......... 'माया' आपल्या अंथरुणावर खिळली होती. तिच्या सुंदरश्या नाजूक चेहऱ्यावर एक मंदस्मित विलासित होते. कदाचित ती निद्रेत स्वप्नरंजनात गोड आठवणींना उजाळा देत असावी. वाऱ्याच्या झोताने खिडकीचा पडदा हेलकावे खात होता आणि अचानक 'आई!', 'आई!' असा आवाज आला. माया दचकून जागी झाली आणि आजूबाजूला बघू लागली पण कोणीच नव्हते. नंतर ती बिछान्यातून उठून खिडकीजवळ आली. खाली बघितले पण कोणीच दिसेना! एक गार वाऱ्याची झुळुक तिच्या मनाला स्पर्शून गेली. तिने घड्याळात बघितले रात्री बाराचे ठोके पडत होते. आकाश शुभ्र धवल चांदण्यांनी भरून आले होते जणूकाही आकाशाच्या कॅनव्हासवर पांढऱ्या ठिपक्यांची नक्षीदार रांगोळी चित्रबद्ध झाली होती. विशाखा नक्षत्राच्या दोन तारकांमध्ये 'शशी' सुशोभित झाला होता. आज हा कलंकित शशी निष्कलंक भासत होता आणि त्याचे दिव्य तेज अजूनच प्रकाशमान होत होते.
... नभात एक निरव शांतता पसरली होती. ती आपल्या बिछान्याकडे परत जाणार तोच पुन्हा तो आवाज आला. 'आई!', 'आई!' ती पुन्हा दचकली मागे वळून बघितले पण कुणाचाही मागमूस नव्हता. ती बिछान्यावर बसणार इतक्यातच तिच्या पोटाला कोणीतरी लाथ मारल्याची जाणीव झाली. तिने साडीचा पदर बाजूला केला आणि आपल्या पोटावरुन हात फिरवला तेव्हा तिला पोटात काहीतरी हालचाल सुरू असल्याचे जाणवले. 'माया' आपल्या उदराला मायेने गोंजारायला लागली तर विलक्षण, चमत्कारिक आवाज तिच्या कानी पडला. "आई! ये आई! 'मी' आहे! तुझा गर्भ!" हा कर्णप्रिय आवाज ऐकून ती चकित झाली.
माया: "तू होय माझ्या बाळा! तरी म्हटलं मघापासून कोण 'आई!', 'आई!' हाक मारत आहे? काय झालं बाळा तुला झोप नाही येत का?
गर्भ: "नाही! मुळीच नाही! आज मला तुझ्याशी बोलायचे आहे. तुझ्याशी संवाद साधायचा आहे.
माया: "अरे बापडे! आईसोबत बोलायचे! बोल ना मग!"
गर्भ:"आई मला तू कधी बाहेर काढणार? मला इथे फार कंटाळा आला आहे."
माया:"तुला होय! काढणार ना! पण अजून वेळ यायची आहे तुझ्या अवयवांची अजून पूर्णपणे वाढ नाही झाली ना! अजून दोन महिने अवकाश आहे तुला बाहेर यायला!"
गर्भ:"काय ग! अजून दोन महिने!"
माया:"हा बाळा! दोन महिने! तेव्हापर्यंत तु या उदराच्या विश्वातच विश्रांती घे!"
गर्भ: "हूऊऊ! ठीक आहे! पण दोन महिन्यानंतर नक्की ना!"
माया:"हो हो बाळा नक्की!"
गर्भ:"चालेल! आता मला सांग माझी जी वाढ होते ती कशामुळे?"
माया: "मी जे अन्न सेवन करते ना त्यातील पोषक द्रव्य तुला मिळतात त्यामुळे तुझं शरीर वाढत जातं!"
गर्भ: "असं होय! आई,ये आई! एक गोड आणि चिकटसा पदार्थ मला चाखायला मिळतो त्याला काय म्हणतात गं?"
माया: "अरेच्चा! तो तर आंबा! आंबा हे एक फळ आहे प्रत्येक गर्भवती स्त्रीला ते आवडते."
गर्भ:"आणखी गोड आणि थोडं आंबट पाणी पण कधी मिळतं मला ते काय असतं?"
माया:"ती होय! ती तर पाणीपुरी!"
गर्भ: "हूऊऊ! फार चविष्ट असते ती! मला फार आवडते म्हणून तर मी ती पाणीपुरी तुला रोज-रोज खायला सांगतो.
