गेल्या भागात आपण नदीचा उगमापासून सपाटीवर येईपर्यंतचा प्रवास पाहिला. नदीला पूर का आला पाहिजे, riparian zone चे महत्त्व याविषयी देखील बोललो. आता या भागात आपण नदीचा मुखापर्यंतचा प्रवास आणि नदीच्या विविध इकॉलॉजिकल सेवा यांविषयी जाणून घेऊ या.
जिज्ञासा: आपण सगळेजण कोणत्या ना कोणत्या तरी नदीशी जोडलेलो असतो म्हणजे प्रत्येक शहरात गावात एक तरी नदी असतेच आजूबाजूला. पण आपण ज्या नदीच्या रूपांविषयी बोललो ती जर कोणाला प्रत्यक्ष बघायची असतील तर कोणती ठिकाणं आहेत जिथे आपण जाऊ शकतो?
केतकी: पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक या शहरांच्या पश्चिमेला गेलो की मग या नद्यांचा बऱ्यापैकी संरक्षित आणि नैसर्गिक स्थितीत असलेला भाग बघायला मिळतो. आणि जर सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये गेलो तर आपल्याला नदीच्या उगमाच्या प्रदेशात असलेल्या परिसंस्था जसे धबधबे, छोटे ओहोळ, झरे इत्यादी पहायला मिळतात.
जिज्ञासा: आता आपण नदीच्या शेवटाकडे जाण्याआधी नदीच्या भोवताली असलेली जैवजीविधता किंवा त्यातले परस्परसंबंध या बद्दल थोडं सांगशील का?
केतकी: जर नदीच्या जैवविविधतेचा विचार केला तर दोन्ही वनस्पती आणि प्राणी यात भरपूर कॉम्प्लेक्स परस्परसंबंध आढळतात. काही invertebrates चा आपण मगाशी उल्लेख केला पण ज्या फूड चेन्स आहेत त्यात हे सगळे एकमेकांवर अवलंबून आहेत. पाण्यात उगवणारं शेवाळं, ते खाणारे छोटे invertebrates, त्यांना खाणारे मोठे invertebrates, मग छोटे मासे, त्यांना खाणारे मोठे मासे, पाणसाप, आणि मग त्यांना खाणारे काही पक्षी (birds of prey) किंवा बगळ्यांसारखे पक्षी अशी लांबलचक आणि वैविध्यपूर्ण अन्न साखळी दिसते. काहींच्या मते फ्लेमिंगो पक्षांचा गुलाबी रंग हा एका प्रकारच्या mollusc (गोगलगायी सारखा प्राणी) ज्याचं गुलाबी कवच असतं त्याला खाल्ल्यामुळे येतो. अगदी सूक्ष्म अशा phytoplanktons आणि zooplanktons पासून mega fauna पर्यंत सर्व या अन्नसाखळीचा भाग असतात. जेवढी याची कॉम्प्लेक्सिटी जास्त तितकी ही इकोसिस्टिम अधिक स्थिर/टिकाऊ होत जाते. दुर्दैवाने आपल्याकडे नदीतल्या प्रदूषणामुळे phytoplanktons आणि zooplanktons हे सूक्ष्मजीव नष्ट झाले आहेत आणि दुसरं एक कारण म्हणजे आपल्याकडे खूप परदेशी माशांच्या जाती नदीत सोडल्या गेल्या आहेत - अगदी शासनाकडून अधिकृतपणे - तिलापिया, मरळ या सारखे मासे मत्स्यपालनासाठी सोडले गेले आहेत आणि ते खूप invasive झाले आहेत. त्यांचे अन्नसाखळीतले predators आपल्याकडे नसल्याने त्यांची अनिर्बंध वाढ होते आहे आणि ते आपल्याकडच्या माशांचे अन्न खाऊन टाकतात. त्यामुळे आपल्याकडचे नदीतले देशी मासे नष्ट होत आहेत. प्रदूषण आणि invasive माशांच्या जाती यामुळे आपल्या नद्यांमधली जैवविविधता झपाट्याने कमी होते आहे. उगमाच्या प्रदेशांत या परिसंस्था थोड्या प्रमाणात टिकून आहेत.
जिज्ञासा: आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊ या ज्यात सपाटीवरून नदी पुढे जाऊन समुद्राला मिळते. नदीच्या या प्रवासाविषयी आणि यातल्या इकॉलॉजी विषयी काय सांगशील?
