आमच्या आत्मानंद थेटरात हॉरर मूव्ही रिलीज झाली. नाव पण भयानक होतं.
"आदमी"
जल्लाद, चंडाळ असे साधू महात्म्यांचे सिनेमे आमच्या आत्मलोक सोसायटीत जेव्हढे चालतात त्याहीपेक्षा जास्त पुराना मंदीर, दरवाजा, शैतानी इलाका असे देवादिकांचे चित्रपट धो धो चालले होते. राम हे नाव घेताना आत्मे थरथर कापतात पण रामसे नाव घेताना हात जोडतात. रामसे बंधू नावाचे कुणी मनुष्यप्राणी नसून ते ही आत्मेच आहेत. ते एका सुनसान हवेलीत राहतात. तिथूनच सिनेमे बनवतात असा विश्वास आहे. काही आत्माळलेली माणसे त्यांच्या चित्रपटात कामे करतात जी माणसांच्या जगात फारशी फेमस नसतात.
पण आदमी नावाचा चित्रपट भयानक असणार याची खूणगाठ सर्वांनी बांधली होती. भीती वाटली तरीही आत्मलोक सोसायटीतले आत्मे जातातच चित्रपट बघायला. काही जरा जास्ते डेअरींगवाले असतात. ते सुनील शेट्टीचे भयपट बघू शकतात. तर सर्वात जास्त डेअरींगबाज आत्मे मिठुन चक्रवर्तीचे चित्रपट बघतात. मायबोलीवर येऊन माणसांचं काही वाटेनासं झाल्याने मी तर धर्मेंद्रचे हुकूमत , सितमगर , बारूद ही बारुद, पाप को जलाकार राख कर दूंगा आणि फौलादसिंग असं पापाजींचं नाव असतं तो एक चित्रपट बघितला होता. त्यामुळे मला जरा जास्तीचा मान आहे.
आदमी सुरू झाला. मिठुनचं नाव आलं आणि थेटरात मंदीरशांतता पसरली. ( मी पण मंदीर आलं की गुपचूप पडतो अजूनपण). नावं बिवं झाली. एक लॉंग शॉट. कॅमेरा क्रेनने वर जायला लागला. अंधारात एक सुनसान रस्ता दिसू लागला. रस्त्यावरचे दिवे धुक्यात (फॉगमशीन) मधे बुडाले आहेत. अशा वातावरणात एक सायकलवाला दूधाचे कॅन अडकवून येत आहे. हा शॉट ऑस्कर मिळवून गेला असता. पण मिठुन आणि ऑस्कर
यांचा छत्तीसचा आकडा आहे. त्याने कधीही असे पुरस्कार आपल्या जवळपास देखील भटकू दिले नाहीत. एक स्वतःचं स्टँडर्ड त्याने मेण्टेन केलेलं आहे. त्याची व्याख्या करता येत नाही. पण जाणकारांना नेमकी कल्पना असते.
सायकलवाला घा-या डोळ्यांचा ९० मधला फेमस साईडव्हिलन आहे. तो सोसायटीच्या वॉचमनचा डोळा चुकवून इमारतीत शिरतो. सायकल तिथे लावतो. कॅमेरा दूधाच्या कॅनवर. एक पांढरी व्हॅन येते. तीतून अजून एक इसम उतरतो.
काही बाल आत्मे या सीनला रडू लागले. त्यांच्या आया त्यांना दटावत म्हणाल्या " चूप कर. माणूस बिणूस काही नसतं "
तर एक पोरगं रडत रडत म्हणालं " पण त्याने कपडे घातलेत " त्यावर थेटरात हंशा पिकला. अंधारात माणूस बाहेर पडला आहे याचं दडपणच गेलं.
त्याऐवजी कपडे घालून बाहेर पडण्याच्या कल्पनेने आत्मे पोट धरधरून हसू लागले.
अजून एक माणूस हातगाडी घेऊन घामाघूम होऊन आला आहे.
सीन पहिला कट.
सीन दुसरा
तिघेही एका अपूर्ण इमारतीच्या कुठल्या तरी मजल्यावर उभे आहेत. हा मजला कितवा हे आपल्याला समजत नाही. आता घा-या डोळ्याच्या व्हिलनच्या हातात रिमोट आहे. तिघे मिळून एकच घड्याळ बघतात. एक तर इतर दोघांना ते परवडत नसावे किंवा समजत नसावे. सेकंद काटा बारावर येत असतो.. फिल्म वाले टायमिंगचे पक्के असतात. तिन्ही काटे बारावर येण्याचा आमचा जो गोरजमुहूर्त असतो त्याच वेळी यांचं काहीतरी महत्वाचं काम असतं.
काट्यावर काटा येतो आणि रिमोट दाबला जातो.
आणि भयंकर दृश्य दिसते. थर्माकोलच्या इमारती क्षणात कोसळतात. टेबलला लावलेले छोटे छोटे कॅमेरे ते भय आत्मानंद थेटरात ओतत असतात.
एक म्हातारा आत्मा विचारत होता " रिमोटच दाबायचा तर तिघं तिघं का गेले तिथे ?"
मी सीझन्ड असल्याने म्हणालो " आपल्याला ब-याच गोष्टी माहीत नसतात काका "
" असं होय ? पण एकाच गाडीतून का नाही आले ते ? तिघांना पण कुणीच बघितलं नव्हतं ना ? आणि हातगाडी कशाला आणून ठेवली "
" श्शू ! यामुळेच आपण मागे आहोत मानवाच्या "
मानवांचं नाव घेताच म्हातारं गपगार पडलं .
मंत्री परेश रावल बॉंबस्फोटांमुळे वैतागलेले आहेत. एक इमर्जन्सी मीटिंग बोलावलेली आहे. ( इमर्जनसी मीटींग , अंडाकृती टेबल, खाकी वर्दीतले पोलीस अधिकारी बसलेत आणि कुणीतरी फार गांभीर्याचा आव आणून बोलतंय हा फिल्मवाल्यांचा आवडता सीन असतो. त्यातून जे कधीच कुठे कॉर्पोरेटमधे किंवा एमएनसीमधे जाऊ शकले नाहीत त्यांना या सीनचं फारच आकर्षण असतं). अशा मीटींग मधे मग मंत्र्याजवळ डीसीपी गुलशन ग्रोव्हर बसलेला असतो. गुलशन ग्रोव्हरने फारसा गेट अप केलेला नाही आणि त्याचे कल्ले पांढरे आहेत म्हणजे हा यात याचे वर्तन सुधारलेले असेल असा एक अंदाज प्रेक्षकांना येतो.
