३ जूनला ’निसर्ग’ या चक्रीवादळाचा तडाखा उत्तर कोकण किनारपट्टीला आणि पालघर, ठाणे, मुंबईला बसणार ही बातमी मी वादळाच्या एक दिवस आधी वाचली. मी जरी सध्या बंगळूरला रहात असले, तरी माझं मूळ गाव श्रीवर्धन तालुक्यातलं. अर्थातच त्यामुळे काळजी वाटली. आदल्या दिवशी रायगडच्या जिल्हाधिकार्यांचा एक व्हिडिओ बघितला, ज्यात त्यांनी नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी, प्रशासनाने काय खबरदारी घेतलेली आहे, याची चांगली माहिती दिली होती. पण खरं सांगायचं तर आत्तापर्यंतचा अनुभव असा, की अरबी समुद्रातून चक्रीवादळ येऊन कोकण किनारपट्टीला धडकणार अशा बातम्या कितीही आल्या तरी एक तर ते वादळ समुद्रातच सौम्य होतं, नाहीतर दिशा बदलून दुसरीकडे निघून जातं. त्यामुळे यावेळीही तसंच होईल असं वाटत होतं. पण तसं होणार नव्हतं.
दोन तारखेला रात्री वाचलेल्या बातम्यांनुसार साधारणपणे सकाळी अकरानंतर वादळ रायगडच्या किनार्याजवळ येणार होतं आणि त्याचा लँडफॉल होणार होता. लँडफॉल नेमका कुठे होणार आणि नेमका किती वाजता होणार याच्या माहितीत सतत बदल होत होते आणि ते साहजिकच आहे. २ तारखेच्या रात्री रत्नागिरी जिल्ह्यात वादळ पोचलं. आमचं गाव श्रीवर्धन तालुक्यात असलं तरी समुद्रकिनार्याला अगदी चिकटून नाही. समुद्र आणि गावाच्या मध्ये डोंगर आहे. शिवाय पूर्वेलाही डोंगर आहे. त्यामुळे आपल्या गावात वादळाचा परिणाम कमी होईल अशी आशा होती मनात. तीन जूनला दहा-साडेदहानंतर फोन आणि मोबाईल सेवा बंद झाली.
त्यानंतर टीव्हीवर वादळाच्या बातम्या पाहण्याशिवाय आणि ’श्रीवर्धन, दिवेआगरला वादळ धडकले’ अशा ब्रेकिंग न्यूज वाचून काळजी करण्याशिवाय दुसरा काही मार्गच राहिला नाही. मुंबईच्या सुदैवाने वादळ मुंबईला टाळून उत्तर महाराष्ट्राकडे गेलं. शाळेतल्या मित्रमैत्रिणींच्या ग्रुप्सवर चौकशी केली. कुणाचाच घरी फोन लागत नव्हता आणि त्यामुळे सगळेच काळजीत होते.
चार तारखेला श्रीवर्धनच्या, मुरुडच्या जवळच्या नातेवाईकांच्या/ओळखीच्यांच्या घरांच्या बातम्या इकडून तिकडून मिळायला लागल्या. जवळजवळ सगळ्यांच्या घरांची छपरं उडून गेल्यामुळे घरात पाणीच पाणी झालं होतं. फोन, मोबाईल चालू नसल्यामुळे माझ्या गावी थेट संपर्क होत नव्हताच आणि इतर कुणाकडूनही घरची काहीच बातमी कळत नव्हती, त्यामुळे केवळ अंदाज लावणं हेच हाती होतं. अशा वेळी मन चिंती ते वैरी न चिंती याचा प्रत्यय येतो. आपापल्या गावाची काहीच बातमी कुठूनच कळत नसल्यामुळे आमच्या गावातले आणि आजूबाजूच्या गावांतले, मुंबई-पुण्यात किंवा अन्य ठिकाणी रहात असलेले आम्ही सगळेजण अस्वस्थ आणि चिंताक्रांत झालो होतो. श्रीवर्धनजवळच्या मेटकर्णी भागातल्या एका महिलेच्या कोसळलेल्या घराची हृदयद्रावक बातमी टीव्हीवर दिसली. पण त्यापलीकडे जाऊन आमच्या भागातल्या, अंतर्गत भागातल्या बातम्या काहीच कळत नव्हत्या. असंख्य झाडं रस्त्यांवर पडल्यामुळे बरेच रस्तेही बंद होते. रिलायन्स जिओ सोडल्यास कुठल्याच मोबाईलला नेटवर्क नव्हतं, पण तेही फक्त श्रीवर्धन शहरातच आणि त्यातही वीजपुरवठा नसल्यामुळे कुणालाच मोबाईल चार्जिंगही करता येत नव्हतं.
