लेखकाचे मानधन : कथा आणि व्यथा

Submitted by कुमार१ on 1 January, 2020 - 09:12

सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा !
.........

साहित्याच्या प्रांतात लेखक, संपादक, प्रकाशक आणि वाचक हे महत्वाचे घटक आहेत. मुळात एखादे साहित्य निर्माण होण्यासाठी लेखक हा मूलभूत स्त्रोत आहे. त्याने काही लिहिल्यावरच अन्य तीन घटकांचा प्रश्न उपस्थित होतो. लेखक स्वतःच्या प्रतिभेने लिहितो आणि मग ते लेखन लोकांनी वाचावे या आशेने निरनिराळ्या माध्यमांत प्रकाशित केले जाते. लेखन करताना लेखकाची बुद्धी आणि कष्ट खर्ची पडतात. त्याच्या लेखनातून वाचकांचे रंजन होते आणि त्यांना अन्य काही फायदेही होऊ शकतात. त्याचा मोबदला म्हणून लेखकाला काही मानधन मिळावे अशी प्रथा पडली. जे लेखक बाजारात यशस्वी ठरतात ते व्यावसायिक म्हणून गणले जातात. त्यांच्या वकुबानुसार ते यथायोग्य मानधन मिळवत राहतात. याउलट हौशी लेखकांचे असते. त्यांचा चरितार्थाचा अन्य उद्योग असतो आणि केवळ लेखनाच्या हौसेपोटी ते लिहीत असतात. त्यांना साहित्यविश्वात ‘नाव’ वगैरे मिळालेले नसले तरी त्यांचा ठराविक असा चाहता वाचकवर्ग असतो. असे लेखकही त्यांच्या परीने बुद्धी आणि कष्ट पणाला लावतात. अशा लेखकांना प्रस्थापित व्यावसायिक प्रकाशकांकडून मानधन मिळते का, हा या लेखाचा विषय आहे. त्याच बरोबर एकंदरीत लेखक-प्रकाशक यांच्यातील व्यवहारावर थोडा प्रकाश टाकेन.
या संदर्भात अनेक हौशी लेखकांचे भलेबुरे अनुभव मी जाणून घेतले आहेत. त्यातून प्रकाशकांचा अशा लेखकांकडे बघण्याचा दृष्टीकोन दिसून येतो. हे अनुभव वाचकांना समजावेत या उद्देशाने हा लेख लिहीत आहे. ते लिहिताना संबंधितांचा नामनिर्देश मी करणार नाही हे उघड आहे. या अनुभवांतून काही मानवी वृत्तीप्रवृत्तींचे दर्शन वाचकांना व्हावे इतकाच हेतू आहे. लेखाची व्याप्ती अर्थातच विविध छापील नियतकालिकांतील मराठी लेखनापुरती मर्यादित आहे.
………..

सुरवात करतो एका भूतपूर्व मासिकापासून. दोन दशकांहून अधिक काळ ते चालू होते आणि त्यात चांगल्या अभिरुचीचे साहित्य प्रकाशित झालेले आहे. त्याच्या प्रकाशकांचे धोरण खूप चांगले होते. ते प्रस्थापित लेखकांबरोबरच हौशी आणि नवोदितांचे देखील साहित्य स्वीकारत असत. त्यांची संपादकीय शिस्त वाखाणण्याजोगी होती. कुणीही लेखकाने त्यांना लेखन पाठविल्यानंतर एक महिन्याचे आत ते त्यासंबंधीचा निर्णय (स्वीकार/नकार) लेखकास लेखी कळवत. जर ते लेखन स्वीकारले गेले असेल तर त्याचे मानधन किती मिळेल याचा स्पष्ट उल्लेख त्या पत्रात असायचा. पण याही पुढे जाऊन ते अधिक काही लिहीत. तो मजकूर असा असायचा:

बौद्धिक श्रमांचे औद्योगिक जगातले मूल्य याहून कितीतरी जास्ती असते हे आम्ही जाणतो. परंतु, आमच्या आर्थिक मर्यादेत आम्ही इतकेच मानधन देऊ शकतो. तथापि आपणास ही रक्कम अपुरी वाटत असेल, तर तसे स्पष्ट कळवा. त्यावर आम्ही विचार करून आपणास निर्णय कळवू”.