फिल्मवाल्यांना कधी कधी डीसीपी हा सीपी चा बाप असावा असे वाटत असते. कारण त्यात एक अक्षर जास्त असते. त्यामुळे मंत्र्याजवळ सीपी न बसता डीसीपी बसतो आणि मंत्र्याला सांगतो की या स्फोटांमागे विदेशी ताकते आहेत. पण मंत्री म्हणतो की त्यांना कुणीतरी गद्दार मदत करतोय. त्याला शोधा. मी त्याला अशी शिक्षा देईन की त्याच्या येणा-या पिढ्या लक्षात ठेवतील.
पुढच्याच सीनमधे थकलेला अजित उर्फ त्रिकाल चीअर्स करताना दिसतो. चीन सरकारचा एक अधिकारी त्याला सांगतो की " हे बघ त्रिकाल , आमचं चीन सरकार खूप खूष आहे पण आमच्या देशाचं नाव येऊ देऊ नये नाहीतर दोन देशांचे संबंध बिघडतील". लॉजिक बघूनच गदगदायला होतं. इमारतीत स्फोट करून चीनला काय फायदा याचा विचार आत्मे करत बसतात. त्यात असेच बरेचसे संवाद निघून जातात.त्रिकाल त्याला आश्वासन देतो की मी नेहमी दुस-यावर आळ येईल असे काम करतो. बिचारा विजय श्रीवास्तव.
एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवायला हवी. विजय श्रीवास्तव हे नाव फिल्मवाल्यांचं आवडतं नाव आहे. शशीकपूर असेल तर ते विजय खन्ना, टंडन, कपूर असतं. मिठुन, बच्चन श्रीवास्तव असतात. आपण लगेच ओळखतो "अरे, मिठुन वर संकट येणार ".
आपल्याला अजित हा मेन व्हिलन आहे हे समजतं. मिठुनच्या पिक्चरमधे रहस्य जन्माच्या आधीच फोडतात. रहस्यपट काढायचा तर पटकथा आधी तयार पाहीजे. इथे मिठुन सकाळी जल्लाद, दुपारी चंडाळ आणि रात्री आदमीचं शूटींग करत असताना एक तास आधी पुढच्या सीनची पटकथा लिहायचं आव्हान लेखकापुढे असताना रहस्य ताणणारा चित्रपट बनवायला वेडे आहेत का हे सगळे ? आणि असा वेळखाऊ रहस्यपट बनवायचा असता तर मिठुनची गरज काय होती ?
एका जंगलातून एक पोलिस व्हॅन सायरन लावून बोंबलत पळत असते. हा रस्ता नेहमी न्यायालयात जाताना कैद्याला पळवून नेण्यासाठी वापरला जातो. मुंबईतल्या मुंबईत जेलमधून न्यायालयात जाताना कोणतं जंगल लागत असेल ?
तर जंगलाच्या मध्यभागी एक जेल आहे. या जेलला फायबरच्या भिंती आहेत. दार उघडलं की व्हॅन आत. आत कैदी मध्यभागी मोकळ्या मैदानात फिरताहेत. मेन गेटपासून थेट मैदान आहे. मधे चौकी नाही. सिक्युरिटी केबिन नाही. बॅरीयर नाही. सेन्ट्रीच्या बराकी नाहीत. मग जेलरचं ऑफीस नाही. थेटच रस्ता आणि कैदी यांच्या मधे फक्त तो दरवाजा.
मागे अंदमानच्या फिल्मी सेल्युलर जेल प्रमाणे तीन चार मजली तुरूंग आहे. त्याला दिवाळीच्या किल्ल्याप्रमाणे वर जाणारे जिने आहेत. ति जिने बाहेरून दुस-या मजल्यावरच जातात. तर मग तिस-या मजल्यावरून खाली यायची काय सोय ? मुळात ते वर गेलेच कसे असतील ?
अशा ठिकाणी जेलर शमशेर सिंह नामक खुंखार पाटी लागलेली आहे. हा जेलर दलीप ताहील आहे. त्याला एक पोलीस विजय श्रीवास्तवची माहिती सांगतो. आपल्या आई वडील आणि भावाच्या खूनाचा आरोप आहे. आपल्याला जरी माहीत असलं तरी अधिकृतपणे विजय श्रीवास्तव आपल्याला दाखवलेला नाही. त्याला आणताना त्याचे पवित्र पाय दाखवले जातात. त्यांचे तीर्थ घ्यावे असा मोह अनेक आत्म्यांना झालेला दिसत होता.
पाठमोरा मिथुन दिसतो. पण लावणी नाचणारी बया जसा पदर खाली घेऊन नेमक्या खटक्याला चेहरा दाखवत नाही तसं हिरोच्या एण्ट्रीला फायटिंग पाहीजेच. मग त्रिदेव पिक्चर मधल्या शंभर व्हिलन्स पैकी एक जण (महाभारतातला अर्जुन) तुरूंगात येऊन रजा मुराद जो शामलाल बनलाय, त्याला मारहाण करतो. जमीनदार, दिवाणजी, ठाकूर बनायचं सोडून जेलमधे आला म्हणजे यालाही फसवलं गेलं असणार. रझा मुराद एरव्हीही पाट्या टाकणारा सूर लावतो. पण अशा स्पेशल चित्रपटात तो स्पेशल पाट्या टाकणारा सूर लावतो तिथेच आपण वेगळ्या मनोरंजनास सज्ज होतो. त्या सूरात ना मोह, ना माया, ना राग, ना खेद, ना दु:ख, ना चढ उतार ना सूर ना ताल. बस व्हाल्व्हवाल्या रेडीओच्या फाटलेल्या स्पीकर्समधून सिलोन केंद्र खरखरत लागावं तसे संवाद ऐकू येतात.
रझा मुराद ची दाढी जेलमधला न्हावी जेलच्या मधोमध जे मोकळे मैदान आहे त्याच्या मधोमध करत असतो. रझा मुराद खुर्चीवर डोळे मिटून पडलेला आहे. बाकीचे कैदी आजूबाजूला थव्याथव्याने उभे राहून कसले तरी काम करत आहेत. कॅमेरा जिथे फिरेल तिथले कैदी खाली वाकून स्टुडीओच्या प्लेन जमिनीवर ओतलेल्या मातीत काहीतरी शोधत असतात. कॅमेरा पुढे गेला की तो उठून उभे राहतात. एव्हढ्या कामाचे प्रत्येकी ४० रूपये मिळत होते त्या काळात शेकडो कैदी दाखवणे म्हणजे निर्मात्याला मिठुनला का घ्यायचे होते हा प्रश्नच पडावा !
