अहो बाबा - संस्कारच तसले आहेत !

Submitted by ऋन्मेऽऽष on 6 May, 2021 - 02:18

दुसरा मुलगा मला आता तीन वर्षांपूर्वी झाला. पण त्या आधी चार वर्षे एकच मुलगी होती. बरेपैकी लाडावलेली होती. आय मीन आहे. कारण पहिली मुलगी व्हावी अशी मुळातच बरीच ईच्छा होती. ते एक असो, पण त्यामुळे मुलीशी नाते अगदी मैत्रीचे आहे. लहानपणी ती आधी मला नावाने हाक मारायची ते गोड वाटायचे. पुढे पप्पा बोलू लागली ते ही आवडू लागले. पण अहो जाहो नाही तर अरे तुरे, म्हणजे एकेरीच उल्लेख करू लागली ते ही छान वाटू लागले.
बरेचदा एकेरी उल्लेख म्हटले की आदर शून्य असा आपल्याकडे एक समज असतो. त्यामुळे मुलांना सहसा आपण मोठ्यांशी बोलताना अहो जाहोच बोलायला शिकवतो. तसे आम्हीही तेच शिकवले आहे. पण घरी मला ती आदर देतेय हे दाखवण्यासाठी म्हणून मुद्दाम अहो जाहो शिकवायची गरज नव्हती. म्हणून मग कौतुकाची फेज गेली तरी तिचे अरे तुरेच चालू दिले. आम्ही दोघेही त्यातच कम्फर्टेबल होतो.

तर यातूनच परवा एक किस्सा घडला.

मुलीची एक नवी मैत्रीण घरी आली. मुलीच्याच वयाची, सात वर्षांची. पहिल्याच भेटीत समजले की ती छान शिस्तीची, संस्कारी, शुद्ध आणि अगदी पुस्तकी मराठी बोलणारी आहे. आता यात गैर काही नाही, फक्त आमच्या घराच्या ऊलट वातावरणात वाढलेली आहे हे चटकन समजले ईतकेच. पण म्हटलं बरेय, तेवढेच आपली मुलगीही चार चांगल्या गोष्टी शिकेल. त्यामुळे साधारण कुठल्याही आईबाबांचे मुलांच्या मित्रमैत्रीणीशी जसे संवाद सुरू होतात तसे सुरू झाले. जसे की तू रोज सकाळी उठल्यावर ब्रश करतेस ना, आंघोळ करायला आळस तर नाही करत ना, ऑनलाईन लेक्चर बुडवतेस का? आमची मुलगी अशी तमुकअमुक वागते, तू तशी तर वागत नाहीस ना, सर्व भाज्या खातेस ना..शिकव जरा हिलाही.. वगैरे वगैरे..

मध्येच अचानक माझ्या मुलीने मला म्हटले, "अरे पप्पा, हे तर तू पण नाही करत..."
तू ??? .. ती मैत्रीण एकदम किंचाळलीच
कोण आहेत ते? पप्पा आहेत ना तुझे? तू काय बोलतेस त्यांना? तुम्ही बोलावे...

माझी मुलगी शॉक लागल्यासारखे माझ्याकडे बघू लागली. हे काय नवीनच? आपल्याच पप्पांना कश्याला तुम्ही बोलायचे??

आणि मी भूतकाळात गेलो........

मी स्वतःही माझ्या वडिलांना लहानपणापासून एकेरीच हाक मारायचो. आमच्या एकत्र कुटुंबात त्यांना भाऊ म्हणायचे म्हणून मी सुद्धा भाऊच म्हणू लागलो. पण ओ भाऊ नाही तर ए भाऊ. जवळपास वयाच्या विसाव्या वर्षीपर्यंत एकेरीच हाक मारायचो. पुढे मग कधी अहो जाहो करायला लागलो समजले नाही. पण आजही त्याचे वाईट वाटते. कुठेतरी मुलगा मोठा झाला की बापाशी असलेल्या मैत्रीच्या नात्यात थोडासा दुरावा येतो तसे झाल्यासारखे वाटले. हे अहो जाहो आदरातून आले नसून आमच्यातील आधीचे निखळ मैत्रीचे नाते कुठेतरी माझ्या वाढत्या वयातून आलेल्या अहंकाराने तुटल्याने झालेय असे आजही वाटते. आणि आता फिरून आधीसारखा एकेरी उल्लेख शक्य नाही होणार याचेही वाईट वाटते..

