फुलांची वेणी

Submitted by मनीमोहोर on 12 January, 2021 - 12:53

माझं लहानपण छोट्या गावात गेलं. घर भाड्याचं असलं तरी घरापुढे अंगण होत. अंगणात तगर, मोगरा, शेवंती, कुंदा, प्राजक्त ,अबोली अशी अनेक फुलझाडं होती. हार आणि वेण्या करणं हा माझा छंदच होता. असतील त्या फुलांचा रोज हार/वेणी मी रोज करत असे. पुढे शहरात आल्यावर गजरे/ हार हुकमी मिळत असले तरी स्वतः गजरा हार वेणी करण्याच्या सुखाला मात्र मुकले होते.

पूर्वी स्त्रियांचे केस मोठे असत आणि केसात वेण्या, फुलं माळण्याची आवड होती. चाफ्याची, शेवंतीची, गुलछडी ची, अबोलीची, कोरांटीची अश्या अनेक प्रकारच्या वेण्या स्त्रिया अगदी हौसेने अंबाड्यावर घालत असत. आता जनरली केस लहान असतात , केसांचा स्पेसिफिक कट केलेला असतो म्हणून काळाच्या ओघात ह्या वेण्या गडप झाल्यात जवळ जवळ. मला घालायला नाही आवडली तरी करायला खूप च आवडते. पायाच्या अंगठ्यात दुपदरी दोरा धरून त्यात फुल ठेवायचे आणि दुसरा डोरा वरून खालून उलट सुलट फिरवून ते फिक्स करायचे. (साधारण tating सारखी वीण )

सध्या मुक्काम सातारला आहे. एका परिचित मुलीला माझं हे फुलांचं वेड माहीत आहे. तिने मला तिच्या बागेतली फुल आवर्जून आणून दिली. म्हणून त्या फुलांच्या दोन वेण्या केल्या. खूप मजा आली करताना. स्मरण रंजनात वेळ मस्तच गेला.

हा फोटो

20201026_095941~2.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुंदर,
व्हिडीओ केला अस्ता तर समजलं असतं कसं केलं ते
आम्ही लहानपणी सुई धाग्याने करत असू, अगदी अबोली देखील -फुलं कोमेजून जात तरीही, कारण असलं काही येत नसे

गुलबक्षी ची बिना धाग्याची वेणी कशी करायची? माझ्याकडे भरपूर फुले आली होती, खूप invasive झाड आहे. सर्व कुड्यांत तेच दिसतेय

फुले गुंफण्याचे अनेक प्रकार आहेत. वेणी, गजरे आणि हार ह्यात वेगवेगळ्या प्रकारांनी फुले गुंफतात. फिरवून करायचा गजरा, सुईत ओवून करायचे जुईसारख्या नाजूक फुलांचे गजरे, एकाच धाग्याने दोन बोटांवर दोरा फिरवून अर्धवट गाठ मारायचा गजरा( ह्याला बहुतेक कदंबा किंवा असे काहीतरी नाव आहे. जागू ताईने लिहिले आहे कुठेतरी. ) पुन्हा जाडसर सुताने देठ आणि पाकळ्यांवर इंग्रजी 8 किंवा S सारखा पीळ घालून करायच्या वेण्या, शेवंतीसारख्या चपट्या फुलांना अंगठ्यावरच्या दोन दोऱ्यांमध्ये एकापुढे एक ठेवून फुलाच्या पृष्ठभागावरून धागा घेऊन करायच्या वेण्या, (आता ह्यासाठी अंगठ्यावरच्या धाग्याऐवजी धातूची लवचिक पातळ तार वापरतात. त्यामुळे वेणी घट्ट मुट्ट राहाते.) शिवाय एक थरी, दोन थरी वेण्या असतात. म्हणजे दोन वेगळी फुले, एक लांब देठाचे, दुसरे लहान म्हणजे सोनटक्का आणि जांभळी कोरांटी किंवा अस्टर आणि त्यात पिवळी/ सफेद शेवंती, लिली आणि गुलछडी (निशिगंधा) वगैरे एकत्र गुंफून करायच्या वेण्या वगैरे. गुलाबाच्या पाकळ्यांना वेगवेगळ्या फुलांसमवेत गुंफून सुंदर हार करतात. दादर फुलबाजारात कितीतरी सुंदर प्रकार बनताना दिसतात. दादरची मिनी आवृत्ती म्हणजे सेंट्रल माटुंगा. इथे माडाच्या कोवळ्या पाती, सुपारीची फुले वगैरे वापरून छान सजावट करून मिळते. दाक्षिणात्य पद्धतीचे फुलांचे टोप, वेणीपट्टी...सुंदर असतं सगळं.

सगळ्यांना धन्यवाद.

हीरा , मस्त प्रतिसाद.

परत केली वेणी तर नक्की व्हिडीओ दाखवते. तो पर्यंत ही गुलबक्षी ची वेणी पहा ( थोडं झूम करून बघा नीट दिसेल. )

20210116_144737.jpg

मनीमोहोर, तुमच्या दोन्ही फोटोतल्या वेण्या सुरेख आहेत. आकर्षक रंगांमुळे गुलबक्षीची वेणीसुद्धा खुलून दिसतेय .

सुरेख
गणपती गौरीला आवर्जून गुलबक्षीच्या वेण्या करायचो

माझी आई, आजी आणि बाबा सुद्धा बनवत. मी कधीच लक्ष नाही घातले पण आता बाटते शिकायला पाहिजे होतं तर इतली फुलं अशी मिळत नाहीत.

सर्वांना धन्यवाद प्रतिसादासाठी .

उन्हाळ्यात बागेतली अबोली खूप फुलत होती. म्हणून त्याची ही केली वेणी. खूप सुन्दर दिसत होती आणि टिकली ही छान दोन तीन दिवस.

20210425_170239_1.jpg

Pages