एका माणूसघाण्याची पिकनिक
शाळा सुटली, पाटी फुटली.
पण शाळेतली मैत्रीही तुटली असे कधी होईल तेव्हा वाटले नव्हते.
त्या काळी शाळेतील मस्तीखोर आणि किडे करणार्या मुलांची यादी काढली असती तर पहिल्या तीनात माझे नाव असते. हेच कॉलेजबाबतही म्हणता येईल. अगदी माझ्या पहिल्या जॉबच्या सुरुवातीच्या दोन वर्षांबाबतही हेच म्हणता येईल.
मग जग बदलले. मित्र बदलले. नव्हे आयुष्यातून गेलेच. उरले ते कलीग. ऑफिसवेळेत एकमेकांशी स्पर्धा करणारे. कुरघोडी करणारे. मनात सुप्त असूया इर्ष्या ठेवून मैत्री निभावणारे कलीग.
मला हे कधी शत्रूंबाबतही जमले नाही. मग तुटत गेलो जगापासून. अंतर राखूनच वागू लागलो. तसाही माझा मूळ स्वभाव तोच होता. पटकन कोणामध्ये मी मिसळत नाही. स्वताहून फारसे बोलत नाही. एखाद्याशी ट्यूनिंग जमली तर त्याच्यासाठी कायपण, मैत्रीला नो लिमिट. पण नाही ट्युनिंग जमली तर मी भला आणि माझा एकांत भला. आणि मग अश्याने एकटाच जास्त पडू लागलो. कारण शाळेतील ती निकोप मैत्री पुढे पुन्हा कधी अनुभवताच आली नाही.
मग ऑनलाईन प्रेम प्रकरण जुळले. माझ्याशी ट्युनिंग जमणारी, मला झेलू शकणारी व्यक्ती भेटली. जिच्याशी काहीही बोलू शकतो, कसेही वागू शकतो. मग तिच्याशीच लग्न केले. मग दोन मुले झाली. ती माझाच अंश होती, माझ्यासारखीच किडेकर निघाली. त्यांच्याशी ट्युनिंग जुळणारच होती. राहिली आई तर ती माझी लहानपणापासूनची बेस्ट मैत्रीण होती. बघता बघता मी माझ्या छोट्याश्या कुटुंबालाच माझे विश्व बनवून जगू लागलो.
दुसरीकडे व्हॉटसपवर शाळेचा ग्रूप बनला होता. त्यांचे गेट टूगेदर पिकनिक चालू झाले होते. पण मला मात्र आता ईतक्या वर्षांनी माझ्या सेट झालेल्या विश्वातून बाहेर पडायचे नव्हते, कारण जगासाठी माणूसघाणा, स्वकेंद्रीत, आत्ममग्न वगैरे वगैरे असलो तरी मी माझ्या आयुष्यात खुश होतो, समाधानी होतो, त्यांच्यासोबत आहे तोच वेळ मला पुरत नव्हता. त्यामुळे आणखी चार मित्र, चार नाती जोडण्याची, वाढवण्याची गरज नव्हती आणि ते मला सहज जमतही नाही. त्यापेक्षा मी आपला सोशलसाईटवरच प्रत्यक्ष भेटायची बोलायची गरज न पडणार्या आयडींमध्ये छान रमत होतो.
त्यामुळे गेले कित्येक वर्षे मी त्यांच्या पिकनिकला त्यांना हे न सांगता, त्यांच्या भावना न दुखावता व्यवस्थित टांग देत होतो. पण ते देखील न चुकता दर वेळी आग्राह करत होते. यावेळी मात्र त्यांना शंभर टक्के खात्रीच होती की मी टांग देणार. आणि मग का माहीत नाही, मलाच वाटले की एकदा जाऊन बघावे. किती दिवस ते सोशलसाईटवरचे मित्र असल्यासारखे त्यांच्याशी ग्रूपवर चॅट करणार. बायकोला हे बोलून दाखवताच ती माझ्यापेक्षा जास्त उत्सुक दिसली. कदाचित जे मला दिसत नव्हते ते तिला दिसत होते. माझ्या परीपुर्ण(!) आयुष्यात तिला दोनचार मित्रांची कमी जाणवत असावी. मी विषय काढताच तिने मला फेरविचार करायची संधी न देता थेट माझे पैसेच भरून टाकले. मी येतोय हे कळताच मित्रांनी आनंदाने मला केकची ऑर्डर देऊन टाकली. बायकोही केक करायला तयार झाली. माझे जवळपास परतीचे सारे दोर कापले गेलेले तरी मी अजूनही जावे की न जावे या संभ्रमातच होतो. कारण माझे कोणामध्येही चटकन न मिसळणे या स्वभावाची मला कल्पना होती. आणि तसे झाल्यास शाळेतले मित्र पुन्हा जोडले जाण्याऐवजी दुरावले जाण्याचीच भिती होती. आणि त्यानंतर कदाचित आम्ही चॅटवर जसे बोलतो तसेही जमले नसते.