तर याच एकेरी उल्लेखाचा एक किस्सा घडलेला,

दहावीच्या क्लासला होतो आम्ही. एक मुलगी मला फार्र आवडायची. तसेही माझ्या शैक्षणिक कारकिर्दीत असे एकही वर्षे नाही की ज्यात मला एखादी मुलगी आवडली नसेल. तरीही दहावी म्हणजे बोर्डाची परीक्षा म्हणजे आपण मोठे झाल्यासारखे वाटू लागलेले. त्यामुळे या मुलीने हो, म्हणताच आपण पुढे जाऊन हिच्याशीच लग्न करायचे वगैरे असल्या प्रकारचे सिरीअस प्रेम होते. एकतर्फी प्रेमप्रकरणात जे सर्वात पहिले करतात ते केले होते. म्हणजे वर्गमित्रांमध्ये डिक्लेअर केले होते की ईथे मी नंबर लावलाय, जेणेकरून निदान आपला कोणी मित्र मध्येच घुसून त्रिकोण बनवायच्या भानगडीत पडत नाही. आणि शक्य ती मदतच करतात. अपवाद, आपल्या लंगोटी याराचा. तो त्याला जे किडे करायचे ते करतोच.

तर असेच आम्ही एकदा क्लास सुरु व्हायच्या आधी बाहेर जमलो होतो. सर लेट येणार होते, तर गप्पागोष्टींचा माहौल होता. कोण कसे आपल्या घरच्यांना घाबरत नाही, आपली घरात कशी चालते, आपल्याला कुठेही पिकनिकला जायचे असेल तर घरचे अडवत नाही, एखादा प्रोग्राम बनवायला दरवेळी घरच्यांची परवानगी लागत नाही, वगैरे वगैरे यावर चर्चा चालू होती. मुले बोलत होती, मुली ऐकत होत्या. ऐकणार्‍या मुलींमध्ये ती सुद्धा होती. ते पाहून आपणही काहीतरी बोलणे गरजेचे होते. पण मला कुठून दुर्बुद्धी झाली, आणि अतिशहाणपणा दाखवत मी म्हटले, माझे वडील तर माझे अगदी यारदोस्त आहेत. तुम्हाला तर माहीत आहे ना, मी त्यांना अहोजहो नाही तर अरेतुरेच बोलतो.

संस्कार !

मित्र पक्का पुणेरी. फक्त एवढेच म्हणाला, संस्कार !
पण असे काही म्हणाला की एकदम ठ्ठो !

मी यकायक धरती फट जाये और मे उस मे समा जाऊ मोड मध्ये गेलो. नालायकाने तिच्यासमोर माझ्या संस्कारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून माझी लाजच काढली होती.

पण सुदैवाने पुढच्याच क्षणाला सावरलो, आणि म्हणालो,

हो का,
मग आईच्या वेळी कुठे जातात हे...
संस्कार !

तिला बरे अरे तुरे करतोस.

