अहो बाबा - संस्कारच तसले आहेत !

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2021 - 02:18

दुसरा मुलगा मला आता तीन वर्षांपूर्वी झाला. पण त्या आधी चार वर्षे एकच मुलगी होती. बरेपैकी लाडावलेली होती. आय मीन आहे. कारण पहिली मुलगी व्हावी अशी मुळातच बरीच ईच्छा होती. ते एक असो, पण त्यामुळे मुलीशी नाते अगदी मैत्रीचे आहे. लहानपणी ती आधी मला नावाने हाक मारायची ते गोड वाटायचे. पुढे पप्पा बोलू लागली ते ही आवडू लागले. पण अहो जाहो नाही तर अरे तुरे, म्हणजे एकेरीच उल्लेख करू लागली ते ही छान वाटू लागले.
बरेचदा एकेरी उल्लेख म्हटले की आदर शून्य असा आपल्याकडे एक समज असतो. त्यामुळे मुलांना सहसा आपण मोठ्यांशी बोलताना अहो जाहोच बोलायला शिकवतो. तसे आम्हीही तेच शिकवले आहे. पण घरी मला ती आदर देतेय हे दाखवण्यासाठी म्हणून मुद्दाम अहो जाहो शिकवायची गरज नव्हती. म्हणून मग कौतुकाची फेज गेली तरी तिचे अरे तुरेच चालू दिले. आम्ही दोघेही त्यातच कम्फर्टेबल होतो.

तर यातूनच परवा एक किस्सा घडला.

मुलीची एक नवी मैत्रीण घरी आली. मुलीच्याच वयाची, सात वर्षांची. पहिल्याच भेटीत समजले की ती छान शिस्तीची, संस्कारी, शुद्ध आणि अगदी पुस्तकी मराठी बोलणारी आहे. आता यात गैर काही नाही, फक्त आमच्या घराच्या ऊलट वातावरणात वाढलेली आहे हे चटकन समजले ईतकेच. पण म्हटलं बरेय, तेवढेच आपली मुलगीही चार चांगल्या गोष्टी शिकेल. त्यामुळे साधारण कुठल्याही आईबाबांचे मुलांच्या मित्रमैत्रीणीशी जसे संवाद सुरू होतात तसे सुरू झाले. जसे की तू रोज सकाळी उठल्यावर ब्रश करतेस ना, आंघोळ करायला आळस तर नाही करत ना, ऑनलाईन लेक्चर बुडवतेस का? आमची मुलगी अशी तमुकअमुक वागते, तू तशी तर वागत नाहीस ना, सर्व भाज्या खातेस ना..शिकव जरा हिलाही.. वगैरे वगैरे..

मध्येच अचानक माझ्या मुलीने मला म्हटले, "अरे पप्पा, हे तर तू पण नाही करत..."
तू ??? .. ती मैत्रीण एकदम किंचाळलीच
कोण आहेत ते? पप्पा आहेत ना तुझे? तू काय बोलतेस त्यांना? तुम्ही बोलावे...

माझी मुलगी शॉक लागल्यासारखे माझ्याकडे बघू लागली. हे काय नवीनच? आपल्याच पप्पांना कश्याला तुम्ही बोलायचे??

आणि मी भूतकाळात गेलो........

मी स्वतःही माझ्या वडिलांना लहानपणापासून एकेरीच हाक मारायचो. आमच्या एकत्र कुटुंबात त्यांना भाऊ म्हणायचे म्हणून मी सुद्धा भाऊच म्हणू लागलो. पण ओ भाऊ नाही तर ए भाऊ. जवळपास वयाच्या विसाव्या वर्षीपर्यंत एकेरीच हाक मारायचो. पुढे मग कधी अहो जाहो करायला लागलो समजले नाही. पण आजही त्याचे वाईट वाटते. कुठेतरी मुलगा मोठा झाला की बापाशी असलेल्या मैत्रीच्या नात्यात थोडासा दुरावा येतो तसे झाल्यासारखे वाटले. हे अहो जाहो आदरातून आले नसून आमच्यातील आधीचे निखळ मैत्रीचे नाते कुठेतरी माझ्या वाढत्या वयातून आलेल्या अहंकाराने तुटल्याने झालेय असे आजही वाटते. आणि आता फिरून आधीसारखा एकेरी उल्लेख शक्य नाही होणार याचेही वाईट वाटते..