आणि अजून थोडं गोड आणि पांढरशुभ्र पाणी पण छान वाटतं मला ते काय?"
माया:"ते! ते तर शहाळं!"
गर्भ: "शहाळं म्हणजे?"
माया: "नारळ! नारळाचे पाणी! नारळ जेव्हा कच्चं असतं तेव्हा त्यामध्ये पाणी भरतं!"
गर्भ:"आणखी! आणखी!थंडगार मलईपण चाखायला मिळते मला! त्याला काय म्हणतात गं?"
माया: "अरे व्वा! तुला तर सगळेच माहित आहे. गुणी माझं बाळ! ती आहे थंडगार आइस्क्रीम ती वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये येते कधी 'स्ट्रॉबेरी', 'चॉकलेट',व्हॅनिला असे सगळेच फ्लेवर मी खाते.
गर्भ: "धन्य माझी मातोश्री! अरे पण कधी कधी तुझ्या हावरटपणामुळे मला त्रास होतो ना!"
माया:"कसं काय?"
गर्भ:"मला सर्दी होते ना!"
माया:"हूऊऊ! सॉरी बाबा आता जपून खानार!"
गर्भ: "हो मला तर होतोच! पण तुला पण होतो ना! तुझ्या पोटातच मी 'शी' करते आणि मग तुला उलट्यांचा त्रास होतो."
माया:"हो रे बाळा कधी कधी मला खूप उलट्या होतात."
गर्भ: ठीकेय! आता मला सांग तू संध्याकाळी ज्या गोष्टी वाचते त्या कशा मधल्या असतात?"
माया:"त्या महाभारतातल्या, गीतेमधल्या!"
गर्भ: "हूऊऊ! तो कवच-कुंडल असलेला मुलगा कोण?"
माया:"तो तर कर्ण!"
गर्भ:"त्याची गोष्ट मला खूप आवडते आणि चक्र धारण करणारा!"
माया: "चक्रधारी श्रीकृष्ण आणि त्याच्या हातात ते
सुदर्शन चक्र!"
"काय बाळा आज कसं काय रे तुला बोलावसं वाटलं माझ्यासोबत!"
गर्भ:"हूऊऊ!आहे त्याला विशेष कारण!"
माया: "कोणते? सांग ना!"
गर्भ:"आई! तू काल फार घाबरली होती. धापा टाकत मोठ- मोठ्याने ओरडत होती आणि रडतपण होती. पोटात नुसती कालवाकालव झाली. त्यामुळे माझे मन बेचैन झाले. मी विचार केला काय झालं असेल माझ्या आईला म्हणून मला राहवलं नाही आणि तुला झोपेतून जागं केलं! सांग ना काय झालं काल?"
माया: "किती काळजी करते माझं बाळ! आपल्या आईची! म्मू!
काल होय! तुझी आजी आणि तुझे बाबा काल भांडले माझ्यासोबत!"
गर्भ:"का?काय झालं?"
माया:"आता कसं सांगू तुला?"
गर्भ: "सांग ना! मी तर तुझाच अंशं आहे. माझ्यापासून काय लपवायचं!"
माया:"ठीकेय! सांगते बाबा सांगते."
"प्रत्यक्षात तुझ्या जन्माच्या स्वागतासाठी कोणी खूश नाही."
गर्भ: का?
माया:"कारण तू एक मुलगी आहे."
गर्भ: मुलगी आहे म्हणून काय झालं?"
माया: "अरे माझी राणी, छकुली तुला या जगाची रीत नाही माहिती! तू जेव्हा या पाशवी, मायावी दुनियेत येशील ना तेव्हाच कळेल तुला!"
गर्भ:"कसली जगाची रीत! सांग ना मला!"
माया: तुझ्या आजीला पहिलं बाळ 'मुलगा' हवा होता. मी जेव्हा गर्भवती झाले तेव्हा तुझ्या आजीने गर्भलिंगनिदान करायला सांगितले. मी त्यास नकार दिला तेव्हा तुझ्या आजीने तुझ्या बाबांकरवे माझ्याकडून जबरदस्तीने करून घेतले आणि जेव्हा माझ्या पोटात 'मुलगी' आहे हे कळल्यावर तुझ्या आजीने गर्भपात करायचा हट्टच धरला! मी त्याचा जोरदार विरोध केला. मी म्हणाले हे माझं बाळ आहे आणि या बाळाला मी जन्म देणार! मी पुरती पेटून उठले होते. एक स्त्री असून एका मुलीच्या जन्माला विरोध! मला हे सहनच नाही झाले. तेव्हापासून तुझ्या आजीने आणि बाबांनी माझ्यासोबत बोललणे टाकले."
