लेखकाचे मानधन : कथा आणि व्यथा

Submitted by कुमार१ on 1 January, 2020 - 09:12

सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा !
.........

साहित्याच्या प्रांतात लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. मुळात एखादे साहित्य निर्माण होण्यासाठी लेखक हा मूलभूत स्त्रोत आहे. त्याने काही लिहिल्यावरच अन्य तीन घटकांचा प्रश्न उपस्थित होतो. लेखक स्वतःच्या प्रतिभेने लिहितो आणि मग ते लेखन लोकांनी वाचावे या आशेने निरनिराळ्या माध्यमांत प्रकाशित केले जाते. लेखन करताना लेखकाची बुद्धी आणि कष्ट खर्ची पडतात. त्याच्या लेखनातून वाचकांचे रंजन होते आणि त्यांना अन्य काही फायदेही होऊ शकतात. त्याचा मोबदला म्हणून लेखकाला काही मानधन मिळावे अशी प्रथा पडली. जे लेखक बाजारात यशस्वी ठरतात ते व्यावसायिक म्हणून गणले जातात. त्यांच्या वकुबानुसार ते यथायोग्य मानधन मिळवत राहतात. याउलट हौशी लेखकांचे असते. त्यांचा चरितार्थाचा अन्य उद्योग असतो आणि केवळ लेखनाच्या हौसेपोटी ते लिहीत असतात. त्यांना साहित्यविश्वात ‘नाव’ वगैरे मिळालेले नसले तरी त्यांचा ठराविक असा चाहता वाचकवर्ग असतो. असे लेखकही त्यांच्या परीने बुद्धी आणि कष्ट पणाला लावतात. अशा लेखकांना प्रस्थापित व्यावसायिक प्रकाशकांकडून मानधन मिळते का, हा या लेखाचा विषय आहे. त्याच बरोबर एकंदरीत लेखक-प्रकाशक यांच्यातील व्यवहारावर थोडा प्रकाश टाकेन.
या संदर्भात अनेक हौशी लेखकांचे भलेबुरे अनुभव मी जाणून घेतले आहेत. त्यातून प्रकाशकांचा अशा लेखकांकडे बघण्याचा दृष्टीकोन दिसून येतो. हे अनुभव वाचकांना समजावेत या उद्देशाने हा लेख लिहीत आहे. ते लिहिताना संबंधितांचा नामनिर्देश मी करणार नाही हे उघड आहे. या अनुभवांतून काही मानवी वृत्तीप्रवृत्तींचे दर्शन वाचकांना व्हावे इतकाच हेतू आहे. लेखाची व्याप्ती अर्थातच विविध छापील नियतकालिकांतील मराठी लेखनापुरती मर्यादित आहे.
………..

सुरवात करतो एका भूतपूर्व मासिकापासून. दोन दशकांहून अधिक काळ ते चालू होते आणि त्यात चांगल्या अभिरुचीचे साहित्य प्रकाशित झालेले आहे. त्याच्या प्रकाशकांचे धोरण खूप चांगले होते. ते प्रस्थापित लेखकांबरोबरच हौशी आणि नवोदितांचे देखील साहित्य स्वीकारत असत. त्यांची संपादकीय शिस्त वाखाणण्याजोगी होती. कुणीही लेखकाने त्यांना लेखन पाठविल्यानंतर एक महिन्याचे आत ते त्यासंबंधीचा निर्णय (स्वीकार/नकार) लेखकास लेखी कळवत. जर ते लेखन स्वीकारले गेले असेल तर त्याचे मानधन किती मिळेल याचा स्पष्ट उल्लेख त्या पत्रात असायचा. पण याही पुढे जाऊन ते अधिक काही लिहीत. तो मजकूर असा असायचा:

बौद्धिक श्रमांचे औद्योगिक जगातले मूल्य याहून कितीतरी जास्ती असते हे आम्ही जाणतो. परंतु, आमच्या आर्थिक मर्यादेत आम्ही इतकेच मानधन देऊ शकतो. तथापि आपणास ही रक्कम अपुरी वाटत असेल, तर तसे स्पष्ट कळवा. त्यावर आम्ही विचार करून आपणास निर्णय कळवू”.

अत्यंत पारदर्शक असा हा दृष्टीकोन लेखकांना नक्कीच सुखावत असे. पुढे तो मासिक अंक प्रकाशित झाल्यावर ते त्यातील सर्व लेखकांना मानधनाचा धनादेश, आभाराचे पत्र आणि अंकाच्या दोन प्रती कुरिअरने पाठवीत. ही सर्व प्रक्रिया त्या महिन्याची १ तारीख उजाडण्यापूर्वीच पूर्ण होत असे. म्हणजे वाचकाच्या हाती जर तो अंक १ तारखेस पडणार असेल, तर त्यापूर्वीच ते लेखकाला तृप्त करीत ! इतका सहृदय दृष्टीकोन बाळगणारे प्रकाशक विरळा असतात, हे हौशी लेखकांनी अनुभवलेले आहे. अशी सुरेख संपादकीय शिस्त असलेले हे मासिक कालौघात बंद पडले याचा खेद वाटतो.
.......