..... आणि पिकनिकची सुरुवात तशीच झाली !
सकाळी मला एका मित्राने त्याच्या गाडीत घेतले. सोबत आणखी तीन जण होते. आणि गाडी माळशेज घाटाच्या दिशेने निघाली. प्रवासाच्या तीन चार तासांत माझे कोणाशीही औपचारीकतेच्या पलीकडे बोलणे झाले नाही. अरे नाईक ईतका शांत का बसला आहेत तू? ही वाक्ये कानावर पडायला सुरुवात झाली आणि आता दोन दिवस हेच ऐकायचे आहे याची मी मनाची तयारी करून सरसावून बसलो.
दोस्ती लेकवूड माळशेज घाट, रिसॉर्ट बूक केले होते. पहिल्या जेवणासाठी मात्र सर्व जण पायथ्याशी जमले. तिथे एका मित्राच्या ओळखीच्या हॉटेलमध्ये जेवण उरकले. आणि दोस्तीचा डोंगर चढायला सुरुवात केली. कारण गाड्या वर जाणार नाहीत असे समजले. दहा पंधरा मिनिटांचा रस्ता म्हणत सारे जण बॅग पाठीवर घेऊन अर्धा तास डोंगर चढतच होते. पाऊस सोबतीला कोसळतच होता. पण यापेक्षा कहर होता तेथील सुसाट भन्नाट जबराट वगैरे वगैरे शब्द कमी पडावेत असा वारा. ज्याच्यासमोर सार्यांनीच हात टेकले होते. हो अॅक्चुअली, मला तर हातच टेकावे लागत होते. कारण माझ्या हातात केकची पिशवी होती. ज्यात वारा असा काही शिरत होता की त्याचे पॅराशूट तयार होत होते आणि त्यासोबत उडून जातो की काय अशी भिती वाटल्याने खरेच मध्येच आधारासाठी हात टेकावे लागत होते. पिशवी तर नाही उडाली. पण माझा कॉम्प्युटरवर काम करायचा चष्मा उडून गेला. खरे तर तो टीशर्टला लटकवून ठेवायची बिलकुल गरज नव्हती. पण फोटो काढायच्या वेळी तो आपण लाऊ, त्यात आपण स्मार्ट वगैरे दिसतो असे मला उगाचच वाटत असल्याने सोबत होता.
जसे वर चढत होतो तसे समोरील सरोवराचे द्रुश्य आणखी विलोभनीय दिसत होते. हा एकच मोह पाय वरच्या दिशेने खेचत होता. अखेरीस जेव्हा हा रस्ता थेट स्वर्गातच जातो की काय असे वाटले तेव्हा आम्ही स्वर्गासारख्या परीसरात प्रवेश केला. मात्र तरीही वर पोहोचणारा प्रत्येक जण ज्याने हि जागा निवडली त्याला शिव्या घालत होता. कारण नाहक सर्वांची फिटनेस टेस्ट झाली होती. त्यात एक मित्र तर लो बीपी होत चक्कर येऊन आडवा झाला होता. मला मात्र हा अनुभव प्रचंड आवडला होता. आपण बारीक असलो तरीही धापा टाकल्या नाहीत म्हणजे फिट आहोत हे समाधानही सोबतीला होते.
एव्हाना नाईक खूप शांत शांत आहे हि खबर सर्वांमध्ये पसरली होती. त्यानंतर ते सर्वांचे समजावणे, अरे सारी आपलीच पोरे आहेत, कसला विचार करतोयस, खुलून ये, बोल बिनधास्त कसला संकोच आहे, तुला मजा नाही येत आहे का.... वगैरे वगैरे हे सारे प्रकार ईरिटेटींग असतात. आणि अपेक्षाही मग अशी की मी भडभडून बोलायला सुरुवात करावे. अरे भ्रमिष्ट आहे का मी जे क्षणात शांत क्षणात बडबड. आता आहे मी शांत तर आहे शांत. राहू द्या मला थोडावेळ तसे. पण मित्रांमध्ये हेच जमत नाही.
आता हे दोन दिवस कसे जाणार या विचारात मी आलेला चहा घेतला आणि बायकोला फोन लावला. तिच्याशी जरा बोललो. बरे वाटले. ईतक्यात कोणीतरी मला आवाज दिला, केक कापून घेऊया म्हटले. केक तसा विस्कटलेलाच होता. पण हे होणार याची कल्पना येत मी घरीच फोटो काढून घेतले होते. ते ग्रूपवर शेअरही केले होते. सर्वांना तेव्हाच तो आवडला होता. केकची थीम माझीच हे देखील त्यांनी ओळखले होते. पण केकची चव घेतल्यावर मात्र पुढच्या पाचदहा मिनिटातच केकच्या पंधरा ऑर्डर तरी तोंडी का होईना बूक झाल्या. म्हटले चला, बायकोने केक बनवून दिला हे बरेच झाले. निदान आपण बोलत का नसेना आपले काम तरी बोलले.
