ता लागत नाही(- त्यांचं तोंड ऑलमोस्ट त्या फोनच्या आत असतं!) हे एक. आणि त्यातूनही शेजारून कोणी गेलं, तर बोलणारा आपला आवाज कमी करतो ना- त्यांना गरजच नाही.. त्यांचा आवाज ऑलरेडी इतका लहान असतो, की शेजारी कोणी ठाण मांडून बसलं, तरी त्याला पत्ता लागणार नाही, ही मुलगी काय बोलत्ये ह्याचा! कसलं कौशल्य आहे ना! जाम हेवा वाटतो मला! ह्या बाहेर तरी येतात क्यूबिकलच्या.. शेजारी शेजारी बसूनही फोनच्या आत काय बडबड जात्ये याचा पत्ता न लागू देणारे धुरंधर आहेत! ह्यांना फोन आला कधी (नेहेमी सायलेन्टवर असतो), ह्यांचं बोलणं झालं कधी, फोन ठेवला कधी- पत्ता म्हणून लागत नाही!

पत्तावरून आठवलं.. आमच्या ऑफिसमध्ये मी अगदी कोपर्‍यात बसते. एकदा एक मैत्रिण भेटायला आली, तिला मी जनरल सांगितलं होतं- कुठे बसते ते.. ती येत होती जीना चढून इतक्यातच माझ्या बॉसचा फोन आला आणि मी त्याच्याशी बोलत होते. बोलत्ये, तोवर ही समोर कधी आली मला कळलंच नाही. मी एक सेकंद बावचळलेच!
"सापडले मी तुला?"
त्यावर ही माझी मैत्रिण कुचकटपणे हसत म्हणाली,"अगं सोपं होतं, तू फोनवर बोलत होतीस ना, तुझ्या आवाजाचा माग काढत आले!"
अक्षरश: तीळपापाड झाला माझा! पण बसले हात चोळत! काय करणार? खरं होतं ना ते! तरी मी बॉसशी बोलत होते, त्यामुळे तेव्हाची आवाजाची पट्टी अदबशीर, पोलाईट लेव्हलची होती! आई, बहिण, अजून एखादी गॉसिप करणारा मित्र/मैत्रिण असती, तर काय झालं असतं, कल्पना करा! हे माझं होतंच हं पण.. आपल्याला फोन आलाय, किंवा आपण केलाय ह्याची उगाचच एक्साईटमेन्ट इतकी असते, की काय बोलू आणि काय नको असं होतं आणि अलगद आवाजाची पट्टी चढते! खिदळत असताना, एखाद्या बातमीची देवाण-घेवाण करत असताना आवाज लहान कसा काय ठेवायचा असतो बुवा? छे! इम्पॉसिबल आहे!

’तुला फोनची तरी काय गरज आहे मध्ये? थेट बोललीस तरी कळत असेल ना समोरच्याला काय म्हणत्येस ते?’, ’ग्राऊंडवर खेळणार्‍या मुलाला बोलावताना नॉर्मल आवाजाची अर्धी पट्टी वर लावली तरी तो घाबरून लगेच येत असेल ना घरी?’, ’तू ना, सुगम वगैरे गाणं शिकू नकोस, थेट ओपेरा सिंगींग सुरू कर.. त्यात तुझ्यासारख्या आवाजाच्या बायका मस्त गातात अगं, तीही एक कलाच आहे..’ असे अनेक तर येताजाता पडत असतात कानावर!

जेव्हा माझ्या मुलाला शाळेचा अभ्यास पहिल्यांदा सुरू झाला, आणि त्याने तो करण्यासाठी टंगळमंगळ करायला सुरूवात केली तेव्हाची गोष्ट.. माझी रसवंती नेहेमीप्रमाणे सुरू झाली..म्हणजे मी होते सुरू अगदी समंजसपणे वगैरे, पण हळूहळू आवाजाची भट्टी अशी जमते की काय सांगू.."असं करून कसं चालेल अरे? अभ्यास करायला नको का? मग कळणार कसं शाळेत काय चाललंय ते? (इथे आवाज एक पट्टी वर) तुला ना फक्त टीव्ही पहायला हवा, खेळायला हवं.. (दोन पट्ट्या) ते काही नाही, आजपासून सगळं बंद. फक्त अभ्यास कर. ते झाल्याशिवाय काही नाही.. आणि उगाच माझ्या मागे लागू नकोस.. मी काहीएक ऐकणार नाहीये सांगून ठेवत्ये.. मित्र-बित्र सगळे बंद.. कळतंय की नाही काही? (परमोच्च बिंदू)"