केतकी: इथे आधी थोडं नदीच्या विविध टप्प्यात नदीचा वेग याबद्दल सांगते - उगमापाशी नदीचा वेग सर्वाधिक असतो. त्यामुळे तिथल्या पात्रात आपल्याला मोठे दगड आढळतात. सपाटीच्या प्रदेशात नदीचा वेग थोडा मंदावतो आणि मग या पात्रात आपल्याला वाळू आणि छोटे दगडगोटे दिसतात. नदीच्या शेवटच्या टप्प्यात जेव्हा नदी अतिशय मंद गतीने वाहते तेव्हा आपल्याला तिच्या पात्रात आणि आजूबाजूला प्रामुख्याने अत्यंत सुपीक अशी गाळाची माती दिसते.
प्रकाशचित्र: नदीतील दगड आणि गाळ (https://oikos.in/html/monthcalendaryear.php?year=2018&month=5)
आता नदी जिथे समुद्राला मिळते त्या भागाला नदीचं मुख असं म्हणतात. तर नदी दोन प्रकारे समुद्रात मिळते - एक म्हणजे खाडीच्या रूपात जे आपल्याला पश्चिम किनारपट्टीवर पहायला मिळतं. आणि दुसरा प्रकार म्हणजे त्रिभुज प्रदेश - हे प्रदेश आपल्याला ज्या गाळाच्या नद्या असतात त्यांच्या बाबतीत पहायला मिळतात. या नद्या जेव्हा किनाऱ्याच्या जवळ येतात तेव्हा त्यांचा प्रवाह अनेक छोट्या नद्यांमध्ये (distributaries) विभागला जातो आणि यातून एक त्रिकोणी आकाराचा प्रदेश तयार होतो ज्याला त्रिभुज प्रदेश (delta) म्हणतात.
त्रिभुज प्रदेश तयार होण्याचं एक प्रमुख कारण समुद्र पातळी आणि जमीन यात फारसा उंचीचा फरक नसणे - स्लोप खूप मंद असेल तर मग नदीचा वेगही खूप मंदावतो. अशावेळी आणलेला गाळ हा तिथेच पडून राहतो आणि मग नदी छोट्या नद्यांमध्ये विभागली जाते. खाडी जिथे असते तिथे समुद्राची पातळी आणि नदीची पातळी यात फरक असतो. त्यामुळे नदीचे पाणी बऱ्यापैकी वेगाने समुद्रात शिरताना आढळते. या प्रदेशात समुद्राचं पाणी देखील जवळपास ३० किमी पर्यंत आत शिरू शकतं. भरतीच्या वेळी समुद्राचं पाणी नदीत मिसळताना दिसतं. त्रिभुज प्रदेश आणि खाड्या या दोन्ही ठिकाणी खाऱ्या गोड्या पाण्याच्या सरमिसळीमुळे एक विशेष परिसंस्था दिसते - ती म्हणजे खारफुटीची जंगलं. ही एक प्रकारची वेटलँड इकोसिस्टिम आहे. या ठिकाणी नदीच्या गाळामुळे चिखलमय माती असते जिच्यात पाणी भरलेलं असतं आणि हवा नसते त्यामुळे मातीत anaerobic (प्राणवायू किंवा हवा नसल्याची) स्थिती तयार होते. महेश शिंदीकर या आमच्या मित्राने या जंगलांचे एका कवितेत उत्तम वर्णन केलं आहे -
माझ्यासाठी रचिल्या गेल्या चिखलाच्या वाटा
पायावरती सतत झेलितो मी सागर लाटा
अशा स्पेशल हॅबिटॅटशी जुळवून घेत या खारफुटीच्या वनस्पतींनी अनेक adaptations बदल केलेले दिसतात. या चिखलात उभं राहता यावं यासाठी या झाडांना prop roots म्हणजे आधारमुळं असतात. शिवाय या मातीत मुळांना श्वास घेता येत नाही यामुळे जमिनीच्या वर काही मूळं आलेली दिसतात त्यांना breathing roots म्हणतात. तिसरा बदल म्हणजे या झाडांची जी फळं असतात ती फांद्यावरच रुजायला लागतात. त्यातून एक मोठं लांब आणि जड असं खोड बीपासून झाडाच्या फांदीवरच तयार होतं. हे नवीन रोप जेव्हा खाली जमिनीत पडतं तेव्हा जड असल्याने ते चिखलात रुतून बसतं. जर नुसते बी झाडावरून खाली पडले तर समुद्राच्या भरतीच्या पाण्याबरोबर ते वाहून समुद्रात जाण्याची भीती असते हे टाळण्यासाठी हा बदल झालेला दिसतो. शिवाय ही फळं देखील जरा विशेष जड असतात.
महेशच्या कवितेत याचं छान वर्णन करणारी ओळ आहे - फांद्यावरती असती चालू यांची पाळणाघरे!
