.[ पूर्वार्ध ]
सानपांच्या भयकथा मेंदूत कोरल्या जातात.
त्यातलं भय विसरलं जात नाही. पुन्हा सानपांचे कोणतेही पुस्तक वाचायचे नाही असा निर्धार केला की मनाला बरं वाटतं. आता ही कथा डोक्यातून काढून टाकू या निश्चयाने बळ येतं.
पण कधीतरी रात्री एकटी घरात असताना दारावरच्या झडपेच्या काचेतून समोरच्या बंद फ्लॅटमधून येणारा प्रकाश त्यातले रंगतरंग वेगळे करत भिंतीवर पसरतो. मधल्या पॅसेज मधे उडणार्या चतुर, पाकळ्या आणि झडपेच्या काचेवरची पाल यांच्या सावल्या मोठ्या होत भिंतीवर हलू लागतात तेव्हां..
"असला प्रकाश नको" या कथेची आठवण झाल्याशिवाय राहवत नाही.
मला नक्की खात्री नाही. पण ही कथा अशीच मेंदूचा ताबा घेऊन राहिली होती तेव्हां समोरच्या त्या फ्लॅटमधे पंख्याला टांगलेली एक आकृती पण दिसली होती. अगदी काहीच काळ. नंतर नाही.
हे कुणाला कसं सांगणार ? म्हणून कुणाकडेच बोलायचं नाही हे ठरवून टाकलं.
आक्रसणा-या मिती ही सानपांचीच कथा आहे हे नक्की समजेपर्यंतच ती माझ्या आयुष्यात आली होती. म्हणजे सानपांची आहे हे माहिती असण्याचीही गरज नाही. कथेतलं भय झपाटतं. इतकं की ते सत्यात उतरतं हा अनुभव त्या ही वेळी आला होता.
पण कुणाला सांगायची हिंमत होत नाही.
हे मनाचे खेळ आहेत असेच म्हणतील सगळे.
*******************************************
या आठवणी कधीच्या आहेत ?
माझ्या आयुष्यात कथांचं भूत आलं होतं ?
आठवत नाही नेमकं.
कि शाळकरी वयात काकाची भयकथांची पुस्तकं चोरून वाचली होती मी ?
मग आता आठवत कसं नाही ?
अंधा-या जागा, काळोखाची रात्र, एकटेपणा या गोष्टी सोबतीला असल्या कि स्मृतीतून काही तरी उसळी मारून आल्यासारखे का वाटते नेहमी ?
जुन्या वाड्यातल्या वरच्या काळोख्या मजल्यावरच्या त्या काकांबद्दल सतत काही न काही ऐकलं होतं.
त्यांची खोली दुपारी पाहताना उघड्या थैलीतून काही तरी रोखून पाहतंय अस्म वाटलेलं तो भास होता ?
ते लाल माणकासारखे डोळे पण भास होते ?
मग ते काका कसे काय डोळे विस्फारून मरण पावले होते ?
काय पाहिलं त्यांनी ?
ते तेव्हां तिथे होतं की माझ्या स्मरणातून ?
छे ! काहीच्या काहीच !!
मग तर सानपांच्या लिखाणातूनच ते वर आलं असतं ना ?
ते भय होतं ?
की भयाची दृश्य प्रतिमा ?
मग भय काय असतं ?
नको असलेले असे काही ?
अप्रिय घटना ? आठवणी ?
घड्याळाच्या गजराबरोबर नीलमची विचार शृंखला तुटली.
सावकाश उठत तिने मोरीत जाऊन डोळ्यांवर पाणी मारले. थोडंसं फ्रेश वाटलं.
पायात शूज बांधत ती संध्याकाळच्या फेरीला निघाली.
गेले दोन महीने तिचा या गावात हाच क्रम चालू होता.
तिने जरी कुणाशी ओळखी करून घ्यायचा प्रयत्न केला नाही तरी गावकरी हळूहळू तिला ओळखू लागले होते.
या वेळी ही बाई एकटीच फिरायला जाते.
तिकडे माळाकडे जाते.
नको जाऊ म्हटलं तरी ऐकत नाही.