न्हावी जावेद खान आहे. या माणसाचा चेहरा पाहता याला चित्रपटात का यायचं होतं आणि अभिनयच का करायचा होता वेताळ जाणे ! इतके अजीजीचे भाव फाशीच्या कैद्याच्या चेह-यावर पण नसतील. नुक्कड सारख्या मालिकेत सतत इमोशनल संवाद बोलायची लागलेली सवय नंतरही गेली नाही. म्हणतात ना जित्याची खोड ! तर हा जावेदखान पट्टीच्या न्हाव्याप्रमाणे गि-हाईकाच्या दाढीला साबण लावून वस्त-याला धार लावायला बाजूला आला आहे. एका चामड्याच्या पट्ट्यावर वस्तरा घासतोय. कदाचित त्यांना सँडपेपर दाखवायचा असेल पण प्रॉडक्शन वाल्यांनी पण मिठुन स्टँडर्ड म्हटल्यावर कमरेचा बेल्ट काढून दिला असणार. जेल मधे वस्तरा, मैदानात मधोमध दाढी का हे असले फालतू प्रश्न विचारणा-याला पाकिस्तानला पाठवा असे म्हणण्याची आयडिया त्या वेळी नव्हती. पण लोकांच्यात समजूतदारपणा प्रचंड होता. तर हा वस्तरा जावेद खानपासून छिनून (दुसरा शब्द नाही) तो अर्जुन नामक व्हिलन रझा मुरादच्या गळ्याला लावतो आणि "बोल कारखान्याचे आणि अमक्या तमक्याचे कागद कुठे आहेत ? " असं विचारतो. कागद म्हणजे दस्त. ते जबरीने बनवणे अथवा छिनने म्हणजेच जबरद्स्त ! म्हणून हा सीन जबरदस्त ! रझा काही त्याची मुराद पूर्ण होऊ देत नाही. तो बधत नाही म्हणून अर्जुन गळा चिरणार इतक्यात..
तमाशात लावणीला ऐन मोक्याला "ऐका " असं म्हणत पदर खाली जाऊन बाईचा मुखडा दिसावा तसा मिठुन एण्ट्री घेतो. आत्मे गर्भगळीत होतात. या सीनला माणसं म्हणे टाळ्य़ा, शिट्ट्य़ा वाजवतात ! सामान्य आत्म्यांना कसं जमायचं हे ? आणि मग प्रत्येक ठोशाबरोबर भय गडद होत जातं ! या सीनमधे आपल्याला कालियाची आठवण झाली तरी तसे बोलून न दाखवता सकारात्मक विचार करत मोहरा सीनच्या जेलमधल्या दृश्याची बीजे आदमी मधे रोवलेली आहेत असे म्हणावे. हा एकच सिनेमा पाहताना आपल्याला अर्जुन, घायल, कालिया, मोहरा असे अनेक सिनेमे एकाच तिकीटात पाहिल्याचे समाधान मिळते. म्हणूनच चाणाक्ष लोक इतक्या हिरोंचे सिनेमे न पाहता मिठुनदाचे सिनेमे बघत असत. म्हणतात ना ३३ कोटी देव असले तरी कुलदैवत एकच असतं. तसं मिठुन कुलदैवत असलेले लोक इतर देवांना पूजत नाहीत कधी.
या हाणामारीमुळे पांढरे कल्ले असलेले डीसीपी ( जे सीपीपेक्षा सुपर असतात) गुलशन ग्रोव्हर खुंखारसिंहच्या ऑफीसमधे मिठुनचा इंतजार करीत आहेत. ते मिठुनपुढे एक प्रपोजल ठेवतात की आम्हाला डॉनला पकडायचे आहे त्यासाठी तुझी मदत पाहीजे. यावर मिठुन काही खवचट डायलॉग मारतो पण त्यात पुणेरी जोश नसल्याने त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊयात. तर प्रपोजल असे की सर्वत्र बॉंब फोडणा-या डॉनच्या संतानला मिठुनने पळवायचे आणि मग पोलिसांनी डॉनकडून सगळ्या गुन्ह्यांची कबुली घेणार त्याबदल्यात मिठुनने न केलेल्या गुन्ह्यांतून पोलीस त्याला सोडवणार. च्यायला म्हणजे यांना माहीत असून जेल मधे डांबला की. मिठुनला थोडी हिचकिचाहट होते पण गुलशन ग्रोव्हर अत्यंत प्रगल्भतेने आणि प्रेमाने सांगतात की हे देशकार्य आहे. देशकार्य म्हटल्यावर मिठुनदा कसे नकार देतील ?
गुलशन ग्रोव्हर त्याला एक फोटो दाखवतात. पुढच्याच क्षणी एका आडबाजूच्या विमानतळाच्या बाद रनवेवर करीश्मा कपूरने बॉबकट केलेला असावा किंवा ताल मधे अक्षय खन्नाची खडूस काकू (कर्णिक बाई - आंटीच म्हणावं खरं तर) दिसावी अशी एक घा-या डोळ्यांची तरूणी टी शर्ट आणी जीन्स मधे रस्त्यावर पोझ घेऊन खाली आडवी झालेली आहे असे दृश्य दिसते. तिने डोक्याला तळहाताचा आधार देऊन एका अंगावर ती झोपलेली आहे आणि संगीत सुरू झाले आहे. कॅमेरा ट्रॉली आता जवळ येऊ लागते आणि काय गंमत ! ती ती नाही तर तो असतो ! तो करीश्मा कपूरच्या पहिल्या पिक्चरमधला हिरो हरीश ! आत्मे लिंगनिरपेक्ष असले तरी चांगलेच गंडल्याने थोडी चर्चा होते. मग एक आत्मा मागून आवाज टाकतो " ए गपा". त्या बरोबर शांतता पसरते.
हिरवीन पण येते. मग आखडलेलं अंग मोकळं करावं असे नृत्यप्रकार करून अजिबात लक्षात न राहणार गाणं संपतं. मग मिठुनदांना पोलीस कसे बाहेर काढणार होते ते समजतं. एक सप्लायव्हॅन म्हणजे ट्रक आत येते.