आता एका दिवाळी अंकाबद्दल लिहितो. याचे प्रकाशन फक्त वार्षिक असे आहे. ही मंडळी अनाहूत लेख स्वीकारतात. लेखकाला लेखस्वीकृतीबद्दल काही कळवत नाहीत. लेखकाने दिवाळीच्या दिवसांत वाट पाहत बसायचे ! काहीही उत्तर आले नाही तर लेख नाकारल्याचे समजून घ्यायचे. जर लेख स्वीकारला गेला असेल, तर तो अंक टपालाने लेखकास मिळतो. त्यासोबत संपादकांचे पत्र असते. त्यात स्पष्ट लिहिलेले असते, की हा अंक ना नफा ना तोटा तत्वावर प्रसिद्ध होतो. त्यामुळे ते लेखकास काहीही मानधन देऊ शकत नाहीत. या अंकात व्यापारी जाहिराती सहसा दिसत नाहीत; साहित्यविश्वाशी संबंधित लोकांच्या आर्थिक पाठबळावर हा अंक निघत असतो. त्यामुळे मानधन न देण्याची प्रामाणिक कबुली ही योग्य वाटते. फक्त हेच धोरण त्यातील प्रस्थापित लेखकांनाही लागू आहे की नाही, हे गुलदस्त्यात राहते.
.......
वरील दोन सभ्य अनुभवांच्या नंतर आता पाहूया एक अशिष्ट अनुभव. हे मासिक एका शिक्षणसंस्थेतर्फे चालवले जाते. ही संस्था तत्त्वनिष्ठ कडक शिस्तप्रिय मंडळींची आहे. त्या मासिकातील लेखन संस्कारप्रधान असते. एका हौशी लेखकाचा इथला अनुभव पाहू.

अन्य एका प्रथितयश मासिकात या लेखकाचा एक लेख प्रकाशित झालेला होता. तो खूप वाचकप्रिय ठरला. तो या मासिकाच्या संपादकांच्या वाचनात आला. तो आवडल्याने त्यांनी या लेखकाशी संपर्क साधला. त्यांनी त्याला त्यांच्या मासिकात लिहिण्याची फोनवरून विनंती केली. मानधनाचे बोलणे काही झाले नाही. लेखकही जरा हरखून गेल्याने भिडस्त राहिला. अर्थात ही त्या लेखकाकडून झालेली मोठी चूक ठरली, हे पुढे लक्षात येईल.

लेखकाने लेख पाठवला. काही दिवसांत त्याला फोनवरून स्वीकृती कळवण्यात आली आणि प्रकाशनाचा अंदाजे महिनाही सांगण्यात आला. यथावकाश अंक प्रकाशित झाला आणि तो लेखकास टपालाने मिळाला. सोबत वेगळे पत्रही होते. या लेखकाने मोठ्या उत्सुकतेने ते उघडले. त्यात त्यांनी मानधनाची अल्प रक्कम नमूद केली होती आणि ती जमा करण्यासाठी लेखकाच्या बँक खात्याची माहिती मागवली होती. लेखकाने ती कळवली. रक्कम किरकोळ असल्याने निदान त्याचा धनादेश न पाठवून तो भरण्याची आपली हमाली तरी वाचली, असे लेखकाने समाधान करून घेतले. आता पुढचा किस्सा भारीच आहे. या घटनेला महिना उलटला तरी लेखकाच्या खात्यावर ती रक्कम काही जमा झालेली नव्हती. तरी तो शांत होता. अचानक एके दिवशी त्याला त्या मासिकाकडून पत्र आले. या पत्रात धनादेशासोबत “तुम्हाला *** इतके रुपये मानधन धनादेशाने देण्यात येत आहे“, असे वाक्य लिहिलेले होते आणि त्यातील रकमेचा आकडा (दिसत राहील असा) खोडून त्याच्या डोक्यावर कमी केलेल्या रकमेचा आकडा टाकला होता ! यावर लेखकाने कपाळावर हात मारला. आता त्याला या रकमेत शून्य रस होता. त्याने तो धनादेश सपशेल फाडून टाकला आणि त्या प्रकाशकास एक खरमरीत इ-मेल पाठवली. मानधनाचे बोलणे आगाऊ न केल्याची चूक त्याला महाग पडली होती आणि वर मनस्तापही झाला. आजच्या काळात अत्यल्प रक्कम आपल्याला कोणी धनादेशाने पाठविल्यास तो बँकेत भरून यायची हमाली खरोखर महाग पडते हे स्पष्ट आहे. शिस्तप्रिय म्हणवणाऱ्या या संस्थेकडून लेखकास मिळालेली ही वागणूक अशिष्ट आणि अजब होती. पत्रात खाडाखोड करून लेखनातील किमान सभ्याताही त्यांना पाळता आली नाही याचे सखेद आश्चर्य वाटते.
.........

पुढचा किस्सा एका दिवंगत नामवंत साहित्यिकाबाबत घडलेला आहे आणि तो मी एका पुस्तकात वाचलेला आहे. तो रोचक आणि चालू विषयाशी संबंधित असल्याने लिहितो.
हे लेखक त्यांच्या अजोड साहित्यकृतींमुळे तमाम मराठी वाचकांच्या हृदयात प्रेमाचे आणि आदराचे स्थान मिळवून बसले आहेत. एकदा एका दिवाळी अंकाचे संपादकांकडून त्यांना लेखासाठी विचारणा झाली. मग त्यांनी तो पाठवला. हे संपादक महोदय देखील नामांकित, साक्षेपी वगैरे. त्यांनी तो लेख ३-४ वेळा वाचला पण त्यांना काही तो अजिबात पटला नाही. लेखात सुधारणा वगैरे सुचवायचे काही त्यांना धाडस झाले नाही. मग त्यांनी तो लेख नाकारून या लेखकांना साभार परत पाठवला. पण गंमत पुढेच आहे. या परतीच्या लेखासोबत चक्क मानधनाचा धनादेश जोडलेला होता !! “सदर लेख आम्ही तुमच्याकडून मागवून तुम्हास कष्ट दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही मानधन देणे लागतो, पण तुमचा लेख पसंत नसल्याने साभार परत करीत आहोत”, असा सुरेख मजकूर या पत्रात लिहिलेला होता. लेखकाचा यथोचित आदर केलेले यासारखे प्रसंग मराठी साहित्यविश्वात घडू शकतात, यावर क्षणभर खरेच विश्वास बसत नाही !
........