खरे तर मी हे अंदाजानेच म्हणालो, कारण आपल्याकडे शंभरात ९५ घरात हेच चित्र असते. आणि माझाही तीर निशाणेपे Happy

आता मी काही पुणेकर नसल्याने किमान शब्द वापरून थांबलो नाही. आईला अरेतुरे करणे म्हणजे कसे प्रेम आणि आपुलकीची भावना असते, यात तिचा अनादर नसतो. मग बाबांच्या वेळीच का अहोजाहो मध्ये संस्कार आणि अरेतुरे मध्ये अनादर दिसावा? यावर सर येईपर्यंत १०-१५ मिनिटे त्याला छान लेक्चर दिला. हेतू एकच. हे सर्व ऐकणार्‍या तिला ईम्प्रेस करणे.
आता यामुळे म्हणा किंवा दुसर्‍या कारणामुळे म्हणा, आमचे पुढे काही काळासाठी जमलेही. तिच्याशीच लग्न करायचे स्वप्न काही पुर्ण झाले नाही ती गोष्ट वेगळी आणि ती पुन्हा कधीतरी स्वतंत्र लेखात...

पण आज फिरून तोच प्रश्न माझ्या मुलीला विचारला गेला होता. ते सुद्धा माझ्यासमोरच. आणि माझ्याकडे उत्तर तयार होते Happy

बाळ, तू आईला काय हाक मारतेस? ए आई की ओ आई?
ए आई ना? मग तिला नको का आदर द्यायला आपण?
देतो ना तिलाही आदर... ए आई बोलूनही आदर देता येतो ना..
आई आणि बाबा दोघेही एकसारखेच असतात आपल्यासाठी. जसे आईला आपण प्रेमाने आणि लाडाने ए आई बोलतो तसे पप्पांनाही ए पप्पा बोलायला काही हरकत नसते.

मी माझ्या परीने त्या मुलीला छान समजावले, पण एकंदरीत या वयात संस्कार हे नेहमी आपल्याच आईवडीलांकडून होत असल्याने तिला तिच्याच वडिलांची शिकवण योग्य वाटणार होती. त्यामुळे तिला माझे म्हणने शून्य पटले असे मला वाटले.
पण तिला पटो न पटो, माझ्या मुलीला मात्र ए पप्पामध्येही आदर प्रेम आपुलकी सारे असते हे पटले आणि आईबाबा एकसमान हि शिकाव्ण सुद्धा मिळाली हे माझ्यासाठी महत्वाचे ठरले Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तर ते अमेरीकन परवडतात ह्या बाबतीत.... बॉसला नावाने हाक मारली तरी हरकत नाही....
>>>>>>>
आमचे युरोपियन सुद्धा असेच आहेत. अर्थात ते लोकं तसे आमचे बॉस नाहीत. म्हणजे त्यांची टीम वेगळीच आहे. पण कोणीही उच्चपदस्थ असला तरी बाई डिफॉल्ट नावानेच हाक मारा हे बरे असते.

मी त्यांच्याशी मिटींग चालू असताना आमचा बॉस ज्याला मी ईतरवेळी सर बोलतो तो मिटींगमध्ये असेल तरी त्यालाही नावानेच हाक मारतो.
एकदा मला बॉसने विचारले की काय रे मिटींगाम्ध्ये मला सर नाही बोलत, नावाने हाक मारतोस.
मी त्यावर म्हटले की तो समोरचा माणूसही ईतका सिनिअर आहे, तुमच्यापेक्षाही, त्याला मी नावाने हाक मारतो, आणि त्याच्यासमोर तुम्हाला सर बोलतो तर त्याला कसे वाटेल?
बॉसला ते पटले. ईट्स ओके म्हणाला Proud

हीरा , प्रतिसाद आवडला.
फक्त वद , वच पासून बोल हा शब्द निघाला असेल असे वाटत नाही.
त्याला मराठी समानार्थी शब्द बोलणे असा दर्शवला आहे.

बोल हा शब्द ब्रू या भाषेतून निघाला असावा.
https://www.aplustopper.com/bru-dhatu-roop-in-sanskrit/

वद वरून वदले, वदलो असे शब्द मराठीत आहेतच.

सुंदर आम्ही दिसलो असतो, वदले छत्रपती !!