त्यानंतर मग सारे गप्पा मारायला हॉटेलवरच्या डेकवर जमले. ज्याने एवढा वेळ आमच्या शिव्या खाल्या होत्या की अशी कसली ऊंचावरची जागा निवडलीस तो आता अचानक हिरो झाला होता. कारण समोर दिसणारे अफलातून द्रुश्य सर्वांनाच स्तब्ध करणारे होते. आपण डोंगराच्या कड्यावर, खाली पायथ्याशी हायवे, पलीकडे नजर जाईल तिथवर पसरलेले सरोवर, त्या पलीकडे डोंगररांगा, डावीकडे दरी, पाठीमागे आमच्याच डोंगराचा उभा राहिलेला सुळका, नजरेच्या खाली डावीकडून उजवीकडे वाहणारे धुक्यांचे ढग, मध्येच समोरचे द्रुश्य धुक्यात हरवून जाणे तर अचानक लक्ख दिसणे, खाली दरीतून वर येणारा वारा, सोबत पाऊस.. आणि सोबतील पुन्हा एक चहाचा राऊंड आणि गरमागरम कांदा बटाटा भजी.. निव्वळ अफाट... जेव्हा ब्रह्मदेवाने पृथ्वी बनवली असावी आणि वरतून पाहिले असावे तेव्हा अशीच सुंदर दिसली असावी. ते पाहून एक प्लेट भजीची ऑर्डर त्यानेही दिली असावी
सर्वांचे फोटो सेल्फी काढणे सुरू झाले, आणि मी पहिले घरी लेकीला विडिओकॉल लाऊन सर्व परीसर दाखवून घेतला. कदाचित ते कौतुक असावे, कदाचित होम सिकनेस. कल्पना नाही. एका भन्नाट जागी आल्याचे समाधान होते पण अजूनही मी मित्रांमध्ये मिसळलो नव्हतो. ईतक्यात अजून एक मित्र वर गडावर पोहोचला. समजले की तो फक्त अर्ध्या तासाची धावती भेट द्यायला आला होता. मी शॉकड्! भले त्याचे गाव तिथून जवळ का असेना पण ईतका मोठा डोंगर चढून तो एकटा आलेला ते देखील फक्त अर्ध्या तासाच्या भेटीसाठी. मला १८० अंशात मिळालेला झटका होता तो. एकेकाळचा माझाही खास मित्र होता तो, पण त्याच्याशीही मी औपचारीकरीत्याच हात मिळवला.
चहाभजी आणि धुंद वातावरण, मित्रांच्या गप्पा तिथेच डेकवर सुरू झाल्या. शाळेचे किस्से निघू लागले. शाळेत माझ्याच बाकावर बसणार्या पण मधल्या काळात काहीच संपर्क नसलेल्या माझ्या एका सर्वात खास मित्राने माझे किडे सांगायला सुरुवात केली. त्यात त्याने मी तेव्हा केलेली एक विडंबन कविता सांगायला सुरुवात केली. पहिल्या कडव्यातच सारे हसून हसून ठार. तेव्हाच्या वयाला साजेसे अश्लील विडंबन असल्याने ईथे देऊ शकत नाही, पण बघता बघता त्याने तीनचार कडव्यांची पुर्ण कविता म्हटली. हसताहसताही माझ्या डोळ्यातून पाणी आले. ईतक्या वर्षांनी.. ईतके लक्षात ठेवणे.. त्या दिवशी माझ्यासाठी तो पहिला क्षण होता जेव्हा मी त्या सर्वांशी जोडला गेलो. पहिल्यांदा मी एका मित्राला मनापासून मिठी मारली.
सात वाजले, अंधार पसरू लागला तसे आता मद्य पिणार्या मित्रांनी मेहफिलीचा ताबा घेतला. रूम्सच्या व्हरांड्यातच टेबलखुर्च्या टाकल्या गेल्या. हळूहळू माहौल बनू लागला. मी मात्र चिकन चिल्ली आणि फिशफ्राय वगैरे स्टार्टरवरच कॉन्सट्रेट केले होते. माईकचीही सोय होती. पोरांनी जमेल तसे गाणे गायला सुरुवात केली. माझ्याही हातात माईक सरकवला गेला. पण मी मात्र मला ते सहज जमले असूनही टाळले. अन्यथा एकेकाळी प्किनिक म्हटले की बसमध्ये गाणार्यांमध्ये सर्वात मोठा आवाज माझाच असायचा. पण आता पुढाकार घेणे नाही जमले.
खरे तर मी त्यांच्यासोबत एंजॉय करत होतो. मलाही ते पहिल्यांदाच आलेला मित्र म्हणून एक्स्ट्रा अटेंशनही देत होते. मी कधीच एकटा पडलोय असे मला बिल्कुल जाणवले नाही. ऊलट व्हॉटसप ग्रूपवर सर्वात जास्त डोके खाणारा हा म्हणून प्रत्येकाला माझ्याबद्दल जास्तीत जास्त जाणून घ्यायचे होते. माझ्याकडून त्यांना प्रवचन ऐकायचे होते. मी शाळेत एकेकाला पकडून सांगत असलेले खरेखोटे किस्से ऐकायचे होते. पण मी काही बोलतच नव्हतो.
