वृक्षवल्ली अम्हा सोयरे वनचरे।
पक्षीही सुस्वरें आळविती।। - संत तुकाराम
आपण गेल्या काही भागांत गोड्या पाण्याच्या परिसंस्था - नदी आणि पाणथळ जागा याबद्दल माहिती घेतली. आता या पुढच्या काही भागात आपण जंगल या परिसंस्थेविषयी केतकीशी गप्पा मारणार आहोत. महाराष्ट्राच्या भागात आपण पाहिलं की इथली मुख्य परिसंस्था ही विविध प्रकारची जंगले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला जंगलांविषयी थोडी तरी माहिती हवीच!
जिज्ञासा: तर आपण सगळ्यात सोप्या प्रश्नाने सुरुवात करूयात. जंगल म्हणजे काय? आणि महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची जंगल पाहायला मिळतात?
केतकी: जंगलाची व्याख्या अशी आहे - अशी जागा जिथे वृक्षांचा दाट समूह असतो. आता यातल्या प्रत्येक शब्दाला महत्त्व आहे. वृक्षांचा म्हणजे ज्यांच्यामध्ये लाकडी (woody) भाग आहे अश्या वनस्पतींचा प्रकार, दाट या शब्दाला पण अर्थ आहे कारण नुसते वृक्ष बागेतही असतात आणि ते एका विशिष्ट अंतरावर देखील असतात पण त्यांची सावली एकमेकांमध्ये मिसळून जातेच असं नाही आणि समूह म्हणजे अर्थात झाडांची संख्या. पण ही पुस्तकी व्याख्या झाली. जर जंगल म्हणजे काय हे समजून घ्यायचं असेल तर माझ्या अत्यंत लाडक्या अशा महाजन सरांनी केलेली फॉरेस्ट (FOREST) या इंग्रजी शब्दाची जी फोड किंवा लॉन्ग फॉर्म सांगितला आहे तोच मी तुला सांगते.
आता F stands for flora and fauna म्हणजे कुठल्याही जंगलात विविध झाडं आणि प्राणी असतात. जंगल या दोन्ही गोष्टी मिळून बनतं. फक्त झाडेच असतील तर ते जंगल नाही. पण तसं पाहिलं तर झाडं आणि प्राणी पक्षी एखाद्या घरात किंवा प्राणिसंग्रहालयात पण असतात. मग जंगलात अजून काय असतं तर
Organization (O) - organization म्हणजे काय तर जंगलात प्रत्येक झाडाची रचना ही ठराविक असते. म्हणजे जरी आपण जंगलात हिंडताना आपल्याला झाडांची रचना - composition रँडम आहे असं वाटलं तरी तसं ते नसतं. ते ठराविक असतं. जंगलाच्या प्रकारानुसार ते बदलतं. यातलं एक प्रकारचं organization आपण बघितलं आहे की जंगलातली झाडं ही तिथल्या पाऊसमानाप्रमाणे असतात. उदाहरणार्थ पानगळी जंगल हे सदाहरित जंगलापेक्षा वेगळं असतं. जरी काही जाती सारख्या असल्या तरी काही युनिक जाती प्रत्येक जंगलात असतात ज्या हॅबिटॅट स्पेसिफिक असतात. कुठल्या जाती एकत्र एकत्र चांगल्या वाढतात हे सांगणारं phytosociology नावाचं शास्त्र आहे.
आता पुढचा R stands for regeneration म्हणजे पुनरुज्जीवनाची क्षमता. यावरती जंगलाचं भवितव्य पूर्णपणे अवलंबून असतं. जंगलात हिंडताना जंगलाच्या जमिनीलगत आपल्याला खूप सारी रोपं दिसली पाहिजेत. आणि ही रोपं सुरवातीला म्हणजे अंकुरल्या अंकुरल्या शेकडो हजारो संख्येत असतात. आणि वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर हळू हळू कमी होत जातात. पण हे सगळे टप्पे असतील तर आपण म्हणू शकतो की या जंगलाला काहीतरी भवितव्य आहे. दुर्दैवाने बऱ्याचशा जंगलांमध्ये असं चित्र दिसतं की फक्त मोठे वृक्ष आहेत आणि खाली जंगलाच्या जमिनीवर कोणतीही रोपं नाहीत. उद्या जेव्हा हे मोठे वृक्ष पडतील, मृत होतील तेव्हा त्यांची जागा घ्यायला झाडांची नवीन पिढी तयार होताना दिसत नाही.