अत्यंत पारदर्शक असा हा दृष्टीकोन लेखकांना नक्कीच सुखावत असे. पुढे तो मासिक अंक प्रकाशित झाल्यावर ते त्यातील सर्व लेखकांना मानधनाचा धनादेश, आभाराचे पत्र आणि अंकाच्या दोन प्रती कुरिअरने पाठवीत. ही सर्व प्रक्रिया त्या महिन्याची १ तारीख उजाडण्यापूर्वीच पूर्ण होत असे. म्हणजे वाचकाच्या हाती जर तो अंक १ तारखेस पडणार असेल, तर त्यापूर्वीच ते लेखकाला तृप्त करीत ! इतका सहृदय दृष्टीकोन बाळगणारे प्रकाशक विरळा असतात, हे हौशी लेखकांनी अनुभवलेले आहे. अशी सुरेख संपादकीय शिस्त असलेले हे मासिक कालौघात बंद पडले याचा खेद वाटतो.
.......

आता एका दिवाळी अंकाबद्दल लिहितो. याचे प्रकाशन फक्त वार्षिक असे आहे. ही मंडळी अनाहूत लेख स्वीकारतात. लेखकाला लेखस्वीकृतीबद्दल काही कळवत नाहीत. लेखकाने दिवाळीच्या दिवसांत वाट पाहत बसायचे ! काहीही उत्तर आले नाही तर लेख नाकारल्याचे समजून घ्यायचे. जर लेख स्वीकारला गेला असेल, तर तो अंक टपालाने लेखकास मिळतो. त्यासोबत संपादकांचे पत्र असते. त्यात स्पष्ट लिहिलेले असते, की हा अंक ना नफा ना तोटा तत्वावर प्रसिद्ध होतो. त्यामुळे ते लेखकास काहीही मानधन देऊ शकत नाहीत. या अंकात व्यापारी जाहिराती सहसा दिसत नाहीत; साहित्यविश्वाशी संबंधित लोकांच्या आर्थिक पाठबळावर हा अंक निघत असतो. त्यामुळे मानधन न देण्याची प्रामाणिक कबुली ही योग्य वाटते. फक्त हेच धोरण त्यातील प्रस्थापित लेखकांनाही लागू आहे की नाही, हे गुलदस्त्यात राहते.
.......
वरील दोन सभ्य अनुभवांच्या नंतर आता पाहूया एक अशिष्ट अनुभव. हे मासिक एका शिक्षणसंस्थेतर्फे चालवले जाते. ही संस्था तत्त्वनिष्ठ कडक शिस्तप्रिय मंडळींची आहे. त्या मासिकातील लेखन संस्कारप्रधान असते. एका हौशी लेखकाचा इथला अनुभव पाहू.

अन्य एका प्रथितयश मासिकात या लेखकाचा एक लेख प्रकाशित झालेला होता. तो खूप वाचकप्रिय ठरला. तो या मासिकाच्या संपादकांच्या वाचनात आला. तो आवडल्याने त्यांनी या लेखकाशी संपर्क साधला. त्यांनी त्याला त्यांच्या मासिकात लिहिण्याची फोनवरून विनंती केली. मानधनाचे बोलणे काही झाले नाही. लेखकही जरा हरखून गेल्याने भिडस्त राहिला. अर्थात ही त्या लेखकाकडून झालेली मोठी चूक ठरली, हे पुढे लक्षात येईल.