दहा वाजले. पिण्याचा प्रोग्राम ऊरकला. सॉरी, मध्यांतर झाले. आता सारी पावले थिरकायला डीजे होता तिथे वळली. आधीच तिथे एक दोन फॅमिली ग्रूप्स नाचत होते. आम्ही एक जागा पकडली. आणि मी सर्वात मोठा ईरीटेटींग काळ झेलायला तयार झालो. का ईरीटेटींग?
तर मला नाचाची प्रचंड आवड आहे. म्युजिक सुरू होताच बीट्सनुसार अंग हलू लागते. जवळपास रोजच घरी मुलांसोबत डान्स असतोच. पण बाहेर मात्र जिथे ट्युनिंग असते तिथेच नाचतो. ऑफिसच्या पार्टीला आजवर एकदाही नाचलो नव्हतो. त्यामुळे ऑफिस फंक्शनला जेव्हा स्टेजवर एकट्याने नाचायचे ठरवले तेव्हा सारे अवाक झालेले.
याबद्दल सविस्तर ईथे वाचू शकता - माझा नाच आणि नाचाचा प्रवास ! (फोटो आणि विडिओसह) - https://www.maayboli.com/node/72946
आताही हेच होणार होते. मला नाचाचा आग्रह होणार होता. आणि मी नाही नाही बोलून ईरीटेट होणार होतो. मग ते हात धरून खेचणे आणि आपण एक हात वर करून ईथून जाऊन तिथून बाहेर पडणे. आणि मग पुन्हा तेच, पुन्हा तेच. जवळपास वीस पंचवीस पोरे पुन्हा पुन्हा तेच करणार होती. कोणी मला खेचणार होते, तर कोणी ढकलणार होते. या टेंशनमध्ये दबकतच मी डान्सहॉलमध्ये प्रवेश केला. पण नियतीच्या मनात काहीतरी स्पेशल लिहिले होते. त्याच्याशिवाय हे शक्यच नव्हते...
आम्ही आत शिरलो आणि डान्सफ्लोअरवर उतरलो तसे पहिलेच गाणे लागले ते बचना ए हसीनो, लो मै आ गया. हे तेच गाणे ज्यावर मी गेल्या वर्षी ऑफिसला नाचलो होतो. मग काय घेतला चान्स. उतरलो रिंगणात. माझ्या दोनचार स्टेप्स बघून पोरे थक्क झाली. भाई ये तो सोलो डान्सर है म्हणत सगळे मागे सरकून एक रिंगण तयार केले आणि मी एकटाच नाचू लागलो. मुले चेकाळू लागली. आणि मला नाचतानाच जाणवू लागले की मी शेलमधून बाहेर येतोय. पाठोपाठ बघतोय रिक्षावाला झाले, पुन्हा डॉनचे गाणे लागले तसे पुन्हा माझा सोलो डान्स सुरू झाला. झिंगाटला अक्षर्शा झिंगाटलो, जवळपास दोन अडीच तास नाचून झाल्यावर यारी दोस्तीच्या गाण्यांनी समारोप झाला. पण माझ्यासाठी ती पिकनिक तिथे खरी सुरू झाली होती. एका बोअरींग दुपार आणि काहीश्या उदास संध्याकाळीनंतर एक रात्र उजळून निघाली होती. आता मी मित्रांच्या मुख्य प्रवाहात सामील झालो होतो.
जेवण झाल्यावर पुन्हा काही जणांनी आपली नाचाची हौस भागवली. रात्रीचे दोन वाजेपर्यंत माळशेज घाट दणाणून उठले होते. मग पुन्हा रूमवर पत्यांचा डाव रंगला. सभ्य पोरं झोपायला गेली. मला कोणी सोडणारच नव्हते. कारण एकतर मी सभ्य नव्हतो. वर्गात जुगार सुरू करणारा तो मीच होतो हे सर्वांना माहीत होते. दुसरे म्हणजे माझा दिवस रात्रीच सुरू होतो याचीही व्हॉटसग्रूपवर माझे रात्रीचे चहा भेळीचे फोटो पाहून त्यांना कल्पना होती.