अशा विशेष प्रकारची झाडे या ठिकाणी आपल्याला दिसतात. या खारफुटीच्या जंगलांची इकॉलॉजिकल सेवा अशी की जेव्हा सुनामी आली तेव्हा ज्या ठिकाणी ही खारफुटीची जंगलं शिल्लक होती तिथे सर्वात कमी नुकसान झालं. कारण या जंगलांनी काही अंशी सुनामी अडवून धरली. Wetland असल्याने सुनामीचं जास्तीचं पाणी इथे काही प्रमाणात शोषलं गेलं. शिवाय या जंगलांचे इतर अनेक उपयोग आहेत- इथल्या झाडांची लाकडे जळण म्हणून किंवा बांधकामासाठी वापरतात. काही ठिकाणी या जंगलात मधमाशी पालन करतात कारण इथल्या फुलांमध्ये मकरंद जास्त असतो.
जिज्ञासा: या जंगलात कोणती झाडं, वनस्पती, प्राणी दिसतात?
केतकी: आपल्याकडे या जंगलांना कांदळवन पण म्हणतात कारण इथे कांदळ जातीचं झाड (Rhizophora) मुख्य दिसतं किंवा मुंबईत तिवरांची झाडे (Avicennia marina) दिसतात. याच्या बरोबरीने Sonneratia च्या जाती दिसतात. यांची स्थानिक नावं वेगवेगळी असतात. खारफुटीची जमीन आणि नेहमीची जमीन यात जो मधला बफर भाग असतो तिथे आपल्याला काही mangrove associates दिसतात. जी खूप युनिक असतात. इथली जैवविविधता अनेक प्रकारची असते. बरेच मासे हे समुद्रातून उलटे येऊन खारफुटीच्या चिखलात (mudflats) अंडी घालतात. अनेक खेकड्यांच्या जाती, पक्षांच्या जाती इथे दिसतात. इथे एक mudskipper नावाचा मासा दिसतो तो साप आणि मासा यातला मधला प्रकार असावा असा दिसतो - तो पाण्यात पोहू ही शकतो आणि चिखलात घसरू पण शकतो.
खारफुटीचं जंगल म्हणून सुंदरबन सगळ्यांना माहितीच असेल - हे त्रिभुज प्रदेशात आहे त्यामुळे इथे थोड्या वेगळ्या जाती दिसतात - इथे दिसणाऱ्या सुंदरी (Heritiera fomes) नावाच्या खारफुटीच्या झाडामुळे या जंगलाला सुंदरबन नाव पडले आहे. जगातील सर्वात मोठ्या खारफुटीच्या जंगलांपैकी हे एक जंगल आहे आणि याची खूप मोठ्या प्रमाणावर कार्बन डाय ऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता आहे - जवळपास चार कोटी टन.
जिज्ञासा: बापरे इतका कार्बन डाय ऑक्साईड! ही एक मोठी इकोलॉजिकल सेवाच आहे या प्रदेशाची! आता पुढचा प्रश्न असा की जेव्हा आपण एखाद्या नदीकाठी जातो तेव्हा काय गोष्टी बघायला पाहिजेत?
केतकी: अनेक गोष्टी बघण्यासारख्या असतात - मुख्य म्हणजे नदीचं पात्र कसं आहे? पात्रात काय काय दिसतंय? दगडगोटे आहेत की मोठे दगड (boulders) आहेत की अगदी बारीक वाळू आहे? म्हणजे गमतीने मी म्हणते की जर डोळ्यावर पट्टी बांधून आपल्याला एखाद्या नदीच्या पात्रात नेलं तर केवळ sediments वरून आपल्याला कळू शकतं की आपण नदीच्या कुठल्या टप्प्यात आहोत ते! मग तिथे कोणत्या microhabitats दिसत आहेत का - म्हणजे डबकी, खळगे, किंवा नदीच्या पात्रात बऱ्याचदा छोटी बेटं दिसतात जिथे थोडी माती साचून गवतं उगवलेली दिसतात. ही बेटं पुराच्या वेळी पाण्याखाली जातात. ही सारी ठिकाणं उत्तम आसरे असतात सर्व प्राण्यांसाठी. नदीच्या काठी किंवा पात्रात कोणती झाडी आहे? उदाहरणार्थ शेरणी नावाचं एक झुडूप केवळ नदीच्या पात्रात दिसतं. या झाडाची गम्मत म्हणजे यात थोडी साबणासारखी फेस येणारी रसायनं असतात त्यामुळे पूर्वी बायका कपडे धुवायला हे झुडूप वापरायच्या! तर या सगळ्या गोष्टी पाहायच्या.
शिवाय नदीचे काठ कसे आहेत? म्हणजे आपण मगाशी बोललो त्या प्रमाणे riparian zone मधली कोणती झाडं दिसत आहेत का ते बघावं. जर झाडं असतील तर त्या झाडांवर पक्षांनी घरटी केली आहेत का? कोणते पक्षी दिसत आहेत? या साऱ्या गोष्टी आपण सहज बघू शकतो.