तर याच एकेरी उल्लेखाचा एक किस्सा घडलेला,

दहावीच्या क्लासला होतो आम्ही. एक मुलगी मला फार्र आवडायची. तसेही माझ्या शैक्षणिक कारकिर्दीत असे एकही वर्षे नाही की ज्यात मला एखादी मुलगी आवडली नसेल. तरीही दहावी म्हणजे बोर्डाची परीक्षा म्हणजे आपण मोठे झाल्यासारखे वाटू लागलेले. त्यामुळे या मुलीने हो, म्हणताच आपण पुढे जाऊन हिच्याशीच लग्न करायचे वगैरे असल्या प्रकारचे सिरीअस प्रेम होते. एकतर्फी प्रेमप्रकरणात जे सर्वात पहिले करतात ते केले होते. म्हणजे वर्गमित्रांमध्ये डिक्लेअर केले होते की ईथे मी नंबर लावलाय, जेणेकरून निदान आपला कोणी मित्र मध्येच घुसून त्रिकोण बनवायच्या भानगडीत पडत नाही. आणि शक्य ती मदतच करतात. अपवाद, आपल्या लंगोटी याराचा. तो त्याला जे किडे करायचे ते करतोच.

तर असेच आम्ही एकदा क्लास सुरु व्हायच्या आधी बाहेर जमलो होतो. सर लेट येणार होते, तर गप्पागोष्टींचा माहौल होता. कोण कसे आपल्या घरच्यांना घाबरत नाही, आपली घरात कशी चालते, आपल्याला कुठेही पिकनिकला जायचे असेल तर घरचे अडवत नाही, एखादा प्रोग्राम बनवायला दरवेळी घरच्यांची परवानगी लागत नाही, वगैरे वगैरे यावर चर्चा चालू होती. मुले बोलत होती, मुली ऐकत होत्या. ऐकणार्‍या मुलींमध्ये ती सुद्धा होती. ते पाहून आपणही काहीतरी बोलणे गरजेचे होते. पण मला कुठून दुर्बुद्धी झाली, आणि अतिशहाणपणा दाखवत मी म्हटले, माझे वडील तर माझे अगदी यारदोस्त आहेत. तुम्हाला तर माहीत आहे ना, मी त्यांना अहोजहो नाही तर अरेतुरेच बोलतो.

संस्कार !

मित्र पक्का पुणेरी. फक्त एवढेच म्हणाला, संस्कार !
पण असे काही म्हणाला की एकदम ठ्ठो !

मी यकायक धरती फट जाये और मे उस मे समा जाऊ मोड मध्ये गेलो. नालायकाने तिच्यासमोर माझ्या संस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून माझी लाजच काढली होती.

पण सुदैवाने पुढच्याच क्षणाला सावरलो, आणि म्हणालो,

हो का,
मग आईच्या वेळी कुठे जातात हे...
संस्कार !

तिला बरे अरे तुरे करतोस.

खरे तर मी हे अंदाजानेच म्हणालो, कारण आपल्याकडे शंभरात ९५ घरात हेच चित्र असते. आणि माझाही तीर निशाणेपे Happy

आता मी काही पुणेकर नसल्याने किमान शब्द वापरून थांबलो नाही. आईला अरेतुरे करणे म्हणजे कसे प्रेम आणि आपुलकीची भावना असते, यात तिचा अनादर नसतो. मग बाबांच्या वेळीच का अहोजाहो मध्ये संस्कार आणि अरेतुरे मध्ये अनादर दिसावा? यावर सर येईपर्यंत १०-१५ मिनिटे त्याला छान लेक्चर दिला. हेतू एकच. हे सर्व ऐकणार्‍या तिला ईम्प्रेस करणे.
आता यामुळे म्हणा किंवा दुसर्‍या कारणामुळे म्हणा, आमचे पुढे काही काळासाठी जमलेही. तिच्याशीच लग्न करायचे स्वप्न काही पुर्ण झाले नाही ती गोष्ट वेगळी आणि ती पुन्हा कधीतरी स्वतंत्र लेखात...