पुढचं अक्षर आहे E which stands for energy flow अर्थात ऊर्जेचा प्रवाह जो सूर्यापासून सुरु होतो आणि जंगलातल्या प्रत्येक जीवापर्यंत पोहोचतो. जीवो जीवस्य जीवनं म्हणतात ते खरंच आहे. एका जीवाकडून पुढच्या जीवाकडे ऊर्जा संक्रमित होत जाते. सूर्य हा ऊर्जेचा एकमेव स्रोत आहे म्हणून हे सगळं जग चालू आहे खरंतर! या ऊर्जेच्या linear प्रवाहाशिवाय कुठलीही इकोसिस्टिम काम करू शकत नाही.
पुढचा S stands for stratification. जंगलात आपल्याला वेगवेगळे थर दिसतात आणि प्रत्येक थरात विविध युनिक गोष्टी चालतात. सगळ्यात वरचा थर असतो तो उंच झाडांच्या शेंड्यांचा, त्या खालोखाल मध्यम उंचीच्या झाडांची सावली (canopy) असते, मग त्याखाली छोटी झाडे, झुडुपे असतात आणि मग जंगलाच्या जमिनीलगत मगाशी आपण जिथे regeneration होते म्हणालो तो थर ज्याला forest understorey असं म्हणतात तो असतो. आता हे थर का महत्त्वाचे तर या प्रत्येक थराशी प्राण्यांचे काही विशीष्ट गट जोडलेले दिसतात. ते आता आपण एक एक करून बघूया.
जो सर्वात खालचा पालापाचोळ्याचा थर असतो ती जमीन कोण वापरतं? मोठे सस्तन प्राणी तर ही जमीन वापरतातच म्हणजे वाघ येऊन झाडाच्या सावलीत बसेल, हरणं पण सावलीला येतील, तिथे पडलेली फळंबिळं खातील. पण ही understorey अतिशय महत्त्वाची आहे कारण ही मातीच्या सगळ्यात वरच्या थराला पोषकद्रव्य पुरवते. या थरात पडलेला पालापाचोळा किंवा इतर जैविक पदार्थ याचं decomposers म्हणजे सूक्ष्मजीव (बॅक्टेरिया, बुरशी इत्यादी) यांच्या मदतीने विघटन होत असतं आणि त्यामुळे खालच्या मातीत ही सारी पोषकद्रव्य पुन्हा मिसळली जातात. या थरात अनेक कीटक, अपृष्ठवंशीय (invertebrates) म्हणजे गांडुळासारखे प्राणी हे ही आढळतात. याशिवाय बिळात राहणारे, सरपटणारे असे प्राणी देखील या खालच्या थरात आपल्याला दिसतात.
याच्या एक वरचा थर जो झाडांच्या बुंध्यांचा आणि छोट्या उंचीच्या झाडाझुडुपांचा असतो तो वापरणारे वेगळे प्राणी पक्षी असतात. प्रत्येक झाडाच्या सालीवर, त्या सालीच्या प्रकाराप्रमाणे आपल्याला वेगवेगळे कीटक दिसतात. शिवाय झाडाच्या बुंध्यावर ढोल्या असतात त्यात घुबडं राहतात. सुतार पक्षी यात आपली स्वतःची ढोली करतो.
याच्या वरची जी मधली canopy असते तिथे बुजणारे (shy) असे पक्षी असतात जे सहसा इतर प्राणी, माणसं यांना बिचकून राहतात. माकडे देखील या थरात वावरतात. आणि मग जो सर्वात उंच थर असतो जंगलातला तिथे आपल्याला बरेचदा शिकारी पक्षी (bird of prey) म्हणजे मोठे पक्षी गरुड गिधाडासारखे दिसतात. या थरात आपल्याला मधमाशांची पोळी देखील लागलेली दिसतात. यात अजून एक चांगल्या जंगलाचं वैशिष्ट्य असं या जंगलांमध्ये आपल्याला महावेल दिसतात ज्यांना liana किंवा woody climbers म्हणतात. या नाजूक वेली नसतात. यांचे मोठे जाड लाकडी पीळ असतात आणि हे महावेल जंगलातल्या मोठ्या अतिविशाल वृक्षांवर चढलेले दिसतात. बरेचदा त्यांचं वय हे या वृक्षांइतकं असतं - म्हणजे काहीशे वर्षं वयाचे हे वेल असतात! हे असे महावेल आपल्याला नव्याने तयार झालेल्या सेकंडरी फॉरेस्ट्स मध्ये पहायला मिळत नाहीत म्हणून असे महावेल असणारी जंगलं ही उत्तम मानली जातात.