आता पाहूया एका लेखकाने प्रकाशकावर कशी कुरघोडी केली ते. हे लेखक बऱ्याच नियतकालिकांत लिहीत. एकदा एका दिवाळी अंकाच्या संपादकांनी या लेखकांना लेख मागितला. तो प्रकाशित केला आणि चांगले मानधनही दिले. तो लेख बऱ्यापैकी गाजला. एक वर्षाने त्या मंडळींनी यांचेकडे पुन्हा लेख मागितला. पण या खेपेस प्रकाशकांनी लेखकास चाचरत विचारले की मानधन जरा कमी घ्याल का? आता यावर लेखक बरे ऐकतील? त्यांनी सरळ सांगितले, “ लेख तुम्ही पुन्हा मागत आहात. तेव्हा मानधन कमी तर होणारच नाही, उलट याखेपेस ते वाढवले जावे !” प्रत्येक लेखकास असा आपल्या लेखनक्षमतेचा अभिमान जरूर असावा. अन्यथा लेखकांना ‘गृहीत’ धरण्याची प्रकाशकांची वृत्ती वाढीस लागते.
…………………………

आता एका दैनिकाचा अजब अनुभव. त्यांचेकडे अनाहूत लेखकांसाठी काही सदरे आहेत. त्यापैकी ‘अनुभव’ प्रकारातले एक सदर आहे. यात वाचक-लेखक दैनंदिन सामान्य जीवनातले सपक अनुभव लिहितात – जेमतेम ३०० शब्दांत. त्याला ते किरकोळ मानधन देतात. या दैनिकाच्या पुरवणीत निरनिराळ्या वारी विज्ञान, तंत्रज्ञान, समाजशास्त्र इत्यादी विषयांवर तज्ञांचे लेख येत असतात. हे अभ्यासपूर्ण लेख आकाराने पुरेसे मोठे असून ते संबंधित तज्ञांनी लिहिलेले असतात. पण या लेखांना मात्र अजिबात मानधन नसते. या सर्व तज्ञांनी लेखन ही समाजसेवा समजावी अशी या दैनिकाची अपेक्षा आहे !
..............

नियतकालिकांकडून लेखकांना दिले जाणारे मानधन हा एक संवेदनशील विषय आहे. याबाबतीत आढळणाऱ्या तऱ्हा आपण वर पाहिल्या. लेखकाला मानधनाची आगाऊ कल्पना देणे आणि त्याप्रमाणे नंतर खरोखर देणे, पूर्वकल्पना न देता एकदम अंकाबरोबर मानधन देणे, अथवा ते अजिबात न देणे असे सर्व प्रकार दिसतात. एकंदरीत पाहता मराठी साहित्यविश्वात मानधनाची रक्कम ही ‘मान’ अधिक व ‘धन’ कमी या प्रकारात मोडते ! किंबहुना आपल्या देशात हिंदी व इंग्लीश वगळता बहुतेक प्रादेशिक भाषांची हीच स्थिती असावी. जिथे मानधन दिले जात नाही तिथे प्रकाशकांनी लेखकाला भेट अंक पाठवला तरी अगदी धन्य वाटते. लेखन स्वीकारून अंकही नाही आणि मानधनाचे तर नावही नाही, असे देखील अनुभव काही लेखकांना आलेले आहेत.

या संस्थळावर लिहिणारे माझ्यासारखेच अन्य काही लेखक अन्यत्रही लिहीत असतात. त्यांनाही व्यावसायिक प्रकाशकांकडून असे काही अनुभव आलेले असणार. या अनुभवांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने हा लेख लिहीला आहे. संबंधित प्रतिसादांचे तसेच निव्वळ वाचकांच्या मतांचेही स्वागत आहे.
********************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

* मासिकात किंवा वर्तमानपत्रात प्रकाशीत झालेला लेख आंतरजालावर 'किती काळाने' टाकायला परवानगी देतात प्रकाशक?>>>

माझा याबाबतीतला 'अंतर्नाद ' मासिकाचा अनुभव खूप चांगला आहे. मी तिथे १५ वर्षे लिहिले (मानधनासह). नंतर ते बहुतेक लेख इथे प्र करण्याआधी त्यांची परवानगी मागितली. त्या सर्व लेखांची परवानगी त्यांनी मला एकाच इ मेलने सहज दिली. कुठलेही काळाचे बंधन नाही.

वर जो ब्लॉग वरचे लेखन आणि फुकट हा मुद्दा आलाय, त्यावरून एक काल्पनिक उदा देतो.

समजा, माझ्या घरात मी एक छान झुंबर बसवले आहे. माझ्या घरी जे पाहुणे येतील ते सर्वजण ते आवडीने कितीही वेळ (फुकट) पाहू शकतात; वर मी त्यांचे आदरातिथ्य करतोच.

