इकोनॉमिक्स शिकताना आम्हाला एक सूत्र अगदी सुरुवातीस लक्षात ठेवावे लागलेले; WANTS ARE UNLIMITED, MEANS ARE SCARCE . त्या फुलपाखरी दिवसांत अर्थातच ह्याचा प्रत्यय आला असला तरी, जाणीव व्हायला बराच काळ जावा लागला. एकीतून दुसरी इच्छा जन्म घेते, तिच्या पूर्ततेचे समाधान किती काळ मनास सुखवते, ते याच प्रतीक्षा यादी वर ठरत असावं बहुतेक!
त्यामुळे माझ्या बकेट लिस्ट चा प्रवास लिहायला बसलेय खरी; परंतु निवड करताना जरा गडबड उडेलशी वाटतंय. आणि हे, आत्मस्तुतीची छ्टा न येऊ देता लिहिणं अवघड आहे.
लहानपणी असलेल्या ज्या ' थोर्र' इच्छा, त्यांचा पयला नंबर लावूया . तर , ‘शाळा शाळा खेळणे’ हा अति प्रिय खेळ असल्याने ‘शिक्षिका बनणे’ हे स्वप्न होतं. म्हणजे स्वप्न वगैरे कळत नसण्याचं वय, पण आवडायचं म्हणून स्वप्न म्हणायचं . मात्र शाळेत न शिकवितादेखील ही इच्छा नंतर योगायोगानेच पुरी झाली...
त्यातील समाधानाचं शिंपण आजही मनबुद्धीस टवटवीत ठेवत आहे
आमच्या शाळेत २६ जानेवारीला ध्वजारोहण करण्याचा मान आदर्श विद्यार्थ्यास मिळत असे. सातवीत (प्राथमिक) व दहावीत (माध्यमिक) आदर्श विद्यार्थी निवडला जाई. या शिरस्त्यानुसार एका हुश्शार मुलग्यास सातवीत हा मान मिळाला. तेव्हा मनात वाटून गेलं की आपल्यालाही असे करायला मिळावे. तर माध्यमिक मध्ये मला ही इच्छा पुरी झालेली पाहायला मिळाली ! (अर्थात मला आदर्श विद्यार्थिनी बनून दाखवावं लागलं..यात अभ्यासात हुशार, मॉनिटर ची जबाबदारी , कलागुण प्रदर्शित करणं, स्पर्धांमध्ये सहभागी होणं शक्यतो अव्वल स्थान मिळवणं हे निकष होतेच शिवाय जास्तीत जास्त हजेरी, तक्ते बनवणं, वगैरे गोष्टी होत्या.)
पुढे, दूरदर्शनवर चमकणे ही इच्छा शाळेच्या प्रयत्नांमुळे पूर्ण झाली. आमच्या बाईंनी गाणं बसवून घेतलं होतं, ते सादर केलं. मला वाटतं शरण बिराजदार निर्मित किलबिल कार्यक्रम असावा तो.
याच दरम्यान सिनेकलाकारांना प्रत्यक्ष व जवळून बघण्याची इच्छा पूर्ण झाली. आईला गोरेगावच्या चित्रनगरीचं ऑडिट करण्यासाठी जावं लागलं, तेव्हा एकदा तिने आम्हाला प्रवेशपत्र मिळवून दिलं.. मला पहिल्यापासूनच चंदेरी जगाबद्दल उत्सुकता असल्याने मी अगदी खुशीत होते. आम्ही तेव्हा चिंटू म्हणजे ऋषी कपूर, राज किरण, प्रेम चोप्रा आणि काही कलाकारांचं चित्रीकरण पाहिलं. मज्जाच मज्जा वाटली. पण प्रणयदृश्य प्रत्यक्ष पाहताना जरा विचित्र वाटलं होतं. नायक आणि नायिका परस्परांजवळ येताना पार्श्वसंगीतही होतं. पण त्या दृश्याचे तीन चार वेळा रीटेक झाले. तेवढे वेळा ते दोघे एकदम अलिप्तपणे आपापल्या जागी जाऊन बसायचे. तेव्हाच्या माझ्या स्वप्नाळू स्वभावाला हे बघून जरा धक्का बसला होता. आज विचार केला तर त्या प्रतिक्रियेबद्दल गंमत वाटते..