पण आता मी मागे राहण्यातला नव्हतो. मीच मग पुढाकार घेऊन हॉटेलवाल्याच्या स्वयंपाक्याला उठवून वीसेक कप चहा बनवायला लावली आणि पत्यांचा जोड हातात घेतला. पिसताना पत्ते पत्यांत आणि मी मित्रांत मिसळत होतो. १०-१० रुपये टेबल लाऊन तीन पत्तीला सुरुवात झाली ते पहाटे साडेपाच वाजता मी तब्बल साडेआठशे रुपये जिंकूनच उठलो. माझ्या एकेकाळच्या द ग्रेट गॅम्बलर ईमेजला जागलो. अकरा-बारा जणांनी सुरुवात केलेली ते शेवटपर्यंत खेळणारे आम्ही सहा जणच उरलो होतो. मग पुढचे अर्धा तास उजाडेपर्यंत आमच्या गप्पा रंगल्या. मग पहाटेचे पुन्हा एकदा आदल्या संध्याकाळच्या डेकवर जाऊन तिथून पुन्हा एकदा पहाटेच्या वातावरणात तो परीसर अनुभवला. आणि रात्र जागवलेल्याची आठवण म्हणून काही फोटो काढले.
मग दिड तासांची झोप, ती मात्र वार्याने वाजणार्या छपरांच्या खडखड आवाजाने गाढ अशी आलीच नाही. रूमसर्विसची तशी बोंबच होती. पण पर्वा नाही. आठसाडेआठच्या सुमारास चहाचा आवाज आला तसे पांघरूण फेकून खाडकन उठलो आणि पुन्हा पोरांच्यात जाऊन मिसळलो. हळूहळू सारेच उठले आणि दहा पर्यंत सर्वांचे चहापाणी झाले. मी मात्र त्यावेळी थोडासा वेळ काढून त्या परीसराचा एक छोटासा विडिओ बनवून घेतला. पुढे मग तिथल्याच डोंगरावरच्या एका धबधब्यात जाऊन भिजणे, तिथे जातानाही शेतातून चिखल तुडवत, पाटाच्या पाण्यात पाय भिजवत जाणे, धबधब्याच्या जवळ येताच वार्याने त्याचे पाणी बाणासारखे तोंडावर टोचणे, पुन्हा एकदा ज्याने हा स्पॉट निवडला त्याला शिव्या घालणे पण प्रत्यक्षात मात्र हा थरार भरभरून अनुभवणे चालूच होते.
आता धबधब्यात भिजलोच आहोत तर स्विमिंग पूल का सोडा म्हणून तिथेही चार डुबक्या मारून झाल्या. डोंगरावर असलेला स्विमिंग पूल आणि पाठीमागे दिसणारा लेक म्हणजे त्या दुबईच्या हॉटेलात टेरेसवर असणार्या स्विमिंगपूलसारखे झाले, म्हणून तिथेही काही फोटो टिपले. आता मी खुलून आल्याने माझा फोटो काढायचा आणि काढून घ्यायचा उत्साहही वाढला होता.
सरतेशेवटी समारोपाचे म्हणून अर्धा तास चिखलवार्यात पाऊसपाण्यात बेछूट फूटबॉल खेळून झाले आणि मग दोन दिवसांचा क्षीण घालवणारी गरम पाण्याची आंघोळ. तेव्हाही वाटले की एखाददुसर्या मित्रालाच सोबत घेऊन जावे आंघोळीलाही ईतके आता मी सर्वात रुळलो होतो.
मग यावेळची पिकनिक कशी झाली या गप्पांमध्ये दुपारचे जेवणखाणे उरकेपर्यंत तीन वाजले. आधी जे माझ्या बायकोने बनवलेल्या केकने सुरुवात झालेली ते कौतुक आता माझा नाच आणि माझ्या केसांकडे वळले होते. मला बॉबीचा रिशी कपूर हे नाव पडले होते. या पिकनिकच्या गप्पांसोबत मला त्यांनी जुन्या पिकनिकचे किस्सेही सांगायला सुरुवात केली. आजवर त्यातले कैक व्हॉट्सपग्रूपवर ऐकलेले. पण ते असे मित्रांच्या घोळक्यात ऐकण्याची मजाच वेगळी. शेवटी पाय निघतच नव्हता. शाळेच्या सेंडऑफची आठवण झाली. पुन्हा कधी भेटणार त्याची वाट बघणे आले आता.
पण पुढच्या पिकनिकला अजून बरेच काही करने शिल्लक आहे. कॉलेजनंतर ज्या मित्रांमध्ये द्यायच्या शिव्या माझ्या तोंडून हरवल्या आहेत त्या पुन्हा द्यायच्या आहेत, माझे गाणे गायचे शिल्लक आहे. मुलींसोबत प्रेमप्रकरणाचे खरे खोटे किस्से रंगवून सांगणे बाकी आहे. चारचौघांपेक्षा वेगळे किडे करणारा म्हणून शाळेतली ओळख मला पुन्हा मिळवायची आहे. यावेळी खुलून आलोय, पुढच्यावेळी हलवून सोडायचे आहे. आणि म्हणून घरी आल्याआल्या सर्वात पहिले व्हॉटसपग्रूपवर पोस्ट टाकली.
पुढच्या पिकनिकची लिस्ट
१) ऋन्मेष
२) ........
३) ......
....
..
लोकेशनचा मी काढलेला विडिओ ईथे बघू शकता.