लक्षात ठेवा. दरवाजा , मग मोकळं मैदान मागे तीन चार मजली जेल. गाडी सुद्धा मोकळ्या मैदानात येऊन थांबते. (ती रात्री का आली हे कळत नाही. बहुतेक रात्री सप्लायच्या वस्तू मोजताना घोटाळा करता येत असेल). मिठुनला जेलर इशारा करतो. मिठुन पण चेहरा अत्यंत सूक्ष्म हलवत तयारीत राहतो. किल्ल्यासारख्या पाय-यांवरून तो खाली येतो. म्हणजेच मिठुनने स्वबळावर पळून जायचे आहे तर. जेलमधल्या गार्डसना कल्पना नाही.
इथे दिग्दर्शक आणि निर्मात्यांचं भांडण होतं. निर्माता म्हणतो " अरे हा पळून चालला आहे की परसाकडं? थरार कुठे आहे ?"
मग निर्मात्याला जास्त चुना लावणे शक्य नाही म्हणून दिग्दर्शक नाईलाजाने व्हिडीओवर इतर जेल फोडण्याचे सीन्स व्हिडीओवर बघतो. मग त्याला सर्चलाईटची माहिती मिळते. घाई गडबडीत सर्चलाईट लावले जातात. मिठुनला सावकाशीने लाईट चुकवायचे काम दिलेले असते. चौकोनी मैदानात मधे उभ्या असलेल्या गाडीकडे जाताना मिठुन इमारतीच्या लगत कुंड्यांमागे लपतो. मग मुख्य पाय-यांच्या झाली झोपून रांगतो. प्लीन्थची लेव्हल वर असल्याने रांगणारा मिठुन पोलिसांना दिसत नाही. त्या पाय-या पार केल्या की पुन्हा मधे येण्यासाठी तो पळत सुटतो. कुणाचेच लक्ष जात नाही. सर्वांनीच मिठुनपटाचे स्टॅंडर्ड मनावर घेतलेले असते. अधून मधून निर्माता येऊन त्यात विरजण घालतो तेव्हढेच काय ते.
मिठुन गाडीच्या खाली घुसून अॅक्सलला लटकतो. गाडी निघते. कधी नाही ते एका इन्स्पेक्टरला गाडी चेक करायची हुक्की येते. इथे निर्माता अडला असणार. तो मागे हौदा चेक करतो पण त्याला कमर का दर्द असल्याने आणि त्या परीसरात झंडू बाम मिळत नसल्याने खाली वाकून काही तो बघत नाही. मिठुनचं नशीब की दबंग नंतर आला. नाहीतर गाणं ऐकून त्याने झंडू बाम बाळगलं असतं तर खेळ इथेच संपला असता.
मिठुन आता त्याच्या घरी पोहोचला आहे. घायल मधे सनी देओल पोहोचतो तसा. त्याचा चेहरा म्हटलं तर अभिनय करतोय असा किंवा गुरूनाथ नाईकांच्या पात्रांप्रमाणे कठोर म्हणावा असा. जसे समजून घ्यावे तसे. एक चौक आहे. हा चौक कुठल्याही शहरात असू शकत नाही असे वाटते.
एक रस्ता अगदी समांतर फूटपाथ असलेला. त्याला अचूक काटकोनात येऊन मिळणारा रस्ता. या त्रिकोणाच्या मोठ्या रस्त्याला लागूनच ही इमारत आहे. खाली हॉटेल वर घर. जो रस्ता मुख्य रस्त्याला मिळाला आहे त्याला कालच रात्री रोवलेली झाडे आणि पलिकडे खोचलेल्या झाडीत ठेवलेली हिरवळीची लादी. मिठुन झाडाखाली अंधारात उभा राहून घराकडे बघतोय आणि त्याला कालच घडत असल्याप्रमाणे भूतकाळ दिसतो. दिग्दर्शकाला फ्लॅशबॅक तंत्राचे ज्ञान आहे हे पाहून हायसे वाटते. मिठुन स्नान करून टॉवेल गुंडाळून टी शर्ट शोधतोय. ते त्याच्या भावाने अंगावर चढवले आहे ( अंगात घातलेले चूक की बरोबर यावर चर्चा झालेली असल्याने). असे प्रसन्न कौटुंबिक प्रसंग घडत आहेत. लाडात येणारी माऊली कामात व्यस्त आहे. खाली ग्राहक अस्तावस्त आहेत. गल्ल्यावर कोण तुमचा बाप बसणार का असे प्रश्न न विचारणारे पिताजी गल्ला सांभाळत आहेत तरी मिठुनदा कुठल्या तरी ऑफीसला चालले आहेत.
मिठुनदा या सीक्रेट शहराच्या मध्यवस्तीतल्या आपल्या हॉटेल कम घरापासून निघून कामाला निघतात आणि पुन्हा त्यांना जंगलातला सुनसान रस्ता लागतो. मिठुनदा गाडी थांबवतात तिथे ऑर्डनन्स फॅक्टरीचा बोर्ड असतो. बाहेर ख्वुंखार कुत्र्यांचा पिंजरा. जेलच्या बाहेर नसलेली सेंट्रीची रूम. आणि महत्वाचं म्हणजे... आत्म्यांनी थक्क होऊन तोंडात बोटं घातली.
आधी जिथे मिठुनदा जे जेल फोडून बाहेर आले तीच जेलची वास्तू इथे ऑर्डनन्स फॅक्टरी म्हणून डौलात उभी असलेली दिसते. व्हॅल्यू फॉर मनी दिग्दर्शकाने निर्मात्याचे किती तरी पैसे वाचवलेत. काही लोक म्हणतील की मिठुनच्या दहा पिक्चरचं शूटींग एकाच वेळी चालले असल्याने आपण जेल आणि दारूगोळा कारखाना म्हणून एकच सेट लावला आहे हे त्यांच्या लक्षात आले नसेल. पण ही नकारात्मकता नाही का ?
पुन्हा एकदा उजळणी. तेच ते मधलं मोकळं मैदान. फायबरच्या भिंती. मधोमध उघडणारे गेट. पाठीमागे दिवाळीच्या किल्ल्याप्रमाणे असलेल्या जेलच्या इमारती. तिथे बाहेरून लावलेले जिने. तिस-या मजल्यावर कसला दारूगोळा बनत असेल ? तिथे पोहोचत कसे असतील ? शंकाच नको. एकच इमारत आहे. बचत ही चांगली गोष्ट आहे.