आठवड्याभरापूर्वी ती डोंगराच्या दिशेला गेली होती. काटक्या वेचणा-या बायांनी तिला आवाज देऊन मागे फिरायला सांगितले होते.
तिने नेहमीप्रमाणेच कुणाचे ऐकले नाही.
गावात बरीच चर्चा झाली.
सकाळी दूध घालायला नर्मदा चाची आल्या तेव्हां त्यांनी तिची शाळा घेतली.
" सामके टाईपमे वहां कोई आत जात नही है. हम गांववालों मे से कोई भी नही जाता. अकेली औरत तू. कुछ उल्टा सीधा हो गया तो कोई भी नही आ सकता मदद के लिए"
यावर तिने थंडपणे उत्तर दिलं. " चाची ! आप मेरी चिंता छोड ही दो. मै. अपनी देखभाल कर सकती हूं "
" देखो. हम नही लोग कहते है. इलाका अच्छा नही है वोह. बूढे बुजूर्ग कहते है वो मान लेना चाहिए "
तिने फक्त ऐकलं न ऐकल्यासारखं केलं. आणि नजरेनेच पुढचा संवाद तोडून टाकला.
नर्मदाचाची समजायच्या ते समजून गेल्या.
जास्त वाद घातला तर मुद्दामून तिकडे जाण्यापेक्षा थांबलेलं बरं.
मध्य प्रदेशातल्या या गावाशी तसा तिचा काहीच संबंध नव्हता.
तिच्या एकुलत्या एक मैत्रिणीच्या होणा-या नव-याच्या खास मित्राचे गाव.
इटारसी स्टेशनपासून पिपरिया रस्त्याने गाडीने यायचं.
पिपरीया पचमढी रस्त्याला जंगल सुरू होतं.
या रस्त्यालाच अनहोनी नावाचं गाव आहे.
गेल्या दोन पिढ्यांपासून गावाकडे कुणी फिरकले नव्हते.
त्या आधीच्या पिढीत एक शिक्षक होते. त्यांनी गावचं भलं चिंतलं होतं.
लोकांच्या अडचणी सोडवल्या होत्या.
त्यांच्यावरच्या प्रेमापोटी लोकांनी या प्रॉपर्टीकडे लक्ष दिलं होतं.
या मुलीबद्दल मात्र लोकांच्या चर्चा चालू झाल्या होत्या.
********************************************************************
हिरव्या फाटकातून आता जायचं नाही.
पण ते हिरवं फाटक कसं कुणालाच दिसत नाही ?
मलाच दिसतंय.
जाऊन पहायलाच हवं.
ती पुन्हा त्या रस्त्यावरून निघाली. सायंकाळ होत आली होती. आत ब्रिटीशांची पार्टी चालू होती. हिरवळीवर गोरेपान सुंदर स्त्री पुरूष नृत्य करत होते.
मघाशी तर काहीच नव्हतं ना इथे ?
ते हिरवं फाटकही नव्हतं !
आता होतं आणि ते ही सताड उघडं.
जणू बोलवत होतं तिला.
ती संमोहित झाल्याप्रमाणे फाटकाकडे वळाली. आतलं वातावरण किती वेगळं होतं.
तिलाही नृत्य करायची इच्छा झाली.
पण कसलंसं भय दाटून येत होतं.
मात्र तिची जिज्ञासा भयावर मात करू पाहत होती.
अज्ञाताचा वेध घेणारी तिची दुर्दम्य इच्छा चांगलं वाईट, सत्य असत्य यावर मात करत होती.
ती फाटकापाशी आली.
आता पुढचं पाऊल आतच असणार होतं.
इतक्यात पुन्हा गजर झाला.
तिची विचारसाखळी तुटली.
असंच होत होतं.
हे कधीपासून सुरू झालं होतं ?
************************************************************
धूसर चित्रं खोलीत पिंगा घालत होती.
शाळा, शाळेचं पटांगण. मित्र मैत्रिणी.
सगळे शाळेच्या युनिफॉर्ममधे होते.
किती आनंदात होते सगळे.
एका मुलाने तिला "ए जाडे" अशी हाक मारली तोपर्यंतच.
तिचा चेहरा रडवेला झालेला दिसत होता.
सगळे हसत होते.
एकच मैत्रीण तिची समजूत घालत इतरांना शांत करत होती.