Dosti Lakewood Resort, Malshej Ghat
ऑस्सम प्लेस !
यात शेवटच्या क्लिपमध्ये मी सुद्धा दिसेन. ओळखा
बाकी फोटो जमा करतोय मित्रांकडून
तोपर्यंत केकवर तुटून पडा
.
.
माळशेज घाटाचे इतर फोटो या ईथे क्लिक करून बघू शकता,
माळशेज घाट - महाराष्ट्राचा स्वित्झर्लंड - https://www.maayboli.com/node/79696
चला पिकनिक njoy केली हे बरं
चला पिकनिक njoy केली हे बरं झालं, हे होणारच होतं
पुढच्या सर्व पिकनिक साठी तुम्हाला शुभेच्छा आणि मित्रांना all the best
८५० रूपये!! क्या किजिएगा इस
८५० रूपये!! क्या किजिएगा इस धनराशीका???
वाह. छान. शेलमधून बाहेर पडता
वाह. छान. शेलमधून बाहेर पडता आलं ही सगळ्यात मोठी कमाई.
लेख प्रांजळ आहे म्हणून अधिकच चांगला वाटला.
पुढच्या पिकनिकला शुभेच्छा.
आणि मग का माहीत नाही, मलाच
आणि मग का माहीत नाही, मलाच वाटले की एकदा जाऊन बघावे. ...
मग तो 'टांग देण्याचा' धागा काढून का समस्त मायबोलीकरांच्या डोक्याची मंडई केलीस????
असो, या धाग्याच्या निमित्ताने तुझे आडनाव 'नाईक' आहे हे कळले! (जे तू याआधी 'आडनावावरुन जात कळते' आदी करणे देऊन सांगणे टाळायचास!) आता आडनाव कळलेच आहे तर लवकरच तुझे खरे नाव, पत्ता देखील कळेल, नाहीतर आम्ही शोधून काढू!!! कारण 'शोधलं की सापडतच'!!!
नाईक तो पण बहिर्जीपणा इतरांचा
आहे का! म्हणजे नाईक तो पण बहिर्जीपणा इतरांचा...
छान लेख!
छान लेख!
नेहमीप्रमाणे अत्यंत सुंदर लेख
नेहमीप्रमाणे अत्यंत सुंदर लेख
बघ, आधीच म्हटलं होतं की मजा
बघ, आधीच म्हटलं होतं की मजा येईल. ऐकावं तायांचं, दादांचं.
छान. पिकनिकला गेलास ते बरं
छान. पिकनिकला गेलास ते बरं केलंस. मनातली अढी निघाली.
मला पण हे जमवायला हवंय कधीतरी.
छान. पिकनिकला गेलास ते बरं
छान. पिकनिकला गेलास ते बरं केलंस. मनातली अढी निघाली.
मला पण हे जमवायला हवंय कधीतरी.
मला तू माघा वाटत नाहीस
मला तू माघा वाटत नाहीस कुठच्याही ॲंगलने. उगीच चिकटवून घेतलयस ते बिरूद. जाऊदे, आली ना मजा म ssss ग? ती येणारच होती. . मित्रांबरोबर पिकनिक ला जाऊन जे रिचार्ज होत नाहीत असे फार थोडे असतील.
मी आधी जाउन ते रीसॉर्ट चेक
मी आधी जाउन ते रीसॉर्ट चेक केले. मस्त आहे.
छान लिहला आहेस वृन्तांत.
बरं झालं जाऊन आलास म्हणजे
बरं झालं जाऊन आलास म्हणजे जाणार हेतासच .... छान प्राजळपणे लिहीलाहेस रे रुन्म्या वृत्तांत ...
मद्य पिणार्या मित्रांनी
मद्य पिणार्या मित्रांनी मेहफिलीचा ताबा घेतला. रूम्सच्या व्हरांड्यातच टेबलखुर्च्या टाकल्या गेल्या. हळूहळू माहौल बनू लागला. मी मात्र चिकन चिल्ली आणि फिशफ्राय वगैरे स्टार्टरवरच कॉन्सट्रेट केले होते. >>
छान झाला लेख. अगदी पिकनिकला फिरवुन आणले.
पण... वरच्या प्रसंगात आपण चिकन फिश खातांना जर मित्रांना मदिरापानाचे दुष्परिणाम समजावुन सांगितले असते तर...
शाळेच्या मित्र मैत्रीणींबरोबर
शाळेच्या मित्र मैत्रीणींबरोबर , माझी तरी अजून तार जुळली नाही. उलट काहीच रीलेट करु शकले नाही. फक्त कोरडे प्रश्ण व श्वास असे वाटले भेटले तेव्हा.
त्यापेक्षा, कॉलेजमध्ये कधीच चुकूनही न बोललेल्या मित्रांमध्ये( मैत्रीणींपेक्षा) ज्यास्त गट्टी झाली कस्काय आणि प्रत्येक्षात सुद्धा.