चार तारखेला रात्री आणि पाच तारखेला दिवसभरात फेसबुकवरच्या आपला श्रीवर्धन नावाच्या ग्रुपवर श्रीवर्धन तालुक्यातल्या वाकलघर, रानवली, हरिहरेश्वर, धारवली, वाळवटी या गावांबरोबरच आमच्या गावाचेही काही फोटो पहायला मिळाले. काही व्हिडिओही होते. सगळ्या फोटोंमधून आणि व्हिडिओंमधून दिसत होता तो फक्त आणि फक्त विध्वंस! हे फोटो आणि व्हिडिओ नक्की कुणी काढले आहेत ते कळत नव्हतं. थेट काहीच बातमी न कळल्याने सहा तारखेला मुंबईपुण्यात राहणारे आमच्या परिसरातले बरेचजण गावाला गेले.
श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यातल्या दांडगुरी, वाकलघर, खुजारे, आसुफ, कार्ले, वडवली, वांजळे, बोर्ला, देवखोल, धनगरमलई, नागलोली या आणि अशा कित्येक गावांमध्ये असंख्य घरांची छपरं या वादळाने उडवून नेली आहेत. आंब्याची, काजू-फणसाची जुनी झाडं मोडून किंवा मुळासकट उन्मळून पडली आहेत. या सगळ्या गावांमधली बहुतेक सगळी तरुण मंडळी मुंबईत नोकरी करतात. कष्ट करून, पैसे साठवून, प्रसंगी कर्ज काढून गावाकडचं मोडकळीला आलेलं जुनं घर पाडून नवीन घर बांधतात. अशा या घरांचं मोठं नुकसान या वादळाने झालं. लॉकडाऊनमुळे आधीच सगळ्यांच्या डोक्यावर नोकरीधंदा जाण्याची टांगती तलवार असताना हे नवीनच संकट आलं. श्रीवर्धन, दिवेआगर , हरिहरेश्वर आणि मुरुडसारख्या बागायती गावांमधल्या नारळ-सुपारीच्या अख्ख्या बागाच्या बागा अक्षरशः आडव्या होऊन पडल्या आहेत. यावर्षी कोरोना आणि लॉकडाऊनमुळे या भागातल्या पर्यटन व्यवसायाला आधीच मोठा धक्का बसला होता. ते कमी म्हणून की काय, हे बागायतीचं प्रचंड नुकसान! अनेकांचं पोट या नारळ-सुपारीच्या बागांवर अवलंबून असतं. उन्हाळ्यात पाणी शिंपून तगवलेल्या सुपारीच्या बागा आणि वाडवडिलांनी लावलेली, आपण मशागत करून फळवलेली आंब्याकाजूंची झाडं मोडून पडताना पाहणं सोपं नाही.
वादळ आलं म्हणून पाऊस थांबला नाही. कोकणात मान्सून म्हणा, मान्सूनपूर्व म्हणा, पण पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. घरावरचं छप्पर वादळाने उडवून नेलेलं, पत्रे, कौलं, ताडपत्री, वेल्डिंगसाठी लागणार्या जनरेटर्सची, एवढंच नाही, तर घरात उजेडासाठी लावायला मेणबत्त्यांचीही टंचाई आणि या टंचाईचा गैरफायदा घेऊन वस्तूंचा आणि सेवांचा चढा भाव लावणारे दुकानदार आणि कारागीर! श्रीवर्धन, म्हसळा, मुरुड, अलिबाग, माणगाव तालुक्यांमधल्या जवळजवळ सगळ्या गावांमधलं हे चित्र आहे. शिवाय समोर पावसाळा उभा! कोकणात पाऊस नुसता पडत नाही, तर कोसळतो. अशा वेळेस सामान्य माणसांनी काय करायचं?
रायगड जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी हे सक्षम आणि लोकांच्या प्रश्नांची जाण असणारे आहेत, ही एक नक्कीच दिलासादायक वस्तुस्थिती आहे. सरकारकडून जी काही नुकसानभरपाई मिळायची ती यथावकाश मिळेलच.