गर्भ:"आई का गं! हे मुलीच्या जन्माला विरोध का करतात?"
माया:"म्हणे 'वंशाला दिवा' हवा यांना! वंशवेल वाढली पाहिजे आमची! अरे 'वंशाला दिवा' हवा पण त्या दिव्याला प्रकाशमान करणारी 'पणती' नको का? हेच काय सगळा जणमानस या दिव्यापायी जळून खाक झालेला आहे तरी पण अजूनही तीच री ओढतात. म्हणतात मुलगी म्हणजे जीवाला घोर! तिची अब्रू सांभाळावी लागते. तिच्या शिक्षणाचा, लग्नाचा खर्च उचलावा लागतो. हुंडा द्यावा लागतो. ही हुंड्याची प्रथा सुरू करणारा क्रूरकर्मा हा समाजच! तिने काही कमी-जास्त केले तर समाजामध्ये आमची इभ्रत वेशीला टांगणार! त्यामुळे मुलगी नसलेलीच बरी! अरे मुलगी नको तर मग या वंशाच्या दिव्याला जन्म कोण घालणार? एक मुलगीच ना! साधा सरळ विचार या समाजाला कळत नाही! काय म्हणावे या घाणेरड्या विचारसरणीला!"
गर्भ:"आई खरच हा 'समाज' मुलींना पोटातच मारतो!"
माया:"हो बाळा हे खरे आहे! मी या गर्भपाताला विरोध केला म्हणून तू वाचली! पण ज्या 'माया' दुबळ्या आणि लाचार आहेत त्या या गर्भपाताला बळी पडतात आणि कधीकधी आपल्या प्राणाची आहुतीपण द्यावी लागते त्यांना!"
गर्भ: 'आई' मुलगी म्हणजे नक्की काय असते?"
माया: 'मुलगी' 'बाळाची आई', 'भावाची बहीण', 'नवऱ्याची बायको', 'बालगोपाळांची आजी' अशा विविध नात्यांनी गुरफटलेली स्त्री असते.
"जन्मा आली लेक, बाप म्हणतो कचरा,
माय म्हणते असु द्या माझ्या जीवाला आसरा!"
सासरघरची वाट्याला आलेली वेदना, उपेक्षा या माऊलीची उपजत शिदोरीच असते. कधीकधी वेगवेगळ्या नात्यांनी दिलेली हीन वागणूक, पोरकेपणा आणि अपेक्षांचा केलेला भंग हे तर जन्मापासून स्त्री सोबत जोडलेलेच असते. ही जीवनकथा स्त्रीच्या दारिद्र्याची पण त्याहीपेक्षा अधिक वंचनेची असते. जगाची रीत तिला ठाऊक असते या दळभद्री समाजाच्या तऱ्हा ती जाणते आणि लोक व्यवहाराचे, मानवी स्वभावाचे मोठे मर्मभेदी निरीक्षणेही मांडते. स्त्रीची प्रतिभा, कल्पनाशक्ती, तिची निष्ठा, तिचे प्रेम यासोबतच अतीव करूणेने तिचे मन नेहमीच पाझरत असते. या कणखर, खंबीर माऊलीने या कष्टमयी जीवनाचा केलेला स्वीकार! त्या स्वीकारामागचे तिचे सामर्थ्य, तिचा झुंज देण्याचा कणखरपणा, तिच्या दुबळ्या जागा आणि आपली अनुभवचित्रे मनःपटलावर बिंबवणारी ती ' दिव्य प्रतिमा' असते.अद्भुत सहनशक्तीची नव्हे तर सहनसिद्धीचे दर्शन देणारी ती कुलस्वामिनी असते."
गर्भ: "आई! किती छान बोलते ग तू! असं वाटतं तुझ्या मुखातून अमृत पाझरत आहे आणि त्या अमृताने मला अमरत्व प्राप्त होत आहे."