ट्रक ड्रायव्हर जास्तीचा दारूगोळा एण्ट्री न करता घेऊन चालले आहेत. मिठुनदा त्यांना अटकाव करतात. दारूगोळा कारखाना जरी तुझ्या शेठचा असला तरी सरकारने इथे मला सुपरवायझर नेमलेले आहे असा डायलॉग ते मारतात. यावर त्याला पैसे द्यायचा प्रयत्न होतो. पण मिठुन लगेच कानाखाली आवाज काढतो. लक्षात घेण्याची गोष्ट ही की, मिठुनचे असले सिनेमे येत असताना खासगी मालकीचा दारूगोळा कारखाना इमॅजने ही दिग्दर्शकीय प्रतिभा होय. मिठुनचे सिनेमे अशा पद्धतीने काळाच्या पुढे असायचे, पण लक्षात कोण घेतो ? आत्ता आत्ता अनिल अंबानी विमाने बनवणार आहे. पुढे दारूगोळाही बनवेल. पण हे भविष्य १९९७ सालीच दिग्दर्शकाने पाहीले होते. मिठुनवर ट्रकड्रायव्हर बंदूक ताणतो. इतक्यात मागून गोळी येते ड्रायव्हर गतप्राण. अजित जिन्यावरून खाली येत असतो. बेईमानीने पैसे कमावू नयेत असे लेक्चर तो देतो. भोळा आणि इमानदार मिठुन खूष होतो.
यानंतर अजितच्या अड्ड्यात मंत्री परेश रावल घा-या डोळ्याच्या साईड व्हिलनला अजितने म्हणजे परेश रावलच्या सास-याने गोळी का घातली यावर ग्यान देत असतात. त्यात इमानदारीचा रोग म्हणजे काय हे सांगतात. आणि आता आरडीएक्स बाहेर काढू नका असे बजावतात. बघा लगेच हे पण रहस्य फोडलं की नाही ? कशाला ठेवायचं लपवून ? काय मिळणार कुणाचं काय लपवून तरी ? आणि आपण कोणत्या चित्रपटात काय लपवलंय हे लक्षात तरी नको का रहायला ? स्टोरी पण वेगवेगळी नाही म्हटल्यावर गोंधळ उडणे साहजिकच नाही का ?
ही कामगिरी केल्यावर घरातले प्रेमळ वातावरण, लटके राग, बहू आणण्याबद्दल दटावणी याला तोंड देत मिठुन शहराच्या मध्यभागी असलेल्या लांबच लांब जंगलातून अरूंद रस्त्याने निघतो. या शहरात सर्वांनाच हा रस्ता सोयीचा असावा. कारण हिरॉइन पण त्या काळच्या झिंग थिंग मारूती व्हॅन मधे निघालेली आहे. एकच रस्ता , बावळट पण सुंदर मद्रकन्या आणि सर्वगुणसंपन्न हिरो म्हटल्यावर गाडीला गाडी आणि दिलाला दिल धडकणारच. सुंदर मद्रकन्या जंगलाच्या मध्यभागी आर्मीचं भरती केंद्र वाटावं अशा तीन बैठ्या इमारतीच्या मधोमध निर्मनुष्य रस्त्यावर उभ्या असलेल्या पोलिसाच्या समोरच मिठुनला धडकते आणि दंड मिठुनला होतो. आता मिठुन तिच्या मागे लागतो. ती जंगलात एका स्टेडीयमसारख्या इमारतीत शिरते. ते स्टेडीयमच असते. तिथे मग मद्रकन्येच्या चिथावणीने कराटे क्लबच्या स्टुडंट्सनी मिठुनवर हल्ला करणे आणि मधेच कुणीतरी येऊन " अरे मूर्खांनो हे तर तुमचे कराटेचे सर " असा खुलासा करणे आलेच. काही महीने ज्यांच्याकडे शिकलो त्या सरांना स्टुडंट्स ओळखत नसल्याने हा प्रसंग घडतो.
आता जे लक्षात यायचे ते आलेच असेल. मिठुनचे प्रेमपात्र आले. दोन चार टुकार गाणी झाली. मग लग्न ठरवण्यासाठी मद्रकन्या (गौतमी) च्या वडीलांकडे मिठुनचे घरचे जातात. तिथे लहान असलेला त्याचा भाऊ ज्यादाचा शहाणपणा करतो. वडील युनूस परवेझ असतात ( बचत बचत ! पिंचू कपूरने जास्त पैसे घेतले असते). युनूस परवेझ वकील असतात. श्रीमंत असतात. अशा घरात रिश्ता कायम होतो.
इतक्या बड्या बापाशी रिश्ता करण्याची औकात असलेले मिठुनचे वडील शहरात लग्नपत्रिका वाटण्यासाठी त्यात त्या सुनसान जंगलरस्त्याने धाकट्या मुलाला डबलसीट घेऊन निघतात. पत्रिका वाटत वाटत दारूगोळा कारखान्यात येतात. तिथे सायकल लावून ते वरच्या मजल्यावर जातात तेव्हां आतला जिना आपल्याला पहिल्यांदा दिसतो. हे ही समजतं की वरच्या मजल्यावर फक्त व्हरांडा आहे आणि खाली वर्कशॉप आहे. वरून थेट खालचं दिसतं. मिठुनचे पप्पा वरून बघतात तेव्हां मधे गोल टेबल लावलेलं असतं. त्यावर रायफल्स, एके ४७ आणि शस्त्र असतात. एक व्यापारी बॉब क्रेश्तो बसलेला असतो. तो काही बेसिक प्रश्न विचारतो. मग अजित धंदा उलगडून सांगतो. इतक्यात मंत्री डी पी म्हणजे धर पकड परेश रावल येतो. तो आपलाही सहभाग सांगतो. ते ऐकूनच मिठुनच्या पप्पांच्या हातून पत्रिका खिडकीतून थेट त्यांच्या टेबलावर पडतात. पप्पा पळत सुटतात. अजित पत्रिकेवर विजय श्रीवास्तव नाव वाचतो.
सिक्युरिटीला शिळोप्याच्या गप्पा मारत पप्पा एकदाचे सुसाट सुटतात. पुन्हा तोच निर्मनुष्य रस्ता. या शहराची रचनाच अशी आहे की ब्रेड आणायचा असेल तरी दुकानात सुद्धा या रस्त्याने जाणे भागच आहे. एक घाट सुद्धा लागतो. पाठीमागे कार लागते. कसे बसे पप्पा जीव वाचवून घरी येतात. पण इतक्यात विजय घरी येऊन शोधायला गेलाय. त्याला रस्त्यात पडलेली सायकल दिसते. तिकडे गोगा म्हणजे घारा साईडव्हिलन विजयची जीमची बॅग घेऊन येतो ज्यात बॉंब ठेवलेला असतो. ते बॅग ठेवून जातात.
