आठवणींचा ठेवा ...आराम खुर्ची

Submitted by मनीमोहोर on 16 August, 2021 - 07:29

आठवणींचा ठेवा ...आराम खुर्ची

मागच्या आठवड्यात सोशल मीडियावर मैत्रिणीच्या पिकनिकचे फोटो बघत होते. लोकेशन सुंदर होतं. खोलीची छानशी गॅलरी आणि गॅलरीतून समोर दिसणारी हिरवीगार टेकडी, त्यावरून वहाणारे छोटे छोटे झरे, ढगांमधून सूर्य हळूच डोकावत असल्याने हिरवळीवर पडलेलं कोवळं सोनेरी ऊन ... फ्रेम अप्रतिम होती होती. पण माझं लक्ष वेधून घेतलं ते गॅलरीतल्या आराम खुर्चीने, जिने मला कमीत कमी पन्नास वर्षे तरी मागे नेलं.

आमच्या लहानपणी घरात सोफे वैगेरे नसतंच. मोठया हाताच्या लाकडी खुर्च्या, घडवंच्या, लाकडी बाकं किंवा मग सरळ जमिनीवर सतरंजी घातलेली असे. जरा सधन घरात गादी लोड तक्क्यांची बैठक असे. आमच्या घरात मात्र वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे सहज हलवता येणाऱ्या, वजनाला हलक्या, आणि वेळ आली तर घडी करून ठेवता येणाऱ्या आणि तरी ही नाव सार्थ करून भरपूर आराम देणाऱ्या अश्या आराम खुर्च्याच होत्या बैठकीच्या खोलीत.

ह्या आराम खुर्च्या हल्ली फार पहायला मिळत नाहीत म्हणून सांगते. ह्यात लाकडाच्या अंदाजे दोन इंच रुंदीच्या दोन चौकटी एका स्क्रुने थोड्याश्या सैल अश्या फिक्स केलेल्या असतात ज्यामुळे त्या खुर्च्या फोल्ड होऊ शकतात. खुर्ची उघडली की खालची चौकट जमिनीवर राहते आणि वरच्या चौकटीत वर खाली लाकडी दांड्या च्या आधारे बसवलेल्या जाड कापडाच्या झोळी सारख्या आकारत आपल्याला मस्त बसता येतं. त्यांची कापडं अगदी टिपिकलच असत. किरमिजी,हिरवा रंग आणि त्यावर पांढरे पट्टे हेच असायचं डिझाईन.

कापडाच्या लांबीवर खुर्चीचा झोल अवलंबून असतो. लांबी कमी केली की खुर्चीत ताठ बसता येत जे मोठ्या माणसाना जास्त करून आवडतं. त्यामुळे आमच्याकडे तश्या ताठ बसता येईल अश्या खुर्च्याच जास्त होत्या. खूप झोळ असणारी खुर्ची एखाद दुसरीच असे त्यामुळे त्यात कोण बसणार ह्या वरून आम्हा भांवडात भांडणं ही होत असत.

दिवाळी, गणपती, किंवा कोणी पाव्हणे येणार असतील तर ती कापडं धुतली जात . त्या दिवशी आम्हाला खूपच संभाळून वागावं लागे कारण खुर्चीच्या दांड्या आईला सहज मिळतील अश्या असत. दुपारी टाइमपास म्हणून खुर्चीची दांडी हळूच कोणाला ही न समजेल अशी काढून ठेवणे आणि कोणी पोरगं बसायला गेलं की कसं आपटलं म्हणून टर उडवणे वैगेरे प्रकार ही आम्ही करत असू. अर्थात मुला ऐवजी कोणी मोठं बसलं तर मात्र आमची धडगत नसे. त्या लाकडी दांडीचा प्रसाद चुकवणं जवळ जवळ अशक्यच होत असे. आणि वरती " काय ही अघोरी चेष्टा , जरा नीट वागा " असं काहीतरी आईच बौद्धिक ही ऐकावं लागे ते निराळच.