हरचंद पालव, देवकी, ऋन्मेष, रानभुली आभार.
ब्रू ब्रवीति हेसुद्धा आहेच. आणि अधिक जवळचे आहे.
मला वाटते, म्हणजे अंदाजानेच, बरळणे हे क्रियापद ब्रू वरून आले असावे.
गीतेमध्ये उवाच, आह ही रूपे अनेकदा येतात. बोलणे, सांगणे म्हणणे यातल्या छटांसाठी. अब्रवीत् सुद्धा असते अनेकदा

याचे नियम व्यवस्थित कोणी देत नाही. >>
नियम:
१..गाणे / कविता म्हणतात, बोलत नाहीत.
तो खूप छान गाणे बोलतो. बाळ एक कविता बोलून दाखव पाहू असे आपण "म्हणत" नाही.

नियम २. तुमच्या कडे याला काय "म्हणतात?" म्हणजे अमुक वस्तूला/बाबीला/गोष्टीला तुमच्याकडे कुठला शब्द वापरतात.
"तुमच्याकडे याला काय बोलतात?" असे "म्हणत" नाहीत.
अमक्या / अमकीला बोलणे म्हणजे सुनावणे. उदा. आज बायको मला बोलली. याचा अर्थ तिने माझ्याशी गप्पा मारल्या असे होत नाही तर मला तिने सुनावले असा अर्थ होतो.
तेच जर मला ऐवजी माझ्याशी म्हटले की अर्थ बदलतो.
बायको आज माझ्याशी खूप बोलली म्हणजे माझ्याशी खूप गप्पा मारल्या.

तुमच्याकडे डाळव्याला काय बोलतात? तसे विचारल्यास आम्ही डाळव्याला काही बोलत नाही, त्याने आमचे काही वाईट केले नाही असे ऐकण्याची तयारी ठेवावी.

३. तो काय म्हणाला? तो काय बोलला?
दोन्ही बरोबर आणि एकाच अर्थाने वापरले जाते.

४. मला असं म्हणायचंय...... = माझ्या म्हणण्याचा असा अर्थ आहे की ....
मला असं बोलायचंय... = मला अशा ठराविक पध्दतीने बोलायचे आहे.

५. त्यांचं म्हणणं ऐकून घ्या = त्यांची बाजू ऐकून घ्या.
त्यांचं बोलणं ऐकून घ्या = ते तुम्हाला आता काही सुनावणार आहेत ते (मुकाट्याने) ऐकून घ्या.

म्हणाला आणि बोलला ह्यात फरक आहे.
क्रिया कर्ता व क्रिया करवता ह्यावरून वापरले जातात.
उदाहरण म्हणजे,
मुखी गोड बोल बोलावे- करवून घेण्याची क्रिया.( करवता उल्लेख)
बोले तैसा चाले- करवून घेणे क्रिया आहे.
बोल लावणे वगैरे

आता, म्हणणे, म्हणणे इथे क्रिया कर्ता आहे. म्हणून, तुम्ही काय म्हणता? आम्ही असे म्हणतो , ते तसे म्हणाले.
तर, वदणे व वदवून घेणे हा क्रियेनुसार बदलतो.
कर्ता असेल तर, वदणे/वदला( राजा वदला, बघून एकटक..)
करवता असेल तर, ज्ञानेश्वरांनी, रेड्याकडून वेद वेदवून घेतले/ वदवले.
( इती मराठी प्रोफेसर काकाआजोबा)
नोटः त्यांनी शिकवलेले जसे आठवलय तसे लिहिलेय