माया: "माझी छकुली! तू एक स्त्री होणार म्हणून तुला या स्त्रीच्या सुख दुःखाचा पाठ घालत आहे. मुलगी ही नेहमी आपल्या स्त्रीजन्माचा भोगवटा आपल्या प्रत्ययास आणून देते पण तरीही सगळं काही देऊन सगळं काही मिळवण्याचा गुणही स्त्रीचाच असतो. समर्पणातून सत्ता आणि प्रेमातून प्रतिष्ठा मिळवण्याचे तिचे सामर्थ्य आणि कौशल्य हे स्त्रीचे खास वैशिष्ट्यच! एकूणच स्त्री जीवनाचा सामूहिक आविष्कार कधीकधी फार संवेदनशील आणि काव्यात्मक अशा भावकोमलतेचा साक्ष देणारा असतो. स्त्रीमनाच्या अबोधाला स्पर्श करणारे मोती सापडतात आणि काचेआड दिव्याची ज्योत हलून जावी असा उजेडाचा अनुभव येतो."
अस्ताचलाला गेलेल्या सूर्याचा उदय झाला होता आणि त्याच्या तांबुस, सोनेरी छटा मायाच्या चेहर्यावर पडल्या आणि तिने डोळे उघडले. थोडा वेळ ती स्तब्ध होती पण नंतर तिला आपल्या अस्तित्वाच्या गाभाऱ्यात असणाऱ्या सत्वाची आठवण झाली आणि तिने आपल्या उदरावरून हात फिरवला. एका स्त्री जन्मासाठी ती आपल्या सत्वाची 'समशेर' घेऊन या चक्रव्यूह रचलेल्या रणांगणात चहूबाजूंनी लढण्यास सज्ज झाली होती.
(हा संवाद तर माझी एक कल्पना आहे.तरीपण आपले स्रीजन्माविषयी काय मनोगत आहे ते व्यक्त करावे ही मायबोलीकरांना नम्र विनंती!)
मुलगी व्हायला नशीब लागते...
मुलगी व्हायला नशीब लागते...
प्रत्येकाला मुलगा आणि मुलगी वाढवण्याचे भाग्य मिळायला हवे... इट्स युनिक exp...
लकी असतात ते लोक ज्यांना एक मुलगी आणि एक मुलगा असतो...
सहमत आहे आपल्या विचिरांशी
सहमत आहे आपल्या विचिरांशी च्रप्स!
धन्यवाद!
छान, पटले. आजही काही समाज
छान, पटले. आजही काही समाज बदललाय तर काही अजूनही याच विचारांत गुरफटून आहे.
आणि च्रप्स यांनी म्हटले ते << प्रत्येकाला मुलगा आणि मुलगी वाढवण्याचे भाग्य मिळायला हवे... इट्स युनिक exp...>>> याच्याशीही सहमत.
मलाही आधी दोन मुली हव्या होत्या. पण मग एक मुलगी झाल्यावर आता एक मुलगा हवा असे वाटू लागले ते याचसाठी. दोन्ही प्रकारचे अनुभव दोन्ही मजा हव्या होत्या
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद ऋन्मेश दादा!
मेसेज चांगला आहे पण पद्धत खूप
मेसेज चांगला आहे पण पद्धत खूप कृत्रिम वाटते
चांगला लिहिलय.
चांगला लिहिलय.
साधा माणूस,मृणाली आपल्या
साधा माणूस,मृणाली आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद!
पद्धत जरी कृत्रिम असली तरी हेतू हा धारणेचा आहे!
छान लिहीले आहे...चंद्रमा...!!
छान लिहीले आहे...चंद्रमा...!!
कथेतला काल्पनिक संवाद छान रंगवला आहे.
छान लिहीले आहे!
छान लिहीले आहे!
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी
आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे रूपाली,शब्दवर्षा
धन्यवाद!
चांगले लिहिलं आहे..
चांगले लिहिलं आहे..
प्रिय राणी आपल्या अमूल्य
प्रिय राणी आपल्या अमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
गर्भ: "आई! किती छान बोलते ग
गर्भ: "आई! किती छान बोलते ग तू! असं वाटतं तुझ्या मुखातून अमृत पाझरत आहे आणि त्या अमृताने मला अमरत्व प्राप्त होत आहे.">> जन्मालाही न आलेल्या बाळाच्या तोंडी फारच अलंकारीक भाषा वाटते. कदाचित आईच्या मनात
चाललेले द्वंद्व असावे.
बाकी चांगला विषय हाताळला तुम्ही.
समीक्षण केले ते छान! खरतर
समीक्षण केले ते छान! खरतर वाचक फक्त छान! चांगलं लिहलय!सुंदर लिखाण!अशाच प्रतिक्रिया देतात पण वीरू तुमच्यासारखे जागरूक वाचक त्यामध्ये काय अधिक काय उणे हे शोधून काढतात ते प्रशंसनीय!
धन्यवाद आपल्या प्रतिसादाबद्दल!