आता जर एखादा पाहुणा मला म्हणाला की अरे, तुझे झुंबर मला एक आठवडाभरा साठी देतोस का, कारण माझ्या घरी समारंभ आहे, तर

माझी प्रतिक्रिया अशी असेल:
१. अजिबात नाही. त्याने माझ्या घरी येऊन कितीही वेळा ते बघत बसावे, पण इथून नेता येणार नाही.

२. समजा तो गळीच पडला, तर मग मी त्याला काही भाडे घेऊनच दिले पाहिजे, नाही का ? Bw

साद,
तुमचे घर ही खाजगी जागा आहे. ब्लॉग, फेसबुक, माबो ही बिनभाड्याची पब्लिक जागा आहे. (मला जेवढं माहीत आहे त्यानुसार ब्लॉग काढू देणाऱ्या साईट काही भाडे आकारत नाहीत लेखकांकडून.)
===

बादवे
१. ब्लॉग काढू देणाऱ्या साईट तिथल्या प्रकाशित कन्टेन्टवर काही हक्क सांगतात का?
२. माबो सांगते ना हक्क इथे प्रकाशित झालेल्या कन्टेन्टवर? मला वाटतं समिर गायकवाड यांनी मधे कधीतरी विनंती केली होती "माझे पुस्तक प्रकाशित करायचे आहे. त्यासाठी प्रकाशक सांगताहेतकी या लेखनाच्या जालावरच्या सगळ्या कॉपी हटवाव्या लागतील. तर माझे माबोवरचेलेखन डिलिट करा प्लिज."
जेवढे मला माहीत आहे त्यानुसार लेखन डिलिट झाले नाही.
३. फेसबुक काही हक्क सांगत नाही आपल्या पोस्ट, फोटोवर.
===

यासगळ्या चर्चेवरून मला E.L. James आणि Anna Todd आठवल्या.
Fifty Shades आंतर्जालावरच Twilight चे फॅनफिक म्हणून चालू झाले होते. पण सगळे तिन्ही भाग जालावर आले नव्हते.
After देखील हॅरी स्टाईल्स चे फॅनफिक म्हणून wattpad वर आले. त्याचे तिन्ही भाग जालावर फुकट उपलब्ध आहेत अजूनही. त्यात थोडाफार फेरफार करून पुस्तकं, चित्रपट बनले आहेत.

ईतर अनेक सो.मी. साईट - तुमची वयक्तीक माहिती - हे भाडे देऊन त्याबदल्यात तुम्हाला वापरायला मिळते.
You are the product.

ब्लॉगच्या बाबतीत प्राथमिक योजनेसाठी भाडे नसते, पण त्यापुढचे प्लॅन्स, स्टोरेज व डोमेन नेम ई. साठी भाडे असते.
केवळ ब्लॉग वेबसाईट भाडे आकारत नाही म्हणुन लगेच, ती कलाकृती सार्वजनीक मालमत्ता होत नाही. ते ब्लॉग खाते त्या व्यक्तीची वयक्तीक मालमत्ता आहे. अलिकडे काही सो.मि. साईटनी तुमची वयक्तीक मालमत्ता - ब्लॉग/सोमी. खाते - तुमच्या वारसदारांना मिळावे यासाठी सोय केल्याची बातमी वाचल्याचे अंधुकसे आठवते.

१. ब्लॉग काढू देणाऱ्या साईट तिथल्या प्रकाशित कन्टेन्टवर काही हक्क सांगतात का?
>>
नाही. तुम्ही बेकायदेशीर किंवा त्यांचे TOS चे उल्लंघन करणारे काही लिहिले/प्रकाशित केले तर तो लेख किंवा तुमचा ब्लॉग काढुन टाकला जाऊ शकतो.

> केवळ ब्लॉग वेबसाईट भाडे आकारत नाही म्हणुन लगेच, ती कलाकृती सार्वजनीक मालमत्ता होत नाही. ते ब्लॉग खाते त्या व्यक्तीची वयक्तीक मालमत्ता आहे. > कलाकृती सार्वजनिक मालमत्ता आहे असे मी म्हणत नाहीय. पण कलाकृती सार्वजनिक 'जागेत' आहे म्हणतेय. त्यामुळे घर-झुंबर हे उदाहरण योग्य नाही असे साद यांना सांगतेय.

कलाकृतीवर मूळ हक्क लेखकाचाच हवा.
त्यामुळे लेखन काढून न टाकण्याचा/टाकता येण्याचा माबोचा निर्णय फारसा पटत नाही.

अभिनव,
उपयुक्त माहिती.
.......

आपल्या लेखनश्रमांचा काहीतरी मोबदला मिळावा हे लेखकास वाटणे साहजिक आहे. मी असे धोरण ठेवले:
* पुरेसे श्रम घेऊन केलेले लेखन आधी छापील माध्यमात ( मासिक, साप्ताहिक, दैनिक) प्रकाशित करून घेतले. त्याचे मानधन मिळाले.

मग ते सर्व लेखन इथे स्वतः प्रकाशित केले. इथल्या चर्चेचा आनंद घेतला.

* ज्या लेखनास 'लेख' असे स्वरूप नव्हते आणि ते निव्वळ चर्चाविषय होते ते थेट इथेच लिहिले.

* माझे इथले लेखन कुणी चोरले तर त्याचे दुःख नाही कारण मी त्याचा आनंद वेगळ्या रुपात आधीच घेतला आहे.