असं बरंच ऐकून झाल्यावर तो शांतपणे म्हणाला, "आई हो, मी करेन अभ्यास, पण हळू जरा. खालचा मानसही बघतोय बघ.." (म्हणजे मी ओरडत असताना ह्याचं लक्ष बाहेर मानसकडे, हे तेवढ्यात आलंच लक्षात माझ्या!)

मी चटकन खाली डोकावले! हो की! आमच्या खाली राहणारा मानस खरंच बाहेर येऊन वर बघत होता मी कशी रागावत्ये ते.. मी वरून बघत आहे हे कळल्यावर माझ्याकडे बघत मिश्किल हसत आत पळाला..

मग एक दिवस मी ठरवलं, अगदी गोड, हळू बोलायचं(- फोनवर तरी). जमलंच पाहिजे, नाही म्हणजे काय? असं हळू बोलायचं की ह्या कानाचं त्या कानाला ऐकू येता कामा नये! गोड, लाडिक, मऊ आवाजात बोलायचं. (कमी बोलायचं असंही मी अनेक वेळा ठरवून विसरलेय, त्यामुळे तो संकल्प सध्या बासनात गुंडाळलाय.) असं ठरवलं आणि ह्यांचा फोन आला! म्हटलं, आता ह्यांना चकितच करू. एरवी येताजाता मला टोमणंवत असतात माझ्या आवाजावरून! तर, अगदी गोड आवाजात बोलायला लागले. दोन वाक्य होतात न होतात, तोवर ह्यांनी विचारलं, "तुझा आवाज असा खोल का गेलाय? बरं नाही वाटत आहे का?" डोंबल! खोल? Sad म्हणजे बघा, मी गोड आवाजात बोलत्ये, तो त्यांना आजारी आवाज वाटला! हाय रे कर्मा! तरी, मी तसंच बोलणं रेटलं. त्यांना उलट काहीतरी मस्त खबर द्यायला लागले. तर, ह्यांनी बोलणं थांबवलंच!
"काय बोलत्येस? मला काही ऐकायला येत नाहीये.."
इतकं ऐकूनही मी अगदी धीराने घेत होते. तसंच, त्याच पिचमध्ये बोलणं पुढे ढकललं. मग मात्र इकडून वैतागायला झालं.."अगं काय चाल्लंय हे? नीट बोल की हडसून खडसून नेहेमीसारखी.. हे काय कानाला गुदगुल्या केल्यासारखं चाल्लंय मगापासून?"
हे ऐकल्यानंतर मात्र मला हसू आवरलं नाही, फिस्सकन हसून मी सांगितलं शेवटी, "मी मृदू आवाजात बोलण्याची सवय करत्ये.."
"ह्यॅ! काही नको.. तुझा आहे तो खणखणीत आवाजच बराय.. हे असलं काही शोभत नाही तुला.. तुझ्या दणदणीत आवाजाची इतकी सवय झालीये, की माझ्या शेजारी बसणार्‍या मनोजलाही सगऽळंऽ कळतं आपण काय बोलतो ते.. तू अशी पुटपुटत बोलायला लागलीस, तर मला त्याला वेगळं सांगत बसायला लागेल..ते तसं नको.. नेहेमीच्या वरच्या पट्टीत येऊदे.." असं म्हणत स्वत: राक्षसासारखे गडगडाटी हसले! म्हणजे बघा, हे असं असतं.. मोठ्याने बोलले, तर हळू बोल. हळू बोलले, तर जोरात बोल.