वैनींंनी लेख वाचला तर ऋन्मेष
वैनींंनी लेख वाचला तर ऋन्मेष नाईक यांची आज कुंडली निघेल
------------------------------------------------------------------------------------
बादवे, खूप छान लिहिलंय. डेक वरून दिसणार्या परिसराचे अन माळशेजच्या निसर्गाचे ८-१० फोटॉ हवे होते.. ते नाहीत म्हणुन रुखरुख लागली. पुढील ट्रिप साठी शुभेच्छा..!!
आणि हो, बाहेर जाऊन एवढी एंजोयमेंट करून आलाय तर आरटीपीसीआर नाही निदान अँटीजेन तरी करून घ्या.
धन्यवाद सर्व प्रतिसादांचे.
धन्यवाद सर्व प्रतिसादांचे.
कॉम्प्युटरवर काम करायचा चष्मा उडून गेल्याने फार कष्ट घेत हा लेख लिहीला आहे. व्याकरण, शुद्धलेखन, शब्दरचनेचे संस्कार करत बसलो नाही. मनातल्या भावना ताज्या आहेत तोपर्यंत पटकन सारे लिहून काढायचे होते.
@ विक्षिप्त मुलगा
@ विक्षिप्त मुलगा
मलाच वाटले की एकदा जाऊन बघावे. ...
मग तो 'टांग देण्याचा' धागा काढून का समस्त मायबोलीकरांच्या डोक्याची मंडई केलीस????
>>>>>>>>>>>>>
हो, मलाच वाटलेले जाऊन बघावे. पण नंतर नाव दिल्यापासून पिकनिक जवळ येईपर्यंत उगाच नाव देऊन फसलो असे वाटत असल्याने तो धागा काढलेला. तिथे सल्ला मिळो न मिळो, पण आपले प्रतिसादांनी मनावरचे दडपन हलके होण्यास फार मदत केली त्या धाग्यावर.
आता आडनाव कळलेच आहे तर लवकरच तुझे खरे नाव, पत्ता देखील कळेल, नाहीतर आम्ही शोधून काढू!!!
>>>>>>
हे मी केव्हाच डिक्लेअर केले आहे ऑफिशिअली.
याच लेखात त्या नाचाच्या धाग्याची लिंक आहे तिथे माझे नाव गाव फळ फूल ईतकेच नव्हे तर फोटोही टाकला आहे. किंबहुना आता प्रोफाईलला सुद्धा माझा स्वतःचाच ओरिजिनल फोटो तर आहे. आणखी काय माहीती हवी आहे माझी? विचारा, देतो
@ सीमंतिनी,
@ सीमंतिनी,
माझे घरचे टोपणनाव बहिर्जी नाईकच आहे. लहानपणीच आईने ठेवलेले. कारण मी सदैव माझ्याचा तंद्रीत असल्याने कधीच म्हणजे अगदी कधीच पहिल्या हाकेला कोणालाच ओ देत नाही
@ धनुडी,
मला तू माघा वाटत नाहीस कुठच्याही ॲंगलने. उगीच चिकटवून घेतलयस ते बिरूद.
>>>
मला ते माघा म्हणजे नक्की कोणाला म्हणायचे हे क्लीअर नव्हते. घाणा नसेल पण टाळणारा आहे म्हणूया.
कॉल आला ऑफिसचा... आलोच!
@ अंकु, मी आधी जाउन ते
@ अंकु, मी आधी जाउन ते रीसॉर्ट चेक केले. मस्त आहे.
>>>
मी नंतर चेक केले आल्यावर. पण रूमच्या फोटोवर जाऊ नका. ते बहुधा जुने असावेत. रूम्स स्वच्छ नीटनेटक्या आहेत, पण फोटोत दिसतात तश्या चकाचक नाहीयेत. तसेच पावसाळ्यात वर गाड्या जात नाहीत आणि चढावे लागते हे देखील कुठे मेंशन केलेले दिसले नाही.
बाकी तो स्पॉट, तिथले क्लायमेट, तिथून दिसणारे व्यू मात्र सर्वच अफाट आहे. फोटोसोबत मी तिथला एक छोटासा दोन अडीच मिनिटांचा विडिओही शूट केला. ईथे फोटो शेअर करेनच, जमल्यास विडिओही शेअर करता आला तर बघतो.
पण... वरच्या प्रसंगात आपण
@ वीरू
पण... वरच्या प्रसंगात आपण चिकन फिश खातांना जर मित्रांना मदिरापानाचे दुष्परिणाम समजावुन सांगितले असते तर...
>>>>>>
रोज व्हॉटसपग्रूपवर सांगतो. उगाच का ते मला प्रवचनकार बाबा म्हणतात.