या चारपाच दिवसात मी आधी कधीही पाहिल्या नसतील इतका वेळ आणि इतक्या उत्सुकतेने मराठी वृत्तवाहिन्या पाहिल्या. चक्रीवादळ आलं त्या दिवशी संध्याकाळपर्यंत त्या बातम्यांचा नक्कीच ’बातम्या’ म्हणून उपयोग झाला. पण त्यानंतर ’मुंबईवरचा धोका टळला’ या बातमीने या वृत्तवाहिन्या जणू रिलॅक्स झाल्या. दुसर्या दिवशीपासून चक्रीवादळाने केलेल्या नुकसानाच्या बातम्या मागे पडल्या. तेच तेच व्हिडिओ परत दिसू लागले. तिसर्या दिवशी तर वटपौर्णिमा होती. त्या दिवशी चंद्रग्रहणही होतं. ’वटपौर्णिमेची पूजा करण्यात ग्रहणाची अडचण नाही’ अशा प्रकारची अत्यंत मौलिक आणि उपयुक्त माहिती आणि ठिकठिकाणच्या सुवासिनींनी मास्क बांधून वडाच्या झाडाची केलेली पूजा, कुणी घरी फांदी आणून पूजा केली, कुणी अजून कुठल्या प्रकारे केली, अशा सुरस आणि महत्त्वाच्या बातम्या देण्यात वृत्तवाहिन्या गर्क होत्या. पण श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यांमधले बहुतेक सगळे अंतर्गत रस्ते सुरू झालेले असतानाही (NDRF आणि SDRF च्या जवानांनी प्रचंड कष्ट घेऊन हे रस्ते दोन दिवसात मोकळे केले) कुठल्याही मराठी वृत्तवाहिनीवर मी वर उल्लेख केलेल्या गावांमधली आणि इतरही असंख्य गावांची दृश्यं कधीच दिसली नाहीत. वृत्तवाहिन्याच नाही, तर आघाडीच्या मराठी वृत्तपत्रांच्या वेबसाईट्सवरही या कुठल्याच गावांचा उल्लेखही नाही. मोबाईल सेवा त्या भागात सुरू नसताना, घरची काहीच बातमी नसताना, आपल्या परिसरातली काहीतरी बातमी कळेल म्हणून उत्सुकतेने टीव्ही लावावा, तर तिथूनही काही बातमी कळत नव्हती. आता तर निसर्ग चक्रीवादळाचा उल्लेख होतोय, तो फक्त कोकणात होणार्या राजकीय नेत्यांच्या दौर्यासंदर्भातच.
राजकीय नेते, सरकार आणि प्रशासन त्यांची कामं करतच आहेत, पण या सगळ्या खेडेगावांची झालेली दुरवस्था इतक्या लवकर बदलणार नाहीये. अजून कमीतकमी महिना-दीडमहिना लागेल वीजपुरवठा सुरळीत व्हायला. घरांची छपरं होतीलही दुरुस्त, पण वर्षानुवर्षं ज्या झाडामाडांवर मेहनत घेतली, ती कोसळलेली झाडं परत उभी राहणार नाहीयेत. नवीन झाडं लावून त्याचं चांगलं उत्पन्न सुरू होण्यासाठी आठदहा वर्षं जावी लागतात. तोपर्यंत काय करणार हा मोठा प्रश्न आहे. असे प्रश्न सोपे नसतात आणि त्यांचं एकच एक असं उत्तरही नसतं.
वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रं ही अशा ’स्टोरीज’ चा कितपत पाठपुरावा करतात, अशी एक शंका या निमित्ताने मनात आली. आपल्याच गावात चक्रीवादळ आलं, म्हणून मी जिथून जशा मिळतील तशा बातम्या मिळवल्या. पण एरवी अशा कित्येक घटना, दुर्घटना घडतात, आपण कुठे त्या बातम्यांचा पाठपुरावा करतो ? वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रं नक्की कुठल्या निकषांवर आपल्या बातम्या निवडतात? त्यांच्याकडे प्रशिक्षित पत्रकार असतात, पत्रकार म्हणून मिळणारा माहितीचा ॲक्सेस असतो, रोज चोवीस तासांचा वेळ असतो, पण त्याचा ते खेड्यापाड्यातल्या बातम्या देण्यासाठी उपयोग करतात का? आणि जर करत नसतील, तर या बातम्या बाहेर येणार कशा? वादळ एका दिवसात, काही तासात संपलं, पण त्याचे परिणाम मात्र वर्षानुवर्षं मागे राहणार आहेत.
कोकण, गोवा आणि मुंबईतले लोक्स
कोकण, गोवा आणि मुंबईतले लोक्स कसे आहात? काळजी घ्या.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाडं, विजेचे खांब पडल्याचं समजलं. सविस्तर माहिती मिळाली नाही.
इथे मुंबईत आमच्याइथे
इथे मुंबईत आमच्याइथे जोरदारपणे पाऊस पडतोय . वाराही वेगाने वाहतोय. खिडक्या दणादण वाजतायेत
रायगडात घरांचं, झाडांचं
रायगडात घरांचं, झाडांचं नुकसान खूपच कमी आहे गेल्या वेळेपेक्षा. रत्नागिरी-सिंधुदुर्गात मात्र जास्त आहे. जीवितहानी गेल्या वेळी फारशी झाली नव्हती, ती यावेळी मात्र जास्त आहे गुजरातमध्ये तर किती विध्वंस झाला असेल त्याची कल्पना करूनही अंगावर काटा येतो.
आज वर्ष झालं निसर्ग
आज वर्ष झालं निसर्ग चक्रीवादळाला.
Pages