ह्या कुचकुच करणार्‍या मुलींना एकदा धीर करून विचारणारच आहे, की कसं काय जमवता हे? तुम्ही जे बोलता ते तिकडे नीट पोचतं का? त्याने तिकडून ’आं? आं?’ केलं तरी तुम्ही इतक्या थंड कशा राहू शकता? तुमचे आवाज मऊ, मृदू रहावेत म्हणून कोणतं औषध, जडी-बूटी आहे का? माझं शंकानिरसन कराच!!

समाप्त.

त.टी: पात्र खरी आहेत, प्रसंग खरे असतीलच असे नाही.

विषय: 
प्रकार: 

शेजारी शेजारी बसूनही फोनच्या आत काय बडबड जात्ये याचा पत्ता न लागू देणारे धुरंधर आहेत! ह्यांना फोन आला कधी (नेहेमी सायलेन्टवर असतो), ह्यांचं बोलणं झालं कधी, फोन ठेवला कधी- पत्ता म्हणून लागत नाही!>> माझ्या ऑफिसमधे एक पोरगी होती अशी!! तिचा फोन आला की मला काय बोलते ते समजायचंच नाही!!

बाकी पूनम, तू आणि मी समआवाजी Proud

Happy मस्त लिहिलयस... अगदि खरं हं.. माझ्याहि बाजुला एक मुलगी बसायची आता गेली ती दुसरीकडे.. तिचहि अगदि असच. मलाहि खरतर खुप आश्चर्य वाटतं. ट्रेनमध्येहि या लोकांच ह्यांच हळु आवाजात बोलणं. आजुबाजुला इतका गोंधळ मग पलीकडल्या व्यक्तीला काय ऐकु येत असणार? पलिकडली व्यक्तिच जाणे Happy

तुझा आहे तो खणखणीत आवाजच बराय>>>> हे मात्र अगदी खरं. परवा फोनवर तुझा उत्साह इतका ओसंडून वाहत होता ना, खूप छान वाटलं बोलून.

पुनम सेम पिंच.

ह्या कुचकुच करणार्‍या मुलींना एकदा धीर करून विचारणारच आहे, की कसं काय जमवता हे? तुम्ही जे बोलता ते तिकडे नीट पोचतं का? त्याने तिकडून ’आं? आं?’ केलं तरी तुम्ही इतक्या थंड कशा राहू शकता? तुमचे आवाज मऊ, मृदू रहावेत म्हणून कोणतं औषध, जडी-बूटी आहे का? माझं शंकानिरसन कराच!! >>>> अगदी खरयं गं. विशेषतः ट्रेन मधे बसुन चर्चगेटपासुन ते त्यांचं स्टेशन येई पर्यंत हे हळुवार बोलण व्यवस्थित चालु असतं . आणि हल्ली ट्रेन मधे मिनटामिनटाला कर्णकर्कश्श अनाउन्समेंट होत असतात. पण ह्यांच बोलणं चालुच. Happy

लेख मस्त लिहिलायस , नेहेमीसारखाच.

मजेशिर लेख हे Happy प्रसन्ग वाचुन घरोघरि मातिच्याच चुलि परत पटले.
लग्नापुर्वि हार्ट टु हार्ट नाजुक कनेक्षनचि टु-वे वायर अस्ते त्यामुळे कुचुकुचु बोलुनसुध्दा ऐकु जाते. लग्न झालेवर वायरिचा पाइप होतो आनि पर्वति जशुकेन्द्र (बायको) ते टाकि (नवरा) असे वन-वे कनेक्षन सुरु होते व बायकोस तोन्डाचा पम्प सुरु करावा लागतो Proud आम्च्या ३बिस पन घसा खर्वडुन खर्वडुन बोलणेचि सवय हे. थोरलिसुध्दा आएच्या वळणावर गेलि हे. दिवसरात्र गर्जना करत अस्तात. वाघिण प्रेमाने बोल्लि तरि गुरगुरच होते तशि ह्या दोघि फक्त एक प्रश्न विचारताना प्रेमाने गुरगुरतात "थोडे पैसे देता का?"

लेख मस्त, खुसखुशीत एकदम...