खोलीत तरंगणारी चित्रं आता विरत चालली होती.
बॉडी शेमिंग.
कित्येकदा नंतर तिने या प्रसंगाला तोंड दिलं होतं.
प्रत्येक वेळी स्वप्रतिमेच्या चिंधड्या चिंधड्या उडताना ती बघत होती.
स्वत:बद्दलचा आत्मविश्वास कमी होत जाताना तिने पाहिला होता.
पब्लिक अॅपिअरन्सची भीती बसली होती.
कुणाला फेस करायचं भय मनात ठाण मांडून बसलं होतं.
दिवाभीतासारखी ती आपल्या घरात कोंडून घ्यायची.
कॉलेजला गेल्यावर थोडीशी मिसळू लागलेली.
********************************************************************
मूर्ख बाई आहे. खेडवळ कुठली.
काय म्हणत होती ?
मदत ?
तिच्या सॅकमधे मिलटरी नाईफ होती. ती चालवायचं शिक्षण सुद्धा घेतलं होतं.
वेळ पडली तर एक दोन जणांना ती लोळवू शकत होती.
तायक्वांदोच्या ट्रेनिंग मुळे तिच्यात तो विश्वास आला होता.
संध्याकाळी ती डोंगराच्या दिशेने जाऊ लागली तेव्हां चार वाजले होते. काल डोंगरावर चढून पलिकडचा प्रदेश पाहून ठेवला होता.
आज तिकडे जायची इच्छा होत होती.
हे अगदी असंच कुठे वाचलेलं ?
आपण सर्व धरणीमातेची लेकरं !
हो त्या कथेतला नायक पण असाच गावाबाहेर फिरायला गेला होता.
आपण सर्व धरणीमातेची लेकरं.
किती समर्पक ओळ आहे ना ?
माता कधी लेकरात भेदभाव करत नाही. सर्वांना सारख्या नजरेने पाहते.
मग लेकरंच का नाही पाहू शकत ?
तंद्रीत तिची पावलं झपाझप पडत होती.
कॉलेजला निग्रहाने तिने वजन कमी करायला सुरूवात केली होती.
सायकल क्लब आणि तायक्वांदो मुळे रिझल्ट्स सुद्धा यायला सुरूवात झाली होती.
आणि हळू हळू सुरवंटाचं फुलपाखरू व्हावं तसं तिच्यातलं मूळचं सौंदर्य निखरू लागले होते.
आता तिच्याकडे पाहणा-या नजरा बदलल्या होत्या.
त्या तिला सुखावणा-या होत्या.
ती जाईल तिथे वातावरण बद्लत होतं. ती लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत होती.
फुलपाखरासारखे दिवस चालले होते.
कॉलेज संपले.
मग जॉब शोधणे इत्यादी सुरू झाले.
आणि ध्यानी मनी नसताना तिच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
समोरच्या फ्लॅटमधे तो रहायला आला होता.
*******************************************************************
आज डोंगर चढायला कमी वेळ लागला. चालण्याचा वेगही खूप वाढला होता.
ती इथे आली तेव्हां कशी बशी गावाच्या वेशीपर्यंत जाऊ शकली होती. मग तिथल्याच दगडावर तासभर दम खात बसल्यावर पुन्हा माघारी जाऊ शकली.
आता ती इतक्या दूर किती सहज आणि झपाझप आली होती.
अंधार पडायला साडेसात पावणेआठ होतात. दिवस मोठा आहे सध्य़ा.
अजून पावणेपाच पण नाही झाले.
आपण नक्कीच डोंगर उतरून जाऊ शकतो असं तिला वाटलं.
डोंगराजवळून एक झरा वाहत होता.
हा ओलांडायचा नाही असं कुणीतरी सांगितलं होतं.
स्फटिकासारखं स्वच्छ पाणी होतं. तिने ओंजळीत पाणी घेतलं.
चेह-यावर मारलं. हवेची एक झुळूक ओल्या चेह-याला स्पर्शून गेली.
अहाहा ! किती थंडगार वाटलं.
उर्जेचा प्रवाह रोमारोमातून फिरला.
ती झरा ओलांडून तशीच पुढे जाऊ लागली.