लेख पब्लिक असो वा प्रायव्हेट, तो लेख त्या त्या लेखकाची प्रायव्हेट इंटलेकचुल प्रॉपर्टी असते. त्या प्रॉपर्टीचे वापरायचे हक्क त्या त्या लेखकाकडे.

त्यामुळं पब्लिकला अव्हेलेबल असेल तर तुम्ही आम्हाला फुकटात वापरायला द्या, असं होत नाही. शेवटी तो त्या त्या लेखकाचा हक्क असतो.

साधकबाधक उपयुक्त चर्चेबद्दल आपणा सर्वांचे आभार.
रच्याकने…

केवळ मराठी लेखनावर उपजीविका केलेले ४ मराठी लेखक हे आहेत:

(यातल्या काहींनी आधी नोकरी केली होती पण, नंतर ती सोडून पूर्णवेळ लेखनव्यवसाय केला ).

पुलं ( लेखन आणि अन्य कला )
रमेश मंत्री
निरंजन घाटे
सु शि.

.....
माहितगारांनी अजून भर घालावी !

काही नामवंतांचे मानधन-किस्से

( अशोक जैन यांच्या अशोक-वन पुस्तकातून साभार !)

१. शंकर पाटील यांनी ‘स्वराज्य’ला कथा दिली त्यावेळी त्याचे मानधन नगण्य होते. पण त्यांनी स्वराज्यचा खप खूप असल्याने कथा अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचणे अधिक महत्वाचे मानले.

२. ना. ग. गोरे यांना ‘केसरी’त लिहील्याबद्दल ठराविक मानधन पाठवले होते. त्यांनी व्यवस्थापनाला सांगितले की आपली उपजीविका लेखनावरच असल्याने मानधन वाढवून द्यावे.

३. कुसुमाग्रजांच्या ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ कवितेस ‘सकाळ’ने तब्बल ५००० रु. मानधन दिले होते. पुढे ती कविता सर्व सरकारी कार्यालयांत लावण्याचा आदेश तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी काढला होता. परंतु त्यासाठी मात्र कुसुमाग्रजांनी अजिबात मानधन घेतले नाही.

४. विजय तेंडूलकर मटासाठी एक साप्ताहिक सदर लिहीत. त्यासाठी ते मजकूर डीटीपी करून त्याची छापील प्रत पाठवीत. यासाठीचा त्यांचा होत असलेला खर्च त्यांना मानधनाव्यतिरिक्त दिला जाई.

डॉक्टर...
छान किस्से , धन्यवाद...

बर आता एखाद्या साप्ताहिकात आपले लेख छापून येत असतील, अर्थात आपल्या परवानगीने तर संपादकांस किती मानधन मागावे किंवा मागूच नये??

वृत्तमाध्यमे आणि लेखकांचे मानधन या विषयावरील एक वास्तवदर्शी लेख :
https://www.aksharnama.com/client/article_detail/5303

त्यातील हे वाक्य फारच मार्मिक :

अगदी मोजकी प्रथितयश वृत्तपत्रे, नियतकालिके सोडून उरलेली ‘तुम्हाला फुकट लिहायचे तर लिहा नाहीतर नका पाठवू’ असा अलिखित बाणा घेऊन उभी असतात.

गुरुनाथ नाईक यांना आदरांजली वाहणारा एक लेख इथे आहे : https://www.aksharnama.com/client/article_detail/5570

त्यातले निवडक :

"आपल्या पुस्तकांच्या कमाईतून श्रीमंती मिळवणारे एक मराठी लेखक म्हणून नाईक यांना ओळखलं जातं. मात्र नंतर या लेखकावर आर्थिक संकट कोसळलं".

मी बऱ्याच वर्षांपूर्वी, सुधा मूर्ती यांची एका इंग्रजी दैनिकात आलेली मुलाखत आवडली म्हणून मी मराठीत भाषांतरित केली आणि एका स्थानिक दैनिका कडे पाठवली. (भाषांतराचा उल्लेख करून)
त्यांनी ती तीन भागात छापली ह्यातच मला आनंद मिळाला. पण काही दिवसांनी त्याचे चक्क पैसे पण मिळाले.
पुढे पण त्या दैनिकाने माझ्याकडून आणखीन काही लिखाण मागवले आणि दरवेळी नं मागता, पैसे पण दिले. (त्यांची रक्कम अगदीच तुटपुंजी होती, पण मला मुळात काहीच अपेक्षा नव्हती.)
आता ते दैनिक बंद पडलेय.
काही दिवसांपूर्वी दुसऱ्या एका दैनिकाने त्यांच्या आठवडी पुरवणी करता लिखाण मागीतले, अटी घालून-
1. पूर्व प्रकाशित नको. (आंतरजालावर)
2. पैसे मिळणार नाहीत.
3. वेळ पाळावी लागेल.

मी त्यांना सरळ नाही म्हणून सांगीतलं.

शर्मिला
**मी त्यांना सरळ नाही म्हणून सांगीतलं.>>
उत्तम !
अगदी योग्य निर्णय

लेखन आणि मानधन... जिव्हाळ्याचा विषय. खरं तर अलीकडे अशी धारणा झाली आहे की, 'मानधन' हा उगीचच गोग्गोड वाटणारा शब्द वापरण्याऐवजी 'मोबदला' असं रोखठोक का म्हणू नये? काही वर्षांपूर्वी नोकरी सोडली आणि जमेल तेवढं लेखनावर कमावू या, असं ठरवलं. ह्या काळात (आणि आधीही) बरेच वेगवेगळे अनुभव आले.