आपला आवाज ही एक दैवदत्त देणगी आहे. तिचा अनमान करायचा नाही. कोणीही, काहीही, कितीही बोललं, टोमणवलं तरी.... Happy

मला पण कूचकूच करायला जमत नाही. मी हसते सुद्धा खुप मोठ्या आवाजात..

आपला आवाज ही एक दैवदत्त देणगी आहे. तिचा अनमान करायचा नाही. कोणीही, काहीही, कितीही बोललं, टोमणवलं तरी.... मला पण कूचकूच करायला जमत नाही. मी हसते सुद्धा खुप मोठ्या आवाजात
अगदी अगदी मंजू . अर्थात मैत्रेयी ( माझी मुलगी ) म्हणते सुद्धा , आई जरा हळू बोल आणि हळू हस , माझे कान दुखतात . Sad ( माझ्या नवर्‍याचा तिला अर्थातच पाठिंबा असतो Happy )

एक मात्र खरं , मोठा आवाज असणारे मनाने मोकळे असतात आणि उत्साह तर ओसंडून वाहत असतो . ( हे माझे प्रा . म . ) ( कोणी त्यावर आणखी काही लिहायच्या आधी , मी छू . )

पूनम , मस्त लेख . Happy

मस्त लेख Happy

>>>तू अशी पुटपुटत बोलायला लागलीस, तर मला त्याला वेगळं सांगत बसायला लागेल..ते तसं नको.. नेहेमीच्या वरच्या पट्टीत येऊदे.."
Rofl

पण हळूहळू आवाजाची भट्टी अशी जमते की काय सांगू.. >> Lol

आमच्या आज्जीच्या आवाजाची आता आठवण झाली. हा हा म्हणता पट्ट्या पार करायची. हा पट्ट्या पार करण्याचा स्पीड जेवढा जास्त, तेवढं पटकन समोरचं माणूस जरब बसून ताळ्यावर यायचं.

नक्कोच तो मृदू अन कुचुकुचू आवाज. खणखणीत आवाजाचं माणूस कसं मनमोकळं वाटतं. Happy

मस्तच लेख..

माझाही सेम प्रॉब्लेम... Sad कुचुकुचु करायचं ठरवलं तर श्वासच अडकतोय की काय असे वाटायला लागते..मग नेहमीच्या पट्टीत बोलायला लागले की जरा बरे वाटते.

मी जर कुचुकुचु बोलायला लागले तर मी काय बोलतेय ते मलाच कळत नाही. Happy
तरीपण माझा नवरा मला म्हणतो, "अग किती हळू आवाजात बोलतेस जरा मोठ्याने बोल" आता बोला. Sad
आणि फोनवर कुचुकुचु करण तर माझ्या शक्यतेच्या पलिकडच आहे.

सहीच पूनम..

प्रत्येक प्रसंग अगदी डोळ्यासमोर उभे राहीले बघ..

मी वाचत होते तरीही तू बोलल्याचा भास होत होता बघ Lol

अगं सोपं होतं, तू फोनवर बोलत होतीस ना, तुझ्या आवाजाचा माग काढत आले! . . . >>
"आई हो, मी करेन अभ्यास, पण हळू जरा. खालचा मानसही बघतोय बघ.." >> Lol

मस्तच एकदम... Happy

वहिनी, तुझी ही व्यथा कळतेय हो मला Lol

हे बघ..तू नुसतं लिहिलयस तरी तुझा आवाज माझ्या कानात घुमायला लागला बघ लगेच Proud

कविता,
अगं पण, आपला आवाज ऐकणार्‍यांची बोलणी आपल्यालाच खावी लागतात ना गं. म्हणून समदु:खी. Happy

क्या बात है. एकदम बढीया..
आपण "आवाज कुणाचा" अशी स्पर्धा घ्यायची का?. ववीला ठेवायला हरकत नाही.
मी आलो तर नक्कीच जिंकेन. Happy

मस्त. मलापण हळू आवाजात बोलता येत नाही. तसे काही घड्तच नाही आयुष्यात. कायम एकच खणखणीत टोन.

-------------------------------------------
टेन्शन लेने का नहीं देने का.

Pages