आम्ही बरेचदा लहान मुलांना नदीकाठी गेल्यावर करायला सांगतो ती गोष्ट म्हणजे चित्र काढणे. नदीच्या काठी शांतपणे बसायचं आणि आजूबाजूला जे काही दिसतंय त्याचं चित्र काढायचं! आणि मग चित्रातल्या एका एका गोष्टीला नावं द्यायची. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीला काय म्हणतात हे माहिती जरी नसेल तरी त्याचं थोडक्यात वर्णन करू शकतो. जे जे दिसतंय त्याचं चित्र काढायचं. असं चित्र काढलं की त्यात त्या इकोसिस्टिमचे बरेचसे भाग आलेले दिसतात.
आता यापुढे जाऊन मग काही associations किंवा परस्परसंबंध दिसतात का हे नोंदवता येतं. म्हणजे नदीपात्रात शेरणीचं झाड दिसतं, हळदकुंकू असेल तर फुलपाखरं कोणती दिसत आहेत हे पाहता येतं. साचलेलं पाण्याचं डबकं असेल तर सहसा Kingfisher दिसतो - यात कोणत्या प्रकारचा Kingfisher दिसतो यावर आपल्याला डबक्यातल्या पाण्याची गुणवत्ता कळू शकते! म्हणजे white throated kingfisher हा सगळीकडे दिसतो. पण Pied kingfisher नावाचा पक्षी मात्र स्वच्छ पाण्याच्या जागीच दिसतो. पाणी प्रदूषित असेल तर मग बरेच indicators असतात. राखी वंचक (Black-winged stilt) नावाचा एक पक्षी आहे जो जिथे नदीत सांडपाणी सोडलं जातं त्या भागात मुख्य करून दिसतो. दिसायला छान पक्षी आहे. पण तो जर तुम्हाला नदीकाठी दिसला तर समजायचं की इथे आसपास कुठेतरी सांडपाणी नदीत सोडलं जातंय म्हणून!
प्रकाशचित्र: नदी आणि प्राणी जीवन (https://oikos.in/html/monthcalendaryear.php?year=2018&month=6)
जिज्ञासा: आपण या आधीच्या गप्पांमध्ये याचा थोडासा उल्लेख झाला आहे तरी नदीच्या इकॉलॉजिकल सेवा कोणत्या हे अधिक विस्ताराने सांगशील का?
केतकी: काही सेवांचा उल्लेख आपल्या गप्पांच्या ओघात झाला आहे. पण सगळ्यात मोठी नदीची सेवा ही की ती पाणी गाळून शुद्ध करत असते. अगदी जरी प्रदूषण करणारे घटक नदीच्या पाण्यात मिसळले तरी जर त्यांचं प्रमाण योग्य असेल तर नदी वाहताना ते ट्रीट करू शकते. जर शून्य किलोमीटरला काही प्रदूषक नदीच्या पाण्यात सोडले तर ३५ किलोमीटर नदीच्या प्रवाहात राहिल्यावर ते प्रदूषक नाहीसे झालेले दिसतात. प्रत्येक नदीची प्रदूषके वाहून नेताना शुद्ध करण्याची जी क्षमता असते तिला carrying capacity म्हणतात. अर्थात आपण आज करत असलेलं प्रदूषण हे नदीच्या carrying capacity च्या पेक्षा कित्येक पटीने जास्त आहे त्यामुळे आपल्याला ही सेवा तितकीशी उपयोगी राहिलेली नाही त्यामुळे आपल्याला वेगळे filtration plants किंवा sewage treatment plants बसवावे लागतात. दुसरी सेवा म्हणजे पिण्याच्या पाण्याचा स्रोत म्हणून नदीचं महत्व - अर्थात काही प्रमाणात भूजल देखील पिण्यासाठी वापरले जाते. पण प्रामुख्याने आपण या नद्यांवरतीच अवलंबून असतो.
मत्स्योत्पादन ही एक मोठी सेवा आहे. यातून नदीकाठी राहणाऱ्या अनेक लोकांना रोजगार मिळतो. शिवाय नदीतले मासे हे अन्नाचा एक स्रोत ही आहेत. आपल्याकडे नदीतल्या माशांच्या अनेक देशी जाती आहेत उदाहरण द्यायचं झालं तर मळ्या नावाचा मासा आहे जो कातकरी लोक आवडीने खातात. केवळ मासेच नाही तर खुब्या नावाचा एक mollusc चा प्रकार आहे जो आवडीने खाल्ला जातो. अनेक खेकडे खाल्ले जातात. या पारंपरिक आहारातून अनेक पोषणमूल्ये मिळतात.