१. वाचकांची पत्रे - 'केसरी'मध्ये एकदा ठरवून पत्राचे बक्षीस मिळवले. श्री. जयंतराव टिळक ह्यांची सही असलेली धनादेश मिळाला. त्या वेळी (साधारण ३५ वर्षांपूर्वी) ५० रुपये मोठी रक्कम असल्याने धनादेश वटवला. आता वाटतं की, जयंतरावांची सही असलेला धनादेश जपून ठेवला असता, तर... असो! 'सकाळ'मध्ये पहिल्या पानावर पत्र प्रसिद्ध झाल्याबद्दल अंक घरपोहोच आल्याचा अनुभव आहेच.

२. पहिल्या व दुसऱ्या नोकरीतील वृत्तपत्रांमध्ये लेखनाचे (सदर किंवा विशेष लेखन) पैसे मिळत. पण दुसऱ्या नोकरीतला अनुभव असा आहे की, काही काही लेखांचे मानधन देणे संपादकांनी मुद्दाम टाळले - ते तुझे कामच आहे; तो तुझाच विषय आहे. आणखी एक अनुभव असा - संपादकांनी सांगितले म्हणून साप्ताहिक सदर लिहिले. रोज एक लेखक असे. त्यांना ५०० रुपये मानधन मिळे. आपल्यालाही ते मिळेल अशी खुशीची गाजरे खात होतो. ज्याचे पैसे मिळतात, ते लेखन कार्यालयीन वेळेत करायचं नाही, असं आधीपासूनच ठरवलेलं. हजार शब्दांचं सदर रात्री बारा वाजेपर्यंत कार्यालयात थांबून लिहायचो. दोन महिन्यांनंतर संपादक म्हणाले, 'अरे, आपल्या ह्या पदाला मानधन कसलं? आपण पैशासाठी लिहितो का?' मुकाट बसलो. मनातल्या मनात खूप चडफडलो. कार्यालयीन वेळेत लिहून भरघोस मोबदला उपटणारे जवळच होते. त्यामुळे हा तडफड जास्तच होती.

३. मध्यंतरी ब्लॉगवर एक लेख लिहिला. स्वतःला राष्ट्रीय म्हणविणाऱ्या दैनिकाच्या फीचर एडिटरने इमेल करून आम्हाला संपादकीय पानावर लेख प्रसिद्ध करावयाचा आहे, असं कळवलं. 'फ्रीलान्सर असल्याने मला लेखन मोबदला अपेक्षित आहे,' असं स्पष्ट कळवलं. त्यांनी ना मानधन दिलं, ना इमेलला उत्तर. दुसरा अनुभव ब्लॉगचाच. लेख छोटा करून मुलाखतवजा केला. मुंबईतल्या दैनिकाला पाठवला. काही तरी पैसे मिळतील, असं अपेक्षित होतं. त्यांनी काहीच कळवलं नाही. ब्लॉगवरचा असाच एक लेख वाचून ओळखीच्या संपादकांनी संपर्क साधला. 'आम्ही फार नाही पण मानधन देऊ,' असं ते म्हणाल्याने सुखावलो. दीड हजार शब्दांच्या लेखासाठी १०० रुपये देऊ करीत होते. आम्ही दोघेही असमर्थ होतो आणि त्यामुळेच वाद झाला नाही.

४. ही कथा एका माध्यमसमूहाच्या साप्ताहिकाची. त्यात बरेच लेख प्रसिद्ध झाले. त्याचा मोबदला काही नाही, पण मानधन मिळालं. साप्ताहिकानं अचानक निरोप घेतला. पाच लेखांचे पैसे मिळालेच नाहीत. संपादकीय विभागाचे सूत्रधार असलेल्या ज्येष्ठ माणसानं 'अमूकतमूक ह्यांना फोन करा' असं सांगितलं. श्रीयुत अमूकतमूक ह्यांनी फोन उचलण्याचे कष्ट घेतले नाहीत आणि व्हॉट्सॲप मेसेजकडं ढुंकूनही पाहिलं नाही. बुडालेच ते पैसे आणि त्या लेखनासाठी घेतलेली मेहनत.

५. काही वर्षांपूर्वी व्यंग्यकविता केल्या. त्या वाचण्यासाठी म्हणून ओळखीच्या संपादकांना पाठविल्या. त्यांना आवडल्या व विशेषांकात प्रसिद्ध करतो म्हणाले. त्यानुसार त्या रचना प्रसिद्ध झाल्या. अंक व मानधनही मिळाले. रकमेबद्दल माझी तक्रार नव्हती; कारण अनाहूतपणे पाठविलेला मजकूर प्रसिद्ध झाला होता. गंमत पुढेच आहे. राहिलेल्या काही रचना त्यांच्या सहायकानं दिवाळी अंकात प्रसिद्ध केल्या आणि त्याचे प्रत्येकी १०० रुपयांप्रमाणं मानधन(!) पाठवलं. त्याबाबत इ-पत्रव्यवहार केला. त्या सहायकाचा प्रतिसाद अजिबात व्यावसायिक नव्हता. निषेध म्हणून तो धनादेश वटवला नाही. अर्थात त्यांना त्याचं काही सोयरसुतक नसणार.