लेखकाने लेख पाठवला. काही दिवसांत त्याला फोनवरून स्वीकृती कळवण्यात आली आणि प्रकाशनाचा अंदाजे महिनाही सांगण्यात आला. यथावकाश अंक प्रकाशित झाला आणि तो लेखकास टपालाने मिळाला. सोबत वेगळे पत्रही होते. या लेखकाने मोठ्या उत्सुकतेने ते उघडले. त्यात त्यांनी मानधनाची अल्प रक्कम नमूद केली होती आणि ती जमा करण्यासाठी लेखकाच्या बँक खात्याची माहिती मागवली होती. लेखकाने ती कळवली. रक्कम किरकोळ असल्याने निदान त्याचा धनादेश न पाठवून तो भरण्याची आपली हमाली तरी वाचली, असे लेखकाने समाधान करून घेतले. आता पुढचा किस्सा भारीच आहे. या घटनेला महिना उलटला तरी लेखकाच्या खात्यावर ती रक्कम काही जमा झालेली नव्हती. तरी तो शांत होता. अचानक एके दिवशी त्याला त्या मासिकाकडून पत्र आले. या पत्रात धनादेशासोबत “तुम्हाला *** इतके रुपये मानधन धनादेशाने देण्यात येत आहे“, असे वाक्य लिहिलेले होते आणि त्यातील रकमेचा आकडा (दिसत राहील असा) खोडून त्याच्या डोक्यावर कमी केलेल्या रकमेचा आकडा टाकला होता ! यावर लेखकाने कपाळावर हात मारला. आता त्याला या रकमेत शून्य रस होता. त्याने तो धनादेश सपशेल फाडून टाकला आणि त्या प्रकाशकास एक खरमरीत इ-मेल पाठवली. मानधनाचे बोलणे आगाऊ न केल्याची चूक त्याला महाग पडली होती आणि वर मनस्तापही झाला. आजच्या काळात अत्यल्प रक्कम आपल्याला कोणी धनादेशाने पाठविल्यास तो बँकेत भरून यायची हमाली खरोखर महाग पडते हे स्पष्ट आहे. शिस्तप्रिय म्हणवणाऱ्या या संस्थेकडून लेखकास मिळालेली ही वागणूक अशिष्ट आणि अजब होती. पत्रात खाडाखोड करून लेखनातील किमान सभ्याताही त्यांना पाळता आली नाही याचे सखेद आश्चर्य वाटते.
.........

पुढचा किस्सा एका दिवंगत नामवंत साहित्यिकाबाबत घडलेला आहे आणि तो मी एका पुस्तकात वाचलेला आहे. तो रोचक आणि चालू विषयाशी संबंधित असल्याने लिहितो.
हे लेखक त्यांच्या अजोड साहित्यकृतींमुळे तमाम मराठी वाचकांच्या हृदयात प्रेमाचे आणि आदराचे स्थान मिळवून बसले आहेत. एकदा एका दिवाळी अंकाचे संपादकांकडून त्यांना लेखासाठी विचारणा झाली. मग त्यांनी तो पाठवला. हे संपादक महोदय देखील नामांकित, साक्षेपी वगैरे. त्यांनी तो लेख ३-४ वेळा वाचला पण त्यांना काही तो अजिबात पटला नाही. लेखात सुधारणा वगैरे सुचवायचे काही त्यांना धाडस झाले नाही. मग त्यांनी तो लेख नाकारून या लेखकांना साभार परत पाठवला. पण गंमत पुढेच आहे. या परतीच्या लेखासोबत चक्क मानधनाचा धनादेश जोडलेला होता !! “सदर लेख आम्ही तुमच्याकडून मागवून तुम्हास कष्ट दिलेले आहेत. त्यामुळे आम्ही मानधन देणे लागतो, पण तुमचा लेख पसंत नसल्याने साभार परत करीत आहोत”, असा सुरेख मजकूर या पत्रात लिहिलेला होता. लेखकाचा यथोचित आदर केलेले यासारखे प्रसंग मराठी साहित्यविश्वात घडू शकतात, यावर क्षणभर खरेच विश्वास बसत नाही !
........

आता पाहूया एका लेखकाने प्रकाशकावर कशी कुरघोडी केली ते. हे लेखक बऱ्याच नियतकालिकांत लिहीत. एकदा एका दिवाळी अंकाच्या संपादकांनी या लेखकांना लेख मागितला. तो प्रकाशित केला आणि चांगले मानधनही दिले. तो लेख बऱ्यापैकी गाजला. एक वर्षाने त्या मंडळींनी यांचेकडे पुन्हा लेख मागितला. पण या खेपेस प्रकाशकांनी लेखकास चाचरत विचारले की मानधन जरा कमी घ्याल का? आता यावर लेखक बरे ऐकतील? त्यांनी सरळ सांगितले, “ लेख तुम्ही पुन्हा मागत आहात. तेव्हा मानधन कमी तर होणारच नाही, उलट याखेपेस ते वाढवले जावे !” प्रत्येक लेखकास असा आपल्या लेखनक्षमतेचा अभिमान जरूर असावा. अन्यथा लेखकांना ‘गृहीत’ धरण्याची प्रकाशकांची वृत्ती वाढीस लागते.
…………………………