जिथे वाळवंटसदृश्य semi arid भागातून नदी वाहते तिथे आपल्याला संपूर्ण जीवन हे नदीकाठी केंद्रित झालेलं दिसतं.अशा नद्यांना exotic rivers असे म्हणतात. उदाहरण बघायचं तर नाईल नदीचं किंवा कोलोरॅडो नदीचं देता येईल - अशा ठिकाणी अन्नाच्या पुरवठ्यासाठी तिथले लोक हे संपूर्णपणे नदीवर अवलंबून असतात. ही देखील नदीची मोठी सेवाच आहे.
इतर ठिकाणी देखील नदीने वाहून आणलेल्या गाळाच्या जमिनीत उत्तम शेती होते. नदीच्या प्रवाहाच्या वेगामुळे खडकांची झीज होते आणि त्यातून देखील काही गाळ तयार होतो. अशा गाळाच्या जमिनीत अनेकदा काहीही खतं घालायला लागत नाहीत कारण या नदीच्या गाळात पाणलोट क्षेत्रांच्या जंगलांमधून आलेली सर्व पोषकद्रव्यं असतात. आपल्याला सर्वांना कृष्णेकाठची वांगी किती चवदार असतात हे माहिती असेलच. अनेकदा अशा भाजीपाला किंवा पिकांना अधिक भावही मिळतो. या साऱ्या नदीच्या सेवा म्हणता येतील.
जिज्ञासा: अमेरिकेतले न्यूयॉर्क शहर हे खरे तर नदीच्या इकॉलॉजिकल सेवेसाठी देखील प्रसिद्ध असायला हवे! पण अनेक जणांना याबद्दल काहीच माहिती नसते. तर या संपूर्ण प्रकल्पाबद्दल थोडक्यात सांगशील का?
केतकी: आपण सुरुवातीला नदीच्या पाणलोट क्षेत्राबद्दल बोललो. आता या पाणलोट क्षेत्रात जे घडतं त्याचं प्रतिबिंब आपल्याला नदीच्या पाण्यात पडलेलं दिसतं. जर आपण या पाणलोट क्षेत्राला संरक्षण देऊ शकलो तर काय घडू शकतं आणि नदीची पाणी पुरवण्याची सेवा ही किती उत्तम प्रकारे उपयोगात आणता येते हे या उदाहरणावरून आपल्या लक्षात येईल. न्यूयॉर्क शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यापैकी ९०% पाणी microbial contamination साठी कोणतीही filtration प्रक्रिया न करता पुरवलं जातं. आपण पुण्यातल्या मुठेचं पाणी filtration न करता पिण्याची कल्पनाच करू शकत नाही! पण न्यूयॉर्क शहराने १९९३ पासून ही व्यवस्था यशस्वीपणे राबवलेली आहे. शहराला पुरवठा करणाऱ्या जलाशयातून पाणी एका मोठ्या mesh मधून गाळलं जातं मोठा कचरा म्हणजे मेलेले मासे वगैरे बाजूला करण्यासाठी. पुढे ते पाणी chlorinate करतात आणि शहराला पुरवतात. १९९३ पासून का? तर त्या आधी पण याच प्रकाराने पाणी पुरवठा होत होता. पण ९३ साली त्यांना पिण्याच्या पाण्यात पहिल्यांदा microbial contamination आढळले जे EPA (Environmental Protection Agency) ने ठरवलेल्या प्रमाणापेक्षा अधिक होते. मग त्यावेळी फिल्ट्रेशन प्लांट बसवण्याची गरज निर्माण झाली. त्यावेळी त्याचा खर्च होता आठशे कोटी रुपये! सिनेटर केनेडीचा मुलगा रॉबर्ट एफ केनेडी या नेत्याने त्यावेळी पुढाकार घेऊन या प्रश्नाचा अभ्यास केला. त्यांच्या असं लक्षात आलं की ज्या पाणलोट क्षेत्रातून पाणी पुरवठा होत होता त्या, म्हणजे कॅटस्कील आणि डेलावेर या दोन हडसन नदीच्या ट्रिब्युटरी नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात बदल होत होते. तिथली जंगलं तोडून तिथे रासायनिक शेती, गोल्फ कोर्सेस, फार्म हाऊस, पर्यटन, काही उद्योगधंदे अशा गोष्टी सुरु झाल्या होत्या. त्यामुळे पाणलोट क्षेत्रात प्रदूषण वाढलं होतं. आणि त्यामुळे पाण्यातलं सूक्ष्मजंतूंचं प्रमाण वाढलं होतं. या अभ्यासानंतर केनेडी यांनी असा प्रस्ताव मांडला की फिल्ट्रेशन प्लांट उभा करण्याऐवजी आपण या पाणलोट क्षेत्राचं पुनरुज्जीवन आणि संरक्षण करू. पूर्वी जसा परिसर होता तसा पुन्हा निर्माण करू. आणि नदी जर तिच्या नैसर्गिक प्रवाहात वाहीली आणि जर