६. एका स्पर्धेत विनोदी कथेला बक्षीस मिळालं. मुंबईच्या वार्षिकाकडून पत्र आलं. संपादकांनी लिहिलं होतं - कथा पाठवा, पसंत पडली तर प्रसिद्ध करू. मानधन अपेक्षित असेल तर आधीच कळवावं.

७. मागच्या महिन्यात एका दिवाळी अंकासाठी कविता पाठवा, असा 'आदेश' नामधारी संपादकांनी दिला. लेखनमोबदला किती विचारल्यावर 'आम्ही अंक विकत नाही, जाहिराती घेत नाही. त्यामुळे मानधन देत नाही', असं त्यांनी कळवलं. 'मी पुस्तकं विकत घेऊन 'साहित्यसेवा' करतो; फुकट लिहून नाही,' असं उत्तर दिलं त्यांना.

८. एका दैनिकाच्या वर्धापनदिनाच्या (जाहिरात) पुरवण्या दणक्यात निघायच्या. साधारण ५०-६० लेख असायचे. मेहनत घेऊन विषय दिलेले असायचे; संपादनावरही भरपूर कष्ट घेत होतो. लेखकांना किमान काही मोबदला देऊ, असं दर वर्षी सुचवत होतो. कधीही, कुणालाही मानधन दिलं नाही!

९. तरुण मुलगा मासिकाची कल्पना घेऊन आला होता. त्याला सांगितलं की, लेखकांना किमान एक रुपया शब्द ह्याप्रमाणं पैसे दिले गेले पाहिजेत. त्यानं मान्य केलं. नंतर एकूण खर्च पाहिल्यावर त्यानं माघार घेतली. माझ्या कष्टाचे कसेबसे ४० टक्के पैसे दिले. त्यासाठी तेवढ्या वेळा फोन करावा लागला.

१०. नोकरी सोडल्यावर एका सायंदैनिकाचा संपादक म्हणाला, आमच्याकडे लिहा. लिहिण्याचे पैसे घेतो, असं सांगितल्यावर तो कसनुसा हसला. नावासाठी लिहिणारे खूप असतात. मी आता सांगतो की, 'तुम्ही स्वतःचं नाव टाका माझ्या लेखावर, काही हरकत नाही. फक्त पैसे द्या.'

आणि शेवटी
११. कोणत्याही उत्पादनात कच्चा माल व त्यावरची प्रक्रिया ह्यासाठी सर्वाधिक भांडवल खर्च केले गेले पाहिजे. त्याप्रमाणे वृत्तपत्रं, साप्ताहिकं, नियतकालिकं ह्यांनी सर्वाधिक खर्च मजकूर मिळवण्यासाठी करायला हवा. बातमीदार/लेखक, उपसंपादक, सहायक संपादक ह्यांना वाजवी पैसे द्यायला हवेत. एकविसाव्या शतकात आपण ह्या सगळ्याला रामराम ठोकला आहे. मालकाचे पैसे आपण वाचविले, ह्यातच (बहुसंख्य) संपादकांना फुशारकी वाटते. बिच्चारे!

<<काही लेखकांना तर लेखन न करण्याचे पण मानधन मिळू शकेल. मराठी आंतरजालावर आहेत असे काही जण.>>

नाही हो. अजून तरी मला काहीच मिळाले नाही, पण लिहीणे चालू आहे, आशा अमर असते.

बे डर हे पत्रकार असल्याने त्यांना एक विचारतो.

जेव्हा एखादा हौशी लेखक दैनिकाला आपणहून लेख पाठवतो, तेव्हा लेख निवडीची प्रक्रिया कशी असते?
कोणत्या चाळणीतून लेख जातो ?

<< काही वर्षांपूर्वी नोकरी सोडली आणि जमेल तेवढं लेखनावर कमावू या, असं ठरवलं. >>
तुम्ही फारच धाडसी आहात, असं माझं मत झालं हे वाचून.

@ mi_anu, @ कुमार१ आणि @ साद - तुमच्या प्रतिसादाबद्दल आभार.

आता कुमार१ ह्यांनी विचारलेला प्रश्न - हौशी लेखकाचं लेखन आल्यावर काय काय केलं जातं? निवडीची प्रक्रिया कशी असते?

मोठा अवघड प्रश्न आहे हा. मी बहुतेक काळ 'पॅरासाईट एडिशन' म्हणविल्या जाणाऱ्या आवृत्त्यांमध्ये काम केलं. म्हणजे जिथं संपादकीय पान, पुरवण्या ह्याचं काम चालत नाही, अशा आवृत्त्यांमध्ये. तरीही प्रयत्न करतो.

विविध पुरवण्यांसाठी आणि खुल्या सदरांसाठी (व्यक्तिगत अनुभव सांगणारे वगैरे) हौशी मंडळींचे लेख बऱ्याच प्रमाणात येतात. मी जिथे काम केलं, तिथेही असे लेख येतच. पण 'लेखाचा निर्णय पुणे/मुंबई कार्यालयातून होतो', असं बहुतेक लेखकांना लगेच सांगितलं जायचं. त्यातून काही लेख चांगले वाटले, तर ते मुख्य कार्यालयात पाठवायचे. ते प्रसिद्ध होण्याची शक्यता फार कमी. नियोजित पुरवण्यांचं (वर्धापनदिन, दिवाळी पाडवा, चैत्री पाडवा) सहसा नियोजन केलं जाई. दिवाळी किंवा पाडवा पुरवण्यांसाठी असे हौशी मंडळींचे लेख उपयोगी पडत.

