ओल्या काजूची भाजी

Submitted by 'सिद्धि' on 30 July, 2021 - 05:38

हे कोकणातील अगदी सुप्रसिद्ध काजू गर, त्याची रस्सा भाजी किंवा सुखी भाजी अगदी चमचमीत होते. बहुतेक सगळ्यांची आवडती अशी ही भाजी, करताना मात्र थोडी क्लीष्ट वाटते, कारण काजूगर सालीपासून वेगळे करण्यासाठी फार वेळ लागतो. तसेच त्यांचा चीक हाताला लागून खाज वगैरे येऊ शकते. पण इथे आपण हे काजू गरम पाण्यात टाकून ५ मिनिटे वाफवून घेतोय. त्यामुळे वेळ सुद्धा वाचतो आणि चीक सुद्धा निघून जातो. काजू अगदी सहज हाताने सालीपासून वेगळे करता येतात.

kaju.jpgसाहित्य-
पाव किलो ओले काजू गर, २ छोटे कांदे, २ छोटे टोमॅटो, अर्धी वाटी ओलं खोबरं किसून, ४ लसूण पाकळ्या, आलं लसूण पेस्ट १ मोठा चमचा, ५-६ कढीपत्त्याची पाने, गरम मसाला पावडर २ चमचे, लाल तिखट २ चमचे, हळद पाव चमचा, २-३ मोठे चमचे भरुन तेल, १ चमचा किंवा चवीनुसार मिठ, मुठभर स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती-
मंद आचेवर कढई मध्ये एक चमचा तेल गरम करून घ्या. यात कांदा आणि टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. नंतर त्यामध्ये किसलेले ओलं खोबरं घालून ते तेलावर व्यवस्थित भाजून घ्या. गॅस बंद करताना यामध्ये लसूण पाकळ्या मिक्स करून मग हे सर्व साहित्य थंड करून घ्यायच आहे. मिक्सर मधून बारीक वाटून घ्यायचे आहे. या वाटणामध्ये पाण्याचा वापर अगदी नावापुरता करायचा आहे.

एक साईट ला वाटण तयार आहे. वरती वापरलेल्या कढईमध्ये २ चमचे तेल गरम करून यात आलं-लसूण पेस्ट घालून मिनिटभर परतावे. त्यावर वरती केलेले कांदा खोबर्याचे वाटप घालून ते व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. मसाल्याला तेल सुटू लागले, की मग लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला पावडर, आणि चवीनुसार मीठ घालावे. पुन्हा हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून मग यामध्ये ओले काजू गर घालावे. वरुन दोन वाटी गरम किंवा कोमट पाणी घालून चांगले शिजवून घ्या. १०-१५ मिनिटांत मध्यम आचेवर भाजी शिजून तयार होते. वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी, गरमागरम भाकरी किंवा पोळी बरोबर खायला घ्यावे.

kaju 2.jpgटिप -
* रस्सा भाजी साठी पाण्याचे प्रमाण आवश्यकतेनुसार वाढवावे.
* काजू बरोबर एखादा बटाटा घालून भाजी वाढवता येते आणि चवीला देखील छान लागते.
* घरी आधीच बनवुन ठेवलेले ओले वाटप घालून ही भाजी करु शकता. वेळ वाचतो. वाटप सोडले तर बाकी कृती सारखीच आहे.
* काही वेळा काजू लवकर शिजतो. तर काही वेळा जास्त वेळ लागतो. हे हाताने दाबून पहावे. शिजवून अगदी खिमा करू नये.

{https://siddhic.blogspot.com}

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!
माझ्याकडचे ओले काजू संपले आता. नाही तर करून पाहिली असती. पुढच्या वर्षी Happy

छान.
इथे आपण हे काजू गरम पाण्यात टाकून ५ मिनिटे वाफवून घेतोय. त्यामुळे वेळ सुद्धा वाचतो आणि चीक सुद्धा निघून जातो.


बरोबर.