काही प्रदूषण नसेल तर पाणी शुद्ध करण्याची गरज पडणार नाही. त्याने सुचवलेल्या पर्यायाचा खर्च होता दीडशे कोटी रुपये. अर्थात अशा कमी खर्चिक पर्यायात फार कमी लोकांना रस होता! सगळीकडे माणसे सारखीच असतात! पण मग असा पर्याय निघाला की तुमची योजना आम्हाला सिद्ध करून दाखवा - मग पुढची ४ वर्षे रॉबर्ट केनेडी यांनी त्यावर काम केलं - अनेक लोकांच्या सभा घेतल्या, पाणलोट क्षेत्रातल्या शेतकऱ्यांशी, इतर स्टेकहोल्डर्सशी चर्चा केली, लोकांची मनं वळवली. शेतकऱ्यांना riparian zone राखण्यासाठी मोबदला देऊ केला. प्रदूषणाचे स्रोत शोधून तिथे ट्रीटमेंटची सोय केली. मोठ्या प्रमाणावर sewage treatment plants उभे केले. यात बराच विरोधही झाला पण शेवटी सरकारने ही योजना मान्य केली आणि Filtration Avoidance Determination waiver पास केलं. अशा प्रकारे ८०० कोटीच्या ऐवजी १५० कोटी खर्च झाला. ५० कोटी maintenance साठी बाजूला ठेवले. यातला सगळ्यात जास्त खर्च न्यूयॉर्कच्या व्यवस्थापनाने उगमाच्या क्षेत्रातल्या बऱ्याचशा जमिनी विकत घेण्यावर केला! जमिनी सरकारी मालकीच्या झाल्यावर उगमाच्या भागाचे उत्तम रीतीने संरक्षण केले गेले. तिथली जंगलं टिकून राहिली. नदीच्या काठी असलेल्या वसाहतींना मोबदला देऊन riparian झोन राखला. या प्रयत्नांमुळे आजही न्यूयॉर्कमधला ९०% पाणीपुरवठा हा नदीची इकॉलॉजिकल सेवा वापरून होतोय.
जिज्ञासा: ही माहिती फारच नवीन आणि रोचक आहे! या दोन भागांत आपण नदीच्या परिसंस्थेविषयी बोललो. यातून आपल्या वाचकांना नदीच्या इकॉलॉजी विषयी काही नवीन माहिती नक्की मिळाली असेल याची मला खात्री आहे. आजच्या गप्पांमध्ये इथे थांबूया. पुढच्या भागात एका नवीन परिसंस्थेबद्दल गप्पा मारूया!
या मालिकेचा पुढचा भाग पुढील सोमवारी प्रकाशित होईल.
आधीचे भाग
भाग १: नातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग १
भाग २: नातं निसर्गाशी - पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः - भाग २
भाग ३: नातं निसर्गाशी - सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम्
भाग ४: नातं निसर्गाशी: अंजन कांचन करवंदीच्या काटेरी देशा
भाग ५: नातं निसर्गाशी: गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती - भाग १
गेल्या भागावर काहीच प्रतिसाद
गेल्या भागावर काहीच प्रतिसाद आले नाहीत. काही तांत्रिक अडचण आहे का हे कळायला मार्ग नाही म्हणून तो भाग देखील वर काढत आहे.
हा भाग अजून वाचायचा राहिला
हा भाग अजून वाचायचा राहिला आहे. तुमची शैली छान आहे. परंतु तुम्ही दर भागात जी संस्कृत वचने वापरता, त्यात चुका असतात. ह्या भागाच्या शीर्षकात :
गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती >> गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति असं पाहिजे
गंगा यमुना या नद्या( ४-५ कोटी
गंगा यमुना या नद्या( ४-५ कोटी वर्षे) नर्मदा/तापी /कावेरी/गोदावरी,/कृष्णा ( ५-२०० कोटी वर्षे )यांच्यापेक्षा नवीन आहेत तरी देवत्व घेऊन बसल्या आहेत. गंडकीत शाळिग्राम मिळतात ( आता संपले.) यमुनेला कासव वाहन दिले. गंगेला मकर. गंगेत जे काही आंधळे डॉल्फीनस आहेत त्यालाच काल्पनिक मकररूप दिले असावे.
हे दोन्ही लेख आवडले.
वारसा पुस्तक issue app मधून
वारसा पुस्तक issue app मधून आणि ब्राउजरमधून डाऊनलोड करून उघडले. पण पेजेझ मोठी करता आली नाहीत. एका लांब फिल्मरोलवर असल्यासारखे येतात मोबाईलवर. जाऊ दे.