भाषा भाषांच्या प्रांतानुसार, कालखंडानुसार, राजकीय/ सामाजिक स्थिर - अस्थिरतेनुसार लकबी, सवयी, रूपे बदलतात.
मुझ को अपने गले लगा लो हे वाक्य मुझि को अपने किंवा मुझु को अपने असे उच्चारले जाऊ शकते. मुझ मधला झ हा अर्धोच्चारित ठेवायचा नसे म्हणून असे उच्चार होत. आता छुप छुप खडी हो ह्यातला प बघा. किंवा अब के ना सावन बरसे मधल्या अब मधील ब बघा. अबु के ना वाटते ना? किंवा बाबुल मोरा नईहर मधला ल बघा. तो उच्चार पूर्णतेकडे नेण्याच्या प्रयत्नांत लि किंवा लु होतो. पन्नास साठ वर्षांपूर्वीपर्यंत हिंदुस्तानीमध्ये असे उच्चार होते. आज मात्र बनारसी हिंदीमध्ये अकारांत शब्दाक्षरे सरळ अर्धीच उच्चारतात. अब दे चे अब्दे होते आणि धर्मयुद्ध चे धर्म्युध होते. पूर्ण हा शब्द पुण्ण ( दोन्ही ण अर्धे आणि र गायब) असाच ऐकू येतो. कल की बातें हे कल्की बाते होते. बाय द वे, हे होते सुद्धा ' बनते ' कित्येकदा.
सो, जमाने जमाने की बात है.

अरे वा छान चर्चा चालली आहे.

हिरा, रानभुली, मानव, झंपी इंटरेस्टींग आणि माहितीपुर्ण प्रतिसाद.

अमक्याने मला हे सांगितलं असं म्हणायचं असेल तरी अमका हे बोलला हेही सर्रास ऐकू येतं. अमक्याने हे विचारलं असं असेल तरी अमका हे बोलला जास्त ऐकू येतं.

बोले तैसा चाले - ह्यात कोण आहे करवता? उलट कर्ताच आहे. हे कोण बोलले बोला राजहंस माझा निजला - कर्ता आहे. बोला अमृत बोला - कर्ता आहे. नाही मी बोलत नाथा - कर्त्री आहे.

प्रत्येक संस्कृतीचे, समुहाचे वावराचे स्वतःचे असे नियम असतात, यात संबोधनाचे नियमही आले. प्रसंगानुसार, कुणासोबत आहोत त्यानुसार वावर बदलतो.
पालकांना अरे-तुरे संबोधल्याने नाते आपोआप मैत्रीचे होत नाही आणि अहो-जाहो आहे म्हणजे मैत्री नाही असेही नाही. आदर दाखवायच्या प्रत्येक संस्कृतीच्या पद्धती आहेत. आम्ही नाही वाकून नमस्कार करत म्हणणारी मंडळी पूर्वेकडील लोकांना चारचारदा कमरेत वाकून अभिवादन करताना बघितली आहेत. योग्य देहबोली, डोळ्यातील भाव, आणि हाताची पकड यातून हस्तांदोलन करतानाही आदर दाखवता येतोच.
अमेरीका झाली तरी खंडप्राय देश आहे. काही भागात मोठ्यांशी बोलताना यस सर, यस मॅम म्हणायला मुलांना शिकवतात. तसेच मिस्टर 'अबक' म्हणून संबोधणे आणि त्यांनी यू कॅन कॉल मी ...असे म्हणून परवानगी दिल्यावर फर्स्ट नेम बेसीस हे मित्रांच्या पालकांच्या बाबतीत बरेचदा पाळले जाते. आपल्याकडे फ्रेंड्सच्या आईबाबांना काका, मावशी वगैरे म्हणतो तसे इथे अमेरीकन लोकांचे नाही पण एशियन लोकांचे असते. समोरच्या व्यक्तीला काय योग्य वाटेल , प्रसंग काय याचा विचार महत्वाचा.
इथे अमेरीकेत मिडलनेम म्हणून प्रकार असतो. काही वेळा लोकं हे मिडल नेम संबोधनासाठी वापरतात. त्याची इतकी सवय होते की फर्स्ट नेम-लास्ट नेम असा औपचारिक फॉर्म येतो तेव्हा हा कोण ? असे होते.
माझ्या मुलाच्या हायस्कूल ग्रॅजुएशनला त्याची इथली आजी(आमच्या मित्राची आई) मोठ्या प्रेमाने आली होती. समारंभ संपवून मुलं कुटुंबीयांना भेटायला आली तर इतर मुलांनी आपल्या आजी-आजोबांना मिठी मारली, माझ्या मुलाने आधी आजीला वाकून नमस्कार केला, आजीने डोक्यावरुन, गालावरुन हात फिरवत आलाबला घेतल्या आणि मग आजी नातवाच्या मिठीत विसावली. ७८ वर्षांच्या देशी आजीसाठी नातवाचे वाकून नमस्कार करणे, त्याला तोंडभरुन आशिर्वाद देणे हे सुखावणारे होते. अशावेळी इथे असे करत नाहीत म्हणणे, मला कुणी हसेल का असा विचार अयोग्य. नंतर त्याला काही पालकांनी 'तू तुझ्या आजीला भारतीय पद्धतीने भेटलास ते आम्हाला आवडले' असे आवर्जून सांगितले.