एखाद्या ठिकाणी जंगलात जिथे अतिविशाल वृक्ष असतात तिथे वरच्या canopy मध्ये आपल्याला मधमाशांची पोळी नक्की सापडतात. आता आपल्या पश्चिम घाटातला शेकरू नावाचा प्राणी जो फक्त इथेच दिसून येतो त्याच्यासाठी ही झाडांची सर्वात वरची canopy म्हणजे त्याची niche असते.
जिज्ञासा: मला तुझे वर्णन ऐकून डिस्कव्हरी चॅनलवर पाहिलेले जंगल अजून नीट कळल्यासारखे वाटायला लागलंय! पण निश (niche) म्हणजे नक्की काय? आणि हे stratification का महत्त्वाचं आहे?
केतकी: या शेकरू सारख्या ज्या स्पेशालिस्ट जाती असतात त्या या जंगलाच्या एका विशिष्ट भागातच राहू शकतात. ओडमच्या पुस्तकात niche ची छान सोपी व्याख्या दिली आहे. म्हणजे जर हॅबिटॅट हे जर एखाद्या प्राण्याचं घर मानलं तर तो त्या प्राण्याचा पत्ता झाला आणि मग niche हे त्या प्राण्याचं प्रोफेशन म्हणता येईल! म्हणजे शेकरूंसाठी जंगल हा पत्ता आणि जंगलाची टॉपमोस्ट कॅनोपी हे त्यांचं प्रोफेशन. Niche ही स्पेसिफिक संकल्पना आहे. कधी कधी केवळ अमुक झाडाची फळे खाणे किंवा एका विशिष्ट झुडुपाच्या पानांवर अंडी घालणं अशी इतकी narrow professions असू शकतात. आत्ता आपण जे प्रत्येक थराशी संबंधित faunal groups पाहिले त्या जागा ह्या त्या प्राण्यांच्या niches असू शकतात. त्यामुळे जंगलातलं हे stratification महत्त्वाचं असतं.
आणि याची तुलना आपण कशाशी करायची तर monoculture म्हणजे एकसुरी, एकाच जातीच्या झाडांच्या लागवडीशी. जंगलात ही सगळी झाडांच्या canopy किंवा थरांमधली विविधता आहे म्हणून आपल्याला हे प्राण्यांचे वेगेवेगळे गट त्याच्याशी associated दिसतात. पण जर का एकाच प्रकारची, एकाच जातीची झाडं आणि एकाच उंचीची झाडं असतील तर मग अशा जागी एकच हॅबिटॅट आणि एकच niche मिळते. म्हणजे monoculture मध्ये काय प्राणी पक्षी येत नाहीत का? तर ते येतात. पण जर तुम्ही त्याची तुलना जंगलाशी केली तर ते कमी येणार की जास्त? त्यामुळे आपला आग्रह असतो की monoculture कुठेही टाळायला हवं. या आपल्या गप्पा फक्त माहितीपूर्ण व्हाव्यात, यातून केवळ इकॉलॉजीचा अभ्यास व्हावा असा एकमेव उद्देश नाही आपला. त्याचा प्रॅक्टिकल उपयोग व्हावा ही इच्छा आहे. जर आपण stratification समजून घेतलं तर आपण झाडांची लागवड करताना त्यात अधिकाधिक विविधता आणू शकू. मग आपण नुसत्या विविध जाती आणणार नाही तर वेगवेगळ्या वयाची झाडे आणू. असं केलं तर मग आपल्याला जंगलाशी साधर्म्य सांगणारी लागवड करता येईल. ही सगळी माहिती आपल्याला कुठेतरी आपल्या प्रत्यक्ष जगण्यात वापरता आली पाहिजे.
जिज्ञासा: खरं आहे! आता शेवटचा T राहिला!