पण आज फिरून तोच प्रश्न माझ्या मुलीला विचारला गेला होता. ते सुद्धा माझ्यासमोरच. आणि माझ्याकडे उत्तर तयार होते Happy

बाळ, तू आईला काय हाक मारतेस? ए आई की ओ आई?
ए आई ना? मग तिला नको का आदर द्यायला आपण?
देतो ना तिलाही आदर... ए आई बोलूनही आदर देता येतो ना..
आई आणि बाबा दोघेही एकसारखेच असतात आपल्यासाठी. जसे आईला आपण प्रेमाने आणि लाडाने ए आई बोलतो तसे पप्पांनाही ए पप्पा बोलायला काही हरकत नसते.

मी माझ्या परीने त्या मुलीला छान समजावले, पण एकंदरीत या वयात संस्कार हे नेहमी आपल्याच आईवडीलांकडून होत असल्याने तिला तिच्याच वडिलांची शिकवण योग्य वाटणार होती. त्यामुळे तिला माझे म्हणने शून्य पटले असे मला वाटले.
पण तिला पटो न पटो, माझ्या मुलीला मात्र ए पप्पामध्येही आदर प्रेम आपुलकी सारे असते हे पटले आणि आईबाबा एकसमान हि शिकाव्ण सुद्धा मिळाली हे माझ्यासाठी महत्वाचे ठरले Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख छान आहे.

नीट विचार न करता कुणाचे संस्कार काढणे हे सुद्धा चूकीचे संस्कार या प्रकारात मोडायला हवे.

अहोजाहो केले वा सर/म्याडम म्हटले म्हणजे मनात आदर असतो हि अत्यत खुळचट समजूत आहे असे मला खूप पूर्वीपासून वाटते. इंग्लिश लोकांनी सोपे करून ठेवले आहे. You, He, She. विषय संपला. काय आदर अनादर असेल तो मनात असू द्या. बोलण्यावागण्यातून दिसू द्या. तो उच्चारण्याची का गरज पडावी? अहो जाहो अरे तुरे मुळे इतका गोंधळ होतो कधी कधी.

नवीन व्यक्तीला सर/म्याडम/अहो/जाहो म्हणावे तर ते नेमके त्यांना आवडत नसणारे निघतात. म्हणतात मला नावानीच बोलवा.
अरे/तुरे करावे तर नेमके त्यांना सर/म्याडम/जी म्हटलेले आवडत असते म्हणून चमकून तोंडाकडे बघतात.
घोळच आहे सगळा.

सर आणि म्याडम सुद्धा असेच खुळचट प्रस्थ बनवून ठेवले आहे. आयटी मध्ये पूर्वी छान कल्चर होते. एकमेकाला सगळे नावानी हाक मारत. मग तो सीइओ असो किंवा टीम मेंबर. मागच्या काही वर्षात मात्र आयटी मध्ये सुद्धा सर/म्याडम कल्चर बोकाळले आहे. कुठून आले असावे हा वेगळा विषय. असो.

पालकांचे मुलांशी अरे तुरे बोलावले जाणारे मैत्रीचेच नाते हवे. माझ्या लहानपणी मी एकदा वडीलाना अरेतुरे करणारी मुले मी पाहिली होती तेंव्हा आश्चर्य वाटून त्या वडीलांविषयी माझा आदर प्रचंड दुणावला होता. पण आजच्या घडीला नेमके माझ्याच घरात कितीकवेळा सांगूनही मी हे कल्चर निर्माण करू शकलो नाही, किती सांगितलं तरी मुलगा म्हणतो मी तुम्हाला अहोच म्हणणार मला जबरदस्ती करून नका. घ्या!

