खमंग कुरकुरीत शेव

Submitted by मनीमोहोर on 31 October, 2021 - 05:08
Shev,  मराठी शेव
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दिवाळीच्या फराळामध्ये चकली ,करंजी, बेसन लाडू , चिवडा हे जरी मानाचे सरदार असले तरी चिवड्याची लज्जत आणखी वाढवणारी शेव ही आपले चिवड्या बरोबरचे अस्तित्व मानाने टिकवून आहे.

नुसती शेव जरी कमी खाल्ली जात असली तरी पोहे, उपमा, भेळ, चिवडा ह्या पदार्थाना शेव एक प्रकारची परिपूर्णता देते. त्या पदार्थांची लज्जत आणखी वाढवते.

जाडी, बारीक नायलॉन, तिखट, मसाला, प्लेन, लसूणी, भावनगरी असे अनेक प्रकार आहेत शेवेचे. कोणत्या पदार्था बरोबर कोणत्या प्रकारची शेव चांगली लागेल ह्याचे प्रत्येकाचे नुस्के ठरलेले ही असतात. जाड शेवेची चटपटीत शेवभाजी खान्देशात खूप प्रसिद्ध आहे.

अस जरी असलं तरी जनरली शेव कोणी घरी करत नाही. लागेल तसं पॅकेट विकतच आणलं जातं. परंतु दिवाळीच्या फराळाच्या ताटात इतर पदार्थां बरोबर घरी केलेल्या शेवेच फुल (कोणी ह्याला शेवेचा चवंगा ही म्हणतात ) फार शोभून दिसतं. फराळाच ताट भरल्या सारख ही दिसत ह्यामुळे.

शेव करणं चकल्या करण्या एवढं धोकादायक नाहीये. जनरली शेव करणाऱ्याला दगा नाही देणार. कुरकुरीत खमंग शेव कोणालाही सहज जमण्या सारखी आहे. घटक पदार्थ ही मोजकेच लागतात शेवेसाठी आणि होते ही खूप पटकन.

दर वर्षी दिवाळीत मी शेव घरीच करते. पितळी सोऱ्यात बारीक जाळी वापरून पाडलेली शेव खूप नाजूक सुंदर दिसते आणि चवीला ही खमंग, कुरकुरीत लागते.

अजून दोन दिवस आहेत दिवाळीला . तर तुम्ही ही करून बघा ह्या वर्षी बारीक शेव घरच्या घरी.

लागणारे साहित्य :
चार वाट्या बेसन ( चाळून घेतलेलं गुठळ्या नकोत )
2) तांदुळाचे पीठ अर्धी वाटी,
३) दोन टी स्पून ओवा वाटून तो अर्धी वाटी पाण्यात मिक्स करून ते पाणी गाळून घेणे , ह्या बरोवर तुम्ही थोडी लसूण ही वाटू शकता पण मी नाही घातलीय लसूण.
4) हिंग अर्धा चहाचा चमचा मीठ चवीनुसार, पाव चहाचा चमचा हळद आणि तेल.

क्रमवार पाककृती: 

कृती .

परातीत बेसन ,तांदुळाचे पीठ, मीठ, हिंग, हळद हे सगळं एकत्र करून घ्यावे. त्यात चार चहाचे चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे. ते मोहन सगळ्या पीठाला चांगले चोळून घ्यावे. ओवा गाळून घेतलेलं पाणी त्यात घालावे. नंतर गरजे प्रमाणे पाणी घालून पीठ भिजवावे. पीठ घट्ट नको थोडं सैलसर च असावे . हे पीठ दहा मिनिटं ठेवून द्यावे. चकलीच्या सोऱ्यात शेवेची बारीक जाळी घालून पीठ त्यात भरावे आणि गरम तेलात शेव पाडून शेव तळून घ्यावी.

वाढणी/प्रमाण: 
नाही सांगता येणार.
अधिक टिपा: 

1) बारीक जाळी वापरून शेव छान होते.
2) तेल फार गरम नको मध्यम गरम असावे . शेव घालताना गॅस मोठा व घालून झाली की गॅस मध्यम करावा.
3९ शेव पाडताना बाहेरून आत पडावी. कढईच्या मध्ये जास्त हिट लागते त्यामुळे तिथे शेवट शेव पाडावी.
3) शेव पटकन तळून होते. चकली सारखा शेव तळायला वेळ लागत नाही.
4) फार लालसर काढू नये ,रंग नंतर थोडा चढतो.
5) सोऱ्यात पीठ भरताना जाळी प्रत्येक वेळी धुवून पुसून घ्यावी.
6) ओवा वाटलेले पाणी गाळून घेणे मस्ट आहे. बारीक जाळीत न गाळलेला ओवा अडकून शेव तळणीत पडणार नाही म्हणून.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त शेव..
बरे झाले रेसिपी टाकली ते मला हवी होती. Happy

छान दिसतेय!
तांदळाच्या पिठाचे माहित नव्हते. सगळ्या टिपाही मस्त. भरलेले ताट बघून करायचा मोह होतोय.

धन्यवाद सर्वांना , शेव करणं खरंच सोपं आहे. करून बघा ह्या दिवाळी साठी. अजून दोन तीन दिवस आहेत. पटकन होणारी, आणि फेल प्रूफ रेसिपी आहे.

चुकून दोनदा पडला प्रतिसाद. फोटो फारच छान आहे म्हणून असेल! Lol>> वावे ☺️

फोटो एवढा मस्त, असं वाटतंय खाऊ नये अशीच राहू द्यावी शेव बघायला. >> मानव Happy

छानच झाली आहे शेव. शेवेचा एक घाणा त्याला चवंगा म्हण तात. असे अनेक चवंगे ह्या ताटात आहेत. ( देशस्थ शब्द) ओव्याच्या पाण्याची टिप भारीच आहे.

थॅंक्यु सगळ्यांना .

नशीब इथून उचलून खाता येत नाही, नाहीतर माझ्या नंतर वाचणाऱ्याना रिकामं ताट दिसलं असतं. अनु, Lol Lol Lol

हो अमा शेवेचा चवंगा म्हणतात , आम्ही शेवेच फुलं म्हणतो.

अहाहा, काय मस्त दिसतेय शेव, पटकन उचलून तोंडात टाकावे वाटतेय. ममो, तुम्ही सगळ्या गोष्टी इतक्या निगुतीने करता, मग ते स्वयंपाक असो की भरतकाम!

आमची सेम रेसिपी, ओव्याच्या ‌‌पाण्याच्या टिपेसकट.
आज करू जरा वेळाने. मोबाईलवरून फोटो हे मात्र अतिकिचकट काम आहे Uhoh

इतक्या सविस्तर कृतीबद्दल खूप धन्यवाद. .
या पद्धतीने आताच शेव केली. खूप छान झाली आहे.

( जमले तर फोटो टाकेन !!!
गेला तासभर तरी प्रयत्न केला पण नाही होत upload )

अप्रतिम. मला नाही येत करायला. एकदाच प्रयत्न केलेला, काय चुकलं काय माहीत, ती मऊ मऊ झालेली.
फोटोत पण कुरकुरीत पणा दिसतोय.
लाडवासाठी जे पीठ दळून आणतो तेच वापरलं तरी चालतं का की जाड ,बरीक पीठ असं काही लागतं
मला फार प्रिय आहे ही शेव. जुन्या आठवणी जाग्या झाल्या Happy

Pages