केतकी: आता शेवटचा T stands for trophic web. Troph म्हणजे food किंवा अन्न आणि web म्हणजे जाळं. जंगलाचं हे वैशिष्ट्य असतं की इथे food web अर्थात अन्नाचं जाळं असतं. आपण शाळेत जी एक classic food chain किंवा अन्न साखळी शिकतो - गवत > गवत खाणारा टोळ/नाकतोडा > टोळ/नाकतोडा खाणारा बेडूक > बेडूक खाणारा साप > साप खाणारा गरुड. पण दरवेळी हे काही compulsory नाहीये की गवत फक्त टोळच खाईल. हरीण ही गवत खातं किंवा बेडकाला फक्त साप खात नाही, मुंगूसही खाऊ शकतो. तर जंगलात किंवा कोणत्याही इकोसिस्टिममध्ये या अशा अनेक अन्न साखळ्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात आणि त्यांचं जाळं तयार होतं. आता या जाळ्यामध्ये जितके जास्त ओव्हरलॅप्स तितकं एखादं जंगल हे जास्ती स्थैर्य असलेलं असतं. अशा चांगल्या जंगलांमध्ये आपण जरूर फिरायला जातो कारण ही स्टॅबिलिटी असल्याने तिथे आपल्याला अनेक फूडचेन्स म्हणजेच अनेक झाडे आणि प्राणी दिसतात. ही अशी प्रचंड विविधता असलेल्या जंगलात जायला कधी कधी भीतीही वाटू शकते कारण आपल्याला ते जंगल परिचित नसतं. पण एखादा आदिवासी माणूस घाबरत नाही कारण त्याला याची माहिती असते. अर्थात काही घाबरण्यासारख्या किंवा जपून राहण्यासारख्या गोष्टी असतात जंगलात.
जिज्ञासा: हो ना! चुकून एखाद्या फूडचेनचा हिस्सा झालो तर!
केतकी: नाही तसे अपघात होऊ शकतात पण आता आपण पृथ्वीच्या कोणत्याच फूडचेनचा भाग नाहीयोत. काही जीवाणू आणि विषाणू सोडले तर माणूस कोणाचंच अन्न नाही. म्हणजे वाघ काही आपल्यावर अवलंबून नाही! ज्यांच्यासाठी फक्त आपणच भक्ष्य आहोत असं कोणी नाही आता. खरंतर आपण असे supreme apex predator झाल्याने आपण वेगळे झालो आहोत. अर्थात सध्याच्या कोरोनाने व्यापलेल्या जगात हे म्हणताना जरा विचार करावा अशी वेळ आली आहे.. पण त्यावरही माणूस मात करू शकतोय. त्यातून माणूस जात नष्ट होण्याची शक्यता नाही. शिवाय आपल्याशी निसर्गात कोणीच स्पर्धा करणारं उरलं नाहीये कारण आपल्या होमो प्रजातीचे कोणीच भाऊबंद उरलेले नाहीत. थोडक्यात ह्या अर्थी फूडचेनचा आपण भाग नाही. असो, तर फॉरेस्ट शब्दाची ही अशी फोड लक्षात घेतली की जंगल कशाला म्हणायचं याचं उत्तर आपल्याला मिळतं. हे ६ गुणधर्म जिथे आहेत ते जंगल आणि यातले काही गुण missing असतील तर ते जंगल नाही.
त्याला लागून तुझा प्रश्न होता की महाराष्ट्रात आढळणारे जंगलाचे प्रकार कुठले ना?
जिज्ञासा: हो, महाराष्ट्रात कोणती जंगलं आढळतात.
केतकी: हां तर आधीच्या एका भागात पाहिल्याप्रमाणे आपल्याकडे ढोबळमानाने ४ जंगलाचे प्रकार दिसतात - पानगळी, सदाहरित, झुडूपी (scrub), आणि सव्हाना. यातलं आर्द्र पानगळी कोकणात दिसतं. मग पुढे सह्याद्रीच्या माथ्यावर निम्न सदाहरित जंगलं आहेत, सह्याद्रीच्या पूर्वेकडच्या डोंगररांगात पुन्हा एकदा आर्द्र पानगळी आणि पानगळी असं मिक्स प्रकारचं जंगल आहे. मग जो सगळा मध्य महाराष्ट्राचा भाग आहे तिथे सगळं शुष्क पानगळी आणि scrub प्रकारचं जंगल आणि सव्हानासारखे प्रदेश आहेत जिथे मुख्यत्वे गवतं आणि woody shrubs असतात पण आता ते degrade झाल्याने फक्त गवत उरलं आहे. आणि मग पुन्हा पूर्वेकडे विदर्भात आपल्याला पानगळी ते आर्द्र पानगळी असं मिक्स प्रकारचं जंगल दिसतं. या व्यतिरिक्त खारफुटी हा एक स्पेशल जंगलाचा प्रकार पण आहे किनारपट्टीवर.
जिज्ञासा: आता ही जी आपण फॉरेस्ट शब्दाची फोड करून जंगलाची व्याख्या करतो त्यावरून हे लक्षात येतं की असं जंगल काही एका दिवसात तयार होऊ शकत नाही. मग जंगल तयार होण्याची प्रक्रिया कशी असते?
