एक कथा आणि काही प्रश्न !

Submitted by कुमार१ on 8 May, 2021 - 22:10

नमस्कार !
आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ती सांगता सांगता टप्प्याटप्प्याने काही प्रश्न विचारतो. त्यांची उत्तरे मनात देत रहा.
आणि हो, गोष्ट क्रमानेच वाचा. मजकुराचा शेवट आधी बघू नका. तरच मजा येईल !

मग चालू करूयात ?

१. एका गरीब रिक्षाचालकाच्या रिक्षेत एक तरुणी बसली आहे. गाडी सिग्नलला थांबलीय. तेवढ्यात रस्त्यावरची एक भटकी मुलगी त्या तरुणीची पर्स पळवते आणि जोरात पळू लागते. अशा प्रसंगी तो रिक्षाचालक रिक्षा थांबवून आणि आपला कामधंदा सोडून त्या चोर मुलीचा पाठलाग करेल, की त्या तरुणीला उतरवून आपले भाडे घेऊन निघून जाईल ?

२. त्या चोर मुलीला पळता पळता अन्य एका गाडीची धडक बसून ती रस्त्यावर बेशुद्ध पडली आहे. समजा, त्या रिक्षाचालकाने तिचा पाठलाग केलेला असता, तर आताचे दृश्य पाहून तो निघून जाईल की त्या मुलीला रुग्णालयात नेईल?
३. समजा, त्याने तिला रुग्णालयात नेलेच तर तो तिथे डॉक्टर व पोलिस यांच्या ताब्यात तिला देऊन निघून जाईल, का त्या अनोळखी चोर मुलीची काळजी घ्यायला तिथेच थांबेल ? रिक्षातील प्रवासी तरुणी या प्रकरणात लक्ष घालेल की नाही ?

४. एक श्रीमंत वृद्ध माणूस दिल्लीमध्ये भटकायला निघाला आहे. तो शोध घेतोय खऱ्याखुऱ्या प्रामाणिक माणसाचा ! त्याच्या जवळ भरपूर संपत्ती आहे आणि त्याला स्वतःचे मृत्यूपत्रही करायचे आहे. तो जाणून आहे की त्याची मुले व्यसनी, जुगारी व अप्रामाणिक आहेत. आता योगायोगाने हा श्रीमंत माणूस वरच्याच रिक्षाचालकाच्या रिक्षात बसलाय. त्याचा पंधरा-वीस मिनिटे प्रवास होतो. त्या दरम्यान रिक्षाचालकाशी जीवनासंबंधी काही मूलभूत गप्पा होतात. पुढे रिक्षा इच्छितस्थळी पोहोचते. हा प्रवासी पैसे देतो. मीटरनुसार झालेले पैसे दिलेल्या रकमेपेक्षा फक्त तीन रुपयांनी कमी आहेत. तर रिक्षाचालक आपणहून ते तीन रुपये सुटे परत करेल का ? समजा, एवढी क्षुल्लक रक्कम परत घ्यायची प्रवाशाची तयारी नसली तरीसुद्धा हा चालक ते ३ रु. परत करायचा आग्रह धरेल का ?

५. वरच्या घटनेनंतर तो श्रीमंत माणूस मरण पावलाय. मृत्यूपूर्वी त्याने एका मित्राच्या साक्षीने त्याचे जुने मृत्युपत्र बदलून नवे स्वहस्ताक्षरात लिहिलेय. त्याद्वारे त्याने आपली संपत्ती कोणाला देऊ केली असेल ? तो ज्याचा शोध घेत होता तो प्रामाणिक माणूस त्याला सापडला असेल काय ?

६. आपल्या गोष्टीतील मुद्दा क्रमांक १ मधल्या चोर मुलीची तब्येत आता बिघडली आहे. ती अनाथ आहे. सदर रुग्णालय खाजगी आहे. त्या मुलीवर मोठी शस्त्रक्रिया करायची आहे व तिचा खर्च बऱ्यापैकी आहे. हे सर्व त्या रिक्षाचालकाला कळलेले आहे. आता तो स्वतःला या सर्वापासून अलिप्त ठेवेल की त्याच्या आवाक्याबाहेरील तो खर्च करेल ? समजा त्याने तो केलाच तर त्याला यश येईल की अपयश ?