आता ती गुणगुणत होती.
खूप दिवसांनी ती इतकी आनंदात होती.
काही आंब्याची झाडं होती. बोरं, चिंचेची झाडं होती.
आणि बाभळी अस्ताव्यस्त पसरलेली होती. पायात काटा जाऊ नये म्हणून शूज घातले हे बरंच होतं.
बाकी सगळा माळ होता.
काही रानफुलं दाटीवाटीने गर्दी करून होती. मला घे मला घे अशा हाका मारत होती.
दोन फुलं केसात माळून ती दोन डोंगरांच्या मधून पुढे निघाली.
अजूनही बराच वेळ होता.
पुढे एक पडून असलेलं शेत होतं आणि त्या पलिकडे दूरवर निर्मनुष्य असं रान होतं.
आणि त्याच वेळी तिच्या नजरेला ते घर पहिल्यांदा पडलं.
त्या घराकडे जावं का ?
हिरवं फाटकापाशी ती उभी होती तेव्हां गजर झाला होता.
मग काय झालं ?
विचारांची साखळी तुटली होती.
कुठेतरी डोक्यात गजर वाजत होता.
ती मागे फिरली.
झपाझप पावलं टाकत परतीच्या रस्त्याला लागली.
मात्र आता वेळ जास्त लागत होता.
असे तिला वाटत होते की खरेच असे होत होते ?
सानपांच्या कथेत असेच घर होते ना ?
पण हा प्रकार नव्हता.
कि तिला वाटतेय तेच घडत होते ?
तिथे घर नक्की होते ना ?
तिची पावलं अजून वेगाने पडू लागली. पण अंतर काही संपतच नव्हतं जणू.
ती घामाघूम होऊ लागली.
कसा बसा पळतच झरा ओलांडला आणि
नेहमीसारख्या वेगाने अंतर मागे पडू लागले.
काही तरी वेगळे घडले का ?
तिला सांगता आले नसते.
तिला इतकेच समजले होते की ती सुखरूप परत आलीय.
डोंगर चढून आणि उतरून ती पुन्हा आली तेव्हां ती घामाघूम झाली होती.
आता ती जवळपास पळत निघाली होती.
अंधार पडायला सुरूवात झाली होती. गावची शीव अजून लांब होती.
तिला चक्कर येत होती.
शुद्ध जाताना चार पाच जण तिच्याकडे आरडा ओरड करत येत असल्याची जाणिव तिला होत होती.
********************************************************
शुद्धीवर आली तेव्हां गावातल्या बायका आजूबाजूला बसलेल्या होत्या.
दीदी म्हणून गावात दरारा असलेल्या सारू गोंड तिच्याकडे बघत होत्या. ती शुद्धीवर आल्यावर त्यांनी नर्मदाला खूण केली.
नर्मदाचाचीने तिला काहीतरी प्यायला दिलं.
"नाक बंद करके पी जाओ"
तिने निमूटपणे आज्ञेचे पालन केले. नाक बंद केल्यावरही त्या पेयाला खूप तीव्र वास होता.
रानातल्या फुलांचा पण असाच वास होता,
मोहाची फुलं !
"नर्मदाचाची, ये क्या पिलाया आपने "
" कुछ नही बेटा इससे थोडी हुश्शार हो जाओगी. पता है क्या क्या बड बडा रही थी बेहोषी मे "
" अरे निर्मला बेहोष कहा थी वह ? बस चक्कर सा आया था और फिर गहरी नींद मे चली गयी थी "
" बराबर दीदी "
चाचीने मोहाची दारू पाजली याचा नीलमला राग आला होता. पण त्या पेक्षा तिला काळजी वाटत होती ते ती जवळ पास बेशुद्धावस्थेत काहीतरी बडबडत होती याची. या बायकांनी काय ऐकलं असेल ?
त्या पेयाने तिला खरंच तरतरी आली. उठून बसायला दोघी तिघींनी मदत केली.
तिच्यासाठी गरमा गरम ताट आणलेलं होतं.
भात आणि नदीचे मासे.
जबरदस्तीने तिला दोन घास खायला लागले.
जरा बरं वाटू लागल्यावर तिला बाहेरच्या अंगणात बोलवलं गेलं.