केतकी: बरोबर आहे. म्हणजे सध्या पृथ्वीवर दिसत आहेत ती जंगलं ecological succession च्या प्रक्रियेतून तयार झाली आहेत. म्हणजे लाव्हा पृथ्वीच्या पोटातून बाहेर येऊन थंड झाला. मग त्यावर अगदी प्राथमिक जीव म्हणजे शेवाळं, दगडफूल (lichen) वाढू लागले, मग हळूहळू गवतं आली. मग गवतं थोडी नीट रुजल्यावर झुडुपांच्या बिया तिथे रुजायला लागल्या. त्यानंतर तिथे मोठी झाडे, वृक्ष यांची रोपं वाढायला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली. या साऱ्यात खालच्या दगडावर मातीचा आणि humus म्हणजे सेंद्रिय पदार्थांचा एक थर तयार झाला ज्यामुळे तिथे ही सर्व प्रकारची झाडी टिकायला मदत झाली. आणि एकदा ही झाडी तयार झाल्यावर मग बरोबरीने आपण जे विविध प्राण्यांचे ग्रुप बघितले ते या जंगलात दिसायला लागले. आणि मग आपल्याला दिसतं तसं जंगल तयार होऊ लागलं. यात आपण पाहिलं तर अगदी उघड्या खडकावर काही वृक्षांचं बी लगेच रुजत नाही. त्या खडकावर मातीचा थर असावा लागतो. त्यामुळे जंगल तयार होण्याची प्रक्रिया ही तिथल्या अजैविक गोष्टी किंवा भौतिक गुणधर्मांवर अवलंबून आहे. म्हणजे कशा पद्धतीचं हवामान, पाऊसमान, आणि जमीनचा प्रकार - तिथे माती आहे/नाही, कशी आहे या गोष्टींवर जंगलाचा प्रकार आणि तयार होण्याचा वेग ठरतो. या अशा प्रकारे जे जंगल पहिल्यांदा पृथ्वीवर तयार झालं त्याला primary forest म्हणतात.
जी primary forests किंवा मूळ जंगलं आज शिल्लक आहेत ती बहुतेक सगळी माणसाने निसर्गात खूप जास्ती हस्तक्षेप करण्याच्या आधी तयार झालेली आहेत. अगदी या गेल्या अडीच लाख वर्षांत देखील शेतीला सुरुवात होण्यापूर्वी म्हणजे साधारण १४ ते १७ हजार वर्षांपूर्वी माणसाचा फूटप्रिंट फारसा नव्हता. आपण इतर जंगलातील प्राणी जितके बदल करून जगतात तितके मोजकेच बदल करून जगत होतो. त्यामुळे माणसांमुळे जंगलांत बदल घडण्याची प्रक्रिया तशी फार जुनी नाही.
हे सगळं सांगण्याचं कारण हे की जंगल तयार होण्याची प्रक्रिया आपण दोन प्रकारे बघू शकतो.
एक म्हणजे आधी पाहीली तशी जी माणसाच्या अनुपस्थितीत घडली. कारण झाडं ही आपण येण्याच्या आधीपासून अस्तित्वात आहेत. थोडं अधिक जुन्या इतिहासात शिरुया. Gymnosperms म्हणजे फुले/फळे न येणारी झाडे ज्यात सगळे सूचिपर्णी वृक्ष येतात ती साधारण ३६ कोटी वर्षांपूर्वी पासून आहेत. फुलणारी झाडे साधारणतः १२ कोटी वर्षांपूर्वी उत्क्रांत झाली. आणि गवतं ही तशी अलीकडे म्हणजे ६ ते १० कोटी वर्षांपूर्वी निर्माण झाली आहेत. त्यामुळे ही जी ऍमेझॉनची मूळ जंगलं किंवा कुठलीही primary forests आहेत त्यातली काही तर काही कोटी वर्षे जुनी आहेत. ही जंगलं आपल्या सर्वोत्तम स्थितीला ज्याला climax किंवा mature stage म्हणतात त्याला पोचलेली आहेत. आता climax/mature stage म्हणजे जंगल आपल्या dynamic equilibrium ला येऊन पोहोचणे. यात जंगल अगदी जसं च्या तसं रहात नाही, किंचित बदल हे होतंच असतात पण एकूण जंगलाची परिसंस्था ही स्थिर राहते. पण काही कारणाने हे मूळ primary forest नष्ट झालं तर तिथे पुन्हा नव्याने जंगल तयार होण्याची प्रक्रिया सुरु होतेच. आता आपण सुरुवातीच्या भागांमध्ये जे क्रॅकाटोआचं उदाहरण पाहिलं तिथे नैसर्गिक रीतीने जंगल पुन्हा तयार व्हायला १०० वर्षे लागली. हा काळ उपलब्ध अजैविक घटकांवर अवलंबून असतो आणि जागेनुसार बदलू शकतो. या अशा प्रकारे तयार झालेल्या जंगलांना secondary forest म्हणतात. जरी ते primary forest सारखं नसलं तरी ते हळूहळू near climax stage ला पोहोचू शकतं. अर्थात ही पुन्हा माणसाच्या अनुपस्थितीत घडलेली प्रक्रिया आहे.