इतक्यात मिठुन येतो पण समोरच स्फोटात कुटुंब संपताना त्याला दिसतं.
त्या वेळेलाच पळून जात असलेले साईड व्हिलन्स मिठुनला धडकतात. स्फोट झाल्यावर मिठुन पळत जातो. सर्वांना मांडीवर घेतो. पोलीस येऊन अटक करतात. चौकशी नाही काही नाही. मिठुनवर असा अन्याय चंडाळ मधे सुद्धा झालेला आहे. आपल्याच घरच्यांना मारण्याचा आरोप त्याच्य़ावर आहे. एक अगदीच विनोदी न्यायालयीन कामकाज होते आणि शिक्षा सुनावली जाते. युनूस परवेझचं किरट्या आवाजातलं संथ लयीतलं आणि कंटाळवाणं भाषण ऐकूनच जज्ज बहुतेक कावलेला असावा. असले खटले लढवून हा श्रीमंत कसा काय ?
इथे फ्लॅशबॅक संपला. मिठुन घराचा दरवाजा उघडून घरात कोळ्याची जाळी हटवत आत शिरलात. अगदी घायलची आठवण करून देत. त्याला तेच ते टी शर्ट सापडतं. आईचा भावाचा आवाज येतो. इथे त्याच्या निस्तेज डोळ्यात सूडाची आग धगधगते आहे ( हे समजून घ्यावे). आता पुढच्या सूडकथेचा धावता आढावा घेऊयात.
मिठुन जेल कम दारूगोळा कारखान्यातून कशासाठी बाहेर पडलाय आहे का लक्षात ? हा प्रश्न आमच्या आत्मानंद थेटरात माईकवरून विचारतात.
मिठुनला पण आठवतं. तो गौतमीकडे जातो. युनूस पप्पा नुकतंच मुलीला त्याला विसरून जायचा सल्ला देऊन गेलाय. पण मिठुनला पाहून ती त्याला साथ देते. लगेचच ते हरीशच्या कॉलेजात जातात. तिकडे तो नाचत असतो. हे पण नाचतात. (आय लव्ह यू हुआ पुराना यावर पुराना असा कोरस असलेले गाणे युट्यूबवर पहावे). लगेच दोस्ती की भुलीचा बोळा की अपहरण आणि व्हॅन थेट जेलमधे. झाले काम. आता मिठुन बाहेर येणार.
पण हाय रे दैवा. इथे डीसीपी दगा देतो. आपले अंदाज चुकतात. पांढरे कल्ले करून डीसीपी पण सुधारला वाटतानाच पुन्हा बिघडला हा ? विश्वास तरी कसा ठेवावा कुणाच्या सुधारण्यावर ? मिठुन आल्याबरोबर त्याला उलटं टांगतात. आणि टॉर्चर करायला साईड व्हिलन अर्जुन येतो दंडुका घेऊन. जेलर दारू पीत मजा बघत असताना रक्त पिण्याचा डायलॉग होतो. त्याला प्रत्त्युत्तर देताना मिठुन "मंत्री का पेशाब पी लेना " असे स्वाभिमानी उत्तर देतो. उलटे टांगलेले असताना, जेल मधे कोंडलेले असताना दंडुके पडत असताना असे उत्तर सुचणे हे खायचे काम आहे का ? जेलर भडकणार इतक्यात डीसीपी (कमिशनर पेक्षा मोठा) असलेला ग्रोव्हर येतो आणि "पेशाब पीना सेहद के लिये अच्छा होता है" असे पतंजली ग्यान देतो. हिरोला हा कट आहे हे समजणे अत्यंत आवश्यक असल्याने डीसीपी आपली कामे सोडून हे महत्वाचे काम करण्यासाठी आलेला असतानाच एक पोलीस कानात काही तरी सांगतो.
डीसीपी लगेचच पोलीस आयुक्त इमारतीत दाखल होतात. ही तीच जंगलाच्या मधोमध असलेली इमारत जिला मघाशी आपण आर्मी भरती केंद्र समजलो होतो तिथे आता पोलीस आयुक्तालयाचा बोर्ड आहे. इथे शक्ती कपूर आयजी म्हणून आलेला आहे.
आयुक्तालयात आय जी ! आयुक्तालय म्हणजे हेडक्वार्टर असा दिग्दर्शक आणि लेखकाचा समज झालेला असावा.
आयजी पण न कळवता आला. यांच्यात कळवून यायची पद्धतच नसते. त्यामुळे डीसीपीची किती पळापळ झाली. आता सीपी पेक्षा मोठा असल्याने डीसीपी रिपोर्टिंगला आलेला आहे. थोडक्यातच आपल्याला समजते की शक्ती कपूर भयंकर कडक पोलीस अधिकारी आहे. किमान डीसीपी पेक्षा आयजी मोठा हे दिग्दर्शकाला मान्य आहे हे ही नसते थोडके. आयुक्त म्हणजेच आयजी हे त्याला कुणी तरी सांगितले असेल तर त्याला तो तरी काय करणार ?
शक्ती कपूर सांगतो कि "आय जी प्रताप सिंग का ट्रान्स्फर कोई और नही वो खुद करता है "
घ्या ! आणि इकडे विरोधी पक्ष बोंबा मारतो ट्रान्स्फर हा उद्योग आहे म्हणून. आयजी प्रतापसिंग कशाला कुणाला काय देईल? त्याच्या मागेच हरीशची प्रेमिका उभी आहे जी त्याची मुलगी आहे. हरीश किडनॅप झाला म्हणून हा आला आहे. इथे मिठुनचे मानेवरचे केस लांब की आयजीचे हा एक तुलनात्मक अभ्यास सुरू होतो. अर्थात प्रेक्षकांच्या मनात. मानेवर लांब केस ठेवणारा आणि स्वत:ची ट्रान्फर स्वत:च करणारा आयजी पाहून डोळ्यात पाणी येतं. तो जावयाला शोधण्याचं अल्टीमेटम देतो.