मोठ्या माणसांना वाकून नमस्कार नाही केला तर अपमान समजतात.. त्यांची चिडचिड होते म्हणून आदर असो वा नसो, वाकून नमस्कार करावा...त्यांच्या आनंदा साठी...

एकदम जुनी लोकं असतात त्यांच्याशी वागायचे नियम सोपे असतात, मात्र मधली जनरेशन आहे त्यांना काय आवडेल, काय नाही त्याचा काही नेम नाही. वाकून नमस्कार केल्यावर एवढी काही मी म्हातारी झाले नाही असे फटकारले गेल्याचा किस्सा ऐकलाय. तात्पर्य तुम्हाला चालेल ना म्हणून परवानगी घ्यावी.

इथे अमेरीकेत मिडलनेम म्हणून प्रकार असतो. काही वेळा लोकं हे मिडल नेम संबोधनासाठी वापरतात >> शाळेत असताना वात्रट पोरं एकमेकांना मुद्दाम वडिलांच्या नावाने हाक मारायची, त्याची आठवण झाली. मराठी माध्यमातील मुलांना कदाचित आठवत असेल हा प्रकार Happy

पारंबीला का आत्मा नाही! पारंबीला का जीव नाही!
आत्म्याला सुद्धा भावना असतात बरे श्याम !
त्याला दुखवू नकोस बरे!

इथे अमेरीकेत मिडलनेम म्हणून प्रकार असतो. काही वेळा लोकं हे मिडल नेम संबोधनासाठी वापरतात. त्याची इतकी सवय होते की फर्स्ट नेम-लास्ट नेम असा औपचारिक फॉर्म येतो तेव्हा हा कोण ? असे होते.
>>>>>>>>

हे मिडलनेम म्हणजे वडिलांचेच नाव का? की आणखी काही प्रकार असतो?