एका दिवाळी फराळाला माझ्या मित्राच्या घरी गेलो होतो तेव्हा मला असाच धक्का बसला होता. तो, त्याची बहीण, भाऊ (सगळे लग्न झालेले अन मुलं बाळं झालेले..!) त्यांच्या वडिलांना अरे-तुरे बोलत होते. मला कसंतरीच वाटत होतं पण आईला आपण अगं - तुगं करतो हे माहित असल्याने त्या तिघांचं ते अरे-तुरे कसंसंच वाटलं तरी मी ते चेहर्‍यावर येऊ दिलं नाही.

त्यांच्या आई-वडिलांना मी आधीपासून ओळखत होतो परंतू त्यांच्या घरी जाण्याचा तो पहिलाच योग होता. त्यांच्या घरून निघताना मी त्या काका-मावशींच्या पाया पडलो तर माझा मित्र अन त्याचा भाऊ जोरात ओरडले "अरे हे काय करतोयस..!!". मी त्यांच्या आई-वडिलांच्या पाया पडलो हे बघून त्यांना खूप शेम शेम वाटल्या सारखे ते माझ्याकडे बघून मला "अरे..असं पाया नसतं पडायचं..!" असं म्हणाले ते ऐकून काका-मावशी त्या दोघांना दरडावत म्हणाले की अरे पडावं असं मोठ्या माणसांच्या पाया. त्यात एवढं गहजब करण्यासारखं काय आहे अन अस म्हणुन मावशींनी माझ्या डोक्यावर हात फिरवला. मला खूप ऑकवर्ड वाटलं माझ्या मित्रांचं वागणं बघून. पण असो.. आपणाला एकांगी बाजुने लगेच संस्कार काढण्याची काहीच गरज नाही. वयाने मोठ्या माणसांच्या पाया पडलं म्हणुन संस्कार चांगले अन नाही पडले म्हणुन संस्कार वाईट असं म्हणणं पण अति धाडसाचंच..!!

माझा थोरला मुलगा पहिल्यापासून दोघांनाही अरेतुरे करतो. कुठे घरगुती कार्यक्रम वगैरे मधे अनेक नातेवाईक ते ऐकायचे अन त्याला समजवायचे. क्वचित रागवायचेसुध्दा. पण त्यांच्यासमोर तोंडदेखलेही कधी आम्ही त्याला समजावले नाही. आम्हाला त्याचे अरेतुरेच आवडायचे. आता त्याला कोणी बोलतही नाही अन तोही सर्वांसमोर बिनधास्त अरेतुरे करतो.
शाळेत जायच्या आधीतर तो मला थेट नावानेच हाक मारायचा कारण सगळे तसंच करायचे.
पण एकदा नर्सरीत, त्याच्या शाळेत एका मित्राने याचे ऐकून मला थेट नावानेच हाक मारली! मग मात्र टिचरच रागावली आणि त्याने मम्मी म्हणायला सुरूवात केली.

मी स्वतःही माझ्या वडिलांना लहानपणापासून एकेरीच हाक मारायचो >> काय योगायोग आहे.. माझे बाबाही घरात सगळ्या भावंडांमध्ये मोठे होते त्यामुळे त्यांना सगळे भाऊच म्हणायचे.. इतरांमुळे आम्हीही त्यांना अरे भाऊ असा एकेरीतच उल्लेख करायचो..आणि तो कायम तसाच केला..पण बाहेर बोलताना आपोआपच अहो जाओ असाच उल्लेख झाला.. आमच्या घरात बाबांना अरे तूरे बोलणं फार कॅामन होतं कारण माझे बाबा आणि त्यांची भावंडेही त्यांच्या बाबांना अरे बाबाच बोलायचे.. पण माझं अरे तूरे बोलणं माझ्या नवऱ्याला व त्याच्या घरच्यांना आधी विचित्र वाटायचं.. नंतर सवय झाली.. पुढे दोन मुली झाल्या .. त्या त्याला अरे डॅडा म्हणून बोलऊ लागल्या.. आणि तो मनापासून अरे तूरे एंजॅाय करू लागला .. आता मुली आज्जी, आजोबा, मामा, काका, त्यांच्या मैत्रिणींचे बाबा.. सगळ्यांनाच अरे तूरे करूनच बोलवतात.. पण अमेरीकेत राहतात..मराठी जास्त कानावर पडत नसेल म्हणून भारतात आलो तेव्हाही कोणी चूका काढायला आलं नाही .. पुढे जाऊन तुमच्यासारखे अनुभवही येतीलच
आणि हो.. बाबांना जरी अरे तूरे ने बोलत असले तरी नवऱयाला अहो जाओच करते .. कोणाच्या दबावामुळे नाही.. पण ती एक वेगळीच स्टोरी आहे