छान आहे रेसिपी

आपण ड्रायफ्रूट म्हणून खातो ते काजू कुकरमध्ये 2शिट्ट्या करून मस्त मऊ होतात,वर्षभर काजूऊसळ करता येते

ड्राय फ्रूट म्हणून खायचे काजू किंचित गरम करून कुरकुरीत केलेले असतात.
ओले काजूगर म्हणजे खरे तर ओल्या (हिरव्या कच्च्या ) काजूबियांमधून काढलेले गर. पण अनेकदा पक्क्या काजू बी मधून सालासकट काढलेले गर सुकवतात आणि साठवतात, मग हवे तेव्हा ते पाण्यात भिजत घालायचे की बनले त्यातून ओले काजूगर!

सगळ्यांना धन्यवाद.

@ भावना ताई,
गावी बागायती काजू आहे. शेवटचा बहर में महिन्याच्या आसपास येतो, एकदा पावसाला सुरुवात झाली, की त्यानंतर काजू काढायला माणसं मिळत नाहीत, त्यांची शेतीची कामं असतात. आणि काजू झाडांवरतीच खराब होतो. त्यावर उपाय म्हणून आम्ही जून मध्ये हिरव्या काजू बिया काढून त्या सोलून मग तांदळाच्या सुक्या पिठामध्ये घोळून वाळवून ठेवतो. हा काजू पुढे दोन- तीन महिने भाजीसाठी वापरला जातो.

जेवताना दाताखाली ओला काजु आला कि अहा.. जेवन मस्तच जाते मग. + अगदी अगदी खरं Bw

@ हिरा,
ओले काजूगर म्हणजे खरे तर ओल्या (हिरव्या कच्च्या ) काजूबियांमधून काढलेले गर.+१११

ओल्या काजूच्या भाजीला जी टेस्ट असते, ती पक्या काजू च्या भाजीला येत नाही.

अरे वा सिध्दी मस्तच ग... म्हणजे कधिहि वाटलं कि बनवु शकतेस ओल्या काजुची उसळ..ज्यासाठी आंम्ही पुढच्या वर्षीची वाट पाहतो.. Happy

ओल्या काजूच्या भाजीला जी टेस्ट असते, ती पक्या काजू च्या भाजीला येत नाही.>>>> अगदि खरं

आम्हाला पर्याय नाही गं सिद्धी. Happy आम्ही कोरडे काजू वापरुन उसळ करु शकतो. पाककृती खूप छान आहे. कोकणात येऊनच ही भूक भागवावी लागेल.

काजूगरांच्या उसळीचा आणखी एक प्रकार ऐकला आहे. आता तो पूर्ण अस्तंगत झाला असणार. पूर्वी म्हणे पिकलेल्या काजूबोंडांचा मुख्य एक बहर (भर) उतरवून झाला की किरकोळ कुठे अति उंचावरची, कुठे पानांत लपलेली अशी चुकार बोंडे बरीच उरायची. ती तशीच राहात आणि पुढे पावसाच्या माऱ्याने जमिनीवर गळून पडत. नंतर त्यातल्या बिया जमिनीत रुजत. काजूगराची दोन हिरवी पोपटी दळे (डाळे) जमिनीतून बाहेर पडत. ती खुडून घेऊन त्यांची उसळ करीत आणि ती फारच छान लागे.
जमिनीवर गळून पडलेले आणि पुढे पावसात रुजून वर आलेले चिंचोके अनेकदा खाल्ले आहेत. छान लागत. मग असे रुजलेले काजू किती छान लागत असतील!

हीरा, अशा उगवून आलेल्या काजूबिया मी लहानपणी नुसत्या खाल्ल्या आहेत Happy काही काजूबिया मातीत लावून ठेवायच्या. पाऊस पडला की त्या उगवून यायच्या. मग तुम्ही लिहिलंय तशी ती दोन दळं काढायची आणि खायची. चविष्ट प्रकार. उसळ वगैरे नाही करायचो आम्ही.

भारी आयटम असावा हा. ऐकूनही माहीत नव्हते.
आता काजूगर कुठे मिळतील शोधणे आले.
इंग्रजीत काय म्हणावं त्याला?

सगळ्यांना धन्यवाद!

@ रश्मी
कोकणात नक्की फिरायला या.

@ मानव
ओले काजू कोकणातच मिळतात. एप्रिल, में, जून महिन्यात. बाकी बाजारात मिळतात असं ऐकून आहे ‌. पण ते preservatives वापरलेले फ्रोजन चे असणार.