तिथे पुरूष मंडळीही तिची वाट बघत होती.
मग दीदीं त्यांच्या अधिकार युक्त आवाजात तिला तिकडे पुन्हा न जाण्याची तंबी दिली.
गावक-यांनी तिला ताकीद दिली.
त्यांच्या म्हणण्यानुसार ती आता गावची पाहुणी होती. तिचं बरं वाईट ही त्यांची जबाबदारी होती.
जर तिला काही झालं तर बाबूजींच्या वारसांना ते काय तोंड दाखवणार होते ?
बाबूजी म्हणजे या मित्राचे आजोबा.
बरंच आदराचं स्थान मिळवलेलं दिसत होतं या घराने.
पाण्यात राहून माशाशी वैर करता येत नाही.
बरं वाटू लागलं की लगेच पुन्हा तिकडे जाणं आता उद्धटपणाचं वाटलं असतं. नाही म्हटलं तरी वेळेला मदतीला धावून आले होते लोक. आता त्यांना दुखावणं योग्य नव्हतं.
त्या घरात काय आहे ही उत्सुकताही स्वस्थ बसू देत नव्हती आणि
त्या दिवशी ती काय बडबडली हे ही जाणून घ्यायचं होतं.
मराठीत बडबडलो कि हिंदीत ?
पुण्यात राहून जरी ती मराठी बोलत होती तरी मातृभाषा हिंदीच होती तिची.
दोन्ही भाषेत विचार करू शकणा-या दुर्मिळ प्राण्यांपैकी होती ती.
मराठीत बडबडली असेल तर इथे कुणाला समजण्याची शक्यता नव्हती.
पण...
**********************************************************************
समोरच्या फ्लॅटमधले लोक दूरच्या नात्यातले निघावेत हा योगायोगच.
त्यामुळे त्याच्याशी बोलणे होऊ लागले.
आणि मग बाहेर भेटीगाठी ते प्रेमात पडणे आणि मग त्याने लग्नाची मागणी घालणे या गोष्टी किती भराभर घडत गेल्या.
तरी तब्बल दोन वर्षे गेली कि दरम्यान.
दोन्ही कुटुंबे आनंदात होती.
या दोन वर्षात ती निर्धास्त झाली होती.
आनंदाचे सर्वोच्च क्षण अनुभवत होती.
काही करावे असे वाटायचे नाही. बस फक्त त्याचाच विचार.
इतर सगळं बंद झालं होतं.
घरात बसून दिवसभर त्याला फोन करत राहणे.
नाही उचलला कि चिडचिड करणे. यातही आनंद मिळत होता.
तो मात्र न रागवता स्पष्टीकरणं देत रहायचा,
आईने एक दिवस तिला टोकलं.
फक्त संदीप बरोबरच बाहेर पडतेस. एरव्ही अजिबात नाही. वजन परत वाढायला लागलंय. लग्नापर्यंत तरी नीट रहा.
तिने आरशात पाहिलं. इतकंही काही वाढलेलं नव्हतं वजन.
हळू हळू घरी येणारे पण तिला आडवळणाने सुचवत.
दोन वर्षे गेली.
साखरपुड्याचा थाट तर बघण्यासारखा होता. तिच्या घरच्यांनी चांगलाच खर्च केला होता.
मित्र मैत्रिणी, मुलाकडचे नातेवाईक, हिचे नातेवाईक यांनी हॉल गजबजून गेला होता.
साखरपुड्यानंतर मग तीन दिवस गेले.
त्याचा फोन आला नाही. कदाचित बिझी असेल म्हणून तिने केला नाही.
पण मग
एक दिवस त्याने आपला साखरपुडा तोडायचाय असं सांगितलं.
तिचा कानांवर विश्वासच बसत नव्हता.
तिने त्याला भेटायला बोलवलं. तिला कारण हवं होतं.
त्याने आढेवेढे घेत घेत जे काही सांगितलं त्यावरून ती आता लठ्ठपणाकडे झुकली होती.
मुलाकडच्या नात्यातल्या बायका म्हणत होत्या " काही वर्षात तुमचा जोडा शोभणार नाही. ही आत्ताच अशी तर नंतर कशी होईल ?"