डीसीपी लगेच अजितकडे जाऊन रडायला लागतो. तिथे थंड डोक्याचे अजित आणि परेश रावल त्याचं बौद्धीक घेतात. आपण हे काम मिठुनकडून का केलं ? कारण आयजी त्यालाच पकडेल म्हणून. असे म्हणून त्याला शांत करतात. इकडे मिठुनला रझा मुराद कडून हरीश हा त्याचा मुलगा असून रझा मुराद अजितचा धंद्यातला पार्टनर असतो पण तो प्रामाणिक असतो. त्यामुळे त्याचा काटा अजितने काढलेला असतो. त्याने कसले तरी पेपर्स लपवलेत त्यामुळे अजित खार खाऊन आहे. आता मिठुनला खरा प्रकार लक्षात येतो.
तो दगडी चेह-याने त्याच्या कोठडीत येरझारा घालत राहतो. त्याच वेळी एक सिंह पिंज-यात गुरगुरत येरझारा घालताना दिसतो. एका शॉटमधे मिठुन , दुस-यात सिंह ! इथे दिग्दर्शक दिसतो. ज्या प्रमाणे सिंह अभिनय न करता आतल्या आत धुमसत राहतो त्याच प्रमाणे धर्मेंद्र, मिठुनदा, शत्रुघ्न असे अभिनेते वावरतात. तो त्यांचा अभिनय समजायचा असतो.
इथून रक्तरंजीत सूडाचा प्रवास सुरू होतो. मिठुनदा गज वाकवून जेलरकडे जातात. जेलरचं त्या वेळी स्त्री सक्षमीकरणाचं एक अत्यंत महत्वपूर्ण काम चाललेलं असतं. त्यांच्या महिला क्याएंटशी ते प्रेमाने वर्तन करत असताना मिठुनदा तिथे रंग का भंग .. सॉरी काल म्हणून दाखल होतात. जेलरची हड्डी पसली एक करून या षडयंत्राचा रहस्यभेद करून घेतात. त्रिकालचं नाव समजल्यावर मिठुन खवळतो आणि जेल तोडून पळतो. त्याचा पेपर मधे आलेला फोटो आयजीची मुलगी ओळखते.
मिठुन जेलमधून सुटल्यावर चांगले महागडे कपडे (मिथुन स्टाईलचे) अंगावर चढवून थेट फाईव्ह स्टार हॉटेलमधे दारू पीत बसलेल्य़ा अजितच्या पुढ्यात जाऊन जंजीरची आठवण करून देतो. हिरोने आपण कसा बदला घेणार हे सांगणे एक अत्यावश्यक काम असते. न सांगता बदला घेणे हे योग्य नसते हा चित्रपटीय संस्कार आहे.
हिरवीन जंजीरच्या जया भादुरीप्रमाणे " इज्या जा अन तुझा बदला घी" असं म्हणते. तर तिचा भाऊ त्याला अजितचे बारूदचे अड्डे कुठे आहेत ते कळवतो. इकडे मिठुन गेल्यावर दिवाळीच होते. स्फोटांवर स्फोट आणि शेवटी बॉंब ठेवणारा उप साईड व्हिलन दिसतो. इथे मिठुनचा पहिला बदला पूर्ण होतो. पाठीमागे स्फोट होत असताना हिरो डोळ्यात आग घेऊन शांतपणे चाललाय हे दृश्य इथे दिसते. इथून घायलच्या सनीप्रमाणे मिठुन फोन लावायला विसरत नाही. एका फोनने व्हिलन मानसिक दृष्ट्या २५% खचतो. हे गणित किती व्हिलन्सला मारायचे त्या प्रमाणात असते. चार जण असतील तर २५%. पाच असतील तर वीस टक्के. म्हणजे पाच फोन करावे लागतात. गणितात चुका करून चालत नाहीत.
बारूदचा साठा उडवल्याने आत्मे घाबरले आणि आत्मानंद थेटरात गोंधळ माजल्याने काही काळ प्रोजेक्टर बंद करून दिवे घालवावे लागले. अंधार होताच आत्मे सावरले. आता चित्रपट पुन्हा सुरू व्हायच्या आधी जरा पाय मोकळे करावेत , सिगारेटी फुंकाव्यात. चुना तंबाखू काही जमतंय का म्हणून बरेच आत्मे बाहेर पडले. ते सगळे जिवंत असताना पुरूष होते.
तर एकाच वेळी संपूर्ण पडदा बघण्याची नव्हे स्कॅन करण्याची क्षमता असलेले डोळे असणारे आत्मे नायिकेचे कपडे, दागिने यावर चर्चा करू लागले. ते आत्मे जिवंत असताना कोण असतील हे सांगायला हवे का ?
इथे इंटर्व्हल होतो. चित्रपट पुन्हा सुरू होणार आहे. ब्रेक के बाद लौटकर फिर इसी जगह वापस आयेंगे. कही जाईयेगा नही.
(उत्तरार्ध लवकरच)
भन्नाट...
भन्नाट...
कहर...
कहर...
खरोखरच भन्नाट लिहिलंय, पंचेस
खरोखरच भन्नाट लिहिलंय, पंचेस मस्त!
काय हे सिने प्रीक्स्षााण !!!
काय हे सिने प्रीक्स्षााण !!!!
लेख मोठा आहे, फुर्रसतीने
लेख मोठा आहे, फुर्रसतीने वाचतो.
पण आदमी हा चित्रपट पाहिल्याचे आठवतेय. चांगला आहे. ईतर अचाट आणि अतर्क्य मिथुनपटाच्या तुलनेत याची पटकथा चांगली असल्याचे पुसटसे आठवतेय.
एवढं भन्नाट सूचन आणि ते सगळं
एवढं भन्नाट सूचन आणि ते सगळं लिहून काढणं .... धन्य आहेत तुम्ही. बाकी हसून हसून पार मुरकुंडी वळली.
सर्वांचे मनापासून आभार.
सर्वांचे मनापासून आभार.
@अॅडमिन - तीन वेळा एडिट केला पण पॅरा सेटींग्ज चुकीचे होतेय. प्लीज बघाल का ?
(अजून एकदा करून बघतो).
तीन वेळा एडिट केला पण पॅरा
तीन वेळा एडिट केला पण पॅरा सेटींग्ज चुकीचे होतेय. प्लीज बघाल का ? >> चकवा लागला बहुतेक
कमी झाला चकवा. आता बरं आहे
कमी झाला चकवा. आता बरं आहे सेटींग.
वेचक रत्नं प्रतिसादात द्यावी
वेचक रत्नं प्रतिसादात द्यावी म्हणत होते पण वाक्यागणिक एक निघाली. धमाल उडवून दिली आहे. आत्म्याने 'आदमी'चे प्रिक्षण लिहावे ही एक गंमत...
ज ब र द स्त!!