७. आता पुन्हा श्रीमंत माणसाकडे वळू. त्याला अपेक्षित असलेला प्रामाणिक माणूस सापडला होता. अर्थातच तो पूर्ण अनोळखी आणि त्याच्या राहण्याचा पत्तासुद्धा माहीत नसलेला. त्यावर एका फटक्यात त्याने मृत्युपत्रात आपली सर्व संपत्ती या अनोळखी माणसाला देऊ केली आहे. श्रीमंताच्या मृत्यूनंतर त्याचे मृत्युपत्र एक वकील जाहीर करणार आहे. त्यात एक अट घातलेली आहे. त्यानुसार वकिलाचे कर्तव्य आहे की तो प्रामाणिक माणूस ठराविक मुदतीत शोधून काढणे. मात्र जर का तो सापडलाच नाही तर मग संपत्ती जैविक वारसांना जाणार आहे.

८. प्रामाणिक माणूस शोधण्याचे काम त्या श्रीमंताच्या साक्षीदार मित्रावर सोपवलेले आहे. श्रीमंताच्या एका मुलाने या मित्राला वश करून घेतले आहे व (प्रामाणिक माणूस न शोधण्याबद्दल) संपत्तीचा काही भाग द्यायचे कबूल केले आहे. मग आता हा मित्र कसा वागेल ? तो कष्ट घेऊन संबंधित प्रामाणिक माणूस शोधेल की स्वार्थ महत्त्वाचा मानेल ?

९. समजा, अखेरीस तो प्रामाणिक माणूस सापडला आहे आणि तो म्हणजे आपल्या गोष्टीतील रिक्षाचालकच आहे ! आता वकिलाने या गरीब चालकाला सर्व परिस्थिती समजावून सांगितली आहे. मृत्युपत्राची अंमलबजावणी शेवटच्या टप्प्यात आली आहे. सदर संपत्ती ३० कोटी रुपये आहे ! ही संपत्ती खरच त्या रिक्षाचालकाला मिळेल काय? समजा, मिळणार असेल तर ते कळून तो आनंदाने बेभान होईल का ?

१०. आपला रिक्षाचालक व मुद्दा १ मधील त्याच्या रिक्षातील प्रवासी तरुणी यांचे एव्हाना काही ‘नाते’ जुळत आले असेल का ?

११. स्वकष्टार्जित कमाई आणि कष्टाविना झालेला प्रचंड धनलाभ यात काय श्रेष्ठ समजायचे ? या प्रश्नाचे कल्पनेतील आणि वास्तवातील उत्तर एकच असते की वेगळे ?

बस्स !
आता माझी गोष्ट संपली त्यातील प्रश्नांना तुम्ही मनात उत्तरे तयार केली असतील. आता तुमच्या पुढे दोन पर्याय आहेत. एक तर तुमच्या विचारांनुसार त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची किंवा.......

.... सरळ ‘प्राईम’वरचा ‘अमल’ हा हिंदी चित्रपट बघायचा !
….

चित्रपटाबद्दल मी एवढेच लिहीतो :

• २००८ चा रिची मेहता दिग्दर्शित
• Genie पुरस्कार प्राप्त ( सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक व नायक दोघांना)
• हिंदी व इंग्लिश मिश्र भाषेत
• रिक्षाचालकाच्या (अमलकुमार) अप्रतिम भूमिकेत रुपिंदर नागरा
• श्रीमंत माणूस नासिरुद्दीन शाह
• वकील स्त्रीच्या भूमिकेत सीमा बिस्वास.

सुंदर चित्रपट ! मला आवडला.

Amal_hindi.jpg
……………………………………………………………………………

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

डोकं गरगरायला लागलं.
हा चित्रपट पाहणार.
मुद्दा 2 च्या वाक्यात थोड्या व्याकरण चुका आहेत का?अर्थ लावायला कठीण जाते आहे.

चित्रपटाचं परीक्षण लिहीण्याची अभिनव शैली खूपच आवडली. शेवटी चित्रपट नसता आणि या प्रश्नांची उत्तरे देत एखादी कथा लिहायला सांगितली असती तर जास्त मजा आली असती.

वरील सर्वांना धन्यवाद .
राभू,
तुम्ही हा चित्रपट न पाहता यावर तुमच्या शैलीत एक छान कथा लिहाच असे सुचवतो !