आणि त्यानेही त्यांचं ऐकलं.
नकारावरून दोन्ही कुटुंबात टोकाची भांड्णं झाली होती.
तिचा विचारच कुणी करत नव्हतं.
तिने पुन्हा एकदा स्वतःला बंदीस्त केलं होतं. जगापासूनचा संपर्क तोडला होता.
पुन्हा एकदा जुन्या भयाने उसळी मारली होती.
कसलं भय ?
त्याला कुठले रूप होते ? ?
कधी कधी तास न तास शून्यात नजर लावून बसायचं.
कधी कधी फक्त रडत रहायचं.
आणि ते संपल्यावर मनात येणा-या असंख्य प्रश्नांचं भय दाटू रहायचं.
त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात तास न तास जायचे.
हे आपल्याबरोबरच का होतं ?
दोन वर्षात त्याला ही गोष्ट समजली नाही का ?
फक्त वजन वाढले म्हणून कुणी नातं संपवतं ?
वजन वाढले म्हणून आपण बाद ?
संताप, अपमान, चीड, असहाय्यता, भय अशा भावनांचा कोलाज होऊन फेर धरू लागायचा. त्याच्या आवर्तनाने मनाचा डोलारा कोसळायला लागला होता.
कधी कधी सूडाची भावनाही डोकावून जात असे.
*****************************************************************
उत्तरार्धासाठी खाली दिलेल्या दुव्यावर टिचकी मारा.
https://www.maayboli.com/node/80685
( नारायण धारप यांच्या काही कथांचा उल्लेख आणि उपयोग केला आहे. कथेत त्यांचे नाव सानप ठेवले आहे. ही कथा त्यांना आदरांजली म्हणून समर्पित. त्या कथा एखाद्या निस्सीम वाचकाच्या जीवनात त्यांचे जे स्थान असेल अशा पद्धतीने घेतल्या आहेत. याने प्रताधिकाराचा भ़्ंग होत असल्यास कथा उडवावी ही विनंती. )
बऱ्याच दिवसांनी तुमची पोस्ट
बऱ्याच दिवसांनी तुमची पोस्ट आली. छान... वाचतोय..
मस्त आहे सुरुवात!
मस्त आहे सुरुवात!
मस्त आहे पूर्वार्ध !
मस्त आहे पूर्वार्ध !
छान शैली.
रोचक सुरुवात! वाचतेय
रोचक सुरुवात! वाचतेय
भारीच
भारीच
बऱ्याच सानप कथाना स्पर्श केला.पुभाप्र.
मस्त जमलीय ....
मस्त जमलीय ....
तुमच्या कथेतील नायिका एकदम हटके असतात.
मस्तच , नेहमीप्रमाणे...
मस्तच , नेहमीप्रमाणे... पुभाप्र !
मस्तच. उत्तरार्धाच्या
मस्तच. उत्तरार्धाच्या प्रतिक्षेत
मस्तच!
मस्तच!
बऱ्याच दिवसांनी तुमची पोस्ट
बऱ्याच दिवसांनी तुमची पोस्ट आली. छान... >> +111
Welcome back रानभुली
Welcome back रानभुली
नेहमीप्रमाणे छान लिहिलय.
मस्त सुरुवात ! पुढील लेखनास शुभेच्छा!!
मस्त!
मस्त!
मजा आ गया... मस्त सुरुवात...
मजा आ गया... मस्त सुरुवात...
मस्त. हटके कथा घेऊन आल्या
मस्त. हटके कथा घेऊन आल्या आहात..
प्रताधिकाराचा भंग माझ्या मते नुसत्या उल्लेखा ने होत नसावा.
सर्व वाचकांचे मनापासून आभार.
सर्व वाचकांचे मनापासून आभार.
था पोस्ट केल्यावर समाधान
था पोस्ट केल्यावर समाधान होईना. सारखे एडीट करण्याऐवजी दोन्ही भाग काढून टाकले.
कथा संदिग्ध झाली असे वाटले. कोणता शेवट ठेवावा हे मला समजले नाही. आता मला आवडलेलाच शेवट ठेवून पुन्हा पोस्ट करणार आहे.
गैरसोयीबद्दल क्षमा असावी.