ट्रकच्या पुढील भागात बसून प्रवास करणे’ ही बालीश इच्छा अनपेक्षितरीत्या पूर्ण झाली. माबोच्याच एका धाग्यावर हे लिहिलेही आहे. झालं असं, लेकाची मल्लखांब प्रात्यक्षिके चालत्या ट्रकमध्ये होणार होती. तेव्हा त्याच्या बरोबर (उगीचच उत्सुकतेमुळे, त्याच्या नाराजीकडे दुर्लक्ष करून, आईपणास शोभेलशा निर्ढावल्यापणाने) गेलेले. कार्यक्रम झाल्यावर त्यांच्या आणखी एका ग्रुपची मुले अचानक ह्याच ट्रकमध्ये चढ्ली . रात्रीचे साडेनऊ झाल्याने व तेव्हा ‘ओला’ वगैरे नसल्याने वाहनातून उतरण्याऐवजी सरांनी मला ट्रकच्या पुढ्च्या भागात बसायला सुचवले. मीही मागचा-पुढचा (ट्रकच्या नव्हे , परिणामांचा ) विचार न करता ते ऐकले. ड्रायव्हर नमुनेदार वगैरे असल्याने सहजच गाणी म्हणत होता; पण माझ्या मनात धास्तीचं एकच संगीत वाजत होतं ! तरी बरं, तेव्हा मी ‘क्राईम पेट्रोल’ प्रभृति ची प्रेक्षक नव्हते . शिवाय लेकाने बाबाजवळ ही चुगली केली तर, हेही एक कारण होतं (नवऱ्याला घाबरण्याचे ते दिवस .. फिदी) एकंदर हा प्रवास संस्मरणीय ठरला हे खरं !
नवीन लग्न झालेलं असताना, एकदा आमच्याकडे मावसजाऊ आली होती. तिचा नवरा बाहेर गावी जाणार म्हणून जावेने पराठे वगैरे बरेच कायकाय करून दिले. त्या काळात मी नवविवाहित नि आमचे ‘अहो’ एतद्देशीय असल्याने मला अप्रूप इ. वाट्लेले (ही ही ) ही काही बकेट लिस्टीतील इच्छा नव्हती (सुप्त) पण दैववशात तीही प्रत्यक्षात आली- जेव्हा ‘अहो’ देखील काही काळासाठी दूरदेशी गेले..
यांशिवाय, पोळीही करता येत नव्हती त्या काळात व वयात, कुणा एकीच्या उपहासात्मक बोलण्यास एक आव्हान म्हणून (?) स्वीकारून पुरणपोळी करायला शिकणे, घाबरत का होईना, हायवे वर स्कूटर चालवणे (स्पीड वगैरे अंदरकी बात) सूत्रसंचालन करणे, निवेदन करणे, अभिवाचन , फुटकळ जरी असले तरी ‘लेखन’ करणे, आपल्याच शाळेत पाहुणी व्याख्याती म्हणून विद्यार्थ्यांना पकवणे (काळावरील सूड), विमान प्रवास, सरकत्या जिन्यावरून न घाबरता जाणे { विचित्र वाटेल, पण मला हे बरेच दिवस जमत नव्हते. शेवटी तर लेकाने प्रोत्साहन (?)देण्यासाठी मला सांगितले होते की विमानतळावर साधे जिने नसतात, त्यामुळे तुला परदेशात जायचे असेल, तर हे शिकावेच लागेल. हे ऐकून मी काउन्सेलरकडे वगैरे जाण्याची मानसिक तयारी करू लागले होते}; वाचलेल्या पुस्तकाबाबत इतरांना सांगणे (हे माबोमुळे शक्य झाले), कंपोस्टिंग (माबो –वावे ) इ. अनेक गोष्टी कधी सहज तर कधी प्रयत्नपूर्वक साधता आल्या !
आता मनाच्या कडेकडेने वावरत असलेल्या ,पण जीवनातील लहानमोठ्या हिंदोळ्यांतही चिवटपणे तग धरलेल्या इच्छेकडे वळते..
काही खाजगी वा कौटुंबिक कारणांमुळे शिक्षणास साजेसे व सन्मानाचे कार्यक्षेत्र सुरुवातीच्या काळात निवडता आले नव्हते. याची माझ्याहून अधिक खंत आईस वाट्त असे. कारण शालेय व महविद्यालयीन कारकीर्दीकडे ती डोळेझाक करू शकत नव्हती. तसे ती बोलून दाखवत नसली तरी मला प्रसंगोपात्त क्वचित ते जाणवत असे. मलाही मग अपराधी वाटत असे की आपल्या आईला सामाजिक जीवनात गौरवास्पद असे आपण काही करू शकलो नाही.. तीनेक वर्षांपूर्वी मात्र परमेश्वरकृपेने हा योग आला ! मला एका जाहीर व्याख्यानाचे निमंत्रण आले. हे काही प्रथम घडत नव्हते; पण निमंत्रक ‘म.सा.प.’ असल्याने व्यवस्थित कार्यक्रमपत्रिका, बॅनर असे सगळे, नि स्थळ होते, ते आई नियमितपणे जेथे देवदर्शनास जायची त्या मंदिराचे सभागृह ! अर्थात त्यामुळे तिच्या सखीपरिवारात याची बातमी, चर्चा , उत्सुकता असा साग्रसंगीत सोहळा पार पडला ! व्याख्यानाच्या विषयात गम्य वा रस नसलेल्या तिच्या मैत्रिणीही , गॅदरिंगमध्ये प्रोत्साहनासाठी जातात तशा श्रवणास आल्या !( तेवढाच हॉल भरण्यास हातभार फिदी !)