चांगली सूचना आहे सर. माझ्या नावाचा विचार केल्याबद्दल मूठभर मांस चढलं. Happy
पण ऑलरेडी चित्रपट अस्तित्वात आहे म्हटल्यावर ती निर्मिती अस्सल राहणार नाही
आणि कथामालिका लिहीण्याच्या ताणातून नुकतीच सुटल्याची भावना आहे. Lol
अशा प्रकारे वेगळ्या काही कल्पना दिल्या तर नक्की लिहायचा प्रयत्न करीन.

परीक्षणाची अभिनव शैली आवडली. साधारणपणे शेवटी एकदोन प्रश्न उपस्थित करून 'याची उत्तरं हवी असतील तर चित्रपट बघा' असं असतं Happy
तुम्ही प्रश्न विचारता विचारता काही उत्तरंही दिली आहेतच!

धन्यवाद.
* तुम्ही प्रश्न विचारता विचारता काही उत्तरंही दिली आहेतच >>
चित्रपट जुना असल्याने ती लिहीली.

** मी मनातल्या मनात रिक्षाचालकालाच नायक बनवत गेले. >>
अगदी बरोबर !

ही अभिनव पद्धत आवडली. प्रत्येक वेळी दोन उत्तरं मिळत गेली. पुन्हा या सगळ्या सुट्या उत्तरांची माळ ओवणे आले. Happy या प्रश्नांच्या मार्फत आवश्यक तेवढंच सांगून उत्सुकता निर्माण केली आहे. बघते.

अभिप्राय व उत्सुकता दाखवल्याबद्दल वरील चौघांचे मनापासून आभार !

एखादा चित्रपट आवडणे/ नावडणे हे व्यक्तिसापेक्ष आहे याबद्दल दुमत नाही
Bw

काल बघितला.
कलाकारांची कामे उत्तम.
रिक्षाप्रवास छान !

बघितला चित्रपट
आवडलाच
अगदी शेवटही Happy
आणि पुन्हा एकदा थँक्यु

चित्रपट परीक्षण आवडले.

प्रामाणिक मनुष्य कसा शोधायचा याची एक गोष्ट (बहुदा जपानमधील गोष्ट) कुठेतरी वाचली होती, ती या निमित्ताने आठवली.
एका कंपनीचा खूप श्रीमंत मालक असतो, त्याला मूलबाळ नसते. त्याच्या नंतर कंपनी कुणाला चालवायला द्यायची हा प्रश्न असतो. तो खूप विचार करून एके दिवशी कंपनीतल्या सर्वांना बोलवून प्रत्येकी १ अशी सफरचंदाची बी देतो आणि म्हणतो की याला रोज पाणी द्या, त्याची काळजी घ्या, जपा आणि १ वर्षाने परत या. ज्याने मनापासून काळजी घेतली आणि ज्याचे झाड सगळ्यात मोठे झाले, तोच कंपनीची जबाबदारी घेऊ शकेल आणि ती व्यक्ती कंपनी पुढे चालवेल.

एक वर्षाने प्रत्येक जण त्याचे/तिचे झाड घेऊन येतो. काही झाडे छोटी असतात, काही मोठी असतात. ती सर्व मांडून ठेवतात, फक्त एक माणूस चिठ्ठी लिहून ठेवतो की मी रोज पाणी घातले, खत घातले पण झाड काही आले नाही. मालक येऊन सगळी झाडे बघतो आणि ज्याने चिठ्ठी लिहिली होती, त्याला नवीन मालक म्हणून निवडतो. सगळेजण आश्चर्यचकित होतात आणि मालकाला विचारतात की असं कसं काय? आमची सगळ्यांची झाडे आहेत आणि याचे तर झाड पण आले नाही. तेव्हा मालक म्हणतो की हा प्रामाणिक आहे म्हणून, कारण मी सगळ्यांना उकडलेल्या बिया दिल्या होत्या.

अभिप्राय व उत्सुकता दाखवल्याबद्दल वरील सर्वांचे मनापासून आभार !

उबो, किस्सा छानच !
या आशयाच्या काही बिरबलकथा आहेत.

या चित्रपटाच्या कथेशी साधर्म्य दाखवेल अशी वास्तवातील घटना:

वृद्ध महिलेने रिक्षाचालकाला दिला तीन मजली बंगला आणि करोडोंची संपत्ती
https://www.loksatta.com/trending/the-old-woman-gave-the-rickshaw-puller...