हरचंद पालव, धन्यवाद, बदल केला
हरचंद पालव, धन्यवाद, बदल केला आहे! माझं मराठी शुद्धलेखन इतकं चांगलं नाही आणि ही लेखमाला मी सध्या तरी कोणाकडून मुद्रितशोधन करून घेत नाहीये कारण मला असे कोणी सापडले नाहीये. तुमची इच्छा असेल तर मला तुमचा इमेल ऍड्रेस संपर्कातून कळवाल का? मी तुम्हाला हे लेख प्रकाशित करण्याआधी तपासणीसाठी पाठवू का? गंभीरपणे विचारते आहे. किंवा लेख प्रकाशित झाल्यावर संपादनाच्या मुदतीत जरी बदल सुचवलेत तर मग मी ते नक्की करू शकेन.
Srd, खरंय काय अफाट वय आहे या दक्षिणेतल्या नद्यांचं! मला हे कळल्यावर इतकं भारी वाटलं होतं! तुमचा वारसाच्या ईबुकबद्दलचा अभिप्राय केतकी पर्यंत पोहोचवते. काहीतरी बदल करून पुस्तक अधिक वाचनीय (readable) करता आले तर छानच होईल.
खूप छान चालू आहे लेखमाला.
खूप छान चालू आहे लेखमाला. कित्येक गोष्टी माहितीच नव्हत्या असं लक्षात येतंय हे वाचून.
उत्तम उपक्रम , जि!
हाही लेख आवडला. नदी तिचा
हाही लेख आवडला. नदी तिचा प्रवाह आजुबाजूची जागा, झाडे हे सगळंच कायम फॅसिनेटिंग वाटतं.
नदी पाणी शुद्ध करते हे इंट्युटिव्हली समजले तरी ते नक्की कसे होते याबद्द्ल वाचायल आवडेल. जास्त प्रदुषकांची घनता मोठ्या प्रमाणातील पाण्याने, जमिनीने रिडिस्ट्रिब्युट होऊन कमी होते. काही वनस्पती/ प्राणी ही दुषिते शोषुन घेतात आणि परस्परपूरक सहजीवन जगतात असंच असावं. पण ह्या वनस्पती या भागात कशा उत्कांत झाल्या असाव्यात? त्या कुठे आढळतात आणि कुठे आढळत नाहीत असं काही दिसतं का? म्हणजे जास्त प्रदुषित ठिकाणी आहेत आणि अदरवाईज? ही उत्कांती आहे का फरक न करता येण्याने आंधळेपणे केलेली प्राणीमात्रांची सेवा?
न्यूयॉर्कचे उदाहरणही आवडले.
फारच मस्त माहिती.
फारच मस्त माहिती.
नदीच्या मुखाबद्दलची फार माहिती नाही. मला कृष्णा गोदावरी कावेरी यांच्या आंध्र / तमिळणाडू येथील योगदानाबद्दल वाचायला आवडेल. आपल्याकडे कोकणातल्या नद्या या छोट्या आहेत त्यापेक्षा या नद्यांची पात्रे विशाल पाहिली आहेत आणि तेथील प्रदेश सुद्धा वेगळा वाटतो.
वारसाच्या ईबुकबद्दलचा
वारसाच्या ईबुकबद्दलचा अभिप्राय
ते पुस्तक कुठेतरी नेटवर ठेवावं लागतं ते त्यांनी ISSUU या साईटवर ठेवलंय. तर त्या साइटच्या format मुळे तसं होत असेल.
दुसरे पर्याय पीडिएफ / इपब कुठेतरी ठेवायला हवेत. स्वत:च्या/ oicos च्या वेबसाईटवर ठेवायला तेवढी मेमरी घ्यावी लागेल. केतकीने ते पर्याय तपासलेच असतील. अन्यथा mediafire 10gb free storage hosting देतेच.
नदी पाणी शुद्ध करते हे
नदी पाणी शुद्ध करते हे इंट्युटिव्हली समजले तरी ते नक्की कसे होते याबद्द्ल वाचायल आवडेल. जास्त प्रदुषकांची घनता मोठ्या प्रमाणातील पाण्याने, जमिनीने रिडिस्ट्रिब्युट होऊन कमी होते. काही वनस्पती/ प्राणी ही दुषिते शोषुन घेतात आणि परस्परपूरक सहजीवन जगतात असंच असावं. -अमितव.
परस्परपूरक सहजीवन म्हणजे कुजणारे पदार्थ खाणारे छोटे जीव. तर यांना ओक्सीजन, जागा आणि वेळ नदीत उपलब्ध होते.