साऊथचा डब्ड सिनेमा हिंदीत यावा. तो थोडा चालून बंद पडावा.
मग तोच सलमानने रीमेक करावा आणि तुफान जाहीरात करावी तसा विषय आहे हा.
पूर्वीच्या बातमीफलकच्या जमान्यात पाया पडणे गरजेचे आहे का ? किंवा आई वडीलांना अहो जाहो करणे सक्तीचे आहे का अशा चर्चा झडत. नंतर ऑर्कुट, मराठी माती, मानबिंदू, उपक्रम आणि मायबोलीवर देखील होऊन गेल्या.

आता रीमेक आला आहे.

आपण एखाद्याशी बोलतो आणि एखाद्याला म्हणतो

हा फरक हल्ली लोकांना समजत नाही आणि त्याचे वाईटही वाटत नाही

पप्पा बोलतेस? गाणे बोल हल्ली सरास चालून जाते

आपण एखाद्याशी बोलतो आणि एखाद्याला म्हणतो

हा फरक हल्ली लोकांना समजत नाही आणि त्याचे वाईटही वाटत नाही

पप्पा बोलतेस? गाणे बोल हल्ली सरास चालून जाते

देसी लोकांना खुपच मानापमानाचे पडले असते. अगदी ऑफीसमध्ये सांगायचे झाले तर, देसी बॉसना सर, मॅडम वगैरे म्हटलेलेच आवडते.
तसेच काका, मामा वगैरेना.

मला तर ते अमेरीकन परवडतात ह्या बाबतीत.... बॉसला नावाने हाक मारली तरी हरकत नाही....

माझ्या मित्राकडे तर आई-वडील त्यांच्या मुलांना अहो-जाहो करतात. शिवाय ते लोक उत्तर भारतीय पण नाहीत, आपल्याच लातूरचे आहेत.

छान लेख.
हल्ली सगळीकडे बरेचदा सांगितलं, म्हणाला, विचारलं ह्याऐवजी बोलला, बोलला, बोललाच ऐकू येतं.>>> +1

अशणार, नशणार, बशणार, हशणार, घाशणार, पुशणार असंही विचित्र बोललेलं ऐकु येतं. काल तर मी लोकसत्ताच्या एका ऑनलाईन बातमीत 'अशणार' वाचलं अन डोक्यावर हात मारून घेतला.......!!

म्हण हा संस्कृत भण पासून निघालेला धातु.
बोल हा वद, वच पासून निघालेला.
म्हण चा वापर जुन्या मराठीत फारसा दिसत नाही. लीळा चरित्रात मात्र बरेच वेळा आढळतो.
बोल हा धातु मात्र गेल्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत मराठी वाड्;मयात पुष्कळ वापरला गेला आहे.
हे कोण बोलले बोला, राजहंस माझा निजला.
बोला अमृत बोला.
ध्रुव बोले पाहीन पिता माझा,
माय बोले मारील राजभाजा
बोलावा विठ्ठल
हे नयन बोलले काहीतरी.
वगैरे.

.

छान माहिती हीरा.
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले
हे बोलतो म्हणतो वाद मायबोलीवर पूर्वापार चालत आले आहेत. लोकं एखादे वाक्य प्रतिसादात टाकतात पण कुठे काय बोलायला / म्हणायला हवे याचे नियम व्यवस्थित कोणी देत नाही. अर्थात ते कळले तरी सवयीनेच काही शब्द तोंडात बसले गेले की ते तसेच बोलले वा म्हटले जातात Happy लिहिताना मात्र काळजी घेऊ शकतो.

Pages