'अहो-जाहो/ अरे-तुरे' आणि आदरः अशी चर्चा सुरू आहे तर मला बरेच दिवस पडलेला एक प्रश्न विचारते.
माझी मुलगी २-३ छंदवर्गांना जाते. गायन, नाच, चित्रकला इत्यादी. हे छंदवर्ग घेणार्‍या बर्‍याचश्या बायका माझ्याच वयाच्या असतात. मुलीला रोज तिकडे सोडणे आणि आणणे यामुळे त्या बाईंची आणि माझी बर्‍यापैकी दोस्ती होते. त्यामुळे सुरवातीचे "अहो-जाहो" जाऊन आम्ही अग-तुग वर येतो. म्हणजे बर्‍याचदा त्या मॅडमकडूनच प्रस्ताव येतो की "आपण दोघी एकाच वयाच्या आहोत ना मग 'अहो-जाहो' कशाला?"
माझ्या ज्या कोणी मैत्रीणी असतात (शाळेतल्या, कॉलेजातल्या, ऑफिसमधल्या) त्यांना माझी मुलगी 'अग मावशी' असंच म्हणते. पण क्लासच्या सुरवातीच्या दिवसात मी मुलीला शिकवते की, 'क्लासच्या मॅडमना अहो म्हणावे.' त्यामुळे तिला मग नंतर फारच प्रश्न पडतो की आता ह्या मॅडमना अहो म्हणावे की अग मावशी? माझ्याकडे तरी ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर नाही.
हल्ली ही समस्या तिच्या शाळेतल्या काही शिक्षिकांच्या बाबतीत पण येऊ लागलीये. कारण अनेकदा PTA meetings ना गेल्याने किंवा शाळेत voluntary काम केल्याने अनेक शिक्षिकांशीही माझी मैत्री झाली आहे. त्यामुळे मी त्यांनाही 'अग/ अरे' म्हणायला सुरवात केली आहे. अनेक शिक्षिका/ शिक्षक माझ्यापेक्षा १० वर्षे लहानही आहेत. त्यांमुळे घरात त्यांच्या बद्दल बोलताना मी आणि नवरा त्यांचा उल्लेख एकेरीत करतो. पण त्याच बरोबर आम्हाला असेही वाटते की, आमच्या मुलीने शिक्षकांना आदर द्यावा आणि 'अहो-जाहो' म्हणावे. पण आदर दाखवण्यासाठी अहो-जाहो करायची गरज नाही असा मतप्रवाह बर्‍यापैकी प्रबल होते आहे हल्ली. काय योग्य? काय अयोग्य? कसं ठरवायचे?

^^
अशा केस मध्ये विद्यार्थिनीच्या भूमिकेत असताना शिक्षक/शिक्षिकांना अहो जाहो करणे योग्य राहील. बाहेर व्यक्तिगत आयुष्यात भेटल्यावर अरे/अग ठीक आहे (अर्थात त्या शिक्षक/शिक्षिकांशी तसे नाते असेल तर). माझ्या लहानपणी जवळच्या नात्यातल्या शिक्षिका होत्या त्यांना शाळेत/वर्गात चुकूनही मी कधी एकेरी बोलवल्याचे मला आठवत नाही. घरी वा बाहेर जिथे विद्यार्थी भूमिकेत नसायचो तिथे मात्र एकेरी बोलवायचो. (जसे कि तुमची कन्या मॅडमना मावशी म्हणते).

अतुल+१
त्या त्या सेटअपमध्ये जे योग्य संबोधन असेल ते वापरावं. ज्या शिक्षकांची मुलं त्यांच्याच शाळेत शिकत असतात, त्यांना ती मुलं शाळेत 'सर/ मॅडम' असंच हाक मारताना लहानपणी पाहिलेलं आहे.

अरेच्चा ! त्या दुस-या धाग्यावरचा बदला इकडे घ्यायला अज्ञान बालक पण आले का ? हा धागा आयडीच्या नावाच्या व्याकरणाचा आहे का ? असेल तर अज्ञान बालक की अज्ञानी बालक की अज्ञात बालक यावर हीरा यांच्यासारखे तज्ञ प्रकाश टाकतीलच. विषय तो नसेल तर कृपया कळवावे.

>>हे मिडलनेम म्हणजे वडिलांचेच नाव का? की आणखी काही प्रकार असतो?>>
आईचे माहेरचे आडनाव किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीचे नाव किंवा काहीही आवडते नाव असे असते. बरेचदा पालक मुलांना जाब विचारताना, वावगे वागण्यापासून थांबवताना 'I mean it!' हे दाखवण्यासाठी पहिले नाव आणि मिडल नाव घेवून संबोधतात. उदा नुसत्या मेरी ऐवजी मेरी बेथ म्हणून हाक आली की समजायचे आता काही खरे नाही. काही वेळा हाक मारायला पहिले नाव आणि मधले नाव याचे पहिले अक्षर वापरले जाते. काही वेळा लोकं पहिल्या नावाचे पहिले अक्षर आणि मधले नाव पूर्ण असेही वापरतात आणि काही जण मधले नाव हेच पहिले नाव असल्यासारखे वापरतात.

Pages