माणसाच्या उपस्थितीत या प्रक्रियेत अनेक बदल होऊ शकतात, झाले आहेत. आज आपल्याकडे अशा अनेक जमिनी आहेत जिथे पूर्वी जंगल होतं आणि आज नाहीये. तर आता यापुढची जंगल तयार होण्याची प्रक्रिया जर माणसाच्या उपस्थितीत होणार असेल आणि जर माणसाचा चांगला हस्तक्षेप झाला तर जंगल तयार होण्याची प्रक्रिया जरा अधिक वेगाने देखील होऊ शकते. म्हणजे जरी माणसांनी यापूर्वी जंगलं नष्ट केली असली तरी माणसाचं अस्तित्व जंगल तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा न राहता एक asset देखील होऊ शकतं.
जिज्ञासा: जर ठरवलं तर माणसाचा निसर्गातील हस्तक्षेप हा निसर्गाचं संवर्धन करणारा देखील असू शकतो हा नुसता विचार देखील सुखद आहे! पुढचा प्रश्न महाराष्ट्रातल्या जंगलांमधल्या जैवविविधतेविषयी आहे. आपल्याकडे पश्चिम घाटासारखा जगातला एक हॉटस्पॉट आहे. शिवाय इतरही ठिकाणी भरपूर विविधता दिसते. तर त्याविषयी सांग!
केतकी: आपला भारत देश हा जैवविविधतेच्या बाबतीत एक mega diverse देश आहे. आपला देश जगाचा २.४% भाग व्यापतो पण जगातल्या एकूण जातींपैकी ७% जाती आपल्या देशात आहेत.
आता या जैवविविधतेकडे कसं बघायचं तर यातल्या किती जाती या “endemic” म्हणजे “प्रदेशनिष्ठ” आहेत ते पाहायचं. म्हणजे एखादी जागा सोडून जगात इतरत्र कुठेही सापडत नाहीत अशा जाती. अशा जाती अर्थातच महत्त्वाच्या असतात. आता महाराष्ट्रातल्या काही जागा जसे पश्चिम घाट इथे हा endemism अगदी टोकाला पोचलेला दिसतो. जेव्हा एखाद्या जागेला हॉटस्पॉट चा दर्जा दिला जातो तेव्हा तिथले endemic जातींचे प्रमाण हा एक घटक महत्त्वाचा असतो. यातल्या झाडांच्या जातींचा आकडा जर १५०० पेक्षा अधिक असेल तर ती जागा हॉटस्पॉट ठरते. दुसरा एक मुद्दा हॅबिटॅटचा असतो. म्हणजे काही जाती, ज्यांना आपण हॅबिटॅट स्पेशालिस्ट म्हणतो, या एखाद्या स्पेसिफिक हॅबिटॅटशी इतक्या निगडीत असतात की endemic असोत नसोत जर त्यांची हॅबिटॅट नष्ट झाली तर त्या नष्ट होतील. पण दुर्दैवाने आपल्याकडे अजून इतका अभ्यास, सर्वेक्षण झालेलं नाहीये त्यामुळे अशा सगळ्या जाती आपल्याला माहिती देखील नाहीयेत. अशा जातींचा IUCN ही आंतरराष्ट्रीय संस्था रेड लिस्ट मध्ये समावेश करते.
जिज्ञासा: या IUCN च्या रेड लिस्ट याद्यांविषयी थोडक्यात सांगशील का?