नदीत कुजणारे पदार्थ थोडे असतात आणि शहराच्या सांडपाणी नाल्यात म्हणजे कुजणाऱ्या पदार्थांची नदीच ती. तर त्यासही भरपूर वेळ ,जागा दिल्यावर पाणी स्वच्छ होईल. तसा प्रयोग हा पुण्याच्या ओशो आश्रमात केलेला म्हणतात. नाल्याला वळणावळणाने फिरवून वेळ वाढवला आणि काठाला काही खास झाडे लावलेली. मला हे कळलं तेव्हा अध्यात्मासाठी नाही तर या प्रयोगासाठी तिथे जायचं होतं. पण तो आश्रम बंद झाला असं कळलं. शिष्यलोकांत बरेच पर्यावरण गुरु होते त्यांनी त्याचे डिझाईन केले होते.
खुप सुन्दर व महितिपुर्ण
खुप सुन्दर व महितिपुर्ण लेखमाला आहे. नदीबद्दल कधी कुठे वाचले नाही..
काही हरकत नाही, जिज्ञासा.
काही हरकत नाही, जिज्ञासा. नक्की कळवतो. माझी थोडीफार मदत झाली तर आनंदच होईल.
माला आवडते आहे.
माला आवडते आहे.
मी पण वाचते आहे. अभ्यासपूर्ण
मी पण वाचते आहे. अभ्यासपूर्ण मालिका आहे.
Rmd, साधना, हीरा, सी, आवर्जून
Rmd, साधना, हीरा, सी, आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!
अमितव, srd यांनी उत्तर दिले आहेच तुझ्या प्रश्नाचे. मला जी माहिती आहे त्यानुसार प्रदूषके नष्ट करण्याची प्रक्रिया म्हणजे थोडक्यात त्यांचे विघटन होत होत शेवटी बिनविषारी पदार्थात रूपांतर होणे याला bioremediation असं म्हणतात. जरी प्रदूषण करणारे रसायन मानवनिर्मित असले तरी अनेकदा ते निसर्गातल्या कोणत्या तरी रसायनाशी साधर्म्य सांगणारे असते. त्यामुळे काही वनस्पती, सूक्ष्मजीव, किंवा बुरश्यांमध्ये जी enzymes असतात ती या रसायनांचे विघटन करू शकतात. ही तू म्हणतोस तशी फरक न करता आल्याने केलेली सेवा असते. हे असं करू शकणाऱ्या वनस्पती प्रदूषित भागात जास्ती वाढतात असं म्हणणं तितकंसं बरोबर असणार नाही माझ्यामते. यातल्या काही प्रदूषणाच्या इंडिकेटर जाती असू शकतात. अस्थानिक आणि invasive वनस्पती मात्र अशा पाण्यात जास्त दिसतात उदाहरणार्थ जलपर्णी. मी अजून काही पॉईंट्स असतील तर विचारते केतकीला.
Srd, हे नव्हतं माहिती मला. आता बऱ्याच ठिकाणी grey water आणि black water treatment साठी अशी व्यवस्था असते. मी इतक्यात पॉण्डेचेरीच्या ऑरोव्हिल मध्ये अशी व्यवस्था आहे हे एका व्हिडीओ मध्ये पाहिलं.
धनि, मी विचारते हा प्रश्न केतकीला.
हरचंद पालव, धन्यवाद!
बऱ्याच ठिकाणी grey water आणि
बऱ्याच ठिकाणी grey water आणि black water treatment साठी अशी व्यवस्था असते. मी इतक्यात पॉण्डेचेरीच्या ऑरोव्हिल मध्ये अशी व्यवस्था आहे हे एका व्हिडीओ मध्ये पाहिलं.
तांत्रिकरीत्या विघटनाची माहिती असली तरी प्रत्यक्षपणे कार्यक्षमरीत्या विघटन होईलच असं नाही. पॉण्डेचेरीच्या ऑरोव्हिल मध्ये शक्य होत असेल. म्हणजे त्यांच्याच वस्तीतले सांडपाणी स्वच्छ होत असेल. शहरातले सांडपाणी हे निरनिराळे disinfectant मिसळलेले असते. ते केमिकल वाईटाबरोबरच चांगले घाण कुजवू शकणारे सूक्ष्मजीवही मारत असणार. शिवाय दर दिवशी येणारे पाण्याचे प्रमाण पाहता ठराविक संयत्राच्या शक्तिबाहेर होईल.
(( पूर्वी तालुकावारी शालेय विज्ञान प्रदर्शने भरत त्यामध्ये 'सांडपाणी स्वच्छ करून खत करणे, पाणी स्वच्छ करणे संयत्र' याची दोन चार मॉडेल्स माननीय ##** शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बनवलेली ठेवलेली असत. मुलांना प्रश्न विचारले की खूप उत्साहाने माहिती सांगत. ))