माझ्या लहानपणीच्या अनेक रम्य आठवणी ह्या आराम खुर्चीशी निगडित आहेत. गोष्टींची पुस्तकं वाचणे, अभ्यास करणे, दुपारी रेडिओवर खुर्चीत झुलत झुलत गाणी ऐकणे, दाणे, चिवडा असा खाऊ खाणे , पावसाळ्यात गॅलरीतल्या खुर्चीत बसून आकाशातले ढग बघणे, पावसाच्या पाण्याचे तुषार अंगावर घेत , तल्लीन होऊन पाऊस, पागोळ्या बघणे अश्या अनेक गोष्टींसाठी आराम खुर्चीच लागत असे मला. आमच्या गॅलरीत एक खूप मोठा मोगऱ्याचा वेल होता. उन्हाळ्यातल्या संध्याकाळी खुर्चीत बसून संधीप्रकाशात फुलणाऱ्या कळ्यांकडे एक टक पहात बसणे आणि कळी उमलली की तो सुवास मनात साठवून घेणे ह्या आठवणीने तर आज ही मला उत्साहित वाटत.

काळ पुढे सरकत होता. उच्च शिक्षणासाठी आणि पुढे नोकरीच्या निमित्ताने आम्ही शहरात आलो. तिथे जागा मर्यादित म्हणून आराम खुर्च्या ठेवणं अडचणीचं आणि आउट डेटेड वाटू लागलं. आमच्या ही नकळत फोल्डींग च्या लोखंडी खुर्च्या, दिवाण, सोफे ह्यांनी दिवाणखान्यात कधी एन्ट्री घेतली आणि आमच्या आवडत्या आरामखुर्च्या अंग मोडून कधी माळ्यावर जाऊन बसल्या ते आम्हाला ही कळलं नाही.

कोकणात ही आमच्याकडे खळ्यात मांडव पडला की आजच्या प्लॅस्टिकच्या जमान्यात ही एका रांगेत अश्याच साताठ आरामखुर्च्याच ठेवलेल्या असतात बसण्यासाठी. मात्र त्या हाफ आराम खुर्च्या म्हणतात तश्या आहेत आणि त्यांना टेकण्यासाठी हात आहेत. गंमत म्हणजे कोणती खुर्ची कोणाची हे ही साधारण ठरलेलं असत. मला एकदम टोकाची , कमळाजवळची जागा आवडते. खुर्चीत बसलं की मंद वास येत राहतो कमळाचा.

आमची मनी ही कधीतरी अंगाचं मुटकुळं करून खुर्चीत देते ताणून मस्तपैकी. ती खुर्चीत झोपली की मोतीचं डोकं फिरत तीच का खुर्चीत झोपलीय म्हणून. बसल्या जागी गुरकावत रहातो तिच्यावर. अर्थात तिच्यावर ढिम्म परिणाम होत नाही. ती मस्त झोप काढते खुर्चीत. असो. मी जेव्हा लग्न होऊन पहिल्यांदा कोकणात गेले तेव्हा खळ्यातील आरामखुर्च्या बघून ज्या घरात आपल्या माहेर सारख्या आरामखुर्च्या आहेत त्या घरात आपलं नक्की जमेल ह्या विचाराने एकदम आश्वस्त वाटलं होतं मला.

आरामखुर्चीत बसून पुन्हा ते सुख अनुभवण्याच्या विचाराचं सध्या मनावर भलतंच गारुड आहे. त्यामुळे ती आरामखुर्ची आता लवकरच माळ्यावरून खाली येईल, तिची साफसफाई होऊन तिला नवीन कापड ही घातलं जाईल. आमच्या गॅलरीत ती विराजमान होईल. तिच्यात बसून कॉफी पिताना , बाहेरची झाडं पानं बघताना मी पुन्हा एकदा लहान होईन. तेव्हा दिसायचं तसं जग पुन्हा मला सुंदर दिसायला लागेल. जगण्याची नवी उमेद मिळेल...

ही आमची आरामखुर्ची , नवीन कापड घालून सजली आहे. पॉलिश करून आणायचा विचार करतेय.

20210908_073040.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच आठवणी. आमच्याकडेही अशा दोन आरामखुर्च्या होत्या. त्यातली एक जास्त आरामदायी होती.
दांडी काढून बसणाऱ्याला आपटवण्याचे उद्योग आम्हीही क्वचित केलेले आहेत. दुसऱ्या खुर्चीतून उठताना जर नीट काळजी घेतली नाही तर ती खुर्ची फटकन उलटायची. त्यामुळे पाहुण्यांना आम्ही आधीच वॉर्निंग द्यायचो Happy

मस्त लिहिलंत. आमच्या घरी देखिल अशी एक आरामखुर्ची होती. तिला करवंदी रंगाचं कापड अन त्यावर पांढर्‍या रंगाच्या पट्ट्यांत एक काळा पट्टा अशा दोन रेघा होत्या. ती लोखंडी खुर्ची आता गंजून पुर्णपणे खराब झाली. पण जोवर ती घरात होती तोवर मस्त वाटायचं.