केतकी: तर IUCN (International Union for Conservation of Nature) ही संस्था वेगवेगळे निकष वापरून सगळ्या जातींचं वर्गीकरण करते आणि त्या याद्या प्रसिद्ध करते. त्यातली पहिली यादी ही पृथ्वीवरून नष्ट झालेल्या जाती (extinct species) अशी असते. त्यानंतर critically endangered म्हणजे नष्ट होण्याचा सर्वाधिक धोका असलेल्या जाती. म्हणजे आपण काही प्रयत्न केले नाहीत तर या नष्ट होतील - या यादीत आपल्याकडे माळढोक हा पक्षी आहे. या माळढोक पक्षाचा आसरा (हॅबिटॅट) सवाना प्रदेश आहे जो आपल्या मध्य महाराष्ट्रात दिसणारा जंगलाचा प्रकार आहे. जर आपण ही सवाना प्रकारची जंगलं राखली नाहीत तर माळढोक पक्षी महाराष्ट्रातून नाहीसा होईल. आत्ता आपल्याकडे गुजराथ, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मिळून केवळ १५ पक्षी उरले आहेत. महाराष्ट्रात तर कदाचित केवळ एकच मादी शिल्लक आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत जर काही प्रयत्न झाले नाहीत तर भारतातून माळढोक पक्षी नष्ट होण्याची शक्यता आहे. सुदैवाने जगात इतर ठिकाणी माळढोक पक्षी सापडतो. त्यामुळे तो अजून तरी extinct च्या यादीत जाणार नाही. जसा डोडो पक्षी नष्ट झाला.
Critically endangered च्या पेक्षा थोड्या अधिक सुरक्षित असलेल्या जाती endangered या वर्गात मोडतात. वाघ हा या यादीत येतो. किंवा सह्याद्रीच्या जंगलांमध्ये आढळणारी पांढऱ्या पाठीची गिधाडं (white back vultures) ही देखील endangered आहेत. आपण जे शेतीमध्ये endosulfan नावाचं pesticide वापरतो ते चाऱ्यावाटे गुरांमध्ये जातं आणि या गुरांना खाणाऱ्या गिधाडांमध्ये जातं. या endosulfan वर २०११ साली बंदी आली आहे. पण आजही या गिधाडांची संख्या हवी त्या प्रमाणात वाढलेली नाही. यापुढची कॅटेगरी आहे vulnerable म्हणजे शेकरू सारख्या जाती - ज्यांची आत्तापासून काळजी नाही घेतली तर त्या endangered होऊ शकतील. आणि मग बाकीच्या जाती ह्या बऱ्याचशा low risk असतात. कधीतरी यातल्या काही जातींना धोका आहे असं वाटलं तर मग त्यांची कॅटेगरी बदलतात. तर अशा सगळ्या threatened species च्या वेगवेगळ्या याद्या आहेत. याच्यावरून पण आपल्याला ठरवता येतं की जंगलच नाही तर कुठल्याही इकोसिस्टिमची आत्ताची स्थिती काय आहे.
आता जेव्हापासून पृथ्वीवर सजीव सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून गेल्या ३५० कोटी वर्षांत अनेक जाती नैसर्गिक रीतीने नष्ट झाल्या आहेत. पाच मोठी mass extinctions आणि अनेक छोटी extinctions झाली आहेत. पण ह्या सर्व जाती निसर्गातील बदलांमुळे नष्ट झाल्या आहेत. कुणी एका जातीने हे घडवून आणलेलं नाही. आणि अक्खी प्रजाती नष्ट होण्याचा वेग अत्यंत सावकाश होता. परंतु गेल्या पाचेकशे वर्षात आपण ह्या जाती नष्ट होण्याच्या प्रक्रियेचा वेग खूप वाढवला आहे म्हणून ही काळजीची गोष्ट झाली आहे.
जिज्ञासा: हो ना.. एखादी गोष्ट नॉर्मल वेगापेक्षा अधिक वेगाने होऊ लागली तर काहीतरी प्रॉब्लेम आहे हे आपल्या लगेच लक्षात येते. तसेच या जातींच्या extinction चे आहे. मी एका WWF च्या संकेतस्थळावरच्या लेखात वाचलं की जो natural background extinction चा वेग आहे त्यापेक्षा १००० ते १०,००० पट वेगाने सध्या जाती नष्ट होत आहेत. आणि ही पटीची इतकी मोठी रेंज आहे कारण मुद्दलात आपल्याला अजून पत्ताच नाही की पृथ्वीवर एकूण किती जाती आहेत! असो, हा भाग आपण इथेच संपवू. पुढच्या भागात आपल्या जंगलांविषयीच्या गप्पा अशाच सुरु ठेवूया.
या मालिकेचा पुढचा भाग पुढील सोमवारी प्रसिद्ध होईल.