आता एका दैनिकाचा अजब अनुभव. त्यांचेकडे अनाहूत लेखकांसाठी काही सदरे आहेत. त्यापैकी ‘अनुभव’ प्रकारातले एक सदर आहे. यात वाचक-लेखक दैनंदिन सामान्य जीवनातले सपक अनुभव लिहितात – जेमतेम ३०० शब्दांत. त्याला ते किरकोळ मानधन देतात. या दैनिकाच्या पुरवणीत निरनिराळ्या वारी विज्ञान, तंत्रज्ञान, समाजशास्त्र इत्यादी विषयांवर तज्ञांचे लेख येत असतात. हे अभ्यासपूर्ण लेख आकाराने पुरेसे मोठे असून ते संबंधित तज्ञांनी लिहिलेले असतात. पण या लेखांना मात्र अजिबात मानधन नसते. या सर्व तज्ञांनी लेखन ही समाजसेवा समजावी अशी या दैनिकाची अपेक्षा आहे !
..............

नियतकालिकांकडून लेखकांना दिले जाणारे मानधन हा एक संवेदनशील विषय आहे. याबाबतीत आढळणाऱ्या तऱ्हा आपण वर पाहिल्या. लेखकाला मानधनाची आगाऊ कल्पना देणे आणि त्याप्रमाणे नंतर खरोखर देणे, पूर्वकल्पना न देता एकदम अंकाबरोबर मानधन देणे, अथवा ते अजिबात न देणे असे सर्व प्रकार दिसतात. एकंदरीत पाहता मराठी साहित्यविश्वात मानधनाची रक्कम ही ‘मान’ अधिक व ‘धन’ कमी या प्रकारात मोडते ! किंबहुना आपल्या देशात हिंदी व इंग्लीश वगळता बहुतेक प्रादेशिक भाषांची हीच स्थिती असावी. जिथे मानधन दिले जात नाही तिथे प्रकाशकांनी लेखकाला भेट अंक पाठवला तरी अगदी धन्य वाटते. लेखन स्वीकारून अंकही नाही आणि मानधनाचे तर नावही नाही, असे देखील अनुभव काही लेखकांना आलेले आहेत.

या संस्थळावर लिहिणारे माझ्यासारखेच अन्य काही लेखक अन्यत्रही लिहीत असतात. त्यांनाही व्यावसायिक प्रकाशकांकडून असे काही अनुभव आलेले असणार. या अनुभवांची देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने हा लेख लिहीला आहे. संबंधित प्रतिसादांचे तसेच निव्वळ वाचकांच्या मतांचेही स्वागत आहे.
********************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"पैशाला पासरी" ओ, पारशी साहित्याला ओढू नका उगाच यात >>> Lol

बाकी अमितने भारी लिहीले आहे Happy उद्या असे काही झाले की 'बघा, अमितव यांनी तेव्हाच इशारा दिला होता' असे म्हणता येइल Happy

>>>प्रवीण टोकेकर यांचा एक सुंदर लेख>>> वाचला. आवडला.
>> उदा १२ अँग्री मेन किंवा 'एक रुका हुआ फैसला' यात किती व्यक्तीचित्रणाचे बारकावे आहेत, अंडरकरंटस आहेत. ते लिहायला लेखकच हवा.
नवीन Submitted by सामो on 16 May, 2023 - 02:37>>
+९९९

डिव्होर्स वाले एक बेतास बात, function at() { [native code] }इशय तकलादू, नॉट थॉट थ्रु उदाहरण होते जे की फक्त मुद्दा दामटायला वापरलेले. मूळ मुद्दा होता मानवी मनोव्यापारांची गुंतागुंत. असो!!

नोरा रॉबर्टस ने कित्येक पुस्तके लिहीली आहेत पण प्रत्येकात तिचा त्या त्या परिसराचा व, व्यवसायाचा बारीक अभ्यास दिसतो. खूप बारकावे, त्या त्या व्यवसायाच्या खूबी आणि त्यातून निर्माण होणारे बारीकसारीक प्रसंग - मला रोमॅन्स भागापेक्षा ते डिटेल्स फार आवडतात.

>>थोडे दिवस थांबा, मग कळेलच.<< +१
जनरेटिव एआय मॉडल करता हिस्टॉरिकल डेटा हवाच अशी कंडिशन नसते. इट कॅन स्पिटआउट रिझल्टंट सेट बेस्ड ऑन द मचुरिटि लेवल...