छान आठवणी.
आमच्या घरी लोखंडी पाईप ने बनवलेली आराम खुर्ची होती. पण एकदम दणकट, जवळपास पस्तीस वर्षे होती. नंतर कुठे गेली कशी गेली आठवत नाही, पण खराब झाली नव्हती.
त्याच्यापण अशाच आठवणी आहेत.

माझ्या वडिलांना रात्रभर झोप लागत नसे. ते त्यांच्या आरामखुर्चीतच बसून डुलक्या घेत असत हे आठवलं तुमच्या या लेखामुळे! नेहमी प्रमाणेच सुंदर लिखाण!

छान आठवणी.
यात 2 प्रकार होते.एक लाउंज चेअर सारखी पूर्ण आडवं होता येईल अशी आणि दुसरी हात वाली, आरामात पण सोफा च्या खुर्ची सारखं बसता येईल अशी.
स्पेसमॅक्स सोल्युशन्स वगैरे चे हल्लीचे युट्युब व्हिडीओ पाहिले तर तो फोल्डिंग टेबल खुरच्यांचा काळ लवकरच परत येईल असे वाटते.(आता कोणीतरी मला बॅटरी संपत आली सांगेल, हो आलीय, आता जाते चार्जिंग ला लावायला Happy ).
Screenshot_2021-08-17-14-03-01-101_in.amazon.mShop_.android.shopping.jpg

अशा खुर्च्या पण होत्या आमच्या घरी. हात ठेवायला डबल बॅरल बंदुकीसारख्या दोन नळ्या होत्या दोन बाजूंनी. त्या नळ्यांना पुढे प्लास्टिकची टोपणं असायची जी बऱ्याच वेळा दुसरीकडेच कुठेतरी पडलेली असायची. या पट्ट्या विकतही मिळायच्या. एखादी पट्टी फाटली तर ( मधल्या दांडीशी हमखास फाटायची) नवीन पट्टी कापून स्क्रू पिळून बसवायची.

अनु, वरची आरामखुर्ची प्रकारात नाही मोडत. आरामदायक असली तरी. या खुर्च्या मी हैद्राबादला आलो तेव्हा घेतल्या होत्या आई आणि बाबांसाठी एकेक, दोघांनी भांडू नये म्हणुन Wink

हो
मला त्या जुन्या नायलॉन पट्टी वाल्या मिळाल्याचं नाही.
म्हणून ही टाकली.
ही खूप स्टीफ असेल बसायला.

यावरून आठवलं, प्लॅस्टिक च्या निलकमल किंवा कोणत्या तरी कंपनी च्या आरामखुर्ची सारख्या खुर्च्या मिळतात त्या 2 आणल्या होत्या, आल्या गेल्या सिनियर सिटीझन्स ना बसायला.पण त्यात बसायला कोणालाच आवडले नाही, उठायला जास्त जोर लावावा लागतो आणि कठीण होते म्हणून.
Screenshot_2021-08-17-16-01-45-639_in.amazon.mShop_.android.shopping.jpg

छान लिहिल आहे हेमाताई. पुर्वी प्रत्येक घरात असायचीच दांडीवाली आराम खूर्ची. आणि त्याचे कापड पट्टेवाले असायचे. आम्हीही दांडी काढून पाडण्याची मस्ती केली आणि अनुभवली आहे. आता घरात आराम खुर्च्या आहेत पण त्या प्लास्टीकच्या. त्याची झोळी होत नाही पण त्यामुळे काही पाळण्यासारखी मज्जा नाही.

मस्त! नेहमीप्रमाणेच Happy

आरामखुर्ची माझ्याही बालपणीच्या आठवणींचा हिस्सा. पण अगदी धूसर आठवावे.
मुलांबाबतही सेम. गेले चार वर्षे ज्या भाड्याच्या घरात राहत होतो तिथे मालकाची आरामखुर्ची होती. खेळायला, टीव्ही बघायला, आराम करायला.. सर्वांची तीच फेव्हरेट, बायकोच्या बहिणीही संध्याकाळी घरी यायच्या तेव्हा तीच पकडायच्या. ऑफिसचा शीण निघून जायला उत्तम.