पिकनिकला बारानंतर मद्यपान करून आम्ही तुला घेणार अश्या धमक्याही मला मिळालेल्या
पण त्या क्लायमेटमध्ये कोणाला चढलीच नाही. त्यामुळे त्यांची बडबड ऐकायचा योग गेला. पण छान झाले. न चढल्याने सर्वांनी पिकनिक छान शुद्धीत एंजॉय केली. आता दोन दिवसांनी त्यांना हे सांगणारच आहे, लिमिटमध्ये प्यायचे आणि शुद्धीत राहून पिकनिक एंजॉय करायचे फायदे
प्रवासात एका गाडीचा अपघात झाला. ऑईल टँक फुटला. वाईट झाले. आणि गाडीच्या डिक्कीत ठेवलेली ब्लॅक लेबल नामक मद्याची मोठी बाटली फुटली. सारे त्यासाठी जास्त हळहळले. अपवाद मी
@ डीजे
@ डीजे
डेक वरून दिसणार्या परिसराचे अन माळशेजच्या निसर्गाचे ८-१० फोटॉ हवे होते.. ते नाहीत म्हणुन रुखरुख लागली.
>>>
हो काल पहाट झाली म्हणून फोटो राहिले.
तसेही सर्वांनी शेअर केलेले मिक्स झालेत, त्यातले निवडक अजून संकलित करायचे आहेत.
आज रात्री फोटो आणि जमल्यास त्या लोकेशनचा मी शूट केलेला एक विडिओ नक्की शेअर करतो. फुल्ल माहौल होता.
वा,मस्त, कोषातून बाहेर पडणे
वा,मस्त, कोषातून बाहेर पडणे भारीच.
आण्णा नाईक..........!!
आज रात्री फोटो आणि जमल्यास त्या लोकेशनचा मी शूट केलेला एक विडिओ नक्की शेअर करतो. फुल्ल माहौल होता.>> वाट बघतोय... आण्णा नाईक..........!!
शाळेच्या मित्र मैत्रीणींबरोबर
शाळेच्या मित्र मैत्रीणींबरोबर , माझी तरी अजून तार जुळली नाही. उलट काहीच रीलेट करु शकले नाही. फक्त कोरडे प्रश्ण व श्वास असे वाटले भेटले तेव्हा.
>>>>>
पिकनिकचा फर्स्ट हाफ मी माझ्यावतीने तेच करत होतो. पण बाकीचे मित्र एकमेकांच्या आजही टचमध्ये आहेत, आणि त्यांचे बाँडीग ईतके अफाट आहे की मी माझ्या ईतर कुठल्या ग्रूपमध्ये हे पाहिले नाही. बहुतांश मुले आमच्या माझगाव- भायखळा, लालबाग-परेळ, दादर-माटुंगा या मध्यमवर्गीय मराठमोळ्या घरातील असल्याने सर्वांनीच आपल्या बालपणी एक मोकळेढाकळे वातावरण अनुभवले आहे. मी आजही ते माझे बालपण मिस करतो. या मित्रांमुळे ते मला या दोन दिवसात पुन्हा अनुभवता आले.
दहावी-अ ची हुशारे मुले सारी, आज आपल्या प्रोफेशनल आयुष्यात मोठमोठ्या हुद्द्यांवर असली तरी मला या दोन दिवसात कुठेही कसलीही इर्ष्या असूया स्पर्धा वा तो विषयही आढळला नाही. किंबहुना कॉलेज ग्रूपमध्ये ते जाणवते. कारण सारे एकाच फिल्डमध्ये असल्याने कुठल्या कंपनीत जॉबला आहेस, काय पोस्ट आहे, किती पॅकेज आहे या असल्या चौकश्या असतातच. आमच्या पिकनिकला हा विषयच नव्हता. फक्त तू कुठल्या फिल्डमध्ये आहेस हे कळले की विषय संपला. जे पिकनिकमध्ये रंग भरणारे होते ते तिथे हिरो होते.
वा छान
वा छान
वृत्तांत छान आणी मनापासुन
वृत्तांत छान आणी मनापासुन लिहीलास. पण फोटो हवेतच, ( मित्रांचे व घरच्यांचे नको टाकुस, पण निसर्गाचे नक्कीच टाक ) कारण तोच पिकनीकचा आत्मा असतो. आम्ही नाही गेलो तरी नेत्रसुख फोटोमुळेच मिळते की.
पहिला परिच्छेदच Irony
पहिला परिच्छेदच Irony (विरोधाभास) नी भरलेला आहे. एकीकडे स्वतःला - मस्तीखोर, किडे करणारा म्हणायचे आणि त्याच परिच्छेदात खाली माणुसघाना, एकलकोंडा अशी विशेषणे वापरायची.
अभिषेक वृत्तांत छान लिहिला
अभिषेक वृत्तांत छान लिहिला आहेस. मनातली घालमेल चांगली उतरली आहे. कॉलेज च्या गेटटुगेदर ला जाणं मलाही जमले नाही.
कॉलेज च्या ग्रुप पेक्षा शाळेतल्या मित्र मैत्रिणींसोबत ट्युनिंग चांगले जमते .
अभिषेक..?
अभिषेक..?
Pages