मानवी भावना फक्त देशी आंटी क्लबात गुंतागुंतीच्या. मूळ भावना ६ आणि त्याच्या ३४०० पर्यंत उपछटा. ह्या सगळ्याचा डेटा हल्ली सेल्फ हेल्प अ‍ॅप्स, मेडिटेशन अ‍ॅप्स ते मनोरूग्णांनी वापरायचे अ‍ॅप्स यामुळे उपलब्ध आहे. कशापद्धतीची व्यक्ती कशा भावना व्यक्त करते याचा अमाप डेटा उपलब्ध आहे. त्यामुळे ए आय लेखनास अडचण का ही ही नाही. नोरा रॉबर्ट्सला फॉल-पिको केंद्र चालवायला द्या. तिथे अजून ए आय नाही.

ना सी फडके हेअसल्या प्रकाशकान्ना धडा शिकवण्यासाठी व्ही पी पी ने कथा पाठवत . बाकी प्रिन्ट मिडिया मरू घातला आहे ही चान्गलीच गोष्ट आहे . त्यामुळे ह्या प्रकाशक मण्डलीचा माज उतरून भिकेला लागलेत ही स्वागतार्ह गोष्ट आहे.....
(आता ना सी फडके कोन होते आणि व्ही पी पी म्हणजे काय असले अज्ञान्मूलक प्रश्न इच्यारु नयेत . त्यासाठी इथले आदिपुरुष नन्द्या ७५ उर्फ झक्की या आदिमानवास विचारावे )

चांगले अनुभव

एका डिजिटल दिवाळी अंकासाठी त्यांनी लेख मागवले होते.
माँ पहिल्यांदाच असा लेख ( वेळेत, त्यांना अपेक्षित विषयावर) पाठवला होता. त्यामुळे त्यांनी तो स्वीकारला ह्यातच मला छान वाटले.
पण ३-४ महिन्यांनी त्यांचा निरोप आला, तुम्हाला लेखाचं मानधन द्यायचं आहे. दोनच दिवसात त्यांनी मानधन PayPal वर पाठवले.

तसच एका प्लॅटफॉर्म वर एक स्पर्धा होती.. एक दिवस त्यांचा पण निरोप आला तुम्हाला बक्षीस द्यायचे आहे तर डीटेल्स पाठवा. मला कल्पनाही नव्हती की पारितोषिक आहे.

अन्य काही platform/ संकेत स्वथअलांवरती तर ठराविक दिवशी पैसे तुमच्या account ला जमा होतात ( अगदी १ रू ते ****रू)

मला वाटतं ऑनलाईन लेखनात बरीच पारदर्शकता आहे..

एकेकाळचे रहस्यकथांचे बादशहा बाबुराव अर्नाळकर यांच्यावर लिहिलेला सुहास शिरवळकरांचा जुना लेख मध्यंतरी वाचला. त्यातील हा एक हृद्य किस्सा.
बाबुरावांच्या रहस्यकथा पूर्वीपासून रम्यकथा प्रकाशनचे वासुदेव मेहंदळे प्रकाशित करीत असत. कालौघात बाबुरावांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागली. तेव्हा त्यांची पुस्तके खपत नसल्यामुळे मेहंदळे यांनी ती छापणे बंद केले होते. तरीसुद्धा बाबुराव नव्या रहस्यकथांचे हस्तलिखित मेहंदळे यांचेकडे पाठवतच राहायचे.

मेहंदळे यांनी बाबुरावांना शब्द दिला होता, “जोपर्यंत तुम्ही लिहीत आहात आणि मी जिवंत आहे तोपर्यंत तुमचे सर्व लेखन मी विकत घेईन”.

त्यानुसार मेहंदळे त्यांचे हस्तलिखित स्वीकारायचे व बाबुरावांना मानधन पाठवायचे आणि पुस्तक मात्र अजिबात छापायचे नाहीत ! न खपणारे पुस्तक छापून स्वतःचा तोटा वाढवण्यापेक्षा बाबुरावांना दिलेले मानधन हाच फक्त आपला तोटा अशी त्यांची धारणा होती.

बाबुराव लोकप्रिय असताना त्यांनी रम्यकथा प्रकाशनाला धो धो पैसे मिळवून दिले होते. त्याचीच थोडी परतफेड एक प्रकारे मेहंदळे कृतज्ञतेने करत होते.

Pages