ज ब र द स्त!!
मिथुनने पहिल्याच चित्रपटात
मिथुनने पहिल्याच चित्रपटात अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवलाय. चित्रपट- मृगया, दिग्दर्शक - मृणाल सेन
मिथुन सकाळी जल्लाद, दुपारी
मिथुन सकाळी जल्लाद, दुपारी चंडाल, रात्री आदमी, "थरार कोठे आहे", जावेद खानची अजीजी असे अनेक जबरी पंचेस आहेत वाचतोय
भन्नाट लिहिलंय !
भन्नाट लिहिलंय !
बाप रे कसलं लिहिलय आणि केवढं
बाप रे कसलं लिहिलय आणि केवढं लिहिलय.
आत्म्यांच्या नजरेने सिनेमा पाहणे भारीए
भयंकर परीक्षण आहे
भयंकर परीक्षण आहे
ते आय 1 लव्ह 4 यु 3 वालं गाणं आता आठवलं.
पा आ मस्त परिक्षण. तो हरिश
पा आ मस्त परिक्षण. तो हरिश नामक हिरोचे या चित्रपटातील एक गाणे मी_अनु ने दृष्यावरुन गाणे धाग्यात दिले होते. आदमी चित्रपट भयानक बोर करतो. तुम्ही आणि इतर आत्म्यांनी थिएटर मध्ये बसून पाहिलात. कमाल आहे बुवा.
ब-याच वर्षांनंतर न राहवून
ब-याच वर्षांनंतर न राहवून चित्रपटविषयक काही तरी लिहीले आहे. आताच्या मायबोलीला आवडेल कि नाही हे ठाऊक नव्हतं. आपण सर्वांनी वाचून प्रतिसाद दिले याबद्दल आभारी आहे. बराच मोठा लेख झाला आहे. उत्तरार्ध लिहावा कि नाही हे ठरवले नव्हते.
आवडत नसताना पुन्हा पुन्हा मिथुनी अत्याचार करायचा विचार नव्हता . उत्तरार्धही आवडेल अशी अपेक्षा !
बापरे भारी लिहीलेय.. ते ही
झाले एकदाचे वाचून.. भारी लिहीलेय.. ते ही ईतके आणि वर म्हणे अजून उत्तरार्ध बाकी आहे
मला असे चित्रपटांचे खेचाखेचीचे लेख सहसा वाचायला आवडत नाही फारसे.. अर्ध्यावरच सोडतो.. पण ते आत्मा आदमी चांडाळ वगैरे पंचेश छान होते
झाले एकदाचे वाचून.. भारी
झाले एकदाचे वाचून.. भारी लिहीलेय.. ते ही ईतके Proud आणि वर म्हणे अजून उत्तरार्ध बाकी आहे Proud
मला असे चित्रपटांचे खेचाखेचीचे लेख सहसा वाचायला आवडत नाही फारसे.. अर्ध्यावरच सोडतो >>> या कशाचाच अर्थ नाही लक्षात आला.
पा. आ., मस्त लिहिलय. आत्मा
पा. आ., मस्त लिहिलय. आत्मा अँगल जबरी जमलाय.
अहो कौतुकच आहे. मला पर्सनली
अहो कौतुकच आहे. मला पर्सनली या प्रकारचे लेख वाचायला फार आवडत नाहीत ज्यात अमुकतमुक चित्रपटात कसे लॉजिक नाही दाखवून त्याची खेचली जाते. पण यात आत्म्याच्या ॲंगलने आदमीबद्दल जे लिहिलेत त्या अनुषंगाने आलेले पंचेस आवडले
तो सोसायटीच्या वॉचमनचा डोळा
तो सोसायटीच्या वॉचमनचा डोळा चुकवून इमारतीत शिरतो. सायकल तिथे लावतो. कॅमेरा दूधाच्या कॅनवर.
>>त्या दुधाच्या कॅन मागे एक बंदूक असते, ती दाखवण्याचा प्रयत्न होता तो
कसला भयाण पिक्चर आहे.
कसला भयाण पिक्चर आहे. आयुष्यात कधीच मिथुनचे असले सिनेमे पाहीलेले नाहीत. परीक्षण वाचून मोह झाला
पायावर धोंडा नाही धोंड्यावर पाय मारला.
ते गाणं कसलं डेंजर आहे.
https://www.youtube.com/watch?v=lyJHNAj8JcE
नेमकं काय म्हणायचंय यांना ? आणि कोरसवाले इतके आनंदाने पुराना पुराना करताहेत.
धक धक त्या मानाने ग्रामी लेव्हलचं म्हणायला पाहीजे.
कोण काढतं असलं पिक्चर्स ? कोण बघत असेल ? बरेच प्रश्न पडलेत
मिथुन चे उटीला मोठे हॉटेल आहे
मिथुन चे उटीला मोठे हॉटेल आहे. तो हिरो प्लस हॉटेल प्लस शूटिंग लोकेशन असे पॅकेज डील देत असे, त्यामुळे त्याकाळात त्याचे असे असंख्य सिनेमे आले. अनेकदा एका सिनेमातला व्हिलन चुकून दुसर्याच चित्रपटात दिसत असे. लोकही आपलाच मिथुन म्हणून चालवून घेत.
असो. "हप्ता वसूली" नावाचा जॅकी चा सिनेमा हैदराबाद ला असताना पाहिला. तो इतका फ्लॉप होता की तीनच दिवसात थिएटर मधून उतरला. त्यानंतर भाकरीच्या शोधात अमेरिकेत आलो. इथे एका देसी दुकानात "हप्ता वसूली" ची ऑडियो कॅसेट विकायला ठेवलेली पाहून हसू आले. मी ती कॅसेट ची डबी उघडून तीत $२० ची नोट ठेवली. जो कुणी पुण्यात्मा ही केसेट खरेदी करेल त्याला मानाचा मुजरा. दोनेक वर्षाने त्याच दुकानात गेलो तर तीच केसेट होती व माझे पैसेही !
छान
छान
खतरा लिहीलंय उत्तरार्ध कुठेय
खतरा लिहीलंय उत्तरार्ध कुठेय?
फार हसले !!
फार हसले !!
फार हसले !!
फार हसले !!
दोनेक वर्षाने त्याच दुकानात
दोनेक वर्षाने त्याच दुकानात गेलो तर तीच केसेट होती व माझे पैसेही ! >>>>
धन्यवाद सर्वांचे. उत्तरार्ध लिहीतोय. अजून पूर्ण झाला नाही.
Pages