कार्यक्रमानंतरही काही दिवस भोवतालच्या परिचित अपरिचित वर्तुळात आईला याबाबत विचारणा होत राहिली आणि तिच्या चेहर्यावरील माझ्याबाबतचा अभिमान व आनंद यांची कल्पना करून माझ्या मनातील खंत अलगदपणे विरून गेली !
अजूनही ( उगाचच ‘बरसात आहे’ टाईप करायला जात होते!) उण्या गोष्टी – पोहायला शिकणे,चार चाकी (कार) चालवायला शिकणे, अनारसे करणे, केस कुरळे करणे( पक्षी - माधुरीचे ह.आ.है.कौ. मध्ये,साजनमध्ये बघितल्यापासून), तसेच , पैसे पर्सच्या खणात न ठेवता, जुन्या हिंदी सिनेमातील नट्यांप्रमाणे चकचकीत सोनेरी पर्समधून थेट पैशांची चळतच बाहेर काढून बिल वगैरे भरणे, ( आमची जमात म्हणजे शोभत असो वा नसो ,बहुगुणी वा बहुखणी पर्स घेऊनच बाहेर जाणारी !),( सिनेमाच्या प्रभावामुळे) एकदा तरी काही धक्कादायक बातमी ऐकून किंवा संताप आल्यावर हातातील काचेचे कपबशा किंवा काहीतरी हातांतून खाली पाडून फोडणे(अति वाटतं पण करायला आवडेल) अर्थात फुटक्या काचा वगैरे जशी ती नटी गोळा करत नाही तशीच मीही करणार नाही.. इ. काहीबाही..
गांभीर्याने दखल घेण्याजोगे स्वप्न म्हणजे कैलास मानस सरोवर यात्रा करणे, शिवथरघळीच्या वरील झऱ्याजवळ बसून काही काळ चिंतन करणं, इ. कधीतरी नक्की पूर्ण होईल.. असे काही बाकी असले तरी
एकंदरीत पूर्ततेचे पारडे अधिक झुकलेले आहे, हेही खरेच !
............................................................................................................................................................. ....................... .................... ...........
माझ्या बकेट लिस्ट्चा प्रवास – प्राचीन
Submitted by प्राचीन on 15 September, 2021 - 10:56
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुरेख
सुरेख
प्रामाणिक आणि सरळ साधं लिहिलं आहेस
आवडलं
धमाल आहे बकेट लिस्ट
धमाल आहे बकेट लिस्ट
माझ्या बकेट लिस्ट मध्ये आयलायनर, आयशॅडो सहीत स्वतःचा पूर्ण मेकअप स्वतः करणे(मी आय लायनर लावला की एका डोळ्याचा मोठा दुसऱ्याचा लहान होतो, मग दुसऱ्याचा मोठा केला की माझा कुंफु पांडा होतो आणि डोळे खसाखसा धुवून टाकते.तो स्केचपेन सारखा लायनर पण आणलाय सोपं व्हायला), कधीतरी एकदम झटॅक निळे हायलाईट केसात करणे इत्यादी उथळ इच्छा आहेत
मस्त लिहीलेय
मस्त लिहीलेय
मस्तच लिहीलयस
मस्तच लिहीलयस
>>>>>>तिच्या चेहर्यावरील
>>>>>>तिच्या चेहर्यावरील माझ्याबाबतचा अभिमान व आनंद यांची कल्पना करून माझ्या मनातील खंत अलगदपणे विरून गेली !
वाह!!!
छान लिहीले आहेस.
ट्रकची रिस्क भारी गं.
छानच.
छानच.
मजेदार लिहिलंय. आवडली लिस्ट!
मजेदार लिहिलंय. आवडली लिस्ट!
छान लिहीले आहे.
छान लिहीले आहे.