अलीकडच्या काळात बहुतेक वृत्तपत्रांची संपादकीय व फीचर्सची पानं ह्यांचं वर्षभराचं नियोजन केलेलं असतं. लेखक ठरलेले असतात. आठवड्यातला एखाद-दुसरा दिवसच असे लेख प्रसिद्ध होतात.

मी पत्रकारितेत आलो तेव्हाचं सांगतो. अनाहूत लेख लगेच कचऱ्याच्या टोपलीत जात नसत. ते कोणत्या प्रसंगाला/निमित्ताला उपयोगी येतील, ह्याचा अंदाज घेऊन ठेवले जात. त्यानुसार वृत्तसंपादक किंवा सहायक संपादक त्या त्या वेळी ते उपसंपादकाला संपादित करण्यासाठी (वृत्तपत्रीय भाषेत 'सोडण्यासाठी') लेख देत. अनाहूतपणे लेखन करणारा कोणी मोठा-मान्यवर असेल, तरच त्याला कळविण्याची तसदी घेतली जाई. काही हौशी लेखक चिकाटीने पाठपुरावा करणारे असत. दोन-तीन प्रयत्नांनंतर (फोन, थेट कार्यालयात भेट) त्यांना लेखाच्या पसंती-नापसंतीचा निर्णय कळविला जाई.

काही वेळा काय होतं की, जाहिराती अचानक वाढतात आणि त्यामुळे पानांची संख्या वाढवावी लागते. अशा आणीबाणीच्या वेळी हे हौशी मंडळींचे लेख उपयोगाला येत. काही स्थानिक वा उपआवृत्त्या रविवारी किंवा आठवड्यातील विशिष्ट वारी एखादं पान देतात. त्यासाठी अनाहूत लेखच उपयोगाला येतात. पूर्वी बऱ्यापैकी अक्षर, मजकुराचा दर्जा पाहून लेख प्रसिद्ध करायचा की नाही, हे ठरवलं जाई. विषयाचं गांभीर्य अभावानंच असायचं. (आता ते असतं, असा दावा मुळीच नाही.)

माझ्या वृत्तसंपादकांनी फार पूर्वी असाच एक लेख 'सोडण्यासाठी' दिला होता. तो लेखक त्यांच्या फार मागे लागला होता. त्यामुळे 'लावून टाकू अंकात एकदाचा' असं त्यांनी ठरवलं होतं. बहुतेक प्रभू रामचंद्रावर लिहिलेला लेख होता. रामनवमीचं निमित्त असावं. चार-पाच वेळा वाचूनही लेखकाला काय म्हणायचं ते कळलं नाही. त्यामुळे 'लेखात अजिबात 'राम' नाही!' अशी टिप्पणी लिहून लेख परत दिला. ते थोडे नाराज झाले; पण माझी टिप्पणी पाहून, नेमकं काय ते त्यांना कळलं.

जिल्हा दैनिकांमध्ये किंवा राज्य दैनिकांच्या लहान आवृत्त्यांमध्ये आता वाढदिवस, जयंत्या-मयंत्या, उद्घाटनं अशा विविध निमित्ताने लेख प्रसिद्ध होतात. अलीकडच्या काळात लेख प्रसिद्ध होण्याचा मोठा निकष म्हणजे तुम्ही तो इमेलवर पाठवला आहे की नाही, हा. त्यामुळे संपादन, तो संगणकावर चालविणे ह्याचा ताप वाचतो. मुद्रितशोधकानं एकदा पाहिल्यासारखं केलं की, तो 'जागा भरो' आंदोलनासाठी सज्ज!

एका मोठ्या दैनिकातले दोन अनुभव सांगतो -
१. ऐन वेळी गरज पडली, तर म्हणून तिथे काही लेख तयार असतं. कोणत्याही वेळी चालतील असे. कोणीही संपादन न करता ते संगणक कर्मचारी बडवून टाकत. जागेच्या उपलब्धतेनुसार त्यांचं नशीब उघडे. ह्यात गंमत अशी की, सहसा त्या लेखाचं संपादन झालेलं नसायचं. जागा असे ७०० शब्दांची आणि लेखाचा व्याप दीड-पावणेदोन हजार शब्दांचा! मग तो थेट पानावरच क्रूरपणे कापला जाई. असं कसाईकाम पाच-सहा वेळा केल्याचं तरी आठवतं.

२. सन २००८च्या जागतिक मंदीनंतर ह्या दैनिकानं खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला. पहिली कुऱ्हाड संपादकीय विभागावर. अर्धवेळ वार्ताहरांची संख्या कमी करण्यात आली. कार्यालयीन कर्मचाऱ्यांची कपातही झाली - त्यात प्रामुख्याने संगणेक ऑपरेटर होते. त्यानंतर ठरलं की, लेखनाला मानधन द्यायचं नाही. शक्यतो इमेलवर आलेले लेखच घ्यायचे. त्यामुळे संपादकीय सहकाऱ्यांमध्ये असा विनोद प्रचलित झाला की, तुम्ही काय लिहिताय ह्या ऐवजी संगणकावर लिहून पाठवताय की नाही, हे महत्त्वाचं!

माझ्या ह्या दीर्घ उत्तरानं तुमचं समाधान झालं की नाही, कुणास ठाऊक.

खूपच छान माहिती, बे-डर. तुमच्यामुळे ह्या प्रश्नाची दुसरी बाजूही वाचायला मिळाली.

Pages