लाकूड आणि कपड्याची होती. नवीन घरातही तशी घ्यायचा विचार आहे. पण सेम तशीच मिळत नाहीये. सध्या फोनमध्ये फोटो नाहीयेत तिचे. पण फेसबूकवर हे सापडले. खालून गोलाकार रोल होणारी आहे. कोणाला याच कॉम्बिनेशनची ऑनलाईन माहीत असेल तर जरूर सांगा.

IMG_20210817_170202.jpgIMG_20210817_154606.jpg

तुमचे लेख वाचले की नॉस्टॅल्जिया वाढतो. ह्या आधीचे ही सर्व लेख खूप सुंदर. लिहीत रहा.

ही लाकडी आराम खुर्ची नुकतीच माझ्या घरी आणलेय. माझी माऊ फुरफुर करत खुशाल बसून झोके घेते. कोणाची हिम्मत नाही तिला खाली उतरून ठेवायची, नाहीतर अक्ख घर डोक्यावर. मुख्य म्हणजे ही खुर्ची लाकडाची आहे आणि खाली कापडी गादी आहे. खूप दिवस हवी तशी सापडत नव्हती. काही महिन्यापूर्वीच पार्ल्याला मिळाली.

IMG_20210817_211525.jpg

मस्त फोटो, ऋन्मेष अन सिद्धी!

छान लेख.
माझ्या लहानपणी पण होती अशी खुर्ची.

सिध्दी फोटो ग्गोड.
ऋ. मुलाचा फोटो पण क्यूट एकदम.

मृ ,धन्यवाद

ऋ. मुलाचा फोटो पण क्यूट एकदम. >> तो फोटो ऋ च्या मुलाचा आहे का , अरे ,माझा समज झाला फेसबुकवर just खुर्ची साठी कोणाचा तरी घेतलाय. ऋ, गोड आहे तुझा मुलगा ही

सिद्धी मस्त फोटो, मुलीचाही आणि खुर्चीचाही Happy
बाई दवे ती खुर्ची ऊलटी पाडूनही छान कसरतीचे खेळ खेळता येतात. आमच्या दोन्ही पोरांनी फार धटिंगणासारखे वापरले तिला. पण काही झाली नाही ईतकी मजबूत होती.

तो फोटो ऋ च्या मुलाचा आहे का >> छे छे.. नाही नाही ............ मुलीचा आहे Proud

अतिशय सुंदर लेख....गतकालविव्हल करणारा...

दोन्ही लेकरांचे फोटो - क्यूटच ...

तो फोटो ऋ च्या मुलाचा आहे का >> छे छे.. नाही नाही ............ मुलीचा आहे >☺️ ओके ओके.

शशांक , प्रतिसदा बद्दल धन्यवाद.

जि, amezon वर वैगेरे आहेत , बघ मिळून जाईल तुला हवी तशी एखाद वेळी.

अगदी साध्या आणि क्षुल्लक वस्तूंच्याही आठवणीने स्मरणरंजकता आणि स्मरणविव्हलता येते, त्यावर उत्तम लेखन होऊ शकते हे तुमच्या लिखाणातून नेहमी दिसते.
आरामखुर्ची आणि झोपाळ्याच्या अनेक आठवणी आहेत. एकदा एक धिप्पाड, उंच निंच आणि अत्यंत प्रतिष्ठेच्या पदावरील व्यक्ती घरी यायची होती. तिला आरामखुर्ची आवडत असे म्हणून खुर्चीचे कापड धुवून वाळवून ताजे ताजे असे चौकटीत अडकवून ठेवले होते. वरची दांडी उभ्या उभ्या लावता येते म्हणून ती पटकन लावली गेली. खालची लावायची राहिली. थोड्या वेळाने त्या व्यक्तीचे आगमन झाले आणि आल्या आल्या त्यांनी खुर्चीकडे धाव घेतली. आणि जे व्हायचे तेच झाले. मोठ्यांनी हसू कसे बसे दाबले. बायका आत पळाल्या. लहान मुले मनसोक्त हसली. नंतर मात्र हसता हसताच, पण चांगलेच पोस्ट मॉर्टम झाले.

Pages