आधीचे भाग
भाग १: नातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग १
भाग २: नातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग २
भाग ३: नातं निसर्गाशी - सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम्
भाग ४: नातं निसर्गाशी: अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
भाग ५: नातं निसर्गाशी: गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती - भाग १
भाग ६: नातं निसर्गाशी: गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती - भाग २
वाचतोय नेहेमी प्रमाणे
वाचतोय नेहेमी प्रमाणे माहीतीपुर्ण आणि रोचक
मग आपण नुसत्या विविध जाती आणणार नाही तर वेगवेगळ्या वयाच्या जाती आणू. >>> ह्यातले वेगवेगळ्या वयाच्या जाती म्हणजे नक्की काय ते कळले नाही.
उत्क्रांतीच्या टप्प्यावरचे त्या झाड प्रजातीचे वय असे काही असते का?
अधीक प्रकाश टाकावा ही विनंती.
खूप छान मालिका आहे ही
खूप छान मालिका आहे ही जिज्ञासा. हळू हळू वाचतेय. सोपे करुन सांगतेस. धन्यवाद !
खारफुटी तोडल्याने काय काय परीणाम होतायत ते दिसायला लागलेतच. मानव जितका संहारी होईल, तितकेच त्याचेच नुकसान होईल हे दिसतेच आहे.
खूप रोचक आहे हे सर्व.
खूप रोचक आहे हे सर्व.
नेहमीप्रमाणेच उत्तम.
नेहमीप्रमाणेच उत्तम.
अशाच ट्रीप्समधे समजलेली माहिती लिहिते.
Sequoia National Forest मधे मागे भेट दिली असताना तिथे आग लागू नये याकरता प्रोजेक्ट केले होते पण त्याचा उलटा परिणाम झाला. म्हणजे नवी झाडे वाढणेच कमी/बंद झाले. आग वाईट असली तरी पुर्ण वाईट नाही. ती नवे वृक्ष वसाहत वाढायला मदत करते म्हणे.
Release seeds or otherwise encourage the growth of certain tree species, like lodgepole pines
Clear dead trees, leaves, and competing vegetation from the forest floor, so new plants can grow
Break down and return nutrients to the soil.
Remove weak or disease-ridden trees, leaving more space and nutrients for stronger trees
Keep tree stands thin and open, letting more sunlight in so trees stay healthier
Improve wildlife habitat
सॉरी हे मराठीत करायला मला फार वेळ लागला असता म्हणून कॉपी पेस्ट केलं.
तसंच एकदा Redwood National Park ला गेलो असताना तेव्हा कळले की तिथल्या अती ऊंच वृक्षांच्या अगदी वरच्या बाजुला असे किटकजीव असतात की ते कधी जमीनीवर येत नाहीत. ते तिथेच पानात जन्मतात, जगतात व संपून जातात.
ते जंगल समुद्रापासून जवळ असल्याने समुद्राच्या मोठ्या लाटांच्या तुषाराने हवेत प्रचंड ओलावा तयार झालेला असतो, तो सतत शोषून तिथले जंगल वाढते, फक्त पावसाने नाही.
फार सुंदर आहेत वरची दोन्ही जंगले.
धन्यवाद, हर्पेन, रश्मी, सामो!
धन्यवाद, हर्पेन, रश्मी, सामो!
हर्पेन, बदल केला आहे - सगळी झाडे एकाच वयाची नसावीत असं म्हणायचं आहे. मग त्यासाठी एकाच वेळी सर्व जमिनीवर झाडे न लावता दर वर्षी/एक वर्षाआड अशी लावली तरी मग वयाचं stratification आपोआप होतं.
सुनिधी, खूपच रोचक माहिती! काही बिया रुजण्यासाठी त्या आधी आगीत जळून निघाव्या लागतात असं पण काहीतरी आहे. धुरात असलेलं एक रसायन growth hormone म्हणून पण काम करतं. Jungles are amazing places!
वयाचं stratification
वयाचं stratification
मला वाटलं की झाडांची अधिकतम उंची लक्षात घेऊन केलेलं वन. १/३/५/१० आणि १०+ मिटर्स उंची गाठणारी मिसळायची. शिवाय कमीअधिक प्रकाशाची गरज लागणारी.
रान आणि वन हे शब्द उपयोगी पडतील. वाघ, सिंह,हरीण, घार, यांना रान ( जंगल) लागतं. शेकरु, भेकर, नंदननाचण, शामा यांना वन( फॅारिस्ट).